मरणोत्तर देहाचं तत्त्वज्ञान?

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सुदाम्याचे पोहे'मध्ये 'मरणोत्तर' नावाचा एक गमतीशीर लेख आहे. मरणोत्तर कर्मकांडं आणि त्यांमागचं तत्त्वज्ञान (मुख्यतः हिंदू) यांची त्यात खास कोल्हटकरी शैलीतून खिल्ली उडवली आहे. त्यातल्या एका उतार्‍यातल्या एका उल्लेखाविषयी थोडे प्रश्न आहेत. मूळ उतारा खाली देत आहे.

आत्म्याच्या मरणोत्तर स्थितीबद्दल ज्ञान करून घेण्याचे एकही साधन नसल्यामुळे तिच्यासंबंधाने तर्कावरच भिस्त ठेवणे भाग पडते. त्या स्थितीविषयी भिन्न भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न विधाने केलेली आहेत. जीवितरूपी रंगभूमीवर केलेल्या कामाबद्दल प्रत्येक प्राण्यास त्या रंगभूमीच्या सूत्रधाराकडून योग्य पारितोषिक मिळून नंतर त्यास भिन्न भिन्न चौर्‍याऐंशी लक्ष सोंगे घेऊन त्याच रंगभूमीवर पुनः पुनः यावे लागते, असे एका धर्माचे मत आहे; तर पडद्यामागे गेलेल्या नटाचा पुनः त्या रंगभूमीशी कधीच संबंध येत नसून त्यास त्याच्या योग्यतेप्रमाणे स्वर्गसुख किंवा नरकयातना भोगीत अनंत कालपर्यंत राहावे लागते, असे दुसर्‍याचे मत आहे. एक धर्म आत्म्यास अखेर निवाड्याच्या दिवसापर्यंत मरणकालीन स्थितीतच तिष्ठत ठेवतो, तर दुसरा त्यास प्रथम अग्नीच्या आचीने शुध्द करून नंतर त्याची परलोकात स्थापना करतो. एक धर्म त्यास तिळाएवढासुध्दा देह देत नाही, तर दुसरा सतरा सत्त्वांचा अंगठ्याएवढा किंवा त्याहूनही मोठा देह देऊन आपले औदार्य प्रकट करतो. एक धर्म त्याची स्मरणशक्ती तशीच राहू देतो, तर दुसरा ती हिसकावून घेतो.

या उतार्‍यातले बरेचसे उल्लेख हिंदू/ख्रिस्ती/इस्लामी संकल्पनांचे आहेत. फक्त एका उल्लेखाविषयी संभ्रम निर्माण झाला. हा 'सतरा सत्त्वांचा अंगठ्याएवढा' देह कोणत्या तत्त्वज्ञानातला? आणि ही सतरा सत्त्वं कोणती? कुणास कल्पना असल्यास निरसन करावं ही विनंती.

Comments

'सतरा सत्त्वांचा अंगठ्याएवढा'

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*हा आपल्या औपनिषदिक तत्त्वज्ञानातच आहे.

अंगुष्टमात्रो पुरुषोSन्तरात्मा सदा जनानां हृदये संनिविष्टः |

असे एका उपनिषदात म्हटले आहे.
** सतरा तत्त्वे:

पंचविषय पंचभूते|पाच इंद्रिये घेतली येथे|
मन, आत्मा मेळवून तेथे|केली निश्चित सतरा हीं||

...एकनाथी भागवत
यात गंध,रस,रूप,स्पर्श,शब्द हे पाच विषय पंचेंद्रियांचे (नाक,जीभ,डोळे, त्वचा,कान)

रिकर्सिव!

आत्म्याचे एक सत्त्व आत्मा?
आणि यांची आठवण झाली.

होमंक्युलस

गमतीदार विचार :-)

अंगुष्ठमात्र होमंक्युलस असलेला तो "अंतरात्मा"; आणि सत्त्वांपैकी एक असलेला तो आत्मा ही वेगळी एकके असावीत.

माझ्या आजीच्या घरी एक "तांब्याचा तांब्या" आणि एक "स्टीलचा तांब्या" होता!

"तांब्याच्या तांब्याचे" पिंड पहिले वाटावे इतके स्वव्याख्याचक्रात गुंतलेले नव्हते - त्यात पाणी साठवताही येत असे.
त्याच्या नावातल्या एका "तांब्या" शब्दाचा अर्थ "घटक धातूविशेष" असा होता आणि दुसर्‍या "तांब्या" शब्दाचा अर्थ "विवक्षित आकाराचे छोटे तपेले" असा होता.
- - -
(मात्र खुद्द होमंक्युलस कल्पना - बाहुलीच्या पोटात बाहुलीच्या पोटात... - रिकर्सिव्ह आहे. अणूच्या आकारमानाची मर्यादा मानली नाही, तर याला काहीच अंत नसला तरी चालतो. मागे-पुढे आरसा ठेवून "अगणित" प्रतिबिंबे मी कित्येकदा बघितलेली आहेत. आरशातल्या चांदीच्या अणूच्या आकारापाशी पोचता प्रतिबिंबे थांबतात, बहुधा. पण अणू बघण्याइतकी सूक्ष्म दृष्टी नसल्यामुळे "कळते तितपत अगणित छोटी-छोटी प्रतिबिंबे दिसतात" असे म्हणता येते. )

- - -

:)

माझ्याकडे प्लॅस्टिकचे ग्लासही आहेत!

मात्र खुद्द होमंक्युलस कल्पना - बाहुलीच्या पोटात बाहुलीच्या पोटात... - रिकर्सिव्ह आहे.

सहमत.
ट्रिबल आणि गोडझिलासुद्धा गर्भारच जन्मतात.

मागे-पुढे आरसा ठेवून "अगणित" प्रतिबिंबे मी कित्येकदा बघितलेली आहेत.

'बघितली' म्हणजे डोळा मध्ये आला!

  1. १७९.९९° कोन असला तरी कधी ना कधी प्रकाश आरशाच्या बाहेर जाईल.
  2. अगणित आणि अनंत यांत थोडासा फरक आहे. प्रकाश सांत गतीने जात असल्यामुळे अनंत प्रतिमा परावर्तित होण्यासाठी अनंत वेळ लागेल!

धन्यवाद!

प्रतिसादांबद्दल धन्यवाद. म्हणजे सतरा 'सत्त्वे' नसून तत्त्वेच असावीत. आता हा मुद्राराक्षसाचा विनोद म्हणावा की उपसंपादकाच्या डुलक्या की कोल्हटकरांचाच दोष मानावा ते मात्र कळत नाही.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

तत्त्व आणि सत्त्वात फरक असावा ?

>>>सतरा 'सत्त्वे' नसून तत्त्वेच असावीत.
सत्त्व म्हणजे निव्वळ शुद्ध. दोष विरहित ती सत्त्व.
तत्त्व म्हणजे एक मुख्य विचार त्याला शुद्ध अशुद्ध असे काही नसावे.

-दिलीप बिरुटे

 
^ वर