तर्कक्रीडा २१: सम्राट चंद्रगुप्ताची सुरक्षा
श्री.यनावाला यांनी या आठवड्यात आपण कोडे लिहिणार नाही असे सांगितले होते. सम्राट अशोकाबद्दल वाचताना आणि त्याचवेळी रेमंड स्मलयन यांची कोडी वाचताना दोहोंच्या संदर्भातून एक समीकरण मांडण्याची गरज नसलेले साधे-सोपे तर्काधिष्ठित गणिती कोडे सापडले. ज्या अर्थी ते मला सोडवता आले त्याअर्थी कोड्यांत विशेष स्वारस्य वाटत नसणाऱ्यांनाही ते सहज सोडवता येईल असे वाटले. यनावालांची परवानगी घेऊन ते कोडे येथे देत आहे.
सम्राट चंद्रगुप्ताला (राज्यकाळ इ.स.पूर्व ३२०-२९८) गादीवर बसल्यापासूनच आपल्या जिवाची भीती वाटत असे. अंगरक्षक म्हणून त्याने स्त्रियांची नेमणूक केली होती. या स्त्रियांना परदेशातून गुलाम म्हणून विकत आणले होते. त्याच्या शयनगृहातही या स्त्रियांचा कडक पहारा असे. चंद्रगुप्तावर विषप्रयोगाचे प्रयत्न झाल्याने तो नेहमी सतर्कही असे. केवळ राज्यकारभाराच्या कामासाठी आणि शिकारींसाठी तो महालाबाहेर पडायचा. रात्रीच्या प्रत्येक प्रहरी तो आपले शयनगृह बदलत असे. आपल्या विहिरी, जलसंचय इ. मध्ये कोणी विष तर कालवले नाही ना याबाबत तो काळजी घेत होता.
मगधाच्या गादीला तसे अनेक विश्वसनीय दूत व सरदार मिळाले होते. त्यांच्यासोबत शिकारीस जाणे हा चंद्रगुप्ताचा आवडता छंद. कधी कधी चंद्रगुप्त अनेक आठवड्यांच्या शिकारीवर जात असे.
खरा इतिहास येथे संपून आता कोडे सुरू करू.
एकदा चंद्रगुप्ताच्या मनात शिकारीस जाण्याचे आले. मगधाच्या सीमेबाहेर घनदाट अरण्य होतेच. आपल्या विश्वासातील निवडक २४ सरदारांना घेऊन चंद्रगुप्त शिकारीस निघाला. निघण्यापूर्वी चाणक्याने अर्थातच जिवाला अपाय होऊ नये म्हणून सोय कशी करावी याची मसलत चंद्रगुप्ताशी केली होती. त्यानुसार या वेळेस त्याच्या स्त्रीअंगरक्षक त्याच्या समवेत न जाता या २४ सरदारांवरच चंद्रगुप्ताच्या संरक्षणाची जबाबदारी येऊन पडली. अरण्यात चंद्रगुप्ताच्या वास्तव्यासाठी एक लहानसा महाल बांधलेला होताच. या महालास एकूण ९ खोल्या होत्या. त्यातील मध्यभागी चंद्रगुप्ताचे शयनगृह होते. चंद्रगुप्ताने २४ सरदारांची सोय त्या सभोवतीच्या खोल्यांत अशी केली की महालाच्या प्रत्येक दिशेला ९ सरदार असतील. हे शब्दांत सांगून स्पष्ट होत नसेल तर पुढील चित्र पाहा.
3
|
3
|
3
|
3
|
चं.
|
3
|
3
|
3
|
3
|
चं=चंद्रगुप्त आणि प्रत्येक खोलीतील सरदार ३.
उपक्रमावर तक्ता देण्यास त्रास होत आहे. तक्त्याची लांबी ताणल्यासारखी दिसते.
