एकाकीपणा आणि त्यावरचे उपाय

एकाकीपणामुळे हृदयविकार उद्भवू शकतो असे सिद्ध झालेले आहे. मनुष्य समाजशील प्राणी आहे. एकटे पडण्यामुळे मनाच्या काही गरजा भागत नाहीत. साखरेपासून कोलेस्टेरॉल तयार करण्याच्या शारीरिक गतीस अशा परिस्थितीत वेग लाभतो. आणि मग सर्व शरीर सुदृढ आणि निरोगी असूनही हृदयधमन्यांमध्ये किटण साठू लागते. त्या अवरुद्ध होतात. हृदयविकार होतो. असल्यास बळावतो. म्हणूनच हृदयविकार झालेल्यांना समाजात मिळून-मिसळून राहण्याचा सल्ला दिला जातो. इतरांशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने फायदाही होतो. ह्याकरिताच एकाकीपणा उद्भवतो कसा? त्याचा सामना कसा करावा? हृदयविकाराचा प्रतिबंध करण्यासाठी, एकाकीपणा टळावा म्हणून जीवनशैलीत काय परिवर्तन करावे? ह्या प्रश्नांचा उहापोह इथे करण्याचे योजिले आहे.

हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात माणसेच मुळात कमी असतात. दार बंद संस्कृतीमुळे शेजाऱ्यांशी संवाद मर्यादितच असतो. त्यात घरातील प्रत्येक व्यक्ती इतकी व्यस्त असते की एकमेकांशीही बोलायला फुरसत असू नये. घरात माणसे एकतर झोपलेली असतात किंवा घराबाहेरच जास्त वेळ असतात. जागेपणी घरातील दोन-चार व्यक्ती घरात असण्याचा काळ, तीन-चार तासांचाच काय तो असतो. ह्या 'काळास' ते एकतर प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विश्रांती घेण्याचा काळ मानतात किंवा सामुहिकरीत्या दूरदर्शन बघण्याचा काळ मानतात. व्यक्तीव्यक्तींमध्ये अर्थपूर्ण संवाद होतच नाही.

ह्यामुळे, व्यक्तींचे न सुटणारे प्रश्न, साखळलेली निराशा, कामाचे जागी कधीही उद्भवू शकणारे वैमनस्य, अनपेक्षित रीतीने वेळाचा, कष्टाचा, पैशाचा झालेला ऱ्हास इत्यादी समस्यांना श्रोता सापडत नाही. दिलासा मिळणे तर दूरच राहते. अशा परिस्थितीत शरीरभर चैतन्य मंद होते. मनाचे अस्वास्थ्य शरीरात अवतरू लागते.

वाढत्या वयात माणूस कार्यशक्तीच्या बहरातून प्रथम चढत असतो व पन्नाशीनंतर उतरत असतो. उत्तरोत्तर उत्कर्ष साधत तो स्वत:ची एकमेवाद्वितीय जागा बनवत जातो. एकटा पडत जातो. त्याची कामे करण्यास केवळ तोच सक्षम राहतो. इतरांची मदत त्याला होईतनाशी होते. आपले पद अबाधित राहावे म्हणून कधीकधी तो स्वत:च इतरांना सुगावा लागू देत नाही. व्यावसायिक गुप्ततेच्या भिंती बांधत जातो. त्यामुळे कुठेही काहीही बोलू शकण्याचे, वागू शकण्याचे त्याचे स्वातंत्र्य उत्तरोत्तर घटत जाते. मन कैदेत पडल्याचा अनुभव घेते. आणि शरीर परिणाम भोगू लागते.

घरात आणि बाहेरही आपण क्षणोक्षणी असंख्य लोकांना भेटत असतो. मात्र मनातली किल्मिषे दूर करण्यासाठी त्यांच्याशी अनेकानेक कारणांनी संवाद साधता येत नाही. कधी ते लोक आपल्या बौद्धिक क्षमतेचे नाहीत असे आपल्याला वाटत असते. कधी पुरेसा वेळच हाताशी नसतो. कधी समोरच्याला तुमची रामकहाणी ऐकण्यात मुळीच स्वारस्य नसते. कधी परिस्थिती सोयीस्कर नसते. अगदी ओठांवर आलेली गोष्ट बोलण्याच्या वेळेसच काही दुसरी महत्त्वाची घटना बोलणेच खुंटवते.

नुकत्याच झालेल्या दसऱ्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी ५० वर्षांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तित करून बुद्ध धर्मात प्रवेश केला त्या घटनेचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. ते बुद्ध धर्माकडे आकर्षित झाले त्यामागील अनेक कारणांची चर्चा ह्यानिमित्ताने सर्वत्र झाली. मात्र त्याही आधीपासून मला बुद्ध धर्माच्या तीन वचनांची मोहिनी पडलेली आहे. संघशक्तीचे निस्संदिग्ध वर्चस्व त्यांमध्ये विषद केलेले आहे. ते प्रार्थनेचे शब्द आहेत:

बुद्धं शरणं गच्छामि । म्हणजे बुद्धिवंतास मी शरण जातो,
धम्मं शरणं गच्छामि । म्हणजे धर्मास मी शरण जातो,
संघं शरणं गच्छामि ॥ संघास मी शरण जातो.

(धर्म = अर्धमागधी भाषेत धम्म, बुद्धवचने संस्कृत/अर्धमागधीत लिहिलेली दिसून येतात.)

