मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ.

(ह्या लेखातला प्रतिसाद लेख म्हणून वेगळा करण्यात आला आहे.--संपादक)

'भाषा आणि जीवन'च्या अंकात आलेला लेख इथे घातल्याबद्दल चित्तरंजन ह्यांचे तसेच त्याविषयी आपले म्हणणे मांडणाऱ्या उपक्रमींचे आभार मानतो. लेखातील काही मुद्द्यांबाबत काही उपक्रमींनी मतभेद व्यक्त केले आहेत. त्यासंदर्भातील काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करतो. हे लिहायला उशीर झाला असल्यास क्षमा करावी.

मराठीकरणाच्या उद्दिष्टांचा जो क्रम मांडला आहे त्याविषयी काहींनी नापसंती व्यक्त केली आहे. त्याबाबत काही स्पष्टीकरण करणे योग्य ठरेल. हा लेख म्हणजे मुळात ओपन ऑफिसच्या मराठीकरणासंबंधी सीडॅक, पुणे येथे झालेल्या बैठकीनिमित्त लिहिलेले टिपण होते. मी तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नव्हतो.

उद्दिष्टांत जे मुद्दे आले आहेत ते शब्द कोणते घ्यायचे ह्याविषयी आलेले नसून मराठीकरण का करायचे ह्याविषयी आहेत. व्यावाहारिक विचार करायचा तर मुळात मराठीकरण करण्यात जी शक्ती घालवायची ती कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो. सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मराठीकरण न करणे हे अधिक सोयीचे आहे. तरीही जर मराठीकरण करायचेच असे ठरवले तर त्याची उद्दिष्टे लेखात दिलेल्या क्रमाने असतील. पहिले अस्मितेचा आविष्कार हे उद्दिष्ट असेल तर मराठीकरण केलेच पाहिजे. दुसरे भाषासमृद्धी हे उद्दिष्ट मानले तर मराठीकरण करणे बरे ठरेल. तिसरे आकलनसुलभता हेच उद्दिष्ट असेल तर ते साधण्यासाठी मराठीकरण केलेच पाहिजे असे नाही. त्यासाठी इतर मार्ग उपलब्ध आहेत.

भाषाभाषांतील देवघेव आणि भाषासमृद्धी ह्या विषयावर अनेकांनी एका रूढ असलेल्या समजाचा पुनरुच्चार केला आहे. तो म्हणजे इतर भाषांतील शब्द स्वीकारल्याने भाषा समृद्ध होते. मला हा समज पूर्णपणे पटत नाही. भाषेची समृद्धी आपण कशी मोजतो हा खरा प्रश्न आहे.

त्यातला सर्वात सोपा मार्ग म्हणजे भाषेतील (संकल्पनांचे वैविध्य दाखवाऱ्या) शब्दांची संख्या पाहणे (समान संकल्पना असणारे शब्द तात्पुरते वगळून). ह्या दृष्टीने विचार केला तर इतर भाषांतल्या शब्दांमुळे भाषा समृद्ध होते हे खरे आहे. पण त्यासाठी इतर भाषांतून शब्द घेणे अटळ नाही. कारण माझ्या भाषेत तितक्या संकल्पना व्यक्त करणारे शब्द मी घडवू शकलो तरी भाषा समृद्ध होणारच असते.

भाषेची समृद्धी दुसऱ्या प्रकारेही मोजता येईल. मला ही समृद्धी अधिक महत्त्वाची वाटते. एखादी भाषा मानवी जीवनातील किती प्रकारच्या व्यवहारांत वापरण्यात येते हे पाहता येईल. अशा व्यवहाराची परंपरा त्या भाषेत किती प्रमाणात रुजली आहे ह्यानुसार तिची समृद्धी जोखता येईल. अशा तऱ्हेच्या समृद्धीत इतर भाषांतून येणारे शब्द काही वाटा उचलू शकतील. पण तेही अनिवार्य नाही. इथेही मी त्या शब्दांऐवजी स्वतःच्या भाषेत नव्या संज्ञा घडवल्या तर समृद्धी उणावणार नसतेच. थोडक्यात भाषेची समृद्धी आणि शब्दांची देवघेव ह्यांचा तर्कदृष्ट्या अनिवार्य संबंध नाही. त्यामुळे
भाषासमृद्धीसाठी इतर भाषांतून शब्द घ्यायलाच हवेत असे नाही.

इंग्रजी भाषेने इतर भाषांतून शब्द घेतले आहेत ह्याचा त्या भाषेच्या समृद्धीशी संबंध जोडता येणार नाही. इंग्रजी भाषा समृद्ध आहे. कारण त्या भाषेला विविध जीवनक्षेत्रांतील व्यवहाराची मोठी परंपरा आहे. इंग्रजी भाषकांचे राजकीय वर्चस्व, त्यांची ज्ञानलालसा, ह्या दोहोंतून उभ्या राहिलेल्या ज्ञानव्यवहार आणि इतर व्यवहार ह्यांच्या व्यवस्था ही त्या परंपरेची कारणे आहेत. इंग्रजी ही केवळ इंग्रजांनी दुसऱ्या भाषांतून शब्द घेतले म्हणून समृद्ध झाली नाही. तसे म्हणणे हा काकतालीय न्याय झाला. त्यांनी जगभरातले ज्ञान आपल्या भाषेत आणले आणि नव्या ज्ञानाच्या परंपरा आपल्या भाषेतून आरंभल्या. 'इतर भाषांतले शब्द घेतले म्हणून इंग्रजी समृद्ध झाली' असा संबंध नसून 'इंग्रजी भाषा समृद्ध झाली आणि तिने इतर भाषांतले शब्दही स्वीकारले' असा संबंध आहे. विविध भाषकांचा संबंध आल्याने त्यांच्या भाषांतील शब्दांचीही देवघेव होत असते. ते साहजिक आहे. पण तिचा समृद्धीशी कारण म्हणून संबंध जोडणे हे योग्य नाही. तात्पर्य इतर भाषांतील शब्द घेतल्याने भाषा समृद्ध होते ही कारणमीमांसा मला मान्य नसल्याने इतर भाषांतून शब्द घेतल्याने इंग्रजी समृद्ध झाली हेही मला मान्य नाही. त्यामुळे तशा प्रकारची तथाकथित समृद्धी ही प्रशंसनीय वा निंद्य वाटण्याचे कारणच नाही.

