भयसूचक बातमी

आजच्या पुणे म.टा. मधील जोडबातमी प्रथमवाचनी अर्थशून्य आणि हास्यास्पद वाटली.बातमीचे सार असे:
.....*डॉ.एम्.कटककर हे भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाचे अध्यक्ष आहेत.
.....*त्यांनी पुण्यात ज्योतिषशास्त्राचे मुक्तविद्यापीठ स्थापन केले आहे.
.....त्यांनी पुढील दोन सिद्धान्त मांडले:
.....१.पुणे शब्दाचे स्पेलिंग PUNEY असे लिहिल्यास चंगळवाद संपुष्टात येऊन पुण्याला गतवैभव प्राप्त होईल.
.....२.मुंबईचे स्पेलिंग MOOMBAI लिहिल्यास तिथली टोळीयुद्धे समाप्त होतील.
...
पण थोडा विचार करता ती बातमी भीतिदायक,भयसूचक,अशुभसंकेती वाटू लागली.
...आपल्या नावामागे डॉक्टर अशी उपाधी लावणारे हे गृहस्थ एका संस्थेचे अध्यक्ष आहेत.त्या संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला दोन मोठ्या उद्योगसमूहांचे अध्यक्ष उपस्थित आहेत.डॉ.एम्. कटककर ज्योतिर्विद्या मुक्त विद्यापीठ स्थापन करीत आहेत.आज उद्या त्याला शासनाची मान्यताही मिळेल.म्हणजे हे असे गृहस्थ समाजातील एक मान्यवर आहेत. काय सांगावे त्यांच्या स्पेलिंगसिद्धान्ताना माना डोलावणारे बरेच जण असतील!
या एकविसाव्या शतकात वावरणारी शहाणी सुरती व्यवहारज्ञानी माणसे इतक्या निरर्थक गोष्टींवर श्रद्धा ठेवतातच कशी? त्यांची बुद्धी एवढी रसातळाला कशी जाते? इतर विषयांत चालणारी त्यांची विचारशक्ती भविष्याच्या विषयात चालेनाशी का होते?.अशी ठप्प का होते?
आपला समाज बौद्धिक दिवाळखोरीच्या,बौद्धिक विनाशाच्या दिशेने वाटचाल करतो आहे काय? नजिकच्या भविष्यकाळात तमोयुग अवतरेल काय? हे प्रश्न अस्वस्थता आणतात. चिंताग्रस्त करतात.
************************************************

Comments

डॉ.

डॉ.एम्.कटककर हे विद्यालयाशी संबंधित असल्याने प्रा.डॉ. प्रकारचे डॉ असावेत. त्यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

=))

=)) =))

-Nile

उर्वरित भाग

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |

जोड बातमीचा उर्वरित भाग कृपया येथे वाचावा.

पुणे शब्दाचे स्पेलिंग

पुणे शब्दाचे स्पेलिंग PUNEY
हा मला साठे चे साठ्ये आणि मुळे चे मुळ्ये अशातला प्रकार दिसतो.

प्रकाटाआ

डुप्लिकेट प्रतिसाद काढून टाकला आहे

असु द्या हो सर

चालायचच. पण त्यांचे सिध्दांत कुठे सापडतील?

एकदा लिहिलेले बरे

आपला समाज बौद्धिक दिवाळखोरीच्या,बौद्धिक विनाशाच्या दिशेने वाटचाल करतो आहे काय? नजिकच्या भविष्यकाळात तमोयुग अवतरेल काय? हे प्रश्न अस्वस्थता आणतात. चिंताग्रस्त करतात.

समाज करेल तेव्हा करेल. इथल्या आपल्या लेखांवर आलेल्या आक्षेपांचे खंडन करण्याची जबाबदारी टाळून आपण मात्र त्या दिशेने बरेच पुढे गेले आहात हे नम्रपणे नमूद करू इच्छितो.

लेख आणि आक्षेप

लेखांवर आलेल्या आक्षेपांचे खंडन करण्याची जबाबदारी टाळून आपण मात्र त्या दिशेने बरेच पुढे गेले आहात
वरील वाक्याचा अर्थ समजू शकला नाही. उपक्रमवर जेंव्हा एखादा लेखक लेख लिहितो तेंव्हा तो आपली मते मांडत असतो. त्याच्या मतांशी सर्वांची मते जुळतील असे काही नाही. एखाद्या वाचकाने आपल्या प्रतिसादात लेखकाची मते चूक आहेत असे विधान केले तर ते त्याचे मत ठरते. मूळ लेखकाने त्या सो कॉल्ड आक्षेपांचे खंडन करण्याची काय गरज आहे? मात्र मूळ लेखात एखादा संदर्भ दिला जातो तेंव्हा तो संदर्भ कोठून घेतला हे सांगण्याची जबाबदारी मूळ लेखकाची नक्कीच असते. यनावालांचे लेख जबाबदारपणे लिहिलेले असतात असे माझे मत आहे. प्रत्येक प्रतिसादाला त्यांनी उत्तर देण्याची काही गरज आहे असे मला वाटत नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

असहमत

उपक्रम हा ब्लॉग नाही, चर्चास्थळ आहे.

तर्कशुद्धता

आपली मते दुसर्‍याला माहिती व्हावीत आणि ती पटावीत अश्या दोन्ही हेतूंनी लेख लिहिलेला असतो. ती तर्कशुद्ध असल्याने जर पटावीत असे लेखकाला वाटत असेल तर त्याने अवश्य आपेक्षांचे खंडन केले पाहिजे. माझे काम फक्त मते मांडायचे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या, मी पुन्हा काही तिथे फिरकणार नाही, आक्षेपांचे खंडन करणार नाही, त्रास होत असेल तर वाचू नका असे म्हणणे हे उर्मटपणाचे लक्षण आहे.
यनावालांचे लेख जबाबदारीने लिहिलेले असतात असे जर आपले मत आहे तर कृपया आपण आक्षेपांचे खंडन करावे. सुरूवात कोहम धाग्याने करूया का?