क्रम महत्त्वाचा आहे. संघशरणता सर्वोच्च महत्त्वाची मानलेली आहे. माझे मानणे असे आहे की साऱ्या अवनतीकारक रोगांचे मूळ मनोविघटनाद्वारे शारीरिक दुर्बलतेत घडून व्यक्तीस ऱ्हासाप्रत नेत असल्याचे ज्ञान ह्या वचनांमागच्या भूमिकेमधून स्पष्टपणे दिसून येते.

बुद्धीला पटेल तसे आपण वागतो. ही बुद्धीशरणता होय. स्वार्थासाठी दुसऱ्याची फसवणूक करून सौख्य साधणे बुद्धीला पटू शकते. मात्र ते धर्माला पटणार नाही. नैतिकतेला पटणार नाही. तसे वागणे धर्मशरणता ठरणार नाही. शत्रू बलवान असला तर लढाईत विजय मिळणार नाही. तरीही अशी लढाई बुद्धीला पटणारी असू शकते. धर्म्य असू शकते. मात्र ती संघशक्तीला पटणारी नाही. संघाच्या दृष्टीने तो निव्वळ ऱ्हास ठरेल. म्हणून असेच वागावे जे बुद्धीला पटेल, धर्म्य असेल आणि संघास हिताचे ठरेल. त्याकरीता अनुक्रमे बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि म्हणायचे आहे. तिन्हीही आवश्यक.

मात्र गौतम बुद्धास ह्यापरता, तसे न वागल्यास, व्यक्तीलाही मानसिक व शारीरिकदृष्ट्या गंभीर परिणाम भोगावे लागत असणार ह्याचे ज्ञान असले पाहिजे. माणूस समाजशील असल्याकारणाने. ते ज्ञान, जे आज मनोकायिक अभ्यासांनी सिद्ध केलेले आहे. तेव्हा संघशरणता हा एकाकीपणावर उत्तम उपाय आहे. मात्र हे साधावे कसे?

भाषेचा वापर वर्णन करण्यासाठी, साद/प्रतिसाद देण्यासाठी, टिप्पणी करण्यासाठी केल्या जातो. आपल्या बोलण्यात आपण वस्तुनिष्ठ वर्णनशैली विकसित करावी. टिप्पणी/भाष्य करणे टाळण्याचे धोरण ठेवावे. असे केल्यास एकवाक्यता साधते. सहमती होऊ शकते.

कुणीही कधीही आपली मदत मागत असेल, न मागताही आपल्याला शक्य असेल तर प्रसंगी पदरमोड करूनही करावी. मानवी मनाला कृतज्ञता शिकविण्याची गरज नसते. अवघड प्रसंगी केलेल्या मदतीची जाण दुष्ट लोकही ठेवतात. म्हणून कुणि मदत मागत असणे ही आपल्या एकाकीपणावर मात करण्याची संधी मानावी. अर्थातच आपापल्या कार्यशक्तीच्या मर्यादेत राहून.

आपण समाजशील आहोत ह्याचे सदैव भान ठेवावे‌. सर्वांसोबत राहिल्यानेच आपली उन्नती वेगाने घडून येऊ शकते. आपले विशेषाधिकार समाजपुरूषाच्या पायी समर्पित केल्यास आपली भौतिक आणि मानसिक उन्नती घडून येते. कम्युनिस्टांनी 'कम्युन्स'चा महिमा गायिला. गीतेनी 'सांख्य'योग शिकविला. सर्वच धर्मांनी समुदायाचे भान ठेवले. दखल घेतली. मात्र भांडवलशाही समाजात पैशाला अवास्तव महत्त्व प्राप्त झाल्याने माणसाची, माणुसकीची किंमत अकारणच घटली. पैशावरचा विश्वास माणसामाणसातील विश्वासापेक्षा मोलाचा ठरला.

एकाकीपणा सामान्यत: खालील कारणांनी उद्भवू शकतो. आणि त्याचा सामना त्यासोबतच सुचविलेल्या उपायांनी होऊ शकतो.

१. खराखुरा एकाकीपणा. आपल्यासारखेच इतरही लोक मैत्रीच्या शोधात असतातच. तेव्हा 'बर्डस् ऑफ सेम फिदर' शोधत असावे.

२. सभोवती असंख्य नातेवाईक, मित्र, ओळखीचे, आसपासचे, कार्यालयीन असे लोक सदैवच साथ असूनही त्यांच्याशी संवाद साधता न आल्याने येणारा एकाकीपणा. अशा बाबतीत संवादास कारणे हुडकून काढण्याची, संवाद करण्याची, विसंवाद टाळण्याची आत्यंतिक गरज असते. सोबतच्या लोकांच्या मदतीने आणि जाणीवपूर्वक संवाद साधावा.

३. आपल्या पदाच्या एकमेवाद्वितीयत्वामुळे उद्भवणारा एकाकीपणा. आपण जीवनाच्या केवळ एखाददुसऱ्या पैलूबाबत एकमेवाद्वितीय असतो, हे लक्षात घ्या. इतर अनेक बाबतीत आपले इतरांशी असलेले सांख्य (साधर्म्य, समानता, सारखेपणा) शोधा. त्यांच्या अनुभूतीत रस घ्या. त्या त्या बाबतीत तेही तुमच्यात रस घेतील, आणि संवाद साधेल, वाढेल.

