मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांची शोकांतिका

थोर औलिया चित्रकार आणि पंढरपूरचे सुपुत्र मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांचे नुकतेच ९ जून रोजी लंडन येथील एका रुग्णालयात वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. हा अनवाणी हिंडणारा खालिस हिंदुस्तानी कलावंत माणूस अगदी मनसोक्त आणि वादांनी वेढलेले आयुष्य जगला. हुसैन ह्यांनी ७०च्या सुरवातीला काही सरस्वतीची आणि इतर देवदेवतांची निर्वस्त्र चित्रे काढली होती. त्यांच्या ह्या चित्रांचे भांडवल ९०च्या दशकात हिंदुत्ववाद्यांनी केले. त्याच्या चित्राच्या प्रदर्शनांवर संधी मिळेल तशी आणि तिथे हल्ले केले. त्यांच्यावर गावोगावी ९००च्या वर खटलेही दाखल केले. परिणाम असा झाला की, नव्वदीतले हुसैन अखेरच्या काळात मायदेशी परतू शकले नाही.

हुसैनसारख्या थोर कलावंताला वृद्धापकाळात परागंदा व्हावे लागले. मायदेशापासून दूर लंडनात त्यांचा मृत्यू झाला. तर प्रश्न आणि चर्चेचा मुद्दा असा की, हे असे होणे ही आपल्या समाजाची शोकांतिका नाही काय? असे का व्हावे? हुसैन ह्यांचा मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या मनोवृत्तींना, प्रवृत्तींना काय म्हणायचे ? आपला देश नक्की कुठे चालला आहे?

मक़बूल फ़िदा हुसैन
मक़बूल फ़िदा हुसैन

जाता-जाता:
मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा म्हणून शशी थरूरसारख्यांचे प्रयत्न चालू होते. किमान मरणोपरान्त हा सन्मान हुसैन ह्यांना मिळायला हवा असे तुम्हाला वाटत नाही का?

Comments

नो भारतरत्न प्लीज

भारतरत्न पुरस्कार का दिला जातो याबद्दल एखादा लेख कोणीतरी टाकावा ही विनंती. माझ्यामते जर क्रीडाप्रकारात भारतरत्न दिला जात नसेल तर कलाप्रकारातही दिला जाऊ नये.

मला कलेची जाण नसेल म्हणून कदाचित हुसेनचाचांच्या फराट्यांमागचे भीषण वास्तव समजले नसावे. ते ग्रेट असले तरी भारतरत्न व्हावे किंवा आहेत असं मला वाटत नाही. कोची आयपीयल (आणि सुनंदा पुश्कर वगैरे)लफड्यात पडून थरूरसारख्यांनी अगोदरच निष्कारण आपली विश्वासार्हता कमी करून घेतली आहे. थरूर निवडून आले असले तरी कोणत्याही प्रकारे भारतीय व्यक्तींचे किंवा संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात असे वाटत नाही. शोभा डे टाईप कॉस्मोग्लोबल वाटतात.

समाजसेवक, शास्त्रज्ञ, उद्योगपती यांच्यातले कोणी या ना त्या मार्गाने देशाच्या प्रगतीला हातभार लावणार्‍या लोकांना भारतरत्न म्हणावे असे मला वाटते. फारच वाद होत असतील तर् पुरस्कार बंद करावा. आपल्या शेजारी देशांना आणि अंतर्गत प्रश्नांत लुडबुड करणार्‍यांना सडेतोड उत्तर देण्याची धमक भारत देशात आल्यावर सर्वांना बिनधास्त पुरस्कार द्यावा.

मरणोपरांतच द्यायचा असेल तर बरीच मोठी यादी आहे. हुसेनयांचा नंबर खूप खाली आहे. जसा कसाब आणि अफजल गुरुचा फाशीच्या लिस्ट मध्ये आहे.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

अनुचित

हुसेनयांचा नंबर खूप खाली आहे. जसा कसाब आणि अफजल गुरुचा फाशीच्या लिस्ट मध्ये आहे.
अत्यंत अनुचित विधान. या दोन बाबींचा काय संबंध आहे ?

संबंध आहे

आप कतार मे है एवढंच. वरचे लोक संपल्याशिवाय अफजलला फाशी दिली जाणार नाही. तसेच आधीच्या पात्र लोकांना भारतरत्न दिल्याशिवाय हुसेन याना दिला जाऊ नये.(मरणोत्तर द्यायचा झाला तर)

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

शोकांतिका

ही एक शोकांतिकाच नव्हे तर हा आपला करंटेपणाच आहे. वयाची ९२-९३ वर्षे या देशात काढून झाल्यावर एखाद्या माणसाला असं सळो की पळो करून सोडून देश सोडायला लावणं आणि आयुष्याची अखेर देशाबाहेरच येणं हे सगळं संवेदनशीलतेला चूड लावणारं आहे. सिंहासनावरून पदच्युत झालेला, ब्रह्मदेशात एका तुरुंगात मृत्यू आलेला बहादूरशाह "जफर" स्वतःविषयी जे म्हणतो तोच आता हुसैन यांचा एपिटाफ आहे :

"दो आरजू में कट गये, दो इन्तिजार में कितना है बदनसीब 'जफर' दफ्न के लिये दो गज जमीं भी न मिली कू-ए-यार में। "

कटी उम्र होटलों में मरे अस्पताल जाकर

भावनांशी सहमत आहे. स्वतः हुसैन ह्यांना शेराशायरीची चांगली परख होती. ते कवीही होते. स्वतःच्या जीवनशैलीवर टिप्पणी करताना हुसैन अकबर इलाहाबादीचा "हुए इस तरह मुहज़्ज़ब कभी घर का मुंह ना देखा | कटी उम्र होटलों में मरे अस्पताल जाकर " हा शेर ऐकवत असत. (मुहज़्ज़ब म्हणजे सुसंस्कृत)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

युजीन् ओ'नील

युजीन ओ'नील या नोबेलविजेत्या अमेरिकन नाटककाराचे मरणसमयीचे उद्गार आहेत : "I knew it. I knew it. Born in a hotel room - and God damn it - died in a hotel room."

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

सहमत, चांगले शेर

सहमत. या बाबतीत उद्धृत केलेले शेर सुयोग्य आहेत.

वादग्रस्त चित्रे अनादर व्यक्त करणारी नाहीत, असे माझे मत आहे.

(अनादर व्यक्त करणारी चित्रे असती, तरी सुद्धा ठीकच आहेत. पण) ही चित्रे अनादर व्यक्त न-करतासुद्धा त्यांच्याबद्दल विपरित प्रचार करून क्षोभ उसळवला गेला हे विशेष करून काळजी करण्यासारखे आहे.

