सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण?
'लोकसत्ता' या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर पुष्पा भावे यांच्या नावे 'अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण' असे मत प्रसिद्ध झाले आहे.
चर्चाप्रस्तावाचा हेतू उपक्रमींना याबाबत काय वाटते हे जाणून घेण्याचा आहे
- हे मत टिपीकल 'गेले ते दिन गेले' प्रकारचे आहे का?
- सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण होत आहे का?
माझे मत, सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण होत आहे असे आहे. मराठी संकेतस्थळांचेच जर उदाहरण घेतले तरी, फुटकळ लेखनालाही वा वा म्हणत फेटे-शेमले उडवणारे कमी नाहीत. अशा दर्जाहीन लेखनामुळे व अनाठायी स्तुतीस्तुमनांमुळे ट्रॅफिक वाढत असले तरी दर्जा खालावत चालला आहे. शुद्धलेखनाची तमा न बाळगले जाणारे लेखन, व्याकरण न पाळले जाणारे लेखन यांची भलावण मराठीचे प्राध्यापकच करत असतात. इंजिनियरांचा दर्जा कसा घसरत चालला आहे याचा प्रस्तुत संकेतस्थळावर 'विसुनाना' या सदस्यांनी दिलेला प्रतिसादही यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
तुमच्या मतांच्या प्रतीक्षेत आहे.
Comments
उपचर्चा
चर्चाप्रस्तावात बदल करता येत नसल्याने एक उपचर्चेचा मुद्दा खालीलप्रमाणेः
सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात हे सुमारीकरण भारतीय-भारत यांच्यापुरतेच मर्यादित आहे की परदेशातही सुमारीकरणाचा शिरकाव सर्व क्षेत्रांत झाला आहे.
उपक्रमावर अनेक परदेशस्थ भारतीय येत असतात त्यांची मते यासंदर्भात महत्त्वपूर्ण आहेत.
बग फिक्स
किमान दोन प्रतिसाद आल्याशिवाय चर्चाप्रस्तावातील प्रतिसाद 'नवे प्रतिसाद' या सदरात दिसत नाहीत.
त्यांनी स्वतः तरी उत्तर द्यायला हवं होतं
दुव्यात दिलेला लेख वाचला. पण त्या लेखात सकारात्मक सुचना, सल्ले दिसले नाहीत.
त्यांनी स्वतः तरी प्रश्न कसा सोडवायचा? ह्याचं उत्तर द्यायला हवं होतं
त्यामुळे पर्याय क्रमांक १) 'हे मत टिपीकल 'गेले ते दिन गेले' प्रकारचे आहे का?' ह्याच सदरात मला तरी उत्तर म्हणून मोडावेसे वाटते.
शेवटचा परीच्छेद 'पुश्पा भावे यांनी व्यक्त केलेल्या विशयाशी संबंधित नाही' असे म्हणेन.
प्रमाणलेखनाचा तिरस्कार?
शेवटचा परिच्छेद 'विशयाषी' संबंधितच आहे. सरकारने मान्य केलेल्या व शाळेत शिकवल्या गेलेल्या प्रमाणलेखनाच्या नियमांना मराठीचे प्राध्यापकच पाळत नाहीत असे दिसते. असे दिव्य शिक्षक व त्यांचे दुर्दैवी विद्यार्थी यांच्याबद्दल वाईट वाटते.
तुम्हाला हे नियम न पाळण्यात काय भूषणावह वाटते हे सांगाल का? सर्वांनी कपडे घालून वावरावे असा संकेत असताना नागडे फिरण्यात कसले आले आहे शौर्य?
आपल्या कपड्याचे अप्रूप राहिले नाही म्हणून आमची वस्त्रे भरजरी
सर्वांनी कपडे घालून वावरावे असा संकेत असताना नागडे फिरण्यात कसले आले आहे शौर्य? अंह हा प्रश्न शौर्या चा नाही. आपण कपडे घालत असताना इतर लोक नागडे फिरत होते त्यावेळी कसले शौर्या आपण दाखवत होतात. याचा आहे. आता सगळेच कपडे घालत असल्या मुळे आपले वेगळे पण मोठेपण कमी झाला आपल्या कपड्याचे अप्रूप राहिले नाही म्हणून आमची वस्त्रे भरजरी, रेशमी आणि तुमचे कपडे दर्जा हीन फटके ही सुमारीकारणाची भाषा .
thanthanpal.blogspot.com
तुम्हाला शेरलॉक होम्स आवडतो
पुष्पा भावे यांच्यावर असा आरोप करणे चुकीचे आहे. तुम्ही भारताभिमानी असून तुम्हाला शेरलॉक होम्स आवडतोच ना?
विचारवंतानेच हळहळ का व्यक्त केली?
अभिरुचीची वानवा, कष्ट करण्यास नकार आणि अमूर्त तत्त्वज्ञानाकडे अक्षम्य दुर्लक्षामुळे आज सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण झाल्याने अस्सलपणाच नाहीसा झाल्याची खंत ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांनी व्यक्त केली.
तुम्ही लिहीलय, '' पुष्पा भावे यांच्या नावे 'अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण' असे मत प्रसिद्ध झाले आहे."
जे महत्वाचं आहे तेच तुम्ही गिळलतं. तुमची ही कृतीच 'एखाद्याच्या विचाराचेच सुमारीकरण करणे म्हणजे काय?' हे दाखवणारी आहे.
पुश्पा भावे व त्याच प्रमाणे बरेच जण जुन्या गोश्टी जशा मनचक्शूला दिसायच्या तश्या आता दिसत नाही हे पाहून हळहळत आहेत. इथे व्यक्त केलेल्या काही सदस्यांनी व आपण तथाकथित शुद्धलेखनाचे नियम पाळले जात नाहीत ह्याबद्दल मते मांडली आहेत ती देखील याच प्रकारची आहेत.
'वर्ण' ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत. ओळखीचा 'वर्ण' दिसला नाही म्हणून 'शी...दूर हो!' ही भावना वरच्या प्रकारच्या मंडळींच्या मनात येत 'होय..सगळ्याच क्शेत्राचे सुमारीकरण होत आहे.' असे म्हणत आहेत.
अशा मंडळींना मी म्हणेन मित्रानों मनाची तयारी करा. जग बदलत आहे. आज मुंबईत विरार ट्रेन मध्ये मीरारोड येथे राहणारी अफ्रीकेतील मंडळी मोठ्या प्रमाणात आढळू लागली आहेत. अशा काळ्या 'वर्णांच्या' पालकांची मुले व त्यांचे भविश्यातील मराठी लिहीणं, (बोबडं) बोलणं असेल ते वेगळ्या पद्धतीचे असणार. वेगळे 'वर्ण' पाहण्याची सवय करून घ्या, भावर्थाकडे, आशयाकडे पहा. तेच अभिरूची पूर्ण आहे. ते करण्यासाठीच कश्ट घ्यावे लागणार आहेत, 'हम सब एक है' हेच अमूर्त तत्वद्न्यान आहे.