४. जवळच्यांनी दूरत्व पत्करल्याने येणारा एकाकीपणा. ही सर्वसामान्यपणे एकतर्फी प्रेमाची कहाणी असते. तेव्हा समोरच्याने काय करावे हे तुमच्या हातात उरलेलेच नसते. म्हणून 'मिले न फुल तो काटों से दोस्ती कर ले' हेच धोरण पत्करावे. आपल्याला आपला एकाकीपणा घालवायचा आहे. त्यांना त्याच्याशी काय कर्तव्य?

५. पराकोटीच्या वैमनस्यात सदासर्वदा रममाण होण्यामुळे येणारा एकाकीपणा. लोक तुमच्या वैमनस्यापायी हैराण होतात. त्यांना तुमच्या कर्मकहाण्यांमध्ये मुळीच रस राहत नाही. अशावेळी त्या आपल्यासाठी ऐतिहासिक महत्त्वाच्या असलेल्या वैमनस्यावर वर्तमानाचा दाट पडदा टाकून, निरामय भविष्याची वाट धरावी हेच श्रेयस्कर ठरते.

६. स्वावलंबनाच्या अतिरेकी कल्पनांमुळे उद्भवणारा एकाकीपणा. मी कुणावर अवलंबून नाही. माझे कुणावाचून काही अडणार नाही. ह्या व्यर्थ कल्पना असतात. 'पराधिन आहे जगती, पुत्र मानवाचा' हेच काय ते निखळ सत्य असते. परावलंबित्वाचा एवढा बाऊ करू नये. किंबहुना काहिसे परावलंबित्व हेतुत:च पत्करावे. म्हणजे त्यायोगे आपोआप मित्र मिळतात.

मी जनात फिरलो तेव्हा, असंख्य मित्रही केले |
जंगलात फिरलो तेव्हा, निर्झरही बोलत होते ||
मी मनात फिरलो तेव्हा, स्मृतींची साथही होती |
मी कशात मन रमवावे, मज भ्रांत मुळी ही नव्हती ||

वरीलप्रमाणे विचार असतील तर सदरहू कविवर्यांस एकाकीपण सतावणारच नाही. स्मृतींची साथ ही माणसाला एकाकीपण कधीच जाणवू देत नाही. भरपूर पाठांतर असावं. असंख्य कविता, गाणी, वेचे मुखोद्गद् असावेत. म्हणजे अगदी अंधारकोठडीतही मनुष्य सुखेनैव कालक्रमणा करू शकतो. माणसाला कल्पनादारिद्र्य नसावे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरूंगातही 'सागरा प्राण तळमळला' लिहून एकाकीपणा घालवला. कालिदासाच्या शापित यक्षानी 'मेघदूता'स भारतवर्षाची रमणीय सफर घडवित अलकानगरीत मनोमन पोहोचविले. कल्पनाविलास माणसाला मुळीही एकाकीपण जाणवू देत नाही. म्हणून कल्पनाचित्रण करावे. तशी सवयच जडवून घ्यावी.

ह्या आणि तुम्हाला सुचतील त्या सर्व उपायांनी एकाकीपणाचा सामना करावा. लोक आपले शत्रू नाहीत. एकाकीपणा आपला शत्रू आहे. हे मनोमन मानावे. म्हणजे खचितच एकाकीपणापासून सुटका होईल ह्यात काय संशय?
.

Comments

टाईमपास करणे

मराठी संकेतस्थळांवर वेळ घालवणे हा एक उपाय असू शकतो का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

रक्तदाब

काही लोकं मराठी संकेतस्थळांवर वेळ घालवून रक्तदाब पण वाढवून घेत असतील. तो उपाय असेल असे वाटत नाही :)


हम्म!

विभक्त कुटुंबे हे इतकेच एकाकीपणाचे कारण नसावे.

१. जोडीदार निवडण्यासाठी वाढलेल्या अपेक्षा. हल्ली लग्न जमणे ही अतिशय जिकिरीची गोष्ट झाल्याचे कळते.

२. स्वत्वाची जाणीव. विशेषतः स्त्रियांमध्ये ही निर्माण झाल्याने आपण एकटे राहूनही जीवन जगू शकतो हा आलेला आत्मविश्वास

३. परदेशात वास्तव्य. आपली माणसे, आपले जग सोडून इतरत्र राहायला गेलेली माणसे. (विशेषतः कुटुंबासह न जाता एकटी राहणारी माणसे)

४. तंत्रज्ञान. विडिओ गेम्स, कम्प्युटर गेम्स, समस वगैरे एकटेपणा वाढवण्यास मदत करतात. लहान मुले आपला वेळ एकेकटा घालवतात असे पाहिले आहे.

समसचा एक किस्सा असा की मी काही दिवसांपूर्वी ऐकले की एक कुटुंब घरात डायरेक्ट संवाद साधण्याऐवजी एकमेकांना समस करते. या समसच्या सवयीमुळे समोरासमोर बोलतानाही मोजून मापून, शॉर्टकटमध्ये बोलण्याची सवय घरात लागत आहे अशी भीती या घरातील बाई व्यक्त करत होत्या. :-) (हा विनोद नाही!)

असो. एकाकीपणाची अशी अनेक कारणे असतील असे वाटते.

१,२,३ मध्ये मोडणारे अनेक लोक मराठी संकेतस्थळांवर सहज दिसतात असे वाटते.