इतर भाषांतले शब्द घेणे हे समृद्धीचे कारण नसले तरी तसे घेण्यात सोय आहे की नाही? सोय आहे हे मान्य करायला पाहिजे. विशेषतः आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथे. नव्या ज्ञानाची निर्मिती, मांडणी आपल्याकडे आपल्या भाषांतून क्वचितच होते. त्यामुळे एखाद्या नव्या ज्ञानाची ओळख आपल्याला इंग्रजीद्वारे होते. त्यासंदर्भातील संकल्पना आपण इंग्रजी संज्ञा वापरूनच शिकतो. त्या संकल्पनांसंबंधीचा व्यवहारही मुख्यत्वे इंग्रजी भाषेतून किंवा इंग्रजी भाषेतील संज्ञा वापरून होत असतो. मराठीत आपण जो व्यवहार करणार तो बऱ्याचदा फक्त उपयोजनात्मक असतो. अशा वेळी मराठीत वेगळी संज्ञा तयार करणे, तिचा संकेत रूढ करण्याचा प्रयत्न करणे ही कामे अधिक कष्टाची आहेत हे खरे आहे. त्यातून आपला उद्देश हा केवळ आकलन होणे इतकाच असेल तर नव्या संज्ञेपेक्षा परिचित अशी जुनीच संज्ञा अधिक सोयीची.

वरील युक्तिवाद नक्कीच प्रभावी आहे. पण तरीही मला तो स्वीकारावासा वाटत नाही. एक तर केवळ सोय हा मुद्दा नेहमीच विवेकी असेल असे नाही. सर्वांनीच आपापल्या भाषा सोडून इंग्रजीतच व्यवहार करणे हे अधिक सोयीचे आहे असेही कुणी पटवून देऊ शकेल. असे सांगणारे लोक मला भेटले आहेत. दुसरे म्हणजे मराठी संज्ञा घडवणे हेच मला अधिक सोयीचे वाटते. ह्याची कारणे दोन आहेत. १. राजकीय बलाबलाचा मुद्दा २. बौद्धिक आनंदाचा मुद्दा

मी इंग्रजीतील कोणतीही संज्ञा मराठीत वापरू नये अशा मताचा नाही. पण इंग्रजीतून कमीत कमी संज्ञा स्वीकाराव्या अशा मताचा नक्कीच आहे. ह्याचे कारण इंग्रजी आणि मराठी ह्या भाषांचे सामाजिक-राजकीय बलाबल. इंग्रजी आणि मराठी ह्यांचा संबंध आपापल्या स्थानी राहून समृद्ध होणे आणि देवघेव करीत राहणे इतकाच नाही. तर किती जीवनक्षेत्रांतील व्यवहारांत कुणी टिकून राहावे असा आहे. उद्या मराठी भाषकांची भाषा बदलली तर ती कोणती भाषा होण्याची शक्यता अधिक आहे? तर ती भाषा इंग्रजी असेल हे उघड आहे. मराठी भाषकांनी इंग्रजी शब्द वापरणे म्हणजे केवळ आपली सोय पाहणे इतकाच अर्थ नाही. तर ह्या व्यवहारात मराठी शब्द वापरणे शक्य नाही असे मान्य करणेही आहे. मराठीचे वापरक्षेत्र उणावून इंग्रजीचे वापरक्षेत्र वाढवणे असाही आहे.

पण इंग्रजी संज्ञा नाकारून नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल असे थोडेच आहे? नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल हे काही शक्य वाटत नाही. पण तसे करून मराठीचे वेगळेपण आणि स्पर्धेत असणे अधिरेखित होईल. एखादी गोष्ट टिकून राहण्यासाठी पहिल्यांदा तिचे वेगळे अस्तित्व टिकून राहावे लागते. मराठी जिंकेल की नाही हे शेवटी बलाबलानेच ठरेल.

दुसरा मुद्दा असा आहे की नवीन संज्ञा घडवणे आणि तिचा संकेत रूढ करणे हे कष्टाचे असले तरी आनंद देणारे काम आहे असे मला वाटते. नवीन संज्ञा घडवताना त्या संकल्पनेचा परिचय अधिक दृढ होतो. संलग्न संकल्पना अधिक नेमकेपणे उमगून येतात. आपण संकल्पनांच्या अधिक जवळ जातो. आपल्या भाषेचे सामर्थ्य तिच्या मर्यादा ह्यांची जाण प्रगल्भ होते. अर्थात घडवलेली प्रत्येकच संज्ञा अशी असते असे म्हणणे नाही. पण ह्या प्रक्रियेबद्दल आस्था असणारांचा असा अनुभव आहे. ह्या कारणांमुळे मला नव्या संज्ञा घडवण्याचा मार्ग अधिक योग्य वाटतो.

संज्ञा घडवणे आणि ती रूढ होणे/ करणे ह्या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. संज्ञेचा अर्थ कळण्यासाठी कोणत्या तरी मार्गाने संकेत उमजावा लागतो. नव्या संज्ञा घडवणे शक्य आहे कारण संकेत समजावून देणे शक्य आहे. संज्ञा रूढ करण्यासाठी मात्र कळणे पुरेसे नाही. पुरेशा वारंवारतेने ती संज्ञा त्या विशिष्ट संदर्भात वापरण्यात आली पाहिजे. भ्रमणध्वनी ही संज्ञा कशासाठी वापरतात हे मराठीशिक्षित व्यक्तींना आजकाल माहीत असते. त्याचा वापर कमी प्रमाणात का होईना होतो. पण तो रूढ होण्यासाठी अनिल थत्ते ह्यांची वृत्तपत्रांतून वारंवार येणारी जाहिरात ही कारणीभूत ठरली आहे. ड्राइव्हला खण म्हटल्याने पहिल्या वेळी त्यामागची संकल्पना कळणार नाही हे मला मान्य आहे. पण ती कधीच कळणार नाही असे नाही. किंबहुना मी प्रात्यक्षिक दाखवत खण हा शब्द वापरला तर कळायला अडचणही येणार नाही. ड्राइव्ह ह्या शब्दाचा संगणकासंबंधीचा अर्थ मला तरी असाच कळला होता. तेच खण ह्या संज्ञेबाबतही घडेल.

