मराठीतली फार्शी २-

मराठीतली फार्शी २-

मराठीत केवळ फारशी शब्द आले नाहीत. केवळ नावाजणे, गुदरणे/गुजरणे सारखी क्रियापदेही फारशीवरून आली नाहीत तर फारशीचा व्याकरणिक प्रभावही मराठी भाषेवर बराच आहे. 'तुला', 'मला', 'त्याला', 'पुस्तकाला' ह्या शब्दांतील 'ल'चे प्रत्यय हे थेट फारशीतील 'रा' ह्या प्रत्ययावरून आले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, 'उडी/शिवी घालणे/मारणे''दाद देणे', 'सजा मिळणे', 'उडी मारणे', 'गाडी चालवणे/हाकणे' सारखी मराठीतली अनेक संयुक्त क्रियापदे फारशीवरून मराठीत आली आहेत. आम्ही शिव्या किंवा डोळा का 'मारतो' ह्याचे उत्तर कदाचित इथेच असावे.

"'करणे', 'मारणे', 'देणे' इत्यादी क्रियापदांच्या पूर्वी इतर शब्द योजून संयुक्त क्रियापदं सिद्ध करण्याचा प्रकार मराठीत फारशीवरून आला आहे." असे गं. ना. जोगळेकर 'मराठी भाषेचा इतिहास' ह्या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

जसे 'ताव देणे' हे संयुक्त क्रियापद फारशीतल्या 'ताप दादन' वरून आले आहे. फारशीतील दादन (देणे) याफ़्तन (मिळणे), साख़्तन (घडवणे/बनविणे), कर्दन (करणे), ज़दन (मारणे), रांदन 1('रांधा वाढा उष्टी काढा'तले रांधणे/हाकणे/चालवणे) सारख्या धातूंपासून (इन्फिनिटिव) पासून ही संयुक्त क्रियापदे बनली आहेत.

यावर अजूनही बरीच माहिती आहे. तज्ज्ञांशी चर्चा करून हळूहळू देईनच.

१. रांदनपासून चालकासाठी फारशीत 'रानिन्दा' हा शब्द बनला आहे.

Comments

सलाते सलानाते

हे द्वितिया आणि चतुर्थी प्रत्यय ना? (माझे व्याकरणाचे अगाध ज्ञान पाजळल्याबद्दल आगाऊ क्षमस्व!) तर 'ला' प्रत्ययाप्रमाणे बाकीचेही असे फारसीतून आले का?

रांदन हा शब्द एका अफगाणी लेखकाच्या पुस्तकात पूर्वी वाचल्याचे आठवते, तेव्हा संबंध लागला नव्हता.

कर्दनकाळ शब्दातील कर्दन कोठला?

माहितीपूर्ण लेख, फारसीचा मराठीवर इतका प्रभाव असावा असे वाटले नव्हते.

मूळ.

माहितीपूर्ण लेख, फारसीचा मराठीवर इतका प्रभाव असावा असे वाटले नव्हते.

परंतु, दादन (देणे), कर्दन (करणे) यांचे मूळ संस्कृतात असावे असे वाटले.
--लिखाळ.

दादन, कर्दन

दादन पासून झालेले दादा, दाद हे शब्द आठवतात. कर्दन पासून अनेक शब्द बनलेले आहेत. नेहमीचा एक शब्द म्हणजे कारकून(काम करणारा किंवा कार्यकर्ता). ह्यात कार आणि कून हे दोन्ही शब्द कर्दनची रूपे आहेत असे वाटते.

प्रियालीताई, म्हणतात तसे कर्दनकाळ मधला कर्दन फारशी असावा. संस्कृत-फारशी-अरबी असे अनेक खिचडी शब्द मराठीत आहेत. उदाहरणार्थ मुळाबरहुकूम.

दादन

संस्कृत मध्ये दाता, दातृत्व असे जे शब्द आहेत त्यातील जो धातू आहे त्या पासूनच 'देणे' आला असावा असे वाटते. कारण देणार्‍याला मराठीत ही दाता (मूळ संकृत) असेच म्हणतात.

तसेच कृ पासुन कृती इत्यादी शब्द आहेत त्यातीलच 'करणे' झाले असावे असे वाटते. जो करतो तो कर्ता (मूळ संकृत).