लेखाच्या मजकुरात मोलाची भर घातल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

लेखाच्या मजकुरात मोलाची भर घातल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

मैत्री कशी करावी

कुठेतरी वाचलंय की, माणूसाला एकटंही राहता येत नाही, आणि दुकटंही (समाजातही, लोकांतही). हृदयविकारापर्यंत पोहोचलेली माणसं त्यांच्या वयाची अनेक वर्षे असे इतरांशी फारशे संबंध न ठेवता राहीलेले असतात.

१. त्यांमुळे मैत्री कशी करावी ह्याचे ट्रेनिंग त्यांनी घ्यावे
२. अशा माणूसघाण्या लोकांनी त्यांचा एक क्लब स्थापन करावा व आतातरी हे जमेल अशी आशा ठेवून मैत्री करण्याचा प्रयत्न करावा.

लेखाच्या मजकुरात मोलाची भर घातल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

लेखाच्या मजकुरात मोलाची भर घातल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

अतिचिकीत्सक वृत्ती त्यागणे

एकाकीपणा हा कधीकधी दुसर्‍यांचे दोष काढण्याच्या वृत्तीमधूनदेखील येतो. दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही हे म्हण खूप खरी आहे. अतिचिकीत्सक वृत्ती त्यागून दुसर्‍याच्यातील चांगुलपणावर केवळ वरवर नाही तर मनापासून लक्ष केंद्रित केले तर खूप फायदा होतो.
_______
आपली मुलं मोठी होत असतात, जगाबरोबर पुढे जात असतात आणि आपण मात्र भूतकाळात रमत असतो. जुनं ते चांगलं ह्याच विचारात गुरफटलेलो असतो हा अजून एक् शत्रु. मुलांच्या बरोबर रहाण्याकरता सल्ले कमी देणे आणि आधुनिक संगीताची रुची स्वत:ला लावून घेणे, नवीन तंत्रद्न्यान शिकणे हे काही उपाय मला योग्य वाटतात. परत येथीही हीच चिकीत्सक वृत्ती येते की नवं ते वाईट आणि जुनं ते सोनं. ती त्यागणे.
_______
एकंदर दुसर्‍यावर टीका कमी करणे आणि त्याच्या कौतुकास्पद मुद्द्यांवर भर देणे हाच मंत्र सांगता येईल.

लेखाच्या मजकुरात मोलाची भर घातल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

लेखाच्या मजकुरात मोलाची भर घातल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

एक उपाय

रास्वसं, स्वाध्याय परिवार, आर्ट ऑफ लिविंग, वारकरी संप्रदाय, नर्मदा बचाव आंदोलन, (परदेशात असल्यास) महाराष्ट्र/ मराठी मंडळे, आंतरजालीय सोशल क्लब्ज* (उदाहरण) यांसारख्या संघटना/आंदोलने/संस्था यामध्ये घुसल्यास एकाकीपणा कमी होऊ शकतो.

*इथल्या बाउन्सर्सपासून सावध रहावे.

_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

सहमत

सहमत आहे साहेब.

लेखाच्या मजकुरात मोलाची भर घातल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

लेखाच्या मजकुरात मोलाची भर घातल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

संशोधन

एकंदरीत तुमचे हृदयविकार ह्या गोष्टीवर बरेच लेखन मंथन झाले आहे. असे करताना हृदयविकार व त्याची कारणे यावर कुठे आकडेवारी सापडली का? असल्यास ती द्यावी किंवा अगोदरच कुठे तुम्ही ती दिली असल्यास त्याची लिंक द्यावी ही विनंती.

काही कुतुहलात्मक प्रश्न पडले.
१. शेतकरी आत्महत्या प्रकरणे दडपण्यासाठी पोलिस शेतकरी इतर कारणाने मेला असे नोंदवतात. समजा त्या शेतकर्‍याने आत्महत्त्या केली नसती तर ज्या कारणामुळे त्याला आत्महत्या करावी वाटली त्याच कारणांमुळे त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकला असता का?
२. किंवा हृदयविकाराचा झटका येणे म्हणजेच हृदयविकार नसल्याने(माझा समज) ते शेतकरी अगोदरच इतर कोणत्या हृदयविकाराने पिडीत असू शकतात काय?
३. गणपती, निवडणुका यामुळे सलग ड्युटी केल्याने पोलिसांवर ताण येतो. तो चार-पाच पोलिसांनी एकत्र (एकाकीपणा घालवण्यासाठी)ड्युटी केल्याने कमी होऊ शकतो का?
४. एकाकीपणावर हृदयविकारासाठी उपाय न शोधता मनोविकाराच्या दृष्टीकोनातून उपाय शोधले तर जास्त उपयुक्त नाही का?
५. क्रिकेट सामना किंवा तत्सम अटीतटीच्या सामन्यादरम्यान काही प्रेक्षक हृदयविकाराच्या झटक्याने मरतात. आंध्रातील काही नागरीक वायएसार रेड्डी वारले तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या सोबतीला पोहोचले. असे होऊ नये म्हणून त्यांना स्वतःची किंवा आजूबाजूच्या लोकांची काही मदत होऊ शकते का?

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

मंथन तर झालेलेच आहे, नवनीतही उपलब्ध आहे!

खालील दुव्यावरील "हृदयविकारा"वरील मालिका पाहा!

http://www.manogat.com/node/5150/

१. शेतकरी आत्महत्या प्रकरणे दडपण्यासाठी पोलिस शेतकरी इतर कारणाने मेला असे नोंदवतात. समजा त्या शेतकर्‍याने आत्महत्त्या केली नसती तर ज्या कारणामुळे त्याला आत्महत्या करावी वाटली त्याच कारणांमुळे त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकला असता का? >>>> हो शक्य आहे.

