अलेक्झांडर आणि पुरु युद्ध -२

अलेक्झांडर आणि पुरु युद्ध - १

भारतीय स्वारीचा वृत्तांत

एरियनच्या मते सिंधू नदी ही भारतातील महत्त्वाची नदी होय. त्याला गंगा नदीचीही माहिती आहे परंतु भारतात प्रवेश करतेवेळी सिंधू ही विस्तृत नदी लागत असल्याने किंवा अलेक्झांडर गंगेपर्यंत न पोहोचल्याने सिंधू नदीच त्याला महत्त्वाची वाटणे साहजिक आहे. सिंधू नदी ही नाइल आणि युफ्रेटिसपेक्षाही अधिक गाळ-माती वाहून नेते, तिला चांगला वेग आहे असे एरियन म्हणतो. सिंधू नदीचा वेग आणि खोली पाहता ग्रीक सैन्याने इतक्या कमी वेळात कायमस्वरुपी पूल बांधला नसावा असे त्याला वाटते. तसे ठोस संदर्भ त्याला मिळत नाहीत म्हणून तो म्हणतो की होड्यांना होड्या जोडून, बहुधा त्या रश्शींनी एकत्र बांधून त्यावरून सैन्य नदी ओलांडून गेले असावे.

सिंधू नदी ओलांडून अलेक्झांडर तक्षशीलेला पोहोचल्यावर तेथे त्याचे मानाने स्वागत झाले. आजूबाजूच्या प्रदेशातील अनेक राजांनी कोणतीही खळखळ न करता शरणागती पत्करली. त्यात अभिसार हा झेलमच्या पलीकडल्या डोंगरी प्रदेशातील राजा आणि त्याचा भाऊ यांची गणती होते. (अभिसार हा कश्मीर प्रांतातील राजा असावा. ) दक्षराज नावाचा राजाही अलेक्झांडरला सामील झाल्याचे दिसते. इथे तक्षशीलेचा पाहुणचार स्वीकारून, ग्रीक प्रथेप्रमाणे खेळांचे आयोजन करून आणि जनावरांचे बळी देऊन पूजा करून अलेक्झांडर झेलमच्या दिशेने पुढे निघाला. हे करताना त्याने शरणागत तक्षशीलेत आपला प्रांताधिकारी (व्हॉइसरॉय) नेमला आणि जखमी सैनिकांना सुश्रूषेसाठी मागे ठेवले. एव्हाना सुमारे पाच हजारी भारतीय सेना त्याला सामील झाली होती.

अलेक्झांडरच्या आगमनाची खबर लागल्याने झेलमच्या पैलतिरावर पुरुची सेना जमली होती. अलेक्झांडरला झेलम ओलांडू न देता, किंबहुना, तो त्या प्रयत्नांत असताना त्यावर हल्ला करायचा अशी पुरुची रणनीती होती. अलेक्झांडरने झेलम किनारी आपला तळ ठोकला. पैलतिरावर पुरुची प्रचंड सेना आणि हत्ती उभे ठाकलेले दिसत होते. पुरुने जेथून जेथून नदी पार करणे सहज शक्य आहे तेथे तेथे आपले तळ ठोकले होते. अलेक्झांडरच्या हे लक्षात आल्यावर त्याने सैन्याच्या लहान फळ्या करून सर्व बाजूने पसरण्याचा आदेश दिला. असे केल्याने पुरू चकीत होईल आणि आपली निश्चित निती पुरुला कळून येणार नाही असे त्याला वाटले पण पुरू सावध होता. अलेक्झांडरने सिंधू नदीत पुलासाठी वापरलेल्या आपल्या होड्या झेलमपाशी मागवल्या. हे करताना त्याने त्यातील मोठ्या होड्या कापून त्यांच्या लहान होड्या बनवाव्यात अशी सूचना दिली. ती अंमलात आणून मोठ्या होड्यांचे दोन किंवा तीन तुकडे करण्यात आले.

समोरासमोरून झेलममध्ये घोडे टाकून नदी पार करणे अलेक्झांडरला शक्य नव्हतेच. एकतर पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी दुथडी भरून वाहत होती आणि पुरुचे हत्ती समोर तयार होते. घोडे पाण्यात शिरल्यावर या हत्तींनी त्यांच्यावर चाल केली असती आणि ग्रीक सैन्याची तेथेच धूळधाण उडाली असती हे अलेक्झांडर जाणून होता. त्याने आपण पावसाळा संपून थंडी सुरू झाल्यावरच हालचाल करू अशी अफवा पसरवली परंतु या अफवेचा पुरुच्या सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही. नंतर अलेक्झांडरने वेगळी निती अवलंबली. ती म्हणजे, रात्रीच्या पोटात त्याने आपले थोडे घोडदळ नदीच्या वेगवेगळ्याठिकाणी पसरवणे पण मोठमोठ्याने प्रचंड आवाज आणि गाजावाजा करणे सुरू केले. असे केल्याने पुरुला वाटावे की अलेक्झांडर स्वारीला सज्ज झाला आहे आणि त्याचे सर्व घोडदळ नदी ओलांडायच्या प्रयत्नात आहे म्हणून त्यानेही आपले सैन्य त्या दिशेने पाठवावे आणि त्यामुळे अलेक्झांडरला मूळ ठिकाणी नदी पार करता यावी. परंतु पुरुला हा कावा कळून आल्याने ही नितीही फसली.

लवकरच अलेक्झांडरला सुगावा लागला की त्याच्या सैन्यतळापासून सुमारे १७ मैलांवर झेलम नदीत एक बेट आहे. तिथे नदी थोडी उथळ होते आणि बेटाच्या आडोशाने नदी ओलांडणे सोपे आहे. पुरुच्या नजरेसमोरून सैन्य हलवणे सोपे नव्हते. अलेक्झांडरने हळूहळू त्याचे अंगरक्षक, काही सेनापती आणि काही चिवट सैनिकांची फळी बाजूला काढली आणि मागे नेली. क्रेटेरस या आपल्या सेनापतीच्या आधिपत्याखाली मुख्य सैन्य ठेवून त्याने स्वतः लहान फळीचे नेतृत्व केले. किनाऱ्यापासून बरेच अंतर ठेवून ही फळी पुढे सरकू लागली. सिंधू नदीतून आणलेल्या ३० वल्ह्यांच्या होड्यांचे तीन तुकडे करण्यात आले होते. हे तुकडेही या फळीसोबत पाठवण्यात आले. झेलम काठच्या दाट झाडीचा उपयोग त्यांना आडोशासाठी झाला. झेलमच्या त्या बेटामागे ईप्सित स्थळी पोहोचण्याच्या आदल्या रात्री विजांचा चकचकाट आणि गडगडाट होऊन वादळी पाऊस झाला. या पावसामुळे पुरुचे सैन्य गाफील राहिले आणि अलेक्झांडरच्या सैन्याला सुखरूप वाटचाल करण्यास जागा मिळाली.

बेटापलीकडून सैन्य जेव्हा नदीत उतरले तेव्हा नदी उथळ असूनही झालेल्या पावसाने भरून वाहत होती. छातीपर्यंत येणाऱ्या पाण्यातून वाट काढत सैन्याने आगेकूच केली. हे करताना बेटालाच दुसरा किनारा समजून सैन्य बेटावर जमा झाले पण लवकरच चूक कळल्याने त्यांनी पुन्हा किनाऱ्याकडे वाटचाल सुरू ठेवली. या सैन्यात पर्डिकस, कोएनस आणि सेल्युकसचा समावेश होता. पुरुला ही बातमी कळताच त्याने आपल्या मुलाला सैन्यानिशी अलेक्झांडरचा सामना करण्यास पाठवले. येथील युद्धात नेमके काय झाले याबाबत एरियन साशंक दिसतो परंतु टोलेमीच्या संदर्भांवर तो अधिक विश्वास ठेवतो. टोलेमीच्या संदर्भाप्रमाणे १२० रथ आणि दोन हजारांचे घोडदळ घेऊन पुरुपुत्र अलेक्झांडरचा पाडाव करण्यास रवाना झाला. परंतु अतिवृष्टीमुळे चिखल झाला होता त्यात रथ रुतले आणि गोंधळ झाला. येथे पुरुला अलेक्झांडर स्वतः नदी पार करण्याचे वेडे साहस करेल अशी कल्पना नव्हती. अशा गदारोळात पुरुच्या मुलाचा पराभव झाला.

