आठवणी : भारत जोडो यात्रेच्या

आज २४ डिसेंबर. 'श्यामची आई' चे लेखक व प्रत्येक भारतीय माणसाच्या हृदयात पितृस्थानी असलेले सर्वांचे लाडके साने गुरुजी ह्यांची जयंती. त्यांच्या स्मृतीस विन्रम अभिवादन! तसेच आज बाबा आमटेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या 'भारत जोडो' यात्रेला २५ वर्षे पूर्ण झाली. २५ वर्षापूर्वी नागपुरातील तीन तरुण ह्या यात्रेत सामील झाले होते, ते आजही तरुण आहेत आणि २५ वर्षानंतरही नक्कीच तरुण असतील त्याला कारण म्हणजे त्यांना मिळालेला बाबांचा सहवास. श्री चंद्रकांत रागीट, श्री प्रकाश ढोबळे व श्री संजय सोनटक्के. त्यापैकी चंद्रकांत रागीट व प्रकाश ढोबळे ह्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.


प्रश्न : बाबांची आणि तुमची ओळख कधीपासूनची? यात्रेविषयी कसं कळलं? यात्रेला जाण्यापाठीमागचा काय विचार होता?

प्रकाश : बाबा म्हणजे खूप मोठा माणूस! माझी व त्यांची प्रत्यक्ष ओळख नव्हती. त्यांच्याबद्दल खूप वाचलं, ऐकलं होतं. मी व माझा मित्र गंमत म्हणून सायकलने आनंदवन बघायला गेलो होतो. पण त्यावेळेस बाबांची भेट झाली नव्हती. भारत जोडो यात्रा ठरल्यानंतर बाबांनी एक पत्रकार परिषद घेतली होती व ह्या यात्रेत तरुणांना सामील होण्याचे आवाहन केले होते. ही बातमी मी पेपरमध्ये वाचली. मला सायकल चालवण्याची प्रचंड आवड. मी यात्रेत जाण्यास पात्र होतो. बस! ठरलं! जायचंच! रीतसर अर्ज केला. निवड प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर एकटाच सायकलने आनंदवनात गेलो. तेव्हा बाबांशी प्रत्यक्ष भेट, ओळख झाली. बाबांनी यात्रेविषयी संपूर्ण माहिती दिली. तिथेच अतुल शर्माशी ओळख झाली जो ह्या यात्रेचा समन्वयक होता. यात्रेला जाण्यापाठीमागचा विचार फार काही उदात्त किंवा फार मोठं सामाजिक कार्य करायला चाललो आहोत असा काही नव्हता. खूप सायकल चालवायला मिळणार व बाबांसारख्या व्यक्ती बरोबर फिरायला मिळणार ह्या गोष्टीचं आकर्षण व आनंद होता.

चंद्रकांत : मी पण बाबांबद्दल वाचलं, ऐकलं होतं. परिचय मात्र नव्हता. यात्रेबद्दलची माहिती नव्हती. यात्रेला जाण्याचा पाठचा पुढचा काहीही विचारही नव्हता. माझा एक मित्र डॉ अशोक बेलखोंडे ह्या यात्रेत सहभागी होणार होता. मला कन्याकुमारीच आकर्षण होतं. त्याला सोडायला कन्याकुमारीला जावं व कन्याकुमारी बघावं ह्या हेतूने मी रजा घेऊन गेलो. त्यावेळेला मी औरंगाबादला गरवारे पॉलिएस्टर मध्ये नोकरी करत होतो. तिथे गेल्यावर नॅशनल युथ प्रोजेक्ट, दिल्ली चे संचालक एस एन सुब्बारावांच शिबीर, तिथलं वातावरण, तो माहौल बघून मलाही यात्रेत सामील व्हायची इच्छा झाली. मी यदुनाथ थत्ते काकांना तसं सांगितलं. त्यांनी बाबांना भेटायला सांगितलं. बाबांनी माझी चौकशी केली. नोकरीचं काय करशील? विचारल्यावर, मी क्षणात उत्तर दिलं, सोडून देईन! त्यांनी यदुनाथ काकांना भेटायला सांगितलं. मी त्यांना व कर्नल रेग्यांनाही भेटलो. कर्नल रेगे मुख्य समन्वयक होते. त्यांनी माझी तीव्र इच्छा बघून हो म्हटलं. मी तडक तिथूनच नोकरीचा राजीनामा पाठवून दिला. काही काम करायचं असेल तर देशाचं पर्यटन केलं पाहिजे असं विवेकानंदांच्या व गांधीजींच्या चरित्रात वाचलं होतं. ह्या यात्रेच्या निमीत्त्याने आपला देश बघण्याची, समजून घेण्याची संधी मला मिळणार होती.