२. किंवा हृदयविकाराचा झटका येणे म्हणजेच हृदयविकार नसल्याने (माझा समज) ते शेतकरी अगोदरच इतर कोणत्या हृदयविकाराने पिडीत असू शकतात काय?>>>> शक्य आहे.

३. गणपती, निवडणुका यामुळे सलग ड्युटी केल्याने पोलिसांवर ताण येतो. तो चार-पाच पोलिसांनी एकत्र (एकाकीपणा घालवण्यासाठी) ड्युटी केल्याने कमी होऊ शकतो का?>>>> हो.

४. एकाकीपणावर हृदयविकारासाठी उपाय न शोधता मनोविकाराच्या दृष्टीकोनातून उपाय शोधले तर जास्त उपयुक्त नाही का?>>>> हो. ते ही करावेच लागते. माझा यानंतरचा लेख अवश्य वाचा!

५. क्रिकेट सामना किंवा तत्सम अटीतटीच्या सामन्यादरम्यान काही प्रेक्षक हृदयविकाराच्या झटक्याने मरतात. आंध्रातील काही नागरीक वायएसार रेड्डी वारले तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या सोबतीला पोहोचले. असे होऊ नये म्हणून त्यांना स्वतःची किंवा आजूबाजूच्या लोकांची काही मदत होऊ शकते का? >>>> नक्कीच. प्रतिबंधक उपाययोजना करता येऊ शकतात.

धन्यवाद

शत्रू बलवान असला तर लढाईत विजय मिळणार नाही. तरीही अशी लढाई बुद्धीला पटणारी असू शकते. धर्म्य असू शकते. मात्र ती संघशक्तीला पटणारी नाही. संघाच्या दृष्टीने तो निव्वळ ऱ्हास ठरेल.

याचे एखादे उदाहरण द्याल का?

बर्‍याच वेळा इतिहासात गनिमी कावा सोडल्यास बलाढ्य शत्रूबरोबर धर्म म्हणून युद्धे खेळली गेली आहेत आणि हरली गेली आहेत, जोहारही झाले आहेत. अशा वेळी संघाच्या दृष्टीने र्‍हास ठरेल म्हणजे नेमका कोणाच्या किंवा कसा र्‍हास ठरेल? की हे उदाहरण इथे संयुक्तिक नाही?

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

वेडात मराठे वीर दौडले सात...

"वेडात मराठे वीर दौडले सात..." घटनेतील अनावश्यक आक्रमण टाळता आले असते. ती लढाई निश्चितपणे धर्म्य होती. बुद्धीच्या निकषावर चाल करून जाणार्‍यांना ती योग्य वाटली होती. मात्र एकुणात त्यामुळे मराठी दौलतीची हकनाक हानी झाली. ती टाळता आली असती.

"वॉलाँग" पुस्तकात वर्णिलेली चीन विरुद्धची लढाई अशाचप्रकारे अनावश्यक होती. भारतीय संघराज्याच्या वतीने त्या लढाईत जिंकण्याची अजिबात शक्यता नसतांना अनेक सैनिकांना व्यर्थच बलिदान द्यावे लागले. त्या पुस्तकाचाही लेखक त्यात चीनचा युद्धबंदी झाला होता. अशा लढाया संघाचा विचार करून टाळता येतात.

वॉलॉन्ग ची लढाई

त्या लढाईत जिंकण्याची अजिबात शक्यता नसतांना अनेक सैनिकांना व्यर्थच बलिदान द्यावे लागले.
गोळेजी मला क्षमा करा पण मी आयुष्यात इतके कचखाऊ व भ्याड वाक्य वाचलेले नाही. हे लिहून आपण ज्या शूर सैनिकांनी वॉलॉन्गची लढाई आपल्या मर्दुमकीने लढवली व आपल्या झालेल्या मनुष्यहानी पेक्षा पाच पटीने चिनी सैन्याची हानी केली त्यांच्या स्वत:च्या व कुटुंबियांच्या त्यागाचा अपमान करत आहात असे वाटते. वॉलॉन्गची लढाई भारतीय सैन्याला कोणत्याही प्रकारे कमीपणा येईल अशी लढली गेलेली नाही. आपला शत्रू प्रबळ आहे तेंव्हा युद्ध न करणे बरे असा जर सैनिक दले विचार करू लागली तर त्यांना देशाचे संरक्षण कधीच करता येणार नाही. वरून हुकूम आला की बंदूकीत शेवटची गोळी असेपर्यंत व स्वत: जिवंत असे पर्यंत सैनिक लढत रहातात. अरुणाचल प्रदेशातील लढाई व त्या वेळी दाखवलेले गेलेले अत्यंत कमकुवत भारतीय सैनिकी व राजकीय नेतृत्व या संबंधी माझे हे ब्लॉगपोस्ट आपण बघू शकता. वरिष्ठ सेनाधिकार्‍यांनी दाखवलेल्या अकार्यक्षमतेचे खापर सैनिकांवर टाकणे कदापिही उचित म्हणता येणार नाही.प्रतापराव गुजर यांचे वेडात दौडणे आणि वॉलॉन्गची लढाई याची काहीही तुलना होऊ शकत नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

दुसर्‍या उदाहरणाची आवश्यकताच राहिलेली नाही

क्षमा केली!

