आंतरिक शक्तीचा शोध-१

७ डिसेंबर २००४ रोजी हृदयधमनीआलेखन करीत असता डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत, एकच अडथळा ७० टक्के व्यापणारा आढळून आला. इतर धमन्या सामान्य होत्या. तो अडथळा त्याच शल्यक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. तोच सल्ला प्रमाण मानून, तिथेच हृदयधमनी रुंदीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतरही जवळजवळ महिनाभर माझा रक्तदाब १४०/१०० ते १३०/९० असा, म्हणजे जास्तच रहात असे. दरम्यान मला अनुत्तरित प्रश्नांचा विळखाच पडलेला होता. ते प्रश्न मी कसे सोडवले? प्रतिबंधक हृदयोपचाराचा मार्ग मला कसा गवसला? वाटेत कुठकुठल्या अडचणी आल्या? आणि केवळ दोन वर्षांच्या आत मी जवळपास पूर्वपदावर कसा परतलो? ही एक आंतरिक शक्तीच्या शोधाची सुरस कथा आहे. तुम्हालाही ती बोधप्रद होऊ शकेल असा विश्वास वाटून ती लिहून काढली आहे.

समस्येची सुरूवात

शनिवारीच माझ्या पावलांवर सूज आलेली होती. विशेषत: डाव्या. रविवारी वाट पाहिली, यासाठी की काही चावल्याची वगैरे असेल तर सूज उतरेल. पण सूज उतरली नाही. सोमवारी सकाळी जरा वाढलेलीच वाटली. लक्षण काही चांगले नव्हते. तो दिवस होता ४ नोव्हेंबर २००४. मग विचार करून असे ठरवले की डॉक्टरकडे जायलाच हवे. मी आयुवेर्दिक डॉक्टरकडे जायचा निर्णय घेतला. कारण आम्ही त्यांना चांगले ओळखत होतो. ११३० वाजता त्यांचा दवाखाना उघत असे. मी त्यासुमारासच तिथे पोहोचलो.

सूज पाहिल्यावर त्यांनी रक्तदाब मोजायचा निर्णय घेतला. तो २३०/१७० भरला. त्यांनी रक्तदाब फारच जास्त असल्याचे सांगून रक्तमोक्षण करावे लागेल असे सांगितले. रक्तमोक्षण म्हणजे १०० ते २०० मिलीलिटर रक्त शीरेतून इंजेक्शनने काढून, टाकून देणे. लगेच सुई, पिचकारी वगैरे आणली व रक्तमोक्षण केले. नंतर रक्तदाब २००/१३० इथपर्यंत उतरला. औषधे दिली. कार्यालयीन तणावामुळे, अतिश्रमामुळे किंवा कसल्यातरी गूढ कारणाने रक्तदाब वाढला असल्याचा माझा समज झाला. पण उपाय तर करायलाच हवा, म्हणून मी विश्रांतीसाठी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी दरदिवसाआड रक्तदाब मोजून घ्यायला जात असे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर व औषधोपचारांनंतर रक्तदाब १४०/१०० असा राहू लागला. कधी कधी १६०/१०० असा वाढलेला ही आढळत असे.

रक्तमोक्षण, बस्ती, काढा, चंद्रकलारस, बेलाची पाने पाण्यात बुडवून ते तीर्थप्राशन, अटेन-५० ह्या ऍलोपॅथीच्या गोळ्या, सुवर्णसूतशेखर वटी, सर्पगंधा घनवटी, नस्य ह्या साऱ्यांचा वापर करूनही सुधारणा होत नव्हती. मला कल्पना होती की, आमच्या कार्यालयीन ऍलोपॅथी उपचारपद्धतीच्या निकषांनुसार हा रक्तदाब खूपच जास्त असून त्याना तो लक्षात आल्यास ते रुग्णालयात दाखल करतील. मात्र आमच्या आयुर्वेदिक वैद्यांचे म्हणणे असे होते की वाढत्या वयानुसार रक्तदाबही वाढत असतो. काही जणांचा रक्तदाब मुळातच जास्तही असू शकतो. त्यामुळे, जर काही इतर त्रास नसेल तर त्यावर आहार, विहार व व्यायामाने उपचार करत राहावे. हळूहळू कमी होईल.

