२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू
१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला. त्यामुळे खोऱ्यात आता हिंदू नगण्य राहिले आहेत व हिंदू मत नगण्य झाले आहे. पुढे कधी मताधिकार राबवून (प्लेबिसाईट) काश्मीर प्रश्न सोडवायचा असा निर्णय कार्यान्वित झाला तर फुटिरतावाद्यांना त्यांचा डाव जिंकायला साहजिकच सोपे जाईल. कलम ३७० लागू असल्या कारणाने जम्मू काश्मीर सोडून बाकी लोकं तिथे वस्ती करू शकत नाहीत, पण हिंदूंना मात्र तेथून घालवून देऊन पाकिस्तानचा इरादा सफल होत आहे. १९८८ मध्ये पाकिस्तान च्या राष्ट्राध्यक्ष ह्यांचा ऑपरेशन टोपुक कार्यान्वित झाल्यावर १९८९ – ९० मध्ये ज्या हजारो हिंदूंना मारून, धाक दाखवून पद्धतशीर पणे खोऱ्यातून हुसकवून लावले त्याला एवढ्यातच २० वर्षे झाली, नव्या पिढीला कदाचित ह्या इतिहासाचे विस्मरण झाले असेल किंवा कदाचित हा इतिहास माहीत पण नसेल. त्या होलोकास्ट चे व त्या काळ्या दिवसांचे स्मरण करून विस्थापित काश्मिरी हिंदूंनी गेल्या आठवड्यात एक मोर्चा काढला होता.
जर नवीन पिढीला होऊन गेलेला इतिहास माहीत नसेल तर पूर्वी राष्ट्राकडून झालेल्या चुका पुन्हा होण्याची भीती निर्माण होते. बरोबर इतिहास माहीत नसेल तर नवी पिढी आहे त्या परिस्तिथीचा विचार वेगळ्याच दृष्टिकोनातून घेऊ शकते. काही वर्षाने मग इतिहास माहीत नसल्याने किंवा त्याचे विस्मरण झाल्याने नव्या नव्या पिढी कडून ही चूक होण्याची देखिल शक्यता आहे आणि मग असे उद्गार निघायला लागतील - की, एवी तेवी हिंदू कोणी तेथे राहत नाहीत, जे राहतात त्यांना काश्मीर भारतात नको आहे आपण का धरून बसायचे काश्मीरला, सोडून द्या ना. भारत विरोधी अरुंधती रॉय ह्यांच्या सारख्या प्रसिद्धीची हाव असणारे स्वयंघोषित नेते ह्याच गोष्टीचा फायदा आता सुद्धा घेताना दिसतात. येणाऱ्या पिढ्या काश्मीर प्रश्नावर सतत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत राहणार, पण गेल्या २० वर्षांचा इतिहास कोणच्याही शैक्षणिक संस्थांमधून शिकवला जात नाही व ही इतिहासाची जी रिक्त स्थाने आहेत ती भरल्या शिवाय काश्मीर प्रश्नाचे गांभीर्य, सोडवण्याची प्रबळ इच्छा व प्रश्न सोडवण्याचा मार्ग सुकर होणार नाही.
ह्या पिढीला म्हणूनच हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी ऑपरेशन टोपुक व त्यानंतर चे काश्मिरी हिंदूंचे विस्थापन ह्या विषयावर लेख, बातम्या, इतिहास ह्या वर अधिक संशोधन करावे.
Comments
शंका
"त्यामुळे खोऱ्यात आता हिंदू नगण्य राहिले आहेत व हिंदू मत नगण्य झाले आहे."
१९४७ साली किती टक्के हिंदू होते? कृपया संदर्भ द्या.
१०%
१९४८ मध्ये १०% होते असे त्यांनी तिकडे लिहिले आहे.
नितिन थत्ते
धन्यवाद
चितळे यांच्यासाठी प्रश्नः सार्वमतात विजयासाठी किती टक्के लोकांचे सहकार्य लागते?
आपल्या साठी उत्तर
जर १०० टक्के मतदान झाले तर ५० टक्क्या पेक्षा जास्त.
धन्यवाद
तर मग त्या १०% ना हाकलण्याचा उद्देश हा सार्वमतासाठीच असल्याचा आरोप का ग्राह्य धरावा?
बहुतेक
धागाप्रवर्तकांकडे विदा असेल की नेमकी १०% एकगठ्ठा मते सार्वमतात विजय / पराभवाला कारणीभूत आहेत.
नाही का जसे देशातील इतर निवडणूकात अल्पसंख्यांक एकगठ्ठा मत टाकून कायम त्यांच्याच बाजूला निकाल लावतात तशी संधी काश्मीर मधे आली असता हिरावून घेतली जात आहे. :-)
हॅहॅहॅ
पॉईंट आहे!
सार्वमत
रिकामटेकडे साहेब
१. सार्वमत जम्मू आणि काश्मीर राज्यात होणार होते त्याला काही अटी होत्या (त्या इतरत्र वाचाव्यात).
२. जेव्हा सार्वमत होत तेव्हा नुसतेच राज्य नाही तर छोट्या मतदार संघात सुद्धा टक्केवारी बघितली जाते. जम्मूमध्ये साथारण ६७ टक्के हिंदू आहेत.
३. आज जे काश्मीर खो-यात चालले आहे त्याला आळा घातला नाही तर उद्या जम्मू मध्ये व परवा लडाख भागात हेच होऊ शकते.
http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com
शंका
सार्वमत 'जम्मू आणि काश्मीर आणि लडाख' मध्ये अपेक्षित आहे की केवळ काश्मीरमध्ये? पाकिस्तानचा जम्मूवरही दावा आहे काय? विकिपीडियानुसार त्यांचा केवळ काश्मीरवर दावा आहे.