अवलिया आणि कलंदर

हुसेन यांच्या कलेचे रसग्रहण करण्याइतकी माझी चित्रकलेची जाण नाही, पण या ना त्या कारणाने सतत वादांमध्ये, आणि त्यामुळे प्रकाशात राहाण्याचे कसब बाकी त्यांच्यात होते हे नक्की. या निमित्ताने अवलिया आणि कलंदरपणा म्हणजे काय आणि तो असला म्हणजे कलाकार मोठा होतो का यावर एकदा चर्चा व्हायला हवी. चारचौघांपेक्षा वेगळे आयुष्य जगणारा त्याच्या मितीत कदाचित चारचौघांसारखेच आयुष्य जगत असेल या अर्थाचे थोरोचे एक वाक्य आहे, पण चपला न वापरण्याने माणूस मोठा कलाकार कसा होतो? हुसेन यांची कला असेलही मोठी, पण त्या कलेला हुसेन यांच्या चमत्कारिकपणाने चार चांद कसे लागतात ते मला तरी कळत नाही.
हुसेन यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणारी धत्ताड धत्ताड पालीझुरळे चिरायु होवोत. (ती होतीलच, त्यांना माझ्या शुभेच्छांची गरज नाही). 'आपल्या' हिंदू देवतांची विकृत चित्रे काढणारं थेरडं चचलं असे शब्द वापरावेसे वापरणार्‍यांना त्याच हिंदू देवता सद्बुद्धी देवोत.
आणि मायदेशातून हकालपट्टी होणे हे कलाकारांना काही नवीन नाही. वुडहाऊसपासून तस्लिमा नसरीनपर्यंत हे होत आलेले आहे. मायबाप भारत सरकारने आता हुसेन यांना शांतपणे कबरीत चिरनिद्रा घेऊ द्यावी. जिवंत असताना जीविताची हमीही देऊ न शकणार्‍या सरकारने आता हुसेन यांना भारतरत्न देण्याचा विचार करणे यापरता दुटप्पीपणा नाही.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

नाराज पालीझुरळे

हुसेन यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणारी धत्ताड धत्ताड पालीझुरळे चिरायु होवोत. (ती होतीलच, त्यांना माझ्या शुभेच्छांची गरज नाही).

म. फि. हुसैन यांनी पालींची आणि झुरळांची चित्रे काढली कधी काढली नाहीत. त्यामुळे नाराज झालेल्या पालीझुरळांनी अशाप्रकारे आनंद व्यक्त केला असावा.

निषेध

हुसेन यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणारी धत्ताड धत्ताड पालीझुरळे चिरायु होवोत. (ती होतीलच, त्यांना माझ्या शुभेच्छांची गरज नाही).

समस्त पालीझुरळांचा अपमान करणारी सडकी प्रतीक्रिया टाकल्याबद्दल संजोपरावांचा निषेध. ह्या वाक्याद्वारे श्री.संजोपराव ह्यांनी पालीझुरळांना हीनतेने लेखून अपमान केलेला आहे.हा अपमान पालीझुरळ समुदायाचा अपमान आहे, एका मताशी बांधलेल्या कित्येक पालीझुरळांचा प्रत्येकाचा पालीझुरळशः अपमान आहे.

ज्या पध्दतीनं श्री. संजोपराव ह्यांनी जाहीररित्या हा अपमान केला आहे त्याच पध्दतीनं त्यांनी समस्त पालीझुरळांची ह्या अपमानकारक वाक्याबद्दल जाहीर माफी मागितलीच पाहिजे.

(हो मला झुरळ असण्याचा अभीमान आहे.)

मकबूल फिदा हुसेन

मकबूल फिदा हुसेन यांची चित्रे मला आवडतात. अतिशय वेधक आणि कुंचल्याचे ठळक फटकारे ही मला जाणवलेली वैशिष्टे. वेगवेगळे विषय त्याने हाताळले. त्याची रंगचित्रे इथे पाहता येतात. तसेच अन्यत्रही दिसतात.

हुसेनचे घोडे हे चित्रकारांमधे चवीने बोलला जाणारा विषय आहे. त्याच बरोबर स्टंटस ही अनेक. एकदा त्यांनी श्वेतांबरा नावाचे प्रदर्शन केले होते ज्याची आठवण माझे मित्र सांगतात. या प्रदर्शनात जमीनीवर कागद पसरवून ठेवले होते. (चित्रेही फारशी नसावीत.) असे असले तरी हुसेनांच्या चित्राबद्दल आदर सर्वत्र आहे.

माझ्या मते देवी देवतांची त्यांनी काढलेली चित्रे ही कुठेही अनादर दाखवत नाहीत. (देवी देवतांविषयी विनोदयुक्त अनादर दाखवण्याची परंपरा अगदी पुराणकाळा पासून असावी. पौराणिक चित्रपट वा तत्सम सिनेमात काही देवी देवतांची टिंगल दिसते. तमाशातला कृष्ण, नारद, भोळा सांब इत्यादी) या उलट ती चित्रे एक वेगळा भाव त्यातून आणतात. ही चित्रे त्यांनी स्टंट म्हणून केलेली दिसत नाहीत. अशा पद्धतीने चित्र रंगवण्यास आक्षेप असण्याचे कारण नाही.

जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी होता. यामुळे समस्त चित्रकारांमधे तथाकथित हिंदुत्ववाद्यांबद्दल बरीचशी कटुता आहे. असा अनाकलनीय विरोध फक्त चित्रकारांसाठीच आहे असे वाटावे अशी परिस्थिती आहे. फक्त हुसेनपर्यंत हे प्रकार थांबले नाहीत. तर मधे बडोद्यात असेच काहीसे घडले. अगदी ठाण्यात एक छोटेसे प्रदर्शन भरले होते. त्यातील गणपतीची चित्रे काही जणांना आवडली नाहीत आणि त्यावर त्यांनी आक्षेप घेतला. हे दोन्ही प्रसंग भिन्न धर्मियांच्या बाबतीतले नाहीत. मला भेटलेल्या कित्येक चित्रकारांच्या मते गणपतीची प्रतिमा ही एक प्रकारचा पारंपारिक आर्ट फॉर्म आहे. आणि त्यावर असे आक्षेप येणे हे कलाप्रकाराचाच संकोच करण्यासारखे आहे. एरवी सहिष्णू (टॉलरंट) असलेली भारतीय परंपरा येथे भंग पावते. तिची जागा तालीबानी (अतिरेकी) हिंदुत्ववादी घेतात.