जर ही रुपे संस्कृताशी मेळ खात असतील तर ती फारशी ऐवजी संस्कृतातून आली असण्याची शक्यता अधीक नसावी काय?
म्हणजे ही संस्कृतातून आलेली क्रियापदे आणि मग श्री. जोगळेकर म्हणतात तसे संयुक्त क्रियापदाचा वापर फारशीतील पद्धतीप्रमाणे असे काहीसे असावे का ?
--लिखाळ.

कर्दन

कर्दन च्या अर्थासाठी शोधाशोध करता 'कर्दनबस्तन' हा फार्शी शद्ब सापडला. याचा (हवा तो) अर्थ 'निर्मिती व संहार' असा काहिसा दिसतो. बस्तन वरून आलेल्या बस्ती (वसाहत) कडे पाहता कर्दन चे मूळ फार्शी व अर्थ 'संहार' असू शकेल.
~ तो ~

करणे-बांधणे

कर्दन म्हणजे करणे, बस्तन म्हणे बांधणे. बस्तान बांधणे बस्तन वरून आलेले आहे. बस्तनपासूनही उगम असण्याची दाट शक्यता आहे पण बस्ती माझ्या मते वस्तीचाही अपभ्रंश असू शकतो.

बशी

कप-बशी मधील बशीचा उगम कुठचा? कप हा अर्थातच इंग्रजीतून आलेला शब्द आहे, मात्र बशीचा सॉसर शब्दाशी काही संबंध लागत नाही. बशीचा फार्शी भाषेशी काही संबंध आहे का?

हा आणि भाग -१ आवडले. बरीच नवीन माहिती मिळाली. चर्चेत भर घालण्यासारखे माझ्याअकडे फारसे काही नाही. मिळाल्यास जरूर भर घालण्याचा प्रयत्न करेन.

अवांतर - "फार्शीवरून" हा शब्द खटकला. तेथे फार्शीतून, फार्शीमधून हे जास्त योग्य वाटते.

चश्मज़दन

फारशीत चश्मजदन म्हणजे डोळा मारणे.
ज़दज़दन टाळी मारणे
झोपी जाणे ह्यासाठी ख़ाब रफ़्तन (रफ़्तन म्हणजे जाणे) हे संयुक्त क्रियापद वापरतात. यादी बरीच मोठी आहे. हळहळू देईन.

वरदाताई, फारशीवरून हा शब्द गं. ना. च्या पुस्तकात जसा आला तसाच वापरला आहे.
चित्तरंजन

फारसीवरून

फारसीतून/मधून आणि फारसीवरून या शब्दांच्या अर्थात फरक आहे. तत्सम आणि तद्भव शब्दांसारखा. --वाचक्‍नवी

रन्धन

हा शब्द संस्कृतात आहे, हे मी विसरलोच होतो. हा 'रांधा वाढा' मधला रांधा संस्कृत रंदनपासून आला असण्याची शक्यताच अधिक वाटते. माहिती आवडली.

गंमत वाटते.

सद्या चित्तरंजन ह्यांनी सुरु केलेल्या 'मराठीतील फार्शी' ह्या माहितीपूर्ण लेखन मालिकेतून मराठीवर असलेला फारशीचा पगडा दिसून येतोय. ह्या आधी इतरत्र मराठीवरील संस्कृतचा पगडा वगैरेंविषयी बरेच ऐकले वाचले आहे. तरीही एक शंका येते की आता हे जे सर्व लिखाण सुरु आहे ते सर्व संशोधनांती सिध्द झालेले आहे की अजूनही 'असे असावेसे वाटते' असे अंदाजपंचे आहे?
हे विचारण्याच्या मागची भुमिका ही आहे की हे सर्व जर संसि असेल तर ते लक्षपूर्वक वाचून त्याची तशी नोंद बाळगावी म्हणतो आणि जर अंपं असेल तर त्यातल्या साधर्म्याचा निखळ आनंद लुटू शकतो.
माझ्या अल्प माहिती प्रमाणे मराठी शब्दकोशात(माझ्याकडे भिडे ह्यांनी संपादित केलेला 'सरस्वतीकोश' आहे) प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती दिलेली आहे आणि तिथे कंसात त्याचे मूळ(उदा.फारसी,अरबी,संस्कृत इत्यादि) दिलेले आहे. तशा प्रकारचा काही नवा शब्दकोश बाजारात हल्ली मिळत असल्यास घेता येईल(सरस्वतीकोश खूपच जूना आहे आणि आता बराच जीर्ण झालाय म्हणून).ह्या बाबतीत श्री. चित्तरंजन काही मार्गदर्शन करू शकतील काय?