:-)
त्यांनी मागे माझाही एक प्रतिसाद अर्धा गिळून कोट केला होता. असे का केले हे विचारले तर "*एखादे वाक्य घेऊन त्याचे विविध अर्थ कसे काढता येतात हे मला स्पष्ट करायचे होते." असे त्यांचे उत्तर आले. इथे त्यांना काय स्पष्ट करायचे होते माहीत नाही.
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
बातमिचे षीर्शक वाचा
मी दीलेल्या दूव्यावर बातमिचे षीर्शक वाचा आणी मग प्रतीसाद लीहा.
झेपत नाही तर मग....!
चर्चाप्रस्तावाचा हेतू उपक्रमींना याबाबत काय वाटते हे जाणून घेण्याचा आहे
ओ बाबूराव!
तुम्ही चर्चाप्रस्ताव ठेवला त्यात 'बातमिचे षीर्शक वाचा आणी मग प्रतीसाद लीहा.' असे कुठेही लिहीले नव्हते. तुम्हाला इतरांनी दिलेला प्रतिसाद झेपत नसेल तर मग चर्चा प्रस्ताव ठेवताना ह्या/वरील गोश्टी स्पश्ट लिहीत जा.
तुमचे नाव व कार्य टाईमपास जरी असले तरी आम्ही इथे टाईमपास करायला येत नाही. आम्ही संवाद साधायलाच येतो. स्वत:ला जोखायला येतो, विचार व भावना ओळखणं शिकायला येतो.
अध्याहृत असते
एखादी बातमी दिल्यावर त्याचे शीर्षक वाचणे हे कॉमनसेन्सवाल्यासाठी अध्याहृत असते. तुमच्यासाठी विशेष काळजी घेत जाईन.
आमचे/त्यांचे नव्हे, वेगळे/चुकीचे
जुने नियम वापरले जातात की नवे ते महत्वाचे नाही परंतु जितके अधिक आणि सुसंबद्ध नियम असतील तितकी अधिक चांगली अभिव्यक्ति करता येईल. स्वतःचे मत इतरांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचविणे शक्य करून देणे आवश्यक आहेच परंतु ज्यांना आवश्यक असेल त्यांना हवी तितकी अचूकताही आणण्याची सोय हवी. नियम कोणीही करावे पण ते सार्वत्रिक असणे अत्यावश्यक आहे. शिवाय, नियम किंवा वर्ण जितके कमी असतील तितके वैचारिक 'पेलोड' कमी पेलणेच 'भाशेला' शक्य होईल. जर आपल्या तोंडाला श आणि ष हे दोन वेगवेगळे ध्वनि शक्य असतील तर त्यांचा पुरेपूर वापर करणे स्वस्त पडेल, अन्यथा केवळ ० आणि १ या दोनच वर्णांचा वापर करूनही संदेशांची देवाणघेवाण शक्य आहे.
सार्वत्रिक होण्यास विरोध का करता?
नियम कोणीही करावे पण ते सार्वत्रिक असणे अत्यावश्यक आहे. शिवाय, नियम किंवा वर्ण जितके कमी असतील तितके वैचारिक 'पेलोड' कमी पेलणेच 'भाशेला' शक्य होईल. जर आपल्या तोंडाला श आणि ष हे दोन वेगवेगळे ध्वनि शक्य असतील तर त्यांचा पुरेपूर वापर करणे स्वस्त पडेल, अन्यथा केवळ ० आणि १ या दोनच वर्णांचा वापर करूनही संदेशांची देवाणघेवाण शक्य आहे.
रोमन लिपीतील अल्फाबेटसची संख्या किती आहे? देवनागरीत मुळाक्शरांची संख्या किती आहेत? व ज्यांना देवनागरीतील मुळाक्शरे म्हणून शिकवले जाते, त्याच मुळाक्शरांच्या अनुशंगानेच लिहीताना लिहीले जाते का? म्हणजे मुळाक्शर म्हणून लिहायचे, वाचायचे एक व वर्ण म्हणून भलतंच काहीतरी लिहायचे.
उदा.: 'प्र', 'द्य', 'र्व', 'श्री', 'द्ध',
आणि असे केल्याने भलामोठा, विविधांगी वैचारिक 'पेलोड' (डोलारा हा शब्द सुसह्य नव्हता का?) उचलला जातो. असे तुम्हाला (व तुमच्या सारख्या अनेकांना 'अवांतर खुसपटं' काढणार्यांना) का वाटतो?
'रोमन लिपीतील कमीत-कमी अल्फाबेटसच्या सहाय्याने जेवढी 'वैचारीक डोलारा उचलण्याची क्शमता' इंग्रजीने कमावलेली आहे तीच्या पेक्शा जास्त देवनागरीतील लिपीच्या वेगवेगळ्या व चित्र-विचित्र वर्णांच्या सहाय्याने मराठीतून लिहीण्याने जास्त 'पेलोड' उचलला जाणार/ जातो.' असा युक्तीवाद करणे म्हणजे वेडगळपणाच आहे.
आधुनिकता हि 'सहजते'मधून विकसित होत जाते. सामान्य स्तरावरील हि सहजता येण्यानेच आयुश्य प्रगत स्तरावर सरकते. सहजतेला विरोध करणारे व 'असहज असणार्या परंपरंना' धरून राहणारे त्यांच्या मानसिकतेमुळे प्रगत स्तरावर पोहचू शकते नाहीत. (पण हीच मंडळी वा त्यांची पुढची पिढी युरोप, अमेरीकेत जावून स्थायिक होणार )
?
"सार्वत्रिक असणे अत्यावश्यक आहे" असे माझे वाक्य असताना तुम्ही मला "सार्वत्रिक होण्यास विरोध का करता?" असा प्रश्न का विचारता?
युनिकोडचे वेगवेगळे फाँट मिळतात. श् + र् लिहिल्यावर श्र् असे लायगेचर (जोडाक्षर) किंवा द् + य् असे लिहिल्यावर द्य् असे लायगेचर मला दिसते, तुम्ही तुम्हाला आवडता फाँट बनवून वापरू शकता पण तो वेगळा मुद्दा आहे. तुमचा मुद्दा होता की "बोबडे बोलणार्यांना सहन करा". त्यावर माझा आक्षेप असा की बोबडे बोलल्यास श आणि ष, न आणि ण, किंवा ट आणि त यांतील फरक नष्ट होतील. ष ला श पेक्षा वेगळा कोणताही दृष्य आकार देण्यास माझी स्वीकृती आहे परंतु ष ला श पेक्षा वेगळे दृष्य अस्तित्वच दिले नाही तर मूळाक्षरेच कमी होतील.