उर्मटपणाचे लक्षण

माझे काम फक्त मते मांडायचे, पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या, मी पुन्हा काही तिथे फिरकणार नाही, आक्षेपांचे खंडन करणार नाही, त्रास होत असेल तर वाचू नका असे म्हणणे हे उर्मटपणाचे लक्षण आहे.

तुमच्यावर विज्ञान विरोधी असल्याचा आक्षेप नोंदवला आहे. तिथे 'आपल्या प्रतिसादाला उत्तर द्यायचे की नाही हे केस बाय केस ठरवेन.' असे उर्मट उत्तर तुम्हीच दिले आहेत. त्यामूळे दुसर्‍यांवर असले आरोप करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. वॉक युअर टॉक!!

बोले तैसा चाले?

तुम्हाला आलेल्या प्रतिसादांचे काय? तुम्ही तरी कुठे तुमच्या आक्षेपांचे खंडन करता? जर कुणी ती जवाबदारी टाळत असेल तर त्यावर बोलण्याचा निदान तुम्हाला तरी अधिकार नाही.

उत्तर

मी फलज्योतिषावर विश्वास ठेवतो म्हणून मी विज्ञानविरोधी आहे असा आरोप तुम्ही माझ्यावर केलात त्याला मी आतापर्यंत उत्तर दिले नाही त्याचा हा संदर्भ आहे असे समजतो. एक तर हा आरोप व्यक्तिगत आहे. त्याच्या उत्तरातून सार्वजनिक महत्त्वाचे असे काही निष्पन्न होणार नाही असे वाटल्याने उत्तर दिले नव्हते. पण आता देतो. माझ्या आयुष्यात फलज्योतिष्यांनी वर्तवलेली भाकिते खरी ठरण्याचे अनुभव आले आहेत म्हणून माझा त्याच्यावर विश्वास आहे. आता डार्क मॅटर किंवा इतर कोणी मला विज्ञानविरोधी म्हणू नये म्हणून मी माझ्या अनुभवांशी अप्रामाणिक राहून विज्ञानवाद्यांच्या सुरात सूर मिळवून फलज्योतिष थोतांड आहे असे म्हणावे असे वाटत असेल तर आय ऍम सॉरी. अजून थोडी सदसद्विवेकबुद्धी शाबूत आहे. तेव्हा मला या पुराव्यावरून विज्ञानविरोधी ठरवायचे असेल तर खुशाल ठरवा, मला पर्वा नाही. आणि हो, हवे तर हा माझा उर्मटपणा समजा.

ज्योतिष्य

नुसतेच फल जोतिष्य नाही आत्मा विषयावरुन् तुम्ही यनावालांवर जे आरोप केले होते त्यावर (मी धरुन) ज्या ज्या उपक्रमींनी आक्षेप नोंदवले होते त्यातल्या एकाही आक्षेपाचे तुम्ही अजून खंडन केलेले नाही.

माझ्या आयुष्यात फलज्योतिष्यांनी वर्तवलेली भाकिते खरी ठरण्याचे अनुभव आले आहेत म्हणून माझा त्याच्यावर विश्वास आहे.

केवळ स्वानुभव ही कसोटी विज्ञानात पुरेशी असते का? जोतिष्यशास्त्रावर विश्वास आहे म्हणजे काय? फल जोतिष्याला तुम्ही 'विज्ञान' समजता का?

आत्मा

विषयावर उपनिषदांमधल्या माहितीचे सार काढून लिहायला वेळ लागेल असे रिटे यांना आधीच स्पष्ट केले आहे. इतक्या तातडीने आणि उथळपणे मला हा विषय हाताळायचा नाही.
ज्योतिष विज्ञान आहे की नाही मला कल्पना नाही. माझ्या दृष्टीने ते थोतांड नाही.

एक तर तुम्ही मला आरोपीच्या पिंजर्‍यात बसवून व्यक्तिगत गोष्टींबद्दल उलटतपासणी घेत आहात हा प्रकार फारसा बरा नाही. आपल्या चर्चेमधून विशेष काही निष्पन्न होईल असे मला वाटत नाही त्यामुळे यापुढे आपल्या प्रतिसादाला उत्तर द्यायचे की नाही हे केस बाय केस ठरवेन.

उत्तर

विषयावर उपनिषदांमधल्या माहितीचे सार काढून लिहायला वेळ लागेल असे रिटे यांना आधीच स्पष्ट केले आहे. इतक्या तातडीने आणि उथळपणे मला हा विषय हाताळायचा नाही.

मग तोपर्यंत यनावालांच्या लेखनावर केलेले उथळ आरोप मागे घ्यावेत.

ज्योतिष विज्ञान आहे की नाही मला कल्पना नाही.

का बरं नाही? ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे असे तुम्ही जाहीर सांगता ती गोष्ट विज्ञानाला धरून आहे की नाही हे एक वैज्ञानिक असूनही तुम्हाला माहित नाही?

एक तर तुम्ही मला आरोपीच्या पिंजर्‍यात बसवून व्यक्तिगत गोष्टींबद्दल उलटतपासणी घेत आहात हा प्रकार फारसा बरा नाही.

कुठली व्यक्तिगत गोष्ट? तुमच्या कुठल्याही खाजगी गोष्टीविषयी मी चौकशी केलेली नाही. 'तुम्ही जोतिष्य मानता' ही तुम्ही स्वतःहून् जाहीर गेलेली गोष्ट आहे. ती तुम्हाला खाजगी ठेवायची होती तर इथे जाहीरपणे मांडण्यापूर्वी विचार करायला हवा होता.

माझा आक्षेप काय होता?

नुसतेच फल जोतिष्य नाही आत्मा विषयावरुन् तुम्ही यनावालांवर जे आरोप केले होते त्यावर (मी धरुन) ज्या ज्या उपक्रमींनी आक्षेप नोंदवले होते त्यातल्या एकाही आक्षेपाचे तुम्ही अजून खंडन केलेले नाही.