ही पुस्तके

अत्त्यानंदराव,

संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, असे बऱ्याच अजूनही जणांना वाटते. पण तसे नाही हे कळले की थोडा धक्का बसू शकतो. शब्दाचा उगम शोधायला फारसे संशोधन करावे लागत नाही. काही ठिकाणी हुशार अंदाज लावण्याचा प्रयत्न असतो. जसे 'ओरदू' ह्या शब्दाबाबत घडले. जवळपास प्रत्येक शब्दकोशात शब्दाचा उगम दिला असतो. फारशीसारखी भाषा जुजबी जरी आली तरी माझ्यासारखा माणूस मराठीतून फार्शी डिंगा मारू शकतो. असो.

अधिक अभ्यासासाठी डॉ.माधवराव पटवर्धन उर्फ 'माधव जूलियन' यांचा फार्शी-मराठी शब्दकोश, तसेच 'मराठी व्युत्पत्ती कोश' मिळवावा.

शब्दकोष इथे आहे.

आंतरजालावरील शब्दकोष मोल्सवर्थ ने इथे पुरवला आहे. शब्दांच्या उगमासाठी 'शिकस्त' चा अर्थ दाखवणारे हे उदाहरण पाहा. कंसातील (P Broken मधला) 'P' पर्शियन (फार्शी) उगम दर्शवतो.

(माहितगार) तो

अवांतर: उपक्रमावरील 'माहिती' हा 'कळी'चा शब्द अरबी तर 'माहितगार' म्हणे फार्शी आहे! ;)

(फारशी माहिती नसलेला) तो

शब्दकोष - एक शंका

कंसातील (P Broken मधला) 'P' पर्शियन (फार्शी) उगम दर्शवतो.

ही बातमी कशी कळली? म्हणजे मोल्जवर्थ कंसात काही अक्षरे दाखवतो त्याचे अर्थ मला बरेचदा लागत नाहीत. ते कसे शोधायचे/ कळून घ्यायचे?
H हिंदी
S संस्कृत
परंतु A आणि C पाहिल्यासारखे वाटतात. ते कशासाठी?

तसेच P पर्शियन् पण Broken म्हणजे काय?

शब्दकोष उत्तर

ही माहिती खरं तर या पहिल्या पानावर असायला हवी होती. असो. या पहिल्या पानाकडे पाहताच लक्षात येईल की संस्कृतमधून आलेल्या शब्दांपुढील कंसात (s) व शक्य तिथे मूळ शद्ब दिले आहेत. हीच बाब हिंदी (H) व अरबी (A) मधून आलेल्या शब्दांची. अर्थात हा झाला तर्क.

(तळटीपेच्या शोधात) तो

धन्यवाद!

A म्हणजे अरबी हे ध्यानातच आले नाही!

धन्यवाद!

ए, सी, एच, एन्‌. डी., पी, आर्‌, एस्‌ , टी, पोर्ट, डब्‌लू.

मोल्सवर्थमधल्या या लघुरूपांचा अर्थ अनुक्रमे, अरबी, कोंकणी, हिन्दुस्तानी, नॉर्थ देशी(उत्तरी महाराष्ट्री-बहुतेक खानदेशी असावी), फारसी, राजापुरी, संस्कृत, तुर्की, पोर्तुगीज, आणि वाडी जिल्ह्याची(?) भाषा.
पी ब्रोकनम्हण्जे फारसीत अर्थ 'ब्रोकन'. मराठीत वेगळा. असेच फिरस्ताच्या अर्थात आहे. तिथे पी एन्जल असे लिहिले आहे. ब्रोकन आणि एन्जल हे अर्थ मूळ फारसीतले. कंसाच्या बाहेर मराठी अर्थ.
--वाचक्‍नवी

धन्यवाद!

चित्तरंजनजी धन्यवाद!

मराठीतली फार्शी २

सौरभ

चित्तरंजन म्हणतात तसं, मोघल रज्यकर्त्यांच्या काळात फार्शी बोलणे, लिहिणे, वाचणे, फार्षीत काव्य करणे या गोष्टी प्रतिष्ठेच्या होत्या (सध्या ज्याप्रमाणे इंग्लिश प्रतिष्ठेची भाषा आहे, अगदी तसंच ), त्यामुळे फार्शीचा मराठी तसेच इतरही भाषांवर प्रभाव आहे.