डोलारा हा शब्द मला मान्य आहे.
समान विचार मांडण्यासाठी देवनागरीपेक्षा रोमनमध्ये अधिक खर्च येईल हा गणितीय निष्कर्ष आहे.
वैचारिक डोलारा झेपत नाही, पण...
खरे तर मला या प्रतिक्रियांमधीलच वैचारिक डोलारा वाचायला झेपत नाहीय. ती अर्थात माझ्या बुद्धीची मर्यादा. पण भाषेच्या सुलभीकरणाचीही फार मोठी गरज जाणवू लागली आहे. मी सोपी मराठी म्हणतो. अशुद्ध मराठी नाही.
मी इंग्रजी आणि मराठी भाषांशी गेली २० वर्षे खेळत आहे. व्यावसायिक अनुभवाचा निष्कर्ष सांगायचा झाला तर इतकेच म्हणेन, की मराठी ही इंग्रजीहून अधिक क्रिस्प आहे. इथे तुम्हाला आशय व्यक्त करण्यासाठी कमीतकमी अक्षरे आणि शब्द पुरतात. जवळपास १०००० हून अधिक तजुर्म्यांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर केल्यानंतर मी एक ढोबळ निरीक्षण नोंदवतो, की ५०० इंग्रजी शब्दांचे शब्दशः मराठीत भाषांतर केले तरी अंतिमतः मराठी शब्दसंख्या (वर्ड काऊंट) साधारणपणे ३८० -४०० च्या आसपास राहते. याचाच अर्थ मराठी भाषा २० टक्क्यांनी शब्दांची बचत करते.
समर्थ मराठी संस्थेचे स्थापक आणि आमचे मित्र अनिल गोरे यांच्या पुस्तकातील एक उदाहरण नमूद करतो.
बँकेत धनादेशावर संख्या अक्षरी लिहिताना इंग्रजी आणि मराठीत लिहिल्यास उदाहरणार्थ
Rs. Twenty Six Thousand Five Hundred Forty Two या आठ शब्दांच्या जागी
सव्वीस हजार पाचशे बेचाळीस रुपये या पाच शब्दांत काम होऊन जाते.
अक्षरांची मोजदाद केल्यास ३८ च्या ऐवजी १७.
त्यामुळे समान भार (पेलोड) कोण कमीतकमी साधनसंपत्ती वापरुन पेलू शकते, याचाही अंदाज यावा.
सहमत
मला तुमचे मत मान्य नाही असे तुम्हाला वाटते असे तुमच्या प्रतिसादावरून मला वाटते आहे. पण मीही तेच मत व्यक्त केले आहे.
एक दुरुस्ती:
"सव्वीस हजार पाचशे बेचाळीस रुपये" ही ३१ अक्षरे आहेत तर "Rs Twenty Six Thousand Five Hundred Forty Two" ही ४५ अक्षरे आहेत (मूळ युक्तिवादाला याने फारसा फरक पडत नाही).
प्रतिसाद चुकून तुमच्या प्रतिक्रियेखाली पडला...
रिटे,
खरं तर मला रावलेंच्या विधानाबाबत प्रतिसाद द्यायचा होता. गडबडीत तो तुमच्या प्रतिक्रियेखाली पडला. गैरसमज झाला असल्यास दिलगीर आहे.
अवांतर प्रतिसाद...नाईलाजाने
श्री. योगप्रभू,
तुमचा प्रतिसाद चूकीचा आहे. (व तो पडला देखील चूकीच्या ठिकाणी...)
मी जे मत व्यक्त केले आहे ते 'वर्णबोधन स्तरा' बाबत केले आहे.
आपण आधी 'वर्ण ओळखतो' तो वर्ण बोधन स्तर (इंग्रजीत 'अल्फाबेटस'),
त्यानंतर आपण शब्द ओळखतो. तो शब्दबोधन स्तर,
त्यानंतर आपण वाक्य समजून घेतो. तो वाक्यबोधन स्तर,
त्याहीनंतर आपण 'संदर्भ-मतितार्थ' ताडण्याचा प्रयत्न करतो. तो स्तर असतो 'संदर्भ-मतितार्थ स्तर'
वर्णबोधन स्तरावर रोमन लिपीच्या 'अल्फाबेटस'च्या जसे आहे तसेच लिहीण्यामुळे इंग्रजीचे वाचन करताना वा लिहीताना 'वर्ण बोधन स्तरावर' अतिरीक्त ध्यान द्यावे लागत नाही. हो! स्पेलिंगचे पाठांतर करावे लागते. पण ते सवयीने जमते. पण मराठीत 'शुद्धलेखन' या नावाने जे शाब्दीक अवडंबर आहे त्याचे नेहमी पालन करणे सर्वसामान्यांकडून होत नाही ( आणि म्हणूनच त्यांना विनाकारण कावळ्यासारखी चोच मारत बसणे हे काही शहाण्यांना भारी आवडते. दुसर्याच्या व्यक्तीगत अधिकार क्शेत्रात अशी लूडबूड करणे हा मला आगावूपणा वाटतो. )
'लिहीण्याची पद्धती' म्हणजे लिपी मध्ये सहजता यायला हवी. हीच काळाची गरज आहे. कारण मराठी लिहीण्या-बोलणार्यांची संख्या वाढत आहे. वाढत जाणार. त्यामुळे लिहीण्यात सोपेपणा, सहजपणा येणे हे लोकांच्या गरजेचे आहे.
ज्या गोश्टींमुळे सामान्य जनतेला लिहीताना वाचताना त्रास होतोय, चूका होताहेत त्या टप्प्यावर सुधारणा व्हायला हवी. एवढं अपेक्शीतच वरील प्रतिसादात लिहील होतं.( तरी काही लोकांना काय त्रास होतो तेच कळत नाही? )
अजून काही आपणास विचारायचे असेल तर व्यक्तीगत निरोप पाठवावा.
--------------------
हा प्रतिसाद केवळ विचारांचे आदान-प्रदान करण्याहेतू योगप्रभू यांच्यासाठीच आहे.
मजकूर संपादित.
मला नेहमीच सुवर्णमध्य पटतो...
भाषा सामान्यांना न कळेल इतकी दुर्बोध असू नये हे मान्य, पण प्रमाण आणि व्याकरण नियमांच्या चौकटीतील भाषेचेही महत्त्व आपल्याजागी आहेच आणि काळाच्या कोणत्याही टप्प्यावर एकाच समूहातील अनेक वर्गांच्या भाषेत फरक हा राहाणारच. मी कोणतेही टोक गाठण्यापेक्षा सुवर्णमध्य साधण्याला महत्त्व देतो.