थकवा वाटत नसे. छातीत दुखत नसे. माझी सारी कामे मी पूर्ववतच करत होतो. रक्तदाब मोजण्यासाठी दरदिवसाआड वैद्यांकडे जावे लागत होते. कधीकधी श्वासोच्छवासास थोडा त्रास होत असे (हे आयुर्वेदिक औषधे सुरू केल्यानंतरच सुरू झालेले होते). मात्र अलीकडे, मला लोक बोलत ते ऐकू नये असे वाटे. स्वत:चे बोलणेही नकोसे वाटत असे. चेहरा सुजल्यागत दिसे. मात्र सूज नव्हती.

रुग्णालयात दाखल

३ सप्टेंबर २००४ रोजी ऑफिसच्या नेहमीच्या तपासण्यांच्या दरम्यान रक्तदाब १६८/११० असा भरला. तो 'लक्षणहीन (असिम्प्टोमॅटिक) रक्तदाब' असा निदानित करून रुग्णालयात पाठवण्यात आले. माझ्या ४७ वर्षांच्या आयुष्यात मी पहिल्यांदाच रुग्णालयात दाखल होत होतो. यापूर्वीच्या आयुर्वेदिक उपचारांबाबत इथल्या डॉक्टरांचे असे म्हणणे पडले की (पुअर बी.पी. मॅनेजमेंट). ती औषधे चालूच ठेवलीत तरीही काहीच फरक पडणार नाही. मी म्हटले की जी औषधे चालूच ठेवूनही काहीच फरक पडणार नसेल तर ती औषधेच कसली? मी ती आयुर्वेदिक औषधे तात्काळ बंद करून, ऍलोपॅथीचीच औषधे यापुढे घेण्याचा निर्णय घेतला. दुसरे दवशी रक्तदाबनियंत्रणासाठी रोज सकाळी एक याप्रमाणे ऍम्लोडेपिनची ५ मिलिग्रॅमची गोळी घेण्यास सांगण्यात आले. शिवाय चार आठवड्यांनंतर ताणचाचणी करवून घेण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णालयातून सुटतांना 'त्वरित (ऍक्सिलरेटेड) रक्तदाब' असल्याचे नोंदविण्यात आले.

रुग्णालयात निरिक्षणासाठी दाखल असतांना लिपिड रुपरेषेसाठी रक्ततपासणी करण्यात आली. तिची निरिक्षणे उपलब्ध नाहीत. सततच्या उच्च रक्तदाबामुळे बुबुळे कायमची विकृत झाली आहेत का हे पाहण्यासाठी 'फन्डुस्कोपी' करण्यात आली, म्हणजे डोळ्यात वेगळाच लाल प्रकाश टाकून डोळे निरखतात. ह्या तपासणीत बुबुळांवर काहीच विपरित परिणाम झालेला नसल्याचे निष्पन्न झाले. सततच्या उच्च रक्तदाबामुळे फुफ्फुसांवर विपरित परिणाम झाला आहे किंवा काय हे पाहण्यासाठी छातीचे क्ष-किरण प्रकाशचित्र काढण्यात आले. इथेही काहीच विपरित परिणाम झालेला नसल्याचे निष्पन्न झाले.

ताणचाचणीसाठी १ नोव्हेंबर २००४ हा दिवस निर्धारित करण्यात आला. त्या दिवशी चाचणीपूर्वी मोजले असता रक्तदाब १७०/११० असा भरला. तो जास्त असल्याने सॉबिर्ट्रेटची गोळी जिभेखाली ठेवावयास देऊन तासभर झोपवून ठेवले. नंतरही रक्तदाब १६०/१०० इतका राहिल्याने चाचणी होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले. पुन्हा निरीक्षणाकरता एक दिवस रुग्णालयात भरती करण्यात आले.