"कचखाऊ व भ्याड" वाक्य उदाहरणादाखल देऊन, मुद्दा पटवण्याची माझीही अजिबात इच्छा नाही.
मात्र, पहिल्याच उदाहरणावरून तुम्हाला माझा मुद्दा समजलेला/पटलेला दिसतो आहे.
तेव्हा दुसर्‍या उदाहरणाची आवश्यकताच राहिलेली नाही असे मला वाटते.

प्रतापराव गुजर यांचे वेडात दौडणे आणि वॉलॉन्गची लढाई याची काहीही तुलना होऊ शकत नाही.>>>> सत्य वचन. तसा प्रयत्नही नाही.

रच्याकने: आपल्या सैनिकांनी केलेली वर्तणूक अभिमानास्पदच होती. ती वावगी असल्याचे माझ्या वाक्यातून कुठेही ध्वनित होऊ नये. होत असल्यास ती चूक मानून मी तशी सर्व वाक्ये ताबडतोब परत घेतो.

फरक

"वेडात मराठे वीर दौडले सात..." घटनेतील अनावश्यक आक्रमण टाळता आले असते.

सहमत. त्या लढाईत राज्याचा सेनापती हकनाक बळी गेला. इतक्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीला संयम बाळगणे आवश्यक होते.

"वॉलाँग" पुस्तकात वर्णिलेली चीन विरुद्धची लढाई अशाचप्रकारे अनावश्यक होती. भारतीय संघराज्याच्या वतीने त्या लढाईत जिंकण्याची अजिबात शक्यता नसतांना अनेक सैनिकांना व्यर्थच बलिदान द्यावे लागले.

नव्हे. वॅलाँगला सैनिकांनी जे केले ती त्यांची जबाबदारी होती. हाराकिरी नाही. तेथे कृष्ण मेनन किंवा तत्कालीन पायदळाचे सेनापती जनरल थापा होतेसे वाटते (चू. भू. दे. घे) ते गेले असते तर निश्चितच त्यांचे बलिदान तेथे अनावश्यक होते असे म्हणता येईल.

याच धर्तीवर हेमंत करकरेंचा अपुर्‍या यंत्रणेमुळे बळी जाणे हे अनावश्यक होते, शॉकिंग आणि हा:हाकार माजवणारे होते असे म्हणता येईल.

जनरल थापा

जनरल थापा जरी त्या वेळी सेना प्रमुख असले तरी त्यांना बाजूला सारून लेफ्ट. जनरल बी.एम. कौल या अनुनभवी अधिकार्‍याला कॉर्प्स कमांडर म्हणून अरुणाचल प्रदेशातल्या युद्धाचा सेनानी बनवले गेले होते. बी.एम. कौल थेट पंतप्रधानांच्याकडून आज्ञा घेत होते. बी. एम. कौल यांची अशी नियुक्ती ही राजकीय नेतृत्वाने केलेली पहिली अतिशय मोठी चूक होती.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अजून काही लढाया

प्रतापराव गुजर जर तेव्हा वाचले असते तर त्यांनी सुद्धा स्वतःला स्वतःच्या अविचारीपणाबद्दल कोसले असते. त्यामुळे बुद्धीच्या निकषावरसुद्धा किंवा क्षत्रियधर्मानुसार सुद्धा ६ जणांनी शत्रूवर चालून जाणे अयोग्य ठरले असते. कारण त्याचा त्या शत्रूवर काडीइतका परिणाम झाला नाही.

या उलट खालील काही मोजक्या लढाया ज्या पटकन आठवल्या आणि ज्यामध्ये शत्रूवर विजय नाही मिळाला तरी त्याला "आम्हाला जिंकणे सोपे नाही" किंवा "तुम्ही आम्हाला हरविले असले तरी आमची मने आणि अस्मिता अबाधित आहेत." असे संदेश गेले. त्यामुळे किमान त्या शत्रूंचे मानसिक खच्चीकरण तरी झाले किंवा अतोनात नुकसान झाले.

१. शिवाजी-संभाजी नंतर मराठी सैन्याने औरंगजेबास केलेला प्रतिकार. औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणे. संताजी-धनाजी, ताराराणी वगैरे.
२. बाजीप्रभूंचे पावनखिंडीतील बलिदान
३. मुरारबाजीचे पुरंदरावरील बलिदान
४. लिओनायडसच्या ३०० सैंनिकांचे क्झर्सस विरुद्ध बलिदान
५. सोमनाथ मंदीरावर गझनी चालून आला असता पुजारी लोकांनी जनतेसह केलेला प्रतिकार आणि मृत्यू
६. अब्दुल हमीदचे पाकिस्तानी पॅटन रणगाड्यांसहीत असलेल्या सैन्याविरुद्ध बलिदान
७. दुसर्‍या महायुद्धातील रशिया-जर्मनी युद्ध
८. आझाद हिंद सेना विरुद्ध इंग्रज सरकार
९. अहिंसावादी आंदोलनात बळी पडलेले सत्याग्रही.
१०. मगधेचा धनानंद-चंद्रगुप्त लढाया
११. झाशीची राणी

वरील सर्व उदाहरणे माझ्या मते बुद्धिनिष्ठ, नियोजनपूर्वक केलेली धर्मनिष्ठ कृत्ये आहेत. त्यामुळे वरील घटनांवर संघाची म्हणजे बुद्धाची वेगळी मते असू शकतात. तो वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण त्याचा एकाकीपणाशी संबंध नसावा असे मला वाटते.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

कैच्याकै

तुमच्या दाव्यांना काही संदर्भ असेल तर कृपया द्या.

