चंद्र:लोण्याचा गोळा!
चंद्र:लोण्याचा गोळा!
"तुम्ही मला मूर्ख म्हणालात तरी चालेल, वेड्यात काढलात तरी चालेल, मला आता स्पष्ट बोलायला हवे. आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र हा लोण्याचा एक मोठा गोळा आहे. ही वस्तुस्थिती लपवण्यासाठी वैज्ञानिक व त्यांची 'री' ओढणारे काही तरी काल्पनिक सिद्धांत मांडून निष्पाप जनतेची दिशाभूल करत आहेत. "
"परंतु माणूस चंद्रावर गेला होता त्यावर त्यानी पाय ठेवला, झेंडा रोवला. परत येताना चंद्रावरील दगड माती गोळा करून आणले. त्याचे काय?"
"ते तद्दन खोटे आहे. ते एक फार मोठे कुटील कारस्थान आहे. व त्यात सर्व वैज्ञानिक, तंत्रज्ञ, प्रशासकीय यंत्रणा सामील झालेले आहेत. अमेरिकेतील नासा या संशोधन संस्थेने हॉलिवुडमध्ये चंद्रावरील माणसाच्या स्वारीविषयीची एक फिल्म काढली व त्याचेच चित्रण जगभर दाखवली. चंद्र अमुक आहे, तमुक आहे असे सांगत सुटले. त्यांची स्वारीही खोटी व त्यानी आणलेले म्हणून दाखवलेले दगड माती तितक्याच खोट्या. "
"टेलिस्कोपमधून आपण चंद्र बघू शकतो, त्यावरील दगड धोंडे बघू शकतो व त्याची शहानिशा करता येते. चंद्र लोण्याचा गोळा की दगड - मातीचा, हे सहज लक्षात येईल. "
"दुर्बिणीतून जे तुम्हाला दगड वाटतात ते खरे पाहता लोण्याचेच गोळे आहेत."
"अहो, चंद्र लोण्याचा गोळा असता तर इतक्या वर्षानंतर विरघळला असता की. व ते आपल्याला नक्कीच कळले असते. "
"तुम्ही गप्प बसा हो. तुम्हाला यातलं काही कळत नाही. कदाचित त्या लोकानी तुम्हालासुद्धा पैसे चारले असतील. म्हणूनच तुम्ही वितंडवाद घालत आहात. जी गोष्ट आमच्यासारख्यांना सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ व स्पष्ट दिसते, ते तुम्हाला दिसत नाही याची कमाल वाटते. असेच काही बडबडत वा वाद घालत बसल्यास आमची लोक बघून घेतील. मारहाणसुद्धा करतील. जरा जपून बोला. आमच्या भावनांचा आदर राखा. नाहीतर तुमच्या जीवाला धोका आहे. "
कसा काय वाटला हा (सु)संवाद? निव्वळ मूर्खपणा असेच तुम्ही म्हणणार. परंतु अमेरिकेतील 20 टक्के लोकांना अजूनही माणूस चंद्रावर जाऊन पाऊल ठेवून आला आहे यावर विश्वास नाही. त्यांना हे सर्व खोटे वाटते. ते सर्वच्या सर्व वेडे वा मूर्ख आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय? गैरसमजुतीमुळे असला तरी चंद्र हा लोण्याचा गोळा आहे यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. व या श्रद्धेला तडा गेलेला त्यांना आवडणार नाही. कुणी याच्या विरोधात बोललेले ते खपवून घेणार नाहीत. आम्हाला यातून मानसिक समाधान मिळत असल्यास ते हिरावून घेणारे तुम्ही कोण?