यावेळी अम्लोडेपिनची ५ मिलिग्रॅमची एक गोळी आणखी वाढवून देण्यात आली. तसेच लोर्वास २.५ मिलिग्रॅमची एक गोळी सकाळी घेण्यास सांगण्यात आले. आता यु.एस.जी.के.यु.बी. म्हणजे मूत्रपिंड व मूत्राशयावर सततच्या उच्च रक्तदाबाचा काही विपरित परिणाम झाला आहे का हे पाहण्यासाठी त्यांची श्राव्यातीत लहरींनी चाचणी करण्यास तसेच पुन्हा ६ आठवड्यांनंतर ताणचाचणी करण्यास सांगण्यात आले. ही श्राव्यातीत लहरींनी चाचणी दोन दिवसांनी लगेचच करण्यात आली. इथेही काहीच विपरित परिणाम झालेला नसल्याचे निष्पन्न झाले.

ताणचाचणी, हृदयधमनीआलेखन व हृदयधमनीरुंदीकरण शस्त्रक्रिया

आता ताणचाचणीसाठी ४ डिसेंबर २००४ हा दिवस निर्धारित करण्यात आला. त्या दिवशी ताणचाचणी झाली. ती सुरवातीपासूनच सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. ती सहा मिनिटे चालली. आणि हृदयस्पंदनदर मर्यादेबाहेर गेल्याने थांबवण्यात आली. नंतर ती हृदयधमनीतील अडथळ्यांकडे संकेत करीत असल्याचे निदान करण्यात आले. हृदयधमनीआलेखन करून घेण्याचा सल्ला दिल्या गेला.

एखाद्या व्यक्तीने श्रम केले असता हृदयस्पंदनदर वाढत जातो. केलेले श्रम जसजसे वाढत जातात अथवा ते करण्याचा दर जसजसा वाढत जातो तसतसा हृदयस्पंदनदर वाढत जातो. व्यक्तीस शक्यप्राय असणाऱ्या जास्तीतजास्त हृदयस्पंदनदरास अंतिम हृदयस्पंदनदर म्हणतात. अंदाजे अंतिम हृदयस्पंदनदर काढण्याचे एक सोपे समीकरण आहे. २२५ उणा तुमचे वय हा अंतिम हृदयस्पंदनदर असतो. अशा पद्धतीने काढलेल्या हृदयस्पंदनदराच्या ९० टक्के दरापर्यंत पोहोचेस्तोवर ताणचाचणी चालविली जाते. जास्त वेळ स्थितचालन करवून, चालन पट्ट्याचा चढ वाढवून अथवा पट्ट्याच्या फिरण्याचा वेग वाढवून. माझा, अंतिम हृदयस्पंदनदराच्या ९०टक्के हृदयस्पंदनदर (२२५ -४७)X०.९= १६० ठोके प्रतिमिनिट असा होता. तो पोहोचताच चाचणी थांबविण्यात आली.

७ डिसेंबर २००४ रोजी हृदयधमनीआलेखन करीत असता डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत, एकच अडथळा ७० टक्के व्यापणारा आढळून आला. इतर धमन्या सामान्य होत्या. तो अडथळा त्याच शल्यक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. तोच सल्ला प्रमाण मानून, तिथेच हृदयधमनी रुंदीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. कलंकहीन पोलादाचा १६ मिलीमिटर लांबीचा व २.२५ मिलिमिटर व्यासाचा, औषधवेष्टीत विस्फारकही बसविण्यात आला.

हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रियेनंतरची औषधयोजना

हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रियेनंतर २०-१२-२००४ रोजी मला माझी दीर्घकालीन औषधयोजना सांगण्यात आली. ती खालीलप्रमाणे होती. मला असेही समजले की ही औषधे कमी तर करता येतच नाहीत पण रोगाच्या तीव्रतेनुरूप वाढवतच जातात.

साधारणपणे ऍलोपॅथीमध्ये औषधयोजना, दिवसातून तीनदा घेण्याच्या गोळ्यांच्या स्वरुपात केल्या जाते. औषधे खालीलप्रमाणे लिहून दिली जातात.