यावर

यावर शोधल्यास बरेच दुवे मिळतील असे वाटते.
उदा.
दुवा १
दुवा २

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

शंका

  1. कोरिलेशन हे कॉजेशन झाले काय? ;)
  2. एकटेपणाला समाजात वाईट समजले जात असल्यास केवळ तेवढ्यानेही असा प्लॅसिबो परिणाम होण्याची शक्यता आहे.
  3. सर्वेक्षणांत सहभागी व्यक्तींनी आपापली एकटेपणाची व्याख्या धरून एकटेपणाची पातळी ठरविली. त्यामुळे, रोगग्रस्ततेमुळे एकटेपणा 'वाटण्याची' शक्यता त्यात दुर्लक्षिलेली दिसते.

उपाय

यावर एक विस्तृत निबंध लिहून लान्सेट किंवा तत्सम मासिकाला पाठवावा. तो छापून आल्यास तुमचे म्हणणे अधिकृतरीत्या सिद्ध होऊ शकेल. ;)

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

धन्यवाद

ग्रंथप्रामाण्यामागेच दडायचे असेल तर येथे संवादच नको. लॅन्सेटचे कुंकू लावून, होमिओपॅथीवर बंदी घालण्याचा फतवा काढाल काय?

आधी

आधी कैच्या कै वरून निदान संवादापर्यंत आलात म्हणजे प्रगती आहे असे म्हणायला हरकत नाही.

नाही!

ओनस त्यांच्यावरच आहे, त्यांनी संदर्भ देईपर्यंत मी बाय डीफॉल्ट "कैच्याकै" अशीच संभावना करणार.

एकटेपणा विरुद्ध एकाकीपणा

"एकटेपण" ही सकारात्मक किंवा जास्तीत जास्त उदासीन भावना असू शकते. किंबहुना थोडा एकटेपणा हा आवश्यकच असतो. लहान बाळांना देखील थोड्या प्रमाणात एकटेपणा आवश्यक असतो.
एकाकीपणा ही निश्चित रूपात नकारात्मक भावना आहे. रिटे, वरच्या परिच्छेदात, आपल्याला एकाकीपणा म्हणायचे आहे असे वाटते.

खुलासा

एकाकीपणामुळे हृदयविकार उद्भवू शकतो असे सिद्ध झालेले आहे. मनुष्य समाजशील प्राणी आहे. एकटे पडण्यामुळे मनाच्या काही गरजा भागत नाहीत.

यामुळे हे दोन्ही शब्द समानार्थीच वाटतात.

ज्येष्ठ नागरिक, जीवन शैली व एकटेपणा

अतिशय महत्वाचा विषय श्री. गोळे यांनी मांडला आहे. त्या संबंधीचे माझे काही विचार देत आहे.
निवृत्त होण्याच्या आधी बहुतेक जण त्यांच्या करियरच्या अत्युच्च पदावर किंवा अधिकारावर पोचलेले असतात. हाताखालची माणसे त्यांच्याशी सल्ला मसलत करत असतात, त्यांचा सल्ला मानतात (त्यांच्या अधिकाराच्या जागेमुळे) निवृत्त झाल्यावर हे चित्र एकदम बदलते. बाहेर काय घरात पण अशा व्यक्तीला कोणी विचारत नाही. " निवृत्त झाला आहात ना आता स्वस्थपणे बसा" असा सल्ला वारंवार दिला जातो. या सगळ्यातून एक भयंकर एकटेपणा त्या व्यक्तीला जाणवू लागतो. यामुळे शरीराला असंख्य व्याधींनी ग्रासण्याचीही शक्यता निर्माण होते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासाप्रमाणे (संदर्भ सध्या माझ्यापाशी नाही) ज्या व्यक्तींचा मेंदू सतत कार्यरत नसतो अशा व्यक्तींना डिमेन्शिया सारख्या व्याधी होण्याची शक्यता बरीच जास्त असते. ही परिस्थिती टाळायची असेल तर निवृत्त होण्याच्या आधीपासून नियोजन करावे लागते. या नियोजनातील प्रमुख बाबी म्हणजे,

1. आरोग्य व फिटनेस उत्तम राखणे. या साठी आवश्यक ती औषध योजना व व्यायाम वयाच्या पन्नाशीपासून नियमित रित्या घेणे. आरोग्य उत्तम नसेल तर अशा व्यक्तीला जीवनातील कोणताच आनंद उपभोगता येणार नाही.
2. दोन किंवा तीन सोशल ग्रूप्स मधे भाग घेणे यात कट्टा क्लब किंवा पदभ्रमण क्लब, रोटरी, निरनिराळ्या संस्थांचे सभासदत्व या सारखे ग्रूप्स असू शकतात. महत्वाचे म्हणजे फक्त ज्येष्ठांसाठी असलेला ग्रूप एखादाच ठेवावा. कारण यात फक्त आपल्याला कसे कोण विचारत नाही व निरनिराळ्या व्याधी यावरच प्रामुख्याने चर्चा होते.
3. शक्य असल्यास पर्यटन करता ये ईल तेवढे करावे.
4. मेंदूला सतत खाद्य पुरवण्यासाठी आंतरजाल अतिशय उत्तम आहे. त्या शिवाय पुस्तके वाचणे वगैरे चालूच ठेवावे.