त्यांच्यातील अर्धवट वा मर्यादित ज्ञानापायी कुटील कारस्थानाचा आरोप ही सश्रद्ध मंडळी नेहमीच करत असतात. अहो-जाहो वरून अरे-तुरे वर त्यांची भाषा घसरते. मारहाणीपर्यंत त्यांची मजल जाते. हे (अपुरे) मर्यादित ज्ञान काही वेळा एखाद्या विषयासंबंधीच्या holistic समजूतीतून येऊ शकतो. कारण अशी समजूत इतर अनेक छोट्या मोठ्या समज - गैरसमज यामधून तयार झालेला असतो. पाप - पुण्याच्या कल्पना, स्वर्ग - नरक यावरील विश्वास, भूत - पिशाच्चांची भीती, कर्म सिद्धांत, परग्रहावरील जीवश्रृष्टी, मंत्र - तंत्र, दैव - नशीब, पुनर्जन्म - पूर्वजन्मातील स्मृती इत्यादी गोष्टी अशा holistic समजूतीमुळे आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. उदाहरणार्थ, आयस्क्रीम खाल्यामुळे लठ्ठपणा येतो ही समजूत आयस्क्रीमधील उष्मांक, उष्मांकांचा मेदवृद्धीशी जोडलेला संबंध, त्यातून वजनात होणारी वाढ, मग त्यातून स्थूलपणा, स्थूलपणा घालवण्यासाठीचे (अघोरी) उपाय, आहारपदार्थातील पोषण मूल्ये इत्यादी अनेक पदरातून विकसित झालेली असते. समज - गैरसमजूतींची ही साखळी तुटता तुटत नाही. चॉकलेट खाल्यामुळे दात किडतात, हेही उदाहरण याच पठडीतील आहे.
याचबरोबर हे मर्यादित ज्ञान प्रत्यक्ष वस्तुस्थितीला डोळेझाक करणाऱ्या प्रवृत्तीतूनही उद्भवते. मुळात वस्तुस्थिती एखादा सिद्धांत बरोबर की चूक हे सांगू शकत नाही. वस्तुस्थिती पुरावे सादर करू शकत नाही. वस्तुस्थिती पुरावा देण्यास असमर्थ ठरते. वस्तुस्थितीच्या वरवरच्या अभ्यासातून निष्कर्ष काढल्यास दुसरा एखादा सिद्धांतही खरा ठरू शकतो. सूर्योदय व सूर्यास्त ही वस्तुस्थिती पृथ्वी - सूर्य भ्रमण या सिद्धांताऐवजी कुठलीतरी महान अदृश्य शक्ती सूर्याला गाडीत बसवून रोज रोज ओढत नेते या सिद्धांताचेही समर्थन करू शकते. म्हणूनच वस्तुस्थितीवरून पुरावे सादर करताना ऩ्यायालयाला तर्कशुद्धपणे शंकानिरसन करण्याइतके पुरावे स्वीकारार्ह वाटतात वा परिस्थिजन्य पुरावे पुरेशी ठरतात. शंभर टक्के पूर्णपणे नि:संशय पुरावे सादर करण्याची सक्ती न्यायालय करत नाही व केली तरी असे पुरावे सादर करणे जवळ जवळ अशक्यातली गोष्ट ठरेल.
या दोन्ही मर्यादा ओळखून प्रत्येक सिद्धांत/गृहितक यांचा विचार करायचे असे ठरवल्यास सगळीकडे कारस्थानच दिसू लागतील. चंद्र हा लोण्याचा गोळा नसून दगड - मातीतून तयार झालेला, पृथ्वीच्या भोवती फिरणारा उपग्रह आहे, याचे कितीही सबळ पुरावे दिले तरीही ते पुरावे त्यांच्या दृष्टिकोनातून निर्दिष्ट निष्कर्षापर्यंत पोचण्यास अपुरे ठरतात. वस्तुस्थितीतील या उणीवामुळे चंद्र लोण्याचा गोळा, कापसाचा गोळा, बर्फाचा गोळा, ईश्वराच्या चमत्कारातून बाहेर पडलेला चेंडू वा महादेवाच्या भाळीचे आभूषण असे काहीही असू शकतो. या प्रकारच्या समजूतीसाठी आपल्याला फक्त त्यांच्याशी निगडित श्रद्धा - अंधश्रद्धांचे जाळे त्यांना कसे पूरक ठरते याचीच पुनरुक्ती करत राहायचे असते. त्यामुळेच टेलिस्कोपमधून दिसणारे दृष्य, नासाची तंत्रज्ञानातील भरारी, चंद्रावरील मानवाचे पहिले पाऊल, वैज्ञानिक करत असलेले प्रयोग, त्यांनी गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण, या सर्व गोष्टी मातीमोल वाटू लागतात वा तद्दन खोट्या ठरतात.