पण संस्कृत आणि फार्शीतील परस्पर संबंध मात्र मला ठाऊक नाही. त्याकरिता अभ्यास करावा लागेल.

फारसी रंग आणि अंक

माझ्या माहिती प्रमाणे काही रंग व अंक ....

लाल --- किरमीज (किरमीजी ?? )
हिरवा -- सब्ज (जी हिरवी ती सब्जी , का जो सब्जी सारखा तो हिरवा ? !)
पिवळा -- जर्द (पिवळाजर्द !! )
निळा -- आबी ( आब = पाणी)

दहा -- दाह्
नव्वद -- नवाद
शंभर -- सद ( शत )
हजार -- हजार !

रंगीन

किरमिजीबाबत माझी खात्री नाही. लाल ला बहुतेक सुर्ख म्हणतात. मी जाणकारांना विचारून सांगीनच. पण तुम्ही दिलेले इतर शब्द बरोबर आहेत असे वाटते. गंमत म्हणजे फारशीत रंगीन म्हणजे सुंदर, आकर्षक. गुले-रंगीनस्त म्हणजे फूल सुंदर आहे.

बाजारबुणगे

बाजारबुणगे हा शब्द बुनगाए-बाज़ार ह्या फारशी शब्दापासून आला आहे. बुनगा म्हणजे सैन्याच्या मागे चालणारे लोक. मग त्यात सैनिक सोडून बहुधा इतर लोक असत. चू. भू. द्या. घ्या.

विदेशी शब्द कसे ओळखावे?

फार्सी भाग १ व २ ह्या दोन्ही भागांमधून बरीच माहिती मिळाली. मन:पूर्वक धन्यवाद!

संस्कृतमध्ये च् छ् ज् झ् ही व्यंजने तालव्य आहेत. त्यांचा मूर्धन्य उच्चार होत असलेल्या शब्दांचे मूळ संस्कृतात नाही. उदाहरणार्थ, दरवाज़ा हा शब्द. (विनोबांनी गीताईमध्ये असे शब्द ह्या अक्षरांखाली नुक्ता देऊन लिहिलेले आहेत.) तरी ह्याबाबत जाणकारांनी अधिक माहिती द्यावी ही विनंती.

मोहरमच्या मिरवणुकीत हाय दोस्त! (दुलाहा बेधूला) असा घोष करतात त्याचा अपभ्रंश 'हैदोस' घालणे असा झाल्याचे वाचनात आले आहे.

तसेच 'वा हियात' ह्या शब्दावरून मराठीत "वाह्यात" हा शब्द आला असेही वाचनात आले आहे. (हा शब्द अरबी की फार्सी हे मात्र माहीत नाही!)

शक्यता खूप अधिक

मोहरमच्या मिरवणुकीत हाय दोस्त! (दुलाहा बेधूला) असा घोष करतात त्याचा अपभ्रंश 'हैदोस' घालणे असा झाल्याचे वाचनात आले आहे.

धन्यवाद. रंजक माहिती. आता खातरजमा करायलाच हवी.

खुष्कीचा मार्ग ते टक्कल

फार्शीतखुश्की म्हणजे कोरडेपणा, कोरडे ठिकाण नव्हे. खुश्क म्हणजे कोरडे. खुष्कीचा मार्ग म्हणजे 'लँड रूट.'

ह्या खुश्कचे शुष्क ह्या शब्दाशी बघा किती साम्य आहे.
केसात खुश्की आली की ते गळायला सुरवात होते आणि टक्कल पडते. ह्यावर उपाय आहे चंपीय करणे, तेल मालिश करणे.

प्यासा ह्या चित्रपटात जॉनी वॉकर ऊर्फ सत्तारमियाँ म्हणतात:

सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये
आजा प्यारे पास हमारे, काहे घबराय, काहे घबराय

तेल मेरा है मुस्की, गन्ज रहे न खुस्की
जिस के सर पर हाथ फिरा दूँ, चमके किस्मत उसकी
सुन सुन सुन, अरे बेटा सुन, इस चम्पी में बड़े बड़े गुन
लाख दुखों की एक दवा है, क्यूँ ना आज़माये
कहे घबराये, कहे घबराये
सर जो तेरा ...

