अलेक्झांडर आणि पुरु युद्ध -२
अलेक्झांडर आणि पुरु युद्ध - १
भारतीय स्वारीचा वृत्तांत
एरियनच्या मते सिंधू नदी ही भारतातील महत्त्वाची नदी होय. त्याला गंगा नदीचीही माहिती आहे परंतु भारतात प्रवेश करतेवेळी सिंधू ही विस्तृत नदी लागत असल्याने किंवा अलेक्झांडर गंगेपर्यंत न पोहोचल्याने सिंधू नदीच त्याला महत्त्वाची वाटणे साहजिक आहे. सिंधू नदी ही नाइल आणि युफ्रेटिसपेक्षाही अधिक गाळ-माती वाहून नेते, तिला चांगला वेग आहे असे एरियन म्हणतो. सिंधू नदीचा वेग आणि खोली पाहता ग्रीक सैन्याने इतक्या कमी वेळात कायमस्वरुपी पूल बांधला नसावा असे त्याला वाटते. तसे ठोस संदर्भ त्याला मिळत नाहीत म्हणून तो म्हणतो की होड्यांना होड्या जोडून, बहुधा त्या रश्शींनी एकत्र बांधून त्यावरून सैन्य नदी ओलांडून गेले असावे.
सिंधू नदी ओलांडून अलेक्झांडर तक्षशीलेला पोहोचल्यावर तेथे त्याचे मानाने स्वागत झाले. आजूबाजूच्या प्रदेशातील अनेक राजांनी कोणतीही खळखळ न करता शरणागती पत्करली. त्यात अभिसार हा झेलमच्या पलीकडल्या डोंगरी प्रदेशातील राजा आणि त्याचा भाऊ यांची गणती होते. (अभिसार हा कश्मीर प्रांतातील राजा असावा. ) दक्षराज नावाचा राजाही अलेक्झांडरला सामील झाल्याचे दिसते. इथे तक्षशीलेचा पाहुणचार स्वीकारून, ग्रीक प्रथेप्रमाणे खेळांचे आयोजन करून आणि जनावरांचे बळी देऊन पूजा करून अलेक्झांडर झेलमच्या दिशेने पुढे निघाला. हे करताना त्याने शरणागत तक्षशीलेत आपला प्रांताधिकारी (व्हॉइसरॉय) नेमला आणि जखमी सैनिकांना सुश्रूषेसाठी मागे ठेवले. एव्हाना सुमारे पाच हजारी भारतीय सेना त्याला सामील झाली होती.
अलेक्झांडरच्या आगमनाची खबर लागल्याने झेलमच्या पैलतिरावर पुरुची सेना जमली होती. अलेक्झांडरला झेलम ओलांडू न देता, किंबहुना, तो त्या प्रयत्नांत असताना त्यावर हल्ला करायचा अशी पुरुची रणनीती होती. अलेक्झांडरने झेलम किनारी आपला तळ ठोकला. पैलतिरावर पुरुची प्रचंड सेना आणि हत्ती उभे ठाकलेले दिसत होते. पुरुने जेथून जेथून नदी पार करणे सहज शक्य आहे तेथे तेथे आपले तळ ठोकले होते. अलेक्झांडरच्या हे लक्षात आल्यावर त्याने सैन्याच्या लहान फळ्या करून सर्व बाजूने पसरण्याचा आदेश दिला. असे केल्याने पुरू चकीत होईल आणि आपली निश्चित निती पुरुला कळून येणार नाही असे त्याला वाटले पण पुरू सावध होता. अलेक्झांडरने सिंधू नदीत पुलासाठी वापरलेल्या आपल्या होड्या झेलमपाशी मागवल्या. हे करताना त्याने त्यातील मोठ्या होड्या कापून त्यांच्या लहान होड्या बनवाव्यात अशी सूचना दिली. ती अंमलात आणून मोठ्या होड्यांचे दोन किंवा तीन तुकडे करण्यात आले.
समोरासमोरून झेलममध्ये घोडे टाकून नदी पार करणे अलेक्झांडरला शक्य नव्हतेच. एकतर पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी दुथडी भरून वाहत होती आणि पुरुचे हत्ती समोर तयार होते. घोडे पाण्यात शिरल्यावर या हत्तींनी त्यांच्यावर चाल केली असती आणि ग्रीक सैन्याची तेथेच धूळधाण उडाली असती हे अलेक्झांडर जाणून होता. त्याने आपण पावसाळा संपून थंडी सुरू झाल्यावरच हालचाल करू अशी अफवा पसरवली परंतु या अफवेचा पुरुच्या सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही. नंतर अलेक्झांडरने वेगळी निती अवलंबली. ती म्हणजे, रात्रीच्या पोटात त्याने आपले थोडे घोडदळ नदीच्या वेगवेगळ्याठिकाणी पसरवणे पण मोठमोठ्याने प्रचंड आवाज आणि गाजावाजा करणे सुरू केले. असे केल्याने पुरुला वाटावे की अलेक्झांडर स्वारीला सज्ज झाला आहे आणि त्याचे सर्व घोडदळ नदी ओलांडायच्या प्रयत्नात आहे म्हणून त्यानेही आपले सैन्य त्या दिशेने पाठवावे आणि त्यामुळे अलेक्झांडरला मूळ ठिकाणी नदी पार करता यावी. परंतु पुरुला हा कावा कळून आल्याने ही नितीही फसली.
लवकरच अलेक्झांडरला सुगावा लागला की त्याच्या सैन्यतळापासून सुमारे १७ मैलांवर झेलम नदीत एक बेट आहे. तिथे नदी थोडी उथळ होते आणि बेटाच्या आडोशाने नदी ओलांडणे सोपे आहे. पुरुच्या नजरेसमोरून सैन्य हलवणे सोपे नव्हते. अलेक्झांडरने हळूहळू त्याचे अंगरक्षक, काही सेनापती आणि काही चिवट सैनिकांची फळी बाजूला काढली आणि मागे नेली. क्रेटेरस या आपल्या सेनापतीच्या आधिपत्याखाली मुख्य सैन्य ठेवून त्याने स्वतः लहान फळीचे नेतृत्व केले. किनाऱ्यापासून बरेच अंतर ठेवून ही फळी पुढे सरकू लागली. सिंधू नदीतून आणलेल्या ३० वल्ह्यांच्या होड्यांचे तीन तुकडे करण्यात आले होते. हे तुकडेही या फळीसोबत पाठवण्यात आले. झेलम काठच्या दाट झाडीचा उपयोग त्यांना आडोशासाठी झाला. झेलमच्या त्या बेटामागे ईप्सित स्थळी पोहोचण्याच्या आदल्या रात्री विजांचा चकचकाट आणि गडगडाट होऊन वादळी पाऊस झाला. या पावसामुळे पुरुचे सैन्य गाफील राहिले आणि अलेक्झांडरच्या सैन्याला सुखरूप वाटचाल करण्यास जागा मिळाली.
बेटापलीकडून सैन्य जेव्हा नदीत उतरले तेव्हा नदी उथळ असूनही झालेल्या पावसाने भरून वाहत होती. छातीपर्यंत येणाऱ्या पाण्यातून वाट काढत सैन्याने आगेकूच केली. हे करताना बेटालाच दुसरा किनारा समजून सैन्य बेटावर जमा झाले पण लवकरच चूक कळल्याने त्यांनी पुन्हा किनाऱ्याकडे वाटचाल सुरू ठेवली. या सैन्यात पर्डिकस, कोएनस आणि सेल्युकसचा समावेश होता. पुरुला ही बातमी कळताच त्याने आपल्या मुलाला सैन्यानिशी अलेक्झांडरचा सामना करण्यास पाठवले. येथील युद्धात नेमके काय झाले याबाबत एरियन साशंक दिसतो परंतु टोलेमीच्या संदर्भांवर तो अधिक विश्वास ठेवतो. टोलेमीच्या संदर्भाप्रमाणे १२० रथ आणि दोन हजारांचे घोडदळ घेऊन पुरुपुत्र अलेक्झांडरचा पाडाव करण्यास रवाना झाला. परंतु अतिवृष्टीमुळे चिखल झाला होता त्यात रथ रुतले आणि गोंधळ झाला. येथे पुरुला अलेक्झांडर स्वतः नदी पार करण्याचे वेडे साहस करेल अशी कल्पना नव्हती. अशा गदारोळात पुरुच्या मुलाचा पराभव झाला.