या प्रकारात जी स्ट्रॅटेजी वापरण्यात आली ती भारतीय न्यायव्यवस्थेचे वाभाडे काढणारी आहे. खटले वेळेत निकाली न काढणे (त्या योगे खटले चालणे हीच एक शिक्षा होणे.) आणि ठिकठिकाणी एकाच प्रकारावर खटले करणे हे अत्यंत अयोग्य आहे. हुसेन यांना खटल्यातून दोषी न ठरवता शिक्षा देण्याचा हा प्रकार अतिशय भीतिदायक आहे. याची पुनरावृत्ती कुठेही होऊ शकते.

हिंदुत्ववाद्यांना बहुदा हुसेन यांचे नाव खुपत असावे. मग त्यांनी आपल्या देवतांची चित्रे का नाही काढली असा चपखल प्रश्न ते वारंवार विचारतात. चित्रे आणि मूर्त्या काढण्याची मुस्लिम धर्मात परंपरा नाही. अगदी माणसांची चित्रे काढण्यास बंदी असावी. दुसर्‍या धर्मातील देवतांची चित्रे काढणे ही तर त्यातील ब्लासफेमीच. हुसेन यांची चित्रे त्या दृष्टीने तालिबानी मुस्लिमात रुचणारी असणार नाही. त्यामुळे त्यांची चित्रे ही प्रस्थापित इस्लामिक विचारांविरुद्धचे बंड मानले पाहिजे.

हल्ली वाचनात आले की पंढरपूरच्या देवालयातील पुजार्‍याने सांगितल्यावरून हुसेन यांनी देवालयाला एक चित्र करून दिले. या चित्राचे प्रदर्शन ते कधीतरी करतात.

हुसेन हे उच्चकोटीचे चित्रकार होते त्यांना आतापर्यंत पद्मविभूषण मिळाले आहे. भारतरत्न पुरस्कारही द्यावा या मताचा मी आहे. या देशातून हाकलून देण्याच्या शिक्षेपुढे हा पुरस्कार मात्र फार कमी पडेल असे वाटते. (अमेरिकेतून हाकलून दिलेले चार्ली चॅप्लिन आठवतात.)

प्रमोद

माहितीपूर्ण आणि चंतनीय

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रमोदजी यांचा प्रतिसाद माहितीपूर्ण तसेच अर्थपूर्ण,समंजस आणि संतुलित आहे.त्यांनी निदर्शनाला आणून दिलेले सत्य:
"हुसेन यांना खटल्यातून दोषी न ठरवता शिक्षा देण्याचा हा प्रकार अतिशय भीतिदायक आहे. याची पुनरावृत्ती कुठेही होऊ शकते." चिंतनीय आहे.
.
चार/पाच दिवसांपूर्वी वाचलेली एक बातमी : एक वालुकाशिल्पी समुद्रकिनार्‍यावर एम्.एफ्.हुसेन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे वालुकाशिल्प निर्माण करयाण्यात मग्न होता.काही वेळात तिथे ७/८ टग्यांचे टोळके आले. त्यांनी ते शिल्प उध्वस्त केले. शिल्पकाराला लाथा मारल्या आणि दम दिला," पुन्हा असला पुतळा करशील तर याद राख.हात तोडू. " तर असा हा भयावह धर्मोन्माद!

धन्यवाद

धन्यवाद, हुसेन गेल्यानंतर तरी त्यांची चित्रे बघायला मिळाली!!

अश्या चीत्रांची समीशा/रसग्रहण/टीका वगैरेच्या लिंका आपणास माहीती आसल्यास कृपया पाठवाव्यात. धन्यवाद!!

मंदार जोशी

खेद

अस्मिता आणि अभिव्यक्तीचा वाद जुना आहे, हुसेन तिकडे गेले हि खेदाची बाब असू शकते.

बाकी भारतरत्न वगैरेला फारसा अर्थ नाही, ज्या लोकांना भारत-रत्न दिले जाते त्यांचामुळे भारत-रत्न खिताबाला महत्व आले आहे, अशा लोकांना भारत-रत्न देणे बहुदा देणाऱ्याची गरज असावी.

देणाऱ्याची गरज

हुसेन यांच्याबाबतीत असायला हवी होती, हे तर खरे ?

वाद

जेव्हा ७० च्या दशकात त्यांनी ही चित्रे काढली तेव्हा काही वाद झाला होता का? याबाबत कोणी बुजुर्ग माहिती देऊ शकतील का?

की त्या भडकलेल्या काळात ही चित्रे शोधून काढण्यात आली होती?

बाकी ७० च्या दशकातल्या चित्रांवर ९० च्या दशकात गदारोळ यात विशेष काही वाटले नाही. ९० वजा ७० ही वजाबाकी ४०० वर्षांपेक्षा खूपच कमी येते.

नितिन थत्ते

थोर ?

मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा म्हणून शशी थरूरसारख्यांचे प्रयत्न चालू होते. किमान मरणोपरान्त हा सन्मान हुसैन ह्यांना मिळायला हवा असे तुम्हाला वाटत नाही का?

असे झाल्यास , आमच्या सारखे षंढ आम्हीच

वाईट वाटते

(मला त्यांची चित्रे जरी फारशी आवड्त / समजत नसली तरी ) हुसेन यांना परागंदा व्हावे लागले याचे वाईट वाटते.
बाकी. भारतरत्न देण्याइतके कार्य आहे का हा सापेक्ष वाद आहे. माझ्यामते नाही

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

दोन मुद्दे

भावना दुखावण्याचे स्वातंत्र्य हा मॅटर ऑफ जजमेंट असल्यामुळे हुसेन यांना माझा पाठिंबा आहे.
भावना दुखावल्या की नाही हा मॅटर ऑफ फॅक्ट* असल्यामुळे पास (मात्र, या मुद्यावर हुसेन यांचे 'निरपराधित्व' सिद्ध करण्याच्या अपॉलोजेटिक्समागे, भावना दुखावण्याचे स्वातंत्र्य नाकारणे मान्य करणारी अपराधी मनोवृत्ती (गिल्ट कॉन्शन्स) असते असे मला वाटते). भावना दुखावल्या नाहीत असे मान्य केले तरीही, मुख्य प्रवाहाची आवड व्याख्येनुसारच वल्गर असते. त्यामुळे, हुसेन यांचे कलाक्षेत्रातील श्रेष्ठत्व/असामान्यत्व गृहित धरण्याबाबत मी साशंक आहे. ते एक गर्दीखेचू व्यक्तिमत्व होते असे मला वाटते आणि मला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटत नाही.

* किंबहुना, एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातील/गेल्या की नाही त्याविषयी अचूक भाकित/भाष्य करणे तिर्‍हाइताला शक्य नसते. भावना हा विवेकाचा अभाव असल्यामुळे, भाकित/भाष्य करण्याचे प्रयत्नसुद्धा करू नयेत.

