सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण?

'लोकसत्ता' या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर पुष्पा भावे यांच्या नावे 'अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण' असे मत प्रसिद्ध झाले आहे.

दुवा

चर्चाप्रस्तावाचा हेतू उपक्रमींना याबाबत काय वाटते हे जाणून घेण्याचा आहे

  1. हे मत टिपीकल 'गेले ते दिन गेले' प्रकारचे आहे का?
  2. सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण होत आहे का?

माझे मत, सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण होत आहे असे आहे. मराठी संकेतस्थळांचेच जर उदाहरण घेतले तरी, फुटकळ लेखनालाही वा वा म्हणत फेटे-शेमले उडवणारे कमी नाहीत. अशा दर्जाहीन लेखनामुळे व अनाठायी स्तुतीस्तुमनांमुळे ट्रॅफिक वाढत असले तरी दर्जा खालावत चालला आहे. शुद्धलेखनाची तमा न बाळगले जाणारे लेखन, व्याकरण न पाळले जाणारे लेखन यांची भलावण मराठीचे प्राध्यापकच करत असतात. इंजिनियरांचा दर्जा कसा घसरत चालला आहे याचा प्रस्तुत संकेतस्थळावर 'विसुनाना' या सदस्यांनी दिलेला प्रतिसादही यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

तुमच्या मतांच्या प्रतीक्षेत आहे.

Comments

असहमत

भारतात सर्व गोष्टींचे सुमारीकरण झाले आहे या विचारांशी मी पूर्णपणे असहमत आहे. माझ्या वयामुळे मी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कालातली भारतातली परिस्थिती व सध्याची परिस्थिती या जवळून पाहिलेल्या आहेत. मी अगदी बिनधास्तपणे म्हणू शकतो आजच्या भारतीयांच्या आयुष्याची जी गुणवत्ता आहे पूर्वी कधीच नव्हती. जमले तर नंतर खोलात जाऊन दुसरा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करीन. आता इतर काही किरकोळ मुद्दे.

1. माझ्या लहानपणी मी एका गृहस्थांना ओळखत होतो. हे गृहस्थ प्रवास करताना मोटर, आगगाडी किंवा विमान, आपल्या चपला काढून अनवाणी बसत असत. ष हे अक्षर श असे लिहिण्याचा किंवा अशुद्ध लेखनाचा जो अट्टाहास काही मंडळी करत असताना दिसतात तो याच वर्गातला आहे असे मी समजतो.
2. मी 1984 साली प्रथम अमेरिकेला गेलो होतो व 2006 सालानंतर परत गेलेलो नाही. मात्र मला असे स्पष्टपणे जाणवले होते की अमेरिकेमधे मात्र आयुष्याची गुणवत्ता खालावतच चालली आहे. कारणे अमेरिकेत रहाणार्‍या मंडळींनी सांगावीत.
3. भारतात जवळ जवळ सर्व क्षेत्रांमधे पूर्वी समाजातील 1 किंवा 2 वर्गांचाच प्रभाव होता. आता हे चित्र पालटत आहे व सर्व समाजातील सर्व वर्गातील लोक पुढे आलेले दिसतात. ही एक अतिशय उत्तम सुधारणा होते आहे असे मी मानतो.
4. संकेत स्थळांची गुणवत्ता ही त्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. जहरी आणि विषारी प्रचार करणारी, नाक्यावरच्या कट्यावर गप्पा माराव्या तशा प्रकारचा मजकूर असणारी किंवा उपक्रम सारखी अभ्यासू अशी सर्व प्रकारची संकेत स्थळे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे दर्जा खालावत चालला आहे असे नक्राश्रू ढाळणार्‍या मंडळींनी आपण कोणती संकेतस्थळे बघत असतो याचा विचार करावा असे वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अमेरिकेमधे मात्र आयुष्याची गुणवत्ता खालावतच चालली आहे.

रोचक निरीक्षण.

माझी स्वतःची अमेरिकेत जाण्याची किंवा राहण्याची इच्छा नाही. मात्र आजूबाजूला अनेकजण (विशेषतः गुल्टी) अमेरिकेत जाण्यासाठी, ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी जी धडपड करतात ती पाहता भारतातील वाढती क्वालिटी ऑफ लाईफ त्यांच्या नजरेस पडत नाही की काय? किंवा अमेरिकेतील खालावलेले जीवनमान त्यांच्या लक्षात येत नाही काय?

येरे माझ्या मागल्या अन् ताक कण्या चांगल्या

दुवा

भाषेच्या शुद्धतेपेक्षा संवाद महत्त्वाचा - भरत दाभोळकर

रोबो या चित्रपटाचे परीक्षण

रोबो या रजनीकांत याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे अभिजित पेंढारकर यांनी 'सकाळ'मध्ये लिहिलेले परीक्षण माझ्या वाचनात आले. या चित्रपटाचा एक पंच (punch) आहे, तो त्यांनी परीक्षणामध्ये उघड केला आहे. सामान्यपणे अशा स्वरुपाचे पंच उघड करु नयेत असा संकेत आहे. एवढेही किमान तारतम्य नसावे याचे आश्चर्य वाटते.

याखेरीज

याखेरीज या परीक्षणातील मला जाणवलेली मोठी उणीव म्हणजे रहमानच्या अफलातून संगीताबद्दल एक चकार शब्दही नाही.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

हादेखील सुमारपणाचाच नमुना

बिंगो. 'लोकसत्ता'मधील चित्रपट परीक्षणातही रहमानचा उल्लेख नाही. चित्रपटात फक्त ऐश्वर्यालाच बघायला गेले होते वाटते.

मंत्रमुग्ध सोहळ्याने डोळे दिपले

दुवा

पहिल्या पानावरची बातमीः 'मंत्रमुग्ध सोहळ्याने डोळे दिपले'

या वाक्याचा अर्थच मला कळलेला नाही. सोहळा मंत्रमुग्ध कसा काय असतो? माझ्या माहितीप्रमाणे प्रेक्षक मंत्रमुग्ध होतो. मुग्ध या शब्दाचा अर्थही ज्यांना माहीत नाही असे लोक पत्रकारितेतील सुमारपणाला खतपाणी घालत आहेत. त्यांच्या बातम्या पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या लोकप्रिय दैनिकाच्या पहिल्या पानावर छापल्या जातात.

मराठी संकेतस्थळांचे 'गृहशोभिका' स्वरुप

मराठी संकेतस्थळांचे दिलेले उदाहरण अनेकांना खटकले आहे असे दिसते. गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी संकेतस्थळांचे स्वरुप झपाट्याने 'गृहशोभिका' प्रकारचे होत आहे. एखादे प्रवासवर्णन, दोनतीन सुमार ललिते, चार पाककृती, पाच विडंबने, निरर्थक कौल, एखाद्या कामण्णा महाडिकचे 'वहिनीचा सल्ला' टाईपचे लैंगिक सल्ले देणारे लेखन आणि कवितांची भरताड असे स्वरुप उपक्रम, मायबोली, मनोगत वगळता इतर संकेतस्थळांवर प्राधान्याने दिसते.

मराठी संकेतस्थळे ही अभिव्यक्तीचे नवे माध्यम होत असताना अशा सुमारपणाला प्रतिष्ठा मिळत असेल तर साहित्यिक क्षेत्रातील सवंगपणा वाढीस लागणारच.

अजून

स्कोअर सेटलिंग, धर्मांधता आणि कंपूबाजी विसरलात.

