धर्म की विज्ञान: या द्वंद्वयुद्धाचा बळी (उत्तरार्ध)


पास्कलची प्रतिभा केवळ गणितातील नव्या नव्या सिद्धांतापुरतीच मर्यादित नव्हती. तो मुळातच एक प्रायोगिक वैज्ञानिक होता. सैद्धांतिक पातळीवरील विज्ञानापेक्षा प्रत्यक्ष प्रयोग करूनच तत्व वा गृहितकं स्वीकारावीत यावर त्याचा कटाक्ष होता. म्हणूनच त्याला वैज्ञानिक व गणितीय तत्वज्ञ
म्हणून वैज्ञानिक जग ओळखते. इव्हांजेलिस्टा टोरिसेल्ली (1608 - 1647) या वैज्ञानिकाने वातावरणातील दाबाविषयी काही संकल्पना मांडल्या होत्या. या जगात पूर्ण निर्वात अशी एकही जागा सापडणार नाही या अरिस्टॉटलच्या (384 क्रि.पू - 322 क्रि.पू ) जुन्या विधानालाच टोरिसेल्लीने आव्हान दिले होते. अरिस्टॉटलला जगभर ईश्वराचे अस्तित्व असते यावर विश्वास होता. त्यामुळे निर्वात असे काही असूच शकत नाही, असे त्याला वाटत होते. पास्कल मात्र टोरिसेल्लीच्या विधानाचा शहानिशा करण्यासाठी प्रयोग करण्याचे ठरवून पार्‍याने भरलेले वायुभारमापक घेवून वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या शहरांना आपल्या मेव्हण्याला पाठवले. याच निर्वातीकरणाच्या आधारे आणखी काही प्रयोग करून द्रवगतिकी व द्रवस्थितिकी या ज्ञानशाखाशी निगडित द्रवीय द्रायुविषयी पास्कलने काही मूलभूत मांडणी केली. सिरिंजची कल्पना या अभ्यासातून उद्भवली. दाब व उंची यातील संबंधाविषयीचा पास्कलचा नियम भौतिकीत सुप्रसिद्ध आहे.

पास्कल हा रेने देकार्ते (1596-1650) , व पियरे फेर्मा(1601-1647) या फ्रान्समधील गणितींचा समकालीन होता. पास्कलची देकार्तेबरोबरची भेट तेवढी उत्साहवर्धक नव्हती. देकार्तेला जेसुइट्स चांगले काम करत आहेत यावर विश्वास होता. परंतु पास्कल जान्सेनिस्ट असल्यामुळे त्यांचे पटत नसावे. याव्यतिरिक्त टोरिसेल्लीच्या बारोमीटरचे प्रयोग पास्कलने चोरले असा देकार्तेचा आक्षेप होता. शिवाय एवढ्या तरुण वयात पास्कल विज्ञान व गणित याविषयात एवढी प्रगती करू शकतो, यावर विश्वास ठेवायला तो तयार नव्हता. परंतु देकार्ते सज्जन असल्यामुळे या तरुणाला पोटदुखीवर उपाय म्हणून सकाळच्या 11 वाजेपर्यंत झोपण्यास व रोज बीफ टी पिण्यास सांगितले. परंतु पास्कलने हा सल्ला केवळ देकार्ते यानी दिला म्हणून दुर्लक्ष केले.

पास्कलची बहिण मात्र त्याच्या मागे हात धुवून लागली होती. तिच्या दृष्टीने हा भाऊ गणित व विज्ञान यांच्या मागे लागून वाया गेला होता. बहिणीचा ईश्वराला शरण जा या आक्रस्ताळेपणामुळे पास्कलला वेड लागायची पाळी आली. पुढची दोन वर्षे पास्कल धर्मविषयक विचारात गुंतला. या काळाच तो पूर्णपणे धर्माच्या आहारी गेला होता. उलट हाच बहिणीला चर्चमध्ये जोगीण (nun) होण्यासाठी आग्रह धरू लागला. आधुनिक मानसतज्ञांच्या मते पास्कलच्या वर्तनाचे विश्लेषण केल्यास लैंगिक निग्रह (repression) वा धर्माची ओढ यामुळे माणूस अर्धवेड्या अवस्थेत असतो. पास्कल या दोन्ही गोष्टींचा बळी ठरला. त्यानी लिहिलेल्या The Pensées या धर्मविचार संकलनामधून त्याच्या वेडसर वर्तनाचे रहस्य उलगडू शकते असे मानसतज्ञांना वाटते. एकदा तर त्याने 2-4 तास (दिवस!) भावसमाधीत (trance) गेल्यासारखे करत स्वत:ला दैवी साक्षात्कार झाला आहे असे म्हणत होता. ईश्वरी आवाज त्याच्यापर्यंत पोचलेला होता व त्या ऐकलेल्या गोष्टी त्याने एका कागदावर लिहून आपल्या कोटाच्या खिशात आतल्या बाजूस शिवून ठेवले. एखाद्या ताइताप्रमाणे ते कागद व कोट त्याने जन्मभर संभाळले. आपण सर्व पापी आहोत व फक्त ईश्वराची कृपाच आपल्याला पापातून मुक्त करू शकते अशा भ्रमावस्थेतच तो त्या काळी वावरत होता. याच अवस्थेत असताना त्याने भरपूर काही लिहून ठेवले व त्यां याविषयी मूलभूत मांडणी केली. ची संकलित केलेली पुस्तकं The PenséesThe Provincial Letters या नावाने फ्रेंच साहित्यातील अजरामर कृती म्हणून ख्याती पावल्या. ईश्वर, ईश्वरी साक्षात्कार, मुक्ती, धर्मशास्त्र अशा गोष्टी डोक्यात असतानासुद्धा विज्ञान व गणित याबद्दल विचार करणे पास्कालने सोडून दिले नाही, हे विशेष. याच काळात त्याने cycloid याविषयी मूलभूत मांडणी केली.