पुरुपुत्राला अलेक्झांडरच्या सैन्याने कापून काढले आणि पुरुच्या मुख्य तळाकडे मोर्चा वळवला. याचवेळी क्रेटेरसही नदीत उतरू लागला. पुत्राच्या मृत्यूची बातमी आणि दोन्ही बाजूंनी सरकणारे अलेक्झांडरचे सैन्य पाहून नेमकी कोणती युद्धनिती वापरावी हे पुरुला कळेना. शेवटी त्याने अलेक्झांडरच्या रोखाने सैन्य वळवण्याचे आदेश दिले. वळवलेल्या सैन्यात ३०, ००० चे पायदळ, ४००० चे घोडदळ, सुमारे ३०० रथ आणि २०० हत्ती होते. बाकीची सेना त्याने क्रेटेरसशी सामना करण्यासाठी ठेवली. जेथे चिखल झालेला नाही अशा ठिकाणी थांबून त्याने व्यूहरचना केली. या रचनेत हत्ती सर्वांत पुढे होते. या हत्तींना घाबरून शत्रूचे घोडदळ किंवा पायदळ पुढे सरकणार नाही असा पुरुचा अंदाज होता. हत्तींच्या मागे पायदळ होते. पायदळाला कोट करण्यासाठी बाजूने घोडदळ उभे केलेले होते. त्याच्या बाजूने रथ उभे होते. अलेक्झांडरचे घोडदळ पुरुपेक्षा मोठे होते परंतु हत्तींवर हल्ला करणे अशक्य होते त्यामुळे अलेक्झांडरने स्वतःच्या नेतृत्वाखाली उजवीकडून आणि कोएनसने डावीकडून हल्ला चढवला. तसेच ग्रीक तिरंदाजांनी हत्तीच्या माहुतांचा वेध घेण्यास सुरुवात केली. पलीकडून क्रेटेरसनेही पुढे सरकण्यास प्रारंभ केला. अनेक दिशांनी झालेल्या हल्ल्यांमुळे पुरुचे सैन्य अडचणीत सापडले. हत्ती बिथरून मागे फिरले आणि पुरूच्या सैन्याला चिरडून जाऊ लागले. ग्रीक सैन्याने यानंतर चोहोबाजूंनी हल्ला चढवला. या युद्धात पुरूचे बरेचसे घोडदळ मारले गेले आणि अगदी क्षुल्लक पायदळ जिवंत राहिले.
एरियनच्या सांगण्यावरून भारतीयांचे सुमारे २०,००० च्या आसपास पायदळ आणि ३ हजारांच्या आसपास घोडदळ युद्धात कामी आले. रथांची मोडतोड झाली. पुरुचे दोन पुत्र कामी आले. पुरुचे सर्व सेनापती, युद्धभूमीवरील प्रांताधिकारी, अनेक माहुत वगैरे कामी आले. अलेक्झांडरच्या सैन्यातील कामी आलेल्यांची संख्या मात्र एरियन अतिशय क्षुल्लक (काही शेकड्यांत) देतो. या गणितात एरियनचे काहीतरी निश्चितच चुकलेले आहे हे सहज लक्षात येते. तज्ज्ञांच्या मते टोलेमीचे संदर्भ एरियन वापरतो. यापेक्षा ऍरिस्टोब्युलसचे संदर्भ खरे वाटतात.
एरियन पुढे म्हणतो की अलेक्झांडर तीक्ष्ण नजरेने पुरुवर लक्ष ठेवून होता. आपल्या सैन्याचा पराभव होतो आहे हे कळून चुकल्यावरही पुरू माघारी फिरला नाही. तो आपल्या सैन्यासह शौर्याने लढत राहिला. सैन्य माघार घेते म्हटल्यावर काढता पाय घेणाऱ्या पर्शियाचा सम्राट दरायुषसारखा पुरू नाही हे लक्षात आल्याने अलेक्झांडरच्या मनात या राजाविषयी आदर निर्माण झाला. सरतेशेवटी पुरुच्या उजव्या खांद्याला मोठी जखम झाली आणि त्याचा हत्ती माघारी फिरला. अलेक्झांडरने हे पाहिल्यावर तत्काळ हुकूम सोडले की माघारी फिरणाऱ्या पुरुला कुणीही अधिक इजा पोहोचवू नये. पुरुशी वाटाघाटी व्हाव्यात म्हणून त्याने तक्षशीलेचा एक घोडेस्वार पुरुच्या हत्तीच्या दिशेने पाठवला. घोडेस्वाराने पुरुचा हत्ती गाठला तसे त्याला पाहून पुरुचा राग उफाळून आला आणि त्याने पुन्हा शस्त्र उचलले परंतु बरीच विनवणी केल्यावर तो शरण येण्यास तयार झाला.
पुरुरवा
पुरुरवाचा नेमका वंश इतिहासात नमूद नाही. त्याचे राज्य झेलमच्या पूर्वेला पसरलेले होते त्यावरून तो पूर्व पंजाबातील राजा मानला जातो. तक्षशीलेच्या राजा अंभीशी त्याचे शत्रुत्व असल्याने अलेक्झांडर तक्षशीलेस पोहोचला असता त्याला नजराणे पाठवण्याची किंवा मैत्रीचा हात पुढे करण्याची तसदी त्याने घेतलेली नव्हती. उलट, अलेक्झांडर पूर्वेला कूच करेल या अंदाजाने त्याने सैन्याची जमवाजमव केली होती. पावसाळा आणि ग्रीकांना हत्तीशी लढण्याचा अनुभव नाही या अंदाजांवर तो गाफील राहिला आणि ग्रीक सैन्याने संधी साधली. लढाईत पुरुच्या सैन्याची संख्या पाहिली (एरियनने ती वाढवून-चढवून सांगितली नसेल तर) तर तो कुणी मोठा राजा असावा असा अंदाज बांधता येतो. त्याच्या बाजूने इतर कोणते राजे लढले हे कळत नाही. त्याचे प्रमुख सेनापती कोण होते ते कळत नाही.
एरियन पुरुचे वर्णन करताना त्याची उंची "पाच क्युबिट" होती असे म्हणतो. यावरून पुरु सुमारे ६ फुटांपेक्षा अधिक उंच असावा असे वाटते. त्याचे दोन पुत्र युद्धात कामी आले यावरून तो किमान मध्यमवयीन असावा असे दिसते. एरियनच्या सांगण्यावरून पुरू दिसायला अतिशय रुबाबदार असून शरणागत पुरू अलेक्झांडरला भेटायला आला असता त्याच्या चेहऱ्यावर भीती किंवा पराभव दिसत नव्हता. ते पाहून ग्रीक सैन्य अचंबित झाले. पुरुला येताना पाहून अलेक्झांडर स्वतः सैन्याच्या पुढे जाऊन स्वागतासाठी उभा राहिला. अलेक्झांडरने स्वतःहून बोलायला सुरुवात केली आणि पुरुला प्रसिद्ध प्रश्न विचारला.
"राजा, मी तुला कसे वागवू? " पुरुने बाणेदार उत्तर दिले, "हे अलेक्झांडर, मला राजासारखेच वागव. "
यावर अलेक्झांडर उत्तरला, " मी माझ्या मनाच्या समाधानासाठी तुला राजासारखेच वागवेन पण तू तुझे समाधान व्हावे म्हणून काहीतरी माग. "
त्यावर पुरू म्हणाला, "मी प्रथमतः जे मागितले त्यातच सर्व आले. "
अलेक्झांडरने पुरुला त्याचे जेवढे राज्य होते ते मानाने परत करून राज्याचे क्षत्रप बनवले तसेच कश्मीरचा भागही पुरुच्या आधिपत्याखाली दिला.