आत्मा विषयावरून मी यनावालांवर कोणते बरे आरोप केले? आत्मा मानायलाच हवा असे माझे मत नाही. आत्मा मान्य नसेल तर मी चार्वाकवादी आहे असे तत्त्वज्ञानात्मक उत्तर देसाईंनी द्यायला हवे होते. उगीच माझे नाव हे, मी शिक्षक आहे, माझ्याकडे पारपत्र, रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आहे वगैरे वगैरे..असल्या व्यावहारिक उत्तरापेक्षा हे योग्य झाले असते. ज्या लोकांकडे यापैकी काहीही नाही (उदा. वडापाव) त्यांची ओळख काय हा माझा आक्षेप होता हे नीट वाचलेत तर समजेल.

आत्मा हा विषय (अशारीर तत्त्व) हा विषय रिटे यांनी प्रथम मी घेतलेल्या आक्षेपासंदर्भात आणला होता.

आक्षेप

(यनावाला), वारंवार स्मरण देऊनही आपण आपल्या अनेक लेखांवरील आक्षेपांना उत्तरे द्यायचे टाळून पुरोगामी प्रतिसाद (आणि नवीन पुरोगामी लेख) टाकत असता.

हे तुमचे सुरुवातीचे वाक्य होते. त्यावर मी नक्की काय आक्षेप आहेत असे विचारले असता, त्याला उत्तर म्हणून तुम्ही आत्मा हा विषय काढलात (आत्मा ह्या विषयावरचे यनावालांचे विचार तुम्हाला बिनडोक वाटतात वगैरे. हा तो आरोप.) त्यावर अनेक आक्षेप नोंदवले गेले आणि त्यातल्या एकाही मुद्याचे तुम्ही खंडन केलेले नाही. 'पुस्तक सापडत नाही' हा तुमचा प्रतिवाद होता. तेव्हा तुमचे पुस्तक मिळेपर्यंतर तुम्ही हा आरोप मागे घ्यावा. आणि वारंवार सांगुनही यनावाला टाळतात असे आणखी आक्षेप सांगावे. (जमल्यास वरच्या प्रतिसादालाही उत्तर द्यावे)

मूळ चर्चा नीट नाचा. स्वतःचे हसे करून घेऊ नका

प्रभाकर नानावटींच्या दूध का दूध.. या लेखात ही सर्व चर्चा सर्व मुळातून वाचता येईल.

हा माझा मूळ प्रतिसाद

यनावाला

वारंवार स्मरण देऊनही आपण आपल्या अनेक लेखांवरील आक्षेपांना उत्तरे द्यायचे टाळून पुरोगामी प्रतिसाद (आणि नवीन पुरोगामी लेख) टाकत असता. एकदा आपले जुने लेख वाचा. जमले तर आक्षेपांना उत्तरे द्या. उत्तरे नसतील तर तसे सांगा आणि आपल्या विचारसरणीत सुधारणा करा.


त्यावर हे तुमचे वाक्य

नक्की कुठले आक्षेप? कृपया दुवा देता का?


त्यापुढे रिटे यांचे (माझ्याबद्दलचे) हे वाक्य

विज्ञानवाद्यांचा पराभव करणे हे त्यांचे ध्येयच नाही, त्या आक्षेपांचा प्रतिवाद तुम्ही किंवा मी (किंवा, यनावाला वगळता कोणीही विज्ञानवादी) करू शकतो की नाही ते जाणण्यात त्यांना रस नसावा, असे मला वाटते.

»

त्यावर माझी आत्म्यासंबंधित वाक्ये

हा प्रतिसाद रिटे यांनी इथे माझ्याबद्दल जे लिहिले आहे त्याला आणि त्यांनी कोहम लेखावर जे लिहिले आहे त्या दोन्हीला उद्देशून आहे......आत्मा आहे किंवा नाही यावर आपल्याकडे बरीच चर्चा झाली आहे. आत्म्याच्या अस्तित्त्वाच्या बाजूने मांडलेले मुद्दे तर्कशुद्ध वाटतात. इच्छुकांनी केनोपनिषद किंवा कठोपनिषद् वाचावे. विरोधी बाजू म्हणने आत्म्याच्या अस्तित्त्वाबद्दल अजून विज्ञानाला पुरावा मिळालेला नाही. अर्थात् आत्मा विज्ञानाच्या कक्षेबाहेर असला तरी तत्त्वज्ञानाच्या कक्षेबाहेर असायलाच हवा असे नाही

तुम्ही अजूनही यनावालांची मूळ चर्चा वाचलेली नाही असे दिसते. पहिल्यावाक्यातच मी हा प्रतिसाद कशाला उद्देशून आहे ते लिहिले आहे. कोहम लेखावर रिटे यांनी आत्मा हा विषय माझ्या आक्षेपासंदर्भात पहिल्याने आणला म्हणून मी त्याबद्दल इथे लिहिले. यात यनावालांवर कुठलाही आरोप नाही.

मला केवळ विरोधासाठी विरोध करायचा असे ठरवून स्वतःचे असे हसे करून घेऊ नका. पुन्हा सांगतो मी आत्म्यासंदर्भात यनावालांवर कुठलेही आरोप केलेले नाहीत. बिनडोक प्रतिपादन मला का वाटते त्याची सयुक्तिक कारणे दिली आहेत. तेव्हा लिहिण्याआधी नीट वाचत चला.

हसे

कोहम चर्चेमधे रिटेंनी तुमच्या आक्षेपांना उत्तरे दिलेली दिसली. त्यावर तुम्ही पुन्हा जुने आक्षेप उकरुन काढलेत.
त्यावर रिटेंनी तुम्हाला हा प्रतिसाद दिलेला दिसला:

ज्या प्रतिसादांतील आक्षेप अनुत्तरित असल्याचे तुमचे मत असेल त्यांचे दुवे नव्या सदस्यांच्या सोयीसाठी कृपया येथेच द्यावेत.