ऐन तारुण्यात असताना पास्कल बाई व बाटलीमागे लागला अशीसुद्धा अफवा पसरली होती. त्यासाठी त्याच्या चेव्हालियर डि मेरे (Chevalier de Mere) या जुगारी मित्राची साक्ष काढली जाते. परंतु या जुगारी मित्राला मदत करण्याच्या निमित्ताने संभाव्यता सिद्धांत (Probability Theory) या गणितातील नव्या ज्ञानशाखेचा पायाच पास्कल यानी घातला. जुगार, लॉटरी, रेस, मटका यासारख्या बेभरवशाच्या गोष्टी तर्कशुद्धपणे विचार करण्यासारखे असू शकतात यावर आपला विश्वास बसणार नाही. परंतु त्याकाळचा अजून एक गणितज्ञ, पियरे फेर्मा यांच्या पत्रोत्तरामधून संभाव्यता सिद्धांताचा विकास झाला असे म्हणता येईल. याच काळी त्याची सुप्रसिद्ध पास्कल त्रिकोन ही संकल्पनासुद्धा विकसित झाली.याचा वापर मुख्यत्वेकरून द्विपद समीकरण (binomial equations) सोडवण्यात होतो. लास वेगाससारख्या जुगारी शहरातील जुगारी अड्ड्यावर दिसणार्‍या रौलेट चक्राचा आराखडासुद्धा त्याच्या डोक्यातील निरंतर (perpeual) यंत्राच्या कल्पनेवरून त्याला सुचली. संभाव्यता सिद्धात हा केवळ लॉटरीतील क्रमांक काढण्यासाठी किंवा जुगार, रेस सारख्या खेळासाठी नसून अर्थशास्त्र, विमाविज्ञान, यासारख्या सामाजिक व आर्थिक व्यवहारातील गोष्टींचा तर्कशुद्धपणे नियोजन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. परमेश्वरावर विश्वास का ठेवावा याचे समर्थन करणारी पास्कल वेजरची मांडणीसुद्धा याच सिद्धांताची फलश्रुती होय.

अशा प्रकारे विज्ञान व गणित याविषयी अत्यंत महत्वाचे कार्य करत असतानासुद्धा ईश्वर व धर्म हे त्याचा पिच्छा सोडत नव्हते. एकदा घोडागाडीतून जात असताना गाडीला अपघात होऊन घोडा मेला व पास्कल वाचला. परंतु पास्कलला मात्र आपल्याला प्रत्यक्ष ईश्वरानी अपघात स्थळी येऊन वाचविले यावर विश्वास बसला. अजून एका प्रसंगामुळे ईश्वरावरील त्याची श्रद्धा वाढतच गेली. त्याची एक भाची काही काळ अंथरुणाला खिळून होती. डोळ्यातून व नाकातून सारखे पू येत असल्यामुळे ती हैराण झाली होती. काही उपचार केले तरी तिला बरे वाटेना. त्याच वेळी तिथल्याच एका बाईने येशू ख्रिस्ताला फासावर चढवलेल्या खांबाचा खिळा आहे असे म्हणत भाचीच्या पोटावर खिळा फिरवली. भाचीच्या वेदना थांबल्या, ताप उतरला व काही दिवसातच ती ठणठणीत बरी झाली. उपचार करणारे डॉक्टर्स हा एक दैवी चमत्कारच आहे म्हणून लिहून दिले.या चमत्कारावर पास्कलचा पूर्ण विश्वास बसला.

