संगणकव्यवहाराचे मराठीकरण

--सुशांत शंकर देवळेकर

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेबरोबरच उत्पादनांच्या स्थानिकीकरणाची संकल्पनाही महत्त्वाची ठरते. किंबहुना ह्या दोन्ही प्रक्रिया एकमेकींशी नाते राखणार्‍या आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जगातील एका टोकाला असलेली वस्तू जगाच्या दुसर्‍या टोकाला सहज उपलब्ध होऊ लागली आहे. पण त्याबरोबरच जगाच्या त्या टोकाला ती वस्तू पुरवताना तिथल्या स्थानिक आवश्यकता काय आहेत हेही ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे ह्याचे भान आता येऊ लागले आहे. संगणकक्षेत्रातही ह्या स्थानिकीकरणाला विशेष महत्त्व लाभले आहे.

मराठीकरणाची उद्दिष्टे

ज्या विशिष्ट सामाजिक-राजकीय परिस्थितीत आपण वावरत आहोत तिचे भान न ठेवता जर आपण संगणकव्यवहाराचे मराठीकरण करू गेलो तर ते निव्वळ उपचार म्हणून केलेले काम ठरेल. आपले मराठीकरण हे असे असू नये. ह्यासाठी मराठीकरणाच्या उद्दिष्टांतले विविध घटक लक्षात घेणे आवश्यक आणि हितकारक आहे. आपल्याला केवळ शब्दान्तर करायचे नाही. उपचारापुरते शब्दाला शब्द उभे करायचे नाहीत. संगणकाविषयी मराठीतून नेमकेपणे बोलता येईल ह्यासाठी पूर्वसिद्धता करायची आहे. मराठीकरणामागचे हेतू कोणते हे पाहू गेल्यास पुढील उद्दिष्टे ध्यानात येतात.

(अ) अस्मितेचा आविष्कार : मराठी ही माझी स्वभाषा आहे आणि मला माझा ज्ञानाविष्कार मराठीतूनच करायचा आहे अशी भूमिका घेणारे काही लोक असतात. भाषा हा त्यांच्या अस्मितेचा भाग असतो. मला माझ्या भाषेतून हे करता येते हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे असते. (अशा तर्‍हेची) भाषिक अस्मिता हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो. जपान, चीन, स्पेन, फ्रान्स अशा देशांत आपल्या स्वभाषेतच आपला ज्ञानव्यवहार आणि इतर सर्व व्यवहार करू इच्छिणारा फार मोठा वर्ग अस्तित्वात आहे. खरे तर जगात विविध ठिकाणी असलेल्या अशा वर्गाच्या अस्तित्वामुळेही जागतिक संगणकव्यवहाराच्या स्थानिकीकरणात भाषा ह्या घटकाला महत्त्व लाभते आहे.

(आ) भाषासमृद्धी : जीवनव्यवहाराच्या विविध क्षेत्रांत वापरी जाणारी भाषा त्या त्या व्यवहारासोबत आपोआप समृद्ध होत असते. आपली भाषा ही ह्या संगणकीय व्यवहारक्षेत्राची (आणि अशाच इतर अनेक व्यवहारक्षेत्रांची) स्वाभाविक भाषा असती तर आपल्याला हा सगळा स्थानिकीकरणाचा खटाटोप करावाच लागला नसता. पण दुर्दैवाने तशी परिस्थिती नाही. अशा वेळी आपल्याला एक तर हा व्यवहार आपल्या भाषेत करताच येणार नाही असे म्हणून गप्प बसावे किंवा आपल्या भाषेची क्षमता ओळखून ती भाषा अशा व्यवहाराला तयार होईल असे प्रयत्न करावेत. असे प्रयत्न नेटाने झाल्यास भारतीय भाषांना लाभलेली वाङ्मयाची परंपरा अधिक समृद्ध होऊ लागेल. आपल्या भाषेचा लवचीकपणा, शब्दसिद्धीची प्रक्रिया ह्या सर्वांची जाण ह्या उद्दिष्टात महत्त्वाची ठरते.