ह्यावर तुमचे उत्तर काही नाही. थोडक्यात तुम्हाला नुसतेच आक्षेप आक्षेप म्हणून कांगावा करायचा आहे, पण नक्की आक्षेप काय हे पटकन सांगायचे नाही असे दिसते आहे.

बाकी वरती 'ज्योतिष्य/ विज्ञान' वगैरेतुन तुमचेच हसू होते आहे त्याची काळजी करावी ही विनंती. त्या विषयावर असलेल्या वरच्या प्रतिसादाचे आधी खंडन करा. मी तुमची काय व्यक्तिगत माहिती विचारली ह्याला उत्तर द्या. नुसतीच आदळ आपट करुन काहीच साध्य होणार नाही.

खी खी खी ही ही ही

शेवटी डोंगर पोखरून उंदीरही मिळाला नाही म्हणायचे. यनावालांवर मी केलेले आत्माविषयक आरोप शोधूनही मिळाले नाहीत तर!

कोहम चर्चेमधे रिटेंनी तुमच्या आक्षेपांना उत्तरे दिलेली दिसली. त्यावर तुम्ही पुन्हा जुने आक्षेप उकरुन काढलेत.

मुळात मी सांगेपर्यंत ही चर्चाच तुम्ही वाचलेली नव्हतीत. रिटेंनी फक्त मी कोण हा प्रश्न अशरीरी तत्त्वाचे अस्तित्त्व मानल्याशिवाय निरर्थक आहे इतकेच म्हटले होते. तो मुद्दा तिथे तेवढ्यावरच राहिला. माझे मांडणीवरचे आक्षेप आहेत रिटेंनी त्यावर काहीच म्हटलेले नाही.

त्यावर रिटेंनी तुम्हाला हा प्रतिसाद दिलेला दिसला:

ज्या प्रतिसादांतील आक्षेप अनुत्तरित असल्याचे तुमचे मत असेल त्यांचे दुवे नव्या सदस्यांच्या सोयीसाठी कृपया येथेच द्यावेत.

ह्यावर तुमचे उत्तर काही नाही. थोडक्यात तुम्हाला नुसतेच आक्षेप आक्षेप म्हणून कांगावा करायचा आहे, पण नक्की आक्षेप काय हे पटकन सांगायचे नाही असे दिसते आहे.


तुम्ही इतक्या उशीराने चर्चा वाचल्याने कालानुक्रमे कशा घटना घडल्या हे माहिती नाही. त्याचे असे झाले. रिटे यांनी हा प्रतिसाद लिहिल्यावर लगेचच मी माझ्या ललित लेखनावर आधारित आक्षेप लिहिले त्यावर रिटेंनी वर दिलेला त्रोटक प्रतिसाद लिहिला आणि चर्चा तेवढ्यावरच राहिली. इथे रिटे आणि मी यांच्यामध्ये अलिखित संकेत असा होता की ही चर्चा आणि त्यावरचे आक्षेप आधी निपटूया मग दुसरीकडे जाऊ.

तुम्ही कोहम हा लेख न वाचताच एकदम नानावटींच्या लेखावर गेलात आणि तिथे हा प्रतिसाद दिलात

नक्की कुठले आक्षेप? कृपया दुवा देता का?


त्यावर माझे उत्तर असे होते.

वाचन वाढवा इतकेच सांगतो. दुसर्‍यांना स्पून फीडिंग करणे सोडले आहे. यनावालांचे पुरोगामी लेख शोधणे अवघड नाही. इतकेही जमत नसेल तर थोडे थांबा. सध्या कोहमवर चर्चा सुरू आहे. ती झाली की मी आणि रिटे दुसरी चर्चा घेऊ.

»

नक्की आक्षेप काय आहेत हे कोहम धागा वाचूनही कळले नसेल तर आय गिव अप.

मांडणी

माझे मांडणीवरचे आक्षेप आहेत रिटेंनी त्यावर काहीच म्हटलेले नाही.

या प्रतिसादात मी "दोन्ही बाजूंच्या थोड्या युक्तिवादांच्या वाचनानंतरही धार्मिक असलेल्यांचे (पुष्कळ युक्तिवादांचे वाचन केल्यानंतर कोणी धार्मिक राहूच शकत नाही असे मला वाटते) मतपरिवर्तन त्यांच्या युक्तिवादाने शक्य नाही हे मान्य आहे. अज्ञानामुळे विज्ञानविरोध करणार्‍यांचे प्रबोधनमात्र बाळबोध युक्तिवादांमुळेसुद्धा शक्य असते." असा युक्तिवाद केला होता.
जे लोक (उदा., बूटपॉलिशवाला) अज्ञानामुळे धार्मिक असतात त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी "माझे नाव हे, मी शिक्षक आहे, माझ्याकडे पारपत्र, रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आहे वगैरे वगैरे.." असली व्यावहारिक उत्तरे पुरेशी आहेत असे मला वाटते. त्या व्यक्तीला आत्मा सिद्धांताचा तपशील माहितीच नसेल तर आधी स्वतःहून त्या व्यक्तीला अध्यात्म शिकवून मग "त्यांचे दावे निराधार आहेत, आत्मा वगैरे काही नसते" असे पटविण्याचे कष्ट का घ्यावेत? त्यापेक्षा, "मी कोण, माझा उद्देश काय?" असा प्रश्न एखाद्या व्यक्तीला पडलाच तर हा 'सिली प्रश्न' आहे असे म्हणावे. अधिक कुतूहल दाखविल्यास, "(आवश्यक असल्यास) हा पुरावा पहा (तुला फारसा कळणार नाही, वाचनासाठी तुझ्याकडे वेळही नसेल), त्या पुराव्यातून आमचा निष्कर्ष असा आहे: तू एक जैवरासायनिक यंत्रमानव आहेस (श्रेय: प्रकाश घाटपांडे). त्यापलिकडे, तू कोणीही/काहीच नाहीस. मानवाला, सजीवसृष्टीला कोणी (इतर प्रगत जैवरासायनिक यंत्रमानवांनी) निर्मिल्याचा पुरावा नाही. वासनांचे बायप्रॉडक्ट किंवा म्हातारपणाची काठी म्हणून तुला तुझा आईवडिलांनी बनविले, त्यापलिकडे तुझ्या निर्मितीमागे कोणीही कर्ता नाही. तुझी निर्मिती निरुद्देश आहे." असे उत्तर देऊन केस क्लोज करावी असे मला वाटते. यनावालांची मांडणी ही त्याच पद्धतीचे सुलभीकरण (निरर्थक प्रश्नाला निरर्थक उत्तर द्यावे, प्रश्नकर्त्याने कुतूहल दाखविल्यास अधिक माहिती द्यावी) नाही काय?

