नास्तिकांचा विश्वास तरी कशावर आहे?

खरे पाहता नास्तिकांच्या टीकाकारांना नास्तिकांची श्रद्धा तरी कशावर आहे असा प्रश्न विचारायचा असतो. मुळात या टीकाकारांच्या मते नास्तिकांचा कुठल्याही गोष्टीवर विश्वास नसल्यामुळे ते पाखंडी, संवेदनाविहीन, नैतिकमूल्यांची चाड नसणारे, कायमचे वाकड्यात शिरणारे, भावना दुखविणारे.... असतात. परमेश्वर व धर्म यावर श्रद्धा नसणारेसुद्धा नैतिक असू शकतात, त्यांच्याही भावना असतात, यावर त्यांचा अजिबात विश्वास नाही. अशाच प्रकारचा खोचक प्रश्न मायकेल शेर्मर या चिकित्सकाला विचारल्यावर त्यानी दिलेले उत्तर 'उपक्रमीं'ना (अशा लेखांचा कंटाळा आलेल्या रिटे, घाटपांडे व इतरांची क्षमा मागून) विचार करण्यास प्रवृत्त करू शकेल म्हणून हा लेखनप्रपंच.

 • माझा स्वातंत्र्य या तत्त्वावर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येकाला विचार करण्याचे, इतरावर भरवसा ठेवण्याचे व त्याप्रमाणे कृती करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. फक्त या स्वातंत्र्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही वा स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही या मर्यादेतच त्यांनी स्वातंत्र्य भोगायला हवे.
 • आपल्या देशाच्या घटनेत नमूद केलेले मानवी अधिकार, मानवी स्वातंत्र्य (ज्यात भाषण व लेखन स्वातंत्र्य, संघटित होण्याचे स्वातंत्र्य, शांत रीतीने अडचणी इतरांसमोर मांडण्याचे स्वातंत्र्य, ईश्वराची पूजा करण्याचे ( वा न करण्याचे) स्वातंत्र्य इत्यादी आहेत) यांच्यावर माझा विश्वास आहे.
 • खाजगी मालमत्ता, कायद्याचे राज्य व समता यांच्यावर माझा विश्वास आहे.
 • मी मुक्त स्वातंत्र्य, मुक्त निवड, नैतिक अधिष्ठान व वैयक्तिक जवाबदारी यावर विश्वास ठेवतो.
 • मी नेहमीच सत्याच्या शोधात असतो व खरे बोलण्यावर माझा विश्वास आहे.
 • एखाद्यावरील भरवसा व विश्वासार्हता या मला मान्य आहेत.
 • माझा न्याय वर्तणुकीवर व न्याय वर्तणुकीच्या परतफेडीवर विश्वास आहे.
 • माझे प्रेम, विवाह, पती-पत्नीमधील एकमेकाशी निष्ठा यांच्यावर विश्वास आहे.
 • इतरांशी गौरवयुक्त वर्तन, कुटुंबियाबद्दल आस्था - जिव्हाळा, मित्र व समाजातील इतरांबरोबर सलोख्याचे संबंध - वर्तन यावर मी विश्वास ठेवतो.
 • मनापासून विचारलेल्या प्रामाणिक क्षमायाचनेवर माझा विश्वास आहे.
 • दया, करुणा, अडलेल्यांना मदतीचा हात, समाजोपयोगी कार्यासाठी देणगी यावर माझा विश्वास आहे.
 • निसर्ग नियम व सृष्टीत घडत असलेल्या घटनांचे स्पष्टीकरण देण्यासाठी विज्ञानाची फार मोठी देणगी आहे, यावर माझा विश्वास आहे.
 • समस्यांची उत्तरं शोधणारे, आयुष्यातील गुंतागुंतीचे उकल करू शकणारे, संदिग्ध परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करणारे तर्क, विवेक व विचारशक्ती या मानवी जाणीवांच्या साधनांवर माझा पूर्ण विश्वास आहे.
 • मी तंत्रज्ञान, संस्कृती, व नैतिकता यांच्या प्रगतीचा पुरस्कर्ता आहे.
 • माझा मानवाच्या अमर्याद क्षमतेवर, त्याच्या सर्जनशीलेवर, कल्पकतेवर, नाविन्यतेवर व मानवासकट इतर सर्व जाती-प्रजाती या पृथ्वीवर सुख व समाधानाने नांदण्यासाठी तो करत असलेल्या प्रयत्नावर विश्वास आहे.

ही यादी परिपूर्ण आहे वा यात बदल होणार नाही असा दावाही नाही. या यादीवर ओझरती नजर टाकल्यास परमेश्वर, धर्म, यांच्याविनासुद्धा आपण नैतिक व माणूस म्हणून जगू शकतो हे लक्षात येईल.
सूज्ञास जास्त सांगणे न लगे!
(मराठीकरण करताना काही चुका असण्याची शक्यता आहे. चू.भू.दे.घे.)

संदर्भ

Comments

"टींब टींब"

"टींब टींब" हे भयपटातील त्या एका विशीष्ठ पात्रासारखे असतात. भूत पाहीलेली बाई / पुरुष घाबरत-घाबरत दुस-याला त्याबद्दल सांगत असते पण तो दुसरा माणूस तेव्ह्ढे सोडून सगळ्यावर विश्वास दाखवतो पण शेवटी त्यालाच भूताचा साक्षात्कार होतो व त्यालाही ते पटते.

......????

स्पष्टिकरणास्तव एखादा भयपट व त्यातील "टिंब टिंब" पात्र सांगता येइल का?

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

 
^ वर