भावना कशामुळे दुखावल्या?

नवचित्रकला आवर्जून पहाणा-यांची संख्या अत्यल्प असल्यामुळे हुसेन यांची ती आक्षेपार्ह चित्रे कदाचित कोणी पाहिली नसती आणि त्यातला अमूर्त अर्थ कोणाला नीटसा समजला नसता. पण प्रक्षोभक भाषेत लिहिलेले अर्थ त्यांना चिकटवून ती चित्रे इंटरनेटवरून सरसकट सगळ्यांना फॉरवर्ड केली गेली होती. हे करत असतांना त्यामुळे अनिष्ट आणि आक्षेपार्ह चित्रांना अवास्तव प्रसिद्धी मिळत आहे याचे भान ठेवले गेले होते का याचा विचार व्हायला हवा. असली चित्रे काढण्यात हुसेन यांचा दोष आहे, पण त्यांनी ती चित्रे दाखवून कोणाला डिवचले नव्हते. त्याच्या चित्रांचा भरमसाट प्रसार करणारे माझ्या मते जास्त दोषी आहेत. असली (घाणेरडी) चित्रे कोणी काढली म्हणून ती दाखवण्याची काय गरज होती? त्यांना घराघरात नेण्याचे काम कुणी केले ? इतर नवकलाकारांनी काढलेली चित्रे सोवळी आहेत का? त्यांच्यामुळे भावना का दुखावल्या जात नाहीत?

एकाद्या माणसाला भारतरत्न हा बहुमान देण्यासाठी तो सर्वांना आदरणीय वाटला पाहिजे. हुसेन यांच्या बाबतीत तसे नव्हते. असे मला वाटते.

प्रदर्शन

पण त्यांनी ती चित्रे दाखवून कोणाला डिवचले नव्हते.

चित्रे दाखवण्यासाठीच काढली जातात , मग प्रदर्शन वगैरेचे प्रयोजन काय ?
ती चित्रे जर "स्वान्त सुखाय " म्हणून काढली असती तर, स्वतःच्या च घरी ठेवली असती

दोन पैसे

हुसैन ह्यांचा मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या मनोवृत्तींना, प्रवृत्तींना काय म्हणायचे ?

ही तालिबानी/ब्रिगेडी मनोवृत्ती आहे.

आपला देश नक्की कुठे चालला आहे?

हे अपमान होणे, भावना दुखावणे याचे फारच स्तोम माजले आहे. विरोधही अधिकाधिक हिंस्त्र होत चालला आहे. हे निश्चितच चिंताजनक आहे.

मफिहु यांची चित्रे मला अजिबातच आक्षेपार्ह वाटत नाहीत. काहींना ती आक्षेपार्ह वाटणे आश्चर्यकारक नाही पण ही चित्रे केव्हा काढली आणि केव्हा आक्षेपार्ह वाटायला लागली हे पाहता त्यामागे काही कारस्थान असावे असे वाटते. भारतरत्न या पुरस्काराबद्दल फारसा आदर नसल्याने तो दिल्याने किंवा न दिल्याने काहीच फरक पडेल असे वाटत नाही.

मफिहु यांना हाकलण्यात आले किंवा परतणे शक्य नव्हते हे मला नविन आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी (त्यांच्यामागे खटल्यांचा ससेमिरा लागल्याने) स्वत:हून भारत सोडून जाण्याचे ठरवले होते. अर्थात ही माहिती चुकीची असण्याची पूर्ण शक्यता आहे. अशा प्रकारे छळल्या गेलेल्या अनेक कलावंत/ साहित्यिकांकडे देश सोडून इतरत्र आश्रय घेण्याचा पर्याय उपलब्ध नसतो, काही तसा पर्याय उपलब्ध असूनही देश सोडून जात नाहीत. त्यांच्याकडे पाहता मफिहु यांच्या देश सोडण्याविषयी मला फारशी सहानुभुती वाटत नाही.

:)

चाबकाने पार्श्वभाग सडकवल्या गेल्या पाहिजे ह्या हिंदुत्ववाद्यांच्या :) बाय द वे कोणी ती निर्वस्त्र चित्रे कुठे मिळतील ते सांगु शकेल काय ? जो तो फक्त हुसेन ला त्या चित्रांमुळे हकलले म्हणुन सांगतो , चित्रं मात्र दाखवत नाही :(
बाकी अनेकांना हुशेन चा एवढा पुळका आहे की त्याच्या मृत्यूवर कोणाला आनंद झाला तर हे त्याची किव वगैरे करतात , हे बघुन मात्र डोळे पाणावले.

- गद्दाफी

चिन्ह् मासिक

चिन्ह या मासिकाचा नवा अंक प्रकाशित होत आहे. त्यात हुसेनविषयी लेख असणार आहेत. नग्नता हा या अंकाचा विषय आहे. अनेक नामवंतांनी त्यात लिहिले आहे. ( हुसेन मरायच्या आधी. ) चिन्हची वेबसाईट आणि ब्लॉग जरूर बघावा.

चिन्ह

चिन्हची वेबसाईट आणि ब्लॉग जरूर बघावा.

कृपया या संकेतस्थळाचा दुवा(लिंक) द्यावा.

'चिन्ह' दुवे

चिन्ह या मासिकाचा नवा अंक प्रकाशित होत आहे. त्यात हुसेनविषयी लेख असणार आहेत. नग्नता हा या अंकाचा विषय आहे. अनेक नामवंतांनी त्यात लिहिले आहे. ( हुसेन मरायच्या आधी. )

मला असं कळलं होतं की या येणार्‍या अंकाबद्दल त्यांना चिकार धमक्या वगैरे येत आहेत.

चिन्हचे काही दुवे:
http://chinhatheartblog.blogspot.com/
http://www.chinha.in/marathi/archive.html (जुने अंक इथे चाळता येतील).
http://chinhatheblog.blogspot.com/ (मुख्यतः कलाशि़क्षणातले गैरव्यवहार आणि दिरंगाई वगैरे)
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

धन्यवाद

दुव्यांबद्दल आभार.

मला असं कळलं होतं की या येणार्‍या अंकाबद्दल त्यांना चिकार धमक्या वगैरे येत आहेत.

अंक प्रसिद्ध होऊ नये म्हणून आलेले निरोप भारीच मनोरंजक आहेत. अमराठी लोकांना या अंकाबद्दल माहीत असावे (त्यांनी आवर्जून निरोपही धाडावेत) यावरून हिंदुत्ववादी कसे पद्धतशीरपणे अपप्रचार करतात हे ध्यानी यावे.