..............बुझावूं शकेना विधाता तयाला|

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आक्षेप जर मूळ लेखाशी संबंधित असेल,तर्कसंगत असेल,पूर्वग्रहदूषित दोषैकदृष्टीने केलेला नसेल तर त्याचे निरसन करण्यात,प्रतिवाद करण्यात काही अर्थ असतो.अन्यथा फुकाचा वितंडवाद म्हणजे कालापव्यय होय.

बरोबर

आक्षेप जर मूळ लेखाशी संबंधित असेल,तर्कसंगत असेल,पूर्वग्रहदूषित दोषैकदृष्टीने केलेला नसेल तर त्याचे निरसन करण्यात,प्रतिवाद करण्यात काही अर्थ असतो.अन्यथा फुकाचा वितंडवाद म्हणजे कालापव्यय होय.

अगदी बरोबर! बरं आक्षेप दाखवा म्हंटलं तर कधी ह्यांचे पुस्तक गहाळ होते कधी 'स्पून फिडींग करणार नाही' म्हणतात. एकंदरीत कालापव्ययच आहे. तसेच ते विज्ञानविरोधी आहेत हा मुद्दाही त्यांनी खोडून काढलेला नाही. त्यामूळे त्यांच्या आक्षेपांना कितपत किंमत द्यावी ह्यावरंही प्रश्नचिन्हच आहे.

उत्तर

जे लोक (उदा., बूटपॉलिशवाला) अज्ञानामुळे धार्मिक असतात त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी "माझे नाव हे, मी शिक्षक आहे, माझ्याकडे पारपत्र, रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आहे वगैरे वगैरे.." असली व्यावहारिक उत्तरे पुरेशी आहेत असे मला वाटते. त्या व्यक्तीला आत्मा सिद्धांताचा तपशील माहितीच नसेल तर आधी स्वतःहून त्या व्यक्तीला अध्यात्म शिकवून मग "त्यांचे दावे निराधार आहेत, आत्मा वगैरे काही नसते" असे पटविण्याचे कष्ट का घ्यावेत?

बूटपॉलिशवाला (वडापाव) अज्ञानामुळे धार्मिक आहे हे मी कधी लिहिले? किंबहुना तो धार्मिक नाहीच. धर्म, आत्मा वगैरेंशी त्याचा संबंध नाही. "अहं ब्रह्मास्मि"वाल्यांशीही काही संबंध नाही. तो साधासुधा अनाथ मुलगा आहे. देसाईंनी दिलेली "माझे नाव हे, मी शिक्षक आहे, माझ्याकडे पारपत्र, रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आहे वगैरे वगैरे.." ही उत्तरे ऐकून तो विचारात पडला आहे की माणसाची ओळख असण्यासाठी त्याच्याकडे रेशनकार्ड, पारपत्र वगैरे गोष्टी आवश्यक आहेत असे दिसते. आपल्याजवळ तर काहीच नाही तेव्हा आपल्याला ओळखच नाही का? मला ओळखच नाही तर मग मी कोण? असा प्रश्न त्याला आहे. त्यामुळे देसाईंचे उत्तर पुरेसे आहे की नाही यापेक्षा त्याला विचारात पाडणारे आहे. आत्मा सिद्धांतापर्यंत तो या आयुष्यात पोचणार नाही तेव्हा आपण म्हणता तसे त्याला आधी "आत्मा" वगैरे शिकवून नंतर "तसे काही नसते" असे शिकवण्याचा द्राविडी प्राणायाम मला करायचा नाही.

त्यापेक्षा, "मी कोण, माझा उद्देश काय?" असा प्रश्न एखाद्या व्यक्तीला पडलाच तर हा 'सिली प्रश्न' आहे असे म्हणावे. अधिक कुतूहल दाखविल्यास, "(आवश्यक असल्यास) हा पुरावा पहा (तुला फारसा कळणार नाही, वाचनासाठी तुझ्याकडे वेळही नसेल), त्या पुराव्यातून आमचा निष्कर्ष असा आहे: तू एक जैवरासायनिक यंत्रमानव आहेस (श्रेय: प्रकाश घाटपांडे). त्यापलिकडे, तू कोणीही/काहीच नाहीस. मानवाला, सजीवसृष्टीला कोणी (इतर प्रगत जैवरासायनिक यंत्रमानवांनी) निर्मिल्याचा पुरावा नाही. वासनांचे बायप्रॉडक्ट किंवा म्हातारपणाची काठी म्हणून तुला तुझा आईवडिलांनी बनविले, त्यापलिकडे तुझ्या निर्मितीमागे कोणीही कर्ता नाही. तुझी निर्मिती निरुद्देश आहे." असे उत्तर देऊन केस क्लोज करावी असे मला वाटते. यनावालांची मांडणी ही त्याच पद्धतीचे सुलभीकरण (निरर्थक प्रश्नाला निरर्थक उत्तर द्यावे, प्रश्नकर्त्याने कुतूहल दाखविल्यास अधिक माहिती द्यावी) नाही काय?