रावलेसाहेब, मराठी समाजाचाही विचार मी एक मिश्रण म्हणून करत असल्याने माझ्यालेखी अभिजनांची भाषा, बहुजनांची भाषा, वर्णश्रेष्ठत्व हे मुद्दे महत्त्वाचे नाहीत. खरे तर मला 'ते आणि आम्ही' या वर्गवारीतच रस नाही.
माझी प्रतिक्रिया चुकीची आहे, असे आपण म्हणता. मी त्यावर विचार करत आहे.
असो. काही सुचल्यास व्यनिद्वारे संवाद साधेन.
पर्याय १
पहिल्या पर्यायाला मत देत आहे.
विवेचन
थोडेसे विवेचन केल्यास आवडेल. पुष्पा भावे यांनी काही उदाहरणे दिली आहेत ती खोटी का वाटतात? भारतीय व परदेशी यांच्यात तुलना केली असता सुमारपणाचे अंश कुठे अधिक सापडतात? याबाबत विस्ताराने लिहिल्यास आवडेल.
लोकसत्ता लेखात फारशी उदाहरणे सापडली नाहीत
पुष्पा भावे यांनी फारशी तुलनात्मक उदहरणे दिलेली नाहीत.
पूर्वी प्रसारमाध्यमे काय शब्द वापरत? आमच्या जुन्या घराच्या माळ्यावरती मला १८८०-१८९० काळातला (बहुधा १८८६ असेल) "जगद्धितेच्छु" वर्तमानपत्राचा अंक मिळाला. (हा अंक ~१९८६ साली मला मिळाला तेव्हा मी माध्यमिक शाळेत होतो. घर विकायला काढले होते, म्हणून माळ्यावरची अडगळ कचर्यात होती. तो अंक हाताळतानाच तुकडे पडून नष्ट झाला. ऐतिहासिक कुतूहलासाठी तो अंक कुटुंबाने कसाबसा जतन करायला हवा होता, अशी आजही रुखरुख वाटते.) सनसनाटी आणि बेकार बातम्या. त्या काळात काय प्रत्येक वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांच्या तिखट लेखणीमधून उतरत होते काय?
हा दावा आहे. विचार करण्यालायक आहे. पण उदाहरणे कुठे आहेत?
पुष्पा भावे यांनी मूळ व्याख्यानात हे भूतकाळातले उदाहरण दिले असावे. लोकसत्तेतल्या लेखात नाही. त्याहीवेली सोयीचे निर्णय घेतले गेले आणि आताही सोयीचे निर्णय घेतले जातात. मग "त्यावेळी राजकीय तत्त्वज्ञान मांडले, आताही मांडतात" असे म्हणण्यास काय आडथळा आहे?
गेली दहा वर्षे मी भारताबाहेर राहातो आहे. त्या पूर्वीसुद्धा थोडीच गाणी दूरदर्शनवरच्या "छायागीत/चित्रगीत"वर पुन्हापुन्हा दाखवत असत.
"हल्ली" व्याख्या आहे, ती पूर्वी काय होती? पूर्वी तरी "प्रक्रिया" अशी व्याख्या होती का? आणि आजतरी अशी पुचाट व्याख्या कोण करते?
पूर्वी प्रतिकांपेक्षा माणसे मोठी होती याबद्दल उदाहरणे काय आहेत. "चरखा", "जरीपटका" वगैरे प्रतीके "त्रिशूळ"च्या तोडीची आहेत.
"काहीच" अमान्य. "पुरेसे केले नाही" म्हटले असते, तर चालले असते.
जिजीविषेबद्दल पूर्णपणे सहमत. मात्र याचा "पूर्वी विरुद्ध हल्ली"शी काय संबंध लावायचा? पूर्वीदेखील ही तयारी अधिक असायला हवी होती.
- - -
प्रा. पुष्पा भावे या पुरोगामी विचारसरणीच्या आहेत, त्यांनी कार्यही खूप केलेले आहे. "दर्जा सुधारावा" ही कळकळ सुयोग्य आहे. कदाचित त्यांचे म्हणणे असे असावे : "पूर्वापारपासून आपण सुमार दर्जा समाजात सहन करत आलो आहोत, त्यापेक्षा उत्तम दर्जा समाजाने अपेक्षिला पाहिजे..." लोकसत्तेच्या लेखातून "पूर्वी सुमारीकरण नव्हते, आता सुमारीकरण आहे, असे ध्वनित होते.
शिक्षणाचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत करताना शिक्षणाचा दर्जा घसरू दिलेला आहे काय? याबद्दल मला माहिती मिळवायला आवडेल. कलाकारांबाबत असो, सध्या व्यावसायिकांबाबत बघूया. पूर्वीचे नव-स्नातक अभियंते हल्लीच्या नवस्नातक अभियंत्यांपेक्षा अधिक कुशल काम करत काय? डॉक्टर? हिशोबनीस-अकाउंटंट? कारकून? माझ्या मते पूर्वी काही थोडे व्यावसायिक अव्वल दर्जाचे होते, आणि बरेचसे सुमार होते. आजही गुणोत्तर तसेच काही असावे.
सध्या (किंवा पूर्वी) जो सरासरी दर्जा आहे (होता) त्यापेक्षा वरचढ दर्जा असावा, असा प्रयत्न शिक्षकांनी करावा, समाजाचे घटक म्हणून आपण सर्वांनी करावा, या बाबीशी सहमतच आहे.
- - -
भारत व परदेशाबाबत तुलना.
"गेले ते दिन गेले" म्हणणारे लोक संयुक्त राज्यांत (अमेरिकेत)ही बरेच आहेत.
+
असेच म्हणतो.
गेले ते दिन गेले असे रूदन करणारे लोक प्रत्येक काळात असतातच.
प्रत्येक काळात अल्पप्रमाणातच दर्जेदार काम होते.
आपल्या काळात आपल्या समोर दर्जेदार (थोडे) आणि सुमार (बरेचसे) असे दोन्ही लोक दिसत असतात.
जुन्या काळातले सुमार लोक काळाच्या पडद्याआड गेलेले असतात. आणि फक्त दर्जेदार लक्षात असतात. म्हणून प्रत्येक काळात लोकांना वाटते की त्या आधीच्या काळात फक्त दर्जेदारच लोक होते.
धनंजय यांच्याकडून टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने नुकतेच झालेले विचारमंथन आठवले.
दुसरा भाग म्हणजे कालानुरूप संकल्पना/व्याख्या बदलल्यानेही फरक पडतो.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
+१
हल्ली समाज रसातळाला चालला आहे, किंवा आजकाल सगळं कसं वाईट चाललं आहे असे विचार किती सहजपणे लिहिले जातात याचं मला आश्चर्य वाटतं. काही विशिष्ट बाबी पूर्वी चांगल्या होत्या हे मान्य करायला हरकत नाही. पण सुमारीकरणाचं सरसकटीकरण होतं ते पचायला जड जातं. धनंजयनी मांडलेले मुद्दे पटले. पुष्पा भावेंनी आकसाने लिहिलं नसलं तरी 'आजकाल काय पट्टेवाले सुद्धा ग्रॅज्युएट होतात' यातला जो कॉंडेसेंडिंग भाव आहे तो थोडा येतो. त्यांनी मुद्दाम आणला असेल असं नाही.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
पर्याय १
दर्जेदार आणि सुमार कामे हरएक काळात होतच असतात.