पुरुपुत्राला अलेक्झांडरच्या सैन्याने कापून काढले आणि पुरुच्या मुख्य तळाकडे मोर्चा वळवला. याचवेळी क्रेटेरसही नदीत उतरू लागला. पुत्राच्या मृत्यूची बातमी आणि दोन्ही बाजूंनी सरकणारे अलेक्झांडरचे सैन्य पाहून नेमकी कोणती युद्धनिती वापरावी हे पुरुला कळेना. शेवटी त्याने अलेक्झांडरच्या रोखाने सैन्य वळवण्याचे आदेश दिले. वळवलेल्या सैन्यात ३०, ००० चे पायदळ, ४००० चे घोडदळ, सुमारे ३०० रथ आणि २०० हत्ती होते. बाकीची सेना त्याने क्रेटेरसशी सामना करण्यासाठी ठेवली. जेथे चिखल झालेला नाही अशा ठिकाणी थांबून त्याने व्यूहरचना केली. या रचनेत हत्ती सर्वांत पुढे होते. या हत्तींना घाबरून शत्रूचे घोडदळ किंवा पायदळ पुढे सरकणार नाही असा पुरुचा अंदाज होता. हत्तींच्या मागे पायदळ होते. पायदळाला कोट करण्यासाठी बाजूने घोडदळ उभे केलेले होते. त्याच्या बाजूने रथ उभे होते. अलेक्झांडरचे घोडदळ पुरुपेक्षा मोठे होते परंतु हत्तींवर हल्ला करणे अशक्य होते त्यामुळे अलेक्झांडरने स्वतःच्या नेतृत्वाखाली उजवीकडून आणि कोएनसने डावीकडून हल्ला चढवला. तसेच ग्रीक तिरंदाजांनी हत्तीच्या माहुतांचा वेध घेण्यास सुरुवात केली. पलीकडून क्रेटेरसनेही पुढे सरकण्यास प्रारंभ केला. अनेक दिशांनी झालेल्या हल्ल्यांमुळे पुरुचे सैन्य अडचणीत सापडले. हत्ती बिथरून मागे फिरले आणि पुरूच्या सैन्याला चिरडून जाऊ लागले. ग्रीक सैन्याने यानंतर चोहोबाजूंनी हल्ला चढवला. या युद्धात पुरूचे बरेचसे घोडदळ मारले गेले आणि अगदी क्षुल्लक पायदळ जिवंत राहिले.

एरियनच्या सांगण्यावरून भारतीयांचे सुमारे २०,००० च्या आसपास पायदळ आणि ३ हजारांच्या आसपास घोडदळ युद्धात कामी आले. रथांची मोडतोड झाली. पुरुचे दोन पुत्र कामी आले. पुरुचे सर्व सेनापती, युद्धभूमीवरील प्रांताधिकारी, अनेक माहुत वगैरे कामी आले. अलेक्झांडरच्या सैन्यातील कामी आलेल्यांची संख्या मात्र एरियन अतिशय क्षुल्लक (काही शेकड्यांत) देतो. या गणितात एरियनचे काहीतरी निश्चितच चुकलेले आहे हे सहज लक्षात येते. तज्ज्ञांच्या मते टोलेमीचे संदर्भ एरियन वापरतो. यापेक्षा ऍरिस्टोब्युलसचे संदर्भ खरे वाटतात.

एरियन पुढे म्हणतो की अलेक्झांडर तीक्ष्ण नजरेने पुरुवर लक्ष ठेवून होता. आपल्या सैन्याचा पराभव होतो आहे हे कळून चुकल्यावरही पुरू माघारी फिरला नाही. तो आपल्या सैन्यासह शौर्याने लढत राहिला. सैन्य माघार घेते म्हटल्यावर काढता पाय घेणाऱ्या पर्शियाचा सम्राट दरायुषसारखा पुरू नाही हे लक्षात आल्याने अलेक्झांडरच्या मनात या राजाविषयी आदर निर्माण झाला. सरतेशेवटी पुरुच्या उजव्या खांद्याला मोठी जखम झाली आणि त्याचा हत्ती माघारी फिरला. अलेक्झांडरने हे पाहिल्यावर तत्काळ हुकूम सोडले की माघारी फिरणाऱ्या पुरुला कुणीही अधिक इजा पोहोचवू नये. पुरुशी वाटाघाटी व्हाव्यात म्हणून त्याने तक्षशीलेचा एक घोडेस्वार पुरुच्या हत्तीच्या दिशेने पाठवला. घोडेस्वाराने पुरुचा हत्ती गाठला तसे त्याला पाहून पुरुचा राग उफाळून आला आणि त्याने पुन्हा शस्त्र उचलले परंतु बरीच विनवणी केल्यावर तो शरण येण्यास तयार झाला.

पुरुरवा

पुरुरवाचा नेमका वंश इतिहासात नमूद नाही. त्याचे राज्य झेलमच्या पूर्वेला पसरलेले होते त्यावरून तो पूर्व पंजाबातील राजा मानला जातो. तक्षशीलेच्या राजा अंभीशी त्याचे शत्रुत्व असल्याने अलेक्झांडर तक्षशीलेस पोहोचला असता त्याला नजराणे पाठवण्याची किंवा मैत्रीचा हात पुढे करण्याची तसदी त्याने घेतलेली नव्हती. उलट, अलेक्झांडर पूर्वेला कूच करेल या अंदाजाने त्याने सैन्याची जमवाजमव केली होती. पावसाळा आणि ग्रीकांना हत्तीशी लढण्याचा अनुभव नाही या अंदाजांवर तो गाफील राहिला आणि ग्रीक सैन्याने संधी साधली. लढाईत पुरुच्या सैन्याची संख्या पाहिली (एरियनने ती वाढवून-चढवून सांगितली नसेल तर) तर तो कुणी मोठा राजा असावा असा अंदाज बांधता येतो. त्याच्या बाजूने इतर कोणते राजे लढले हे कळत नाही. त्याचे प्रमुख सेनापती कोण होते ते कळत नाही.

एरियन पुरुचे वर्णन करताना त्याची उंची "पाच क्युबिट" होती असे म्हणतो. यावरून पुरु सुमारे ६ फुटांपेक्षा अधिक उंच असावा असे वाटते. त्याचे दोन पुत्र युद्धात कामी आले यावरून तो किमान मध्यमवयीन असावा असे दिसते. एरियनच्या सांगण्यावरून पुरू दिसायला अतिशय रुबाबदार असून शरणागत पुरू अलेक्झांडरला भेटायला आला असता त्याच्या चेहऱ्यावर भीती किंवा पराभव दिसत नव्हता. ते पाहून ग्रीक सैन्य अचंबित झाले. पुरुला येताना पाहून अलेक्झांडर स्वतः सैन्याच्या पुढे जाऊन स्वागतासाठी उभा राहिला. अलेक्झांडरने स्वतःहून बोलायला सुरुवात केली आणि पुरुला प्रसिद्ध प्रश्न विचारला.

"राजा, मी तुला कसे वागवू? " पुरुने बाणेदार उत्तर दिले, "हे अलेक्झांडर, मला राजासारखेच वागव. "
यावर अलेक्झांडर उत्तरला, " मी माझ्या मनाच्या समाधानासाठी तुला राजासारखेच वागवेन पण तू तुझे समाधान व्हावे म्हणून काहीतरी माग. "
त्यावर पुरू म्हणाला, "मी प्रथमतः जे मागितले त्यातच सर्व आले. "

अलेक्झांडरने पुरुला त्याचे जेवढे राज्य होते ते मानाने परत करून राज्याचे क्षत्रप बनवले तसेच कश्मीरचा भागही पुरुच्या आधिपत्याखाली दिला.

---------

या युद्धातील अलेक्झांडरच्या हानीची संख्या एरियनने दिलेल्या आकड्यांपेक्षा बरीच अधिक असावी. ग्रीक सैन्याला भारतीय भूमीवर युद्ध लढायचा अनुभव नसणे, पावसाळी वाईट हवामान, हत्तींचा सैन्यातील समावेश वगैरेंने त्रस्त होऊन त्यांनी कोएनसतर्फे परतण्याची विनंती अलेक्झांडरला केली. ती नाराजीने का होईना अलेक्झांडरला मानावी लागली. या युद्धानंतर (किंवा युद्धात) झालेला ब्युसाफलसचा मृत्यू वगैरे अलेक्झांडरचा निग्रह तोडण्यास हातभार लावून गेले असावेत.

अलेक्झांडर आणि पुरुच्या लढाईत अलेक्झांडर ऐवजी पुरुचाच विजय झाला असे तर्क अनेकांनी मांडलेले आढळतात. या तर्कांना अद्यापतरी तज्ज्ञांच्या लेखी अधिष्ठान मिळालेले नाही परंतु लढाईत पराभव होऊनही स्वतःचे राज्य परत मिळणे, सोबत दुसरे राज्यही पदरात पडणे, ज्या परदेशी सम्राटाने विजय मिळवला त्याचा त्या राज्यात/ देशात स्थायिक होण्याचा हेतू नसणे, इथपासून अलेक्झांडरचे माघारी फिरणे, पुढील काही वर्षांत त्याचा मृत्यू इ. मधून पुरुचा पराभव झाला तरी अंतिम विजय पुरुचाच झाला असे वाटणे शक्य आहे असे वाटते.

---------

वरील लेखात विस्तार भयास्तव युद्धाचे वर्णन त्रोटक केले आहे. हा लेख लिहिताना एरियन खेरीज इतर कोणत्याही इतिहासकाराचे भारतीय युद्धाविषयक संदर्भ तपासलेले नाहीत. लेखासंबंधात प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांतून देता येतीलच. वाचकांकडे अधिक माहिती असल्यास अवश्य पुरवावी. एरियनने लिहिलेला अलेक्झांडरच्या स्वारीचा वृत्तांत गूगलबुक्स वरून उतरवून घेता येईल.