पारपत्र वगैरे कागदी पुरावे नसल्याने एखाद्याच्या मनात "आपल्याला ओळखच नाही" अशी भावना उत्पन्न झाली तर त्याला "मूर्ख प्रश्न" म्हणावे? का? तर तुमच्याजवळ पारपत्रापलिकडे (आणि अर्थातच इतर कादगपत्रांपलिकडे) माणसाची ओळख सांगण्याचा दुसरा उपाय नाही म्हणून? बाकी जैवरासायनिक यंत्रमानव कोण नाही? देसाई, तुम्ही - आम्ही सर्वच तसे आहोत. तसेच देसाई, तुम्ही - आम्ही वासनांचे प्रॉडक्ट (मूल हवे म्हणून झाले असल्यास) किंवा बाय- प्रॉडक्ट (नको असतानाही झाल्यास) यापैकी काही आहोतच. तीच गोष्ट म्हातारपणाचा काठीची. फरक इतकाच आहे की आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर आपल्या आईबापांनी नावाचा, आडनावाचा स्टिकर लावलेला आहे. तो खरवडून काढला आणि आरश्यात नीट बघितले तर जैवरासायनिक यंत्रमानव किंवा वासनांचे प्रॉडक्ट/बाय - प्रॉडक्ट किंवा म्हातारपणाची काठी ही स्टिकर्स आपल्यालाही दिसतील. अश्या स्थितीत केवळ बूटपॉलिशवाल्याला या विशेषणांनी हिणवून काय साधते? (आणि हो, घाटपांड्यांनाही हे वाचून जमले तर उत्तर द्यायला सांगा)

यनावालांची मांडणी ही त्याच पद्धतीचे सुलभीकरण (निरर्थक प्रश्नाला निरर्थक उत्तर द्यावे, प्रश्नकर्त्याने कुतूहल दाखविल्यास अधिक माहिती द्यावी) नाही काय?

यनावालांची सुलभ मांडणी बूटपॉलिशवाल्यासारख्या हजारो कागदपत्रे नसणार्‍या जीवांना ओळख नाकारते हा माझा आक्षेप आहे.

प्रति

तर्कदृष्ट्या आपल्या आक्षेपांचे निरसन होणे गरजेचे आहे, पण व्यावहारिक दृष्ट्या बूटपॉलिशवाल्याला हे प्रश्न पडणे दुरापास्त, त्यामुळेच त्यांनी, ज्याचाकडे खूप वेळ आहे किंवा ज्याला 'प्रश्न' पडू शकतात अश्या पुण्यातील मध्यमवर्गीय शिक्षकाची निवड केली असेल. त्यामध्ये त्या शिक्षकाचे नाव बामणाच्या नावासारखे निघाले हा निव्वळ योगायोग असावा ;)

"मी कोण? माझा उद्देश काय?" हे प्रश्न आणि "माझा उद्देश आधीच ठरवून ठेवला आहे" ह्यामध्ये संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नये (निश्चयित जगात तो संबंध जोडता येऊ शकेल कदाचित). पण वैचारिक दृष्ट्या, प्रगतीसाठी आणि आयुष्याला अमुक एक दिशा मिळण्यासाठी हे प्रश्न नक्कीच योग्य आहेत, त्यामुळे असे प्रश्नच विचारूच नये हे पटत नाही.

"प्रश्न"(आत्मचिंतन) विचारून आयुष्यात काही फरक पडणार नाही असे म्हणल्यास दैववादास काही अंशी समर्थन आहे असे समजावे.

का?

वैचारिक दृष्ट्या, प्रगतीसाठी आणि आयुष्याला अमुक एक दिशा मिळण्यासाठी हे प्रश्न नक्कीच योग्य आहेत, त्यामुळे असे प्रश्नच विचारूच नये हे पटत नाही.

"प्रश्न"(आत्मचिंतन) विचारून आयुष्यात काही फरक पडणार नाही असे म्हणल्यास दैववादास काही अंशी समर्थन आहे असे समजावे.

असे का?

प्रती

१. हे प्रश्नच विचारू नये हे आपले देखील म्हणणे आहे का?
२. रूढ अर्थी दैववादात प्रश्न विचारले जात नाहीत म्हणून, जे घडेल ते स्वीकारले जाते.

ठीक

१. हे प्रश्नच विचारू नये हे आपले देखील म्हणणे आहे का?

होय.

२. रूढ अर्थी दैववादात प्रश्न विचारले जात नाहीत म्हणून, जे घडेल ते स्वीकारले जाते.

ठीक.

खुलासा

माणसाची ओळख असण्यासाठी त्याच्याकडे रेशनकार्ड, पारपत्र वगैरे गोष्टी आवश्यक आहेत असे दिसते. आपल्याजवळ तर काहीच नाही तेव्हा आपल्याला ओळखच नाही का? मला ओळखच नाही तर मग मी कोण? असा प्रश्न त्याला आहे. त्यामुळे देसाईंचे उत्तर पुरेसे आहे की नाही यापेक्षा त्याला विचारात पाडणारे आहे.

अमुकएक अक्षांश रेखांशावर बसलेला एक होमो सेपियनसेपियन जॉन डो यापेक्षा अधिक अशी काय ओळख शक्य आहे?

पारपत्र वगैरे कागदी पुरावे नसल्याने एखाद्याच्या मनात "आपल्याला ओळखच नाही" अशी भावना उत्पन्न झाली तर त्याला "मूर्ख प्रश्न" म्हणावे? का? तर तुमच्याजवळ पारपत्रापलिकडे (आणि अर्थातच इतर कादगपत्रांपलिकडे) माणसाची ओळख सांगण्याचा दुसरा उपाय नाही म्हणून?

कागपत्रांशिवाय, आकृतीबंध (बोटांचे ठसे, दात, रेटिना), डीएनए, इ. बायोमेट्रिक्सचाही समावेश केल्यास तसेच म्हणायचे आहे.

आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर आपल्या आईबापांनी नावाचा, आडनावाचा स्टिकर लावलेला आहे. तो खरवडून काढला आणि आरश्यात नीट बघितले तर जैवरासायनिक यंत्रमानव किंवा वासनांचे प्रॉडक्ट/बाय - प्रॉडक्ट किंवा म्हातारपणाची काठी ही स्टिकर्स आपल्यालाही दिसतील. अश्या स्थितीत केवळ बूटपॉलिशवाल्याला या विशेषणांनी हिणवून काय साधते? (आणि हो, घाटपांड्यांनाही हे वाचून जमले तर उत्तर द्यायला सांगा)

हिणविण्याचा उद्देश नव्हता. सर्वांसाठीच ते वर्णन दिले आहे.
(घाटपांडेंच्या मते माणूस जैवरासायनिक यंत्रमानव नाही.)

