अलेक्झांडर आणि पुरु युद्ध - १

इतिहासकार हा स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या घटनांच्या नोंदी करत असतो किंवा इतरांनी लिहिलेल्या नोंदी वापरून इतिहास लिहून ठेवत असतो. हा इतिहास नमूद करताना तो नि:पक्षपाती असतो का या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थी यावे. महाभारतातील कौटुंबिक कलहाला जय नावाचा इतिहास समजले तरी तेथेही व्यासांनी पदोपदी जेत्या पक्षाला वरचढ स्थान दिलेले आहे. पुढे जनमेजयाच्या समोर वैशंपायनांनी कथा सांगितल्याने राजाला संतोष देण्यासाठी त्यात बरेच फेरफार केले असावेत अशी शंका अनेक तज्ज्ञांना येतेच. महाभारत युद्धाप्रमाणेच भारतीय भूमीवर जी पौराणिक-ऐतिहासिक महत्त्वाची युद्धे लढली गेली त्यात दाशराज्ञ युद्ध, मगध-कलिंगचे युद्ध, पानिपतावरील युद्धे अशा अनेक युद्धांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक युद्ध अलेक्झांडर आणि पुरु यांच्यात लढले गेले. या युद्धामुळे अलेक्झांडरच्या ज्ञात जग जिंकत पुढे सरकण्याच्या इच्छेला खीळ बसली. भारताची भूमी ग्रीकांच्या आक्रमणापासून वाचली. या युद्धात नेमके काय झाले हे जाणून घेण्याची इच्छा मला अनेक दिवस होती.

अलेक्झांडरच्या लहान आयुष्यातही इतका विस्तृत इतिहास भरलेला आहे की तो लिहित लिहित भारतापर्यंत पोहोचेस्तोवर अनेक लेखकांचा उत्साह गळून जातो असे वाटते. सोईस्कर रित्या याला पाश्चात्यांचा भारतीय दुस्वास असेही म्हणता येईल.

या चित्रात अलेक्झांडर पुरुवर स्वारी करताना दिसतो तर दुसर्‍या चित्रात विजयाची देवता नाइके अलेक्झांडरचा गौरव करताना दिसते. या दोन्ही नाण्यांवर कोणतीही अधिक माहिती किंवा लेखन नाही. यावरून हे नाणे अलेक्झांडरने पाडले की त्याच्या क्षत्रपाने याबद्दल साशंकता आहे.

कारण काहीही असो, ज्या अनेक लेखकांचे संदर्भ मी वाचले ते अक्षरशः दोन ते तीन पानांत अलेक्झांडरची भारतीय स्वारी पूर्ण करतात. मागे ऑलिवर स्टोन निर्मित अलेक्झांडर या चित्रपटातही हे असेच झाल्याचे लक्षात आले. तसाही हा चित्रपट इतिहासापेक्षा अलेक्झांडरच्या लैंगिकतेमुळे अधिक गाजला असला तरी चित्रपटात युद्धांचे चित्रण अतिशय सुरेख आहे. भारतीय युद्धाच्या चित्रणातही विशेषतः अलेक्झांडर पुरुच्या हत्तीवर स्वतः चाल करून जातो तो प्रसंग चित्तवेधक आहे. परंतु ऐतिहासिक दृष्ट्या त्यात अनेक त्रुटी आहेत. या प्रसंगात अलेक्झांडर हा कुशल सेनापती असला आणि सैन्याचे नेतृत्व करत असला तरी त्याने पुरुच्या हत्तीवर चाल करून जाण्याचे धाडस दाखवले असेल का असा प्रश्न मनात आला होता. कालांतराने मला ब्रिटिश म्युझियममधील अलेक्झांडरचे नाणे दिसले आणि त्यावर चित्रित हा प्रसंगही दिसला. तरीही विश्वास ठेवण्यास काहीतरी कमी पडते आहे असे वाटले म्हणून अलेक्झांडरचा सर्वात विश्वासार्ह इतिहास, एरियनचा "ऍनाबेसिस ऑफ अलेक्झांडर" चाळला.

लढाईकडे वळण्यापूर्वी एरियन आणि त्याच्या ग्रंथा विषयी थोडे.