या सर्व गोष्टी घडत असताना त्याची प्रकृती ढासळत होती. रोगजर्जर असणे हीच खर्‍या कॅथोलिकची स्वाभाविक स्थिती असते व त्यामुळे ईश्वरी साक्षात्कार होतो या त्याकाळच्या समजुतीप्रमाणे तो सर्व वेदना सहन करत होता. याच स्थितीत तो 19 ऑगस्ट 1662 रोजी वयाच्या 39व्या वर्षी कालवश झाला. त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या शरीराचे पोस्टमार्टेम केल्यानंतरच तो आयुष्यभर पोटाचा कर्करोग वा क्षय रोगांचा रुग्ण होता हे कळू शकले. त्याच्या मेंदूतही बिघाड होता हेही त्यावेळी कळले.

पास्कलच्या स्मरणार्थ दशमान पद्धतीतील (S I units) दाब मोजण्यासाठी ’पास्कल’ हे एकक आपण वापरत आहोत. त्यामुळे तो आपल्या आठवणीतून कधीच निघून जाणार नाही. पास्कल ही एक संगणक भाषा होती हेही काहींच्या स्मरणात असेल. पास्कलच्या प्रगल्भ प्रतिभेचा अंदाज घेण्यासाठी यानी कुठले कुठले शोध लावले याची यादी करण्यापेक्षा अजून कुठल्या कुठल्या शोधांना त्याचा हातभार लागला असता यावरच इतिहासलेखक विचार करत असतात. त्यानी मांडलेले सिद्धांत वा गृहितकं काही काळानंतर कुणीतरी नक्कीच शोधले असते परंतु पास्कल हा एकमेवाद्वितीय असा वैज्ञानिक होता यावर मात्र आपल्या सर्वांचे एकमत असेल!

संदर्भ:
Men of Mathematics - E T Bell
The Drunken Walk - Leonard Mlodinow
The Faith of Scientist - Nancy Frankenberry

Comments

ब्लेझ् पास्कलः दुर्लक्षित्त तत्वज्ञ

+१

दोन्ही लेख अतिशय आवडले. या शास्त्रज्ञाची तुम्ही फारच सुंदर ओळख करून दिली आहे. या प्रमाणेच इतर शास्त्रज्ञांची ओळख जरूर करून द्यावी. एक चांगली मालिका होईल.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अतिशय सुंदर

फारच सुरेख ओळख. पास्कलबाबत ही माहिती नव्हती. इतर शास्त्रज्ञांचीही अशीच ओळख करून द्यावी.

रोचक

सर्वप्रथम – लेख माहितीपूर्ण आहे. सुंदर आहे. जॉन नॅश (अ ब्युटिफुल माइंड) ची आठवण झाली.

सोबतच बरीच रोचक माहिती आणि त्याहूनही रोचक विश्लेषण वाचायला मिळाले.

त्याच्या मेंदूतही बिघाड होता हेही त्यावेळी कळले.

पोस्ट मार्टेममध्ये हे असे समजते, आणि पास्कलच्या काळातही असे समजत होते यावरून अंधारयुगाला दूर लोटणारे आधुनिक विज्ञान किती पुढे गेलेले आहे याची साक्ष पटते. असे बिघाड असूनही हा मनुष्य माणूस चाइल्ड प्रॉजिडी होता. प्रोबॅबिलिटी थियरीचा पाया घालणारा महान गणिती होता. पास्कल त्रिकोण, पास्कल वेजर आदि संकल्पनांचा कर्ता होता. फ्रेंच साहित्यातील अजरामर कृतींचा निर्माता होता. (त्या कृती त्याने भ्रमिष्टावस्थेत लिहिल्या होत्या हा भाग निराळा.) गणिती होता, साहित्यिक होता, तत्त्वज्ञ होता. हे सर्व अव्वल दर्जाचा होता. यावर विश्वास बसणे कठीण जाते. यामुळे याला अपवादात्मक उदाहरण म्हणावे, की निसर्गाचा ‘चमत्कार’ म्हणावे, की ‘बिघाड नसलेल्या नॉर्मल’ मेंदूंनाच बिघाड असलेले मेंदू म्हणावे असे प्रश्न मनात उभे राहिले आहेत.