या युद्धातील अलेक्झांडरच्या हानीची संख्या एरियनने दिलेल्या आकड्यांपेक्षा बरीच अधिक असावी. ग्रीक सैन्याला भारतीय भूमीवर युद्ध लढायचा अनुभव नसणे, पावसाळी वाईट हवामान, हत्तींचा सैन्यातील समावेश वगैरेंने त्रस्त होऊन त्यांनी कोएनसतर्फे परतण्याची विनंती अलेक्झांडरला केली. ती नाराजीने का होईना अलेक्झांडरला मानावी लागली. या युद्धानंतर (किंवा युद्धात) झालेला ब्युसाफलसचा मृत्यू वगैरे अलेक्झांडरचा निग्रह तोडण्यास हातभार लावून गेले असावेत.
अलेक्झांडर आणि पुरुच्या लढाईत अलेक्झांडर ऐवजी पुरुचाच विजय झाला असे तर्क अनेकांनी मांडलेले आढळतात. या तर्कांना अद्यापतरी तज्ज्ञांच्या लेखी अधिष्ठान मिळालेले नाही परंतु लढाईत पराभव होऊनही स्वतःचे राज्य परत मिळणे, सोबत दुसरे राज्यही पदरात पडणे, ज्या परदेशी सम्राटाने विजय मिळवला त्याचा त्या राज्यात/ देशात स्थायिक होण्याचा हेतू नसणे, इथपासून अलेक्झांडरचे माघारी फिरणे, पुढील काही वर्षांत त्याचा मृत्यू इ. मधून पुरुचा पराभव झाला तरी अंतिम विजय पुरुचाच झाला असे वाटणे शक्य आहे असे वाटते.
वरील लेखात विस्तार भयास्तव युद्धाचे वर्णन त्रोटक केले आहे. हा लेख लिहिताना एरियन खेरीज इतर कोणत्याही इतिहासकाराचे भारतीय युद्धाविषयक संदर्भ तपासलेले नाहीत. लेखासंबंधात प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांतून देता येतीलच. वाचकांकडे अधिक माहिती असल्यास अवश्य पुरवावी. एरियनने लिहिलेला अलेक्झांडरच्या स्वारीचा वृत्तांत गूगलबुक्स वरून उतरवून घेता येईल.
लेखातील चित्रे विकीपीडीयावरून घेतली आहेत.
Comments
माहितीपूर्ण
लेख आवडला.
विशेषतः युद्धभूमीचे वर्णन आणि चित्र आवडले. झेलम नदीतील बेट, पुरु थांबलेली उताराची जागा यांचा आता भौगोलिक संदर्भ आता पुसला गेला असेल. तरीही या ठिकाणाचा गुगल अर्थ वरून शोध घ्यावासा वाटला. काही खुणा अजून मिळाल्या तर कदाचित घेता येईल.
टॉलेमी आणि अलेक्झांडर यांच्या विषयी वाचून नवीन माहिती मिळाली. यापूर्वी मी टॉलेमी (वंश) तदनंतरचा समजत होतो. दोघांचा संबंध आणि नंतर टॉलेमीचे इजिप्त मधील राज्य, अलेक्झांड्रिया यांचा संबंध याची माहिती निमित्ताने कळली.
प्रमोद
+१
असेच म्हणतो, माहितीपुर्ण लेख आवडला.
-Nile
युद्धाची जागा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
या युद्धानंतर अलेक्झांडरचा घोडा ब्युसाफलस मेला. त्याच्या स्मरणार्थ आणि युद्धाच्या स्मरणार्थ अलेक्झांडरने दोन शहरांची निर्मिती केली. त्यापैकी जे शहर युद्धभूमी जवळ निर्माण केले ते हे असावे असे विकी संदर्भ म्हणतो.
अगदीच पुढे जाऊन जागा शोधायची झाल्यास इतकी मोठी युद्धे सपाट भूमीवर लढली जात. मी टाईम कमांडर्स म्हणून एक सिरिअल बघत असे त्यानुसार झेलम तिरावर सपाट भूमी युद्धासाठी निवडली गेली होती असे म्हटले होते. या सर्व संदर्भांवरून युद्धाची जागा शोधता यावी.
अलेक्झांडर हा स्वतः इजिप्तचा फॅरो होता. त्यानंतर टोलेमीकडे सत्ता आली. इजिप्तची लेडी फॅरो क्लिओपात्रा ही टोलेमीच्या घराण्यातीलच.
असेच.
असेच. लेख फार आवडला. ह्या प्रतिसादात एवढेच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
संदर्भ
मध्यंतरी मी Envy of the Gods by John Prevas, Published by De Capo Press (Perseus Books) हे पुस्तक माझ्या वाचनात आले होते. अलेक्झांडरच्या मोहिमेचा अतिशय निष्पक्षपाती विचार करणारे हे पुस्तक मला खूपच आवडले होते. दिवाळी अंकात पारसा शहराबद्दलचा लेख लिहिताना या पुस्तकातून बरेच संदर्भ मला मिळाले होते. या लेखात वर्णन केलेल्या पुरू बरोबरच्या युद्धाबद्दल आणखी काही संदर्भ या पुस्तकात कदाचित मिळू शकतील.
प्रियालीताईंच्या लेखाचा दुसरा भागही पहिल्यासारखाच उत्कृष्ट आहे. अचूक व मोजकी माहिती, नकाशे यांनी लेखातून खूप माहिती मिळाली व एकूणच मजा आली. माझी त्यांना विनंती की त्यांनी अलेक्झांडरच्या संपूर्ण मोहिमेबद्दलच एक लेखमाला लिहावी.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
अलेक्झांडरच्या मोहिमा
संदर्भासाठी धन्यवाद. मला हे पुस्तक मिळाले तर मी अवश्य वाचेन.
१. अथेन्स, थेबेसवरील स्वारी
२. ग्रेनायकसची लढाई
३. आयससची लढाई
४. टायर आणि गाझाचा वेढा
५. गागामेलाची लढाई
६. पुरुशी युद्ध
वगैरे या मोठ्या लढाया. याशिवाय अनेक लहान लढाया आणि चकमकी आहेत. अलेक्झांडरचे पूर्ण जीवनच लढायांनी भरलेले, मी लिहिताना थकणार नाही कारण अलेक्झांडर हा माझा प्रिय विषय आहे पण वाचक कंटाळतील. :-)
प्रतिसादासाठी आणि प्रशंसेसाठी आभारी आहे. तुम्हाला हे लेख आवडतील असा अंदाज होताच.
छान
दोन्ही लेख छान. या विषयावर इतकी विस्तृत माहिती पहिल्यांदाच वाचनात आली.
चंद्रशेखर यांच्याशी सहमत आहे. पूर्ण मोहिमेवर लेखमाला वाचायला आवडेल.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
सहमत
आहे. दोन्ही लेख आवडले. अलेक्झांडरच्या इतर मोहीमांची माहिती देणारी लेखमाला वाचायला आवडेल.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा!
हिस्ट्री चॅनलेवर 'एन्शंट बॅटल्स' कार्यक्रम असतो त्याची आठवण झाली!
द आर्ट ऑफ बॅटल . कॉम संकेतस्थळावर ही तसेच अन्य युद्धांची छान माहीती आहे.
अजुन असेच वेगवेगळे युद्धलेख येउ दे.
अलेक्झांडर-पुरु संवाद
तुम्ही दिलेल्या धाग्यावर ५ रोचक आर्ग्युमेंट्स आहेत. त्या थोड्याशा बाळबोध आहेत पण त्यातला एक प्रश्न असा की अलेक्झांडर आणि पुरु संवाद घडलाच कसा? त्यांना एकमेकांची भाषा तर येत नव्हती. :-)
याचे उत्तर असे की त्यांना एकमेकांची भाषा येत नव्हती म्हणूनच जेव्हा पुरु परत चालला होता तेव्हा अलेक्झांडरने तक्षशीलेच्या दूतास पाठवले कारण तो भारतीय भाषेत पुरुची समजूत काढू शकेल. या दूताला पाहून पुरु चवताळला कारण तक्षशीला ही पुरुची शत्रू होती. तरीही हा दूत समजूत काढण्यात यशस्वी ठरला. त्यावरून पुरु-अलेक्झांडर संवाद हा दुभाष्यामार्फतच झाला.