एकदा वाकड्यातच शिरायचे असे ठरवलेले असल्यास त्याला अंत नाही. श्रद्धा - अंधश्रद्धा, समज - गैरसमज यांच्यासाठी फार मोठा कॅन्वास उपलब्ध असतो. गंमत म्हणजे त्यांचे समज - गैरसमज त्यांच्या विधानांचे समर्थन करणारे वाटू लागतात व त्यानाच पुरावे म्हणून ते बिनदिक्कतपणे वापरत असतात. रामसेतू हा वानरांनी बांधला आहे असा समज करून घेतल्यानंतर राम हा निष्णात अभियंता होता किंवा वानरामध्ये काही जण अभियंते होते, त्याकाळी समुद्राच्या तळापर्यंत पोचून पूल बांधण्याएवढे प्रगत तंत्रज्ञान होते, त्यासाठी लागणार्या बांधकाम साहित्याचे उत्पादन त्याकाळी होत असावे, अशा प्रकारची अनेक विधानं करावे लागतात व त्यासाठी आवश्यक पुराव्यांचा शोध घ्यावा लागतो. मग कथा - पुराणातल्या ओढून ताढून आणलेले खोटे खोटे दावे खरे खुरे वाटू लागतात. ऐकीव माहिती पुरावे होतात. नासाचे तथाकथित धूसर फोटोसुद्धा याकामी उपयोगात येते. वस्तुस्थितीचा उघड उघड विपर्यास केला जातो. प्रयोगसिद्ध निष्कर्ष बाजूला सारल्या जातात. पुरातत्व शास्त्रज्ञांने अथक परिश्रमातून केलेल्या संशोधनांना हास्यास्पद ठरवल्या जातात. काऱण ते संशोधन त्यांच्या विधानाला पुष्टी देत नसते. त्यातूनच काही जण आपल्या विरोधात कारस्थान करत आहेत वा नैसर्गिक नियमासाठींचे अतिशयोक्त विधानं, चमत्कार, अतीरंजित विधानं खरेखुरे आहेतच याचा पाठपुरावा केला जातो. त्यामुळे चंद्र लोण्याचा गोळा असू शकतो. पृथ्वी सापाच्या फणीवर बसू शकते, हत्तीच्या डोक्यावर बसू शकते, ईश्वरच सृष्टीकर्ता आहे, सृष्टी तयार करण्यास सहा दिवस लागले, माणूस सर्वश्रेष्ठ प्राणी आहे, इत्यादी प्रकारच्या अनेक विधानांची रेलचेल होत राहते.
परंतु अमुक एक सिद्धांत चुकीचा असून त्या विषयीचा दुसराच सिद्धांत सरस आहे हे कसे ठरवता येईल? उत्क्रांतीचा सिद्धांत बरोबर व लोण्याचा गोळा हा सिद्धांत चुकीचा हे कसे ठरवता येईल? याचे समर्पक उत्तर आपल्याकडे नाही. ते नसल्यामुळे अमेरिकेतील 60-70 टक्के लोकांचा उत्क्रांतीवादावर विश्वास नाही.