कदाचित सुमाराला मिळणारी लोकमान्यता आणि त्या तुलनेत झाकोळले जाणारे दर्जेदार याचा वाटणारा विषाद थोडा कडवटपणे येथे उमटला असावा.
वेगळा मुद्दा
ह्या मुद्द्याची शक्यता नाकारता येत नाही. हिमेश रेशमियाच्या जमान्यात तलतच्या मोरपंखी गाण्य़ांसारखी गाणी कोण करणार?
हम्म!
सर्वच क्षेत्राचे सुमारीकरण झाले आहे असे म्हणणे म्हणजे सर्वच क्षेत्रात काय चालते आहे ते माहित असणे असल्यास मला या विधानाशी सहमती दर्शविता येणार नाही परंतु सुमारीकरण होते आहे असे म्हणण्यात तथ्य वाटते.
नेटावरील लिखाणाबाबत म्हणायचे असल्यास इथे "सोशल नेटवर्किंग"मुळेही फेटे उडवले जातात. नेटावरील लिखाण हा वेगळ्या चर्चेचा विषय वाटतो. असो.
दर्जेदार आणि सुमार या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. जेव्हा दर्जेदार होते तेव्हा सुमारही होतेच. जे दर्जेदार असते ते टिकून राहते असे आपले मला वाटते. ;-) चू. भू. दे. घे.
शक्य
नव्या वाटा उघडल्यानंतर क्वालिटी कंट्रोल येण्यास थोडा वेळ लागतोच. तोपर्यंत सुमारीकरण होणे स्वाभाविक वाटते. गटेनबर्गनंतरसुद्धा असेच घडले असावे. 'नवे तंत्रज्ञानच नको' हा मात्र त्यावर सर्वोत्तम उपाय नाही. सुमारीकरणाला विरोध करणे आणि दर्जेदार पर्यायांना प्रतिष्ठा मिळवून देणे हे दोन्ही मार्ग आवश्यक वाटतात.
मनात असणारी मळमळ मग अश्या विचारातून बाहेर पडते एव्हढाच याचा अर्थ
एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना गिरीजा कीर यांनी 'तळागाळातील, झोपडपट्टीतील आणि न शिकलेल्या बहुसंख्य लोकांना प्रतिभेचा स्पर्श नसतो, त्यामुळे त्यांना साहित्य संमेलनात सहभागी करून काय फायदा' असे म्हणणे आणि पुष्पा भावेंनी, मात्र सुलभीकरणाच्या नादात गुणात्मकता आणि संख्यात्मकता यातील तोल सांभाळला न गेल्याने सुमारीकरणाचा धोका निर्माण झाला. हे सुमारीकरण थोपण्यासाठी समाजही पुढे सरसावत नाही, हे दु:ख त्यांनी ठळकपणे नमूद केले.असे उदगार काढणे हे सरंजामशाही चे लक्षण आहे असेच मानावे लागते . भारत स्वातंत्र्य होवून आज ६० वर्षे होवून गेली . समाजातील तळागाळा जनता जी गेल्या २००० वर्षा पासून शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित होती आणि मुठभर लोकांचे यावर नियंत्रण होते ते संपुष्टात आल्या मुळे मनात असणारी मळमळ मग अश्या विचारातून बाहेर पडते एव्हढाच याचा अर्थ. गेल्या १० वर्षा पासून दूरदर्शन वर ठराविकच गाणी वाजतात बरोबर आहे .तेथे कंपूशाही निर्माण झाली आहे. नवीन गाणी निर्माण होत नाही हे म्हणणे मात्र अत्यंत चूक आहे. अनेक गाणी निर्माण होत आहेत गाजत आहेत पण ती परीघा बाहेरच्या तळागाळातल्या कवींनी , संगीतकारांनी संगीत दिलेली असल्या मुळे आपण विद्वान लोक त्यास अभिरुचीशून्य सवंगपणा म्हणत त्याचे महत्व कमी करण्याचा शुद्र प्रयत्न करत आहात हेच सत्य आहे.
thanthanpal.blogspot.com
काहीसा सहमत
अंशतः सहमत आहे.
पण पुष्पा भावे यांच्याबद्दल जे वाचले आहे त्यानुसार वंचित लोक पुढे आल्याचा पोटशूळ त्यांना असणार नाही असे वाटते.
बाकी विशिष्टांचे सर्जन अभिजात आणि विशिष्टांचे सर्जन हिणकस समजण्याबाबत सहमत.
मालवून टाक दीप चेतवून अंग अंग - हे अभिजात
आणि
चल गवतात शिरून गंमत करू - हे सवंग का हे कधीच कळलेले नाही.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
एक शक्यता
ज्या रचनेची एंट्रॉपी कमी असते तिला अधिक चांगली म्हणणे योग्य ठरेल असे मला वाटते. हा निकष लावून विधानांचे सौंदर्य कसे मोजावे त्याचा फॉर्म्युला मला माहिती नाही पण अव्यक्त मनाला तशी गणिते करण्याची सवय असण्याची शक्यता आहे. अर्थात, पूर्वग्रह किंवा अपुरी निरीक्षणे यांमुळे ते गणितही चुकण्याची शक्यता आहेच.
उदा. यमक, अनुप्रास, श्लेष, अशा अलंकारांनी एंट्रॉपी कमी होते. गेयता, नादमाधुर्य यांचा संबंधही एंट्रॉपीशी लावता येईल. गेयता, नादमाधुर्य, शब्दरचना याच गोष्टी सौंदर्याला कारणीभूत असतात हे तज्ञांचे मत आहे. गेयता, नादमाधुर्य, शब्दरचना या संकल्पना मोजता येत असतील तर सौंदर्याचे वस्तुनिष्ठ, व्यक्तिनिरपेक्ष मापन शक्य आहे. माझा असा अंदाज आहे की पिटातील पब्लिकला काय 'अधिक' आवडते त्याचा अभ्यास केल्यास असे दिसेल की त्यांनाही याच निकषांवर सौंदर्य जाणवते परंतु त्यांची कुवत कमी असल्यामुळे खूपच क्लिष्ट रचना मात्र त्यांना आवडत नाहीत. (म्हणजे, एंट्रॉपीमध्ये थोडी घट झाली तर त्यांना आवडते पण खूप घट झाली तर मात्र त्यांना त्रास होतो. प्रचंड घट झाली तर कोणालाच आवडणार नाही अशीही शक्यता आहे.) मुळात, "एंट्रॉपीतील घटच चांगली का म्हणावी?" तर सजीवपणासाठी आवश्यक असल्यामुळे ती सर्वांनाच आवडते असे शक्य आहे.