लेखातील चित्रे विकीपीडीयावरून घेतली आहेत.

Comments

माहिती । मूळ वृत्तांत

एरियनच्या पुस्तकातील वृत्तांत मूळापासून वाचावा यासाठी त्याच्या पुस्तकाचा शोध घेतला. प्रस्तुत लेखात या पुस्तकाचा दुवा नसल्याने खाली देत आहे.

___________

वाचकांकडे अधिक माहिती असल्यास अवश्य पुरवावी.

गुगल बुक्सवर खालील पुस्तक मिळाले. (पुस्तकाचे पाश्चात्य लेखक विन्सेंट स्मिथ यांनी या युद्धाला तीन पानांपेक्षा अधिक जागा दिली आहे.)

_____
व्हेन पिपल डोन्ट फियर व्हॉट इज टेरिबल, ग्रेट टेरर कम्स.

बायस

छान लेख. यातली काही माहिती हिस्टरी चॅनेलवर बघितलेल्या एका डॉक्युमेंटरीत मिळाली होती. पण या विशिष्ट युद्धाबद्दलचे व त्याच्या लिखित इतिहासातील स्थानाबद्दलचे विचार आवडले. पहिल्या लेखातच जेते इतिहास लिहितात, इतिहासकार निःपक्षपाती असतातच असं नाही असं लिहिलेलं आहे.

लहानपणी अलेक्झांडरला जगज्जेता वगैरे पदव्या दिल्याचं शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांमधून वाचलेलं आहे. तो ग्रेट होता याबद्दल शंकाच नाही. त्याने मिळवलेले विजय नेत्रदीपक होते, व महत्त्वाकांक्षा जबरदस्त होती. पण मला नेहेमी हा प्रश्न पडत आलेला आहे त्याने जिंकलेलं जग हे त्या काळच्या 'जगा'चा नक्की कितवा भाग होतं? पाश्चिमात्यांनी इतिहास लिहिलेला असल्यामुळे की काय, पण युरोप, पर्शिया, इजिप्त वगैरे ठिकाणच्या घटनांना जागतिक इतिहासात कितीतरी जास्त महत्त्व मिळतं असा माझा प्रांजळ समज आहे. भारत व चीन सारख्या बलाढ्य, त्या काळच्या जगाच्या मानाने वैभवाच्या शिखरांवर असलेल्या सत्तांचे फारसे उल्लेख होत नाहीत. उदाहरणार्थ, अलेक्झांडरनंतर लगेचच चंद्रगुप्त मौर्याने भारताचा केवढा तरी मोठा भाग आपल्या साम्राज्याखाली आणला व मुख्य म्हणजे टिकवून ठेवला. लोकसंख्या, क्षेत्रफळ वगैरेचा विचार करता अलेक्झांडरने जिंकलेल्या (व पटकन घालवलेल्या) जगाशी सहज तुलना करता येते. मग अलेक्झांडर जितका माहिती असतो, तितका चंद्रगुप्त का माहिती नसतो?

हे उदाहरण कदाचित बरोबर नसेल - अलेक्झांडरने केलेला विस्तार हा त्याच्या राज्याच्या मूळ आकारापेक्षा प्रचंड होता, हे खरंच. पण माझा मुद्दा ऐतिहासिक घटनांबद्दल इतिहासकारांमध्ये व सामान्य जनतेमध्ये असलेल्या बायसबद्दल आहे. असा बायस दिसतो का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

जगज्जेता :-)

लहानपणी अलेक्झांडरला जगज्जेता वगैरे पदव्या दिल्याचं शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांमधून वाचलेलं आहे.

शाळेतली इतिहासाची पुस्तके मला खरेच आठवत नाहीत. अलेक्झांडरवर धडा होता वगैरे ठीक पण इतिहासाच्या पुस्तकात त्याला जगज्जेता म्हटले असेल तर कल्पना नाही. असल्यास ती त्रुटी आहे. आपल्या शालेय शिक्षणातील इतिहासाची दूरावस्था बघता मला आश्चर्यही वाटत नाही. बिरुट्यांच्या मते तर लेखात दिलेले लढाईचे वर्णनही महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांत होते म्हणे. मला तर शिवाजीच्या लढाईचेही इतके विस्तृत उदाहरण आठवत नाही. ;-) पण असो.

अलेक्झांडरला क्षणभर बाजूला ठेवू. "एक शिवाजी ना होता तो सबकी सुंता हो जाती थी" हे वाचले आहे का? यात थोडी अतिशयोक्ती वाटत नाही का? पण ती करणे हे भाटांचे काम असते. ते त्यांनी चोख बजावावे. इतिहासकारांनी तसे करू नये. अलेक्झांडर हे अद्वितीय व्यक्तिमत्व आहे. त्याची हिरो-वरशिप होणे आलेच. म्हणजेच भाटगिरीही आली. त्याला सिकंदर हे नावही आपण देऊ केले. ते स्वीकारले. "जो जीता वही सिकंदर" असे वाक्प्रचार अंगिकारले. या सर्वात इतिहास मागे राहून वाढवून चढवून सांगितलेले संदर्भच लक्षात राहणार.

पण मला नेहेमी हा प्रश्न पडत आलेला आहे त्याने जिंकलेलं जग हे त्या काळच्या 'जगा'चा नक्की कितवा भाग होतं?

सर्वप्रथम जिंकलेलं जग ही चुकीची संज्ञा आहे. अलेक्झांडरने ज्ञात जग जिंकलं. ग्रीकांच्या मते ज्ञात जग म्हणजे ग्रीक-इटली, स्पार्टा वगैरे आजूबाजूचा प्रदेश, इजिप्त, सुदान, पर्शिया, आशिया मायनॉर आणि आशिया (बॅक्ट्रिया, हिंदूकुश, भारत इ.) अलेक्झांडरने या ज्ञात जगाचा बराचसा भाग जिंकला. चीन, आफ्रिकेचा उर्वरीत भाग, अमेरिका खंड, ऑस्ट्रेलिया वगैरे वगैरेंना बाद करावे. :-)

पाश्चिमात्यांनी इतिहास लिहिलेला असल्यामुळे की काय, पण युरोप, पर्शिया, इजिप्त वगैरे ठिकाणच्या घटनांना जागतिक इतिहासात कितीतरी जास्त महत्त्व मिळतं असा माझा प्रांजळ समज आहे.

समज योग्य आहे पण त्याचे दोषी पाश्चात्य इतिहासकार नाहीत.

भारत व चीन सारख्या बलाढ्य, त्या काळच्या जगाच्या मानाने वैभवाच्या शिखरांवर असलेल्या सत्तांचे फारसे उल्लेख होत नाहीत.

भारत आणि चीनला तुम्ही तुमचे इतिहास लिहू नका अशी कुणीही सक्ती केली नव्हती. किंबहुना, हे व्हायला हवे होते पण आम्हाला बहुधा इतिहासाच्या नोंदी करून ठेवायच्या असतात याची माहिती नसावी. काव्य हे इतिहास नसते. चू. भू. दे. घे. इथे कौटिल्याचे अर्थशास्त्र वगैरे ग्रंथांवरून तत्कालीन समाजाची, राज्यव्यवस्थेची माहिती मिळू शकते. तत्कालीन नाटके, काव्ये यावरूनही माहिती मिळू शकते परंतु ते अंदाज या रूपाने मांडावे लागतात. पाश्चात्यांच्या इतिहासात अलेक्झांडरच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला कोणते स्वप्न पडले (भले ती आख्यायिका असेल) हे ही कळते पण चंद्रगुप्त नेमका कुणाचा मुलगा हे आपल्याला अज्ञात राहते.

उदाहरणार्थ, अलेक्झांडरनंतर लगेचच चंद्रगुप्त मौर्याने भारताचा केवढा तरी मोठा भाग आपल्या साम्राज्याखाली आणला व मुख्य म्हणजे टिकवून ठेवला. लोकसंख्या, क्षेत्रफळ वगैरेचा विचार करता अलेक्झांडरने जिंकलेल्या (व पटकन घालवलेल्या) जगाशी सहज तुलना करता येते. मग अलेक्झांडर जितका माहिती असतो, तितका चंद्रगुप्त का माहिती नसतो?

हो, हे उदाहरण योग्य नाही. अलेक्झांडरचा राज्यविस्तार चंद्रगुप्तापेक्षा खूप मोठा होता. प्रश्नाचे उत्तर अर्थातच वरीलप्रमाणे आहे. चंद्रगुप्ताला किंवा त्याच्या कोणाही मंत्र्याला इतिहासातील नोंदी न करून ठेवण्याची सक्ती नव्हती. त्यांनी ती तशी करून ठेवली असती तर आपल्या सर्वांना बरीच माहिती मिळाली असती आणि सँड्रोकोटसवर अवलंबून राहावे लागले नसते. एरियन, प्लुटार्क हे रोमन-ग्रीक साम्राज्यांचे नोकर होते. त्यांनी त्यांच्या साम्राज्याला उपयुक्त अशा नोंदी करून ठेवल्या. मेगॅस्थेनिससारखा मनुष्य भारतात राहून इंडिका हा ग्रंथ लिहू शकतो (त्यात त्याचे असलेले गैरसमजही स्पष्ट दिसतात) पण आपल्याकडले ज्ञानी लोक तसा प्रयत्न करत नसतील तर काय करावे?