बहिणीच्या धार्मिक आक्रस्ताळेपणाला कंटाळून (नॉर्मल मेंदूवाला) एखादा कडवा धर्मद्वेष्टा बनला असता. पण पास्कलने उलट स्वत:च सवाई धार्मिक आक्रस्ताळी बनून त्याच बहिणीला नन व्हायला भाग पाडले यात त्याची विनोदबुद्धी दिसून येते की सूडबुद्धी (की ‘वेडबुद्धी!’) हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

लैंगिक निग्रह आणि धर्माची ओढ या दोन्हींचा बळी ठरलेल्या बिचाऱ्या पास्कलविषयी बाई-बाटलीच्या अफवा पसरल्या होत्या. अशा अफवा पसरवणाऱ्या अंधारयुगीन समाजाचा निषेध करावा तितका थोडाच. ही अफवाच. कारण हे खरे असते, तर लैंगिक निग्रह नव्हता, तसेच धर्माचीही ओढ नव्हती हे सिद्ध होते. अर्थात युवर ऑनर, पास्कल अर्धवेडा नव्हता, त्याचे वर्तन वेडसर नव्हते असे म्हणावे लागते. परंतु आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढल्याप्रमाणे तसेच पोस्ट मार्टेमने सिद्ध केल्याप्रमाणे पास्कल अर्धवेडा/ वेडसर होता. हेन्स द प्रूफ. अफवाच.

आता कुणी म्हणेल, की पास्कल धर्म आणि विज्ञान यांच्यातल्या द्वंद्वाचा बळी कसा काय ठरतो? त्याचे तर मजेत हे शीक ते शीक, हा प्रयोग कर, तो प्रयोग कर चाललेले होते. त्यांच्या हे 'बळी' प्रकरण लक्षात येत नाही याला कारण आहे त्यांचा पूर्वग्रह. त्यांना वाटते पास्कलने सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. इकडूनही आणि तिकडूनही. विज्ञानाच्या मार्गाने आणि धर्माच्या मार्गाने. अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते सारखे भंपक विचार त्यांच्या मनात रुंजी घालत असतात. पास्कलसारख्या वैज्ञानिकाने The Pensées मध्ये ‘रीझन’ च्या मर्यादांविषयी सखोल भाष्य केलेले असले तरी ते मनावर घेण्याचे कारण नाही. या ग्रंथाला ख्रिश्चन अँथॉलॉजीमध्ये मानाचे स्थान असले तरीही ते एका वेडसर माणसाने भ्रमिष्ट अवस्थेत लिहिलेले आहे हे विसरता कामा नये. त्याच्या वेडाचे मूळ शोधण्याचे ते एक साधन आहे, एवढेच त्याचे मोल. मुळात धर्माचा वगैरे मार्ग नसतोच. वेडसर मनाचे ते खेळ आहेत हे आधुनिक मानसतज्ञांनी सिद्ध केलेले आहेच. पोस्ट मार्टेमचाही पुरावा आहे. धर्माचा नाद पास्कलने वेळीच सोडला असता तर त्याच्या मनाची ओढाताण झाली नसती. दैवी वाणी ऐकून (अजरामर साहित्य वगैरे निर्माण करण्याच्या भानगडीत) वेळ घालवला नसता, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोटाच्या आजारावर वेळीच औषधे घेऊन शंभरेक वर्षे जगला असता. आधुनिक वैद्यकशास्त्रावर त्याने विश्वास ठेवला नाही, स्वत:च्या प्रयोगशील वृत्तीचे प्रयोग स्वत:च्याच शरीरावर करत बसला आणि अकाली गेला. हीच खरी शोकांतिका आहे. आणि या शोकांतिकेचा खलनायक आहे धर्म. ही शोकांतिका लेखकाने अतिशय समर्थपणे मांडलेली आहे.

अवांतर - अंधारयुग जरासे लवकर सरून पोस्ट मार्टेमचे कल्चर मध्ययुगीन भारतात आले असते तर बरेचसे तथाकथित संतसाहित्य मेंदूत बिघाड असलेल्यांनी भ्रमिष्टावस्थेत लिहून ठेवलेले आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झाले असते आणि आपल्या समाजाची अंधश्रद्धांच्या मगरमिठीतून कायमची मुक्तता झाली असती यात संशय नाही. शिवाय अवाढव्य मंदिरांच्या बांधकाम आणि मेंटेनन्सवरचा खर्च वाचून तोच पैसा रस्ते, पूल आदि बांधकामाकडे वळवून औद्योगिक क्रांतीचा पाया भारतातच घातला गेला असता यातही शंका नको. असल्या भ्रमिष्ट कल्पनांना कवटाळून बसणाऱ्या भारतीयांच्या मेंदूतच एखादा कॉमन बिघाड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दिशेने आधुनिक मानसतज्ञांनी अत्याधुनिक वैज्ञानिक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.