(इ) आकलनसुलभता : अजूनही आपल्याकडचा फार मोठा समाज आपला ज्ञानव्यवहार आणि सामाजिक व्यवहार मराठीत करत असतो. (हे संख्याबळ किती काळ टिकेल हा प्रश्न आता सहज दुर्लक्षिता येणार नाही.) अशा समाजाला संगणकीय व्यवहार सहज कळावा हे आपले एक उद्दिष्ट असणार आहे. अनेकांना आकलनसुलभता हा मुद्दा ह्या उद्दिष्टांच्या क्रमात शेवटी घातलेला पाहून आश्चर्य वाटले असेल. पण आपण ज्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत जगत आहोत तिच्यात हा मुद्दा पहिला मुद्दा होऊ शकत नाही. इंग्रजीत चाललेला ज्ञानव्यवहार कळत नाही ह्यावर आपण इंग्रजीतूनच शिकणे आणि आपण इंग्रजीतच ज्ञानव्यवहार करत राहणे हा एक मार्ग आहे. बहुसंख्य अभिजनांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच हा मार्ग अवलंबलेला आहे आणि आपल्याकडचा बहुजनसमाजही आता त्या मार्गाकडे वेगाने वाटचाल करतो आहे. शासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा ह्या मार्गालाच पाठिंबा आहे. तेव्हा निव्वळ आकलनाचा मुद्दा हा मर्यादित ठरतो. केवळ ह्या मुद्याला महत्त्व द्यायचे असेल तर मराठीत हा व्यवहार आणण्याच्या खटाटोपापेक्षा मराठीला सोडून देऊन इंग्रजीशरण होण्याचा मार्ग हा कमी कष्टाचा आहे असेही अनेकांना वाटतं.

पण मराठीकरणाच्या दृष्टीने आपण हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे केवळ उपचार म्हणून भाषान्तर करण्याच्या प्रवृत्तीला काही आळा बसण्याची शक्यता निर्माण होते. आपण केलेले मराठीकरण हे लोकांना हा विषय कळावा ह्यासाठी आहे ह्याची जाण असणे आवश्यक आहे.

संगणकव्यवहार आणि मानवी भाषा

संगणकव्यवहारात एखाद्या मानवी भाषेचा वापर आपण दोन प्रकारे करतो. एक म्हणजे वापरकर्‍यांच्या सोयीसाठी संगणकीय यंत्रणेचा भाग म्हणून संवादपटलावर आपण मानवी भाषा वापरतो. ह्यात व्यक्ती जेव्हा संगणक वापरते तेव्हा संगणकाच्या पडद्यावर तिला विविध सूचना दिसतात. त्यातून कोणत्या क्रियेनंतर त्या वापरकरी व्यक्तीने काय करणे अभिप्रेत आहे ह्याचे मार्गदर्शन मिळते. दुसर्‍या प्रकारात वापरकरी व्यक्ती आपल्या भाषेतील माहिती संगणकावर नोंदवते, साठवते, हवी तेव्हा त्यातील माहिती हुडकून वापरू इच्छिते, तिची देवाणघेवाण करू इच्छिते. आपण ह्यांपैकी पहिल्या प्रकारच्या भाषिक व्यवहाराचा विचार करत आहोत.

घडवलेल्या संज्ञा आणि स्वीकारलेल्या संज्ञा

जो ज्ञानव्यवहार आपल्याकडचा नाही, जो आपण कुणा इतरांकडून शिकलो आहोत, त्या व्यवहारासाठी संज्ञाही त्याच भाषेतून घ्यायला काय हरकत आहे असे एक मत आहे. नाहीतरी विविध भाषा बोलणारे लोक एकमेकांच्या संपर्कात आले म्हणजे त्यांच्या भाषांमध्ये परस्परांत देवघेव होतच असते. संगणकविज्ञान आणि संगणकतंत्रज्ञान आपण युरोप-अमेरिकेकडून घेतले तेव्हा त्यांनी वापरलेल्या संज्ञाच आपण का स्वीकारू नयेत? उगाच मराठी संज्ञा शोधत बसण्याची कटकट कशाला हवी! ही भूमिका काही नवी नाही. पण भाषाभाषांतील देवघेव ही जितकी स्वाभाविक आहे असे भासते वा भासवण्यात येते तशी ती खरोखर असतेच असे नाही हेही आपण ध्यानात घ्यायला हवे. त्यातली स्वाभाविकता आणि अगतिकता ह्या दोन्ही गोष्टी चिकित्सक बुद्धीने तपासायला हव्यात. ज्या दोन भाषांच्या संबंधांबाबत आपण बोलतो आहोत त्या भाषांचे राजकीय-सामाजिक बलाबल काय ह्याचे भान ठेवले नाही तर ह्या तथाकथित स्वाभाविक देवघेवीची परिणती ही एका भाषेने स्वाभाविकपणे दुसरा भाषा मटकावण्यात होते. हा विचार केल्यास सध्याच्या परिस्थितीत इंग्रजीतले शब्द मराठीत सरसकट घेणे टाळावे. अगदी निरुपाय असेल तरच घ्यावे. शक्यतो मराठी धाटणीचे नवे शब्द घडवावे असे प्रस्तुत लेखकाला वाटते. फाइल, फोल्डर, ड्राइव्ह ह्यांना धारिका, संचिका, खण हे किंवा अधिक चांगले इतर मराठी पर्याय वापरणे चांगले.