प्रश्न : शारीरिक, मानसिक व इतर तयारी कशी केली?

प्रकाश : सायकल चालवण्याचा सराव होताच त्यामुळे शारीरिक तयारी वेगळी अशी खूप काही करावी लागली नाही. आणि मानसिक तयारी करायची गरज नव्हती कारण ती जन्मत:च होती असं वाटतं. आमचं कन्याकुमारीला आठ दिवसांच शिबीर घेतलं होतं सुब्बारावकाकांनी. त्या शिबिरात यात्रेला जाणाऱ्या सायकलस्वारांबरोबरच देशभरातले इतरही युवक होते. त्यात सगळ्या प्रकारचा सराव करून घेण्यात आला होता.

चंद्रकांत : मलाही सायकल चालवण्याचा सराव होता. तसेच व्यायामही करत असे त्यामुळे शारीरिक तयारी करावी लागली नाही. तिथला माहौल पाहून मानसिक आपोआपच झाली. तिथे अजून एक तरुण आला होता त्याचे नाव सुभाष कंदले. तो आपली स्वतःची सायकल घेऊन आला होता. त्याची निवड झाली नव्हती तरीसुद्धा तो यात्रेच्या पाठोपाठ एकटाच जाणार होता. समजा मला जर का नाही म्हटले असते तर, त्याने आणि मी डबलसीट जाण्याची तयारी केली होती. पण सुदैवाने तशी वेळ आली नाही.

प्रश्न : घरच्यांची प्रतिक्रिया काय होती ?

प्रकाश : माझं नुकतंच शिक्षण संपलं होतं. छोटी-मोठी नोकरी करत होतो. माझ्यावर घरची जबाबदारी नव्हती. घरातलं वातावरण म्हणाल तर फार काही सामाजिक कार्याबद्दलची जागृती, आवड किंवा जाणीव असणार असं काही नव्हतं. घरातल्या लोकांनी विरोधही केला नाही किंवा प्रोत्साहितही केलं नाही. बाबांबरोबर जातोय ना! जाऊ देत!

चंद्रकांत :
आमचं खाऊन-पिऊन सुखी एकत्र कुटुंब. माझ्यावर घरची जबाबदारी नव्हती.मला माझा पूर्ण वेळ विद्यार्थी परिषदेच काम करण्याचा विचार होता, तो मी वडिलांना बोलून दाखवला होता. शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेड, आधी आपल्या करिता एक भाकर कमव आणि मग त्यातली अर्धी दुसऱ्याला दे, असा सल्ला त्यावेळेला त्यांनी दिला होता. मी माझं शिक्षण संपवून नोकरीला लागलो होतो. मी राजीनामा कन्याकुमारीहूनच पाठवला होता. आज नोकरी गेली तरी परत आल्यावर दुसरी नोकरी मिळेल, ही खात्री होती. २५ वर्षापूर्वी आजच्या सारखी टेलिफोनची सोय नव्हती. मी त्यांना पत्राने कळवले होते. ते पत्र त्यांना महिन्याभराने मिळाले. मी परत आल्यावर थोडा ओरडा ऐकावा लागला. पण फार असं काही महाभारत घरात घडलं नाही.

प्रश्न : एकंदरीत यात्रेच्या दरम्यान व्यवस्था कशी काय होती?