प्रॉजिडीची ट्रॅजेडी

हा मनुष्य माणूस चाइल्ड प्रॉजिडी होता

चाईल्ड प्रॉडिजी

थँक्स!

अजून ते मनुष्य, माणूस असे दोनदा झालेले आहे. ती पण एक ट्रॅडेजी - आपलं- ट्रॅजेडी आहे.

यू आर् वेलकम

:-)

सहमत!

श्री. राजा यांच्याशी सहमत आहे.

बिपिन कार्यकर्ते

:)

तुम्ही लिहिलेली बहुतेक औपरोधिक मते मी मात्र गांभीर्याने बाळगतो.
स्पष्टच लिहितो की 'साक्षात्कार होणे' हे मनोरोगाचे लक्षण आहे.
हवे तर येथेच अवांतर राडा करूया किंवा हवे तर नवा धागा काढा, निवड तुमचीच आहे.

सहमत

आळश्यांच्या राजाने नवा धागा काढावा.

=))

"निरोगी व्यक्तींनाही (अर्धवट झोप, काही औषधे, इ. कारणांनी) भास होऊ शकतात" हा कॅवियाट (अपवाद) वरील प्रतिसादात नमूद करणे राहून गेलेले असूनही आळशांचा_राजा यांनी प्रतिवाद केला नाही हे निरीक्षण त्यांच्या आवेशपूर्ण टीकेच्या पार्श्वभूमीवर आश्चर्यकारक आहे.

वरून गेले!

सॉरी! समजले नाही.

आवेश, राडा, इ.

लेखात घेतल्या गेलेल्या पवित्र्याला उद्देशून एक औपरोधिक प्रतिसाद लिहिला. त्यात मला काय म्हणायचे आहे ते पोचलेले दिसते. मग त्याला उत्तर देण्याऐवजी ‘नवीन धागा काढा’, इथेच अवांतर ‘राडा’ करुया का, हे डोक्यावरुन गेले. राडा करायचा असेल तर त्याला माझी संमती कशाला हवी? खुशाल करा. नवीन धागा मी कशावर काढावा अशी मागणी आहे? पास्कलवर? की नानावटीसाहेबांनी पास्कलच्या वेडसर भ्रमिष्टपणावर केलेल्या टिप्पणीसंबंधी? प्रतिवाद करायचा आहे तर करा ना. प्रतिसाद इथेच आहे. वाचलेला आहे. उपरोध समजलेला आहे. मग वाट कशाची बघताय?

आपापली मते आहेत. अवश्य मांडावीत. हे राडा प्रकरण काय आहे समजले नाही.

मुळातच साक्षात्कार इ. मनोविकृत प्रकारांना मानणारे माझे डोके तर्कमीमांसेत कमी पडत असावे. त्याशिवाय मला तुमचे तर्कसंगत उपप्रतिसाद झेपले नाहीत.

मते

"संतांना साक्षात्कार झाले ते भास नव्हते, काहीतरी खरेच अनुभवले होते" हे तुमचे विधान आहे. मी म्हणतो की तुमचे विधान निराधार आहे." प्रतिवाद तुम्ही करायचा आहे, तुम्ही केलेल्या विधानाला तुम्ही आधार दिलेला नाही.
आमच्या मतांचा आधार असा की शास्त्रीय अभ्यास केला गेला त्या सर्व व्यक्तींचे साक्षात्कार हे भास होते आणि ते मानसिक बिघाडांमुळे झालेले असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे, सर्वच उदाहरणांत 'मानसिक बिघाड' हे एकच स्पष्टीकरण देणे पुरेसे असते. तुम्ही पर्यायी स्पष्टीकरणांसाठीचे आधार (=खरेच काहीतरी अस्तित्वात होते तेव्हाच संतांना साक्षात्कार झाले याचे पुरावे) देत नाही तोवर हेच स्पष्टीकरण लागू राहते.
अधिक माहिती

प्रतिवाद

प्रतिवाद तुम्ही करायचा आहे

मी प्रतिवादच केलेला आहे. औपरोधिक आहे एवढेच. सोयीसाठी उपरोध बाजूला ठेऊन पुन्हा करतो.

“संतांना साक्षात्कार झाले ते भास नव्हते, काहीतरी खरेच अनुभवले होते” हे विधान (येथे) मी केलेले नाही. त्यांना साक्षात्कार झाले ते भास होते असे (किंवा तत्सम) म्हणण्याच्या पवित्र्याला औपरोधिक आक्षेप घेतलेला आहे. दोन्हींमध्ये फरक आहे.

लेखात घेतला गेलेला पवित्रा निराधार आणि विसंगत आहे हा माझा प्रतिवाद आहे.