पारिभाषिक संज्ञा

संज्ञांना भाषाव्यवहारात एक उद्दिष्ट असते ते म्हणजे वस्तुबोधाचे. संज्ञा आपण वापरतो त्या एखाद्या गोष्टीचा निर्देश व्हावा म्हणून. पारिभाषिक संज्ञा हा संज्ञांचा विभाग होतो तो विशिष्ट संदर्भाच्या सापेक्षतेने. इथे संज्ञांचा अर्थ हा मूलत: एका मर्यादित क्षेत्रातल्या व्यवहारानुसार ठरतो. पारिभाषिक संज्ञांचा वापर हा मुख्यत्वे त्या क्षेत्रातील जाणकार करत असतात. डॉ० अशोक केळकर ह्यांनी दिलेले उदाहरण वापरायचे तर पाणी ही संज्ञा व्यवहारात आपण वापरतो ती पिण्याजोगा, धुण्यासाठी वापरायचा द्रवरूप पदार्थ अशा अर्थाने. पण रसायनविज्ञानात त्याच्या ह्या संदर्भापेक्षा त्याची घडण महत्त्वाची ठरते. पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्यांच्या अणूंचे संयुग आहे ह्याला तिथे प्राधान्य असते. मराठीकरणाचा विचार करताना संज्ञाव्यवहाराचे हे वैविध्य ध्यानात घ्यायला हवे.

मराठीकरणाच्या प्रक्रियेविषयी

सर्वसाधारणपणे संगणकप्रणाल्यांच्या देशीकरणात जी पद्धत वापरतात ती म्हणजे इंग्रजीतली संज्ञांची यादी देऊन त्यांना देशी भाषांत कोणते पर्याय आहेत ते लोकांना नोंदवायला सांगणे. पण ह्या पद्धतीत काही तोटे आहेत. ह्या पद्धतीत संज्ञाव्यवहार तुकड्यातुकड्यांत विखुरलेला असतो. त्याचे भान राहतेच असे नाही. संज्ञांचे एकमेकांशी असलेले संबंध, वापराचे संकेत ह्या सगळयांचे एकत्रित भान येतेच असे नाही.
संज्ञांचे पर्याय निवडण्यासाठी देताना स्रोतभाषेतील संज्ञा आणि तिच्यापुढे पारिभाषिक अर्थ अशी सामग्री आपल्यापुढे आपण ठेवली तर संदर्भांचा घोटाळा होणार नाही आणि मराठीकरणही चपखल होईल. त्यामुळे स्रोतभाषेतील संज्ञांचे व्यवहारातले अर्थ आपोआपच गळतील.

दुसरे म्हणजे सुट्या संज्ञा देण्यापेक्षा वाक्येच जर समोर असली तर अर्थाचे संदर्भ स्पष्ट होतात. ह्या दृष्टीने 'साहाय्य' ह्या विभागातील नोंदींचे मराठीकरण प्रथम करण्याचा प्रयत्न झाल्यास अधिक रेखीव संज्ञा उपलब्ध होऊ शकतील. आणि वापरकर्‍यांच्या दृष्टीने पाहता त्यांना फार निकडीची असणारी सोय ह्यातून आपोआप लाभले.

नेमके अर्थसंदर्भ

सर्वसामान्यपणे भाषेतील शब्दाशी विविध संदर्भ निगडित असू शकतात. अशा वेळी शब्दाचा नेमका संदर्भ नीट कळणे आणि तो नीट व्यक्त होणे हे आवश्यक आहे. अनेकदा शब्दाच्या पारिभाषिक अर्थापेक्षा व्यवहारातल्या सामान्य अर्थाच्याच आधारे संज्ञांचा विचार होतो. त्यातून उगीचच बोजडपणा येऊ शकतो. उदा० 'ऑथेंटिफिकेशन'ला 'अधिप्रमाणन' म्हणण्याची आवश्यकता नाही. ह्या संज्ञेच्या वापराचा संदर्भ पाहिला तर 'खातरजमा' हा शब्द अधिक योग्य वाटतो.

एखाद्या गोष्टीशी अनेक संदर्भ निगडित असताना संज्ञा ही त्यातील एखाद्याच संदर्भाला महत्त्व देऊन रचलेली असू शकते. उदा० मराठीत सध्या अनेक लोक ज्यासाठी न्याहाळक अशी संज्ञा वापरतात त्याला इंग्रजीत ब्राव्जर अशी संज्ञा आहे (त्याला अनुसरून काही लोक चाळकही म्हणतात.) ह्या दोन्ही संज्ञा ह्या ह्या गोष्टीच्या एका एका धर्माचा निर्देश करतात. मुळात संगणकावर महाजालावरील संकेतस्थळ पाहण्याची सोय करणारी संगणकप्रणाली हा अर्थ इथे मुख्य आहे आणि तो इंग्रजी आणि मराठी दोन्ही संज्ञांच्या सामान्य व्यवहारातील अर्थांत तंतोतंत गवसत नाही. त्यांचा पारिभाषिक वापर लक्षात घेतला तरच ह्या संज्ञा योग्य वाटतात.

