आधुनिकोत्तरवादः आक्षेप, प्रवाद, परिणाम इ.

'आधिनुकोत्तर कोणास म्हणावे?' या चर्चेमध्ये अनेक उपक्रमींना त्यांची मते मांडता आली नाही. धनंजय यांनी एका उपप्रतिसादात उपचर्चा सुरू केली जावी, असे मत मांडले. रिकामटेकडा यांना 'आस्वाद-अनुभव ही संज्ञा क्वालियासारखी' वाटल्याने त्या धाग्यावर मते मांडणे थांबवले. पुष्कर जोशी यांनी परिणामांबाबत काही मुद्दे उपस्थित केले. त्यावर कदाचित इच्छा असूनही उपक्रमींनी भाष्य करणे टाळले. या सर्वांचे कारण चर्चेची मर्यादित व्याप्ती असल्याचे मला जाणवले. म्हणून आधुनिकोत्तरवादाच्या आकलनापलिकडे चर्चा करता यावी, यासाठी हा चर्चाप्रस्ताव टाकत आहे.

आधुनिकोत्तरवादावर अनेक प्रकारचे आक्षेप आहेत. एक मूख्य आक्षेप म्हणजे आधुनिकोत्तरवाद म्हणजे काय? हे नेमके सांगता येत नाही. अनेक व्याख्या सापडतात पण त्यांच्यात परस्परविरोधही जाणवतो. देरिदा, फुको प्रभृतींनी केलेली मांडणी समजत नाही. इतर अभ्यासकांनी घेतलेल्या आक्षेपांना आधुनिकोत्तर विचारवंत उत्तर देण्याचे टाळतात*. विकिपानावर आधुनिकोत्तरवादावरील टिकेबद्दल स्वतंत्र पानच आहे. आधुनिकोत्तरवादी विचारवंतांमध्येही अनेक मतप्रवाह आहेत. काही जण आधुनिकोत्तरवादास आधुनिकवादाचेच एक अंग मानतात. त्याशिवाय आधुनिकोत्तरवादाचे काही परिणामही सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रांत दिसून येतात.

आधुनिकोत्तरवादाचे परिणाम नेमके काय आहेत? आक्षेपांमध्ये नेमकी काय कारणमिमांसा आहे? प्रवाद असल्यास ते कोणते आहेत या सर्व बाबींवर येथे चर्चा करता येईल. या चर्चेवर असल्यास एकच बंधन आहे व ते म्हणजे चर्चा आधुनिकोत्तरवादाशी संबंधित असावी. चर्चाप्रस्तावक म्हणून चर्चेत एकमेकांच्या मतांचा आदर राखला जावा अशी अपेक्षा आहे.

धन्यवाद.

*चॉम्स्कींचे आधुनिकोत्तरवादाबद्दल मत. या दुव्यावरील मजकूर विश्वसनीय आहे असे खात्रीने सांगता येत नाही.

Comments

काही चित्रफिती

चॉम्स्की-फुको यांच्यातील चर्चा: भाग १ (फुको फ्रेंचमध्ये बोलतात पण इंग्रजी सबटायटल्स दिलेली आहेत.)

चॉम्स्की-फुको यांच्यातील चर्चा: भाग २

चूक खोटे

'काहीच खरे नसते, काहीच बरोबर नसते' (हे सोडल्यास) (सत्य हे बहुआयामी असते. निखळ सत्य असे काही नाही.)
असे काही मांडले तर तो अतिरेक असतो. कदाचित हे कला प्रकारात विद्रोहाला शोभून दिसेल. पण हेच तत्वज्ञान, विज्ञान (सामाजिक धरून) यात बरेचदा शोभून दिसत नाही.
चक्राकार खोटेपणा आहे हा भाग वेगळा.

प्रमोद

याप्रमाणेच

'सांगता येत नाही' हे मला पटते.