सरदारांना मात्र या संरचनेमुळे कैद्यासारखे वाटू लागले. त्यांनी चंद्रगुप्ताची परवानगी काढली की आम्हाला संध्याकाळी/ रात्री निदान एकमेकांच्या खोलीत जाऊन गप्पा गोष्टी करण्याची मुभा असावी. चंद्रगुप्ताने अर्थातच परवानगी दिली परंतु अट घातली की प्रत्येक दिशेला ९ सरदार असणे भाग आहे.
असो. तर पहिल्या रात्री :
चंद्रगुप्ताने झोपायला जाण्यापूर्वी सर्व खोल्यांतून फेरी मारली आणि सरदारांची मोजणी केली. त्याचा हेतू हा की आपली आज्ञा पाळली जाते की नाही हे पाहणे आणि काही सरदार जवळपासच्या खेड्यांतून चालणारे नृत्य-गायनाचे आणि लोककथांचे कार्यक्रम पाहायला तर गेले नसतील याची शहानिशा करणे. चंद्रगुप्ताला प्रत्येक दिशेला ९ सरदार दिसल्याने तो समाधानाने झोपायला गेला. प्रत्यक्षात मात्र ४ सरदार महालाबाहेर गेले होते आणि तरीही उरलेल्या सरदारांनी चंद्रगुप्ताची दिशाभूल केली होती. ती कशी बरे केली असावी?
रात्र दुसरी:
या रात्री कोणताही सरदार महालाबाहेर गेला नाही परंतु ४ गावकर्यांना त्यांनी रात्री येऊन आपले मनोरंजन करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार ते ४ गावकरी महालात आले, पण चंद्रगुप्ताने पाहणी केली असता त्याने प्रत्येक दिशेला ९ सरदारच मोजले. ते कसे?
रात्र तिसरी:
तिसर्या रात्री सरदारांची भीड चेपली आणि त्यांनी ८ गावकर्यांना आमंत्रण दिले. आता महालात चंद्रगुप्ताव्यतिरिक्त २४+८=३२ जण होते, तरीही चंद्रगुप्ताने मोजणी केल्यावर प्रत्येक दिशेस ९ सरदारच भरले. ते कसे?
रात्र चौथी:
सरदारांना आता या प्रकरणाची मजा येऊ लागली. चौथ्या रात्री १२ पाहुणे आले. म्हणजेच ३६ जण भरले. चंद्रगुप्ताला फसवायला त्यांनी अशी मांडणी केली की प्रत्येक दिशेला ९ सरदारच भरतील.
रात्र पाचवी:
ही शिकारीची शेवटची रात्र होती. या दिवशी पाहुण्यांना आमंत्रण नव्हते. उलटपक्षी, ६ सरदार उठून जवळच्या गावात गेले. अर्थातच, चंद्रगुप्ताने प्रत्येक दिशेला ९ सरदार मोजले. ते कसे?
मंडळी, चंद्रगुप्ताचे गणित कच्चे नव्हते. सरदार मात्र त्याच्यासारखेच चलाख होते. कोडे वाचायला मोठे असले तरी सोपे आहे. उत्तरासाठी तक्ता दाखवण्याची गरज नाही.
३ ३ ३
३ च ३
३ ३ ३
अशाप्रकारेही उत्तर लिहिता येईल. पहिल्या रात्रीचे कोडे सोडवले की बाकी सोडवण्यास त्रास पडणार नाही. उत्तरे व्य. नि. तून पाठवावीत.
संदर्भ :
ऐतिहासिक संदर्भ : अशोकचरित्र - वा.गो.आपटे.
कोडे घेतले आहे : द रिडल ऑफ शहरजादी अँड अदर - रेमंड स्मलयन.
Comments
घाईघाईत कोडे
लिहिल्याने शुद्धलेखनात थोड्या चुका आहेत. क्षमस्व!
उत्तर :)
उत्तर कसे काढावे हे माहीत आहे त्यामुळे तक्त्यांची तसदी घेत नाही.:)
अवश्य
तशी तक्ता लिहायची गरजही नाही. उत्तरात, तक्त्यातील पहिली ओळ लिहिली तरी चालेल.