+१००

अमराठी लोकांना या अंकाबद्दल माहीत असावे (त्यांनी आवर्जून निरोपही धाडावेत) यावरून हिंदुत्ववादी कसे पद्धतशीरपणे अपप्रचार करतात हे ध्यानी यावे.
यावर उपक्रमावरील अभ्यासु सदस्य श्री. विकास यांचा प्रतीसाद वाचायला आवडेल.

आभार

माहितीबद्दल चिमा यांचे आणि दुव्यांबद्दल चिंजंचे आभार.

ब्लॉगवर धमक्यांचे विरोप, पत्रं आणि एसेमेस आहेत. अत्यंत गंभीर असे हे प्रकरण आहे. याची आतापर्यंत कुणालाच दखल घ्यावीशी वाटली नाही हे देखील काळजी करण्यासारखे आहेत. सतीश नाईक आणि त्यांच्या टीमच्या धाडसाला सलाम. त्यांनी लिहिल्याप्रमाणे हिंदू असण्याची लाज वाटावी अशी पत्रे त्यांना आलेली आहेत. तरी हे सगळे फारसे प्रसिद्धीस आले नाही हेही बरेच. नाहीतर नाईकांना आणखी त्रास झाला असता.
उगाचच तालिबानींनी बुद्धाची मुर्ती फोडली म्हणून त्यांना नावे कशाला ठेवायची. आता इथे देखील तीच प्रवृत्ती वाढताना दिसत आहे.

- ओंकार.

जय हो!

आपण कसे निधर्मी आहोत हे दाखवण्याबद्दलची चढाओढ पाहून धन्य वाटलं.
हुसेनने ती नग्न चित्र का काढली हे तरी जाणून घ्यायला हवं होतं...पण नाही.
हुसेनने हिटलरचे नग्न चित्र काढलंय...त्याबद्दल त्याला विचारण्यात आलं होतं..की का रे बाबा,तू हिटलरला नागवं का दाखवलंस?
त्यावर त्याने दिलेले उत्तर आहे...मी ज्याचा तिरस्कार करतो त्यांना मी चित्रात नागवं दाखवतो.
ही प्रतिक्रिया लक्षात घेतली तर...हिंदू देवींची नग्न चित्रं त्याने कोणत्या दृष्टीकोनातून काढलेत हे लक्षात येईल...अर्थात लक्षात घेणार असतील तरच...पण तसे होणार नाही...अशा वेळी डोळ्यावर कातडं पांघरणंच योग्य वाटत असतं तथाकथित संभावितांना...अशा वेळी त्यांना हे सगळं कलाकाराच्या अभिव्यक्तित्वाचं स्वातंत्र्य वाटत असतं.
जय हो!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

+१०००००००

अगदी बरोबर. आपण कसे निधर्मी आहोत हे दाखवण्यासाठी हल्ली हिंदू धर्मावर टिका करण्याची फॅशनच आहे हो देवकाका. हिंदू धर्म बेकार, त्यातल्या रूढी रितीरिवाज सगळे निव्वळ टाकावू, हिंदू पुराणग्रंथ थोतांड. आणि गमतीची गोष्ट अशी की या पुराणग्रंथांचे पुरावे मागणारे लोक ग्रीक/रोमन इत्यादी पुराणे मात्र जशी आहेत तशी मान्य करताना दिसतात. पण यालाच आजकाल विचारवंत, पुरोगामी, निधर्मी वगैरे वगैरे म्हणतात. यांना भारतीय भाषांमधले अभिजात साहित्य दिसत नाही. त्यासाठी त्यांना इंग्रजी साहित्याची कास धरावी लागते. मुलांना Alice in Wonderland वाचून दाखवतील पण रामायण/ महाभारत म्हटले की नाके मुरडतात. :-) :-) असो... चालू द्या

हे कुठे बघायला मिळेल?

हिंदू धर्म बेकार, त्यातल्या रूढी रितीरिवाज सगळे निव्वळ टाकावू, हिंदू पुराणग्रंथ थोतांड. आणि गमतीची गोष्ट अशी की या पुराणग्रंथांचे पुरावे मागणारे लोक ग्रीक/रोमन इत्यादी पुराणे मात्र जशी आहेत तशी मान्य करताना दिसतात.

अधोरेखित कुठे बघायला मिळेल?

कर सवलत - सोयीसुविधा

सर्वप्रथम कुठल्याही कलाकारावर आणि पर्यायाने त्याच्या कलेवर बंधन आणायला माझा विरोध आहे. त्यामुळे हुसैन यांच्या कलेला कला म्हणून जर कोणी बंदी घालायला लागले अथवा विरोध करायला लागले तर ते आक्षेपार्हच आहे. जसे कधीकाळी शांता शेळके, भिमसेन आदी अनेक कलाकारांना प्रत्यक्षात भेटायला आवडले असते असे कायम वाटते तसेच हुसैने यांना देखील प्रत्यक्ष भेटता आले असते तर आवडले असते. कलाकार हे मुडी असू शकतात, कलंदर असू शकतात, त्यामुळे जो पर्यंत त्यांच्या कलेसंदर्भात/पुरताच काही विक्षिप्तपणा असला तर तो समाजाने मान्य करावा असे वाटते. त्यामुळे हुसैन यांचे काही विक्षिप्तपणे असले म्हणून काय बिघडले असेच वाटते...

मात्र त्याच बरोबर नियम सर्वांना सारखेच हवेत, डबल स्टँडर्ड असता कामा नये हे देखील महत्वाचे आहे आणि तसे जर नसले (म्हणजे डबल स्टँडर्ड असले) तर मग कोणी हुसैन यांच्या चित्रास विरोध केला तर तो त्यांचा देखील हक्क होतो आणि तो मानायला मी तयार आहे. थोडक्यात, आधी देखील गांधीजींवरील पुस्तकाच्या चर्चेत आणि इतरत्र मांडलेलीच भुमिका मी परत मांडेन : असली बंदी कुठल्याही कलाकारावर/विचारवंतावर आक्षेपार्ह आहे आणि ती असता कामा नये. मग ते हुसैन यांचे कुठलेही चित्र असुंदेत अथवा सलमान रश्दी यांचे कुठलेही पुस्तक, अथवा अजून काही (त्यात अगदी लेन्सचे पुस्तकपण येते).

हुसैनसारख्या थोर कलावंताला वृद्धापकाळात परागंदा व्हावे लागले. मायदेशापासून दूर लंडनात त्यांचा मृत्यू झाला. तर प्रश्न आणि चर्चेचा मुद्दा असा की, हे असे होणे ही आपल्या समाजाची शोकांतिका नाही काय? असे का व्हावे?