भाषाशुद्धीच्या भूमिकेमुळे रुळलेल्या शब्दांची हकालपट्टी होते आणि त्यामुळे भाषा बोजड/दुर्बोध होते असा एक मुद्दा चर्चेत आला आहे. दुर्बोधपणा रुळलेले शब्द बदलल्यामुळे अवतरतो हा ध्वनी मात्र सर्वस्वी योग्य नाही. जर दिलेला पर्याय चांगला नसेल तर दुर्बोधपणा येऊ शकेल. पण असे नेहमीच होईल असे नाही. दुर्बोधपणा टळावा ह्यासाठी काही काळजी घ्यावी लागेल हे मी लेखात म्हटले आहे. ट्रॅक्टरला शासन-व्यवहार-कोशात कर्षित्र असा पर्याय सुचवला आहे. तो नक्कीच दुर्बोध आहे. पण त्याऐवजी नांगरगाडा म्हटले तर ते दुर्वोध वाटणार नाही.

भाषेतले शब्द हे केवळ भाषाशुद्धीच्या चळवळीमुळेच बदलतात असे नाही. वेगवेगळ्या प्रभावांमुळेही बदलतात. अलीकडे इंग्रजीच्या प्रतिष्ठेमुळे अनेक लोक रूढ मराठी शब्दांच्या जागी सररास इंग्रजी शब्द वापरतात. सोमवाराला मण्डे, भाताला राईस, वाढण्याला सर्व्ह कर, नवऱ्याला मिष्टर, बायकोला मिसेस, चुलतभावाला/आतेभावाला/मामेभावाला कझीन असे म्हणतात. ते हेतुतः करत नसतील पण त्यामुळे रुळलेले शब्द हद्दपार होतच असतात. खरे तर भाषा बदलते हे एकदा मान्य केले की ती वेगवेगळ्या कारणांनी बदलू शकते हे आलेच.

परकीय शब्दांना मराठीची व्याकरणव्यवस्था लावून मराठी करून घेणे हा एक मार्ग आहे आणि तो मला मान्य आहे. पण तो मी सगळीकडे वापरणार नाही. मला चांगली मराठी संज्ञा सुचत असेल तर मी ती आधी वापरीन. 'क्लिक्'करता मला 'टिकटिकव' हा धातू सुचला. त्यामुळे मी 'अमुक अमुक ठिकाणी टिकटिकवा' असे म्हणतो. संज्ञा सुचत नसेल तिथे मराठी व्याकरण लावून ते शब्द चालतील.

भाषेत खऱ्या अर्थी लोकशाही असते, लोक जे शब्द वापरतात तेच टिकून राहतात हे मत बरोबर असेल तर मग कुणी रूढ शब्दांना वेगळ्या संज्ञा वापरल्या तर आपल्याला ते त्याला बिचकायचे खरे तर कारणच नाही. पण आपण बिचकतो ह्याचे कारण लोकांनी कोणते शब्द वापरावे ह्याबद्दल आपल्या काही धारणा असतात आणि कोणत्या तरी प्रभावामुळे लोक कोणते शब्द वापरतात हे बदलू शकेल हे आपल्याला जाणवत असते. हा प्रभाव अनेक प्रकारचा असू शकतो. प्रतिष्ठितांच्या भाषेचा, कोणत्या तरी चळवळीचा, बदलत्या परिस्थितीचा इ. त्यामुळे नव्या संज्ञा घडवा इंग्रजीतल्या सरसकट वापरू नका हे म्हणणाऱ्यांचाही काही प्रभाव पडणे शक्य आहे.
चर्चेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ह्या सर्व संज्ञा घडवू पण संगणकाच्या पडद्यावर मला इंग्रजीच संज्ञा दिसणार असतील आणि व्यवहारात इतरांशी बोलताना त्याच वापराव्या लागणार असतील तर हा व्यापार व्यर्थ नव्हे का? मुद्दा अत्यंत योग्य आहे. त्याचे अंतिम उत्तर आज माझ्यापाशी नाही. पण परिस्थिती आहे तशीच राहात नाही. प्रयत्नांनी समाजात काही बदल घडवता येतात ह्यावर माझा विश्वास आहे तोवर चांगल्या मराठी संज्ञा घडवता आल्या तर त्या घडवाव्या, रुळवता आल्या तर रुळवाव्या असा प्रयत्न नक्की करता येईल.

Comments

सहमत

भाषेत खऱ्या अर्थी लोकशाही असते, लोक जे शब्द वापरतात तेच टिकून राहतात हे मत बरोबर असेल तर मग कुणी रूढ शब्दांना वेगळ्या संज्ञा वापरल्या तर आपल्याला ते त्याला बिचकायचे खरे तर कारणच नाही.

लेखकाच्या हेतूविषयी आदर आहे. मात्र एखादी भाषा घडवून तिला अमुक एक रूप देणे शक्य आहे हे पटत नाही. (असा यशस्वी प्रयत्न झाला असल्यास त्याविषयी वाचायला आवडेल.) वेगळ्या संज्ञा वापरल्या तर बिचकायचे कारण इतकेच की समजण्यास त्रास होतो. आणि तसा वारंवार होत राहिला तर त्या संज्ञा अर्थातच वापरातून नष्ट होतील. संज्ञा घडवण्यामागचा हेतू चांगला असला तरी तो व्यावहारिक आहे का याविषयी शंका वाटते.