वस्तुस्थितीचा एनकेन प्रकारे विपर्यास करायचेच असे ठरवल्यास या जगात काहीही होऊ शकते - रामाच्या वानरांनी रामसेतू बांधला, दत्त गुरू ठायी ठायी दिसू शकतो, परामानस शक्तीचा वापर करून पाकिस्तान नामशेष करता येते, मातीची - धातूची गणपतीची मूर्ती गटागटा दूध पिऊ शकते......
Comments
चांगला संवाद!
असे बरेच थोर विचारवंत अजून आहेत. खुद्द गॅलिलीयोला वेड्यात काढणारे!
इथे क्लिक करा.
गौरी
हा चंद्र आणि हा सूर्य
चंद्र जर लोण्याचा गोळा तर सूर्य शेजाऱ्याचा बल्ब का?
मूळ मुद्द्याबद्दल बोलायचा तर - लोकांचे वर्गीकरण करता येईल -
१. श्रद्धा (अंध म्हणाल तर डोळस श्रद्धा हा paradox आहे असे म्हणावे लागेल..असो) असलेले लोक पांडुरंगाच्या देवळाचा कळस हलतो असे म्हणतात, पण त्यात वाईट ते काय? अशा लोकांना तो चंद्र लोण्याचा गोळा आहे कि, रात्रीचा सोबती आहे शेतावरचा कि दगड, माती आहे. काय फरक पडणार आहे?
२. आंधळ्याचा सोंग घेतलेल्याला काहीही दिसणं अशक्य आहे कारण फरक डोक्यात आहे, तेव्हा अशा लोकांना ते कळून सुद्धा वायाच आहे.
३. जर ह्याच पाश्चिमात्य देशामधील लोक ह्या गोष्टी मनात नाहीत आणि तरीही तो देश आज भौतिक प्रगती मध्ये अग्रेसर आहे तर ३०-४० टक्के लोक बरीच प्रगती करू शकतात अस अर्थ निघतो. तेव्हा बाकीच्या लोकांना काय वाटते ह्यांनी काय फरक पडणार?
४. असे लोक ज्यांना खरच जाणून घ्यायचा आहे कि प्रत्येक गोष्टीमागील तर्काला पटेल असे कारण कोणते? त्यामागील कारण पटले तर त्या कारणाचा उपयोग करून आजून काही प्रगती करणे शक्य आहे का? असे लोक ह्या गोष्टी स्वतःच शोधतात किवा प्रयत्न करतात, अशा लोकांसाठीच प्रयत्न करायला हवे असे मला वाटते.
आणि हो - आईस्क्रीम खाल्ल्यामुळे जाडी वाढते असे नाही तर जाडी वाढण्याची संभावना जास्त वाढते असा त्याचा अर्थ असतो, आणि ते खरे आहे.
आंधळ्याचे सोंग
--आंधळ्याचा सोंग घेतलेल्याला काहीही दिसणं अशक्य आहे कारण फरक डोक्यात आहे, तेव्हा अशा लोकांना ते कळून सुद्धा वायाच आहे.--
+१
सहमत
अमेरीकेतील हे लोक हुशार आहेत. त्यांना हे असे म्हणून ४ पैसे गाठीला लावता येतात हे ही लक्षणीय आहे.
उत्तर आहे
ऑकॅमचा वस्तरा हे सडेतोड उत्तर आहे.
वेडे, अडाणी, अशिक्षित, आडमुठे, मूर्ख, अशा विविध छटांपैकीच एखादा शब्द वापरावा लागतो.
आज नशिबाने विज्ञान 'प्रस्थापित' जागी आहे. सुसंवाद चालू ठेवण्याची गरज इतरांना आहे, आपल्याला नाही. त्यांना पटत नसेल तर खिल्ली उडवून आम्हाला मानसिक समाधान मिळत असल्यास ते हिरावून घेणारे ते कोण?
धूर्त
वेडे, अडाणी, अशिक्षित, आडमुठे, मूर्ख, अशा विविध छटांपैकीच एखादा शब्द वापरावा लागतो.
यात धूर्त, बदमाष, पाताळयंत्री राहिले!