ह्या व्यवहाराचा पारिभाषिकपणा लक्षात घेणे ही एक पायरी झाली. ती लक्षात घेऊनही नव्याने एखाद्या भाषेत चपखल संज्ञा सुचवणे हे काम सोपे नाही. मराठीत नव्या संज्ञा आणताना जाणवलेल्या मर्माच्या जागा खाली मांडत आहे.

तंतोतंत जुळणारी संज्ञा

एका भाषेत एखादा शब्द जितक्या विविध संदर्भांशी निगडित असतो तितक्याच संदर्भांशी निगडित असलेली पर्यायी संज्ञा शोधण्यात अनेकदा भाषान्तरकारांची शक्ती खर्च होते. निदान शास्त्रीय भाषाव्यवहारात तरी बहुतेक वेळां ह्याची आवश्यकता नसते. उदा० 'यूजर इण्टरफेस'साठी मराठीत संवादपटल ही संज्ञा सुचवली तर इण्टरफेसचे इतर संदर्भ उदा० दोन संगणकीय यंत्रणांना जोडणारी मध्यस्थ यंत्रणा ही संवादपटल ह्या संज्ञेत समाविष्ट होत नाही. पण अशा विविध अर्थांसाठी वेगवेगळ्या संज्ञा वापरात येतात (संवादपटल आणि मध्यस्था) हे ध्यानात घेतले तर सगळे संदर्भ तंतोतंत जुळतील अशाच संज्ञा हव्यात हा हट्ट उरणार नाही.

आपला सांस्कृतिक शब्दकोश

अनेकदा असे वाटते की मराठीचा आपला सामूहिक शब्दकोश हरवत चालला आहे. आपल्याला नवा शब्द घडवायचा झाला तर आपण संस्कृतातल्या शब्दसिद्धीची प्रक्रिया अधिक वापरू जातो. (तीही बर्‍याचदा अज्ञानमूलक असते, ते असो.) संगणकाची आज्ञावली रचताना त्यात एक विशिष्ट रचनाबंध वापरतात. त्यात एखादी क्रिया विशिष्ट टप्प्यानंतर परत परत करण्यात येते. पुढची आज्ञा मिळेपर्यंत हे परत परत करणे चालूच असते. इंग्रजीत ह्या रचनाबंधाला 'लूप' असे म्हणतात. मराठीत काय म्हणाल असे विचारले तर बहुतेक लोक पुनरावर्तन वगैरे म्हणू लागतात. निष्कारण संस्कृतात शिरतात. त्याला फेरा म्हणता येईल हे आपल्याला पटकन सुचत नाही. फेरा हा शब्द एकदा सुचला की जन्ममरणाचा फेरा, फेर्‍यातून सुटणे इ० शब्दप्रयोग आठवून ही संज्ञा अधिक चपखल आहे हे सहज लक्षात येते. पण हे जरा सुचायला हवे. मराठीकरण करताना ह्या गोष्टीचे भान असल्यास मराठीकरण अधिक स्वाभाविक होईल असे वाटते.

संस्कृतचा अनावश्यक वापर

संस्कृतचा वापर अनेकदा नको तितका झाल्यानेही असा पारिभाषिक भाषाव्यवहार क्लिष्ट होतो. संस्कृततज्ज्ञांच्या दृष्टीने एखादा संस्कृत शब्द चपखल असला तरी मराठीत सोपा शब्द देणे शक्य असताना तो संस्कृत शब्द वापरणे टाळावे. 'नेव्हिगेटर'ला मार्गनिर्देशक म्हणण्यापेक्षा वाटाड्या म्हणणे केव्हाही चांगलेच.