काही शंका

अलेक्झांडरने ज्ञात जग जिंकलं.

ठीक आहे. शिवाय जगज्जेता व (ज्ञात) जग जिंकण्याची जिद्द बाळगणारा या दोनमध्ये कधी कधी गफलत होत असे.

समज योग्य आहे पण त्याचे दोषी पाश्चात्य इतिहासकार नाहीत

दोषारोपाचा प्रश्न नाही. ग्रीकांच्या ज्ञात विश्वाच्या मर्यादेप्रमाणेच प्रत्येकच भूतकालीन इतिहासकाराचं व बखरकाराचं विश्व मर्यादित असावं यात काही विशेष नाही. मला वाटतं नोंद करून ठेवण्याच्या पद्धती सर्वत्र असाव्यात. जी राज्यं जिंकली गेली, साम्राज्य लयाला गेली तिथले कागद हरवले, नष्ट झाले असावेत. अलिकडच्या काळात (गेल्या दोन तीन शतकांत) समृद्धीमुळे पाश्चिमात्यांमध्ये इतिहाससंशोधन, संकलन व जपणूक याला जास्त महत्त्व दिलं गेलं असावं.

अलेक्झांडरचा राज्यविस्तार चंद्रगुप्तापेक्षा खूप मोठा होता.

हे वाक्य सत्य असलं तरी आर्ग्युमेंट मात्र पटत नाही. त्याच्या राज्यविस्तारातला सुमारे दोन तृतियांश वगैरे भाग (माझा अंदाज) रिकामा प्रदेश आहे. १९९४ सालचा लोकसंख्या वितरणाचं चित्र पहा. हे ३३० बीसीमध्ये अचूकपणे लागू होतं असं नाही, पण सर्वसाधारण कल्पना येते. त्यामुळे नुसत्या क्षेत्रफळाचा विचार मला एकांगी वाटतो. त्याने जिंकलेल्या राज्यांची लोकसंख्या तत्कालीन भारताच्या लोकसंख्येच्या १/४ होती असं सांगितलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. जास्त होती असं सांगायला गेलं तर मी शंका घेईन. चीनची लोकसंख्या वगैरे धरलं तर मला वाटतं अलेक्झांडरने प्रत्यक्ष जगाच्या ५ ते १० टक्के लोकसंख्येवर कब्जा मिळवला असावा. तोही काहीसा तात्पुरता.

पण आपल्याकडले ज्ञानी लोक तसा प्रयत्न करत नसतील तर काय करावे?

मला याबाबतीत जुन्या काळपासून शंका आहे. भारतातली संस्कृतीच वेगळी, त्यात नोंदी करण्याची पद्धतच नव्हती असं म्हणणं थोडं धार्ष्ट्याचं वाटतं. साम्राज्य चालवायचं म्हणजे नोंदी करणारी प्रचंड यंत्रणा आवश्यक असते. २-४ लाखाचं सैन्य बाळगणं हे सोपं काम नाही. काळाच्या ओघात या नोंदी नष्ट झाल्या असाव्यात हे जास्त पटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

निरसनाचा प्रयत्न

मला वाटतं नोंद करून ठेवण्याच्या पद्धती सर्वत्र असाव्यात. जी राज्यं जिंकली गेली, साम्राज्य लयाला गेली तिथले कागद हरवले, नष्ट झाले असावेत.

सैन्याचा खर्च, दाणापाणी यांच्या नोंदी कालांतराने महत्त्वाच्या नसल्याने नष्ट होणे सहाजिक आहे. साम्राज्ये लयाला येथे आणि तेथेही गेली. कागद दोन्हीकडील नष्ट झाले, हरवले. परंतु जे महत्त्वाचे आहे ते वंशजांसाठी टिकवून ठेवणे हा इतिहास लेखनाचा उद्देश असतो. नालंदाच्या ग्रंथालयाचा अस्त झाला तसा अलेक्झांड्रियाच्या ग्रंथालयाचाही झाला. म्हणून स्मृती पुसल्या जात नाहीत. तत्कालीन नाटके, काव्ये इ. मागे राहू शकतात तर इतिहासाच्या नोंदी का पुसल्या गेल्या हा प्रश्न आहे. भारताचा इतिहास लहान नाही. तिथे चंद्रगुप्त हा एकच राजा नाही. अनेक राजे झाले होऊन गेले. हर्षवर्धनासारखे सम्राट झाले, विक्रमादित्यासारखे सम्राट झाले परंतु त्यांची इत्यंभूत माहिती मिळत नाही. पैशाची भाषेतील बृहत्कथेचा काहीच भाग शाबूत असला तरी स्मृती पुसली जात नाही. अशा धर्तीवर भारताचा इतिहास लिखित होता पण हरवला म्हणणे धाडसी वाटते.

अलिकडच्या काळात (गेल्या दोन तीन शतकांत) समृद्धीमुळे पाश्चिमात्यांमध्ये इतिहाससंशोधन, संकलन व जपणूक याला जास्त महत्त्व दिलं गेलं असावं.

हा बिचार्‍या शेकडो वर्षे जुने संदर्भ तपासून अलेक्झांडरच्या स्वारीचा वृत्तांत लिहिणार्‍या दोन हजार वर्षे जुन्या एरियनवर अन्याय नाही का झाला? आणि एरियन एकटाच नाही. प्लुटार्क, हेरोडोटस, ऍरिस्टोब्युलस, स्ट्राबो, टॉलेमी असे कित्येक इतिहासकार पाश्चिमात्यांत आढळतात.

त्याच्या राज्यविस्तारातला सुमारे दोन तृतियांश वगैरे भाग (माझा अंदाज) रिकामा प्रदेश आहे.

१९९४ चे चित्र पाहूया नको. ग्रीस, थेबेस, अथेन्स, र्‍होड्स, टायर, गाझा, लिसिया, पॅम्फेलिया, दमास्कस, इजिप्त, पर्शिया, सिरिया, बॅबिलोन, सुसा, पार्सा, बॅक्ट्रिया, गांधार ही भारतात येण्यापूर्वी जिंकलेली काही महत्त्वाची राज्ये किंवा शहरे. येथील संस्कृती अतिशय पुढारलेल्या होत्या. शहरे अतिशय सुरेख. स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने. जुन्या जगातील सात आश्चर्ये येथेच सापडतात. :-) चंद्रशेखर यांचा दिवाळी अंकातील पार्सापोलिसवरचा लेख वाचावा. असो. सांगण्याचा मुद्दा असा की दोन तृतियांश भाग रिकामा होता असे म्हणणेही धाडसी आहे. :-)

थोडा वेगळा युक्तिवाद...

सैन्याचा खर्च, दाणापाणी यांच्या नोंदी कालांतराने महत्त्वाच्या नसल्याने नष्ट होणे सहाजिक आहे.

सैन्याचा उल्लेख केवळ राज्याची व्याप्ती दाखवण्यासाठी केला होता. पुरु राजाइतकं सामर्थ्य असणारे अनेक मांडलिक बाळगणं व अधिपत्याखाली ठेवणं हे सर्व प्रकारच्या नोंदी ठेवण्याच्या यंत्रणेशिवाय होत नाही इतकंच म्हणायचं होतं. माझा असा अंदाज आहे की केलेल्या नोंदींपैकी, लिहिल्या गेलेल्या पुस्तकांपैकी इतिहासकारांना उपयुक्त ठरू शकेल अशी सामग्री साम्राज्यांच्या लयी जाण्यात नष्ट होत गेली. आत्ता आपल्याकडे काय शिल्लक आहे यावरून आपण निष्कर्ष काढतो. पण ते निष्कर्ष जरा चिमूटभर मिठाबरोबर घ्यावे लागतात. समजा एके ठिकाणी ९९.०% नष्ट झालं, दुसऱ्या ठिकाणी ९९.९% नष्ट झालं - तर पहिल्या ठिकाणी दहापट शिल्लक राहील. त्यावरून मुळात दहापट निर्माण झालं असं म्हणणं बरोबर ठरणार नाही. पण इतिहास लिहिणाऱ्यांना अशी गणितं करून बघण्यापेक्षा 'वेगळी संस्कृती, वेगळ्या जीवनपद्धती' असं समाजशास्त्रीय निष्कर्ष अधिक पटत असावेत.

एरियनवर अन्याय नाही का झाला?

नाही नाही. ज्यांनी कोणी भरीव कार्य केलं त्यांना श्रेय आहेच. गेल्या शतकांत जपणूक झाली नाही त्यामुळे ढासळणं, नष्ट होणं चालूच राहीलं असा माझा हायपोथिसिस होता.