प्रकाश : अतुल शर्मा व कर्नल रेगे, हे दोघे ह्या यात्रेचे समन्वयक होते. ते दोघंजण दोन वर्षापूर्वीपासून ह्यावर काम करत होते. त्यांनी संपूर्ण आखणी केली. एकंदरीत अंतर, जाण्याचा मार्ग, विश्रांतीचे थांबे, हवामान, जेवणाची सोय, कार्यक्रम कुठे-कुठे घ्यायचे ह्याची व्यवस्थित आखणी केली होती. पूर्वतयारी अगदी उत्तम केली होती. पण ऐनवेळी काही समस्या उद्भवतातच ना! अगदी अपवादात्मक, काही ठिकाणी गैरसोय झाली. सुब्बारावकाकांनीही घेतलेल्या शिबिराचाही खूप फायदा झाला. २०-२० चे ग्रुप केले होते. दोन दोनच्या फाइलमध्ये सायकल चालवावी लागे. प्रत्येक ग्रुपचा एक लीडर नेमलेला असायचा. ग्रुप लीडर बदलत असे. एखादा ग्रुप थकला तर पुढे-पाठीमागे व्हायचा पण मुक्कामाच्या ठिकाणी मात्र परत सगळे एकत्र असायचो. कामाची विभागणी चोख होती. सामानाची चढ-उतार करणे, काही दुरुस्ती करणे अशी काही कामे प्रत्येक ग्रुपला करावी लागे.

प्रश्न : मुलींचा सहभाग कसा होता ?

चंद्रकांत : मुलींचा सहभाग खूप चांगला होता. एकूण सतरा मुली होत्या त्यापैकी काही सायकल चालवायच्या तर काही लुनावर. चार-पाच मुली सामाजिक कार्यकर्त्या होत्या. कोटेश्वरी नावाची मुलगी होती तिला सायकल चालवता येत नव्हती. ती यात्रेच्या दरम्यान सायकल चालवायला शिकली. मुला-मुलींमध्ये खेळीमेळीचे वातावरण होते. आमच्या बरोबर नफिसा व विद्याव्रत हे लग्न करून आलेलं जोडपं होतं. यात्रेच्या दरम्यान दोघा-तिघांची आपआपसात लग्नही जमली.

प्रश्न : वेगवेगळ्या प्रांतातून अनोळखी एकशे सतराजण तुम्ही एकत्र होता. आपआपसात कधी मतभेद झाले का?

प्रकाश : हो, झाले थोडेफार, पण तेवढ्या पुरतेच. चहाच्या कपातील वादळं म्हणावीत तशी! फारसे गंभीर नाही. आज आम्ही बऱ्याच जणांशी संपर्कात आहोत, चांगले मित्र आहोत. रीजनल स्पिरिट थोड्याफार प्रमाणात होतं. महाराष्ट्रातील तरुणांची संख्या जवळपास निम्मी होती. सगळे एकमेकांशी हिंदीतच बोलायचो. एक-दोघं तमिळनाडूचे होते त्यांना तामीळ शिवाय इतर भाषा येत नव्हती त्यामुळे ते कोणाशी बोलायचेच नाही, मतभेदाचा प्रश्नच नव्हता. एक कर्नाटकातला तरुण होत, पद्मनाभन. त्याची तर खूपच गंमत! तो पैलवान होता. त्याला जोडो म्हणजे ज्युडो वाटलं. बाबा बेल्ट बांधायचे. त्याला ते काहीतरी ज्युडो-कराटे वाटलं. ते शंभर तरुण, त्या सायकली बघून हे भलतंच काहीतरी आहे, हे त्याच्या लक्षात आलं. चंद्रकांतसारखंच, तिथला माहौल बघून तो भारावून गेला आणि यात्रेत सामील झाला.

प्रश्न : सगळ्या प्रांतात तुमचं चांगलं स्वागत झालं. तुमच्या लक्षात राहिलेलं स्वागत कुठलं?

चंद्रकांत : सगळ्याच प्रांतात खूप उत्स्फूर्त स्वागत झालं. लहान गावां पेक्षा मोठ्या शहरांमध्ये जंगी स्वागत झालं. दक्षिणेत तमिळनाडूमध्ये, महाराष्ट्रात उमरगा सारख्या छोट्या गावात छान स्वागत झालं. गुजरात-मध्यप्रदेश सीमेवरच्या आदिवासींनी खूप जल्लोषात स्वागत केलं. त्यांनी तर जत्राच भरवली होती. त्यांनी पारंपरिक वेशभूषेत लोकनृत्य केलं, आम्ही पण त्यांच्याबरोबर नाचलो. पंजाबात जायला आम्हाला परवानगी नव्हती. ऑपरेशन ब्लु स्तरामुळे तिथे कडक बंदोबस्त होता. रात्री बाबांनी सगळ्या तरुणांना एकत्र बोलावलं. बाबांचा निर्णय ठाम होता. ते म्हणाले की मी या यात्रेला निघालो ते कफन घेऊनच. मी जाणारच तुम्हाला काय करायचे ते तुम्ही ठरवा. त्यांनी ज्या तऱ्हेने, ज्या शब्दात भाषण केलं ते ऐकून प्रत्येक तरुण भारावूनच गेला आणि त्यांच्याबरोबर सगळ्यांनीच जायचं ठरवलं. आम्ही अमृतसरमध्येही गेलो. शीख बांधवांनी जोरदार स्वागत केलं. आम्ही एक रात्र दुर्गायनी टेंपलमध्ये राहिलो.