सूचकतेसाठी नेहमीच्या वापरात नसलेले शब्द वापरण्याचीही पद्धत आहे. सपाट रस्त्यापेक्षा रोलरकोस्टरवर आनंद मिळतो तसे हे असावे. तांत्रिक शब्दांसाठी आपल्याकडे संस्कृत वापरतात, इंग्रजीत ग्रीक/लॅटिन वैद्यकीय शब्द वापरतात.
+१
अभिरूचीचे पेटंट काही प्रस्थापितांनी स्वतःकडे घेतले आहे (असा त्यांचा समज आहे.)
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
शब्द
कदाचित भावे ह्यांनी मराठीमधील शब्द randomly घेऊन भाषण बनवले असेल असे वाटते, किवा असे भाषण बनवणारे software असावे, ज्याला विषय दिल्यास असे अचाट शब्द पेरून भाषण बनवून मिळत असेल. अशा लोकांना विचारवंत म्हणतात मग आमच्या उपक्रम वर तर aristotal च्या तोडीची माणसे आहेत. :)
गेले ते ’दीन’ गेले
लेखिकेला जो संदेश द्यायचा आहे त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. लेखात काय नाही ह्याची चर्चा वर अधिक चालली आहे असे वाटले.
तरीही मला पुढील विधान करायला नेहमीच आवडते- मानव आज ज्या अवस्थेत आहे, ती अवस्था त्याच्या पूर्ण इतिहासात सर्वोत्तम आहे व ह्या स्थितीत बरे-वाईट बदल सतत घडत राहणारच आहेत. पूर्वी राजे लोक राज्यविस्ताराची कामना करुन हजारो सैनिकांचा बळी देत, जो प्रदेश जिंकीत तेथील स्त्रीयांना विटाळत, इ, तसे प्रकार अलिकडे पर्यंत चालू होतेच. ते कमी होतायत असे वाटते. (पुरावा नाही.) तरीही, मेडीकल सायन्सची प्रगती, शिक्षण, मुलभूत गरजा, ई ह्याबाबतीत निश्चितच आघाडी घेतली आहे.
मला वाटते जुने ते सोने, गेले ते ’दीन’ गेले, अशा काव्यात्मक कल्पना कुरवाळत बसण्यापेक्षा हे पटत नसेल तर उद्याच्या पिढीला घडवण्यात मदत करावी.
वास्तव चित्रण
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पुष्पा भावे यांच्या लेखातील विचार"गेले ते दिन गेले|" या प्रकारात मोडणारे नाहीत. अनेक क्षेत्रांत दर्जाची घसरण झालेली दिसते हे वास्तव आहे. सत्य परिस्थिती निदर्शनाला आणून देण्यात काही चूक नाही. पुष्पा भावे या पुरोगामी विचारांच्या आहेत. चातुर्वण्य, जातिभेद, दलितांवरील अन्याय या विरुद्ध त्या सातत्याने बोलल्या आहेत. त्यांनी नेहमी वंचितांची बाजू घेतली आहे. त्यांना सरंजामशाही विचारसरणीच्या मानणे अज्ञानमूलक आहे.
शासनाने, अधिकारी वर्गाने, समाजधुरिणांनी दर्जा हीनता खपवून घेलली नसती, "असूंद्या,चलता है" असे म्हटले नसते तर दर्जा सुधारू शकला असता. आजच्या इतकी अवनती झाली नसती. समाजधुरिणांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असे पुषा भावे म्हणतात ते खरे आहे.
सत्य परिस्थिती निदर्शनाला आणून देण्यात काही चूक नाही.
सत्य परिस्थिती निदर्शनाला आणून देण्यात काही चूक नाही. हाच माझ्या चर्चाप्रस्तावाचा हेतू आहे.
सत्य परिस्थिती विशद करून सांगावी ही विनंती
सत्य परिस्थिती समजेल अशा उदाहरणांनी विशद करून सांगावी ही विनंती.
म्हणजे "दर्जा"चे निकष काय आहेत. या काळात अनेक मानवीय कृती असताना त्यांचा सरासरी दर्जा मोजण्याचे गणित काय आहे? (उदाहरणार्थ आजकाल नोबेल पारितोषिके जाहीर होत आहेत. त्यांचा दर्जा, आणि शेकडो विद्यापीठातल्या हजारो प्राध्यापकांनी लिहिलेले जे लाखो बारीकसारीख निबंध आहेत, त्या सगळ्यांची एकत्रित गुणवत्ता काय आहे?)
"सुमारीकरण" शब्दात "पूर्वी जे सुमार नव्हते ते आता सुमार करण्यात आले आहे" असा अर्थ आहे.
जी सत्य परिस्थिती श्री. यनावाला आणि चर्चाप्रस्तावकांना इतकी स्पष्ट दिसत आहे, ती मला स्पष्ट दिसत नाही. नुसते "स्पष्ट आहे" म्हणून कसे चालेल?
("स्पष्ट आहे" असे म्हणण्याची ही युक्ती मला माहीत असती, तर दहावीच्या परीक्षेत भूमितीच्या प्रत्येक सिद्धतेचे उत्तर मी "परिस्थिती स्पष्ट आहे" असे देऊन उत्तरपत्रिका अगदी लवकर सोडवली असती. त्या काळातही माझ्या शिक्षकांनी मला ही युक्ती वापरण्यास बंदी केली होती. शिक्षकांनी स्वतःवर आजही असेच बंधन आणावे. "निदर्शनाने सिद्धता करण्याऐवजी 'स्पष्ट आहे' म्हणतात", हेच सुमारीकरणाचे प्रात्यक्षिक करून दाखवायचे असेल, तर तसे स्पष्ट सांगावे.)
फुटकळ उदाहरणे
मी वर्तमानपत्रात आलेल्या तीन बातम्यांची उदाहरणे दिली आहेत. 'सकाळ' हे वर्तमानपत्र त्याची स्वच्छ भाषा आणि प्रमाणलेखन यासाठी नावाजले जायचे. आज सुमारीकरणामुळे पहिल्या पानावरच्या बातमीतच घोळ सापडतो. मुक्तपीठ नावाची सरळसरळ अंधश्रद्धा पसरवणारी डोकेदुखी आपण पाहिली आहे का? अशा लेखनाला उच्च साहित्यिक मूल्य असते असा गैरसमज अनेक वाचकांचा (वाचकांच्या पत्रव्यवहारातच) होतो. 'लोकसत्ता'मधील नवनीत या सदरात रोज नवनवीन तारे तोडलेले असतात. सकाळ आणि लोकसत्ता ही दैनिके मी गेली २८ ते ३० वर्षे वाचत आहे. हे पूर्वी होत नव्हते.