सिद्धांत

१.पुणे शब्दाचे स्पेलिंग PUNEY असे लिहिल्यास चंगळवाद संपुष्टात येऊन पुण्याला गतवैभव प्राप्त होईल.
२.मुंबईचे स्पेलिंग MOOMBAI लिहिल्यास तिथली टोळीयुद्धे समाप्त होतील.

त्यांनी मांडलेले सिद्धांत तर त्या बातमीत दिसले नाहीत तेव्हा त्यांनी असे काही केले आहे याचा संदर्भ कुठे आहे?

बाकी नावेबिवे बदलणे या गोष्टींची गंमत वाटली. मुंबईचे नाव इंग्रजीतच का बदलायचे? मराठीतही ते मूंबई करायचे का? असे केल्यास अनेक अशुद्धलेखन समर्थकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातमीचा दुसरा भाग

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली आणि श्री.महेश हतोळकर यांनी निदर्शनाला आणून दिलेल्या संदर्भविषयक त्रुटीचे निरसन असे:

लेखात जोडबातमी म्हटले आहे. त्यांतील एकच भाग म.टा.च्या ई आवृत्तीत दिसतो. कागदी आवृत्तीतील दुसरा भाग खाली देत आहे:
..................
पुणे म.टा. सोम.२८.०३ २०११ च्या कागदी आवृत्तीत
पूना चे पुणे झाले आणि चंगळवाद सुरू झाला.
ज्योतिषी डॉ.एम्.कटककर यांचा दावा
या शीर्षकाखाली पुढील मजकूर आहे:
..
इंग्रजांच्या गुलामगिरीचे प्रतीक म्हणून पूना,बॉम्बे या नांवांना विरोध केला जात असला
तरी ही नांवे त्या शहरांना लकी होती.असा दावा भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाचे अध्यक्ष
डॉ.एम्.कटककर यांनी केला आहे.एव्हढेच नव्हे तर पूनाचे पुणे झाले आणि इथला चंगळवाद वाढला.बॉम्बे चे मुंबई झाले आणि तिथल्या हाणामार्‍यांची संख्या वाढली.असे निरीक्षण डॉ.कटककर यांनी नोंदविले.
कटककर यांच्या मते पुण्याची ओळख पूर्वी पूना अशी होती त्यावेळी इथे कलेच्या उपासकांची संख्या मोठी होती.अभ्यासू मंडळींचा वावरही भरपूर होता.पूनाचे पुणे झाले आणि इथला चंगळवाद वाढत गेला.
मुंबईच्या बाबतीतही असेच काहीसे झाले.या शहराचे नाव जेव्हा बॉम्बे होते त्यावेळी तिथे
सगळे उत्तम चालले होते.पण बॉम्बेचे मुंबई झाले आणि तिथल्या हाणामार्‍यांची संख्या
वाढली.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या नावाचे स्पेलिंग MUMBAI ऐवजी MOOMBAI असे केले आणि पुण्याचे PUNE ऐवजी PUNEY असे केले तर या दोन्ही शहरांना पुन्हा एकदा जुने वैभव प्राप्त होईल असे भविष्य डॉ.कटककर यांनी वर्तविले..
पूना नाव होते तेव्हा शहर रवि ग्रहाच्या आधिपत्याखाली होते.त्यामुळे इथली कला संस्कृती वाढत होती.नाव पुणे झाल्यावर शहर शुक्राच्या आधिपत्याखाली गेले.आता पुण्याच्या नावाचे स्पेलिंग PUNE ऐवजी PUNEY केले तर शहर नेपच्यूनच्या आधिपत्याखाली येईल आणि पुणे शहराला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल,असा डॉ.एम्.कटककर यांचा दावा आहे.
मुंबईला बॉम्बे म्हटले जायचे तेव्हा शहर शनीच्या आधिपत्याखाली होते.मुंबई असा बदल झाल्यावर ते मंगळाच्या आधिपत्याखाली आले.त्यामुळे हाणामार्‍यांची संख्या वाढली.आहे.
आता मुंबई स्पेलिंग MOOMBAI असे लिहिले तर शहर पुन्हा शनी ग्रहाच्या आधिपत्याखाली येईल आणि मुंबईला गतवैभव मिळेल असे त्यांचे(डॉ.एम्. कटककर यांचे)म्हणणे आहे.

धन्यवाद

वरील बातमी टंकण्याबद्दल धन्यवाद.

नावांचे स्पेलिंग बदलायचे खूळ आजकाल फार पसरले आहे. गावांची नावे बदलायचेही खूळ बोकाळते आहे हे कळले.

शंका

स्पेलिंग बदलले तर उपक्रम प्रगल्भ होईल काय?
Nile यांनीही Nail असे स्पेलिंग वापरून पहावे काय?

हेहेहे!

स्पेलिंग बदलले तर उपक्रम प्रगल्भ होईल काय?

Oopakram असे लिहायचे की ऊपक्रम असे?

Nile यांनीही Nail असे स्पेलिंग वापरून पहावे काय?

त्यामुळे त्यांचे आठ दिवसांचे हौतात्म्य कमी होईल का अशी शंका व्यक्त करताय का? Nile यांची संमती असल्यास करून बघा. दूध का दूध... इथेच होईल. ;-)

सूचक

मी अजुनही "शेवटचा Nail" कुठला याचे गणित करत असताना मलाच Nail व्हायला सांगणे भयसूचक आहे! ;-)

अवांतराबद्दल क्षमस्व.

-Nile

हेच! हेच!!