स्कोअर सेटलिंग - कंपूबाजी पूर्वीही होते

धर्मांधता हा प्रकार नवा नाही. स्कोअर सेटलिंग आणि कंपूबाजी पूर्वीही होते. आदरणीय अपवाद वगळता साहित्यिक ही जमातच कंपूबाजीवर पोसलेली आहे असे मला वाटते. पण एक किमान दर्जा राखावा एवढेही भान राखले जाऊ नये याचे वैषम्य वाटते. अशा संकेतस्थळांवर प्रकाशित होणारे लेखन व खालील दुव्यावर मिळालेली कविता यात मला स्वतःला गुणात्मक फरक जाणवत नाही. फक्त ब्लॉगवर कविता प्रकाशित केली की कोणी प्रतिसाद देत नाही.

दुवा

कोंबडी भुंकाया लागली पहाटे
अन् कुत्रं करते कुकूच कु....
कसा हो जमाना आला बघा
नवराबायकोचं भांडण असं
चालतयं घरी खुपच खु.....

असली नुसती कटकट सारी
बायकौ करते वटवट भारी
ती पण कामी मी पण कामी
ना तीही कमी ना मीही कमी
म्हणे मलाच कसा भेटला तुच तु....

सकाळी सकाळी भांडणाशिवाय
आमचा दिवस बरा जातच नाही
वेगवेगळ्या ऑफीसात दोघेही कामाला
लंचही भांडल्याशिवाय धकतचं नाही
जेवताना लागे ऊचकी तिची ऊचुक ऊ....

सायंकाळी पुन्हा घरी परतल्यावर
तोंड एकमेकांचं पहावं लागतं
संध्येच्या शितलतेनं भांडणही थंडावू लागतं
हळुच तिच्या हास्यावरती प्रेम भरुन येतं
प्रेमात विलीन होते मग दिवसभराची ढिश्श्युम ढु.....

कवि - सतिश चौधरी

मनोगत

कवितांची भरताड असे स्वरुप उपक्रम, मायबोली, मनोगत वगळता इतर संकेतस्थळांवर प्राधान्याने दिसते.

कवितांची भरताड मनोगतावरही आहे.
नुसत्या कविताच नाही तर "रे मना तुला झालय तरी काय, आणि याचे औषध तरी काय?" या धर्तीचे गाण्याचे अनुवादही आहेत. या अनुवादाच्या दर्जाबद्दल काय म्हणता येईल?

रोज येणार्‍या वीस-पंचवीस कविता (आणि त्यांची विडंबने) हे मनोगत सोडण्याचे एक कारण होते.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

कामण्णा महाडिक

गृहशोभिकेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे वहिनींचा सल्ला टाईप लैंगिक सल्ले देणारे कामण्णा महाडिक हे व्यक्तिमत्त्व. हे मनोगतावर दिसले का? दुसऱ्यांची मुले कशा प्रकारे हस्तमैथुनास सुरुवात करतात हे सांगणारे लेखन मायबोलीवर दिसले का?

कवितांची भरताड हे सुमारपणाचे एकमेव लक्षण नाही. मनोगताची पूर्ण गृहशोभिका झालेली नाही एवढेच मला म्हणायचे होते. अर्थात पुढेमागे गृहशोभिका होऊही शकेल.

तुमचे वाक्य

कवितांची भरताड असे स्वरुप उपक्रम, मायबोली, मनोगत वगळता इतर संकेतस्थळांवर प्राधान्याने दिसते.

ते तसे नाही हे दाखवून दिले, इतकेच.

किंबहुना

एखादे प्रवासवर्णन, दोनतीन सुमार ललिते, चार पाककृती, पाच विडंबने, निरर्थक कौल, एखाद्या कामण्णा महाडिकचे 'वहिनीचा सल्ला' टाईपचे लैंगिक सल्ले देणारे लेखन आणि कवितांची भरताड असे स्वरुप उपक्रम, मायबोली, मनोगत वगळता इतर संकेतस्थळांवर प्राधान्याने दिसते.

यापैकी कौल आणि लैंगिक सल्ला वगळला तर बाकी सगळे मनोगतावरही आहे. मग मनोगताला वगळण्याचे कारण काय?

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

अर्थात पुढेमागे गृहशोभिका होऊही शकेल.

अर्थात पुढेमागे गृहशोभिका होऊही शकेल. असे मी म्हटले आहे

?

गृहशोभिकेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे वहिनींचा सल्ला टाईप लैंगिक सल्ले देणारे कामण्णा महाडिक हे व्यक्तिमत्त्व. हे मनोगतावर दिसले का? दुसऱ्यांची मुले कशा प्रकारे हस्तमैथुनास सुरुवात करतात हे सांगणारे लेखन मायबोलीवर दिसले का?

तुमचा रोख लैंगिक सल्यावर आहे. मग बाकीची उदाहरणे कशाला? (कविता, लेख)
तुम्हाला एका विशिष्ट संकेतस्थळाला टारगेट करायचे असेल तर कृपया उपक्रमाचा वापर त्यासाठी करू नये असे वाटते.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

कुणाचाही अपवाद नाही..

>>एखादे प्रवासवर्णन, दोनतीन सुमार ललिते, चार पाककृती, पाच विडंबने, निरर्थक कौल, एखाद्या कामण्णा महाडिकचे 'वहिनीचा सल्ला' टाईपचे लैंगिक सल्ले देणारे लेखन आणि कवितांची भरताड असे स्वरुप उपक्रम, मायबोली, मनोगत वगळता इतर संकेतस्थळांवर प्राधान्याने दिसते. <<

हे पूर्णपणे खरे नाही. मायबोली, उपक्रम आणि मनोगताला कशाला वगळायचे? तिथेही सुमारपणा दिसतोच की .
मायबोली आणि मनोगताची चिकित्सा इथे करण्यापेक्षा उपक्रमाबाबतच बोललेले रास्त.
उपक्रम हे गंभीर प्रकृतीचे संकेतस्थळ आहे आणि विचारांच्या अभिव्यक्तीप्रमाणेच येथे भाषेची शुद्धता आणि वैचारिक देवाणघेवाण यांचेही महत्त्व अधोरेखित आहे. तरीही त्याची उपेक्षा होताना दिसतेच. चांगल्या सुरु असलेल्या चर्चेत काही नवे मुद्दे मांडण्यापेक्षा वारंवार जातीय आधारावर गरळ ओकण्याचे प्रकार हे एकप्रकारे विचारांचे सुमारीकरणच दाखवते. त्यापुढेही जाऊन अशा सुमारीकरणाचे उदात्तीकरण सुरु असते हे अधिक वाईट आहे.

फरक

उपक्रम हे गंभीर प्रकृतीचे संकेतस्थळ आहे आणि विचारांच्या अभिव्यक्तीप्रमाणेच येथे भाषेची शुद्धता आणि वैचारिक देवाणघेवाण यांचेही महत्त्व अधोरेखित आहे. तरीही त्याची उपेक्षा होताना दिसतेच. चांगल्या सुरु असलेल्या चर्चेत काही नवे मुद्दे मांडण्यापेक्षा वारंवार जातीय आधारावर गरळ ओकण्याचे प्रकार हे एकप्रकारे विचारांचे सुमारीकरणच दाखवते. त्यापुढेही जाऊन अशा सुमारीकरणाचे उदात्तीकरण सुरु असते हे अधिक वाईट आहे.