एखादा प्रतिशब्द दुर्बोध वाटतो किंवा नाही हे त्याचा वापरच ठरवतो. नुकताच उपक्रमावर data या शब्दाला विदाऐवजी आत्त हा नवीन शब्द दिसला. वापरूनही पाहिला. काही लाख लोकांनी वापरायला सुरूवात केली तर रूढही होईल.

भाषा घडण्यामागे त्या काळातील संस्कृती, राहणीमान, इतर संस्कृतींबरोबरची देवाणघेवाण अशा कितीतरी गोष्टी असतात. त्यामुळेच एखाद्या भाषेला विशिष्ट लहजा असतो. शिवाजीमहाराजांच्या काळात अनेक फारसी, उर्दू शब्द आले पण यामुळे मराठी भाषा दूषित न होता समृद्ध झाली. या बाबतीत इंग्रजीचे उदाहरण घेण्यासारखे आहे. आताच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे देवाणघेवाणीचा वेग प्रचंड आहे. साहजिकच अधिकाधिक नवीन शब्द येणारच.

इंग्रजी शब्द केवळ प्रतिष्ठेसाठी वापरले जातात याबद्दल सहमत नाही. त्यांचा वापर प्रचंड आहे आणि ते वापरायला सोपे जातात हे कारण अधिक सयुक्तिक वाटते.

अवांतर : पुलंच्या एका पुस्तकातील उदाहरणः
जो माणूस पुस्तकातून मराठी शिकला आहे तो "या उपाहारगृहात कोणते उष्ण खाद्यपदार्थ आहेत?" असे विचारेल. "गरम काय?" हे त्याला सुचणार नाही. मुद्दाम तयार केलेल्या संज्ञांमुळे भाषेला बरेचदा कृत्रिम स्वरूप येते असे वाटते.

अवांतर : आता मराठीकरण किंवा भाषाशुद्धीवरील चर्चांवर तीच ती मते मांडायला कंटाळा येतो आहे.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

मराठी भाषा विकास आणि समृद्धी

श्री सुशांत यांचा प्रस्तुत लेख व या आधी त्यांनी लिहिलेला आपला एक जुनाच परंतु श्री.चित्तरंजन यांच्या करवी प्रसिद्ध करून घेतलेला लेख हे दोन्ही मी बारकाईने वाचले. मागच्या वेळी लेखातील क्लिष्टता, धूसरता व उगीचच वळणे वळणे घेत मुकामाला जाण्याची पद्धत यामुळे मी तो फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. परंतु श्री. सुशांत या विषयाची पाठ सोडायला तयार नाहीत असे दिसते. त्यामुळे हा प्रतिसाद.
मराठीकरण का करायचे?
मुळात मराठीकरण म्हणजे काय? असाच प्रश्न माझ्या समोर उभा रहातो आहे.ओपन ऑफिस सारख्या एखाद्या संगणकीय कार्यक्रमामधे मराठीतून लिहिता येण्याची सुविधा निर्माण करणे म्हणजे मराठीकरण हाच अर्थ श्री. सुशांत यांना अपेक्षित असला तर मग ते होतेच आहे. त्याच्यासाठी आंदोलन उभारण्याची काय जरूरी श्री. सुशांत यांना वाटते ते समजले नाही. परंतु या पेक्षा दुसरा कोणता अर्थ श्री. सुशांत यांना अभिप्रेत असला तर तो त्यांच्या लेखातून स्पष्ट होतो आहे असे मल वाटत नाही. माझ्यापुरते बोलायचे तर मला मराठीकरण या शब्दाचा अर्थच समजू शकत नाही.
अस्मितेचा अविष्कार करण्यासाठी मराठीची आवश्यकता

मी गेले दीड वर्ष आंतरजालावर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतून लेखन करतो आहे. मराठी मधून लिहिले म्हणजे माझी अस्मिता जागृत होते व इंग्रजीमधून लिहिले म्हणजे ती विझते असा काहीही अनुभव मला नाही. इंग्रजीमधून लिखाण केले म्हणजे माझी भाषा, माझे राष्ट्र यांच्य बद्दलचे माझे प्रेम कमी होते असाही अनुभव मला नाही. 1962 च्या चीन भारत युद्धाबद्दल मी एक लेखमाला मराठीतून लिहिली होती. तर नद्यांचे पाणी चीन कशा पद्धतीने गिळंक्कृत करण्याचा प्रयत्न करतो आहे या विषयाबद्दल लिहिताना तो लेख इंग्रजीमधे लिहिणे मला जास्त श्रेयस्कर वाटले. लेखकाच्या डोळ्यासमोर कोण अपेक्षित वाचकवर्ग आहे त्याप्रमाणे लेखनाची भाषा वापरणे गरजेचे कसे असते या साठी हे उदाहरण मी दिले आहे. मराठीतून लिहिल्यामुळे अस्मिता कशी जागृत होते हे गौडबंगाल मला तरी उलगडत नाही.
भाषासमृद्धीसाठी इतर भाषांतून शब्द घ्यायलाच हवेत असे नाही.