अक्र, औषध, मात्रा (मिग्रॅ), औषधप्रकार, उपाययोजना, किंमत*, ३० दिवसांचा खर्च(रु), निर्मिती व कालबाह्यतेच्या तारखा
१, इकोस्प्रिन, १५०, रक्त-तरल-कर, ०-१-०, रु.५.७७/- प्रती १४ गोळ्या, १३, नि:८/०४, का:१०/०५
२, क्लोपिडोग्रेल/ग्रोविन/प्लेग्रिल-७५, रक्त-तरल-कर, ०-१-०, रु.५७.६०/- प्रती १४ गोळ्या, १७३, नि:७/०४, का:६/०६
३, मोनोट्रेट-२०, धमनी विस्फारक, १/२-१/२-०, रु.३३/- प्रती १० गोळ्या, ९९, नि:५/०४, का:४/०५
४, स्टोर्व्हास-१०, मेदविदारक, ०-०-१, रु.८०/- प्रती १० गोळ्या, २४०, नि:७/०४, का:१२/०५
५, ऍम्लोडेपिन-५, क्तदाबशामक, १-०-१, रु.१३.८०/- प्रती १०गोळ्या, ८३, नि:६/०४, का:५/०६
६, लोर्व्हास -२.५, मूत्रल/रक्तदाबशामक, १-०-०, रु.४९.४५/- प्रती १०गोळ्या, १५०, नि:७/०४, का:६/०७

एकूण ३० दिवसांकरताचा खर्च: रू.७५८/- फक्त

*: स्थानिक कर जादा, LTE: Local Taxes Extra
१-१-१: सकाळी नाश्त्यानंतर, दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर एक एक.
ऍलोपॅथीमधील औषधे बहुधा भरल्या पोटीच घ्यायची असतात.

BD: Bice a day दिवसातून दोनदा, सकाळी नाश्त्यानंतर एक, आणि रात्री जेवणानंतर एक
OD: Once a day , म्हणजे बहुधा रात्री जेवणानंतर एक

वरील माहितीसुद्धा मला मोठ्या कष्टानेच मिळवावी लागली होती. पण त्यामुळे काही नव्या गोष्टी कळल्या होत्या. चक्क डोळेच उघडले होते. पहिले तर हे कळले होते की एकदा हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रिया झाल्यानंतर, पुन्हा अडथळे होण्याचा धोका टाळण्याकरीता जन्मभर औषधे घ्यावी लागतात. नंतर कळले की ती औषधे रु.७५०/- दरमहा याहूनही महाग असतात. आणि उर्वरित आयुष्यात माणूस लक्षावधी रुपये औषधकंपन्यांना बिनबोभाट देतो. हे औषधांच्या दावणीला बांधलेले आयुष्य आणि हृदयाघाताचा कायमच असणारा धोका यांपासून सोडवणूक करून घेणे हे माझ्या जीवनाचे प्रथम कर्तव्य झाले.

यानंतरही जवळजवळ महिनाभर माझा रक्तदाब १४०/१०० ते १३०/९० असा, म्हणजे जास्तच रहात असे. आमच्या रुग्णालयात मला असेही सांगण्यात आले की रक्तदाब जर असाच राहिला तर औषधे (ऍम्लोडेपिन) वाढवावी लागतील. इथे मला ऍलोपॅथीच्या अनुभवासही "पुअर बी.पी. मॅनेजमेंट" म्हणावे की काय असे वाटू लागले.

अनुत्तरित प्रश्नांचा विळखा

दरम्यान मला अनेक प्रश्न त्रस्त करू लागले होते. मी तर संपूर्ण शाकाहारी, निर्व्यसनी, निरोगी, निरुपद्रवी, वरणभाताची गोडी असलेला, पापभिरू मध्यमवर्गीय होतो. मी कुणाचेच. कधीच, काहीही वाईट केलेले नव्हते. मग मला हृदयविकार का झाला? कशामुळे झाला? आता हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रिया तर झाली, मग रक्तदाब आदर्शवत १२०/८० का होत नाही? माझा रक्तदाब कशाने कमी होईल? हृदयधमनीत बसवलेला विस्फारक, गरज संपल्यावर काढून टाकता येतो का? विस्फारकाचे आयुष्य किती असते? एक आणि अनेक.