छान
दोन्ही भाग आवडले.
(बर्याच काळानंतर उपक्रमावर काही मीनिंगफुल वाचल्याचे समाधान लाभले)
नितिन थत्ते
+१
मलाही दोन्ही भाग आवडले. आभारी आहे.
'पुरुराजा' चे नाव काही ठिकाणी (विशेषतः हिंदीभाषिकांत) 'पोरस' असे म्हटले/लिहिले जाते. योग्य उच्चार कोणता?
पोरस
पुरुरवा हे खरे नाव. पुरु हा अर्थातच शॉर्टफॉर्म.
पोरस हे हिंदीतील नाव नसून तो ग्रीक उच्चार आहे. मला ग्रीक भाषा ही ग्रीकच असल्याने ते नावांमागे स हा प्रत्यय का जोडतात ते माहित नाही (कदाचित आदरार्थी संबोधन असावे. आपल्याकडे जी, राव, पंत प्रमाणे [अंदाजपंचे] ;-))परंतु त्यानुसार पुरुचे पोरस होते. याचप्रमाणे अलेक्झांडरला ग्रीकमध्ये अलेक्झांद्रोस असे संबोधले जाते. लेखातील इतर नावे नीअर्कस, क्रेटेरस, कोएनस, पर्डिक्कस, ऍरिस्टोब्युलस वगैरे वाचली तर हे लक्षात येईल. :) टोलेमीचे ग्रीक नाव टोलेमस.
एरियनचे संपूर्ण ग्रीक नाव ल्युसिअस फ्लाविअस एरायनस असे आहे.
अच्छा !
माहितीबद्दल धन्यवाद.
पर्वतेश्वर
पूर्वी दूरदर्शनवरच्या चाणक्य मालिकेत पुरु चे नाव तर पर्वतेश्वर सांगितले आहे.. खरे कोणते मग कोन् जाणे..
नाव
त्यात अलेक्झांडरचे नावही अलक्षेन्द्र सांगितले आहे.
नितिन थत्ते
पर्वतेश्वर| सुधारणा
वर पुरुचे नाव पर्वतेश्वर असल्याचे सांगितले असल्यास ते अगदीच चुकीचे नाही. तसा एक प्रवाद आहे. या प्रवादाचे कारण मुद्राराक्षस हे विशाखादत्ताचे नाटक आहे. त्यात चंद्रगुप्ताच्या मदतीला पर्वतेश्वर नावाचा राजा येतो. पुढे त्याचा विश्वासघाताने मृत्यू होतो आणि त्याचा मुलगा मलयकेतू राजा बनतो.
ग्रीकांच्या इतिहासात पोरसचा मृत्यूही विश्वासघाताने झालेला दिसतो. (मला आता नक्की आठवत नाही पण मुद्राराक्षसात तो विषप्रयोगाने होतो तर ग्रीकांच्या इतिहासात बहुधा पिसाळलेल्या हत्तीच्या तुडवण्याने*. चू.भू.द्या.घ्या. मी शोधून कळवते.) त्याच्या मुलाचे नाव ग्रीक इतिहासानुसारही मलयकेतूसदृश असल्याने पर्वतेश्वर हाच पुरु असावा असा संकेत दिसतो.
तरीही, मुद्राराक्षस हे नाटक विशाखादत्ताने चंद्रगुप्तानंतर अनेक शतकांनी लिहिल्याने, ते नाटक असल्याने त्यातील कथा नाटकीय स्वरूप देण्यासाठी त्यात अनेक बदल केल्याची शक्यता आहे.
------------
* वर तपशिलात चूक होती. इ.स.पूर्व ३१७ मध्ये अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांमध्ये लढाया सुरू झाल्या. त्यापैकी पर्शियातील पैथिऑन या सेनापतीने पूर्वेकडे मजल मारली. पूर्वेला जे सेनापती किंवा विश्वस्त होते त्यात पुरु होता आणि युडेमस नावाचा सेनापती होता. युडेमसला युद्धात हत्तींची गरज होती पण पुरुने त्याला देण्यास नकार दिला. त्यावरून युडेमसने पुरुचा विश्वासघाताने काटा काढला.
अवांतरः कलर्स च्यानेलवर वीर शिवाजी ही सिरिअल आणि इमॅजिनवरील चंद्रगुप्त ही सिरिअल अशाच प्रकारे हवा तसा मीठ मसाला पेरून बदलल्या आहेत.
जगज्जेता
अशोक व्हटकर यांचे जगज्जेता पुस्तक आहे अलेक्झांडर वर. .
धन्यवाद
हा लेख जास्त छान, कदाचित लढाईचे रंजित वर्णन असल्यामुळे असेल पण माहितीप्रद आणि उत्तम. धन्यवाद. :)
शंका
परत एकदा लेख वाचल्यावर हि गोष्ट थोडी खटकली ती शंका म्हणून विचारात आहे. आपणही त्याबाबत लेखात थोडेसे लिहिले आहेच.
>>अलेक्झांडरने पुरुला त्याचे जेवढे राज्य होते ते मानाने परत करून राज्याचे क्षत्रप बनवले तसेच कश्मीरचा भागही पुरुच्या आधिपत्याखाली दिला.
>>ग्रीक सैन्याला भारतीय भूमीवर युद्ध लढायचा अनुभव नसणे, पावसाळी वाईट हवामान, हत्तींचा सैन्यातील समावेश वगैरेंने त्रस्त होऊन त्यांनी कोएनसतर्फे परतण्याची विनंती अलेक्झांडरला केली. ती नाराजीने का होईना अलेक्झांडरला मानावी लागली.
हि कारणे किवा ब्युसाफलसचा मृत्यू हे कारण सुद्धा एक जगज्जेत्याला मागे फिरावयास भाग पडेल असे पटत नाही, कारण भारतापर्यंत येईपर्यंत एकूणच हवामान फार चांगले होते व नंतर ते खराब झाले असे नाही, तो जिंकला होता तर पुरूचा यथोचित पाहुणचार घेऊन तो पावसाळा टाळून मग पुढील स्वारी करू शकला असता. आणि केवळ पुरू बाणेदारपणे उत्तर देतो म्हणून भारावून जाऊन जिंकलेले राज्य देणे म्हणजेही जरा जास्तच आहे, इतिहासात अशी उदाहरणे नाहीच किंवा विरळ असतील. कदाचित हा तर्क पटत नसल्याकारणे पुरू जिंकला होता असे काही ठिकाणी आढळत असेल.
चांगली शंका
अलेक्झांडरचा मनसुबा तसाच होता परंतु त्याच्या सैन्याचा तसा नव्हता. ग्रीस सोडून त्यांना कित्येक वर्षे उलटली होती. अनेकांना घरी परतायची ओढ लागली होती. परंतु गोष्ट इतक्यावर थांबत नाही. अलेक्झांडरच्या ओरिजिनल प्लॅनमध्ये (मराठी गंडलं..क्षमस्व!) भारतावर स्वारी नव्हती. आपल्या पूर्वजांच्या पराभवाचा बदला म्हणून पर्शियावर स्वारी आणि पर्शियन साम्राज्याचा अस्त एवढेच त्याचे आणि त्याच्या सैन्याचे लक्ष्य होते. परंतु नंतर अलेक्झांडरने मनसुबे बदलून पूर्वेकडे जाण्यास तयारी केली. अर्थातच हे सैन्याला पसंत नव्हते. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी की अलेक्झांडरने पर्शियात राहून पर्शियन रीतीरिवाजांचा स्वीकार केला, बॅक्ट्रियन टोळीप्रमुखाच्या मुलीशी लग्न केले. ग्रीकांसाठी या कमीपणा आणणार्या गोष्टी होत्या. यामुळे सैन्यात बंडाळी माजण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. कॅलिस्थेनिसचा मृत्यू हा या बंडाळीतलाच एक भाग.