या लेखात लेखकाने मराठी लेखांच्यात इंग्रजी शब्द वापरण्यास असलेला त्याचा विरोध सौम्य केला आहे असे दिसते. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज वाटत नाही. तरीही या लेखात असे शब्द वापरण्याची गरज नाही असे त्याला वाटते. हा वैयक्तिक आवडीचा भाग झाला. जो शब्द माझ्या जास्तीत जास्त वाचकांना समजू शकेल तो मी वापरतो. या बाबतीत बरीच उदाहरणे मागच्या चर्चेत उपक्रमींनी दिली आहेत. ती परत उगाळण्यात अर्थ नाही परंतु असे शब्द न वापरणे श्री. सुशांत याना आवडत असेल तर त्यांनी जरूर ते वापरू नयेत. दुसर्‍यांनी तसेच केले पाहिजे हा हट्ट योग्य वाटत नाही.
मुळात मराठी जितकी जास्त वापरात येईल तितकी ती जास्त समृद्ध हो ईल हे सूत्र ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळेच इतर भाषांतील शब्दांचा वापर काय? किंवा भाषाशुद्धी काय हे दोन्ही पैलू मला कमी महत्वाचे वाटतात. काही वेळा अशुद्ध लेखनाच्या फिरक्या घेण्याचा मोह मला आवरत नाही हे मी मान्य करतो. परंतु माझे हे असे करणे योग्य नव्हे हे मला जाणवत असते. आपल्याला जी मराठी लिहिता येते ती लिहून आपले विचार मांडणे महत्वाचे असते. लिहित गेले की भाषाशुद्धी होते.लिहित रहाणे हे आवश्यक असते. परंतु आपल्याला चांगले व शुद्ध मराठी लिहिता येते म्हणून काहीतरी जडबंबाल व आशय नसलेले पोकळ लेखन काही मंडळी करताना दिसतात. त्याला मात्र माझा नक्कीच आक्षेप आहे. मोजक्या शब्दात आपल्याला काय सांगायचे आहे ते सांगितले तर ते जास्त प्रभावी ठरते असा माझा अनुभव आहे. उपक्रमवरचे काही लोक असे लेखन नेहमीच करतात व ते वाचायला मला आवडते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

हे तुम्हाला कुणी सांगितले?

श्री.चित्तरंजन यांच्या करवी प्रसिद्ध करून घेतलेला लेख हे दोन्ही मी बारकाईने वाचले.
लेख बारकाईने वाचल्याबद्दल धन्यवाद. पण सुशांत ह्यांनी तो लेख माझ्याकरवी प्रसिद्ध करून घेतला आहे हे तुम्हाला कुणी सांगितले? तुम्हाला मिळालेली माहिती/समजूत चुकीची आहे.

खरे तर प्रकाश घाटपांडे ह्यांनी सांगेपर्यंत सुशांत उपक्रमाचे सदस्य आहेत हेही मला माहीत नव्हते. हा लेख अधिकाधिक मराठी भाषकांपर्यंत पोचावा असे मला वाटले. म्हणून मी 'भाषा आणि जीवन'चे संपादक प्रा. प्र. ना. परांजपे ह्यांचीच परवानगी घेतली होती.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

माझ्याकरवी प्रसिद्ध

दोन्ही लेख व पहिल्या लेखावरचे प्रतिसाद हे वाचून माझा तसा समज झाला. आपला खुलासा वाचून तो गैर असल्याचे दिसते. क्षमस्व.
चन्द्रशेखर

लेखातील भावना गोंधळलेल्या आहेत.

सुशांत, मित्रा नमस्कार!

तुझा लेख वाचला. हा लेख वाचताना अंगावर मोरपीस फिरल्यासारखे वाटले. हा लेख एखाद्या वयात आलेल्या मुलीनेच लिहीला आहे कि काय असे वाटले. म्हणजे ह्या लेखात, भावना अगदी हळूवार पणे मांडल्या होत्या.
तुझ्या ह्या ही लेखात तू भावनाच मांडलेल्या आहेस. भावना मांडणं गैर नाही. पण त्यावर इतरांनी चर्चा ती काय करायची? 'तुमचा लेख चांगला आहे.' एवढाच प्रतिसाद वाचकांनी द्यावा ही अपेक्शा लेख लिहीताना व तो प्रस्तुत करताना ठेवली होती का?
मराठी भाषा हा नाजुक व सद्द्याचा महत्वाचा मुद्दा आहे. त्या मुद्द्याचा कित्येक जण फायदा उचलत आहेत, हे मी सांगायची गरज नाही.
तू 'मराठी भाषेच्या मुद्द्याचा' गैरफायदा घेण्यासाठी लेख लिहीत नाहीस हे मी जाणून आहे.
मराठीचे भविष्य व ती पुढे कशी वाढू शकते? ह्या भावने पायीच तू लेख लिहीले आहेस.

परंतु मला, 'मराठी च्या भविष्यावरील' 'हळूवार' व 'कोणत्याच निर्णयावर ठामपणे न पोहचण्याची' ही शैली आवडली नाही.

इंग्रजी भाषेने इतर भाषांतून शब्द घेतले आहेत ह्याचा त्या भाषेच्या समृद्धीशी संबंध जोडता येणार नाही. इंग्रजी भाषा समृद्ध आहे. कारण त्या भाषेला विविध जीवनक्षेत्रांतील व्यवहाराची मोठी परंपरा आहे. इंग्रजी भाषकांचे राजकीय वर्चस्व, त्यांची ज्ञानलालसा, ह्या दोहोंतून उभ्या राहिलेल्या ज्ञानव्यवहार आणि इतर व्यवहार ह्यांच्या व्यवस्था ही त्या परंपरेची कारणे आहेत. इंग्रजी ही केवळ इंग्रजांनी दुसऱ्या भाषांतून शब्द घेतले म्हणून समृद्ध झाली नाही.

माझ्या मते इंग्रजी भाषा ही इंग्रजांच्या धाडसामुळे मोठी झाली.
भाषा म्हणजे 'आपले विचार व भावना व्यक्त करण्याचे साधन' असते.
सुख-संमृद्धी 'द्न्यानात' दडलेली असते. असे मी मानतो.
द्न्यान 'हे कृती करण्यामध्ये दडलेले असते'.
कोणतीही नवी कृती करण्यासाठी धाडस किंवा शिस्त किंवा दोन्ही गोष्टी लागतात.
इंग्रजांनी धाडस केले, शिस्तबद्दता जोपासली. त्यांच्या ह्या गुणांपायी त्यांच्या 'विचार व भावना व्यक्त करणार्‍या साधना मध्ये' म्हणजे भाषेमध्ये, इंग्रजीमध्ये संमृद्धता आली.
केवळ इंग्रजी भाषा जाणून, शिकून संमृद्ध होता येतं असं मानणं म्हणजे सुर्याच्या प्रकाशात जीवनाचा अभ्यास करण्याऐवजी परप्रकाशित असलेल्या चंद्राच्या प्रकाशात जीवनाचा आभ्यास करणे होय.