सामासिक पदांची घटकपदे

अनेकदा स्रोतभाषेतली संज्ञा ही सामासिक स्वरूपाची असते. अशा संज्ञांना पर्यायी संज्ञा सुचवताना काळजी घ्यायला हवी. उदा० इंग्रजी संज्ञा जर सामासिक असेल तर तिच्या घटकपदांचे कोशातले अर्थ सुटे सुटे लक्षात घेऊन पर्यायी संज्ञा घडवली तर ती बर्‍याचदा अभिप्रेत संदर्भात चपखल वाटत नाही. उदा० 'बुकमार्क'चा पर्याय म्हणून पुस्तकखूण ही संज्ञा वापरली तर अर्थ कळेलच. पण स्मरणखूण अधिक बरी वाटते. मूळ अर्थ काय अभिप्रेत आहे? तर आपण नेहमी वापरतो ते संकेतस्थळांचे पत्ते पुन्हा पुन्हा लिहावे लागू नयेत म्हणून संगणकाने ते नोंदवून घेणे. हे झाले म्हणजे एकदा टिकटिकवल्याने (क्लिक केल्याने) काम भागते. ह्याला मराठीत स्मरणखूण असे म्हणणे अधिक बरे. पुस्तकखूण म्हणजे पुस्तकात ठेवायची खूण तिचा अर्थ आपण कुठवर वाचले त्याची आठवण करून देणे, त्यावरून संकेतस्थळाचा पत्ता लक्षात ठेवण्याची संगणकातली सोय एवढा लांबलचक प्रवास करण्याची आवश्यकता नाही.

व्याकरणिक रचनाविशेष

भाषांचे व्याकरणिक रचनाविशेष अनेकदा काही बंधने आणत असतात ती ध्यानात घ्यायला हवीत. उदाहरणच घ्यायचे तर शब्दसिद्धीच्या दृष्टीने पाहता मराठी भाषेत धातूंना आख्याताचे (म्हणजे काळ आणि आज्ञार्थ इ० अर्थ ह्यांचे वाचक असे) प्रत्यय लागताना त्यांना उपसर्ग लागत नाहीत. संस्कृत वा इंग्रजीत ते लागतात. उदा० हृ ह्या धातूपासून हरति असे क्रियापद बनते तसेच संहरति, विहरति, आहरति, प्रहरति इ० रूपे होतात. इंग्रजीत संस्कृताइतके नसतील पण री, अन् असे काही उपसर्ग लागून काही रूपे होतात. उदा० री-डू, अन्-कव्हर, ऑटो-चेक इ० मराठीत धातूला थेट उपसर्ग लागून होणारी अशी रूपे घडताना दिसत नाहीत. मराठीत पुनर् इ० शब्द नामांच्याच अगोदर येतात. उदा० पुनर्मिलन, पुनर्विचार, फेरनिवड इ० एखादा मनुष्य फेरनिवडला असं मराठीत म्हणत नाहीत त्याला पुन्हा निवडले किंवा त्याची फेरनिवड झाली असे म्हणतात. इंग्रजीतून मराठीत अशा रूपांचे भाषांतर करताना क्रियाविशेषण आणि धातू अशा रचना वापरणे भाग आहे.

अशा प्रकल्पांत संगणकतज्ज्ञ आणि भाषेचे जाणकार अशा दोहोंचा सहभाग असायला हवा आणि त्यांची चर्चा होईल असे एखादे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. असे झाल्यास ह्या प्रयत्नांचा पाया अधिक भक्कम होईल, अशी आशा वाटते. ह्या विवेचनात संज्ञांचा प्रत्यक्ष विचार केलेला नाही, पण काही गोष्टी ध्यानात घेतल्या तर मराठीकरण अधिक नेटके, अधिक स्वाभाविक होऊ शकेल असे वाटले म्हणून काही निरीक्षणे नोंदवली आहेत.

भ्रमणभाष : 097698 35310
ई-पत्ता : दुवा क्र. १

[ 'भाषा आणि जीवन'च्या  पावसाळा २०१० अंकात पूर्वप्रकाशित. उपक्रमावर पुनर्प्रकाशित करण्यासाठी 'भाषा  आणि जीवन'ची परवानगी घेतली आहे.  काही निवडक प्रतिसादांना 'भाषा आणि जीवन'च्या आगामी अंकात प्रसिद्ध करण्यात येईल. ]

लेखकाचा परिचय
सध्या राज्य मराठी विकास संस्था (मुंबई) येथे कनिष्ठ संशोधन-साहाय्यक ह्या पदावर कार्यरत. २००२-२००८ ह्या काळात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) (मुंबई) येथील भारतीय भाषा केंद्रात भाषातज्ज्ञ म्हणून सेवेत. मराठी शाब्दबंध हा शब्दार्थसंबंध दाखवणारा कोश, मराठी शब्दरूपांचे विश्लेषण करणारी रूपविश्लेषक ही संगणक प्रणाली विकसित करण्यात सहभाग. संगणकावर युनिकोड वापरून मराठीत काम कसे करता येईल हे समजावून देणाऱ्या कार्यशाळांत मार्गदर्शन.

Comments

अभ्यासपुर्ण व चांगला लेख!