प्रशासकांनी उदात्तीकरण केले असल्याचे उदाहरण माझ्या पहाण्यात नाही.

नाही. प्रशासकांनी नाही.

प्रशासक उदात्तीकरण करत नाहीत.
सुमार दर्जाचे विचार प्रकट करुन स्वतःच त्यांचे उदात्तीकरण करणारे लोक, असे मला म्हणायचे होते.

मुद्दा

मायबोली, उपक्रम आणि मनोगताला कशाला वगळायचे? तिथेही सुमारपणा दिसतोच की .

सहमत आहे.

त्यापुढेही जाऊन अशा सुमारीकरणाचे उदात्तीकरण सुरु असते हे अधिक वाईट आहे.

+१
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

सहमत

सहमत

ही-हू-मस्ट-नॉट-बी-नेम्ड

एखादे प्रवासवर्णन, दोनतीन सुमार ललिते, चार पाककृती, पाच विडंबने, निरर्थक कौल, एखाद्या कामण्णा महाडिकचे 'वहिनीचा सल्ला' टाईपचे लैंगिक सल्ले देणारे लेखन आणि कवितांची भरताड असे स्वरुप उपक्रम, मायबोली, मनोगत वगळता इतर संकेतस्थळांवर प्राधान्याने दिसते.

उपक्रमाच्या नाकाच्या नथीतून मिसळपाव या संकेतस्थळावर शरसंधान करण्याची पद्धत जुनीच. तसे ज्या कामण्णा महाडिक टाइपचे सल्ले मिसळपावावर दिसतात त्याचे नाव घेण्याची उपक्रमावर बंदी नाही. सकारात्मक टिका कोणत्याही जाहीर लेखनावर करता येतेच. असो.

वरील अधोरेखितांबद्दल दुसर्‍या एका सदस्यांनी लिहिले आहेच पण आजचा मनोगती ताजा आणि सुमार दर्जा बघा -

१५ दैनंदिन साहित्य प्रकारांपैकी ७ कविता, ३ चर्चा आणि उरलेले ५ गद्य. आता या ५ गद्यांपैकी एका गद्याला ५ प्रतिसाद, दुसर्‍याला २, तिसर्‍याला १ आणि बाकीच्यांना शून्य प्रतिसाद. अर्थातच, प्रतिसादांच्या संख्येने दर्जा ठरतो असे काही नाही हं! १०० एक प्रतिसाद कसे जमवायचे त्याचे गणित मिसळपावावर सहज मिळते. :-) १०० प्रतिसादांसाठी दर्जाबिर्जा शब्दांची गरजही नसते.

एकंदरीत काय मराठी संकेतस्थळांना दर्जाबिर्जा गाठण्यास अद्याप थोडा अवधी द्यावा. अगदी उपक्रमालाही.

ते आहेच

उपक्रमाच्या नाकाच्या नथीतून मिसळपाव या संकेतस्थळावर शरसंधान करण्याची पद्धत जुनीच.

याचबरोबर मनोगतावर टीका करण्याची पद्धतही जुनीच आहे.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

मनोगताने काय घोडे मारले आहे?

याचबरोबर मनोगतावर टीका न करण्याची पद्धतही जुनीच आहे.

मनोगताने कोणाचे काय घोडे मारले आहे कळत नाही. मी कोणत्याही संकेतस्थळाचे नाव घेतलेले नाही. जर हे आरोप एखाद्या संकेतस्थळाला लागू आहेत असे वाटत असेल तर हे आरोप खरेच आहेत. अन्यथा वाईट वाटून घेण्याचे कारण नाही.

मी मनोगताचा सदस्य नाही. मनोगतावर कामण्णा महाडिक किंवा गृहशोभिका टाईपचा स्टफ सापडला नाही याचे तुम्हाला वाईट का वाटते हे कळत नाही.

:)

इथे ऍबट अँड कॅस्टेल्लो रूटीन चालल्याचा भास होतो आहे. :)

तुमची समस्या काय आहे ते अगोदर नक्की करा. सगळे सुमार लेखन की लैंगिक सल्ला?

हे तुमचे मूळ वाक्य.

एखादे प्रवासवर्णन, दोनतीन सुमार ललिते, चार पाककृती, पाच विडंबने, निरर्थक कौल, एखाद्या कामण्णा महाडिकचे 'वहिनीचा सल्ला' टाईपचे लैंगिक सल्ले देणारे लेखन आणि कवितांची भरताड असे स्वरुप उपक्रम, मायबोली, मनोगत वगळता इतर संकेतस्थळांवर प्राधान्याने दिसते.

यातून मनोगताला का वगळले? तर

गृहशोभिकेचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे वहिनींचा सल्ला टाईप लैंगिक सल्ले देणारे कामण्णा महाडिक हे व्यक्तिमत्त्व. हे मनोगतावर दिसले का?

मग जर लैंगिक सल्ला इतकाच मुद्दा होता तर कविता, लेख, विडंबने ही यादी कशाला?
सरळ म्हणा की मिसळपाववर लैंगिक सल्ले दिले जातात. ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे?

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

माझी समस्या

माझी समस्या सगळे सुमारीकरण ही आहे. त्यापैकी संकेतस्थळाचे सुमारीकरण हे एक उदाहरण मी दिले आणि तुम्ही तेच धरुन बसलात.

मजकूर संपादित.

प्रिय मनोगत

तुम्हाला मनोगत प्रिय आहे. :)

आहेच्च्च मुळ्ळी. ते आमचे पहिले प्रेम आहे. ;)

भलतेच

मी मनोगताचा सदस्य नाही.

भलतेच विनोदी बॉ तुम्ही. नावात* काय आहे असे त्या म्लेच्छाने म्हटलेच आहे ना? :)

*दुरूस्ती : नावांमध्ये काय आहे असे हवे.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

'आणि' हा लॉजिकल ऑपरेटर

A आणि B या लॉजिकल एक्प्रेशनचे इंटरप्रिटेशन A आणि B दोघेही true असले तरच true होते.

लैंगिक सल्ले देणारे लेखन आणि कवितांची भरताड

असे तुम्हाला मनोगतावर सापडले असेलच त्यामुळेच तुम्ही वरील प्रतिसाद दिला असावा. माझी नजरचूक झाल्याबद्दल क्षमस्व. मी पुन्हा मनोगतावर लैंगिक सल्ले देणारे लेखन शोधतो.

अ आणि ब

आणि हे दोन्ही खरे असतील तरच उत्तर खरे असते. इथे "ब" खरा नाही त्यामुळे उत्तर खरे नाही हेच दाखवले आहे.

मी पुन्हा मनोगतावर लैंगिक सल्ले देणारे लेखन शोधतो.

शोधा शोधा. :-)

'काळा मोठा कठिण आला'

प्रथम चर्चाप्रस्तावात माझा नामोल्लेख केल्याबद्दल आभार. :)
त्या प्रतिसादात 'हे माझे विचार निराशावादी' वाटण्याचा संभव आहे असे मी म्हटले होते.

धनंजय यांच्या 'गेले ते दिन गेले' या पर्यायमान्यतेशी सहमत आहे.
पण केवळ 'नॉस्टाल्जिया' किंवा 'काळा मोठा कठिण आला' या दोन्हींपेक्षा
भारतीय समाजाच्या भौतिक उन्नतीबरोबर भावनिक, वैचारिक , शैक्षणिक अवनती झाली आहे असे मत व्यक्त करतो.