दुसरा मुद्दा असा आहे की नवीन संज्ञा घडवणे आणि तिचा संकेत रूढ करणे हे कष्टाचे असले तरी आनंद देणारे काम आहे असे मला वाटते. नवीन संज्ञा घडवताना त्या संकल्पनेचा परिचय अधिक दृढ होतो. संलग्न संकल्पना अधिक नेमकेपणे उमगून येतात. आपण संकल्पनांच्या अधिक जवळ जातो. आपल्या भाषेचे सामर्थ्य तिच्या मर्यादा ह्यांची जाण प्रगल्भ होते. अर्थात घडवलेली प्रत्येकच संज्ञा अशी असते असे म्हणणे नाही. पण ह्या प्रक्रियेबद्दल आस्था असणारांचा असा अनुभव आहे. ह्या कारणांमुळे मला नव्या संज्ञा घडवण्याचा मार्ग अधिक योग्य वाटतो.

एखादी 'संद्न्या घडवणे, संकल्पना विकसित करणे' हे सध्याच्या मराठीत शक्य आहे का?
सगळ्यांना समजेल असं 'चित्रपटाचं व त्यातील तंत्राच' उदाहरण घेवू. कृष्णधवल चित्रपट साठी वापरला जाणार्‍या कॅमेराने रंगीत चित्रपट बनवता येईल का? जुन्या काळात वापरला जाणार्‍या प्रोजेक्टरने नव्या जमान्यातील सुस्पष्ट चित्र व खणखणीत आवाज यांचा आनंद प्रेक्शकांना देता येवू शकेल का?
मला इथे म्हणायचे आहे की मराठी चे व्याकरण हे इंग्रजीचे व्याकरण इंग्रज या देशात आले त्यानुसार लिहीले/ घडवले गेले. तसे असून ही इंग्रजीपेक्शा वेगळा मराठी भाषेचा स्वत:चा बाज आहे, टिकून आहे. मराठी भाषेच्या व्याकरण रूपी कॅमेरा /प्रोजेक्टर मध्ये सुधारणा केल्या तर....? तेवढे धाडस मराठी माणसाला जमेल?
ही झाली धाडसाची बाजू.
आता पाहू शिस्तबद्धतेची बाजू.
युरोपात नव-नवे शोध लागण्यापूर्वी एखाद्या संस्थेपूढे 'पद्द्धतशीर पणे' शब्दबद्ध करून संशोधक आपले विचार ठेवीत. ती संस्था त्यावर विचार करून त्यावर पुढे काय करायचे ह्याचा निर्णय घेतला जाई.
आपल्या कडे निदान 'मराठी भाषेच्या संदर्भात तरी' एखादी संस्था अस्तित्वात आहे का? जी च्यापुढे एखादी नवी संकल्पना मांडता येईल?
त्रोटक उदा.:
व्याकरणाची प्रचलित पद्धत : कर्ता : कर्म: क्रियापद
एक काल्पनिक पद्धत :कारक: धारक : विशेशण: विशय: माध्यम: क्रियाविशेशण:क्रियापद:अर्थपद

मदत ----पाहिजे असल्यास्

सतीश, मित्रा नमस्कार!!
आपल्याला ज्ञान हा शब्द टंकीत् करण्यास् अड्चण आल्याचे माझ्या निदर्शनास आले. म्हणुन हा पत्रप्रपंच.............
तो पुढीलप्रमाणे टंकीत करावा---------- ज्ञ- jYa

आभारी आहे.

गैरसमज

श्री. सतीश यांना ज्ञान ह्या शब्दाचे टंकन करण्यात अडचण आली नसून त्यांनी तो सहेतुक तसा टंकला आहे. त्यांच्या मते ज्ञान हा शब्द नसून केवळ अक्शरचिन्हसमुच्चय आहे. तो द्न्यान असा लिहिला तरी अर्थबोध तोच होतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दिव्य ज्ञान उपक्रम व्रुक्शाखाली!!

हे अनमोल ज्ञान दिल्याबद्दल शुक्रिया!! पण ज्ञान हा शब्द वाचून इतकी सवय झालीय् कि द्न्यान वाचुन अडकायला झालं. गैरसमजुतीबद्दल् क्षमस्व्!!
मग ज्ञ हे अक्शर मोडीत खात्यात काढायचे का?? ज्ञ ला इतका सोपा पर्याय असताना ज्ञ हे अक्शर शोधण्याचे प्रयोजन काय असावे बरं?? मुर्खच् म्हणायला हवेत् आपले पुर्वज्!!

-सुवर्णा
लहान् तओंडी मोठ्ठा घास्

जूनं ते 'सुवर्णा' सारखे असते, होय नां?

सुवर्णा सखे, तुला नमस्कार!

मला ज्ञान हा शब्द टंकी'त्' करण्या'स्' अ'ड्च'ण आल्याचे आपल्या निदर्शनास आले. म्हणुन आपण जो पत्रप्रपंच केला त्या बद्दल व तो पुढीलप्रमाणे टंकीत करायचा असतो - ज्ञ- jYa
याचे द्न्यान दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे.

पूर्वजांनी जे जे दिले ते तुम्ही सगळेच जपून असता असे तुमच्या प्रतिसादावरून वाटते. नऊवारी किती छान असते. तीच्या नेसण्याने स्त्री चे सर्व शरीर झाकलेले असले तरी तीची फिगर (छान असेल तर) त्यातून किती उठून दिसते नाही? सुवर्णा तुम्ही अजूनही, नेहमी नऊवारी नेसता का?
सेक्सी कपड्यांचा इतका सोपा पर्याय असताना आजच्या काळातील मूली पंजाबी ड्रेस का घालंत असावेत? मुर्खच् म्हणायला हवे'त्' आपले पुर्व'ज्'! नाही का?

मदत्.... पुन्हा एकदा तातडीची!!