नाव घ्यावे अशी गाणी आजकाल मराठीत होत नाहीत. संदीप खरे-सलील कुळकर्णी यांना किती दिवस सहन करायचे? हिंदीतल्या कोणत्या गाण्यांना तलत-लता यांच्या गाण्यांचा दर्जा गाठता येईल?
मुक्तपीठ "मुक्त पीठ" आहे ना?
सकाळ वर्तमानपत्रात अप्रमाण रूपे आणि मुद्रणदोष आजकाल येतात. शब्दांपैकी किती टक्के मुद्रितदोष असतात.
पूर्वीसुद्धा थोडे मुद्रितदोष तर असतच. "मुद्राराक्षस" म्हणून सदर कुठल्याशा नावाजलेल्या वर्तमानपत्रात येत असे, असे मला वाटते. त्या काळात किती टक्के शब्दांत मुद्रितदोष असत?
मुक्तपीठ हे सदर "मुक्त पीठ" आहे ना? त्यात वाटेल ते येईल.
(सकाळच्या उदाहरणापेक्षा तुम्ही मटाचे उदाहरण घेतले असते, तर "पूर्वीच्या मटापेक्षा कमी दर्जा" याबाबत मी सहज होकार दिला असता. तर मग तुम्ही मटाचेच उदाहरण दिलेले आहे, आणि मी मानलेले आहे, असे समजूया.)
काही वर्तमानपत्रांचा दर्जा घटला असेल, आणि काही वर्तमानपत्रांचा दर्जा वधारला असेल. उदाहरणार्थ गोव्यातली मराठी वर्तमानपत्रे माझ्या लहाणपणी होती त्यापेक्षा बरी आहेत. अमुक एक उदाहरणापेक्षा मला सर्वेक्षण झालेले आवडेल.
- - -
लता-तलत यांच्या गाण्याची शैली तुम्हाला सर्वोत्तम म्हणून आवडत असल्यास, त्या शैलीत गाणारे दुसरे कोणीही तुम्हाला सापडणार नाही. आणि त्यापूर्वीच्या बालगंधर्वांची शैली लता-तलत मध्ये तरी कुठे आहे? तुमच्या उदाहरणाचा तुलनात्मक मला लावून घेता येत नाही.
भेद
मुक्तपीठमधील चुकीच्या मतांना हाणणारी पत्रे ते छापत नाहीत हे मत अध्याहृत असण्याची शक्यता आहे.
मुद्राराक्षस आणि उसंडु यांकडे पूर्वी 'क्वचित घडणारी घटना' म्हणून पाहिले जात असे असे मला वाटते.
क्वचित म्हणजे किती?
क्वचित म्हणजे किती? १०,००० शब्दांपैकी १ की १००० शब्दांपैकी १ ?
काही का असेना. पूर्वी गुणोत्तर काय होते? हल्ली काय आहे?
(संकेतस्थळावर हल्ली किती चुका असतात, ते मीसुद्धा मोजू शकतो. छापील आवृत्तीत किती टक्के शब्द चुकलेले असतात? बहुधा पहिले पान, गृह्यसंस्कार, पुरवण्या यांच्यात टक्केवारी वेगवेगळी असावी. तसे असल्यास तसे वेगवेगळे आकडे बघायला आवडतील.)
ते इंप्रेशनिस्ट चित्रकार आज कुठे गेले?
सुंदर सुंदर चित्रे काढणारे ते इम्प्रेशनिस्ट चित्रकार कुठे गेले? कोण काढते त्यांच्या तोडीची चित्रे आजच्या जगात?
आता उदाहरण म्हटल्यास वरील वाक्यात काही अंश सत्यता आहे. आजकाल अव्वल दर्जाची इम्प्रेशनिस्ट चित्रे कोणीच काढत नाही, हे खरेच आहे. मात्र यास "सुमारीकरणा"चे उदाहरण मानण्यात दोन आडथळे आहेत.
१. त्यांच्या स्वतःच्या काळात इम्प्रेशनिझम गचाळ चित्रकला मानली जाई. त्यातील बरेचसे चित्रकार दरिद्री म्हणून जगले-मेले. आज तुम्ही गचाळ मानता त्यापैकी काही चित्रशैली अतिशय कल्पक आहेत, हे कळण्यासाठी त्या चित्रांशी अधिक ओळख लागेल.
२. आज स्वयंभू निर्मिती करण्याची हुरहुर असलेला चित्रकार इम्प्रेशनिस्ट (किंवा पोस्ट इम्प्रेशनिस्ट) शैलीचे अनुकरण काय म्हणून करेल. मूस मोडणे म्हणजेच स्वयंभूत्व. काही निर्मिती त्याज्य असतील, काही निर्मिती टिकाऊ असतील. काही का असेना. इम्प्रेशनिस्ट असणार नाहीत.
(हा विचार "लता-तलत यांच्यासारखे आजकाल कोणी का गात नाही?" बद्दल केला पाहिजे.)
तलत
तलतचा उल्लेख दुसर्यांदा आल्याने मुद्दाम हा प्रतिसाद. तलतचा एक 'डाय हार्ड' फॅन असूनही तलत म्हणजे गुणवत्ता आणि हिमेश रेशमिया म्हणजे तद्दन टाकाऊ हे मी आजवर कुणालाही पटवून देऊ शकलो नाही. तलतच्या रेशमी कंपाला 'काहीतरी हीहीहीही आहे झालं' असं म्हणणार्यांना गुणवत्ता ही वैयक्तिक आवडीनिवडीवर अवलंबून असते या तडजोडीच्या उत्तरापलीकडे काही पटेलसे नाही. खरे-कुलकर्णींना सहन करणे हे इथे म्हणालात ते ठीक. पलीकडे लोक तुमच्यावर तुटून पडतील. उद्या काय तुम्ही शिरवळकर सामान्य आहेत, असेही म्हणाल!
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान
पलिकडचे
पलिकडचे सोडूनच द्या हो. काय ठेवले आहे तिकडे?
आपण इथले इथे बोलू या का?
आम्हाला तलत आवडतात आणि कधीकधी ऐकायला हिमेसभाईही आवडतात. विशेषतः पावसाळ्यात. ते बेडकाबद्दल कोण बोलले होते? मला वाटते पुलंचे काकाजी का? त्या बेडकाचा आवाजही चांगला वाटतो, तेथे हिमेसभाई तर काय माणूस आहेत.
खरे तर पावसाने एकदम रट लावली की कुठचेही थोडे बरे गाणे ऐकायला मजा येते. खरे-कुळकर्णी आवडणारे लोक अभिरुचीसंपन्न नसतात असे नसावे. उलट खरे- कुळकर्णींमुळे बरीच तरुण मुलेही परत मराठी कवितांकडे वळली असे ऐकते/ पाहिलेही आहे.