भारताचा विचार केला तर भारतापर्यंत हवामान हे चांगले होते हे खरेच आहे. भारतासारखा मुसळधार पाऊस, चिखल, पूर हे त्यांना पर्शियात लागले नाही. सर्वदूर पसरलेल्या मैदानी प्रदेशात लढाया लढल्या गेल्या. भारतात हे सर्व गणित बदलले. हत्तींशी लढाई, उंचसखल जंगली प्रदेश, शत्रूची अजिबात माहिती नसणे वगैरेंने ग्रीक सैन्य त्रस्त झाले. पुरुशी झालेल्या युद्धानंतर ग्रीक सैन्य लगेच परतलेले नाही. त्यानंतरही अनेक लढाया आणि चकमकी घडल्या (उदा. संगाला किंवा सियालकोटची लढाई, मूषक आणि शंभू या राजांशी चकमकी वगैरे) परंतु त्यातून हेच दिसले की भारतभूमीवर लढणे सोपे नाही.
नव्हे, केवळ बाणेदार उत्तराने नव्हे. अलेक्झांडर हा कुशल सेनापती होता. परक्या भूमीवर, परक्या लोकांवर ग्रीक प्रांताधिकारी आणि मूठभर सैन्य ठेवले असते तर ते काय राज्य करते? अशा स्थितीत कधीच बंडाळी माजून कधीच सत्ता हातातून गेली असती. त्यापेक्षा पराजित राजाला आपला क्षत्रप बनवून त्यावर देखरेख करायला आपले प्रांताधिकारी ठेवणे ही कधीही उत्तम निती होती. युद्धातून पुरु हा निधड्या छातीचा आणि आपल्या कर्तव्याशी दक्ष दिसतो. त्याने अलेक्झांडरचा विश्वासघात करण्याची शक्यता कमी असावी. राज्य परत दिल्याने पुरु अलेक्झांडरला मिंधा राहिला.
मान्य
>>अलेक्झांडरच्या ओरिजिनल प्लॅनमध्ये (मराठी गंडलं..क्षमस्व!) भारतावर स्वारी नव्हती. आपल्या पूर्वजांच्या पराभवाचा बदला म्हणून पर्शियावर स्वारी आणि पर्शियन साम्राज्याचा अस्त एवढेच त्याचे आणि त्याच्या सैन्याचे लक्ष्य होते. परंतु नंतर अलेक्झांडरने मनसुबे बदलून पूर्वेकडे जाण्यास तयारी केली.
हे पटू शकते.
काही गोष्टी पटतात पण अशा त्रस्त परिस्थितीत दुसऱ्याच्या (पुरुसारख्याच्या) गल्लीत जाऊन त्याला हरवणे हा केवळ एक योगयोग किंवा खाली प्रा. म्हणतात त्याप्रमाणे फंदफितुरी /राज्यांतर्गत कलह हे देखील एक कारण असू शकेल काय? अन्यथा जर अलेक्झांडर अतीपराक्रमी होता म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील तो जिंकला हे विधान केले तर ह्या लढाईनंतर लगेच त्याचे किंवा सैन्याचे मन बदलले हे पटत नाही, पण कदाचित ही शेवटची लढाई असे त्यांनी आधीच ठरवले असू शकेल, तरी देखील आपण दिलेली उदाहरणे काही अंशी पटण्यासारखी आहेतच.
मनसुबे
मला वाटते तुमचा प्रतिसाद येण्यापूर्वी मी माझा प्रतिसाद थोडा संपादित केला होता. पुरुची लढाई ही भारतातली शेवटची लढाई नाही. पुरुशी लढाई ही शेवटची मोठी लढाई. अलेक्झांडर त्यानंतरही अनेक लढाया खेळला परंतु भारतीय भूमीवर लढणे सोपे नाही हेच जाणवले.
अलेक्झांडरला बियास पार करून गंगेपर्यंत मजल मारण्याची मोठी मनिषा होती परंतु ही इच्छाच त्याच्या सैन्याचे मनोधैर्य खच्ची करून गेली कारण "हा थांबणार कुठे? आणि हे सर्व कशासाठी सुरु आहे?" असे प्रश्न त्यांना भेडसावू लागले. सैन्याच्या गोटांतून परत फिरण्याचा निर्णय अनेकांनी व्यक्त केला आणि पुढे तो अलेक्झांडरला कळवला. याप्रसंगी अलेक्झांडरने सैन्यासमोर केलेले भाषण प्रसिद्ध आहे...पण ते नंतर कधीतरी. शेवटी नाइलाजाने अलेक्झांडर माघारी फिरला.
अलेक्झांडरला लागल्यास अंभीची सेना हवी होती. आपल्या जखमी सैनिकांची सुश्रूषा हवी होती. सैन्याची काळजी घेणारे एक ठिकाण हवे होते. अंभीला मदत करून पुरुचा पाडाव अंभीसाठी करणे हे त्याचे ध्येय नव्हते. अलेक्झांडर लढाई स्वतःसाठी लढला. अंभीसाठी नाही.
हां
हां हे आता पटण्यासारखे आहे :). अतिशय छान माहितीबद्दल धन्यवाद. असेच अजून छान लेख येउद्या. :)
छान. पण....
इतिहासाची ओळखच नसलेल्यांना कदाचित दोन्हीही भाग खूप माहितीपूर्ण वाटू शकतात. पण माझ्यासारख्या नुकत्याच इतिहासाची गोडी लागलेल्या वाचकाची मात्र सदरील लेखांनी घोर निराशा केली, हे नम्रपणे नमुद करावे लागते. अलेक्झांडर द ग्रेट ची थोडी ओळख होतीच. पण इंडो-ग्रीकांच्या आक्रमणांच्या इतिहासवजा लेखनात ब-याच ठिकाणी भारतावर आक्रमण करणा-या सायरस,दारियस, वगैरे नावानंतर अलेक्झांडरचे नाव घेतल्या जाते. वरील लेखन फारसे नवीन नसावे,नाही. वरील वर्णनात आलेले लेखन 'झेलमचे युद्ध' म्हणून महाविद्यालयीन पातळीवरील अभ्यासक्रमात परिचित आहेच. एक गोष्ट लेखाच्या निमित्ताने सांगावे वाटते की, तक्षशिलेचा राजा अंभी व पोरस [पोरस हिंदी की मराठी ते नंतर ठरवूया] यांचे वैमनस्य होते. तेव्हा अलेक्झाडंरच्या मदतीतीने पोरसचा पराभव करावा ही योजना अंभीच्या मनात होती. [संदर्भ नाहीत] त्याप्रमाणे अलेक्झांडरच्या मदतीने एका भारतीय राजाने दुस-या भारतीय राजाच्या पाडावासाठी परकीय राजाची मदत घेण्याचा प्रसंग पहिलाच असावा असे इतिहासकार म्हणतात.
असो, अलेक्झांडर जेव्हा सिंधू नदी पार करुन तक्षशिलेला पोहचला तेव्हा अंभीने त्याचे स्वागत केले. अंभीच्या मांडलिक राजांनी विविध नजराने देऊन त्याचे मांडलिकत्त्व स्वीकारले. मात्र स्वाभिमानी पोरस राजाने मांडलिकत्त्व स्विकारण्यास नकार दिला. पुढे युद्धप्रसंगी पावसामुळे व जी काही अन्य कारणे असतील त्यामुळे पोरसचा निभाव लागला नाही या कारणाबरोबर राजा पोरसचे शौर्य, बाणेदारपणा किंवा पराक्रम पाहून अलेक्झांडरने पोरसला सोडून दिले त्यापाठीमागे काही कारण असावे [जो इतिहास मला माहित नाही. त्याबद्दल लेखन असते तर खूप आनंद झाला असता] जसे पोरसच्या राज्यातील लोक उठाव करतील वगैरे हेही कारण असावे. खरे म्हणजे लेखाच्या निमित्ताने पोरस व सिकंदर यांच्यात जी 'प्रश्नोत्तरे' झाली त्याबद्दल काही अधिक माहिती मिळाली असती तर मला या लेखनाने वेगळा आनंद वाटला असता.
असो, तरीही इतिहासातील काही घटनांची ओळख करुन दिल्याबद्दल लेखिकेचे मनःपूर्वक आभार मानले पाहिजे, तेव्हा लेखनाबद्दल मनःपूर्वक आभार.
-दिलीप बिरुटे
अं?