अभ्यासपुर्ण व चांगला लेख!
प्रत्येक आवश्यक अशा गोष्टीचे निराकरण केले आहे.
---निष्कारण संस्कृतात जातात---- हे मात्र अगदी खरे. फार बोर करतात ही मंडळी.

चांगले विचार

सुशांत यांचे मुद्दे बहुतांश पटतात.

एक मुद्दा मला महत्वाचा वाटतो आणि पटत नाही. तो म्हणजे काही इंग्रजी शब्दांना मराठीत सामील न करणे.
याविरुद्ध खालील मुद्यांप्रमाणे विचार करता येईल.

भाषासमृद्धी
त्यांच्या भाषासमृद्धीचा विचार केला तर दुसर्‍या भाषेतील शब्द मराठीत स्वीकारले तर भाषा समृद्ध होते. जगातल्या सगळ्याच भाषा ते करत असतात. बहुतेक वेळेला ते त्याच शब्दाचा उच्चार वेगळा करतात. अकादमी, इस्पितळ, अलमारी, कर्व (कार्बन), नत्र (नायट्रोजन).

रुळलेल्या शब्दांची हकालपट्टी
कित्येक शब्द अगोदर पासून रुळलेले असतात. जेव्हा भाषाशुद्धीची चळवळ सुरु होते तेव्हा त्या शब्दांची हकालपट्टी व्हायला लागते. हिंदीतून उर्दु आणि उर्दुतून हिंदी शब्द्दांची हकालपट्टी झाली (सरकारी पातळीवर) तेव्हा हिंदीने संस्कृतोद्भव तर उर्दुने थेट इंगजी (पाकिस्तानातली उर्दु) शब्दांचा आसरा घ्यायला लागले. त्यानंतरची हिंदी दुर्बोध झाली. (पाकिस्तानातल्या उर्दुचे माहित नाही.) तेव्हा रुळलेले शब्द नाकारायची गरज नाही.

संकल्पना
संकल्पनात्मक शब्द नेहमी कठीण असतात असे मानले जाते. याचे कारण मूळ संकल्पना बरीचशी कठीण असते हे एक असते. दुसरे कारण म्हणजे नेहमी वापरातला शब्द तिकडे वापरला तर गोंधळ उडू शकतो. यासाठी नवीन शब्द घडवावे लागतील. (विझान व तंत्रज्ञान क्षेत्रात यांची चणचण नेहमीच भासते.) माझ्या क्षेत्रातील कॉन्क्रीट, रिइन्फोरर्समेंट, सिमेंट, फोर्स, मुमेंट, टॉर्शन, मुमेंट ऑफ इनर्शिया इत्यादी नेहमीचे शब्द आहेत. या शब्दांना बाहेर काढायचे असेल तर मराठीत नवीन शब्द करावे लागतील. मग त्यावर एकमत होऊन रुळायला वेळ लागेल. या ऐवजी तेच शब्द मराठीत आणले तर संकल्पनांचा र्‍हास होणार नाही. तुम्ही ड्राइवला खण शब्द वापरला तर त्या संकल्पनेचे नेमके स्वरुप ध्यानात येणार नाही.

पुढील शिक्षण
भाषा मराठी (व्याकरण आणि बहुतेक शब्द) पण संकल्पनांसाठी इंग्रजी शब्द (उच्चारभ्रंश होऊन झालेले चालतील.) वापरले गेले तर उचशिक्षणात कमी अडचणी येतील.

प्रमोद

छान लेख

परकीय शब्दाचे वापराने मराठीकरण होते. श्री. वाकक्नवी यांनी मागे एका दिलेल्या प्रतिसादात ही प्रकीया कशी होते ते छान सांगितल्याचे आठवते. साधारण असे की एखाद्या शब्दाला विभक्ती-प्रत्यय लावता येऊ लागल्यास त्या शब्दाचे मराठी करण पूर्ण झाले असे समजायला हरकत नाहि व तो शब्द मराठीच समजावा

जसे कोणी 'टेबल्सवर' म्हणत असतो तर टेबल हा इंग्रजी शब्दच राहीला असता.. मात्र तोच टेबल जेव्हा 'टेबलांवर' बनून येऊ शकतो म्हणजे तो पूर्ण मराठी शब्द झाला आहे. त्याच प्रकारे पेन, शर्ट, पँट, कोट वगैरे शब्द मराठीच आहेत असे मी मानतो.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

लेख

लेख आवडला.
लेखाचे शीर्षक संगणकव्यवहारातली मराठी असे असले तरी एकंदर चर्चा भाषेच्या व्यवहाराबद्दलची आहे असे दिसले.
मराठीकरण करताना किती संस्कृतोद्भव शब्द वापरावेत, इंग्रजी शब्द वापरावेत का ? देशी शब्दांचा वापर कसा जास्त योग्य आहे हे मुद्दे परिचित वाटले.