सत्तारमियाँ मुश्कीचा उच्चार मुस्की असा करतात आणि खुश्कीचा खुस्की असा. ( मुश्क म्हणजे कस्तुरी/कस्तूरी हे माहीत असेलच. मुश्कपासून इंग्रजीत 'मस्क' आले आहे.) तर विडियोही बघा, ऐका :

तर आता जमल्यास चंपीय! तेल मालिश!!!ही करवून घ्या

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

एक शंका

सत्तारमियाँ मुश्कीचा उच्चार मुस्की असा करतात आणि खुश्कीचा खुस्की असा. ( मुश्क म्हणजे कस्तुरी/कस्तूरी हे माहीत असेलच. मुश्कपासून इंग्रजीत 'मस्क' आले आहे.)

या न्यायाने, कस्तुरीमृगापासून कस्तुरी काढली जाते तेव्हा त्या कस्तुरीमृगाची 'नामुष्की झाली' असे म्हणता येईल काय?


"I am not what I think I am. I am not what you think I am. I am what I think you think I am." -?????.

नामुष्की, नामूसी, नामूसगी

या न्यायाने, कस्तुरीमृगापासून कस्तुरी काढली जाते तेव्हा त्या कस्तुरीमृगाची 'नामुष्की झाली' असे म्हणता येईल काय?

शंका चांगली आहे. हा शब्द बहुधा नामूसी, नामूसगी (अप्रतिष्ठा, बेइज्जती) पासून आला असावा.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

आभार / शक्य आहे, पण... / अधिक शंका

हा शब्द बहुधा नामूसी, नामूसगी (अप्रतिष्ठा, बेइज्जती) पासून आला असावा.

याबद्दल विस्तृत माहिती (शब्दाची फोड वगैरे करून) मिळू शकेल काय? (म्हणजे 'प्रतिष्ठा' किंवा 'इज्जत' याअर्थीचा कोणता फार्शी शब्द येथे वापरला गेला आहे, त्याचा उगम वगैरे?) आभारी आहे.

तसेही 'नामुष्की'चा 'कस्तुरी' अशा अर्थी 'मुश्क'शी अर्थाअर्थी संबंध पटत नाही. म्हणजे कस्तुरीमृगाच्या बाबतीत ठीक आहे, परंतु मनुष्याच्या बाबतीत 'बेइज्जती होणे' याअर्थी 'कस्तुरीहरण होणे' हे काही बरोबर वाटत नाही. म्हणजे, कस्तुरी ही मौल्यवान (आणि कदाचित दुर्मिळ) वस्तू असल्याकारणाने ज्या मनुष्याजवळ कस्तुरी आहे त्या मनुष्यास समाजात मानमरातब, इज्जत, प्रतिष्ठा असणे समजण्यासारखे आहे (किंवा उलटपक्षी केवळ समाजात मानमरातब, इज्जत, प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तींकडेच कस्तुरीही सापडत असण्याची शक्यताही ग्राह्य आहे), परंतु यात दोन गोष्टींचा हिशेब लागत नाही, त्या म्हणजे (१) एखाद्या मनुष्याकडे मुळात कस्तुरी नसल्यास अशा मनुष्याची बेइज्जती होऊ शकत नाही हे पटत नाही, आणि (२) एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीजवळील कस्तुरीचे हरण (मृग नव्हे! 'कस्तुरीहरण' आणि 'कस्तुरीमृग' यांच्यातील हा फरक चिंत्य आहे.) होणे (उदाहरणादाखल कस्तुरीची भुरटी चोरी वगैरे झाल्याने) यात त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा होण्यासारखे काही आहे हेही पटत नाही.

अवांतर: 'नामुष्की'साठी एक पर्यायी संस्कृतोद्भव व्युत्पत्तीही ऐकलेली आहे. अर्थात (१) या पर्यायी व्युत्पत्तीत तथ्य किती, आणि (२) (संस्कृत आणि फार्शी या भाषांत जवळचे नाते असल्याकारणाने) फार्शी व्युत्पत्तीत आणि या पर्यायी संस्कृतोद्भव व्युत्पत्तीत काही नाते आहे अथवा नाही, या दोन्ही बाबींबद्दल कल्पना नाही. चूभूद्याघ्या.


"I am not what I think I am. I am not what you think I am. I am what I think you think I am." -?????.

 
^ वर