सायरस आणि दरायसने भारतावर स्वारी कधी केली?
लेखात स्पष्ट लिहिले आहे की लेख एरियनच्या संदर्भांवरून घेतला आहे. कृपया, प्रतिसाद लिहिण्यापूर्वी लेख पूर्ण वाचावा. :-)
वेळ द्या.
>>>सायरस आणि दरायसने भारतावर स्वारी कधी केली?
च्यायला, आपलाही इतिहास आमच्यासारखाच दिसतो. :)
सायरस आणि दारियस अलेक्झांडरच्या आधी की नंतर आणि त्यांनी गांधार की पंजाबचा काही प्रदेश जिंकला होता ते पुस्तक वाचून सांगतो. वेळ द्या. :)
-दिलीप बिरुटे
सायरस आणि दरायस
सायरस हा अलेक्झांडरच्या आधीचा. दरायस पहिला आणि दुसरा अलेक्झांडरच्या आधीचे. दरायस तिसरा अलेक्झांडरला समकालीन. गांधार हा भारताचा भाग नाही. :-) पंजाबपासून पुढे भारत असे ढोबळमानाने मानले जाते. सायरसने भारतावर स्वारी केल्याचे मला आठवत नाही. चू. भू द्या घ्या. सायरसचे राज्य भारतीय सीमेपर्यंत पसरलेले असू शकेल.
लॉक करतो
आपण प्रतिसाद बदलू नये म्हणून प्रतिसाद उद्यापर्यंत लॉक करतो. :)
सायरसने भारतावर स्वारी केली होती असे वाटते.
-दिलीप बिरुटे
अवश्य
अवश्य वेळ घ्या. किंबहुना, सायरसच्या भारतीय स्वारीवर स्वतंत्र लेखही चालेल. :-) वाचायला आवडेल.
बायदवे, सायरस (कुरुश) आणि दरायस (दरायुष) हे दोघे पर्शियन राजे. इंडो-ग्रीक स्वार्यांशी त्यांचा खास संबंध नाही. अलेक्झांडर आणि पुरु युद्धाशी तर अजिबात नाही. ;-)
कुरुश व दरायुष
या पर्शियन सम्राटांनी भारतावर स्वारी केल्याचे मीही कोठे वाचलेले नाही. बिरुटे यांनी ही माहिती दिल्यास जाणून घ्यायला आवडेल. मात्र एक गोष्ट बघितली की बलुचिस्तानचा पार सिंधु नदीपर्यंतचा भाग कुरुश याच्या साम्राज्यात असल्याचे बर्याच नकाशांच्यात दर्शवले आहे. विकिपिडिया सह. चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
पर्शियन सम्राटांचे आक्रमण
''मगधचा एक बलाढ्य शक्ती म्हणून इ.स.पू. ६ व्या शतकात उदय झाला. शिशूनाग व नंदाने तेथे राज्य केले. ही राजकीय प्रक्रिया घडत असतानाच भारताच्या वायव्य भागात लहान लहान राज्य होती. ती आपापसात लढत होती. त्याचा फायदा परकीयांनी घेतला. भारतावर आक्रमण करणारा पर्शिया हा पहिला देश होय. वायव्य भारताच्या समृद्धीकडे पर्शिया आकर्षित झाला होता. पर्शियन सम्राटांनी भारताच्या वायव्य भागावर आक्रमणे केली.
१) सायरस (इ.स.पू. ५५८-५३०) गांधारवर आक्रमण केले.
२) दारियस प्रथम (इ.स.पू. ५२२-४८६) गांधार, पंजाबचा काही प्रदेश जिंकला. सिंध व राजस्थानचाही काही भाग जिंकला.
पार्शियात दारियस प्रथमनंतर त्याचा पूत्र क्षर्षस (इ.स.पू. ४८६-४६५), दारियस द्वितीय, दारियस तृतीय वगैरे राजे झाले. परंतु इ.स.पू. ३३१ मधे ग्रीकच्या अलेक्झांडरने पर्शिया जिंकला. त्यामुळे भारतातील पर्शियाचे वर्चस्व संपूष्टात आले.
मॅसिडोनियाचा राजा फिलीप दुसरा हा इ.स.पू. ३३६ मध्ये मृत्यू पावला त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पूत्र अलेक्झांडर मॅसिडोनियाचा राजा झाला त्याने ग्रीसमध्ये जी लहान लहान राज्ये होती ती जिंकून घेतली युरोपवर आक्रमण न करता तो पर्शियाकडे वळला. याचे कारण १५० वर्षापूर्वी पर्शियाने ग्रीसवर आक्रमण केले होते, तेव्हा पर्शियाला धडा शिकवावे असे त्याला वाटले असावे''१
बाकी, अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या वेळेस भारताच्या राजकीय परिस्थितीचे वर्णन जस्टिन,एरियन या ग्रीक इतिहासकारांनी केलेच आहे. आणि ते वर्णन वरील माझ्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे महाविद्यालयीन पातळीवरील अभ्यासक्रमात आहेत. आणि वरील इतिहास लेखनाचे आधार ग्रीक लेखकच आहेत.
संदर्भ : १. भारताचा इतिहास व संस्कृती (इ.स.६५० पर्यंत). डॉ.एस.एस.गाठाळ. प्रकाशक : कैलास पब्लीकेशन, औरंगाबाद.
माधुरी दिक्षित
माधुरी दिक्षितला एकदा नेपाळ हा भारताचा पूर्वापार भाग होता असे काहीसे विधान केल्याबद्दल मार पडायचा बाकी होता त्याची आठवण झाली. ;-)
गांधार हे स्वतंत्र राज्य होते. भारताशी त्याचा संबंध नाही. तेव्हा सायरसची गांधार स्वारी, बॅक्ट्रियन स्वारी वगैरे भारतावरील आक्रमण ठरत नाही. सीमावर्ती प्रदेशात चकमकी, भूभाग लाटणे वगैरे होत असतेच त्याला भारतावरील आक्रमणही म्हणता येत नाही. सिंधू नदी पार करून आत आले तर भारत अशी साधी समजूत आहे.
हे वाक्य मात्र गंभीर आहे. आपण ज्या ग्रीक लेखकांचा हवाला देता ते कोण हे कळले तर बरे होईल. डॉ.एस.एस.गाठाळ यांनी संदर्भासाठी त्यांचा वापर केला असावा. ती नावे द्यावीत.
मी कुणी पर्शियन सम्राट राजस्थानापर्यंत पोहोचला होता वगैरे हे ऐकलेले नाही. असो.
समजूत
>>>सिंधू नदी पार करून आत आले तर भारत अशी साधी समजूत आहे.
अच्छा 'समजूत आहे' होय. मग आपल्या मताचा आदर करतो.
पूर्वीचा भारत कुठून कुठपर्यंत होता ते मला काही माहिती नाही.
>>>हे वाक्य मात्र गंभीर आहे. आपण ज्या ग्रीक लेखकांचा हवाला देता ते कोण हे कळले तर बरे होईल.
मिळाली तर नक्की देईन.
>>>मी कुणी पर्शियन सम्राट राजस्थानापर्यंत पोहोचला होता वगैरे हे ऐकलेले नाही.
आता ही माहिती लक्षात ठेवा. संदर्भाने काही वाचनात आले तर जरुर कळवा.
चूक बरोबरची चर्चा करा. मी आपल्या भावना पूस्तक लेखकापर्यंत जरुन कळवीन.
बाकी, ते विषय सोडून माधूरी दिक्षीतबद्दलच्या विधानाच्या माहितीबद्दल आभारी.
चर्चेत भाग घेतल्यावर चर्चा अशी कुठेतरी जाईल, असे वाटलेच होते.
-दिलीप बिरुटे
माहिती करून घ्यावी
ही माहिती वरील प्रतिसाद लिहिण्यापूर्वी असणे गरजेचे होते. आता झाली ते बरे झाले.
मला वाटते मी संदर्भात काही आले तर अवश्य कळवेन परंतु आपण ज्या लेखकांचा हवाला दिलात त्यांना हे संदर्भ कुठून मिळाले हे कळले तर बरे होईल. विशेषतः राजस्थानचे संदर्भ कारण त्यामुळे सिंधू नदी पार करून पर्शियन भारतात आले असा अर्थ होतो. हे संदर्भ रोचक आहेत.