मित्रवर्या तुज नमस्कार,

मदत क्र. १.
अधिक माहिति अशी कि पंजाबी पोशाख हा सुद्धा आमच्या पुर्वजांचि देणगी आहे. कारण मि स्वत:ला भारतीय समजते व पंजाब हा प्रांत अजुन तरि भारतातच आहे. आपण वाटत टिंबकटु चे रहिवासी आहात त्यामुळे आपणास हि अधिक माहिति देत आहे.
त्याचप्रमाणे अजुनहि आम्हि मुलींनी हि प्रथा जपली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण एकदम नऊवारिवर घसर्ल्यामुळे सांगाव लागतय कि आम्हि त्याचे नऊ तुकडे करुन अंगाभोवती लपेटत नाही. सुट्सुटीत सदरे लेंगे याची प्रथा चालु असती तर आम्हिहि ती चालु ठेवली असती!! नऊवारी नेसण हा फ़ार मोठा सोपस्कार असतो. त्यामुळे सद्ध्या हा प्रकार फ़क्त काहि समारंभापुरता हौसेने नेसला जातो.
चांगल्या प्रथा असतील तर ....जरुर त्या पुढे न्याव्यात, त्यात कमीपणा कसला?? उगाच बदलासाठि बदल नको.
उद्या रहायला जागा नाहि म्हणुन तुम्हि ताजमहाल पाडुन त्याजागि सर्वसोयिंनि युक्त ४०० मजली टॉवर बांधणार का??

द्न्यान टंकित करताना --- dnyaan एवढ टकटकित करणे आणि ज्ञान साठी ---- j~jaan {बराह मधे}
द्न्यान टंकित करताना --- dnyaan एवढ टकटकित करणे आणि ज्ञान साठी ---- jYaan {gamabhana मधे}
मग द्न्यान यात काय एवढी भाषिक उत्क्रांती आहे?
हाताने लिहितानाहि नाहि आणि टकटकित करतानाही नाही.
ज्ञ, क्ष यांसारखे क्लिष्ट शब्द वारंवार वापरवे लागतात त्यामुळे कदाचित आपल्या पुर्वजांनि याना कॉम्पॅक्ट रुप दिले असावे. हि खरी भाषिक उत्क्रांति आहे.

मदत क्र. २
समोरच्या व्यक्तिने मित्रा/ मैत्रिणि असे म्हटले म्हणुन लगेच आपण त्या माणसाला सखे/ सख्या असे अतिजवळचे सम्बोधन देऊ नये! क्षमा असावी.

ता.क.--->> फ़िगर, सेक्सी या व अश्या प्रकारच्या शब्दांचि परंपरा पुढे नेण्याबद्दल आपले त्रिवार अभिनंदन !!! चांगली गोष्ट आहे.

मदत लिहीताना 'त' चा पाय मोडला का?

सुवर्णा बाई,
समोरच्या व्यक्तिने मित्रा/ मैत्रिणि असे म्हटले म्हणुन लगेच आपण त्या माणसाला सखे/ सख्या असे अतिजवळचे सम्बोधन देऊ नये! क्षमा असावी.
मी सुशांत ला ओळखतो, म्हणून मी त्याला मित्रा असे संबोधले. मी तुम्हाला व तुम्ही मला ओळखत नसताना डायरेक्ट 'मित्रा' असे कां संबोधले? तुम्हाला तुमची चूक समजली. हे चांगले झाले. संस्कृतमध्ये काय म्हण आहे ती?, 'टिंबटिंब.. अवद्न्या!'

मी नऊवारीवर घसरलो नाही. तुम्हीच 'द्न्यान' ह्या शब्दातील 'द्न्य' वर अडखळलात. मी 'द्न्य' च लिहीणार, मी 'क्श'च लिहीणार. ते वर्ण मी माझ्या उच्चारानूसारच लिहीणार.

-----------------------
जानी, गुलाबको छूना हो,
तो नजाकत से छुना,
नही तो काटा चूभ सकता है!

हसू की रडू

हसणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणार "च्" !!! हह् हा हा
आता का? ते कळवते......
आपण सर्व एकाच् उपक्रमाचे सहसदस्य असल्यामुळे व सतीश यांना मदत् करण्याची तीव्र ईच्छा झाल्यामुळे (सध्या ज्याचा पश्चात्ताप होतो आहे) त्यांना मित्रा असे संबोधण्याचे धाडस् केले. कारण ती सुद्धा संस्कृती आहे. आणि सतीश यांच्या लेखनाने पण् त्यांची थोडीफार् ओळख् करून् दिली.
आता क्ष ज्ञ बद्दल -- हे वर्णसुद्धा सतीश यांच्या नाहि तर् सर्वांच्याच् उच्चाराप्रमाणे आहेत. हा... आता त्यांचा तसा हट्टच् असेल तर् त्याला मी बापडी काय् करणार्? तुम्ही हव ते जरुर् करु शकता लोकशाहि आहे काय् मोगलाई नाहि लागून् राहिली. पण् इतरांनी सुध्दा आसच् करायच् अस नाही तुम्ही म्हणु शकत्.
राहता राहिला मोडलेला पाय् ... तर् त्याचा सुध्दा समाचार् घेउया.
आता हे जे मी टकटकीत केलं आहे ते उपक्रम् ने उपलब्ध् करून् दिलेल्या गमभन एडिटरवर्, त्यामुळे शेवट्च्या शब्दपुढे "a" हे अक्षर् टकटकित् करणे हे आळसामुळे म्हणा किंवा वेळ् वाचवण्यासाठि म्हणा मी टाळते.
आणि संस्कृत ची सतीश यांच्याइतकी जाणकार् नसल्यामुळे "ती" म्हण् मला माहित् नाही. पुर्ण् टकटकीत् करण्याची त्यांनी कृपा करावी व त्याचा अर्थसुद्धा द्यावा. अज्ञानी असल्यामुळे तो सुद्धा कळणार् नाही त्यामुळे मित्रा या सम्बोधनासाठि कसा लागु होतो ते पण् सांगावे.