बरखा दत्त यांनी एनडीटीव्हीवर हुसैन यांच्या या निर्णयासंदर्भात सगळ्यात पहीली मुलाखत घेतली होती. ती पहाण्यासारखी आहे:

या मधे हुसैन यांनी कतार ला जाण्याची जी काही कारणे दिली आहेत त्यातील एक आहे करसवलत. रोमन पोलान्स्कीचे उदाहरण देत आणि मर्यादीत साम्य दाखवत त्यांनी "हरॅसमेंट बाय दी टॅक्स पिपल" असे म्हणले आहे. जर चाळीशीत असतो तर त्यांच्याशी दोन हात केले असते... पुढे त्यांचे असे देखील म्हणणे होते की त्यांना त्यांचे ठरलेले प्रॉजेक्ट्स पूर्ण करायला जास्तीत जास्त सुविधा-आराम-सवलती हव्या होत्या ज्या तेथे मिळाल्या. बाकी त्यांच्या दृष्टीने राजकीय सीमा या माणसांनी तयार केल्या आहेत असे सांगत ते पुढे म्हणतात, "हिंदी है हम वतन है, सारा जहाँ हमारा"...

म्हणजे हुसैन यांनी स्वतः जे काही सांगितले आहे ते लक्षात घेत ते "वृद्धापकाळात परागंदा" का झाले ह्याचा विचार केला तर काय कारण आढळते तर "हरॅसमेंट बाय दी टॅक्स पिपल" आणि "कम्फर्ट्स अँड फॅसिलीटिज्". तरी देखील या मुलाखतीच्या सुरवातीस एनडीटीव्हीवरील (बरखा नाही) वृत्तनिवेदीका, यावर बोलताना त्याचा स्पष्ट उल्लेख न करता फक्त "ते म्हणाले की मी चाळीशीत असतो तर त्यांच्याविरोधात दोन हात केले असते" असे म्हणाले म्हणते. म्हणजे जे ही मुलाखत बघणार नाहीत त्यांना त्याचा संदर्भ हा त्यांच्या काहीजणांना आक्षेपार्ह वाटणार्‍या काही चित्रांपुरताच वाटेल. वास्तवीक तो त्याच्याशी नव्हताच!

आता असे कोणी म्हणू शकेल की त्यांनी ते बोलायचे टाळले. पण मग त्यांना "टॅक्स पिपल" बद्दल पण सरसकट बोलायची काय गरज होती? भारतात त्यांना सुविधा मिळू शकल्या नाहीत असे म्हणायची काय गरज होती? शिवाय, त्यांनी जे काही म्हणले ते खरे मानायचे का खोटे? जर खोटे मानायचे असेल तर त्यांच्या हिंदू देवदेवतांविषयीच्या, भारतमातेच्या चित्रांबाबत त्यांनी दिलेले स्पष्टीकरण देखील खरे का मानावे? शिवाय जर त्यांनी त्यांना आणि त्यांच्या कलेला स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून सोडले असते तर ते कतारला का गेले असते? बरं गेले ते गेले, त्यांना काय अरब संस्कृतीबद्दल सगळेच दाखवणे शक्य देखील झाले आले असते का? पण तो माझा मुद्दा नाही. कारण हुसैन यांना अगदी एक व्यक्ती म्हणून (ते खर्‍या अर्थाने श्रेष्ठ कलाकार होते हे जरी अगदी बाजूस ठेवले तरी), कुठे रहावे आणि काय करावे याचा संपूर्ण हक्क आहे.

पण त्याचा, म्हणजे त्यांच्या कतारला जाण्याचा संबंध लावत हिंदूत्ववाद्यांना झोडपणे आणि ते देखील जेंव्हा स्वतः हुसैन असे म्हणत नसताना, तेंव्हा ते ढळढळीत दिशाभूल करणारे ठरते आणि समाजाची शोकांतिका होण्यासाठी कारणीभूत ठरते असे वाटते. हुसैन यांच्या मृत्यूचा आनंद बाळगणारी मनोवृत्ती आणि दिशाभूल करत समाजात दुही पसरवणारी मनोवृत्ती यामुळे देश कुठे चालला आहे असे वाटते...

हुसैन यांचा जिवंतपणे बळी घेण्यास ७०-९० च्या काळात वाढलेली आणि नंतरही जोपासली गेलेली ही सुडोसेक्यूलर वृत्ती आणि त्या अनुषंगाने राजकारण्यांनी केलेले लांगुलचालन कारणीभूत आहे. म्हणून खोटे बोलणे ही जरी कला असली तरी देशाच्या आणि समाजाच्या हितासाठी, फक्त त्या कलेवरच बंदी घालण्यास माझा पूर्ण पाठींबा राहील! ;)

असो.

हिंदी है हम वतन है, सारा जहाँ हमारा...

सदरच्या मुलाखतीत हुसैन ह्यांनी भारताबाहेर राहुनही मनाने भारतीय असल्याचा केलेला उल्लेख तसेच त्यांनी उल्लेखलेले भारताला वाहिलेले त्यांचेर् प्रोजेक्ट्स पाहता हुसैन हे भारताला शेवटपर्यंत पुण्यभू समजत असावेत असे वाटते. त्यामुळे निदान सावरकरवादी हिंदुत्ववाद्यांच्यामते ते १००% हिंदू असले पाहिजेत. असे असुनही जे हिंदुत्ववादी हुसैन ह्यांना त्रास द्यायचे ते स्युडो हिंदुत्ववादीच म्हंटले पाहिजेत.

युसेक्युलर भूमिका

कोणी हुसैन यांच्या चित्रास विरोध केला तर तो त्यांचा देखील हक्क होतो

विरोध म्हणजे काय?

त्यांच्या हिंदू देवदेवतांविषयीच्या, भारतमातेच्या चित्रांबाबत त्यांनी दिलेले स्पष्टीकरण देखील खरे का मानावे? शिवाय जर त्यांनी त्यांना आणि त्यांच्या कलेला स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून सोडले असते तर ते कतारला का गेले असते? बरं गेले ते गेले, त्यांना काय अरब संस्कृतीबद्दल सगळेच दाखवणे शक्य देखील झाले आले असते का? पण तो माझा मुद्दा नाही. कारण हुसैन यांना अगदी एक व्यक्ती म्हणून (ते खर्‍या अर्थाने श्रेष्ठ कलाकार होते हे जरी अगदी बाजूस ठेवले तरी), कुठे रहावे आणि काय करावे याचा संपूर्ण हक्क आहे.

eu-secular मत काय असावे ते मांडतो.
हिंदू आणि मुस्लिम धर्मांना वेगवेगळी वागणूक देणारे हुसेन दुटप्पी होते, फट्टूही होते. मात्र, कलावंताकडे स्पष्टीकरणाची मागणी करणेच चूक आहे. अन्याय्य कायद्यांच्या मदतीने हिंदुत्ववाद्यांनी हुसेन यांना त्रास दिला.