१९९४ चे चित्र पाहूया नको.

लोकसंख्यांचे आकडे आपल्याकडे नाहीत, पण माझा अंदाज साफ चुकलेला नसावा असं वाटतं. १९९४ चं चित्र किमान सुपीक प्रदेश, नद्यांची खोरी व अशा ठिकाणी झालेलं लोकसंख्येचं एकत्रीकरण दाखवतात. भारताची लोकसंख्या फार पूर्वीपासून जगाच्या लोकसंख्येच्या २०% च्या आसपास आहे. ३०० बीसीच्या वेळी अजूनच अधिक प्रमाण असावं असं वाटतं. अलेक्झांडरने खूप समृद्ध पण छोटी, विरळ राज्यं जिंकली जी संपूर्ण भारताच्या तुलनेत खूप लहान होती असा माझा समज आहे. तुमच्याकडे आकडे असतील तर तो समज बदलू शकेल. नुसत्या राज्यांच्या नावांच्या याद्यांनी काहीच सिद्ध होत नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

युक्तीवाद :-(

तुमचा युक्तीवाद प्रतिसादागणिक बदलतो आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे. ;-) ह. घ्या.

अलिकडच्या काळात (गेल्या दोन तीन शतकांत) समृद्धीमुळे पाश्चिमात्यांमध्ये इतिहाससंशोधन, संकलन व जपणूक याला जास्त महत्त्व दिलं गेलं असावं.

आणि

गेल्या शतकांत जपणूक झाली नाही त्यामुळे ढासळणं, नष्ट होणं चालूच राहीलं असा माझा हायपोथिसिस होता.

यातलं नेमकं काय घ्यावं ते मला कळेनासं झालं आहे.

माझा असा अंदाज आहे की केलेल्या नोंदींपैकी, लिहिल्या गेलेल्या पुस्तकांपैकी इतिहासकारांना उपयुक्त ठरू शकेल अशी सामग्री साम्राज्यांच्या लयी जाण्यात नष्ट होत गेली.

पुन्हा तेच म्हणतो आहोत आपण. स्मृती जात नाहीत. पुस्तके नष्ट होतात. जर नोंदी होत्या तर अश्या नोंदी करणारे कुणी होते असे स्मरणात राहते. सॉक्रेटिस प्लेटोमुळे स्मरणात राहतो तसे. आपली मौखिक परंपरा तर सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे तेव्हा फक्त इतिहासाबद्दल जे काही होते ते समूळ नष्ट झाले म्हणण्यास वाव नाही.

अलेक्झांडरने खूप समृद्ध पण छोटी, विरळ राज्यं जिंकली जी संपूर्ण भारताच्या तुलनेत खूप लहान होती असा माझा समज आहे.

:-) सिंधू आणि गंगेच्या खोर्‍यांप्रमाणेच नाइल आणि युफ्रेटिस-तिग्रीसचे खोरे समृद्ध होते. भूमध्य सागरी प्रदेश तर सुपीक होताच. तेथे लोकसंख्या विरळ होती म्हणण्यास वाव नाही. अतिशय समृद्ध राज्ये आणि सैन्ये तेथे होती. पर्शियाच्या वाळवंटी पठारावर ती नक्कीच कमी असावी.

भारताच्या लोकसंख्येचा जो १९९४मधील दावा आहे त्यात सिल्करुट खुला झाल्यावर, व्यापार उदीम वाढल्यावर भारतात स्थायिक झालेल्या (कोकणस्थ ब्राह्मणांपासून-मुसलमानांपर्यंत) लोकसंख्येचा अंदाज देता येईल का? मला वाटतं हे प्रश्न बरेच मोठे आहेत आणि लेखाशी अवांतर आहेत. तेव्हा

तुमच्याकडे आकडे असतील तर तो समज बदलू शकेल. नुसत्या राज्यांच्या नावांच्या याद्यांनी काहीच सिद्ध होत नाही.

याचे उत्तर देणे मला कठिण वाटते. आता पुढे -

मी अनेक शहरांची किंवा राज्यांची नावे घेतली तशी चंद्रगुप्ताने जिंकलेल्या राज्यांची नावे घेता येतात का? चंद्रगुप्ताच्या ताब्यातील राज्ये किती, जंगले किती, अंकित न झालेल्या टोळ्या किती वगैरेंचे संदर्भ मिळतात का? प्रत्यक्षात चंद्रगुप्ताच्या वेळेस दक्षिणेकडे कलिंग, आंध्रराज्ये वगैरे होती. (संदर्भ: मेगॅस्थेनिस) चंद्रगुप्त प्रथम तेथे वळला नाही. तो तक्षशीलेच्या दिशेने साम्राज्यविस्तार करून गेला कारण तेथे ग्रीक क्षत्रपांच्या ताब्यातील कारभार खिळखिळा होता. नंतर दक्षिणेकडे. त्यावेळेस भारतात लहान लहान गणराज्ये होती. कोणतेही मोठे, प्रबळ राज्य उरलेले नव्हते. (माझ्यामते कलिंगकडला भाग त्याला जिंकता आला नाही.) त्याने केले ते योग्यच केले. साम्राज्य वाढवण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट चाल परंतु जर विपर्यस्त मत मांडायचे झाले तर मांडता येईलच. :-)

किंबहुना असेही म्हणता येईल की अलेक्झांडरच्या साम्राज्य लालसेला जवळून पाहिल्याने चंद्रगुप्ताला सम्राट बनण्याची इच्छा झाली. अलेक्झांडरने भारतावर स्वारी केली नसती तर कदाचित चंद्रगुप्त, सम्राट चंद्रगुप्त न बनता. :-)

हम्म्म...

मौखिक परंपरा, स्मृती वगैरेविषयीची मतं पटली नाहीत. काही गोष्टी मौखिक परंपरेने टिकल्या हे मान्य, पण त्यावरून प्रत्येकच गोष्ट, स्मृती टिकून राहील हे सिद्ध होत नाही.

अलिकडच्या काळात (गेल्या दोन तीन शतकांत) समृद्धीमुळे पाश्चिमात्यांमध्ये इतिहाससंशोधन, संकलन व जपणूक याला जास्त महत्त्व दिलं गेलं असावं.

आणि

गेल्या शतकांत जपणूक झाली नाही त्यामुळे ढासळणं, नष्ट होणं चालूच राहीलं असा माझा हायपोथिसिस होता.

यात विसंगती नाही. पाश्चिमात्यांत ही जपणूक झाली, तर भारतात पडझड चालूच राहिली (पारतंत्र्य, औद्योगिक क्रांती न होणं वगैरेमुळे) असं म्हणायचं होतं. माझा युक्तिवाद कळला असता तर दुसऱ्या वाक्यात 'भारतात' हे अध्याहृत आहे हे लक्षात आलं असतं असं मला वाटलं. पुढच्या वेळी अधिक स्पष्ट करून लिहीन.

राज्यांची नावे घेता येतात का?

या चर्चेत विसंवादच जास्त होतो आहे असं वाटतं. अलेक्झांडरने भारतावर स्वारी केली नसती तर कदाचित चंद्रगुप्त, सम्राट चंद्रगुप्त न बनता. :-)
हे तुम्ही चेष्टेने म्हटलं आहे की नाही हे मला समजलं नाही. असो. माझं इतिहासाचं ज्ञान कच्चं आहे. एका विशिष्ट युक्तिवादात तार्किक कच्चा दुवा वाटला म्हणून विचारलं. तुम्ही दिलेला लोकसंख्येचा युक्तिवाद बरोबर आहे म्हणून स्वीकारतो. इतर शंकांचं समाधान इतरत्र होतंय का पाहीन. ही चर्चा इथेच थांबवू.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

चेष्टेत नाही

मौखिक परंपरा, स्मृती वगैरेविषयीची मतं पटली नाहीत. काही गोष्टी मौखिक परंपरेने टिकल्या हे मान्य, पण त्यावरून प्रत्येकच गोष्ट, स्मृती टिकून राहील हे सिद्ध होत नाही.

मी माझे म्हणणे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे दिली. आपण प्रत्येकच गोष्ट म्हणता आहात मी तर हजारो वर्षांपासूनचा अनेक राजांच्या इतिहासाबद्दल, भारतात बोट दाखवण्यालायक एखादा इतिहास किंवा इतिहासकार झाला नाही त्याबद्दल बोलते आहे. तरीही तुम्हाला माझे म्हणणे पटत नाही म्हणजे तुमचा बायस आडवा येतो असे मला वाटते. तेव्हा यावर यापुढे चर्चा करण्यात उपयोग नाही.

माझा युक्तिवाद कळला असता तर दुसऱ्या वाक्यात 'भारतात' हे अध्याहृत आहे हे लक्षात आलं असतं असं मला वाटलं. पुढच्या वेळी अधिक स्पष्ट करून लिहीन.