असो. वरील लेखाचा आणि आपण इथे देत असलेल्या संदर्भांचा काहीही संबंध नाही हे आतापर्यंत लक्षात आले असल्यास ही चर्चा येथेच थांबवू.
थांबतो आहे.
>>>>वरील लेखाचा आणि आपण इथे देत असलेल्या संदर्भांचा काहीही संबंध नाही हे आतापर्यंत लक्षात आले असल्यास ही चर्चा येथेच थांबवू.
हम्म, माझे प्रतिसाद लेखन संदर्भाशी कदाचित नसतीलही,
पण आपल्या चर्चेचा रोख पाहता सदरील चर्चेत मी थांबलेच पाहिजे असे वाटते.
मी थांबतो आहे. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
माधुरी!!!
माधुरीचा किस्सा खरा कि तिचा खांदा वापरताय, कि दोन्हीही ? ;) (संदर्भ दिला नाही म्हणून म्हणतोय :प)
माधुरीचा किस्सा
हा घ्या संदर्भः http://www.indianexpress.com/ie/daily/19981224/35850404.html
प्रसिद्ध किस्सा आहे. सर्वांना माहित असावा असे वाटले.
अमिताभ बच्चन कौबक सादर करत होता हे सांगण्यासाठी संदर्भ लागत नाही तसेच.
धन्यवाद
धन्यवाद :)
अवांतर - परत परत सिद्ध करतात बुवा ..सुंदर दिसणाऱ्या मुली हुशार म्हणून नसतातच मुळी ;)
गांधार
गांधार हे स्वतंत्र राज्य होते. भारताशी त्याचा संबंध नाही
गांधार स्वतंत्र राज्य होते हे मान्य पण नक्की कोणापासुन् स्वतंत्र ते नाही कळाले कारण त्या हिशोबाने त्या काळी भारत असा अस्तित्वातच नव्हता. भारताच्या सीमारेषा या एका संस्कृतीने बांधील लोकांच्या राज्यांनुसार ठरवायला लागतील. त्या अर्थी अफगाणीस्तान भारताचाच भाग होते. अगदी पतसे नाही म्हटले तरी गांधार राज्यात तक्षशिला आणि पेशावर् ही दोन शहरे यायची अशी माझी समजुत् आहे. तसे असल्यास गांधार राज्य भारताचाच भाग होते असे म्हणायला लागेल्.
स्वतंत्र
स्वतंत्र म्हणजे बहुधा कुणा मोठ्या राजाचे/राज्याचे मांडलिक नाही असे असावे.
नितिन थत्ते
???????
म्हणजे फक्त ते कोणा मोठ्या राजाचे मांड्लिक नव्हते म्हणुन ते राज्य भारताचा भागच नव्हते काय्? परत् विचारतो भारताचा भाग् होण्यासाठी पेशावर् आणि तक्षशिला गांधार राज्याचा भाग असणे पुरेसे नव्हते काय्?
पुरेसे नाही
भारत हा देशच तेव्हा अस्तित्वात नसल्याने सदर राज्ये भारताचा भाग होती असे ठासून सांगण्यात काही हशील नाही. हिंदू किंवा वैदिक संस्कृती तेथे नांदत होती हे खरे आहे पण ते भारताचा हिस्सा नाहीत.
गांधार भारताचा भाग्
भारत हा देशच तेव्हा अस्तित्वात नसल्याने सदर राज्ये भारताचा भाग होती असे ठासून सांगण्यात काही हशील नाही. हिंदू किंवा वैदिक संस्कृती तेथे नांदत होती हे खरे आहे पण ते भारताचा हिस्सा नाहीत.
भारत हा देशच तेव्हा अस्तित्वात नव्हता असे तुमचे मत् असेल् तर् "पंजाबपासून पुढे भारत असे ढोबळमानाने मानले जाते" हे विधानही चुकीचे ठरते. आणि जर् पंजाब भारताचा भाग् असेल् तर गांधार का नाही ते कळत नाही. महाभारतात गांधार राज्याचे पुरावे सापडतात. बहुधा पंजाबचेच सापडत नाहीत. शिवाय तक्षशिला आणि पेशावर देखील् भारतात मोडत नाहीत् असे म्हणण्यामागे काय् कारण आहे ते कळत नाही. त्यामुळे गांधार हा माझ्यामते तरी भारताचाच भाग् होता.
कारण
कारण पंजाबपासून पुढे हा आजचा भारत आहे. भारत हा देश प्रस्थापित झाल्यावर. अगदी ब्रिटिश इंडियातही अफगाणिस्तान नव्हते असे वाटते. तक्षशीला हे पूर्व पंजाबातील राज्य असल्याने ते ब्रिटिश इंड्याचा भाग निश्चितच होते पण ते भारत या देशाचा भाग नाही. तेथे वैदिक, हिंदू आणि बौद्ध संस्कृती नांदत होती हे खरेच.
कोणाच्या गांधार राज्यात? गांधारीच्या वडलांच्या? अंभीच्या? कुशाणांच्या की आणि कोणाच्या? राज्यांच्या तत्कालीन सीमा पक्क्या नव्हत्या.
असो. मी वरचे तुमचे वाक्य नीट उचलले नव्हते पण तक्षशीला हे नंतर पूर्व पंजाबातील राज्य असून ते ब्रिटिश इंडियाचा भाग असल्याने तसेच सिंधू नदी पार केल्यावर तक्षशीला लागते त्यामुळे तक्षशीलेला (नसलेल्या) भारतात टाकण्यास मला प्रत्यवाय नाही. तसेही अंभी गांधाराचा राजा होता असे म्हटल्याचे आढळत नाही. तो तक्षशीलेचा राजा होता कारण त्या काळी कोणतीही एकसंध सत्ता त्या भागावर नव्हती. लहान गणराज्ये होती.
महाभारतात गांधार राज्याचे पुरावे सापडल्याने काय सिद्ध होते? जे महाभारत आहे त्यात तामिळनाडू आणि केरळ सापडते का? अतिशय लहान भागावर (कुरुराज्य) राज्य करणार्यांचा भारत म्हणून उदोउदो करणार्यांचे काव्य म्हणजे महाभारत. त्यातही पांडवांची सत्ता गांधारावर नाहीच. ते वेगळे स्वतंत्र राज्य आहे.
तुमच्या मते नेपाळ, श्रीलंका, कंबोडिया, झालेच तर एडिसन, न्यूजर्सी, यूएसए भारताचा भाग असले तरी माझे मत बदलत नाही. तेव्हा मी विषय येथेच थांबवते.
गांधार भारताचा भाग
कारण पंजाबपासून पुढे हा आजचा भारत आहे. भारत हा देश प्रस्थापित झाल्यावर. अगदी ब्रिटिश इंडियातही अफगाणिस्तान नव्हते असे वाटते. तक्षशीला हे पूर्व पंजाबातील राज्य असल्याने ते ब्रिटिश इंड्याचा भाग निश्चितच होते पण ते भारत या देशाचा भाग नाही. तेथे वैदिक, हिंदू आणि बौद्ध संस्कृती नांदत होती हे खरेच.
एक् मिनिट. आजचा भारत काय् आहे यावर चर्चा चालुच् नाही आहे आणी आधीही नव्हती. सायरस् दरायस कालीन भारताबद्दल् चर्चा चालु आहे. त्याकाळातल्या भारतात जर पंजाब येतो तर तक्षशिला , गांधार, पेशावर् का नाही हा प्रश्न आहे. जर त्याकाळी भारतच नव्हता तर प्रश्नच नाही हे माझ्या आधीच्या प्रतिसादावरुन् पण स्पष्ट होते.
कोणाच्या गांधार राज्यात? गांधारीच्या वडलांच्या? अंभीच्या? कुशाणांच्या की आणि कोणाच्या? राज्यांच्या तत्कालीन सीमा पक्क्या नव्हत्या.