5. स्वत:ला दोन तीन नवीन छंद लावून घ्यावे. प्रत्येकाला लहानपणापासून करायच्या असलेल्या पण कधीच न जमलेल्या अशा काहीतरी गोष्टी असतातच. अशा गोष्टी छंद म्हणून करण्यास सुरुवात करावी.
वरील उपायांनी एकटेपणा पुष्कळ कमी होऊ शकतो असे वाटते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

लेखाच्या मजकुरात मोलाची भर घातल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

लेखाच्या मजकुरात मोलाची भर घातल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

आयडीया

लेखाच्या मजकुरात मोलाची भर घातल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

लेखाच वेटेज् वाढवण्याची उत्तम आयडीया. क्षमा असावी.

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

महत्वाचे

चांगला प्रतिसाद.

यात अजून काही घालावेसे वाटत आहे (विशेषतः निवृत्तीनंतरच्या वयोगटातील व्यक्तींकरता)

आज ज्या साठीच्या वर व्यक्ती आहेत त्यांनी किमान थोडेफार स्वतःच्या आठवणींवर आधारीत लिहून ठेवावे. त्यात देखील चांगला वेळ जाऊ शकतो. त्यासाठी ब्लॉग लिहीणे, टाईप करणे शिकावे. असे लेखन हे नंतरच्या काळात माहितीपूर्ण ठरू शकते. तसेच त्यात स्वतःचे अनुभव देत असताना रमवून घेणे सहज शक्य होते. (स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आलेल्या पिढीने जितकी स्थित्यंतरे पाहीली आहेत तितकी ७०-८० नंतरच्या अथवा त्यांच्या वाडवडलांच्या पिढ्यांनी पाहीलेली नाहीत म्हणून अधिकच वाटते).

टिव्हीवरील मालीका बघणे बंद करणे. या मालीकांचे व्यसन हे देखील एका अर्थी औदासिन्याचा प्रकार ठरू शकते. त्या पेक्षा हवे तितके चित्रपट पहा (अगदी पायरेटेड कॉपीज पण ज्येष्ठांना माफ आहेत ;) ). जास्तीत जास्त तीन तासात संपतो.

ह्या काळात स्वतःचे सिंहावलोकन करत असताना काही भूतकाळातील घटना/गोष्टींमुळे पश्चाताप/अपराधीपणाची भावना (अमुक च्या ऐवजी तमुक केले असते तर वगैरे) येऊ शकतात. त्या पूर्ण टाळाव्यात, किमान तसा प्रयत्न करावा असे वाटते.

जिथे शक्य आहे तेथे संवाद साधायचा प्रयत्न करावा. त्यात नवीन (तरूण) पिढ्यापण आल्या. त्यांना देखील मैत्रिच्या नात्याने जवळ केले तर आवडतेच...

छान

छान लेख आणि छान प्रतिसाद. मी स्वतः हे पहिले आहे त्यामुळे आपले म्हणणे पटते आहे.

तसेच अश्या व्यक्तींनी घरामधील कामे किंवा कामाचे नियोजन करण्याचा प्रयत्न करावा(ढवळा-ढवळ होईल असे नाही).

रिकामेपणा

निवृत्त झाल्यानंतर आपण आता कुचकामी झालो याची सर्वात अधिक जाणिव जर कोणी देत असेल तर ते घरचे लोक. नोकरित असतांना जर गृह मंत्री प्रतिकुल असेल तर मनुष्य शक्यतोवर घराबाहेर ऑफीसचे काही ना काही काम सांगुन राहण्याचा प्रयत्न करतो. निवृत्त झाल्यानंतर मात्र त्याच्या या सबबी कुचकामी ठरतात. त्यामुळे त्याला अधिकच औदासिन्य येते. मुले मोठी झाली असल्याने. जी कामे आधी आपण मुलांना सांगत असु ती सर्व आपल्यावर येतात आणि न्युनगंड अधिकच वाढिस लागतो. अगदि दळण आणणे, भाजी आणणे, नातवांना फिरावयास नेणे ही गौण कामे देखील अंगावर येतात. त्यात ऑफिस चे कोणी भेटले की त्यांची आपल्याकडे पहाण्याची दृष्टी देखील हिणवणारी भासते. घरातील चर्चेत देखील आपले मत एक तर कोणी विचारीत नाही आणी आपण ते देण्याचा प्रयत्न केला तरी ते दुर्लक्षीत होते. आधी मागीतल्यावर लगेच समोर येणारा चहा आता अजीजीने मागितला तरी येण्याची शाश्वती नसते. काही चमचमीत खाण्यास मागीतले तर आग्नेय नेत्राला सामोरे जावे लागते. या आणी अनेक क्षुल्लक गोष्टीच मोठ्या व गंभीर आजाराला कारणीभुत ठरतात.

त्यामुळे आपली जिवन शैली ही प्रथम पासुनच स्वावलंबी असेल तर हे सर्व प्रकार टाळता येतात. काहींनी सुचविल्याप्रमाणे नियमीत दिनचर्या, वाचनाची आवड, नविन पिढीसोबत त्यांच्या विषयाची माहिती करुन घेणे, इंटर्नेट चा सराव, थोडी समाजसेवा करण्याकडे कल यामुळे जिवन सुसह्य होण्यास मदत होते. घरात अनाहुत सल्ले देणे टाळावे. निवृत्तीनंतर विपश्यनेचे एक तरी शिबीर जरुर करावे त्याने खुप सकारात्मक फरक जाणवतो.

विश्वास कल्याणकर

 
^ वर