म्हणजे...

सरसकट स्पष्टीकरणः कुठलाही कायदा हातात घेऊन कोणी कशालाच विरोध करावा असे माझे म्हणणे नाही आणि नव्हते. तसे जे कोणी करेल त्याला कायद्याने आपल्या हातात घ्यावे...

म्हणून विरोध म्हणताना मी "हुसैन यांना विरोध केला तर", असे म्हणलेले नाही तर, "तर मग कोणी हुसैन यांच्या चित्रास विरोध केला तर तो त्यांचा देखील हक्क होतो आणि तो मानायला मी तयार आहे", असे म्हणलेले आहे. आणि तो विरोध कायदा हातात न घेता करणे म्हणजे सरकारदरबारी त्यावर बंदी घाला असे म्हणणे. जे मला मान्य नाही पण प्रस्थापित कायद्यात तो पब्लीकला हक्क आहे असे वाटते.

हिंदू आणि मुस्लिम धर्मांना वेगवेगळी वागणूक देणारे हुसेन दुटप्पी होते, फट्टूही होते.
ह्या मताशी (ज्या कुणाचे असेल त्याच्याशी) असहमत आहे. माझ्या दृष्टीने हुसैन दुटप्पी नसून कायद्याचा वपर करणारे दुटप्पी आहेत आणि त्यांच्या कतारला जाण्याच्या संबंधात ते स्वतः काय म्हणाले ते विचारात न घेता अथवा जगासमोर न आणता त्या स्थलांतराचा दोष इतर कारणांवर घालणार्‍या आणि समाजात दुही पसरवणारे विचारवंत आणि माध्यमे दुटप्पी आहेत. म्हणून असले कायदे नकोत आणि गैरसमज पसरवणे नको असे माझे मत आहे.

तरीही

जे मला मान्य नाही पण प्रस्थापित कायद्यात तो पब्लीकला हक्क आहे असे वाटते.

तो कायदाच अन्याय्य असल्यामुळे त्याचा वापर करून हुसेन यांना त्रास देणेही अयोग्य म्हणावे.

हुसैन दुटप्पी नसून कायद्याचा वपर करणारे दुटप्पी आहेत

  1. कायद्याचा वापर हिंदुत्ववाद्यांनीच केला ना?
  2. हुसेन यांनी आयेशाची नग्न चित्रे काढली काय? मी जर भारतमाताप्रेमी/हिंदू असतो तर हुसेन यांच्या चित्रांमुळे कदाचित माझ्या भावना दुखावल्या असत्या असे मला वाटते.

ते स्वतः काय म्हणाले ते विचारात न घेता

ते काय म्हणाले ते विचारात घेण्याची आवश्यकताच नाही, त्यांना त्रास जाणवला की नाही ते गौण आहे, त्यांना तो त्रास मान्य करण्याचीही लाज वाटत असू शकेल. मात्र, हिंदुत्ववाद्यांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तेच वाईट आहे.

तर

>>मात्र, हिंदुत्ववाद्यांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तेच वाईट आहे.

कदाचित हुसेन ह्यांच्या अभिव्यक्तीमुळे काही लोकांना त्रास झाला असेल, त्या पिडीत लोकांच्या अभिव्यक्तीमुळे हुसेन ह्यांना त्रास झाला असेल, जाणून-बुजून दिलेल्या त्रासाचा(प्रयत्नांचा) निषेध आहे. अभिव्यक्तीचे स्वरूप देखील शिष्ठ/मानसिक रित्या अत्यंत त्रासदायक चालेल, हिंसा टाळावी.

असहमत

अन्याय्य कायद्यांच्या आधारावर पोलिस तक्रार करून तुरुंगवासाच्या/आर्थिक दंडाच्या ऐहिक त्रासाची भीती निर्माण करणे हा मानसिक त्रासही चूकच आहे.

हॅरॅसमेंट

"हॅरॅसमेंट बाय टॅक्स पीपल" हा एकूण छळाचा भाग होता का हे तपासता येईल का? कारण तेहलकाने पहिले स्टिंग ऑपरेशन केल्यावर त्यांच्या मागे अशी लचांडे लावण्यात आल्याचे वाचले होते.

नितिन थत्ते

हॅरॅसमेंट

हुसैन ह्यांना हिंदुत्ववाद्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळायच्या. त्यांच्या घरावर बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला होता ज्याला शिवसेनेचाही पाठींबा होता.(दुवा) त्यांच्या मागे इतक्या केसेस सुरू होत्या की भारतात आल्यास त्यांना अटक होण्याची स्थिती निर्माण झाली होती, जे हुसैन ह्यांचे कतारमधे राहण्यामागे सर्वात महत्वाचे कारण होते. त्यांच्या प्रदर्शने भरवणार्‍या नफिसा अली सारख्यांनाही विहिप वगैरेंनी त्रास दिला होता, ज्यामुळे त्यांना भारतात स्पॉन्सरर मिळाणे कठीण झाले होते असे बरखा दत्त ह्यांच्या मुलाखतीत सांगत आहेत.

त्यामुळे वरती आलेले, "हुसैन हे मुख्यत्वाने आयकर अधिकार्‍यांचा ससेमिरा चुकवायला किंवा आरामदायी वातावरणासाठी कतारला शरण गेले, हिंदुत्ववाद्यांनी दिलेला त्रास हा सुडोसेक्युलर लोकांनी पसरवलेला गैर समज आहे" हे आर्ग्युमेंट पोकळ आहे.

वाह!

हुसैन निवर्तले, त्यांचे आयुष्य संपले किंवा काहीजणांसाठी त्यांनी मृत्यूचा पुढला टप्पा गाठला. आम्ही अजून तिथेच.... ;-) चालू द्या!

असे का?

हुसैन निवर्तले, त्यांचे आयुष्य संपले किंवा काहीजणांसाठी त्यांनी मृत्यूचा पुढला टप्पा गाठला. आम्ही अजून तिथेच.... ;-) चालू द्या!

या तिरकसपणाचे प्रयोजन कळाले नाही. हुसेन यांची भारतातून झालेली हकालपट्टी - मग ती सामाजिक कारणांसाठी असो की आर्थिक - त्यांच्या कलेवर आणि कलेच्या मांडणीवर धार्मिक संघटनांनी लावलेला अंकुश आणि त्या निमित्ताने एकूणच कलाकार आणि समाज यांमधील नाते हे महत्त्वाचे विषय आहेत. यांवर चर्चा व्हायला हवी. या मंचावर (अजून तरी) चर्चेचे गांभीर्य टिकून आहे. म्हणून अशा चर्चांना उत्तेजन दिले पाहिजे. मला वाटते, या संकेतस्थळाचा हेतूच तो आहे.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

सहमत आहे

या मंचावर (अजून तरी) चर्चेचे गांभीर्य टिकून आहे. म्हणून अशा चर्चांना उत्तेजन दिले पाहिजे. मला वाटते, या संकेतस्थळाचा हेतूच तो आहे.