शंका
आज पाकिस्तानचा दावा जम्मूवर नाही. उद्याचे सांगता येत नाही. सार्वमत पूर्ण जम्म काश्मीरला लागू होते (तेव्हाच्या करारानुसार - पाकव्यप्त काश्मीर व पाकिस्तानने चिनला दिलेले अक्साईचिन धरुन )
प्रश्नहा आहे की आपल्या आंतरराष्ट्रीय सिमा जर स्थिर नसतील तर हा प्रश्न नेहमी ओपन राहू शकतो. आपल्या सिमा स्थिर नाहीत - काश्मीर मध्ये इंटरनॅशनल बाऊंड्री नाही - लाइन ऑफ कंट्रोल (पाकिस्तान ला लागून) व लाइन ऑफ एक्चुअल लाइन ऑफ कंट्रोल (चिन ला लागून) आहे.
हा इतिहास ताजा ठेवला नाही तर हानी होत राहणार. असे माझे मत
http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com
विस्थापित काश्मिरी हिंदू॰
अधिक माहिती साठी " शापित नंदनवन " हे पुस्तक जरूर वाचावे.
घरकुल काय बांधता येईल केव्हाही,
मनगटात झेप घेण्याची जिद्द असावी.
काश्मिरी पंडित
काश्मिरी पंडितांच्या निर्वासित अस्तित्वावर सहवेदना सर्वांनाच असतील.
लेखाचे दोन उद्देश दिसतात. एकात काश्मिरी पंडितांना हुसकून लावले त्याबद्दल. तर दुसर्यात सार्वमतात हा भूभाग 'आपल्या' कडून जाण्याबद्दल. यातील खरी चिंता दुसर्याची भासते आहे असे वाटले. (देशांतर्गत इतर निर्वासित आहेत.)
काश्मिर राज्य (हरिसिंगाचे राज्य) यात अनेक भिन्न विचाराचे भिन्न भाग होते. मूळ सार्वमत (जे भारताने मान्य केले होते.) हे पूर्ण राज्यात एकत्र घ्यायचे होते. त्यावेळची सार्वमते (जुनागड नंतर सिक्कीम) ही पूर्ण राज्यात घेतली होती. त्या राज्याचे तुकडे करणे अपेक्षित नव्हते. आज मूळ राज्याचे तीन दर्शनी तुकडे झाले आहेत. (पाकव्याप्त भागाचे प्रशासकीय तुकडे आहेत.) सध्या पूर्वपरिस्थितीनुसार सार्वमत घेणे दुरापास्त आहे. सर्वपक्षांना त्याची जाणीव आहे. मूळ मागणी नुसार पाकिस्तानला आणि भारताला पूर्णतः हे राज्य हवे होते. आजही दोघांचीही हीच दर्शनी मागणी आहे.
मूळ राज्यात काश्मिर हा एक भाग आहे. जम्मु, लडाख, बाल्टीस्तान (उत्तर भाग), अक्साई (चीन कडील भाग) हे इतर भाग लहान नाहीत (काही क्षेत्रफलाने तर काही लोकसंख्येने.) यातील मुख्य अडचणीची गोष्ट म्हणजे काश्मिर भागाचे दोन तुकडे झाले. त्यामुळे काश्मिरी (या भागातील लोक) दोन तुकड्यात विभागले गेले. सध्याचे राजकारण/वाटाघाटी या भागाबद्दलच्या आहेत.
पंडितांचा प्रश्नाचे विस्मरण होऊ नये हे धागा लेखकाचे म्हणणे उचित आहे. मात्र सार्वमताची त्यात गुंतागुंत नसावी.
प्रमोद
प्रमोद साहेब
प्रमोद साहेब धन्यवाद.
।।।लेखाचे दोन उद्देश दिसतात. एकात काश्मिरी पंडितांना हुसकून लावले त्याबद्दल. तर दुसर्यात सार्वमतात हा भूभाग 'आपल्या' कडून जाण्याबद्दल. यातील खरी चिंता दुसर्याची भासते आहे असे वाटले. (देशांतर्गत इतर निर्वासित आहेत.)
इतरत्र काश्मिरी हिंदूंना हुसकून लावले त्याबद्दल कथेच्या रुपाने लिहिले आहे. सार्वमताची एवढी चिंता नाही कारण आपण म्हटल्या प्रमाणे हे होणे आता बहूंशी दुरापास्त वाटते, पण डेमोग्राफी बदलण्यामुळे त्याचे सलग्न प्रश्न आहेतच व राहतील. नविन पिढीला जाणिव असली पहिजे ह्या सर्व गोष्टींची असे वाटते.
दुर्दैवाने...
काश्मिरी पंडितांच्या निर्वासित अस्तित्वावर सहवेदना सर्वांनाच असतील.>>>>>
वरचे काही प्रतिसाद वाचल्यावर दुर्दैवाने तसे असावे असे वाटत नाही. नुसते तर्कदुष्ट विचार व त्या नुसार मांडले गेलेले काही मुद्दे ,टिप्पण्या हे मला क्रूर विनोद वाटले. परदु:ख शीतळ असते म्हणतात ते आठवले. :(
खरे आहे आपले म्हणणे
मला हा अनुभव आला आहे आधी सुद्धा. आपल्यासाठी दुवा व्यनि करुन देत आहे.