कोणता पवित्रा, तर धर्म/ साक्षात्कार यासंबंधी काहीही उल्लेख आले की ते आक्रस्ताळी, वेडसर, भ्रमिष्ट असतात. हा पवित्रा घेताना आपण किती विसंगत भूमिका घेत आहोत हे लेखकाच्या लक्षात आलेले दिसत नाही. एका बाजूला पास्कलच्या अद्वितीय बौद्धिक आणि (अर्थातच मानसिक) क्षमतांचे गोडवे गायचे, आणि त्याचसोबत तो वेडसर होता अशी विधाने करायची. का, तर केवळ त्याने धर्म, साक्षात्कार या गोष्टींविषयी रस दाखवून त्यासंबंधात काही अभ्यास केला, ते न नाकारता, न खोडता. म्हणजे, इथे, त्याने धर्म नावाचा प्रकार खोडायला हवा होता हा अट्टाहास आहे. गेलाबाजार दुर्लक्षित तरी करायला हवा होता अशी अपेक्षा आहे.

पास्कल प्रयोगशील होता हे एका बाजूला म्हणायचे, आणि तसेच प्रयोग त्याने धर्माच्या/ अध्यात्माच्या क्षेत्रात केले असतील तर ते मात्र नाकारायचे. आणि या पवित्र्याला आधार म्हणून बिचारा पास्कल धर्म आणि विज्ञान यांच्यातल्या तथाकथित द्वंद्वाचा ‘बळी’ ठरला असे चित्र रंगवायचे. तो बळी कसा काय ठरतो हे लेखात कुठेच स्पष्ट होत नाही. त्याच्यावर धर्मसंस्थेने काही कशाची सक्ती केलेली नव्हती. त्याचा कॉन्शस चॉइस होता. मग म्हणायचे, तो काळच तसा होता, त्या काळातील विचारांना बिचारा बळी पडला. यातही विरोधाभास आहे. त्या विचारांना बळी पडला म्हणले तर मग तो सायंटिफिक टेम्परामेंट बाळगून असलेला महान वैज्ञानिक होता हे म्हणता येणार नाही. माणूस एकतर शहाणा असेल किंवा भंपक असेल. तो दोन्ही होता असे या लेखात म्हटले आहे. असे म्हणण्याच्या सोयीसाठी मग तो ‘बळी’ असल्याची थियरी मांडली आहे. मेंदूत बिघाड असल्याचा पुरावा दिलेला आहे. पोस्ट मार्टेम मध्ये मेंदूत बिघाड असलेला समजतो हे मला माहीत नव्हते. पास्कलच्या काळात मेंदूचा एवढा अभ्यास झाला असेल, आणि त्यात मेंदूतील बिघाड समजत असेल यावर माझा विश्वास नाही. मेंदू जरासा वेगळा असल्याचे एकवेळ समजेल असे मी मानतो, पण वेगळा म्हणजे बिघडलेला हे कसे ठरवणार? काही भाग मिसिंग असल्यावर?

आधुनिक मानसतज्ञांनी त्याच्या व्यक्तीमत्त्वाचे विश्लेषण केल्याचा दाखला दिला आहे. काय विश्लेषण केले तर त्याने लिहिलेल्या धार्मिक/ आध्यात्मिक ग्रंथांमध्ये त्याच्या वेडाचे मूळ सापडू शकते असा विचार मांडला आहे. पास्कलने नेमका काय वेडेपणा केला हेही स्पष्ट केलेले नाही. तीन चार दिवस/ तास तो ट्रान्समध्ये होता (किंवा त्याला तसे वाटले) हा त्याच्या वेडाचा पुरावा! अपघातातून वाचल्यावर आपल्याला ईश्वराने वाचवले अशी (अंध!)श्रद्धा बाळगली हा त्याच्या वेडाचा पुरावा! हे ग्रंथ साहित्यातील अजरामर कृती आहेत असे एका बाजूला म्हणायचे, आणि त्यातच लेखकाच्या वेडाचे मूळ सापडते म्हणायचे याला विसंगती म्हणतात. बरं, हे आधुनिक मानसतज्ञ असं म्हणत नाहीत, की पास्कलने जे अजरामर शास्त्रीय शोध लावले त्यातच त्याच्या वेडाचे मूळ सापडू शकते. जर माणूस वेडाच्या भरात उत्कृष्ट साहित्यकृतीला जन्म देऊ शकतो, थिऑलॉजिकल भाष्य करू शकतो, तर तो वेडाच्या भरात संगणकाचा पाया घालू शकतो, प्रोबॅबिलिटी थियरी मांडू शकतो, इत्यादि. मग त्याच्या असामान्य, काळाच्या पुढे असलेल्या वैज्ञानिक विचारांतच त्याच्या वेडाचे मूळ सापडू शकते असे का म्हणत नाही अत्याधुनिक मानसशास्त्र?