हेच म्हणतो.

तिरकसपणा?

तिरकसपणा? नाही हं! मला जे खरे आहे असे वाटले ते लिहिले. आता तिरकसपणाबद्दल कोणी आणि काय बोलावे? आपल्याला तिरकसपणा वाटला असेल तर त्यालाही हरकत नाहीच. असो.

बाकी या संकेतस्थळावर असे मुद्दे चर्चिले जाऊ नयेत असे म्हणायचा हेतू नव्हताच म्हणूनच चालू द्या असे म्हटले.

आँ?

येथील कोण्या सदस्याने 'तो पुढला टप्पा गाठावा' असा तुमचा सल्ला आहे की काय? ;)

मोठे व्हा! ;-)

येथील कोण्या सदस्याने 'तो पुढला टप्पा गाठावा' असा तुमचा सल्ला आहे की काय? ;)

हेहेहे! आयुष्यातील पुढील टप्पे सर्वांनाच गाठायचे असतात. ते गाठले नाहीत तर आयुष्य गोठून जाईल. 'तो पुढला टप्पा गाठण्याची' एखाद्याची वेळ आली असेल तर त्याने तो गाठायला मी कोण हरकत घेणार? ;-) त्याने तोही टप्पा गाठावाच असाच सल्ला देईन. ;-)

- इति मा प्रियाली उवाच

माझा प्रतिसाद

असे होणे ही आपल्या समाजाची शोकांतिका नाही काय?

सहमत.

असे का व्हावे? हुसैन ह्यांचा मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या मनोवृत्तींना, प्रवृत्तींना काय म्हणायचे ? आपला देश नक्की कुठे चालला आहे?

गैरसोयीच्या, अप्रिय किंवा न पटणार्‍या अभिव्यक्तींना कसं वागवलं जातं हे कोणत्याही समाजाच्या प्रगल्भतेचं एक दर्शन घडवतं. "I disapprove of what you say, but I will defend to the death your right to say it" या तत्त्वाचा किती आदर केला जातो हे पहायला हवं.

मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा म्हणून शशी थरूरसारख्यांचे प्रयत्न चालू होते. किमान मरणोपरान्त हा सन्मान हुसैन ह्यांना मिळायला हवा असे तुम्हाला वाटत नाही का?

पुरस्कारांविषयी विशेष आदर नही त्यामुळे आमचा पास.
प्रतिसादांत आलेल्या काही इतर मुद्द्यांविषयी:

अवलिया आणि कलंदरपणा असला म्हणजे कलाकार मोठा होतो का
चपला न वापरण्याने माणूस मोठा कलाकार कसा होतो? गर्दीखेचू व्यक्तिमत्व वगैरे.

अशा प्रकारच्या वागण्यामागे प्रसिद्धीची हाव असेल किंवा चित्रांची किंमत वाढावी असा हिशेब असेल असं तात्पुरतं मान्य केलं तरीही त्यानं कलाकार म्हणून कुणी मोठं होत नाही तद्वत छोटंही होत नाही. माझ्या मते हा विक्षिप्तपणा किंवा त्यांच्या चित्रांच्या किमती किंवा त्यांबद्दल झालेले वाद वगैरे गोष्टी कलाबाह्य मानायला हव्यात. त्यांच्या कलेकडे तटस्थपणे पहाता आलं तर हुसेनना थोडा न्याय मिळेल. कारण मगच त्यांच्या चित्रांचा नीट परिचय करून घेता येईल आणि तो झाला तर त्या चित्रांतून देवतांचा अपमान झाला का वगैरे गोष्टींचा उहापोह डोळसपणे करता येईल.

मला कधीकधी असंदेखील वाटतं की चित्रं ही दृश्यभाषेत असल्यामुळे एक अडचण होते. म्हणजे इंग्रजी साहित्याचा आस्वाद घ्यायला इंग्रजी शिकली पाहिजे, संस्कृत साहित्यासाठी संस्कृत शिकलं पाहिजे असे मुद्दे सहज मान्य होतात पण डोळ्यांना जे दिसतं ते कळून घेण्यासाठी दृश्यभाषासुद्धा शिकली पाहिजे हा मुद्दा आपल्याकडे मोठमोठे सुशिक्षित लोकही विसरतात असं वाटतं.

जेव्हा ७० च्या दशकात त्यांनी ही चित्रे काढली तेव्हा काही वाद झाला होता का? की त्या भडकलेल्या काळात ही चित्रे शोधून काढण्यात आली होती?

मी ही चित्रं वादापूर्वी पाहिलेली आहेत. त्याविषयी एवढं रामायण होईल असं तेव्हा स्वप्नातही वाटलं नसतं. उलट चित्रकलेतलं फारसं काही कळत नसताही हुसेनची चित्रं त्यावेळी लोकांना आवडत असत असं दिसे.

बाकी विरोध करणाऱ्यांचे हे असले प्रताप पहाता मलाही पळून जावंसं वाटलं असतं.
http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-metroplus/article211...

असो. हुसेनच्या मृत्यूच्या निमित्तानं मी केलेल्या किंचित लिखाणाचे हे दुवे. प्रतिक्रियाही बोलक्या आहेत.
मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय
भाग १: http://www.misalpav.com/node/18220
भाग २: http://www.misalpav.com/node/18230
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

आवडले

"I disapprove of what you say, but I will defend to the death your right to say it"
हे आवडले. इतका प्रगल्भपणा लोकांत, समाजात येईल, तो सुदीन. इतका प्रगल्भपणा लोकांत, समाजात येईल, तो सुदीन.इतका प्रगल्भपणा लोकांत, समाजात येईल, तो सुदीन.इतका प्रगल्भपणा लोकांत, समाजात येईल, तो सुदीन.इतका प्रगल्भपणा लोकांत, समाजात येईल, तो सुदीन

सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

'प्रहार'मध्ये या धाग्याचा उल्लेख

रविवारच्या 'प्रहार'मध्ये उपक्रमावरच्या हुसेनच्या धाग्याचा उल्लेख आलेला आहे. समीक्षा नेटके या नावानं लिहिलेला 'कोऽण हुसेऽन?' हा लेख इथे वाचता येईल.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

 
^ वर