एक मत

देरिदा, स्पिवाक, क्रिस्टेवा प्रभृती 'फ्रेंच स्कूल'च्या बुध्दिवाद्यांनी आधुनिकोत्तरतेच्या विषयात बुध्दिभेद केला आहे या चॉम्स्कीच्या वरच्या मुद्द्याशी (तो नक्की त्याचा असो नसो) मी सहमत आहे. या विषयावरच्या सैध्दांतिक मांडणीत याच लोकांची दादागिरी असल्यामुळे प्रचंड अडचणी होतात हा विचारही मला पटतो. म्हणूनच मी पहिल्या धाग्यात त्यांचा उल्लेखही टाळला होता. पण मग ज्यांना आधुनिकोत्तरतेविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सुकता आहे त्यांसाठी काही उपाय आहे का?

माझं मतः सैध्दांतिक मांडणीत गोंधळ असल्यामुळे संज्ञा आणि व्याख्यांत अडकू नये. त्याऐवजी सांस्कृतिक अभिव्यक्तीकडे पहावं. चित्रपट, वाङ्मय आदि कलांमध्येही भोंगळपणा आणि मुद्दाम गोंधळ माजवणारे पुष्कळ आहेत. तरीही ज्या कलाकृतींनी आधुनिकोत्तर संवेदनांद्वारे काही अ-टाकाऊ अभिव्यक्ती मांडली अशा काही कलाकृती सापडतात. त्यांच्या पुरेशा नमुन्यांचा विचार केला तर आधुनिकोत्तरता का? यावर थोडा प्रकाश पडेल. कदाचित विषयाच्या आपल्या आकलनात विधायक भर पडू शकेल. तरीही 'हे सर्व थोतांड आहे.' असं वाटत राहिलं तरीही मग हरकत नाही.

टीपः मी वर दिलेला चॉम्स्की-फूको डिबेटचा व्हिडिओ पाहिलेला नाही.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

वॉट्स इन योर हेड?

सर्ल पेटी तत्त्वावर आधारित तात्त्विक झोंबीकडून आधुनिकोत्तरतेवर काय प्रतिक्रिया मिळेल?

तात्त्विक झोंबी

तात्त्विक झोंबींना जर मानवाचे सर्व फिजिकल ऍट्रिबुट्स असतील तर त्यांच्या वातावरणाला (उदा. टाचणी टोचणे) प्रतिक्रियाही मानवांप्रमाणे भिन्न असतील, असे वाटते. तात्त्विक झोंबींच्या प्रतिक्रिया आणि मानवी प्रतिक्रिया यांच्यात फरक असण्याची शक्यता फक्त मानवांमध्ये काही अशारीर आहे हे मान्य केल्यास किंवा मानवाचे शारीर झोंबींमध्ये पूर्णपणे उतरवणे नाही यामुळेच घडेल असे वाटते.

पळवाट: माझा क्वालिया वगैरे संकल्पनांच्या अभ्यास नाही. तेव्हा माझे मत चुकीचे असू शकते.

अंदाजपंचे

आधुनिकोत्तरवादाचे परिणाम नेमके काय आहेत?
आधुनिकोत्तर म्हंजी काय हेच काय क्लियर न्हाय त्यामुळं परिणाम काय सांगता येणार न्हाय.

आधुनिकोत्तर म्हंजी पुन्हा इतिहासातल्या गोष्टींकडं नव्या दृष्टीनं पाहणं.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

आधुनिकोत्तर

आधुनिकोत्तर चळवळीत इतालो काल्व्हिनो यांचे नावही घेतले जाते. त्यांच्या बॅरन इन द ट्रीज या पुस्तकाची ओळख इथे.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

हत्तीभोवतीचे आंधळे

दीड महिन्याने धागा पुन्हा वर आला आहे परंतु "हे पुस्तक वाचा आणि तो चित्रपट बघा" असे इम्पिरिकल ज्ञान खूपच विसविशीत वाटते आहे. त्यातून आधुनिकोत्तरवाद समजाविण्यापेक्षा कोणीतरी सरळपणे व्याख्या, वर्णन, गुणधर्म, वैशिष्ट्ये, आधुनिकतेपेक्षा वेगळेपणा, इ. सांगावे ही विनंती.

 
^ वर