अतिशय् महत्त्वाचा खुलासा---- मी या चर्चेत् मदत् करणे या आणि याच् 'सुद्ध्' व् सामाजिक् हेतुने प्रेरित् होऊन् सामील् झाली. बाकी काहिहि हेतु नव्हता. आणि नंतर् ज्ञान् झाले की संबंधित् इसमास् त्याची गरजच् नव्हती. पण् काही गोष्टी न् पटल्यामुळे त्या सांगाव्याशा वाटल्या इतकच्.

{हे म्हणजे त्या मुलांसारख् झालं ज्यानी नको असताना जबरीने त्या बिचा-या म्हातारिला रस्ता पार् करुन् दिला आणि वर् सांगत् सुटले...बघा अम्हि एका म्हातारिला मदत् केली.
justt kidding ह. वा. घे.
(हसण्यावारी घेणे) }

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
न जाने कितनी काटोंभरी राहों से गुजर् चुके हैं हम्.....
इस् गुलाब् के काटे का कोइ गम् नही |

वेगळा धागा हे चांगले

वेगळा धागा बनवला हे चांगले केले.

लेखकाला शुभेच्छा.

"बलाबल" मुद्दा मला पटलेला नाही.* आणि लेखकाच्या वैयक्तिक आवडीबद्दल अर्थातच त्यांना शुभेच्छा आहेत. "अकलनसुलभता" मार्गाने सुद्धा त्यांना हवे तसे बरेच शब्द रूढ होऊ शकतील, तशा शब्दांचा प्रसार करण्यात मीसुद्धा त्यांची मदत करेन.

उगाच तपशील : "टिकटिकवणे" शब्द माझ्या तोंडात रुळणार नाही असे वाटते.
"खण" शब्द लोक वापरू लागले, तर मी वापरेन, स्वत:हून प्रसार करणारा मिशनरी होणार नाही. ("भ्रमणध्वनी" बाबत असेच.)
"टिचकी मारणे/टिचकी देणे" हा शब्दप्रयोग बरा वाटतो. तो स्वतःहून वापरायला घेईन.

सोमवाराला मण्डे, भाताला राईस, वाढण्याला सर्व्ह कर, नवऱ्याला मिष्टर, बायकोला मिसेस,

लेखकाशी सहमत. येथे आदले मराठी शब्द वापरणे मला आवडते.

चुलतभावाला/आतेभावाला/मामेभावाला कझीन असे म्हणतात.

लेखकाच्या उदाहरणाशी असहमत. "कझिन" अधिक व्याप्ती असलेली संकल्पना आहे. त्या संकल्पनेसाठी पुष्कळ संदर्भांत मराठीत उपलब्ध असलेला "नातेवाईक" शब्द चालतो.

- - -
*विनिमयासाठी एखादा समाज कवड्या वापरतो, आणि दुसरा समाज नोटा वापरतो, समजा. बहुधा पहिला समाज दुर्बळ आहे, आणि दुसरा समाज सबळ आहे. जर पहिला समाज कवड्या+नोटा दोन्ही वापरू लागला, तर तो पूर्वीपेक्षा सबळ होतो, असे मला वाटते. कवड्यांवरती "पहिला समाज सरकार" कोरून तसे विनिमय साधन वापरून सबळ होतो की नाही, हे मला माहीत नाही. होय. नोटा वापरणारा समाज महायुद्धात तितरबितर झाला, तर मग कवड्या वापरणारा समाज अधिक बलवान होईल. बलाबलाचा कवड्यांशी/नोटांशी काहीही संबंध नाही.

मराठी भाषेचे १ नं चे शत्रु म्हणजे स्वत: मराठी लोक.

मराठी भाषेचे १ नं चे शत्रु म्हणजे स्वत: मराठी लोक. काही लोक भाषेला अडवण्याचा प्रयत्न करुन आपल्याला हवी तशी दिशा देण्याचा प्रयत्न करत् आहेत. जी कधीच स्तब्ध नसते, सतत वाहती असते ती भाषा काही लोकांना एखाद्या शिल्पाप्रमाणे घडवायची आहे. जे कवेतच घेता येत नाही, ते कसे मनाप्रमाणे घडवता येइल्?

जी वाहती आहे, तीला वाट मोकळी करुन द्यावी , ती वाहेल, खळखळेल, जीवन जगवेल.

तीला बंदीनी करु नका.

तुमच्या मनात आहे तशी मराठी लोकांनी बोला-लिहायची आहे तर तो पाया शाळा-कॉलेजात घालावात. तिथे जे मराठी शिक्षण होते ते जर योग्य असेल तर पुढील चिंता भेडसावु नयेत.

चांगला प्रतिसाद

सुशांत,

पूर्वीच्या धाग्यात ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या त्यावर मुद्देसूद प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
काही बाबतीची असहमती आहेच. पण असे चालायचेच

प्रमोद

लोकशाही

भाषेतील बदल लोकशाहीच्याच मार्गाने रूढ होतात याचे एक रोचक उदाहरण इथे.
खरे तर या बाबतीत बदल घडला तर आयुष्य सोपे होईल. पण जोपर्यंत लोकांना रूचत नाही आणि जास्तीत जास्त लोक वापरत नाहीत तोपर्यंत असे बदल येतात आणि जातात, टिकत नाहीत.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

ऑक्सफर्ड

ऑक्सफर्ड डिक्शनरीने नुकतीच इंग्रजीत आलेले नवीन शब्द, वाक्प्रचार यांची यादी प्रसिद्ध केली.
इतरभाषिक शब्दांना प्रतिशब्द शोधून त्यांची सक्ती करण्यापेक्षा हा मार्ग किती सोपा वाटतो. जे शब्द लोक वापरत आहेत त्यांना स्वीकारा आणि अधिकृत दर्जा द्या.
बात खतम!

ताक : त्यातील एक एंट्री रोचक आहे.
friend noun – a contact associated with a social networking website.
verb – add (someone) to a list of contacts associated with a social networking website.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

 
^ वर