राजव्यवहार भाषेत मराठीचा वापर व्हावा, न्यायालये आणि इतर संस्था यांसारख्या ठिकाणी मराठीचा वापर या सारखे मुद्दे महत्त्वाचे आहेत असे मला वाटते. मुंबईतच्या हायकोर्टापासून इतर महत्त्वाच्या संस्था आणि केंद्रांवर इंग्रजीची मातबरी दिसते. इंग्रजीचे अस्तित्व पुसून न टाकता तिची मक्तेदारी अशा ठिकाणी संपविणे , इंग्रजीच्या जोडीला मराठीचे स्थान असणे हे मला महत्त्वाचे वाटते.

मी वर मांडलेला मुद्दा हा उपरोक्त लेखावरची थेट प्रतिक्रिया नसून , भाषेच्या चर्चेच्या संदर्भात सामान्य मराठी माणसाच्या दृष्टीने सर्वात अधिक गरजेचे आणि महत्त्वाचे जे मला वाटते त्याबद्दल आहे.

लेख आवडला

आंतर्जाल क्रांतीनंतर भाषेतले बदल किमान सुरचित उत्क्रांतीने व्हावेत, याची गरज व काही प्रमाणात मार्गदर्शन करणारा.

पण भाषाभाषांतील देवघेव ही जितकी स्वाभाविक आहे असे भासते वा भासवण्यात येते तशी ती खरोखर असतेच असे नाही

ज्या दोन भाषांच्या संबंधांबाबत आपण बोलतो आहोत त्या भाषांचे राजकीय-सामाजिक बलाबल काय ह्याचे भान ठेवले नाही तर...

हे बरोबर आहेच, पण अजूनही खोलात जाऊन विचार करता येईल. निरोप 'पाठवा' साठी 'send' ही संज्ञा स्वीकारण्यात काहीच गम्य नाही. हे अगदीच तकलादू उदाहरण असलं तरी मला हा भाषिक बलाचा मुद्दा जास्त वाटतो. बरं, लिपी तर वेगळीच आहे - त्यामुळे तोच शब्द ठेवण्यात फायदा फारसा नाही.

'यूजर इण्टरफेस'साठी मराठीत संवादपटल ही संज्ञा सुचवली तर इण्टरफेसचे इतर संदर्भ उदा० दोन संगणकीय यंत्रणांना जोडणारी मध्यस्थ यंत्रणा ही संवादपटल ह्या संज्ञेत समाविष्ट होत नाही.

असे सर्वच अर्थ सामावले जावे असा आग्रह नको असं वाटतं. काही बाबतीत अर्थं शब्दानुधावन्ते झालं तरी चालेल.

लेखात तुम्ही वापरकरी असा शब्द वापरलेला दिसला. आत्तापर्यंत मराठीत 'वापरणारा' असाच शब्द चालत असे. पण युजर हा शब्द जितक्या वेगवेगळ्या संदर्भात वापरला जातो त्या सर्व संदर्भात तो चपखल बसत नाही. वापरकरी, किंवा वापरकर्ता अशा घरगुती शब्दांतूनच त्याचं मराठीकरण करणं योग्य. त्यासाठी उपभोक्ता किंवा इतर ओढून आणलेले संस्कृत शब्द वापरणं योग्य नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सुशांत

सुशांत देवळेकर हे आपल्या उपक्रमाचे सदस्य आहेत. http://mr.upakram.org/user/1167
लेखातील पर्यायी शब्द स्वीकारण्याबाबत मतभेद असु शकतात.
प्रकाश घाटपांडे

काही कळले नाही

मला प्रस्तुत लेखात लेखकाला काय म्हणायचे आहे याचे ओ किंवा ठो कळले नाही. हे कदाचित माझ्या मर्यादित आकलनशक्तीमुळे असू शकेल. कोणी साध्या भाषेत (त्याच्यात दुसर्‍या भाषेतील शब्द आले तरी मला चालतील, भाषाशुद्धीचा माझा आग्रह नाही) समजावून सांगू शकेल का?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चंद्रशेखर यांच्यासाठी....

हा लेख शिळा आहे, ताजा नाही. बर्‍याच महिन्यांआधी लिहीलेला आहे. लेखात विचार नाहीत. आहेत त्या फक्त 'भावना'.

मराठीप्रेमाची मोठी लाट काहि वर्षांआधी आलेली होती. वरील लेख त्या भावनिक लाटेचा परीपाक आहे. ती लाट आता ओसरलेली आहे. परंतु, आता उरलेला गाळ सगळ्यांच्या समोर येत आहे.