त्यानंतरचे अनेक दिवस मी अक्षरश: निकरानी उपायांचा शोध घेण्यात घालवले. यापुढील कोणतीही ताणचाचणी नकारात्मक यावी आणि उर्वरित आयुष्य औषधविरहित जगता यावे हीच दोन प्रमुख उद्दिष्टे मी ठरवली. ही खरोखरच साध्य आहेत काय, हे माहित नव्हते.

लोक भेटायला येत. नाना प्रकारचे उपाय सुचवत. त्यात वरील प्रश्नांची उत्तरे मुळीच नसत. उलट ते; फिरायला जात जा (इथे उपजीविकेपाठी बांधलेले मध्यमवर्गीय जीवन वाट्याला आलेले आहे, नाही तर सकाळ-संध्याकाळ, बायकामुलांसकट, कुत्रा हाताशी धरून, बागबगीचे फिरलो असतो), व्यायाम करा (अहो, हे सारे करायला अतिरिक्त बळ कुठून आणू?), प्राणायाम करा (निवांत श्वासोच्छवास करत बसायला, इथे वेळ कुणाला आहे?), दुधीचा रस प्या (दर दिवसाआड आम्ही दुधीचीच तर भाजी खातो की हो. मग तर, मला हृदयविकार व्हायलाच नको), तणाव बाळगू नका (मला काय तणाव बाळगायची हौस आहे?), संतापू नका (लोक संताप आणतात), आराम करा (आणि माझी कामे काय तुम्ही करणार?), अशा प्रकारचे सल्ले जरूर देत.

माझ्या याआधीच्या दिनचर्येत मला ते साधण्यास मुळीच वेळ मिळत नव्हता, म्हणून तर ही परिस्थिती आलेली होती ना? मग आता मला झालेला आजार, माझी झालेली शस्त्रक्रिया, औषधयोजनेमुळे बांधल्या गेलेला आहार ह्या साऱ्यांच्या उपस्थितीत मी त्या सल्ल्यांचा उपयोग कसा करू शकणार होतो, ते मला समजत नव्हते. भेटीला येणारे माझेच जवळचे सुहृद, नातेवाईक असत. त्यांची माझ्याबाबतची कळकळ खरी होती. हेतू प्रामाणिक असल्याचीही मला खात्री होती. ते सांगत होते त्या उपायांनी, लोक बरेही होत असल्याचे दाखलेही, ते देत असत. माझी प्रतिक्रिया मात्र वर कंसात दिल्याप्रमाणे, त्या उपायांवर अविश्वास दाखविणारी आणि नकारात्मकच असे. ते सल्ले मला परस्परविरोधी वाटत. निरर्थक वाटत. माझ्या खऱ्या प्रश्नांची उत्तरे त्या उपायांनी कधीच मिळणार नाहीत, असा माझा समज झाला होता.

मला माझ्या उद्दिष्टांकडे नेणारा उपाय दिसेना. मग माझ्या मावसभावाने प्रतिबंधक हृदयोपचारांचा उपाय सुचविला. आयुर्वेदाच्या उपचाराने भ्रमनिरास केला होता. पारंपारिक ऍलोपॅथीक औषधांचा आणि शस्त्रक्रियेचाही म्हणावा तसा उपयोग झालेला नव्हता. तेव्हा निरुपायाने आणि काहीशा अनिच्छेनेच मी प्रतिबंधक हृदयोपचारांकडे वळलो. एरव्हीही, मी अकार्यक्षम झालो तर ज्यांना सांभाळावे लागणार होते त्यांच्या म्हणण्याला मी कसे टाळू शकलो असतो?

उत्तरार्ध पुढील भागात

Comments

पुढला भाग वाचुन

प्रतिसाद देईन

सुरेख सुरुवात

फारच छान. आजारपणाच्या इतक्या वैयक्तिक विषयावर केलेले सुरेख लेखन. "माझा साक्षात्कारी हृद्रोग" ची आठवण झाली. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. आपली लेखन शैली खूप छान आहे. उपक्रमवर सतत लेख येऊदेत.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अशक्य

सूज पाहिल्यावर त्यांनी रक्तदाब मोजायचा निर्णय घेतला. तो २३०/१७० भरला. त्यांनी रक्तदाब फारच जास्त असल्याचे सांगून रक्तमोक्षण करावे लागेल असे सांगितले. रक्तमोक्षण म्हणजे १०० ते २०० मिलीलिटर रक्त शीरेतून इंजेक्शनने काढून, टाकून देणे. लगेच सुई, पिचकारी वगैरे आणली व रक्तमोक्षण केले. नंतर रक्तदाब २००/१३० इथपर्यंत उतरला.