भारताच्या भौतिक उन्नतीचे ठोकताळे आपल्याला वर्ल्ड बँकेच्या साईटवर पाहता येतात. खेडोपाडी जनतेला आता पिण्याचे पाणी
जास्त प्रमाणात सहज मिळू लागले, भरपूर शाळा निर्माण होऊन साक्षरता वाढत आहे, अर्भकांचा/बालकांचा मृत्यूदर खाली येत आहे, दरडोई उत्पन्न वाढत आहे इ.इ.
ही प्रगतीच आहे याबद्दल दुमत नाही. परंतु मानवाला भौतिक प्रगतीइतकीच मानसिक प्रगती महत्त्वाची आहे.
(किंबहुना भौतिक प्रगतीपेक्षा काकणभर जास्तच महत्त्वाची आहे.)
आर्थिक समृद्धीबरोबरच वैचारिक समृद्धी येणे महत्त्वाचे आहे. नाहीतर, "येरे माझ्या मागल्या आणि ताक-कण्या चांगल्या"
असे नंतर वाटून उपयोग नाही. नव्हे , तसे आतापासूनच वाटू लागले आहे.

उदाहरणार्थ,
धनंजय यांनी "जगद्धितेच्छु" वर्तमानपत्राचा अंक उदाहरण म्हणून दिला आहे. 'इंदुप्रकाश' अथवा 'केसरी' चे उदाहरण दिले नाही.
मी लहान असताना 'पुढारी' हे दैनिक या जगहितेच्छुशी तुलना करण्यालायक होते. त्यामानाने चढत्या श्रेणीने 'सकाळ', 'लोकसत्ता', 'मटा'
ही चांगली वृत्तपत्रे समजली जात. 'इलस्ट्रेटेड वुईकली'/'सत्यकथा'/'किर्लोस्कर'/'किशोर' यासारखी उत्तम नियतकालिके निघत. (त्याला कुणी उच्चभ्रू म्हणून नावे ठेवेल.
पण सार्वत्रिक शिक्षणाबरोबर सर्वसामान्य लोकांच्या भिवईची (भ्रू) पातळी का उंचावत गेली नाही? हा प्रश्न आहे.)
आज सर्वच वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि टीव्ही च्यानेल्स यांची संख्या आणि भौतिक गुणवत्ता (कागदाचा दर्जा, रंगीत प्रकाशचित्रे, ग्लॉस-चकाकी)
वाढत असली तरी वैचारीक पातळी त्यामानाने निम्नस्तरीय झालेली आहेत ही वस्तुस्थिती आहे.

हेच सर्व क्षेत्रात चालले आहे असे वाटते. मुळातला प्रश्न भौतिक प्रगती आणि वैचारिक प्रगती यांच्या समतोल विकासाचा आहे असे मला म्हणायचे आहे.
दोहोंचे प्रमाण सम न दिसता व्यस्त दिसू लागले आहे.
माझा 'पोटशूळ' भौतिक प्रगतीबद्दल मुळीच नाही. तो आहे सर्वसाधारण वैचारीक अधोगतीबद्दल. 'साक्षर : विचारशील' हे प्रमाण कोणत्याही काळात तेवढेच
होते/आहे /असते असे वाटत नाही. सर्वसाधारण शिक्षण घेणार्‍या व्यक्तींमध्ये पूर्वीच्या काळी जी विचारशीलता होती ती नाहीशी होत आहे आणि
शिक्षणाचा मूळ हेतू - जो सुसंस्कृत,सभ्य, विचारशील नागरीक निर्माण करणे हा आहे - तोच नामोहरम होत आहे याची खंत वाटते.

'जे विकते तेवढेच पिकवणे' हे विचारांच्या बाबतीत घडू लागले आहे. समाजाला योग्य दिशा देणार्‍या, समृद्ध करणार्‍या विचारांची आणि कृतींची वानवा
निर्माण होत आहे.'आहे हे ठीक चाललेले नाही' हे कोणत्याही समज असणार्‍या व्यक्तीला कळून येते. त्याचे धोके नेमके काय आहेत? असेच सुरू राहिले तर नेमके कोणते
गंडांतर ओढवू शकेल? याचा वेगळा विचार करायला हवा. किंवा तसा धोका नसला तरी निदान तोटा काय होईल? असाही विचार करता येईल.

पुष्पा भावे आणि महेश एलकुंचवारांची भाषणे मुळातून पूर्णपणे वाचली पाहिजेत. कारण लोकसत्तेच्या वार्ताहाराने केलेले समालोचनही
अर्धवट असू शकते.

सहमत

पुष्पा भावे आणि महेश एलकुंचवारांची भाषणे मुळातून पूर्णपणे वाचली पाहिजेत. कारण लोकसत्तेच्या वार्ताहाराने केलेले समालोचनही
अर्धवट असू शकते.

सहमत आहे. बरेचदा वृत्तपत्रात आपल्याला हवे तसे वाक्य तोडून दिले जाते, पूर्ण संदर्भ दिला जात नाही.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

'काळा मोठा कठिण आला' मधील काळा कोण?

कृपया वर्णभेद टाळावा!

चुकीचा अधिक काना = काळाचा महिमा

तो काना = कान्हा = कण्ह = कृष्ण => काळा असा 'काळा' झाला आहे... ;)
असो. टंकनदोषाबद्दल क्षमस्व!
(हेच ते, हेच ते सुमारीकरण - प्रतिसाद टंकतानाही दोष राहून जातात आणि सहमतीचे प्रतिसाद दुरुस्तीचा मार्गही बंद करतात. :()

अपवाद

प्रतिसाद टंकतानाही दोष राहून जातात आणि सहमतीचे प्रतिसाद दुरुस्तीचा मार्गही बंद करतात. :()

याला काही सन्माननीय अपवाद आहेत ज्यांच्या बाबतीत असे मार्ग खुले असतात. ;)

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

बाकी तुमच्या प्रतिसादाशी सहमत आहेच

प्रतिसाद आवडला

काही निरीक्षणे आणि थोडे 'सर्वसामान्यीकरण'

अशा प्रश्नावर उहापोह करण्याआधी काही निरीक्षणं नोंदवावीशी वाटतात.

प्रमाण लेखन - माझी सामाजिक श्रेणी शतकानुशतकं निम्न होती म्हणून (किंवा इतर कारणांपायी) मला प्रमाण लेखनाविषयीच्या नियमांतून सूट हवी अशी मागणी पाश्चिमात्य देशांत होताना दिसत नाही. ललित लेखनाच्या आशयानुसार भाषेच्या नियमांची मोडतोड करण्यास मुभा अर्थात असते, पण (उदा.) राष्ट्रीय पातळीच्या ब्रिटिश किंवा अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये अशी (प्रमाण भाषेला नाकारणारी) धोरणं राबवली जाताना दिसत नाहीत. मराठीमध्ये मात्र असे वाद अजून चालू आहेत. या गोंधळाच्या परिस्थितीमुळे प्रमाण लेखनाचं महत्त्व आणि प्रमाण कमी झालं आहे.