पास्कल बळी वगैरे काही नव्हता. धर्म आणि विज्ञान यांच्यातील तथाकथित द्वंद्वाचा तर मुळीच नाही. खरं तर तो एक अनमोल ठेवा आहे. आध्यात्मिक प्रयोगशीलतेच्या क्षेत्रातील. त्याने लिहिलेल्या The Pensées मध्ये (कदाचित) त्याच्या वेडाचे मूळ सापडू शकते याऐवजी मी असे म्हणेन, की या ग्रंथात (कदाचित) पास्कलला अनुभवाअंती गवसलेली आध्यात्मिक सत्ये सापडतील. ज्या सायंटिफिक टेम्परामेंटने त्याने आयुष्यभर विज्ञानाचा वेध घेतला, त्याच टेम्परामेंटने त्याने अध्यात्माचाही अभ्यास केला. त्याशिवाय अजरामर साहित्यकृती निर्माण होणार नाही.

आपल्याला अध्यात्म मान्य नसेल तर ठीक आहे. नसेना मान्य. पण ज्या (आपल्याच मते श्रेष्ठ वैज्ञानिक) माणसाला ते मान्य होते, त्यात त्याने प्रयोग केले, त्या निष्ठेपायी औषधोपचार देखील न करवता वेदनेने विव्हळत राहणे पसंत केले, प्राण जाईपर्यंत, त्याच्या या प्रयोगशीलतेला, निष्ठेला सलाम करायला हवा. ते राहिले बाजूला. त्याला चक्क वेडा म्हणून त्याची संभावना करायची! म्हणजे आपण शहाणे. तो वेडा. कितीही महान शास्त्रज्ञ असेना का. वेडाच तो. धर्माविषयी बोलतो. चक्क समर्थन करतो अंधश्रद्धांचे. म्हणजे वेडाच.

या पवित्र्याला आक्षेप आहे. पर्यायी स्पष्टीकरणाचे आधार मला मागत आहात. मी लेखातील विसंगती पुरेशी स्पष्ट केलेली आहे. ती दूर करा. पर्यायी स्पष्टीकरणाचा आधार त्यातच लपलेला आहे. एखादी गोष्ट तर्कसंगत असेल, तर स्वयंसिद्ध असते. वेगळ्या आधाराची आवश्यकता नसते.

आमच्या मतांचा आधार असा की शास्त्रीय अभ्यास केला गेला त्या सर्व व्यक्तींचे साक्षात्कार हे भास होते आणि ते मानसिक बिघाडांमुळे झालेले असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे, सर्वच उदाहरणांत 'मानसिक बिघाड' हे एकच स्पष्टीकरण देणे पुरेसे असते.

कोणाकोणाचा असा शास्त्रीय अभ्यास केला गेला आणि मानसिक बिघाडांचे सत्य शोधले गेले यावर आपणच एक सविस्तर धागा काढावा अशी मी विनंती करतो. अधिक माहितीचा जो दुवा दिलेला आहे, त्यात या विषयावरची कोणतीही अधिक माहिती मिळाली नाही. महंमद आणि येशू हे आपल्या मते भ्रमसेन आहेत ही आपल्याविषयीची माहिती अवश्य मिळाली.

निराधार आक्षेप

“संतांना साक्षात्कार झाले ते भास नव्हते, काहीतरी खरेच अनुभवले होते” हे विधान (येथे) मी केलेले नाही. त्यांना साक्षात्कार झाले ते भास होते असे (किंवा तत्सम) म्हणण्याच्या पवित्र्याला औपरोधिक आक्षेप घेतलेला आहे. दोन्हींमध्ये फरक आहे.

कोणता फरक?

त्या विचारांना बळी पडला म्हणले तर मग तो सायंटिफिक टेम्परामेंट बाळगून असलेला महान वैज्ञानिक होता हे म्हणता येणार नाही. माणूस एकतर शहाणा असेल किंवा भंपक असेल.

असे आवश्यक नाही. अनेक प्रतिभावंतांच्या मेंदूत बिघाड असतात, होते. त्यामुळे त्यांना विक्षिप्त इ. म्हटले जाते. एका कार्यक्षेत्रात बुद्धिमान आणि दुसर्‍यात मठ्ठ अशी व्यक्ती शक्य आहे. किंबहुना, "मेंदूत काहीतरी 'झोल' असल्याशिवाय नवे विचार सुचणारच नाहीत" ही शक्यताही खुली आहे.