प्रश्न : आठवणीतील चांगले वाईट प्रसंग कोणते?

चंद्रकांत :
मी आयुष्यात पहिल्यांदा अंगावर शहारे आणणार भाषण ऐकलं ते कुसुमाग्रजांच, वि वा शिरवाडकरांच. आजही ते भाषण आठवलं की अंगावर शहारे येतात. गुजरातमधील हरीवल्लभभाई पारीखांच काम बघून मी भारावून गेलो. लोकअदालतची मूळ कल्पना त्यांचीच. आपआपसातील भांडणे न्यायनिवाडा करून लगेच सोडवल्या जायची आणि निर्णय सगळ्यांना मान्य असायचा. असा एक न्यायनिवाडा आम्हाला बघता आला. एक प्रसंग वाईट पण परिणाम चांगला, असा होता. आम्ही दक्षिणेत सतत १०८ किमी प्रवास केला. रस्त्यात आम्हाला दिवसभर खायला-प्यायला काही मिळाले नाही. पेट्रोलिंगची गाडी पुढे निघून गेलेली. मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो तर कळलं की जेवायला अजून किमान एक तास. भुकेने जीव कासावीस झालेला. आमचं तरुण उसळतं रक्त, चिडलो. अशी कुठे व्यवस्था असते का... वेगैरे बरीच आरडा-ओरडी केली. बाबा म्हणाले, 'फक्त एक दिवस तुम्हाला खायला मिळाले नाहीतर तुम्ही एवढे चिडलात. आपल्या देशात असे कितीतरी लोकं आहेत, दोन-दोन दिवस मजुरी करतात पण दोन-दोन दिवस अन्नाच पोटात कण जात नाही. भूक काय असते ते तुम्हाला कळलं का?' बाबा ज्या तऱ्हेने समजावून सांगायचे ना त्याला तोड नाही. पुण्याची मनीषा लोढा बाबांच भाषण ऐकून ढसढसा रडायलाच लागली. त्यादिवशी काहीजण तर जेवलेच नाही. दुसरा एक वाईट प्रसंग म्हणजे पोटाच्या दुखण्यामुळे रामानंद शेट्टीचा झालेला मृत्यू.

प्रश्न : आज मागे वळून पाहताना ह्या यात्रेविषयी काय वाटतं ?

चंद्रकांत : व्यक्तिगत पातळीवर आम्हाला खूपच फायदा झाला. यदुनाथ काकांनी तर ह्या यात्रेला 'चाकावरचे विद्यापीठ' म्हटलंय. आमच्यात आत्मविश्वास, धडाडी निर्माण झाली. कोणत्याही संकटांना सामोरं जाण्याची हिंमत आली. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मोठं-मोठाल्या व्यक्तींना भेटता आलं, त्याचं काम जवळून पाहता आलं. आम्ही ह्या यात्रेतून प्रेरणा घेऊन अनेक सायकल यात्रांच आयोजन यशस्विरीत्या केलं. आमच्यापैकी बरेचजण आज पूर्णवेळ सामाजिक कार्य करत आहे. दिल्लीत तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी ह्यांना भेटायला फक्त आमटे परिवार गेला होता, त्यांच्या बरोबर एकही सायकलस्वार नव्हता. त्यावेळेला ती गोष्ट आम्हा सर्वांनाच खटकली होती. पण आमच्यापैकी कुणाला ननेण्यामागे नक्कीच तसंच काही कारण असावं असं आज वाटतंय. बाबांचे गावात कार्यक्रम चालू असताना आम्ही गावात फेरफटका मारायचो. त्यावेळेला काही ठिकाणी गावकरी म्हणायचे क्या बाबा चोर लोगोंके साथ बैठा है और भारत जोडो की बात करता है. ते कार्यक्रम स्थानिक लोकांनी आयोजित केलेले असायचे. बाबांना माहिती नसायचं त्यांच्याबरोबर कोण बसलंय. किंवा काश्मीरमध्ये बाबांच भाषण सुरू असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. आज, आता असं वाटतं, हे टाळता येऊ शकत होतं.

