पानिपताची मराठी भाषेला देणगी
पानिपत आणि तिथं झालेला पराभव ही मराठी माणसाला सलणारी आणि सहज विसर न पडणारी अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे 'पानिपत होणे' असा एक वाक्प्रचार मराठीला मिळाला. विकिपीडिआनुसार 'संक्रांत कोसळणे' हा वाक्प्रचारही पानिपताने मराठीला दिला. पानिपताविषयीची बखरींतली किंवा मौखिक परंपरेतली वर्णनं, पोवाडे वगैरेंमधून असे इतर काही शब्द मराठीला लाभले का? असतील तर ते कोणते याविषयी माहिती हवी आहे.
यासंबंधात एक प्रश्नः मोहोरा गळणे, बांगडी पिचणे, चिल्लर-खुर्दा असे पानिपतावरच्या युध्दाच्या नतीजाचे वर्णन करणारे (बहुधा) भाऊसाहेबांच्या बखरीतले शब्द हे आधीपासून अस्तित्वात होते का? की त्या बखरीमुळे ते अनेकांच्या तोंडी गेले आणि मग मराठीत रुळले? म्हणजे हे शब्दही पानिपताची मराठी भाषेला देणगी मानता येतील का?
टीपः विकीपिडीआत 'पानिपतची तिसरी लढाई':'साहित्यात व दैनदिन जीवनात' याखाली 'संक्रांत कोसळणे'विषयी उल्लेख आहे, पण तो त्रोटक आहे आणि संदर्भ म्हणून 'स्वामी' या रणजित देसाईंच्या अर्वाचीन कादंबरीचा उल्लेख केला आहे. हे फारसं विश्वासार्ह वाटलं नाही. याविषयीही अधिक संदर्भ मिळाले तर हवे आहेत.
Comments
एक विसरलात....
"विश्वास पानीपतच्या युद्धात गेला" ही लोकप्रिय म्हण विसरलात काय ?
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
आप मेला, जग बुडाले.
ही काही म्हण नाही (किंवा आहे?) पण इतका शहाणपणा नक्कीच कौतुकास्पद आहे.
आप मेला, जग बुडाले.
आबरु जाते अन वांचतो कोण
शक्यता नाकारता येत नाही
शक्य आहे पण ...
परांचनामुळे तेव्हा संक्रांत १० जानेवारीला येई. तरीही १४ जानेवारी अशी तारीख ठोकल्यामुळे मराठी विकिपीडिया खूपच अविश्वासार्ह असल्याचे पुन्हा दिसून येते.
संक्रांत दरवर्षी निरनिराळ्या रंगांच्या अन्नपदार्थांवर येते (असे ऐकल्याचे स्मरते). त्यातून व्युत्पत्ती असू शकेल काय?
संक्रांत कोसळली
१७६१ साली संक्रांत १० जानेवारीला आली असली आणि युद्ध १४ जानेवारीला झालेले असले तरी 'संक्रांत कोसळणे' हा वाक्प्रचार ज्यावेळेस वापरात आला त्या वेळी संक्रांत कधी होती हे बघायला हवे. :-) बखरीत असा उल्लेख (संक्रांत कोसळल्याचा) असेलच असे नाही. चू.भू.दे.घे.
'पानिपत होणे' हा वाक्प्रचारही कधी रुजू झाला हे शोधणे रोचक आहे. 'मीट योर वॉटर्लू'चे देशीकरण तर नाही? ;-)
उगीच आपल्या शक्यता हं!
१७६० या सालाचाही पानिपताशी संबंध लावला जातो.
वाक्यात उपयोगः श्रद्धा-अंधश्रद्धांवरचे १७६० लेख मराठी संकेतस्थळांवर सापडतील. ;-)
बचेंगे तो और भी लडेंगे..
पानिपतच्याच निमित्ताने 'बचेंगे तो और भी लडेंगे' हे वाक्य मराठीत प्रसिद्ध झाले.
हाणा! मारा! असे ओरडताना भाऊसाहेबांच्या तोंडाला खरस आली.
मल्हारबांचा नाईलाज झाला. आभाळच फाटले तो कुठवर ठिगळ लावावे? म्हणुनी पाच-पंचवीस स्वारांनिशी बाजूला होऊन निघून गेले.
पानिपतच्या बखरीत असलेले पण नंतर मराठीत न वापरले गेलेले दोन शब्द सापडले.
१) अंतर्वेदी - गंगा व यमुनेच्या दुआबातील प्रदेश
२) गिलचे - रोहिले व अब्दालीचे सैनिक
गिलचे
'गिलचे' हा शब्द विशेषनाम असल्यामुळे तो फक्त त्या विशिष्ठ सैनिकांसाठीच (प्रांतवाचक?) वापरला जाऊ शकत असावा. त्यामुळे पानिपताशी संबंधित साहित्यकृतींमध्ये (उदा: विश्वास पाटलांच्या कादंबरीत) तो वापरला गेला आहे. गोविंदाग्रजांच्या 'पानिपतच्या फटक्या'तही अशी ओळ आहे:
कौरव पांडव - संगरतांडव द्वापरकाली होय अती;
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती॥
गिलच्यांविषयी इथे काही रोचक मजकूर सापडला. तो खाली देत आहे:
The Marathas always speak of Afghans as Gilchas, or Gilzyas, a corruption, of course, of Ghilzye, the name of one of the great clans of Afghanistan.