बरं, हे आधुनिक मानसतज्ञ असं म्हणत नाहीत, की पास्कलने जे अजरामर शास्त्रीय शोध लावले त्यातच त्याच्या वेडाचे मूळ सापडू शकते. जर माणूस वेडाच्या भरात उत्कृष्ट साहित्यकृतीला जन्म देऊ शकतो, थिऑलॉजिकल भाष्य करू शकतो, तर तो वेडाच्या भरात संगणकाचा पाया घालू शकतो, प्रोबॅबिलिटी थियरी मांडू शकतो, इत्यादि. मग त्याच्या असामान्य, काळाच्या पुढे असलेल्या वैज्ञानिक विचारांतच त्याच्या वेडाचे मूळ सापडू शकते असे का म्हणत नाही अत्याधुनिक मानसशास्त्र?

कारण "धर्म हा मूर्खपणा आहे, विज्ञान नव्हे" हा लेखाचा आरंभबिंदू (प्रेमिस) आहे. तो नाकारण्यासाठी तुम्हाला धर्माच्या दाव्यांना आधार द्यावा लागेल.

त्याला चक्क वेडा म्हणून त्याची संभावना करायची! म्हणजे आपण शहाणे. तो वेडा. कितीही महान शास्त्रज्ञ असेना का. वेडाच तो. धर्माविषयी बोलतो. चक्क समर्थन करतो अंधश्रद्धांचे. म्हणजे वेडाच.

होय. त्याच्या धार्मिक मतांची वैज्ञानिकता सिद्ध होत नाही तोवर तसेच म्हणणे योग्य आहे. विज्ञानात व्यक्तीपूजा नसते याचे हे चांगले उदाहरण आहे. चूक ते चूक, महान शास्त्रज्ञ असण्याचा संबंध नाही.

कोणाकोणाचा असा शास्त्रीय अभ्यास केला गेला आणि मानसिक बिघाडांचे सत्य शोधले गेले यावर आपणच एक सविस्तर धागा काढावा अशी मी विनंती करतो.

एक उदाहरण.

पास्कल

एस् आय् युनिटस मधे पास्कल हे दाबासाठी नेहमीच वापरले जाते. न्युटन (बल) आणि पास्कल (दाब) या जोडगोळीचे नाव त्यामुळे बहुतेक सिविल, मेकॅनिकल अभियंत्यांना वापरावे लागते. पास्कलच्या नावावर एका संगणकभाषेला नाव दिले होते. फोर्ट्रॅनचा मोठा भाऊ अशी त्याची ओळख होती. अशी नावाची उजळणी होत असली तरी पास्कलने काय केले हे इतिहास वाचल्याशिवाय समजले नाही.

पास्कलची एक उत्तम ओऴख करून दिल्याबद्दल धन्यवाद. पास्कल हा पाहिले तर शिवाजी औरंगजेब यांचा समकालीन (थोडा पूर्वीचा).
तो एका श्रीमंत घराण्यातून आला होता. त्याने केलेल्या लाकडी कॅल्क्युलेटरचे त्याने पेटंट घेतले होते. हेच डिजाईन वापरून, फ्रान्समधील एका सुताराने तसेच उपकरण बनवले. त्या विरुद्ध त्याने कोर्टात लढा दिला. असे काहीसे मी वाचले होते. याची आठवण येण्याचे कारण म्हणजे पेटंट घेणे आणि त्याची राखण करणे या संस्कृतीत युरोप किती आधी गुंतला होता हे मला कळले.

पास्कलने केलेल्या यंत्राची रचना कुठे पाहायला मिळाली नाही. मधे विमानाच्या शोधाला १०० वर्षे होण्याच्या निमित्ताने राईट बंधूंनी केलेले विमान १:१० च्या स्केलला करून उडवून दाखवण्याची स्पर्धा झाली होती. तशीच स्पर्धा पास्कलचे यंत्र लाकडात बनवून ते वापरून दाखवण्याची व्हावी असे वाटते.

प्रमोद

उत्तम लेख

पास्कलची करून दिलेली ओळख आवडली. पास्कल ही संगणकी भाषा कॉलेजात शिकल्याने पास्कल थोडाफार ओळखीचा होता पण इतकी विस्तृत ओळख नव्हती. (पास्कल नावाच्या भाषेचा आता र की ट आठवत नाही ही गोष्ट वेगळी)

उपक्रमावर या मालिकेची पुस्तक स्वरुपात बांधणी व्हायला हवी.

लेख आवडला, नेहमीप्रमाणेच!

लेख आवडला, नेहमीप्रमाणेच!

छान लेख

आपण इंडिगो बेबीज बद्दल वाचले का. मला त्यांची आठवण आली.

 
^ वर