मला तुमचा युक्तिवाद कळला होता म्हणूनच सुरुवातीला ह. घ्या असे लिहिले पण वाक्ये अध्याहृत शब्द न लक्षात घेता वाचली तर परस्परविरोधी आहेत हेच दाखवायचे होते. असो. त्यात काही गंभीर नाही. मी गंमतीत लिहिले. गैरसमज होत असल्यास क्षमस्व! मीच अधिक स्पष्ट करून लिहायला हवे होते. त्याऐवजी नुसते कॉपीपेस्ट मारले. असो. इथेही माझा युक्तिवाद तोच आहे. जर महाकाव्ये, नाटके, वेद वगैरे राहतात तर इतिहास पुसला जातो असे होत नाही.

अलेक्झांडरने भारतावर स्वारी केली नसती तर कदाचित चंद्रगुप्त, सम्राट चंद्रगुप्त न बनता. :-) हे तुम्ही चेष्टेने म्हटलं आहे की नाही हे मला समजलं नाही.

हे मात्र चेष्टेत नाही गांभीर्याने म्हटले. अलेक्झांडरच्या स्वारीनंतर सैन्याची रचना, निती यांचे ज्ञान चंद्रगुप्ताला झाले, त्याने ते शिकून घेतले याच बरोबर प्रबळ शत्रूंशी मुकाबला करण्यासाठी स्वतः प्रबळ असायला हवे हे कळले असावे. चंद्रगुप्त हा भारताचा पहिला सम्राट. तोही अलेक्झांडरनंतर लगेच. अलेक्झांडरच्या स्वारीने भारताच्या राजकारणातील अनेक गोष्टींवर परिणाम झाला. सत्तेसाठी आणि एकतेसाठी राज्यविस्तार करायला हवा याची जाणीव चंद्रगुप्ताला झाली असावी. (असावी म्हणण्याचे कारण फक्त असा लिखित इतिहास सापडत नाही म्हणून.अन्यथा, चंद्रगुप्ताने अलेक्झांडरच्या सैन्यात राहून अनेक गोष्टी कशा शिकून घेतल्या आणि नंतर सैन्यरचनेपासून स्वतःच्या अंगरक्षकांपर्यंत त्या कशा अंमलात आणल्या त्याच्या रोचक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.)

असो. जेवढा अलेक्झांडर प्रिय तेवढाच चंद्रगुप्तही मला प्रिय आहे. फरक इतकाच की इथे राहून चंद्रगुप्ताविषयी हवी तेवढी माहिती मिळत नाही. तरीही, चंद्रगुप्ताविषयी हा इतिहासाचा तुकडा आणि कोडे तुम्हाला नक्की आवडेल.

इतिहास

इतिहास हा आवडीचा विषय असल्याने आणि मागच्या काही दिवसातल्या उपक्रमवरच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आपला लेख सुखद धक्का वाटला.

पुरु आणि अलेक्झांडर यांच्या युद्धाविषयी अधिक आणि सचित्र माहीती मिळाली.

काही वेळा युद्धात दोन्ही पक्षांची इतकी हानी होते की हार-जीत फक्त नाममात्र असते. अशा वेळी जिंकणार्‍याला सुद्धा मागे फिरणे सूज्ञपणाचे ठरते.

एतद्देशिय राज्यकर्त्यांची किंवा ज्ञानी मंडळींची इतिहास लिहीण्याबद्दलची अनास्था पाश्चात्य इतिहासकारांचे लेखन संदर्भ म्हणून वापरण्यास भाग पाडते.

तेव्हा इतिहास नीट लिहीला असता तर वर्तमानात इतिहासाबद्दलचे (कुणाचा गुरु कोण, पुतळे हलवणे न हलवणे वगैरे)प्रश्न सोडवणे सोप्पे गेले असते.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

लेख आवडला

लेख खुप आवडला.

व्हिंसेंट स्मिथयांनी "द अर्ली हिस्टरी ऑफ ईंडिया" या पुस्तकात लढाईच्या वर्णना सोबत नकाशा दिलेला आहे -

व्हिंसेंट स्मिथने दिलेला नकाशा

या नकाशाच्या सहाय्याने तयार केलेला गुगल मॅपचा दुवा -


मोठा नकाशा पाहा
मोठा नकाशा पाहा">

स्मिथयांचे पुस्तक १९०८ साली प्रसीद्ध झाले, त्यामुळे तेव्हाची झेलम नदीच्या पात्राची (नकाशातील) स्थिती आणि गुगल मॅप मधे दिसणारं नदीपात्र यात फरक आहे. आणि प्रत्यक्ष लढाईच्या वेळी पात्राची अवस्था काय असेल याबाबत अंदाज करणे योग्य ठरणार नाही, कारण युद्धकाळात आणि युद्धाआधी पडलेल्या पावसामुळे नदिचे पात्र फुगले असणार यात शंका नाही.

शिपाईगडी

छान

माहितीपूर्ण लेखमाला आणि चर्चा.

सहमत

सहमत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

+१

सहमत.

दोन्ही लेखांक आणि चर्चा

माहितीपूर्ण आहेत. लेखिकेला आणि चर्चाकर्त्यांना धन्यवाद.

एक शंका आहे : 'गांधार भारतचा भाग नव्हते' यावर स्पष्टीकरण हवे आहे.
तसेही अलेक्झांडर आला त्यावेळी 'भारतवर्ष' ही संकल्पना 'आसेतुहिमाचल' अशी नव्हती. किंबहुना एकाच प्रकारचे तत्त्वज्ञान बाळगणारे लोक म्हणजे एक देश असतो याची
कल्पना फारच थोड्या लोकांना होती. कारण एकाच प्रकारचे आचार-विचार बाळगणारी अनेक राज्ये एकमेकांशी लढत किंवा मित्रत्वाने रहात.
याहून वेगळे आचार-विचार असणारे अलेक्झांडरचे आक्रमण प्रबुद्ध काळात पहिलेच होते. (त्यामुळेच 'हम सब एक हैं' = भारतवर्ष ही संकल्पना उदयाला आली. यादृष्टीने अलेक्झांडर भारतात आला नसता तर चंद्रगुप्त सम्राट झाला नसता असे म्हणणे योग्य आहे.)
जर तक्षशीला गांधारात होती आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर तक्षशीलेत होत असे तर 'गांधार हे भारताचा भाग नव्हते' असे म्हणणे योग्य आहे काय?

भारत

आपल्याशी सहमत त्या काळी देशाच्या पोलीटीकल बाउंडरीज नसायच्या पण ऐतिहासिक बाउंडरीज असायच्या व गांधार म्हणुनच त्या वेळच्या भारतवर्षाचा भाग होता.

http://rashtravrat.blogspot.com

गांधार

गांधार या देशाच्या सीमा साधारण हिंदुकुश पर्वतांच्या पूर्वेकडे व दक्षिणेला पेशावर पर्यंत पसरलेला होत्या असे वाटते. त्या कालात भारत अशी काहीच संकल्पना बहुदा नसावी. त्यामुळे गांधार भारताचा भाग नव्हते हे वाक्य बरोबरही आहे व चूकही आहे. नसलेल्या देशाचा भाग गांधार कसे असणार? ब्रिटिश कालात भारताच्या 1947 पूर्व ज्या सीमा होत्या त्यामधे गांधाराचा समावेश होता. मराठ्यांनी ज्या वेळेस अटकेपार आपल्या फौजा नेऊन पार खैबर खिंडीपर्यंत ठाणी बसवली होती. हा भाग मुघल बादशहाच्या राज्यातच मोडत होता. त्यामुळे या काळात सुद्धा गांधार हे भारताचाच भाग होता असे म्हणता येते.
हिंदू किंवा बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास गांधारातील तक्षिला येथे होत होता म्हणून हा भाग भारताचा भाग होता हा तर्क योग्य वाटत नाही. त्या कालात अफगाणिस्तानातील बामियान जवळ एक विशाल बौद्ध धर्माचा मठ होता व तेथे अध्ययन चालत असे. त्यामुळे काही अफगाणिस्तानला भारताचा भाग म्हणता येणार नाही त्याचप्रमाणे गांधारबाबतही म्हणता येते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

गांधार, नेपाळ, कंबोडिया, जावा

एक शंका आहे : 'गांधार भारतचा भाग नव्हते' यावर स्पष्टीकरण हवे आहे.
तसेही अलेक्झांडर आला त्यावेळी 'भारतवर्ष' ही संकल्पना 'आसेतुहिमाचल' अशी नव्हती. किंबहुना एकाच प्रकारचे तत्त्वज्ञान बाळगणारे लोक म्हणजे एक देश असतो याची
कल्पना फारच थोड्या लोकांना होती.