विद्वत्तापूर्ण लेखन - वृत्तपत्रासारख्या पारंपरिक प्रसार माध्यमाचा मराठीपुरता विचार केला तर असं दिसतं की काही वर्षांपूर्वीपर्यंत 'महाराष्ट्र टाईम्स' पासून सकाळपर्यंत अनेक प्रकारच्या वृत्तपत्रांमध्ये वैचारिक लेखांचं प्रमाण आताहून अधिक असायचं. पुस्तक-परीक्षणं, विविध क्षेत्रांमधल्या विद्वानांनी त्या त्या क्षेत्राशी संबंधित गंभीर, वैचारिक लेख लिहिणं हे आता पूर्वीहून कमी झालेलं आहे. त्याऐवजी आता सर्वसामान्य माणसांनी लिहिलेलं स्फुटवजा लिखाण पूर्वीहून अधिक असतं. याला अधिक लोकशाहीकरण म्हणता येईलही आणि ते त्याचं समर्थनही कदाचित मानता येईल; पण सर्वसामान्य माणसं विद्वज्जनांपेक्षा अधिक वैचारिक लिहितात असा दावा सिध्द करणं कठीण जाईल असं वाटतं.

रसिकप्रिय किंवा अनवट संगीत - जेव्हा आकाशवाणीलाच रेडिओ प्रसारणाचे हक्क होते तेव्हा तिथं चित्रपट संगीत, मराठी भावगीतं यांसारख्या लोकप्रिय संगीताबरोबर अभिजात संगीत, उपशास्त्रीय संगीत, गैरफिल्मी संगीत यांना स्थान असायचं. (गैरफिल्मी संगीत - यात बेगम अख्तर, तलत, रफी यांच्या गैरफिल्मी गझलांपासून लोकसंगीत किंवा अनवट भक्तीरचनांसारख्या अनेक प्रतींचं संगीत असायचं.) आता माझ्या रेडिओवर ७-८ स्थानकं येतात पण लोकप्रिय संगीत सोडलं तर इतर प्रकारचं संगीत अजूनही फक्त आकाशवाणीच्या स्थानकांवरच ऐकू येतं. उलट स्पर्धेमुळे त्यांनीही लोकप्रिय संगीताला अधिक वेळ दिलेला आहे. म्हणजे पूर्वीहून अधिक स्थानकं येत असूनही आता रेडिओ प्रसारणातून माझ्यापर्यंत पोहोचणार्‍या संगीतातला रसिकप्रिय किंवा अनवट संगीताचा वाटा कमी झाला आहे. चित्रपट संगीतातही चाळीस-पन्नासच्या दशकातली अनवट गाणी आता पूर्वीहून कमी ऐकू येतात.

अशी इतर क्षेत्रांतली उदाहरणंही देता येतील. यातून काही सामान्य निष्कर्ष मी काढतो ते असे: सर्वच क्षेत्रांत दर्जेदार काम थोडंच होत असणार हे वैश्विक आणि त्रिकालाबाधित सत्य असेलही, पण रसिकमान्य किंवा विद्वत्तापूर्ण दर्जेदार गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्वी अधिक अवकाश उपलब्ध होता. आता सार्वजनिक क्षेत्रात (डिसकोर्सला मराठी प्रतिशब्द ठाऊक नाही; असल्यास सांगावा.) सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेल्या आणि सहज उपलब्ध असणार्‍या माध्यमांमध्ये अशा गोष्टींसाठी पूर्वीहून कमी अवकाश उपलब्ध आहे. 'जे लोकांना आवडतं ते आम्ही देतो', 'हे निव्वळ स्मरणरंजन आहे' अशा पध्दतीनं या अवकाश संकोचण्याचं समर्थन केलं जातं. किंवा 'हा उच्चवर्णीयांचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला काय त्याचं?' अशी हेटाळणीही केली जाते. ते समर्थन किंवा ती हेटाळणी योग्य किंवा अयोग्य हा मुद्दा बाजूला ठेवला तरीही रसिकमान्य, वैचारिक, दर्जेदार गोष्टी आता संकुचित अवकाशात वावरतात असं म्हणता येईल का? हे एक प्रकारचं सुमारीकरण म्हणता येईल का?

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

धिस टेक्स द केक

अतिशय चपखल प्रतिसाद. धनंजयरावांना उदाहरण म्हणून यातील मुद्दे घेता येतील.

दर्जाचे उदात्तीकरण योग्य, स्मृतिरंजनात कल्पनारम्यता नको

दर्जाचे उदात्तीकरण योग्य, स्मृतिरंजनात कल्पनारम्यता नको.

माझी सामाजिक श्रेणी शतकानुशतकं निम्न होती म्हणून (किंवा इतर कारणांपायी) मला प्रमाण लेखनाविषयीच्या नियमांतून सूट हवी अशी मागणी पाश्चिमात्य देशांत होताना दिसत नाही.

दिसते . येथे "एबॉनिक्स"बद्दल बघावे.

राष्ट्रीय पातळीच्या ब्रिटिश किंवा अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये अशी (प्रमाण भाषेला नाकारणारी) धोरणं राबवली जाताना दिसत नाहीत.

येथे थोडी गडबड होत असावी. प्रमुख वृत्तपत्रांची शैली हीच प्रमाण मानली जाते. कालांतराने ती बदलते. न्यू यॉर्क टाइम्स मध्ये शुद्धिपत्राबद्दल लेख मी अधून-मधून वाचतो. (येथे एक लेख बघावा. बहुधा मोफत सदस्यत्व घ्यावे लागेल.)

"इंग्लंड अमेरिकेत आजकाल विरामचिह्नांकडे फारच दुर्लक्ष होते..." - "ईट्स्, शूट्स्, अँड लीव्ह्ज्" पुस्तकाबद्दल येथे वाचावे.

विद्वत्तापूर्ण लेखन -

येथे माझा एक अनुभव सांगतो. १९९२-९३ मध्ये मी प्रा. अशोक केळकरांना भेटलो, आणि त्यांनी लिहिलेल्या "वैखरी" लेखसंग्रहाबद्दल बोलणे निघाले. मी विचारले - "हे पुस्तक अजून उपलब्ध आहे, की आवृत्ती खपून अनुपलब्ध झालेले आहे?" ते हसून म्हणाले, "उपलब्ध आहे. अशा पुस्तकांची पहिली आवृत्तीसुद्धा खपून संपत नाही." गेल्या वर्षी त्यांच्या "रुजुवात" बद्दल असेल बोलणे झाले, तर असे समलले, की या पुस्तकाची पहिली छपाई-आवृत्ती पूर्ण खपली होती. प्रा. केळकरांशी बोलताना मी लेखातल्यासारखी काही तक्रार केली की मराठीत वैचारिक ग्रंथसंपदेसाठी बाजार नसल्यामुळे मैलिक लेखन मराठीत करण्यास हुरूप होत नाही. त्यांनी सोदहारण माझ्या म्हणण्याचे खंडन केले.
आता प्रा. केळकर विरुद्ध श्री. चिंज हे दोन्ही रसिक चौफेर वाचक आहेत. मला आता सर्वेक्षण-मोजमाप-विश्लेषणच हवे.

रसिकप्रिय किंवा अनवट संगीत -

कोणास ठाऊक. मला "आप जैसा कोई" वगैरे डिस्को जमान्यातली गाणी, आणि रहमानची बरीचशी गाणी फार आवडतात. १९५०-७० काळातली गाणीसुद्धा आवडतात. माझी आवड दर्जेदार नसेल म्हणून मी येथे सूट घेतो. पण माझी आवड दर्जेदार नाही, हे ठासून समजून घेण्यासाठी पुन्हा सर्वेक्षण-आकडेवारी बघायला आवडेल.