व्य. नि.तून उत्तरे
यनावालांचेच सर्वप्रथम आले. त्यानंतर मेघदूत यांचे. उत्तरे बरोबर आहेत.
"त्याच्या" उत्तरात तत्त्वे बरोबर आहेत, उत्तरे मात्र थोडी सरकली आहेत. अर्थात, त्याच्या बुद्धीमत्तेविषयी शंका नाहीच. ;-)
युयुत्सुंचे उत्तर एकदम कर्रेक्ट!
विसुनाना आणि अमित कुलकर्णी यांची उत्तरेही एकदम बरोबर.
दिगम्भा यांचे उत्तरही
अगदी बरोबर आणि नेहमीप्रमाणे कोडे विशद करून सांगितले आहे. कोड्याचे उत्तर देताना तेच येथे चिकटवीन म्हणते. :)
कोडे आवडले!
कोडे आवडले.
प्रियालीताई - उत्तरे फुटू नयेत म्हणून व्य नि ने मागविलीत खरी... पण २४ सरदारांची ९/९/९/९ ची चौरंगी रचना आपणच सुरुवातीला देऊन बरे नाही केले!!
पेपर फोडला
तरी उत्तरे देणारी मंडळी तिच आहेत, त्यामुळे तसा काही फायदा-नुकसान झाले नाही.
कोडे आवडल्याबद्दल धन्यवाद. ते लिहायला आणि त्याची इतिहासाशी सांगड घालायला मला मजा वाटली.
आवडाबाई यांचे उत्तर आताच आले ते बरोबर आहे.
चलाख सरदारांची संरचना - उत्तर
दिगम्भांनी दिलेले उत्तर येथे छापते आहे.
तत्वः एकूण माणसे जेवढी असतील त्यातली परस्परविरुद्ध बाजूंना दिसणारी ९+९=१८ सोडली की उरलेली माणसे उरलेल्या दोन मधल्या खोल्यांत ठेवायची. सिमेट्रीमुळे उरलेले उत्तर येतेच.
वरकरणी पाहता गोंधळात टाकणारे वाटले तरी एकूण अतिशय सोपे कोडे आहे हे.
उत्तरः
४ १ ४ | २ ५ २ | १ ७ १ | ० ९ ० | ५ ० ४
१ चं १ | ५ चं ५ | ७ चं ७ | ९ चं ९ | ० चं ०
४ १ ४ | २ ५ २ | १ ७ १ | ० ९ ० | ५ ० ४
हेच उत्तर इतरांनी वेगवेगळ्या प्रकारे दिले. जसे,
००९
०चं०
९००
किंवा
१०८
०चं०
८०१
इ. उत्तरे देणार्यांतील सर्वांची उत्तरे बरोबर आहेत. :)
माझ्या शेवटच्या उत्तरात नजरचूक
५ ० ४
० चं ०
४ ० ५
असे हवे होते
- दिगम्भा
अरे हो की
माझीही नजरचूक कशी झाली? बहुधा पहिली चार बरोबर आहेत आणि पाचव्यात ५ आणि ४ दिसताहेत म्हणून बारकाईने पाहिले नाही.
बरं! झालं मला पेपर तपासावे लागत नाहीत ते. नाहीतर पोरांचं फावलं असतं.
असो. क्षमस्व!
तत्व
या मागे 'कोपर्यातील सैनिक दोन बाजूत गणला जातो.' हे तत्व ध्यानात येणे महत्वाचे आहे. ते आल्यास १८ ते (९००,०चं०,००९) ते ३६ (०९०,९चं९,०९०) रचना करता येतात :)
अवांतर टीपः लहान-मोठे तक्ते
table टॅग मध्ये इतर माहितीच्या बरोबरीने style="width: 40%;" असे लिहून (किंवा स्टाईल आधीच असेल तर त्या यादीत विड्थची भर घालून)आणि आवश्यकतेनुसार विड्थ बदलून टेबल लहानमोठे करता येणे शक्य व्हावे.
उदा. <table border="1" style="width: 40%;">
धन्यवाद!
वा! जमलं.... अनेक धन्यवाद.