:-) हेच तर स्पष्टीकरण आहे. मी सांगायच्या आधीच तुम्ही देऊन टाकले. चंद्रशेखर यांचे स्पष्टीकरणही योग्य आहे. गांधार हे नेहमीच एक स्वतंत्र आणि वेगळे राज्य राहिले आहे. आसेतुहिमाचल अशी कल्पना मांडली तरी ती उत्तर-दक्षिण कल्पना आहे. पूर्व-पश्चिम आपण आपल्या सोयीनुसार वाढवत गेलो तर जावा आणि कंबोडियाही भारताचे हिस्से मानावे लागतील. बौद्ध धर्माचा प्रसार श्रीलंकेत झाला म्हणून श्रीलंकाही भारताचा भाग मानावा लागेल पण ही सतत वेगळी आणि स्वतंत्र राज्ये राहिली आहेत. अर्थातच, गांधार हा सीमाप्रदेश असल्याने तेथे सर्वत्र भारतीय संस्कृतीच्या खुणा मिळणारच. श्रीलंका, नेपाळ, कंबोडिया, थायलंड इथेही असेच आहे.

अगदी महाभारताचा विचार करायचे झाले तर गांधार हा दूरवरला देश. तिथली सून आणताना तिचा भाऊ सोबत येतो तो ती तिथे एकटी पडू नये म्हणून. अगदी तेव्हापासून गांधार हे वेगळे राज्य राहिले आहे. त्याचा अधिक भाग उत्तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील.

जर तक्षशीला गांधारात होती आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर तक्षशीलेत होत असे तर 'गांधार हे भारताचा भाग नव्हते' असे म्हणणे योग्य आहे काय?

स्वतः अलेक्झांडरला असे वाटत होते (म्हणजे त्याला जी माहिती पर्शियनांकडून मिळत गेली त्यावरून) की सिंधू नदी पार केली की जो प्रदेश लागतो तो इंडस/इंडिया. अंभीला एरियन तक्षशीलेचा राजा म्हणतो. गांधाराचा नाही.तक्षशीला ही सिंधूच्या पूर्वेला आहे त्यामुळे अलेक्झांडरला ती भारतात वाटते. अंभीच्या लोकांचे उल्लेखही (भाषांतरात) सतत तक्सलाइट्स असे केले गेलेले आहेत. यावरून तक्षशीला हे स्वतंत्र गणराज्य असावे असे वाटते. सिंधू ते झेलमच्या परिसरात अंभीचे राज्य होते. तसेही जेव्हा अलेक्झांडरच्या स्वारीचा विचार करावा लागतो तेव्हा तत्कालीन धारणांनाच लक्षात घेतलेले योग्य.

निदान अलेक्झांडरच्या वेळेस तरी गांधार हे एक संपूर्ण मोठे सलग राज्य नव्हते असे वाटते. तिथे अनेक क्षत्रपी होत्या असे दिसते म्हणजेच गांधार हा प्रदेश अनेक गणराज्यांत विभागला गेला होता. पुढे चंद्रगुप्ताने तक्षशीला आणि आजूबाजूच्या क्षत्रपी आपल्या अधिपत्याखाली आणल्या. त्या त्याच्या राज्याचा भाग झाल्या. मुघलांचे राज्य ही अफगाणिस्तानापर्यंत पसरले होते. ब्रिटिशांचे राज्यही. परंतु हे सर्व त्यांच्या राज्यांचे विस्तार झाले. भारत नाही.

त्यामुळेच 'हम सब एक हैं' = भारतवर्ष ही संकल्पना उदयाला आली. यादृष्टीने अलेक्झांडर भारतात आला नसता तर चंद्रगुप्त सम्राट झाला नसता असे म्हणणे योग्य आहे.

धन्यवाद. हेच म्हणायचे होते. :-)

कंदहार व गांधार

काही जुन्या इंग्रजी पुस्तकांच्यात अफगाणिस्तानमधील कंदहार शहर हे गांधार राज्यामधे होते असा उल्लेख आहे. गांधारवरूनच या शहराला हे नाव पडले असल्याचा उल्लेख आहे कदाचित प्रियाली ताई जास्त खुलासा करू शकतील

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

विशेष माहिती नाही

काही जुन्या इंग्रजी पुस्तकांच्यात अफगाणिस्तानमधील कंदहार शहर हे गांधार राज्यामधे होते असा उल्लेख आहे. गांधारवरूनच या शहराला हे नाव पडले असल्याचा उल्लेख आहे कदाचित प्रियाली ताई जास्त खुलासा करू शकतील

विशेष माहिती नाही पण कंदहार हे गांधारचे भ्रष्ट स्वरूप असल्याचे म्हटलेले आढळते. अशोकाचे शिलालेख कंदहारात सापडलेले आहेत त्यामुळे अर्थातच ते गांधारातील शहर होते पण गांधार हा प्रदेश बराच मोठा असावा.

अवघड आहे

अंभीला एरियन तक्षशीलेचा राजा म्हणतो. गांधाराचा नाही.तक्षशीला ही सिंधूच्या पूर्वेला आहे त्यामुळे अलेक्झांडरला ती भारतात वाटते.

गांधारची राजधानी तक्षशिला होती. तक्षशिला हे व्यापार आणि विद्येचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते.

-दिलीप बिरुटे

खरंच?

गांधारची राजधानी तक्षशिला होती. तक्षशिला हे व्यापार आणि विद्येचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते.

गांधारची राजधानी तक्षशिला कोणत्या राजाच्या काळात होती? त्या राजाने किती काळ तेथे राज्य केले? त्याच्या हातून ते राज्य गेले का? त्या राज्याची किती शकले पडली? की त्याने राज्यविस्तार करून त्या गांधाराला इतर भाग जोडले? वरली "अवघड" विधाने करण्यापेक्षा थोडी अधिक माहिती द्यावी. विशेषतः अंभीच्या राज्याची कारण आपण फक्त त्या काळाबद्दल आणि त्या राजाबद्दल बोलतो आहोत.

बाकी, अवघड कशामुळे आहे? ऐतिहासिक संदर्भ पचवणे कठिण जाते आहे की प्रियाली लोकांची दिशाभूल करत आहेत हे इतरांना पटवणे अवघड जाते आहे?

माफ करा

प्रतिसाद संपादित करण्यापूर्वीच आपला प्रतिसाद आला. मलाही हीच माहिती हवी आहे.

कोणीतरी अगदी तपशिलवार 'जनपद' 'महाजनपद' यांचा मागोवा घेऊन वेगवेगळ्या राजांची नावे, राजेमहाराजांचे प्रदेश (इ.स.पू पाचशेपर्यंत) आणि सध्याच्या भारतातील नकाशावर त्यांचे असलेले स्थान. यावर धागा काढा राव किंवा असेल तर कुठे नकाशा तो तरी द्या राव म्हणजे अंदाजपंचे चर्चा होणार नाहीत.

-दिलीप बिरुटे

आपण काढा

यावर धागा काढा राव किंवा असेल तर कुठे नकाशा तो तरी द्या राव म्हणजे अंदाजपंचे चर्चा होणार नाहीत.

आपण अवश्य धागा काढावा. मी फक्त अलेक्झांडरच्या वेळेस गांधाराची स्थिती कशी होती ते एरियनच्या इतिहासलेखनावरून मांडले आहे. आपण इतिहासाचा अभ्यास करता असे लिहिले तेव्हा आपल्याला अधिक माहिती असावी. ती आपण द्यावी, मलाही ती वाचायला आवडेल.

असो.

गांधाराची राजधानी पुष्कलावतीही होती. ती कोणत्या काळात/ कोणत्या राजाच्या अधिपत्याखाली होती त्याची विशेष माहिती नाही. मुघलांच्या काळातही राजधानी फतेहपूर सिक्रिला हलवण्याचे प्रयत्न झाले होते. तेव्हा राज्यांच्या राजधान्या आणि सीमा बदलत राहणे ही अवघड गोष्ट असू नये.

माहितीबद्दल आभार.

ऐतिहासिक संदर्भ पचवणे कठिण जाते आहे की.....

आपल्याकडे असलेल्या विदेशी लेखकांच्या मूळ लेखनातून माहिती येत आहे तेव्हा त्याच्या वाचनाचा आनंद आहे. मला कोणतेच संदर्भ पचवणे कठीण जात नाही.

प्रियाली लोकांची दिशाभूल करत आहेत हे इतरांना पटवणे अवघड जाते आहे ?
मला असे काही करण्याची गरज नाही. फक्त अन्य उपक्रमी जर इतिहास विषयाच्या निमित्ताने माहितीपूर्ण प्रतिसाद टाकत असतील तर लग्गेच उपप्रतिसाद टाकून खूप 'आश्चर्य व्यक्त करणे' 'हे तर माहितच नव्हते' 'हा प्रतिसाद गंभीर आहे' 'प्रतिसाद पुराव्यानिशी सिद्ध करा' असा धोशा लावल्याने माहितीपूर्ण प्रतिसाद टाकणा-याबद्दलच्या माहितीबद्दल अविश्वास निर्माण होऊ शकतो. तेव्हा इतरांबद्दल दिशाभूल होणार नाही याची काळजी तर आपणही घेतलीच पाहिजे.

अलेक्झांडर जेव्हा भारताकडे कूच करत होता. आजूबाजूच्या प्रदेशातील राजे खळखळ न करता शरणागती पत्करत होते त्याच्या पूर्वी काबूल नदीच्या परिसरात सिकंदर आणि अश्वकांचे युद्ध झाले अश्वकाच्या राणीने मोठी झुंज दिली. आणि याच अश्वकाच्या राणीकडे पायदळ आणि घोडदळांची संख्या खूपच होती म्हणे पोरसशी युद्ध करतांना अलेक्झांडरला हेच सैन्य कदाचित उपयोगी पडले असावे.