एरियन

एरियनचा जन्म सन ८६ ते १६० दरम्यानचा. म्हणजेच अलेक्झांडर नंतर सुमारे चारशे-साडेचारशे वर्षांनंतरचा. अलेक्झांडरच्या कर्तृत्वामुळे प्रेरित होऊन त्याने स्वारीचा वृत्तांत लिहिला तरी त्यात राजाची स्तुती करणे असा हेतू दिसत नाही. अनेक संदर्भ वापरून, आपली टिप्पणी देऊन तो इतिहास समोर आणतो. त्याच्या लेखनात व्यक्तीपूजा (हिरो-वरशिप) केलेली दिसत नाही आणि तरीही अलेक्झांडरला "द ग्रेट" बनवण्यात या इसमाचा मोठा हात असल्याचे मानले जाते . अलेक्झांडरच्या काळात न जन्मता, प्रत्यक्ष इतिहासाचा साक्षीदार नसतानाही त्याने लिहिलेला इतिहास हा अलेक्झांडरविषयीचा सर्वात मोठा विश्वासार्ह स्रोत मानला जातो. हा इतिहास लिहिण्यासाठी एरियनने जे संदर्भ चाळले त्यात टोलेमीने लिहिलेला अलेक्झांडरच्या स्वारीचा वृत्तांत, ऍरिस्टोब्युलसने लिहिलेला इतिहास हे दोन अतिशय महत्त्वाचे संदर्भ आणि याशिवाय कॅलिस्थेनिसने लिहिलेला इतिहास, नीअर्कसचा इतिहास आणि अशा अनेक संदर्भांचा समावेश आहे. मेगॅस्थेनिसने लिहिलेला इंडिका हा ग्रंथ, फिलिपच्या मंत्र्याकडील नोंदी आणि अलेक्झांडरच्या पत्रांचा तो संदर्भ म्हणून वापर करतो.

टोलेमीच्या संदर्भांवर त्याचा सर्वात अधिक विश्वास आणि याचे कारण देताना एरियन म्हणतो की टोलेमी हा लहानपणापासून अलेक्झांडर सोबत वाढलेला, त्याच्या सोबत राहिलेला, स्वारीवर गेलेला आणि याहूनही महत्त्वाचे असे की टोलेमी पुढे स्वतः सम्राट झाला. अशा परिस्थितीत त्याने काही खोटे लिहून ठेवणे म्हणजे स्वतःच्या नावाला बट्टा लावून घेण्यासारखे आहे. टोलेमीने अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इतिहास लिहिला. तो लिहिण्याची त्याच्यावर जबरदस्ती नव्हती किंवा जे घडले त्यापेक्षा वेगळे लिहून त्याला त्यातून काही बक्षीस किंवा उत्पन्न मिळणार नव्हते. अशाच कारणांसाठी ऍरिस्टोब्युलसही एरियनला विश्वासार्ह वाटतो.

अर्थातच, एरियनच्या अभ्यासातील त्रुटी दाखवणारे निबंध आहेत परंतु अलेक्झांडरच्या इतिहासाचा सबळ स्रोत म्हणून आजही एरियनकडेच पाहावे लागते. त्याचे लेखन आज इतक्या कालावधीनंतर शाबूत असणे ही सर्वात महत्त्वाची बाब.

दुसर्‍या भागात युद्धाचे त्रोटक वर्णन केले आहे. या युद्धातील एरियनने दिलेले मनुष्यबळ किंवा मनुष्यहानी यांच्या आकड्यांविषयी अनेकांना शंका वाटते. किंबहुना, एरियनला स्वतःलाही शंका वाटते म्हणून तो टोलेमीवर विश्वास प्रकट करतो. मीही केवळ एरियनचे संदर्भ वाचून आकडे दिले आहेत. ते योग्य आहेत असा दावा नाही.


काही संदर्भः

टोलेमी - हा अलेक्झांडरचा लहानपणीपासूनचा मित्र. टोलेमी हा अलेक्झांडरचा अनौरस सावत्र भाऊ असावा असा अंदाज बांधला जातो. अलेक्झांडरच्या सर्व स्वार्‍यांत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याचे जे ४ मोठे भाग झाले त्यात टोलेमीने इजिप्तचे राज्य हस्तंगत केले. टोलेमीने अलेक्झांडरच्या स्वार्‍यांचा विस्तृत इतिहास लिहून ठेवला.

ऍरिस्टोब्युलस - अलेक्झांडरचा मित्र आणि विश्वासू. सैन्यात स्थापत्यशास्त्री किंवा अभियंता असे त्याचे पद होते. त्याने अलेक्झांडरला अनेक स्वार्‍यांत सोबत केली आणि इतिहासही लिहून ठेवला.

नीअर्कस - अलेक्झांडरचा सेनापती. भारतीय युद्धात त्याचा समावेश होता. भारताबद्दल त्याने लिहून ठेवलेल्या नोंदींचा एरियनने आपल्या इंडिका या ग्रंथात उपयोग केला.

मेगॅस्थेनिस
- चंद्रगुप्ताच्या दरबारातील सेल्युकस निकेटरचा राजदूत. त्यानेही भारतावर इंडिका हा ग्रंथ लिहिला होता.