इतर क्षेत्रातले उदाहरण - माझ्यासाठी आहे सिनेमा : राज कपूरचे सिनिमे मला भडकपणामुळे, तांत्रिक गलथानपणामुळे बघवत नाहीत. अक्षरशः डोळे मिटून गाणी ऐकवी लागतात. त्या मानाने हल्ली विमानात कुठलासा मसालेदार हिंदी चित्रपट बघितला. तांत्रिक बाबतीत अतिशय सुबक होता. (म्हणजे शॉट्स एकमेकांना चिकटवणे, दिग्दर्शनातल्या बारीकसारीक खुबी, पार्श्वसंगीताची कृतीशी सांगड जोडणे...)

अभिजात कलाकृती निर्माण होत नाहीत, असे मला वाटत नाही. मागच्या वर्षी काही कारणाने मुंबईत काळ्या घोड्याजवळ टंगळमंगळ करत होतो. म्हणून चित्रप्रदर्शन बघायला गेलो. बरी चित्रे होती.

तसेच नव्या दमाचे काही चांगले कवी असावेत. मागे मुक्तसुनीत यांनी, कदाचित चिंज यांनी सुद्धा, ओळख करून दिली होती. या कवींच्या पुस्तकांचा खप फार मोठा नाही. त्यावर उपजीविका चालवता येत नाही. मर्ढेकर तरी पूर्वीच्या काळी दर्जेदार कवितांवर उपजीविका कुठे चालवत होते? (मला वाटते कुठेशी प्राध्यापकी करत होते.)

"पूर्वीपेक्षा आजकाल कमी अभिजात कलाकृती निर्माण होतात" असे जर असेल, तर मला सर्वेक्षण आणि आकडेवारी बघायला आवडेल. उच्चभ्रू लोक काही सगळे मेलेले नाहीत. अजून जिवंत आहेत.

वेगळा निष्कर्ष

वैखरी या लेखसंग्रहाचे लेखन करतेवेळी प्रा. केळकरांची गुणवत्ता सुमार होती आणि नंतर सुधारली असा अर्थ तुम्ही सांगत आहात काय? ;)
लोकांची क्रयशक्ति वाढल्यामुळे वैचारिक लेखनाचा खप वाढला असल्याची शक्यता मला पटते. परंतु पिटातील पब्लिकची क्रयशक्ति तुलनेने अधिक वेगाने (मुळात ती अधिक असणारच, त्यात अधिक भर) वाढली असावी. अशा असमान वाढीमुळे पोषक वातावरणाचा अभाव होणे शक्य आहे.

मला "आप जैसा कोई" वगैरे डिस्को जमान्यातली गाणी, आणि रहमानची बरीचशी गाणी फार आवडतात. १९५०-७० काळातली गाणीसुद्धा आवडतात. माझी आवड दर्जेदार नसेल म्हणून मी येथे सूट घेतो.

त्यात कल्पनांची गुंतागुंत, शब्दालंकार/ध्वनि-अलंकार पुरेसे असतील तर त्या आवडीला दर्जेदार 'म्हणावेच' लागेल. (दर्जा ही बाब व्यक्तिनिष्ठ असेल तर तिची चर्चाच करता येणार नाही.)

:-)

वैखरी या लेखसंग्रहाचे लेखन करतेवेळी प्रा. केळकरांची गुणवत्ता सुमार होती आणि नंतर सुधारली असा अर्थ तुम्ही सांगत आहात काय? ;)

नाही :-)

लोकांची क्रयशक्ति वाढल्यामुळे वैचारिक लेखनाचा खप वाढला असल्याची शक्यता मला पटते. परंतु पिटातील पब्लिकची क्रयशक्ति तुलनेने अधिक वेगाने (मुळात ती अधिक असणारच, त्यात अधिक भर) वाढली असावी. अशा असमान वाढीमुळे पोषक वातावरणाचा अभाव होणे शक्य आहे.

शक्यता विविध आहेत. काही का असेना, मला निकष आणि आकडेवारी हवी.

(संगीताचा दर्जा - माझ्या मते श्री. चिंज या ठिकाणी खानेसुमारीत चुकलेले आहेत. माझ्या लहानपणी आमच्या घरी रेडियोवरती फक्त खरखरीत बातम्या ऐकत असू, आणि मुद्रितध्वनी ऐकण्यासाठी कुठलेच साधन नव्हते. खेडेगावात उत्तम कलाकारी ऐकण्याची संधीसुद्धा नव्हती. मोठेपणी मी जितके अभिजात संगीत ऐकलेले आहे, त्या मानाने लहानपणी ऐकलेल्या संगीताची मात्रा जवळजवळ शून्य आहे. संधी नसल्यामुळे आवडही शून्य होती. पूर्वी अभिजात संगीताचा चाहता नव्हता पण आज चाहता आहे, असा एकतरी व्यक्ती आहे - "मी". श्री. चिंज हे त्यांच्या लहानपणी ज्या ठिकाणी राहात त्या ठिकाणी अभिजात संगीत ऐकण्याची संधी पुष्कळ होती, असा माझा कयास आहे. शहरात सर्वांकडे रेडियो उत्तम ऐकूही येत असेल. अभिजात संगीताची रुची उत्पन्न करण्यासाठी कानांचे फार प्रशिक्षण लागते, तितका वेळ उपलब्ध असलेल्या लोकांचे प्रमाण त्यांच्या आप्त-संबंधितांमध्ये अधिक असेल, असा माझा कयास आहे. माझ्यासारखा संधी-नसलेला व्यक्ती असू शकतो, हे त्यांना कदाचित तात्त्विक पातळीवर ठाऊक असेल, पण असे व्यक्ती अपवादात्मक असतील असा त्यांचा पूर्वगह असेल. आता त्यांच्या ओळखीतल्या लोकांमध्ये अभिजात संगीतापेक्षा तयारी-न-लागणारे संगीत आवडणार्‍या लोकांचे प्रमाण अधिक असेल. माझ्यासारख्या लोकांच्या संख्येची मोजणी त्यांनी नगण्य मानली असणार, आणि त्यांच्या ओळखीतल्या लोकांची मोजणी त्यांनी अधिक वजनदार केली असणार, असा माझा कयास आहे. मी मात्र माझ्यासारख्या आता-संधी-मिळून-अभिजात-संगीत-आवडू-लागलेल्या लोकांची संख्या अधिक मानली असणार, आणि श्री. चिंज यांच्या मित्रमंडळात अभिजात संगीत न-आवडणार्‍या लोकांच्या संख्येला कमी वजन दिले असणार.
.
अभिजात किंवा लाइट-क्लासिकल आवडणार्‍या लोकांची निव्वळ संख्या वाढलेली आहे, असे मला वाटते. आवडणार्‍यांची संख्या भागिले संगीत उपभोक्त्यांची संख्या हे प्रमाण कमी झाले असल्यास मला त्याबद्दल मुळीच वाईट वाटत नाही. स्वस्त ध्वनिमुद्रणामुळे माझ्यासारख्यांना काही उत्कृष्ट ऐकायला मिळू लागले आहे, या आनंदात आहे. त्या आनंदामुळे काय होते? नवीन माध्यमांवरती अनेक लोकांना कमी तयारीचे संगीत ऐकायला आवडते, याबद्दल मला फारसे शल्य वाटत नाही. श्री. चिंज यांच्या हिशोबात असे ध्वनित होते (त्यांचे असे मत नसेलही) की अभिजात कलाकृतींची आणि आस्वादकांची निव्वळ संख्याही कमी झाली आहे, आणि प्रमाणही कमी झाले आहे. अथवा निव्वळ संख्या वाढली तरी अभिजात श्रोत्यांचे प्रमाण कमी झाले, हे अधिक दु:खदायक आहे.
.
म्हणून मला सुयोग्य निकष असलेले सर्वेक्षण, आणि आकडेवारी बघायला आवडेल.
)

पर्याय संख्या आणि निवड बुद्धी

सहमत.