असो, आपल्या 'आमचा त्यांचा इतिहास' या समुदायात आमचा हा शेवटचा प्रतिसाद. उगाच किरकोळ कारणावरुन नव्या वर्षाच्या सुरुवातीला मला भांडण नको.

-दिलीप बिरुटे

हास्यास्पद

मला असे काही करण्याची गरज नाही. फक्त अन्य उपक्रमी जर इतिहास विषयाच्या निमित्ताने माहितीपूर्ण प्रतिसाद टाकत असतील तर लग्गेच उपप्रतिसाद टाकून खूप 'आश्चर्य व्यक्त करणे' 'हे तर माहितच नव्हते' 'हा प्रतिसाद गंभीर आहे' 'प्रतिसाद पुराव्यानिशी सिद्ध करा' असा धोशा लावल्याने माहितीपूर्ण प्रतिसाद टाकणा-याबद्दलच्या माहितीबद्दल अविश्वास निर्माण होऊ शकतो. तेव्हा इतरांबद्दल दिशाभूल होणार नाही याची काळजी तर आपणही घेतलीच पाहिजे.

विषय फक्त अलेक्झांडर आणि पुरुच्या लढाईबद्दल चालला असता पर्शियन राजे, इतर गणराज्ये वगैरे आणून त्यांची चर्चा येथे झाली पाहिजे असा उगीच धोशा लावणारे प्रतिसाद देणे आणि वर ही वरली वाक्ये लिहिणे. मूळ चर्चेत विषयांतर पुरे झाले. मूळ चर्चा संदर्भांनिशी चालली आहे तेव्हा आपण विधाने केल्यावर हे माहित नव्हते तेव्हा अधिक माहिती द्यावी किंवा पुराव्यानिशी सिद्ध करावे हे सांगणे आलेच. हीच उपक्रमाची पद्धत अहे. जर योग्य संदर्भ नसतील तर माहितीपूर्ण प्रतिसाद टाकणार्‍याने थोडे थांबून माहिती, संदर्भ गोळा करून प्रतिसाद टाकणे योग्य ठरते. उगीच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे करण्यात काय उपयोग? तेव्हा इतरांबद्दल दिशाभूल वगैरे हे हास्यास्पद आहे. जर एखादी गोष्ट माहित नसेल तर माहित नाही हे सांगणे योग्य असते, वाद वाढवत राहणे नाही. जे आपण येथे करत आहात. त्याचे कारण सहज कळून येते आहे.

अलेक्झांडर जेव्हा भारताकडे कूच करत होता. आजूबाजूच्या प्रदेशातील राजे खळखळ न करता शरणागती पत्करत होते त्याच्या पूर्वी काबूल नदीच्या परिसरात सिकंदर आणि अश्वकांचे युद्ध झाले अश्वकाच्या राणीने मोठी झुंज दिली. आणि याच अश्वकाच्या राणीकडे पायदळ आणि घोडदळांची संख्या खूपच होती म्हणे पोरसशी युद्ध करतांना अलेक्झांडरला हेच सैन्य कदाचित उपयोगी पडले असावे.

पुन्हा तेच. माझे दोन्ही लेख आणि चर्चा अलेक्झांडर-पुरु विषयावर आहे. काबूल नदीच्या परिसरात काय झाले त्यावर नाही. कोसल-अंग-मगधात काय झाले त्यावरही नाही. तेव्हा कृपया असले अवांतर प्रतिसाद देणे थांबवावे.

असो, आपल्या 'आमचा त्यांचा इतिहास' या समुदायात आमचा हा शेवटचा प्रतिसाद. उगाच किरकोळ कारणावरुन नव्या वर्षाच्या सुरुवातीला मला भांडण नको.

होप सो! आपल्याकडून यापुढे अवांतर प्रतिसाद दिले जाणार नाहीत असे मानते. भांडण मलाही नको पण कारण किरकोळ वाटत नाही. हवे असल्यास पार्श्वभूमी खरडवहीतून सांगू का?

प्राचीन भारतातील राज्ये

तुम्हाला हवी असलेली माहिती कदाचित या दुव्यावर मिळू शकेल असे वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

दुव्याबद्दल आभार.

चंद्रशेखर साहेब दुव्याबद्दल आभारी आहे. दुव्यावरील पुस्तकात प्राचीन भारतातील राज्याबद्दल माहिती मिळते का पाहतो. खरं तर मला सध्याच्या भारताच्या नकाशावर कोणी समजून सांगितले पाहिजे. उदा. 'कोसल' उत्तरप्रदेशातील अयोध्येच्या परिसरातील महाजनपद होते. कोसल,मगध,अंग या जनपदात सतत वैर होते. मग सध्याच्या भारताच्या नकाशावर त्यांचे प्रदेश त्यांच्या राजधान्या. प्रदेश कुठून कुठपर्यंत होते अशी उत्सूकता होती. अर्थात काळाच्या प्रवाहात राजे आणि त्यांचे प्रदेश सतत बदलते असल्यामुळे असा इतिहास समजून घेणेही कठीणच दिसते. असो, सध्या इतिहास चाळतोच आहे तेव्हा ती माहितीही मिळेल. आणि माहिती मिळाली की 'इतिहासाची केवळ मलाच खूप माहिती आहे' अशी संस्थळावर स्पर्धा करण्यापेक्षा मराठी विकिपिडियात भर घालू म्हणतो :)

-दिलीप बिरुटे

सहा सोनेरी पाने

प्रियाली आपला
लेख आवडला. सावरकरांच्या सहा सोनेरी पानांची आठवण करुन दिलीत मला तुम्ही. सहा सोनेरी पाने व त्यात लिहीलेला इतिहास वाचण्यासारखा आहे. तुम्ही वाचली असतीलच पण जर राहून गेले असेल तर वाचनिय आहे. पुरु व अलेक्झांडर चे संभाषणावर अजुन सावरकरांनी कसा प्रकाश पाडला आहे ते वाचण्यासारखे आहे. पहिल्या सोनेरी पानाच्या पान ८ पासुन पुढे लिहीले आहे. अर्थात त्या काळाच्या (स्वातंत्र्य लढा) दृष्टीकोनातून वाचले गेले पाहिजे.
राजेशघडसाडवी साहेबांचे विचार आवडले.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

सहा सोनेरी पाने

सहा सोनेरी पाने पूर्वी वाचलेले आहेच. सावरकर पृष्ठ आठ मुद्दे २४,२५ मध्ये जे म्हणतात ते परफेक्ट आहे. :-) दुव्याबद्दल धन्यवाद.

मिनिंगफुल!

नितिन थत्तेंशी सहमत आहे.

समग्र अलेक्झांडर वाचण्यास उत्सुक आहे.

बिपिन कार्यकर्ते

उत्तम लेख

लेख खूप आवडला.

होड्यांना होड्या जोडून, बहुधा त्या रश्शींनी एकत्र बांधून त्यावरून सैन्य नदी ओलांडून गेले असावे.
नावांचा दोरखंडांनी पूल बांधणे हेच खरे असावे. चंद्रगुप्तानंतरही शेकडो वर्षांनंतरही भागीरथीवर नावांचाच पूल बांधण्यासाठी दत्ताजी शिंदे यांनी सुरूवातीला नजीबाला जवळ केले असे दिसते. नजीबाने अर्थातच वेळकाढूपणा करून काम केले नाहीच.

अलेक्झांडर जसा वागला (राज्य परत करणे) ते औदार्य इतर कोणी दाखवले असेल असे वाटत नाही. पुरूला हरूनही त्याची सर्व जमीन परत मिळाली हे जरा आश्चर्यकारक वाटते. थोडे अवांतर होईल पण पानिपतानंतर अब्दालीनेही नंतर नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून भाऊ आणि विश्वासराव यांच्या मृत्युबद्दल खेद व्यक्त केला आहे असे वाचनात आले, तो स्वतः कंदाहारला परत गेला, पण सतलजच्या पलीकडील प्रदेश स्वतःकडेच ठेवला. दिल्लीकरांकडून (नजीब) दरसाल खंडणी मात्र वसूल करण्याची मसलत केली. या प्रकाराशी साधर्म्य राखणार्‍या या प्राचीन लढाईत अलेक्झांडरने असे राज्य देऊन टाकले असे कसे घडले असेल, असे वाटते. जिंकणार्‍यांच्या नेहमीच्या पद्धतींमुळे या कहाणीविषयी माझ्या मनात थोडी शंका आहे. अलेक्झांडरने पुरूला सोडून दिले असले तर त्याने आपले गेलेले राज्य परत मिळवले असेल का? का या 'मलहूस' मोहिमेमुळे अलेक्झांडरचे मन अधू झाले असेल आणि त्याने जमीन देऊन टाकली असेल?

 
^ वर