शरिरात साधारण ५००० मिलि रक्त असते. त्यातून २०० मिलि म्हणजे ४% रक्त काढल्याने अशी १५-२०% घट शक्य नाही. किंबहुना, रक्तदाब मुळीही कमी होणार नाही. तो नक्कीच प्लॅसिबो परिणाम होता. परंतु, आंतरिक शक्तीमुळे घडते असे समजले की आंतरिक शक्तीचा परिणाम बंद पडतो.

दरम्यान मला अनेक प्रश्न त्रस्त करू लागले होते. मी तर संपूर्ण शाकाहारी, निर्व्यसनी, निरोगी, निरुपद्रवी, वरणभाताची गोडी असलेला, पापभिरू मध्यमवर्गीय होतो. मी कुणाचेच. कधीच, काहीही वाईट केलेले नव्हते. मग मला हृदयविकार का झाला? कशामुळे झाला?

वरवर पहाता जनुकीय स्पष्टीकरण हे संचिताप्रमाणे वाटते खरे ;)
पूर्ण लेखमाला वाचल्यावर अधिक नेमकी टिपण्णी करता येईल.

लेखमाला वाचतोय!

रोजनिशी लिहीलेली वाचतोय, असे लेख वाचताना वाटले. बरेच संदर्भ, माहिती या लेखात गाळली असती तर बरे झाले असते असे वाटते. काहि सविस्तर माहिती नंतर एखादे म्हणणे सांगताना सांगितले असते तरी चालले असते. शीर्शकाने जेवढी उत्सुकता वाढली तेवढ्या शैलीने लेख पेश केला गेलेला नाही.

चांगला लेख

लेख चांगला आहे. पण सोप्या आणि प्रचलित इंग्रजी शब्दांसाठी प्रतिशब्द म्हणून वापरलेल्या मराठी शब्दांचा अर्थ लावता लावता घाम फुटला. बीपी चेक करून येतो.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

देणे-घेणे

>> मग मला हृदयविकार का झाला? कशामुळे झाला? >>
मी खूप सुंदर कथा वाचली होती गोळे साहेब, एका मुलीच्या अशाच आंतरीक शोधाची. तिची आई सदैव दुसर्‍यांकरता झटली, कामात व्यग्र राहीली, कधी कोणाचं वाईट केलं नाही मग तिच्या आईलाच कॅन्सर का झाला? या प्रश्नाने ती जंग जंग पछाडली आणि सरतेशेवटी तिला उत्तर सापडलं. एका सुजाण व्यक्तीने तिला हे सुचवलं "असं बघ तुझी आई फक्त देत राहीली. कुठेतरी हे असंतुलन आहे नाही का? आईला मिळावे म्हणून तिला हा आजार मागे लागला असेल. बघ विचार कर."
सगळ्यांच्या बाबतीत कारण तेच असेल असे सांगता येत नाही. आपल्या बाबतीत हे कारण असूही शकेल. प्रत्येकाने विचार करून या प्रश्नाचा पाठपुरावा करायचा असतो खरा.
(* अनिस वाल्यांनी ताबडतोब टीकास्त्र सोडू नये. जर असा विचार करून, अशा धारणेने मानसिक समाधान मिळत असेल तर असा विचार करण्यास प्रत्यवाय {की प्रत्यावय?} नसावा.)

आपला दुसरा भाग अजुन आला नाही

मी मागे संचित ह्या नावाचा चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर खुप चांगली चर्चा झाली होती. तुम्ही वाचली की नाही माहित नाही. मला हे पण माहित नाही लेखकाचा दुसरा भाग गोष्ट (स्वानुभव) कोठे नेतो ते पाहिला पाहिजे.

http://rashtravrat.blogspot.com

रोचक

रोचक माहिती. पुढील भागाची वाट बघतो आहे.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

वाचतोय

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

पुढचा भाग लवकर यावा

नक्की कोणती दिशा आहे ते कळत नाही.
पुढचा भाग लवकर यावा. (अंतरिक शक्ती म्हणजे काय?)
***
पायावर आलेली सूज किडनीसंबंधी विकार (सीकेडी) दाखवत आहे का?
तुम्हाला आर्टेरियल स्टिफनेसबद्दल (धमन्यांचे काठिन्य) कितपत माहित आहे? -असो.