माझा मते त्रास हा पर्याय संख्येचा आहे, किवा निवड बुद्धीचा आहे. जेवढे जास्त पर्याय तेवढी आवघड निवड, अशा लोकांना मोजकेच पर्याय आवडतात त्यामध्ये निवड करण्ण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही. आणि हि सहज वृत्ती आहे, त्यात काही दोष आहे असं नाही.

त्याच वेळी काही लोकांना पर्याय उपलब्ध असणे हि एक संधी आहे असे वाटते, आनंद मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहे असे त्यांचे मत असते.

माझामते गोष्टीतून आनंद मिळत नसेल तर गोष्ट चुकीची कि त्यात आनंद शोधण्याचा प्रयत्न चुकीचा हे ठरवला तर सुमारीकारणाचे उत्तर मिळेल.

धनंजयांना प्रतिसाद

प्रमाण लेखन - माझा मुद्दा कदाचित मी नीट मांडू शकलो नाही. 'गार्डिअन' किंवा 'न्यू यॉर्क टाईम्स' कटाक्षानं प्रमाण लेखनाचे नियम पाळून मजकूर प्रसिध्द करतात आणि त्यासाठीचं धोरण ठरवतात हाच कळीचा मुद्दा आहे. आज 'सकाळ' किंवा 'लोकसत्ता'मध्ये असं धोरण दिसत नाही; केवळ मुद्रितशोधनातला हलगर्जीपणा दिसतो. इतर वृत्तपत्रांची अवस्था त्याहून वाईट आहे.

'प्रमाण लेखनाच्या नियमांविषयी सूट मिळण्याची मागणी होतच नाही' असं म्हणण्यात मी चुकलो. त्यापेक्षा प्रतिष्ठित आणि जबाबदार् वृत्तपत्रं/प्रसारमाध्यमं/प्रकाशनसंस्था अशा मागण्या/कारणांपोटी प्रमाण भाषेचे नियम धाब्यावर बसवण्याचं किंवा त्यांविषयी गोंधळाचं धोरण हेतुपुरस्सर किंवा हलगर्जीपणातून स्वीकारत नाहीत असं म्हणणं सयुक्तिक ठरेल. आपल्याकडे मुद्रितशोधन ही हलक्यानं घ्यायची बाब बनली आहे. 'ईट्स्, शूट्स्...' मी वाचलेलं आहे; इंग्लंडमध्ये फिरलेलोही आहे. आपल्याकडे ज्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी वाक्यावाक्यात प्रमाण लेखनाच्या चुका आढळतात् तशा इंग्लंडमध्ये आढळत नाहीत. याला माझ्यापाशी कसलीही विदा नाही, पण हवं तर पुढच्या वेळेस पुण्यात याल तेव्हा मी माझ्या खर्चानं तुम्हाला फिरवेन आणि चुका दाखवेन (इंग्लंडमध्ये मात्र तुमच्या खर्चानं फिरा!) त्यानंतर तुम्ही म्हणाल ते मी मान्य करेन.

विद्वत्तापूर्ण लेखन - माझी निरीक्षणं ही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध अवकाशाविषयीची होती, म्हणून मी वृत्तपत्रं, रेडिओ अशी माध्यमं निवडली. केळकरांचं 'रुजुवात' हे पुस्तक त्या मानानं महाग आहे. ते तसं नसावं असं मी म्हणत नाही; पण पूर्वी केळकरांचेच अनेक लेख मी वृत्तपत्रांत वाचलेले आहेत; आता मात्र त्यांचा (तशा लेखांचा) सार्वजनिक अवकाश संकुचित झालेला आहे असा माझा मुद्दा होता.

रसिकप्रिय किंवा अनवट संगीत - इथेही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध अवकाशाचा मुद्दा होता. रेडिओवर सहज वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकू यायचं. त्यानंतर व्यक्तीसापेक्ष रुची तयार होई. तीत बहुसंख्य 'आप जैसा कोई' आवडणारे असत. पण काहींना वेगळं संगीत आवडू लागे. आज मोठमोठ्या अनेकमजली दुकानांत भरपूर पैसे देऊनही रफी-तलत-गीता दत्त प्रभृतींच्या गैरफिल्मी गझला-गाण्यांच्या सी.डी. मिळत नाहीत. मला हा 'वेगळ्या' संगीताला उपलब्ध सार्वजनिक अवकाशाचा संकोच वाटतो. मी तेच संगीत श्रेष्ठ असं म्हणत नाही; फक्त रुची घडण्याच्या काळात कानावर पडण्याचं भाग्यही त्याला आज मिळत नाही एवढंच म्हणतो आहे.

अभिजात कलाकृती निर्माण होतच नाहीत असाही माझा मुद्दा नाही. उपलब्ध अवकाश कमी होतो आहे असं मी म्हणतो आहे. लोकप्रिय गोष्टी अधिकाधिक गदारोळानिशी माझ्यावर सतत आपटत असतात. हा गदारोळ पूर्वी कमी होता. सारखे उच्चरवातले आवाज कानावर पडले की कान हळूहळू बहिरे होतात; मग शांततेत ऐकायचे आवाज अस्तित्वात असूनही मला ऐकू येईनासे होतात. तसंच काहीसं हे आहे.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

चिंतातुर जंतुना प्रतिसाद

अनेक प्रतिसाद/उपप्रतिसादांच्या यादीत नेमका कुणाच्या मताला प्रस्तुत प्रतिसाद आहे ते कळावे म्हणून वर नामोल्लेख केला.

रसिकमान्य किंवा विद्वत्तापूर्ण दर्जेदार गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्वी अधिक अवकाश उपलब्ध होता.
या विधानाबद्दल थोडा साशंक आहे. तुम्हीच दिलेल्या आकाशवाणी , वृत्तपत्रे यांच्या उदाहरणाचा दाखला देऊन विचारावेसे वाटते : प्रत्येक पेपरात किंवा चॅनलवर अशा स्वरूपाच्या कामाला कमीकमी वाव मिळत असेल हे खरे असेलही; परंतु आता प्रत्येक क्षेत्रात निवड जास्त चांगली करता येते हेदेखील खरे आहे की नाही ? पूर्वी ठराविकच साधने होती. आता प्रत्येक क्षेत्र खुले झालेले आहे. कलेला, संगीताला वाहिलेली नियतकालिके निघतात, त्यांना आर्थिक आधार देणारे न्यास उपलब्ध असतात. मागील दशकांपेक्षा कितीतरी जास्त साधने आता उपलबध आहेत. याबद्दल तुम्हाला तुमच्या विवेचनाच्या संदर्भात काय म्हणावेसे वाटते ?