तुम्हाला कोणता मंधार अपेक्षित् आहे ते मला माहित् नाही. मी आज ज्याला कंदाहार म्हणतात त्या अफगाणीस्तानातल्या भागाबद्दल बोलत् होतो. तुम्हाला दुसरे काही अपेक्षित् होते काय्? राज्यांच्या तत्कालीन सीमा पक्क्या नव्हत्या हे तर झालेच ते तसे १९४७ पर्यंत नव्हते. अगदी आजही नाही. काय् फरक पडतो? भारत कशाला म्हणायचे ते आपल्याला समजते ना? की इंग्रमंच्या चष्म्यातुन् भारत बघणार् आहात्?
असो. मी वरचे तुमचे वाक्य नीट उचलले नव्हते पण तक्षशीला हे नंतर पूर्व पंजाबातील राज्य असून ते ब्रिटिश इंडियाचा भाग असल्याने तसेच सिंधू नदी पार केल्यावर तक्षशीला लागते त्यामुळे तक्षशीलेला (नसलेल्या) भारतात टाकण्यास मला प्रत्यवाय नाही. तसेही अंभी गांधाराचा राजा होता असे म्हटल्याचे आढळत नाही. तो तक्षशीलेचा राजा होता कारण त्या काळी कोणतीही एकसंध सत्ता त्या भागावर नव्हती. लहान गणराज्ये होती.
ब्रिटिश इंडिया म्हणाजेच भारत् असे मजेशीर विधान कधी वाचायला मिळेल असे वाटात नव्हते. परत तेच इंग्रजी चष्मा........
बादवे तक्षशिला हे पुर्वापार गांधार राज्याचा भाग मानले जाते हे तुम्हाला माहित् नाही काय? नसेल् तर् मी काय् करु शकतो म्हणा?
महाभारतात गांधार राज्याचे पुरावे सापडल्याने काय सिद्ध होते? जे महाभारत आहे त्यात तामिळनाडू आणि केरळ सापडते का? अतिशय लहान भागावर (कुरुराज्य) राज्य करणार्यांचा भारत म्हणून उदोउदो करणार्यांचे काव्य म्हणजे महाभारत. त्यातही पांडवांची सत्ता गांधारावर नाहीच. ते वेगळे स्वतंत्र राज्य आहे.
हॅ हॅ हॅ. तुमच्या दुर्दैवाने सापडतात. महाभारतात कोणाचा उदोउदो करतात याच्याशी मला कर्तव्य नाही पणा उल्लेख मात्र अगदी कंबोडियाचे पण येतात दुर्दैवाने आणी यवनांचे पण. शिवाय पांडवां॰हे राज्य जिथे होते ते म्हणाजे भारत असा तुमचा समज का झालाय् ते कळायला काही मार्ग नाही कारण पांडवांचे राज्य आसाम वर पण नव्हते आणि मणिपुरवर पण् नाही. म्हणजे तो भारताचा भाग नव्हता आणी नाही की काय्? :)
तुमच्या मते नेपाळ, श्रीलंका, कंबोडिया, झालेच तर एडिसन, न्यूजर्सी, यूएसए भारताचा भाग असले तरी माझे मत बदलत नाही. तेव्हा मी विषय येथेच थांबवते.
आणी तुमच्या मते दिल्ली, कुरुक्षेत्र, काश्मीर, महाराष्ट्र, आसाम, मणिपुर्, गुजरात, राजस्थान, बिहारा भारताचे भाग नसले तरी माझे मत बदलत् नाही. बाकी तुम्ही विषय थांबवलाच् आहे तर मीही थांबवतो.
पकिस्तानी इतिहास
मित्र हो.. लहान तोंडी मोठा घास घेतोय (राग मानू नये) पण इतकी चांगली चर्चा चाललेली असताना कशाला गरम व्हावे.. कुत्सित भाषा ही मुद्द्याला आणि पर्यायाने चर्चेला चांगली नाही असे वाटते.. लेखाला धरून चर्चा नसली तरी पण माहितीत भर पडत असेल तर (इतरांच्या at least) चर्चा चाललेली चांगलीच.. बाकी या विषयावर एकमत शक्यच नाही हे मान्य केल्यावर तर कोणाला राग न यावा..
असो.. एखाद्या प्रदेशाचा इतिहास हा भौगोलिक सीमांबरोबर तिच्या संस्कृतीशी निगडीत असाच गृहीत धरला जात असावा.. 'भारताचा इतिहास' आणि ऐतिहासिक भारताच्या सीमा या संदर्भात एका पाकिस्तानी चर्चा स्थळावर थोडी फार अशीच चर्चा वाचण्यात आली होती . त्यात ही आपण चर्चा करत असलेल्या इतिहासास सर्व जगाने पाकिस्तानी इतिहास म्हणावे असा सूर आढळतो..(म्हणजे हा नवा पेच..)
माझ्या माहितीत हिमालय आणि हिंदुकुश यांच्या नैसर्गिक सीमांच्या आतला प्रदेश आणि त्याचा इतिहास हा भारताचा म्हणून समजायला बऱ्याच लोकांची सहमती आढळते.. कदाचित संस्कृतीसाधर्म्यामुळे असेल.. माहीत नाही.. गांधार हा इथे वादाचा मुद्दा असेल तर एक शंका आहे.. त्या काळात जी महाजनपदे होती त्यांना या उपखंडाच्या इतिहासात गृहीत धरण्याचा विचार करता येईल काय ?
छान
माहितीपूर्ण लेख. सहजरावांनी दिलेला जुन्या लढायांचा दुवादेखिल छान.
मी लिहिताना थकणार नाही कारण अलेक्झांडर हा माझा प्रिय विषय आहे पण वाचक कंटाळतील.
नाही कंटाळत. तुम्ही लिहाच!
मागे एकदा सुधाकर डोईफोडे यांच्या "सिकंदराला भारतीयाने मारले" ह्या लेखावर उपक्रमावरच चर्चा झाल्याचे आठवते.
सदर लढाईत पुरुच जिंकला असा दावादेखिल केला जातो. तो खरा आहे असे वादापुरते जरी मान्य केले तरी त्यामुळे अलेक्झांडरच्या "ग्रेट"पणाला काहीच बाधा येत नाही. कारण माझ्यामते त्याचे "ग्रेट"पण त्याच्या लढायांपुरतेच मर्यादित नव्हते. तर त्याच्या ह्या मोहिमेमुळे घडलेले परिणाम जास्त महत्त्वाचे होते.
त्याच्या मोहिमेमुळे ग्रीक, पर्शियन आणि भारतीय संस्कृतींची एकमेकांना ओळख झाली. भारतीय आणि चिनी संस्कृतींची एकमेकांना ओळ्ख होतीच. त्यातूनच ग्रीक (पुढे रोमन) - पर्शियन - भारतीय - चिनी अशी शृंखला निर्माण झाली आणि "रेशीम मार्ग" तयार झाला.
भारताच्या पश्चिम किनार्यावर सोपारा, कल्याण, चौल अशी बंदरे उदयास आली. व्यापार उदिम वाढीस लागला. भारतातून सोन्याचा धूर निघू लागला तो त्यानंतरच.
असेच लेख अजून येउदेत!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
ग्रेटपणा
लढाईत कोणीतरी जिंकते कोणीतरी हरते तेव्हा ग्रेटपणा लढायापुरता मर्यादित नव्हता हे वाक्य योग्य आहे. लढाई हरला म्हणून पुरु कमी ठरत नाही आणि अलेक्झांडर हरला असता तर तोही कमी ठरला नसता.
अलेक्झांडरचे ग्रेटपण आहे ते अल्पायुषात इतकी प्रचंड महत्त्वाकांक्षा ठेवण्यात, इतके प्रचंड सैन्य घेऊन ज्ञात जगाची स्वारी करण्यात, आपल्या सैन्याचा पाठिंबा मिळवण्यात, कुशल सेनापती असण्यात, अभेद्य रणनिती आणि व्यूहरचना आखण्यात.
सहमत आहे.
वर्ष-समाप्ती-उत्सवाची छान भेट
वर्ष-समाप्ती-उत्सवाची छान भेट दिल्याबद्दल प्रियालींचे आभार मानतो.