कॅलिस्थेनिस - हा ऍरिस्टॉटलचा नातू. त्याने अलेक्झांडरवर लिहिलेला इतिहास हा इतिहास कमी आणि भाटगिरी अधिक प्रकारचा आहे. मात्र अलेक्झांडरने पर्शियन रीतीरिवाजांचा स्वीकार केल्यावर कॅलिस्थेनिसची भाषा बदलते. बहुधा यावरूनच त्याचे आणि अलेक्झांडरचे संबंध बिघडले आणि त्याला राज्यद्रोहाच्या आरोपांखाली तुरुंगात टाकण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.

ऑलिवर स्टोनच्या चित्रपटात वर्णन केलेला प्रसंग असा दिसतो.

चित्र क्र. १ विकीपिडीयावरून घेतलेले असून चित्र क्र. २ allmovietrivia.info येथून घेतले आहे.

क्रमश:

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्सुक!

भारतिय मनाला मोहवणारा सनातन विषय. वाचायला उत्सुक आहे.

बिपिन कार्यकर्ते

छान

छान विषय निवडलाय.
अनेक दिवसांनंतर आणि अनेक बाष्कळ चर्चांनंतर प्रियालीताईंची माहितीपूर्ण लेखमाला वाचायला मिळणार याचा फार आनंद झाला.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.

पार एक्सलन्स

फारच छान. पहिला भागच अतिशय माहितीपूर्ण, संदर्भासह व घटना आणि व्यक्ती यांना धरून केलेला, असल्याने अतिशय रोचक वाटला. पुढच्या भागाच्या अपेक्षेत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

धन्यवाद

सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.

एक रिक्वेस्ट - पुरू बद्दल देखील थोडी माहिती मिळाली असती तर बरे झाले असते, माझे इतिहास ज्ञान एवढे चांगले नाही म्हणून रिक्वेस्ट.

पुरुची माहिती

पुरुची माहिती दुसर्‍या भागात आहे तेवढीच एरियन देतो. त्यातील काही टिप्पणी माझी आहे परंतु यापेक्षा जास्त माहिती अलेक्झांडरच्या स्वारी वृत्तांतात नाही. त्यासाठी इतर लेखक (प्लुटार्क किंवा ऍरिस्टोब्युलस) चाळावे लागतील.

हो

हो ते वाचनात आले दुसऱ्या भागात, धन्यवाद.

भाषांतरकार

दोन्ही लेखांची क्वालीटी अप्रतिम.
इतिहास नावडता विषय आहे त्यामुळे सविस्तर प्रतिसाद देत नाही.
त्याकाळच्या भाषांतरकारांचे कौतुक् वाटते. अलेक्झांडर रशियन भाषेत बोलला असणार व पुरुला संस्कृत वजा पंजाबी येत असणार असे गृहीत धरले तर त्यांचा एकमेकांशी झालेला संवाद त्यांना कसा कळला असेल?
भाषांतरकार घाटावरचा असेल तर तो योग्य शब्दनिवडीबद्दल अडून बसला असता असेही वाटून गेले.

अलेक्झांडर रशियन भाषेत?

इतिहास तुमचा नावडता विषय आहे हे कळले पण अलेक्झांडर रशियन भाषेत बोलला असणार हे वाचून क्लीन बोल्ड झालो. अहो अलेक्झांडर मॅसेडोनियन होता.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

बघा मी म्हणालो नव्हतो

--अहो अलेक्झांडर मॅसेडोनियन होता.--
बघा मी म्हणालो नव्हतो?!, इतिसाहात मला गति नाही म्हणून! तो मॅसेडोनियन असेल आणि नसेलही. तो भारतेतर भाषेत बोलत होता हे नक्की.

आवडलं

इतिसाहात मला गति नाही म्हणून!

आपले म्हणणे पुराव्यानिशी सिद्ध करणारे मला नेहमीच आवडतात. :-) आता बिरुटेसर हे कधी सिद्ध करतात ते पाहण्यास उतावीळ आहे. ;-)

उतावीळ आणि कॉ बॉ ?

प्रतिसाद किंवा लेखनात हिरोडोट्स,टॉलेमी, प्लिनी, जस्टिन, डायमेकस, प्लुटार्क, डायोडोर्स, डायोनिसीयस,
अशी नावे आली म्हणजे एखाद्याला इतिहासलेखनाची खूप गती आहे, असे काही सिद्ध होत नसावे, असे वाटते. आम्ही आत्ता आत्ता तर इतिहास चाळू लागलो आहोत. :)

-दिलीप बिरुटे

हाहाहा!

आम्ही आत्ता आत्ता तर इतिहास चाळू लागलो आहोत. :)

ते लक्षात आलेच. :-) चला बरे झाले. निदान त्यामुळे मराठी भाषेची परवड संपून तिला बरे दिवस येतील असे वाटते.

चला

चला उपक्रमावर माहितीपुर्ण आणि चांगले लेख सुरु झाले. भाग १ - म्हणजे सुरुवात म्हणून सुंदरच - भाग एक - तोंडओळख :)


 
^ वर