साधनं आणि उपलब्धता - मुक्तसुनीत यांना प्रतिसाद

अधिक साधनं उपलब्ध म्हणजे विविध प्रकारच्या गोष्टींची अधिक उपलब्धता हे मला पाश्चिमात्य देशांत पाहायला मिळतं पण भारतात तसं म्हणता येत नाही. मी वर दिलेलं गैरफिल्मी गाण्यांचं उदाहरण पाहा. वीस वर्षांपूर्वी उपलब्ध असणार्‍या अनेक मराठी पुस्तकांची आवृत्ती आज उपलब्ध नाही. अगदी दि.बा.मोकाशींसारख्या परिचित लेखकाच्या बाबतीतही हे होतं. आज सत्यजित राय किंवा ऋत्विक घटक यांचे अनेक चित्रपट उपलब्ध आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मणी कौल किंवा अदूर गोपालकृष्णन यांच्याबाबत तसं नाही. मग (अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्‍या) जाहनू बारुआ या आसामी दिग्दर्शकाच्या चित्रपटांची मागणी करण्यातही काही अर्थ नाही.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

प्रतिसाद

मागे एकदा "अभिधानंतर" परिवारातल्या एका प्रॉमिनंट कवीने कुलकर्णी-खरे या द्वयीवर औपरोधिक उद्गार काढले होते तेव्हा मी त्याना असे म्हण्टले होते की , 'सामान्य वाचक हा शेवटी डिपार्टमेंटल स्टोअर्स् मधे जाणार्‍या ग्राहकाप्रमाणे आहे खरा. त्याच्या नजरेला "अभिधानंतर"चा सेक्शन येतो , खरे-कुलकर्णींचाही येतो'. बदलत्या काळानुसार एकंदर मार्केटप्लेस् चे स्वरूप क्रमाक्रमाने खुले होत जाऊन शेवटी ते आजच्या व्यवस्थेप्रत येऊन पोचलेले आहे. या संदर्भात , तुम्ही उभ्या केलेल्या "संकोचा"च्या मुद्द्यामधले तथ्य मला अजूनही कळत नाही.

तुम्ही वर दिलेल्या उदाहरणांमधे, गतकाळातल्या काही गुणी कलावंतांच्या कलाकृती प्रकाशात येत नाहीत याची (योग्यच स्वरूपाची) खंत आहे. मात्र एकंदर सुमारपणाच्या वाढीच्या संदर्भात हा मुद्दा लागू कसा ठरतो ?

बाजारपेठ खुली होणे - नवनवी व्यासपीठे उपलब्ध होणे ही घटना व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला हजर असलेल्या घटकांना , एकंदर ऍक्टीव्हीटी वाढायला उपयुक्त ठरलेली आहे. कलेच्या व्यवहाराच्या दृष्टीने ती मला पोषक वाटते. आजवर अंधारात , उपेक्षित असलेल्या अनेक घटकांना यामुळे नक्की आवाज प्राप्त झालेला आहे. ही कोंडी अचानक फुटल्यामुळे सुमारपणाची सद्दी सुरू झाल्याचा आभास निर्माण होत असेल. परंतु, माझ्यामते गुणीजनांना प्रकाशात येण्याची संधीही त्यामुळेच उपलब्ध झाली आहे.

निव्वळ गतकाळाचा प्रश्न नाही

'सामान्य वाचक हा शेवटी डिपार्टमेंटल स्टोअर्स् मधे जाणार्‍या ग्राहकाप्रमाणे आहे खरा. त्याच्या नजरेला "अभिधानंतर"चा सेक्शन येतो , खरे-कुलकर्णींचाही येतो'.

हे विधान मला पाश्चिमात्य देशांतल्या परिस्थितीविषयी अधिक चपखल वाटतं. भारतातल्या अजस्र डिपार्टमेंटल स्टोअर्समध्येही ग्राहकाच्या रुचिवैविध्यानुसार उपलब्ध वस्तूंची विविधता नसते. म्हणजे अल्पसंख्य रुचीच्या ग्राहकाला तिथं फार काही सापडत नाही. त्यात माझा मूळ मुद्दा तर सर्वसामान्य ग्राहकाविषयी होता - म्हणजे जो आपल्या छंदांवर हजारो रुपये खर्च करू शकत नाही असा आस्वादक, किंवा ज्याची रुची अद्याप घडते आहे, असा आस्वादक. दूरदर्शन/आकाशवाणी पूर्वी अशा आस्वादकांसाठी झटत असत.

'अभिधानंतर'सारख्या अनियतकालिकांचे प्रश्न अजून थोडे वेगळे आहेत. ते इथं मांडणं अवांतर होईल पण आपण ख.व./व्य.नि. मधून बोलू शकतो.

बदलत्या काळानुसार एकंदर मार्केटप्लेस् चे स्वरूप क्रमाक्रमाने खुले होत जाऊन शेवटी ते आजच्या व्यवस्थेप्रत येऊन पोचलेले आहे. या संदर्भात , तुम्ही उभ्या केलेल्या "संकोचा"च्या मुद्द्यामधले तथ्य मला अजूनही कळत नाही.

वर म्हटल्याप्रमाणे स्वतःची अल्पसंख्य रुची घडवण्यासाठी झटणार्‍या गरीब भारतीय सर्वसामान्याला बाजारपेठेची व्यवस्था थोडी दूरच ठेवते. हा संकोच मला अभिप्रेत होता.

तुम्ही वर दिलेल्या उदाहरणांमधे, गतकाळातल्या काही गुणी कलावंतांच्या कलाकृती प्रकाशात येत नाहीत याची (योग्यच स्वरूपाची) खंत आहे. मात्र एकंदर सुमारपणाच्या वाढीच्या संदर्भात हा मुद्दा लागू कसा ठरतो ?

हा मुद्दा निव्वळ गतकाळातल्या कलाकृतींसंदर्भात नाही, तर आज 'इव्हेंट मॅनेजमेंट' करू न शकणारे (किंवा इच्छिणारे) कलाकार आणि त्यांच्या कलाकृतींनाही लागू होतो. म्हणजे एकेकाळी आपण जी.एंच्या फटकून वागण्यापायी त्यांना दूर ढकलत नव्हतो, पण आजच्या जी.एंना समाजमान्यता प्राप्त होणं जवळजवळ अशक्य आहे.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

धिंगाणा

धिंगाणा आपण सुरु केलात.

त्यांना नम्र विनंती की त्यांनी त्यांचा धिंगाणा दुसरीकडे घालावा. किंबहुना ज्येष्ठ सदस्यांनाही हे तारतम्य पाळता येत नाही हे दुःखद आहे.

आमचीही आपल्याला नम्र विनंती आहे. कामण्णा महाडिकांबद्दल जे काही आपले आक्षेप आहेत ते त्या संकेतस्थळावर जाऊनच व्यक्त करावेत. उपक्रमाला अशाप्रकारे ओलीस धरल्याचा आम्हालाही खेद होतो.

कामण्णा महाडिक हा विषयच नाही

चर्चेच्या ओघाने आलेल्या एका विचारावर मी मतप्रदर्शन केले तर चर्चाविषयच वेठीला धरला गेला. कामण्णा महाडिक यांच्याविषयी आक्षेप तिथे जाऊन मुद्दाम व्यक्त करावेत इतके ते महत्त्वाचे नाहीत. अशा सवंगपणाला खतपाणी घातले नाही तरच बरे.

नक्कीच

कामण्णा महाडिक यांच्याविषयी आक्षेप तिथे जाऊन मुद्दाम व्यक्त करावेत इतके ते महत्त्वाचे नाहीत. अशा सवंगपणाला खतपाणी घातले नाही तरच बरे.

सहमत आहे; म्हणूनच उगीच त्यांचे नाव घेऊन खतपाणी घालू नका. उपक्रमावर खूप विषय आहेत चर्चिण्यासारखे.

सहमत

सहमत

 
^ वर