सगळ्यांना प्रतिसाद दिल्याखातर मन:पूर्वक धन्यवाद

नमस्कार लोकहो,

रणजित चितळे, चंद्रशेखर, रिकामटेकडा, रावले सतीश, अभिजीत, शुक्लपक्ष, आरागॉर्न, डॉ.दिलीप बिरुटे आणि विसुनाना सगळ्यांना प्रतिसाद दिल्याखातर मन:पूर्वक धन्यवाद.

चंद्रशेखर, हो. मी डॉ.अभय बंग यांनाच आदर्श मानून वागलो. म्हणूनच बचावलो. पुढे एकदा मला त्यांना भेटण्याचीही संधी मिळाली होती. तेव्हा त्यांना मी हे आवर्जून सांगितले.

रिकामटेकडा, चर्चेसाठी चर्चा असा हा प्रकार नाही. सर्व तपशीलासकट प्रकाशित केलेले हे माझे स्वानुभव आहेत. या प्रकाशनातून मला प्रसिद्धी किंवा तत्सम काहीही मिळवायचे नाही. हृदयविकार खरोखरीच माघारी परतू शकतो. औषधविरहित निरामय आयुष्य पुन्हा जगता येते. ते अतिशय सोपे आहे. असाच संदेश मला यातून द्यायचा आहे. तुम्ही "संचिता"प्रमाणे म्हणता. मी ती चर्चा वाचली. हे तसे नाही. मला हृदयविकार का झाला ह्याची कारणे आता उघड झालेली आहेत. जीवनशैलीगत ती कारणे, निरस्त केल्यावर माझा हृदयविकार माघारी परतला आहे. त्या अर्थाने पूर्वसुकृताची फळे मी उपभोगली हे खरेच आहे. मात्र यात आता अनाकलनीय असे काहीही राहिलेले नाही. मुख्य म्हणजे तुम्ही म्हणता तसे अशक्य यात काहीही नाही, घडलेल्या घटनांचे ते फक्त एक अत्यंत प्रांजल निवेदन आहे. एवढी व्यक्तिगत स्वरूपाची माहिती लोक सहसा उघड करत नाहीत. केवळ इतरांस उपयोगी पडावेत, त्यांच्या धारणा रास्त व्हाव्यात म्हणूनच मी हे केलेले आहे.

रावले साहेब, यावरून तुम्हाला हे लक्षात आलेच असेल की वरील प्रकारच्या रिकाम्या शंकांना वाव राहू नये म्हणून सर्व तपशील देण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घ्यावा लागला.

अभिजीत, तुम्हाला माय-मराठीतले साधे शब्द अवघड वाटू लागले असून इंग्रजीतील प्रचलित शब्द जवळचे वाटू लागले आहेत ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच तर, अस्तित्वात असलेलेच मराठी शब्द वापरून मी काही चूक केलेली आहे असे मला वाटत नाही. निदान त्यामुळे तरी तुम्हाला बरेच मराठी शब्द कळले असतील.

शुक्लपक्ष, तुमची धारणा योग्य नाही. मी वर रिकामटेकडा ह्यांना लिहीलेल्या प्रतिसादात माझ्या हृदयविकाराचे कारण स्पष्ट झाल्याचे लिहीलेच आहे, तेही वाचा.

विसुनाना, तुम्हाला वाटणारी काळजी स्वाभाविकच आहे. मात्र सुदैवाने, वाढलेले रक्तदाब अनेक वर्षे राहूनही माझ्या मूत्रपिंडांवर कोणतेही विपरित परिणाम झालेले नसल्याचे दिसून आलेले आहे. वैद्यकीय चाचण्यांत तसे निष्पन्न झालेले आहे. माझ्याकरता तुम्ही बाळगलेल्या सदिच्छांखातर पुन्हा एकवार मनःपूर्वक धन्यवाद.