हल्लीच खरेंची एक कविता ऐकली/पाहिली -नाजूक का अशीच काहीशी.
त्यातल्या काही कल्पना मला तरी फार रोचक वाटल्या. अगदी पठडीत राहूनही हे लोक वेगळे प्रयोग करण्याचे धाडस दाखवतात त्याचे कौतुक करायचे सोडून त्यांची गुणवत्ता का काढली जाते हे कळत नाही.
माझ्या मते हजारो लोकांना जे आवडते ते सवंग आणि अभिरुचीशून्य असणार असा दंडक नाही. उलट ते सोपे, समजेल असे केले असल्याची शक्यता तपासून पहायला हवी.
देअर आर नो
देअर आर नो बॅड पीपल ऑर गुड पीपल, ओन्ली बॅड डीड्स अँड गुड डीड्स, अँड ईव्हन दोज आर टेंपोरल्.
--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||
जो जे वांछील
प्रश्न अभिरूचीसंपन्नतेचा नाही. क्लॅश ऑफ सिविलायझेशनचा आहे. खरे-कुळकर्णी आवडणारे लोक अभिरुचीसंपन्न नसतात असे कुणी म्हटले आहे. आम्ही त्यांना किती दिवस सहन करायचे हा प्रश्न आहे. खरे-कुळकर्णी युग हेच मराठी संगीताचे सुवर्णयुग आहे अशा मानण्यामुळे मराठी संगीतात सुमारसद्दी सुरु झाली आहे.
'तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं' या गाण्यातील कल्पनाही मला रोचक वाटतात. मात्र ह्या कल्पना सवंग आहेत याची जाणीवही असते.
पुरुषांच्या मंगळागौरीचे वेगळे प्रयोग खरे-कुळकर्णी मंडळींनी यशस्वीपणे केले याबद्दल मला त्यांचा हेवा वाटतो.
या
या संदर्भात नंदनच्या अनुदिनीमधील विंदांची मुलाखत वाचनीय आहे. (दर वर्षी एकदा तरी मी हा दुवा अशा प्रकारच्या चर्चांमध्ये देत असतो.)
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
क्लॅश ऑफ सिविलायझेशन
सन्जोप राव, हा सगळा प्रकार क्लॅश ऑफ सिविलायझेशनचा आहे. कोणत्याही क्षेत्रात दर्जेदारपणाचा आग्रह धरणे म्हणजे मूलतत्त्ववाद हे लक्षात ठेवा. सगळं कसं सवंग, सपक आणि बुद्धिमत्तेच्या लसाविला समजणारे, आवडणारे हवे. *मुख्य म्हणजे शुद्धतेच्या आग्रहाचा असा आरोप करणारे लोकच पुन्हा वर तोंड करुन भारतातील लोक जे२ईई ही अभिमानाने करतात असे हिणवायला मोकळे असतात असे कुठेसे वाचले होते. *
शिरवळकर सामान्य आहेत-होते हे वेगळे म्हणायला कशाला हवे? स्वतः पुस्तके लिहून त्यांनीच ते सिद्ध केले आहे.
भाषणाचा वृत्तांत
प्रस्तुत दुव्यात भाषण दिले नसून त्रोटक असा वृत्तांत दिला आहे. अवांतरः सध्याचा सुमार दर्जा पाहिला तर दर्जेदार भाषणाचा सुमार वृत्तांत असणार. :)
माझ्या मते संपूर्ण भाषण कुठे मिळाले तर पुष्पा भावेंवर मुद्यांवर टीका करणे सयुक्तिक राहील.
सध्याचे (त्या त्या वेळचे) जग सुमार आहे असे म्हणणारे मी सतत पाहिले आहेत. त्यातील बहुतेकांकडे वस्तुनिष्ट दृष्टीकोन नसतो असा माझा अनुभव आहे. काहीशा त्राग्याने (एखाद्या घटनेमुळे) त्यांचे असे मत प्रगट होत असते.
याचा अर्थ मी काहींना जाणवणार्या सुमारपणाला नाकारतो असे नाही. यात माझी एक छोटीशी थियरी आहे. समाजात विशिष्ट प्रमाणात दर्जेदार माणसे असतात. वेगवेगळ्या वेळी ती वेगवेगळ्या रुपात वावरतात. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात राजकारणात दर्जेदार माणसे जाण्याचे प्रमाण जास्त होते. आता ते कमी झाले. काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकी क्षेत्रात समाजातील लोणी स्तर (क्रीम) जात असे. आता तो संगणकक्षेत्राकडे जातो. (संगणकक्षेत्र हे अभियांत्रिकी क्षेत्रात मोडत नाही असे कधी कधी माझे मत असते.) आता जिकडून हे स्थलांतर होते तिकडे दर्जा घसरू शकतो. असेच उदाहरण एकेकाळी भारतात उत्तम विणकर होते आता राहिले नाहीत असे ही देऊ शकतो.
thanthanpal यांनी प्रस्तुत केलेला मुद्दा देखील महत्वाचा आहे. कित्येक 'गेले ते दिन गेले' म्हणणार्यांना उभरत्या लोकांविषयी आकस असतो. खानदानी श्रीमंत हा संस्कृती पाळणारा तर नवश्रीमंत हा छचोर. (सत्यजीत रे चा जलसाघर सिनेमा आठवला.) चिपळूणकरांनी जोतिबा फुलेंची भाषेवरून केलेली हेटाळणी. (निबंधमाला). हे यातले प्रकार. ज्यांना तुम्ही निम्नदर्जाचे समजता ते तुमच्या खांद्याला खांदा लाऊन बसायला लागले की होणारी तळमळ हे स्वतःच्या घसरत्या प्रतिभेचे उदाहरण आहे. मला असे वाटते की पूर्ण माहिती अभावी पुष्पा भावेंवर हा आरोप सध्या गैरलागू ठरेल. पण ही मानसिकता कित्येकांची असते हे नाकारता येणार नाही.
तिसरा मुद्दा थोडासा वेगळा आहे. पुष्पा भावे या प्रसिद्ध प्राध्यापिका होत्या. विद्यार्थ्यांचा दर्जा वाढावा म्हणून अशी कान उघडणी करणारे शिक्षक बरेच असतात. अशा काहीशा भूमिकेतून हे मत मांडल्याची शक्यता आहे.
प्रमोद
पुरावा
पुष्पा भावे यांचा लेख वाचून लेखनात खरोखरीच सुमारीकरण झाले आहे हे नुसते पटलेच नाही तर जाणवले देखील.
असे सोदाहरण लेखन केल्याबद्दल श्रीमती भावे यांचे अभिनंदन!
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?