मी अजुनही "शेवटचा Nail" कुठला याचे गणित करत असताना मलाच Nail व्हायला सांगणे भयसूचक आहे! ;-)

पुराव्यासकट सिद्ध करण्याची वेळ आली की बरेचजण पळवाट शोधतात. :प्

प्रगल्भ स्पेलिंगची आज्ञावली

प्रगल्भ स्पेलिंगची आज्ञावली लिहायला हवी. सदस्यनाम घेतानाच सदस्याला प्रगल्भून टाकायला हवे. प्रयत्न करा बरं. क्रांती येईल.
काही नावे वानगीदाखल घेऊन प्रयत्न करा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यवाद सर

बातमी टंकल्याबद्दल. (आणि तुमच्यावर आलेल्या आक्षेपाचे खंडन केल्या बद्दल)

थांबा..

आजूनकोणमी ह्याची तर्कदृष्ट्या वैज्ञानिक चिकित्सा करत नाहीत तो पर्यंत कृपया कटकरांची खिल्ली उडवू नये.

:)

:) तुमचे कोणीच ऐकत नाही बहुदा.

हो

हो. सगळे तुमचेच ऐकतात ना :)

हात्तिच्या....

लेखाचं शीर्षक बघुन मला वाटलं की
एखादा राखी सावंत ह्यांचा नवीन रीऍलिटी शो सुर् झाला की काय.

किंवा सचिन-सेहवाग पैकी कुणी जखमी होउन उपान्त्य सामन्यातुन माघार वगैरे घेतली का काय.

--मनोबा

तूम्ही सूखी आहात काय ?

या एकविसाव्या शतकात वावरणारी शहाणी सुरती व्यवहारज्ञानी माणसे इतक्या निरर्थक गोष्टींवर श्रद्धा ठेवतातच कशी?

या एकविसाव्या शतकात वावरणारी सर्व माणसे जर सूखी असती तर मग ती शहाणी सुरती व्यवहारज्ञानी असोत अथवा नसो, त्यांनी या गोश्टींवर ना श्रध्दा ठेवली असती, ना जर कोणी श्रध्दा ठेवलीच असेल तर श्रध्दा का ठेवली अशी ओरड करणारे लेख लीहले असते.

दु:खाचे प्रसंग

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. चतुर यांचा प्रश्नः-- "तुम्ही सुखी आहात काय?"
उत्तरः-- आपणा सर्वांची आयुष्ये कमी अधिक प्रमाणात सारखीच असतात.सर्वसाधारणपणे इतरांवर येतात तसे दु:खाचे प्रसंग माझ्यावरही आले.आले ते स्वीकारले. धीराने तोंड दिले. नातेवाईकांची ,मित्रांची मदत घेऊन संकटातून बाहेर पडलो.कोणत्याही बुवा बाबा कडे,ज्योतिषाकडे गेलो नाही.देवाला साकडे घातले नाही.कोणताही धार्मिक उपाय केला नाही.भ्रामक मानसिक समाधानाच्या मागे लागलो नाही. अवैज्ञानिक मार्गांनी एकतर आर्थिक हानी होते आणि अंततः नैराश्य येण्याचा संभव असतो.मन खंबीर असावे.त्यावर बुद्धीचा अंकुश असावा.

विद्यापीठ

प्रत्येक ज्योतिषाचा क्लास म्हणजे एक मुक्त विद्यापीठच असते.
इथे पहा प्रश्न क्रं ६१
प्रकाश घाटपांडे

बौद्धिक दिवाळखोरी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या विषयी एका सदस्यांनी व्य. नि.द्वारे विचारले आहे की कुणा ज्योतिषाने काही अर्थशून्य
दावे केले ही बातमी भयसूचक कशी असू शकते? अशा बातमीचे आपल्यावर (तुम्हा आम्हांवर) कोणते दुष्परिणाम होणार आहेत?
प्रतिसाद लिहिणार्‍या सदस्यांनीसुद्धा ही बातमी हसण्यावारी घेतली. ते ठीकच आहे. कारण ज्योतिषीदावे हास्यास्पदच आहेत.
पण थोड्या दूरवरच्या भूतकाळ-भविष्यकाळाचा विचार केला तर काय दिसते?
आपण समाजापासून फार अलिप्त राहू शकत नाही.आपल्याला,आपल्या भावी पिढ्यांना या समाजातच राहायचे आहे.(इथे भारतीयय नागरिकांचा विचार प्रस्तुत आहे.) समाजाच्या भल्यातच आपले भले आहे.समाजाची योग्य दिशेने प्रगती झाली तरच देश प्रगत होईल.
गेल्या दोन दशकांत इथे भ्रष्टाचार,अनैतिकता,आर्थिक घोटाळे, भेसळ प्रकरणे,अत्याचार अशा गोष्टीत सतत वाढ होत आहे.ज्योतिष,वास्तुदिशाभूलशास्त्र,भाग्यरत्‍ने,श्रीयंत्रे अशा अनेकानेक अंधश्रद्धांच्या रोगाची साथ झपाट्याने पसरत आहे.
समाजाची विचारशक्ती भरकटली आहे.समाज बौद्धिक दिवाळखोरीच्या मार्गावर आहे.परिणामत: देवधर्माचे स्तोम अतोनात वाढले आहे.धार्मिक कर्मकांडांना ऊत आला आहे.समाजाची बौद्धिक आणि नैतिक अवनती होत आहे.
लेखातील बातमीत एक प्रतिष्ठित मान्यवर पत्रकारांपुढे इतके हास्यास्पद दावे गंभीरपणे करतात.ते प्रसिद्ध होतात.हे दावे खरे आहेत असे मानणारे अनेक जण असणार हे उघड आहे.म्हणजे माणसांची बुद्धी रसातळाला जात आहे. हे भयसूचक आहे.यामुळे वरील चिंता वाटते.ही चिंता स्वत:संबंधी नाही.समाजाविषयी आहे.
कोणी याला लहान डोकी मोठा भास म्हणतील.असो.बातमी वाचून जे प्रकर्षाने वाटले ते लिहिले.

 
^ वर