आरागॉर्न, केवळ रोचकच नव्हे तर ही माहिती, हृदयविकारास प्रगतीशील, प्राणघातक, पूर्वसुकृतांमुळे मिळालेली शिक्षा असे मानून, खरी कारणे दृष्टिआड करणार्‍या समाजधारणांना मोडीत काढणारी आहे.

खुलासा

रिकामटेकडा, चर्चेसाठी चर्चा असा हा प्रकार नाही. सर्व तपशीलासकट प्रकाशित केलेले हे माझे स्वानुभव आहेत. या प्रकाशनातून मला प्रसिद्धी किंवा तत्सम काहीही मिळवायचे नाही.

मान्य.

हृदयविकार खरोखरीच माघारी परतू शकतो. औषधविरहित निरामय आयुष्य पुन्हा जगता येते. ते अतिशय सोपे आहे. असाच संदेश मला यातून द्यायचा आहे.

छोट्या आकाराच्या निरीक्षणांमध्ये योगायोग येऊ शकतात. स्वानुभव या एका निरीक्षणासाठी मिळालेले कोरिलेशन विश्वासार्ह नसते. मोठ्या आकाराच्या निरीक्षणातही कोरिलेशन सापडले तर मी मान्य करेन. "कोरिलेशन डज नॉट इम्प्लाय कॉजेशन" असे सांगणारे विद्वान तुम्हाला त्यावेळी विरोध करतील असे मला वाटते ;)

तुम्ही "संचिता"प्रमाणे म्हणता. मी ती चर्चा वाचली. हे तसे नाही. मला हृदयविकार का झाला ह्याची कारणे आता उघड झालेली आहेत. जीवनशैलीगत ती कारणे, निरस्त केल्यावर माझा हृदयविकार माघारी परतला आहे. त्या अर्थाने पूर्वसुकृताची फळे मी उपभोगली हे खरेच आहे. मात्र यात आता अनाकलनीय असे काहीही राहिलेले नाही. मुख्य म्हणजे तुम्ही म्हणता तसे अशक्य यात काहीही नाही, घडलेल्या घटनांचे ते फक्त एक अत्यंत प्रांजल निवेदन आहे. एवढी व्यक्तिगत स्वरूपाची माहिती लोक सहसा उघड करत नाहीत. केवळ इतरांस उपयोगी पडावेत, त्यांच्या धारणा रास्त व्हाव्यात म्हणूनच मी हे केलेले आहे.

'अशक्य' हे शीर्षक मी केवळ त्या प्रतिसादातील पहिल्या उद्धरणासाठी वापरले होते, गैरसमजाबद्दल क्षमस्व. रक्तदाब कमी करण्यासाठी रक्तमोक्षण करणे पटले नाही असे सांगायचे होते. धक्क्या(शॉक)च्या पहिल्या पायरीतील यंत्रणांमुळे हृदयावर अधिकच ताण येईल!
संचिताशी तुलना नाही हे मला मान्यच आहे. 'वरवर पहाता' असा शब्दप्रयोग मी केला आहे. जीवनशैली सुधारणे महत्वाचे आहे हे मान्य आहेच! परंतु, तुम्ही 'निर्व्यसनी' हा उल्लेख केला आहे. त्यामुळे, जीवनशैली हे एकमेव कारण तुम्हाला मान्य नाही असे मला वाटले (मलाही मान्य नाही). म्हणून मी जनुकीय दोष हे कारण सुचविले. पूर्वी स्निग्ध पदार्थांची मुबलकता नसे. त्यामुळे, वाईट जनुके उत्क्रांतीद्वारे नष्ट झाली नाहीत. उलट, बचत करणारी जनुके जमली.
रोग माघारी फिरणे, औषधविरहित जीवन, इ. दावे तपासण्याजोगे आहेत आणि डीन ऑर्निश यांचे दावे प्रचलित विज्ञानात स्वीकारले गेलेले नाहीत हे मात्र पुन्हा नोंदवितो.

 
^ वर