प्रश्न : आज भारत जोडो यात्रेची गरज आहे का? अशी यात्रा काढायची झाल्यास त्याचं नेतृत्व कोणाकडे असावं? आजचा तरुण त्याला प्रतिसाद देईल का?

चंद्रकांत : हो, आजही अश्या यात्रेची गरज आहे. कुणाला वेगळा विदर्भ हवाय कुणाला वेगळा तेलंगणा. दहशतवाद, नक्षलवाद ह्या समस्या आहेतच. आजही एकात्मतेची भावना नाही. आजच्या तरुणांसमोर खरंच पूर्वीसारखे , जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, गुरुजी, बाळासाहेब देवरस .. अशी अनेक नावे घेता येतील, असे राष्ट्रीय पातळीवरचे आदर्श नेते नाहीत. प्रांतीय पातळीवर असे बरेच काम करणारे लोकं आहेत. अगदी निराशाजनक परिस्थिती नाही. पण आता वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे आयडल (आदर्श) आहेत -ए पी जे अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, किरण बेदी, नारायण मूर्ती, विजय भटकर, अंबानी, प्रकाश आमटे, अभय बंग, अमिताभ बच्चन, ए र रेहमान.....वैगेरे. माझ्या डोळ्यासमोर तसे बरेच आहेत पण तीन त्या तोडीचे, त्या ताकदीचे आदर्श नेत्यांची नावे चटकन मनात येतात की ज्यांच्या आवाहनाला तरुण नक्की प्रतिसाद देतील, ते म्हणजे नानाजी देशमुख, सुब्बारावजी व आणि तिसरे मोहनजी भागवत. नानाजी देशमुख आज आपल्यात नाही व सुब्बारावकाकांच वय झालं. 'समरसता' हा बाळासाहेब देवरसांचा शब्द! दुर्दैवाने आज त्यांना अपेक्षित असलेली समरसता कुठेही आढळत नाही. मोहनजी भागवतांनी अशी एखादी सायकलवर 'समरसता यात्रा' काढली तर आजचा तरुण वर्ग नक्की प्रतिसाद देईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे.


Comments

+१

उत्कृष्ट लेख. अतिशय आवडला.

चन्द्रशेखर

असेच

उत्कृष्ट लेख. अतिशय आवडला.

असेच. श्री. चंद्रकांत रागीट 'मातृभू अंतर्गत संस्कार' ह्या किंवा अशाच काहीशा नावाच्या मासिकाचे अध्वर्यू आहेत असे वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असेच म्हणतो

उत्कृष्ट लेख. अतिशय आवडला.

असेच म्हणतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ढोंग्या रोग

दिल्लीत तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी ह्यांना भेटायला फक्त आमटे परिवार गेला होता, त्यांच्या बरोबर एकही सायकलस्वार नव्हता. त्यावेळेला ती गोष्ट आम्हा सर्वांनाच खटकली होती. पण आमच्यापैकी कुणाला ननेण्यामागे नक्कीच तसंच काही कारण असावं असं आज वाटतंय.

अशोक जैन यांनी भारत जोडो यात्रेविषयी एक रोचक अनुभव नोंदविलेला आहे.

सांगा सांगा

अशोक जैन यांनी भारत जोडो यात्रेविषयी एक रोचक अनुभव नोंदविलेला आहे.

काय आहे बरे तो अनुभव?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

महानगरीतून...

मलाही ते वाक्य वाचल्यावर 'तो' रोचक अनुभव आठवला. :)

पंचवीस वर्षानंतरही आवर्जून आठवणी काढण्याएवढी भारत जोडो यात्रा ग्रेट होती, असे काही वाटत नाही. बाबांचे त्याआधीचे कार्य मात्र खरंच थोर आहे.
तरीही, एकंदर लेख चांगला आहे. ट्रेकिंगच्या आठवणी असतात, तसा काहीसा वाटला.

चांगली माहिती

चांगली माहिती आणि मुलाखत.

वा!

खूपच छान लेख आणि माहिती.

बिपिन कार्यकर्ते

 
^ वर