प्रमोद
अधिक नेमकी आणि यशस्वी भाकिते करणारा सिद्धांत सरस
भाकिते करायची नसतील तर काही फरक पडत नाही. वाटेल तो सिद्धांत माना. शब्द बापुडे केवळ वारा. वाटल्यास त्यातल्या त्यात कर्णमधुर किंवा तालबद्ध शब्दांतील सिद्धांत निवडा.
मात्र जर भाकिते करायची असतील, तर फरक पडतो. ज्या सिद्धांताच्या गणितामधून अधिक नेमकी भाकिते करता येतात, आणि कालांतराने ती भाकिते पडताळून योग्य असलेली दिसतात, तो यशस्वी सिद्धांत सरस मानावा.
लेख आवडला
लेख आवडला. विशेषतः सुरुवातीचा भाग.
अमेरिकेतील २० टक्के चंद्राला लोण्याचा गोळा समजतात हे वाचून नवल वाटले. (कदाचित हे वाक्य लेखातील वाक्यांचा अर्थ नसेल.)
चंद्रावर माणूस एका कालखंडात जाऊन आला. आणि त्यानंतर अजून एकदाही गेला नाही. त्याच वेळी स्पुटनिक, अंतराळप्रवास यात रशियाने मारलेली बाजी होती. चंद्रावर जाऊन येणे हा अमेरिकन अस्मितेचा एक भाग होता. अमेरिकन सरकाराची विश्वासार्हता कमी आहे आणि ती वीसटक्के लोकांना वाटत नसावी. असे काहीसे त्यात असेल. (माझ्या माहितीतल्या काहींना सद्दामने कुवैतवर केलेले आक्रमण आणि लादेन (?) ची विमानआदळ योजना अमेरिकेने केलेली वाटते. गल्फ वॉर ला ते टी.व्ही. वॉर म्हणतात.)
कॉन्स्पिरसी थियरींवर विश्वास ठेवणे आणि अंधश्रद्धा यात फरक असेल. पण कदाचित तो फारसा नसेलही.
प्रमोद
सहमत
+१
'लोणी' हे 'चीज' (गुंतागुंत नसलेला दुग्धजन्य पदार्थ) या शब्दाचे 'भाषांतर' असू शकेल.
थोडासा फरक आहे असे वाटते. संशयसिद्धांत हे केवळ 'एक शक्यता' म्हणून मांडले जातात तोवर ते चांगले बौद्धिक व्यायाम वाटतात.
टक्केवारी दुग्धजन्य पदार्थाबाबत नाही, कॉन्स्पिरसी थियरी आहे
~१०-३० टक्के लोकांना "चंद्रावर मनुष्य गेला" यावर विश्वास नाही.
(टक्केवारी "चंद्र पनीरने बनवला आहे" याबद्दल नाही.)
कॉन्स्पिरसी थियर्यांबद्दल तुम्ही पुढे लिहिलेलेच आहे.
रोचक
नानावटी यांचे लेख नेहेमीच रोचक आणि विचारप्रवर्तक असतात.
विषयाची व्याप्ती प्रचंड आहे. विश्वाची रहस्ये उलगडलेली आहेत किंवा नाहीत आणि हो तर कुठल्या मर्यादेपर्यंत यावर तज्ज्ञांचेही एकमत नाही. याच आठवड्यात खगोलभौतिकी शास्त्रज्ञ शॉन कॅरल यांनी "आपल्या रोजच्या व्यवहारातील भौतिकीचे नियम आपल्याला पूर्णपणे समजले आहेत" असे काहीसे महत्वाकांक्षी विधान केले. त्यावर वेगवेगळ्या तज्ज्ञांची चर्चा अजून चालू आहे.
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
अभिनंदन !
अशी चर्चा बर्याचदा वाचायला मिळते.
पण हा लेख अतिशय चांगल्या प्रकारे मांडला आहे. अभिनंदन !
---------------------
-धनंजय कुलकर्णी