ते वाचून आणि हे वाचून असा शोध लागला की अल्लाउद्दीन खिलजीच्या घराण्या/वंशा/गटाचा 'गिलचे'शी संबंध आहे.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
गिलचे
अब्दालीच्या सैनिकांना गिलचे असे का म्हटले गेले आहे याचे स्पष्टीकरण आहे का कुणाजवळ? रोहिलखंडातील लोकांना रोहिले आणि बुंदेलखंडातील लोकांना बुंदेले म्हटले जाते. तसे गिलचे हे स्थानवाचक संबोधन आहे का? कारण गिलचीस्तान वगैरे असा भाग नाही.
परंतु, बराच शोध घेतल्यावर गिलझई/ गिल्जी ही पश्तु लोकांची जमात दिसते. यापेक्षा वेगळे स्पष्टीकरण कुणाला माहित आहे का?
अवांतर १: खिल्जी (राजवट) किंवा हमीद करझाई यांची नावे ही अशाच प्रकारची असावी.
अवांतर २: चिंजंचा प्रतिसाद त्यांनी पुन्हा संपादित केल्यावर मी वाचला नव्हता पण त्यांचे म्हणणेही असेच दिसते.
इतर संदर्भात सुचलेली काही उदाहरणे
"वॉटर्लू होणे" : समवन मेट् देअर् वॉटर्लू इन समथिंग्..
"वॉटरगेट्" नंतर अमेरिकेत कसलेही स्कँडल झाले की त्याला "गेट्" म्हणायची पद्धत दिसते. उदा. "मोनिकागेट्"
बाजारबुणगे
पेशव्यांच्या मुख्य सेनेबरोबर नेलेले बाजारबुणगे.
बाजारबुणगे हा शब्द माझ्या पानीपत सोडून इतिहासात इतरत्र वाचनात आला नव्हता.
कदाचित काशी करणे हाही वाक्प्रचार बट्टयाबोळ करणे या अर्थी आला असावा.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
बुनगा ए बाज़ार
बाजारबुणगे हा शब्द मूलतः फार्शी आहे.
"विश्वास पानिपताच्या युद्धात गेला"
पानिपतवरील सुप्रसिद्ध पोवडा : "भाऊ नाना तलवार धरून | गेले गिलचावर चढाई करून ||" .... बरेच काही बहाल करून जातो.
"शहर पुणें बसविलें मोहरा पुतळ्यांला नाहीं कांही उणें | चमके नंगी तलवार सैन्य हें सारें लष्कर पाहून || गर्व कोंदला फार जैसा लंकापती रावण ....
अटकेपार
अवांतरः अटकेपार झेंडा लावला ही म्हणही मराठ्यांनी केलेल्या साम्राज्यविस्तारामुळे आलेली आहे. हे अटक नावाचे गाव पाकीस्तानात आहे.
निमित्त/स्पष्टीकरण/विनंती
पानिपतच्या लढ्याला आता २५० वर्षं पूर्ण होतील. त्या निमित्तानं हा धागा काढला हे सांगायचं राहून गेलं. प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. अजून एक गोष्ट म्हणजे एखाद्या शब्दाची व्युत्पत्ती पानिपत-वाङ्मयाबाहेरचीही असू शकते, पण तो शब्द/वाक्प्रचार/म्हण मराठीत प्रचलित होण्यामागचं कारण पानिपत-वाङ्मय (लेखी/मौखिक) असलं तरीही चालेल.
एक विनंती: शक्य तिथे संदर्भ द्यावेत (कोणती बखर/पोवाडा, वगैरे). नाहीतर विकिपीडिआप्रमाणेच विश्वासार्हतेला मर्यादा पडतात.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
रोचक चर्चा
कालच विश्वास पाटील यांच्या "पानिपत"ची स्मृतिविशेष आवृत्ती विकत घेतलीय; फार उत्सुकता होती. शिवाय अंतःकरणाला आतून सदैव डिवचणार्या पानिपतच्या समरप्रसंगाबद्दल थोडीबहुत म्हणण्यापेक्षा अगदीच त्रोटक माहितीसुद्धा माझ्याकडे नाही, आता ती राहिलेली कसर भरुन निघेल, या आशेनेच मी भारावून घेलोय! चर्चासुद्धा छान आहे. आभार.
पुन्हा संक्रांत
अन हा धागा सापडला वाचायला. म्हणून प्रतिसाद लिहून वर काढला. क्षमस्व.