कोणतेही सखोल चिंतन करून हा लेख लिहीलेला नाही, असे बराच काळ निघून गेल्यानंतर हा लेख वाचताना जाणवेल. पण तरीही 'चांगले लिहीले आहे' हे म्हणण्याची औपचारीकता काही वाचकांनी पार पाडलेली आहे.

या पेक्शा श्री. शुभानन गांगल यांचा हा 'ताजा' लेख जरूर वाचावा. त्यात काहीतरी चिंतन आहे. भले त्यात अनेक चूका आहेत. पण चिंतन न करताच लिहीण्याचा काटकसरीपणा नाही.

प्रस्तुत लेखाचा लेखक 'मराठी अभ्यास केंद्र' या संगठनेचा सदस्य आहे. मी देखील या संगठनेचे सदस्यत्व त्या संघटनेचे नाव चूकून शब्द:श घेतल्यामुळे स्विकारलेले होते.
ज्यांनी हा शिळा, आंबलेला लेख पुन्हा वाचकांपूढे वाढला आहे ते चित्तरंजन 'मराठी अभ्यास परीशद' या संगठेनासाठी काम करतात.

'मराठी अभ्यास केंद्र' हि 'मुंबई जवळील' ठाणे शहरातील आहे.

'मराठी अभ्यास परीशद' या संगठेना ही 'पूणे' शहरातील आहे.

त्या-त्या संगठनेच्या कार्यशैलीवर त्या-त्या स्थानाचा प्रभाव आहे.

चंद्रशेखर अजून तुम्हाला काय कळले नसेल तर जरूर विचारा.

हसावे की रडावे?

रावलेंचा प्रतिसाद वाचून हसावे की रडावे असा प्रश्न पडला.

अर्थातच, जेव्हा जेव्हा असा प्रश्न पडतो तेव्हा हसून घेण्यातच शहाणपणा असतो हे अनुभवावरून कळले आहे.

तेव्हा,

:-))))))))))))))))))))))))))))

=)) =))

श्री. शुभानन गांगल यांची घौडदौड!

श्री. शुभानन गांगल यांची त्यांच्या घौडदौड अगदी वेगाने चालू आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा!
माझा वर दिलेला प्रतिसाद खचितच बोचरा आहे, हे मी जाणून आहे. पण काळ पुढे सरकत असतो. त्यानुसार आपण ही पुढे जायचे असते.
हि बातमी वाचून तुम्हाला कळेल कि मी वरील लेखाला 'जुना' का म्हटले ते.
व तसे करत असताना श्री. शुभानन गांगल यांच्या लेखाला ही नावे ठेवली.

श्री. गांगल हे सगळ्यांना मराठी भाषेच्या व्याकरणाचीआय.एम.ई. तंत्राची चूकीची माहिती देत आहेत. पण त्यांच्या हातून तंत्रविकासासाठी जे काम होत/होणार आहे ते नितांत गरजेचे आहे.

चालू द्या 'घौड'दौडी

पण काळ पुढे सरकत असतो. त्यानुसार आपण ही पुढे जायचे असते.
हि बातमी वाचून तुम्हाला कळेल कि मी वरील लेखाला 'जुना' का म्हटले ते.

अहो त्या बातमीचा आणि देवळेकरांच्या लेखाचा कसा काय संबंध लावला तुम्ही रावले! बातमी कशाबद्दल आहे आणि लेख कशाबद्दल आहे हे तरी नीट बघाल की नाही सतीशराव?

श्री. गांगल हे सगळ्यांना मराठी भाषेच्या व्याकरणाची व आय.एम.ई. तंत्राची चूकीची माहिती देत आहेत. पण त्यांच्या हातून तंत्रविकासासाठी जे काम होत/होणार आहे ते नितांत गरजेचे आहे.

गांगलांच्या व्याकरणाच्या कंसेप्टा अगदी गोल असतीलही. किंबहुना आहेतच. आणि/पण हे रावलेंनी सांगावे म्हणजे... भयंकर मनोरंजक. असो.
गांगलांनी तंत्रविकासाचे काम केले नाही तरी चालेल. स्वतःच्या मार्केटिंग करताना मराठीचा उद्धार करतो आहोत असा आव नको. आधी युनिकोडला विरोध केला. आता पुन्हा युनिकोडकडे कसे काय वळले गांगल? असो.

बाकी चालू द्या तुमच्या आणि त्यांच्याही 'घौड'दौडी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

म्हणूनच म्हटले ना

अहो त्या बातमीचा आणि देवळेकरांच्या लेखाचा कसा काय संबंध लावला तुम्ही रावले! बातमी कशाबद्दल आहे आणि लेख कशाबद्दल आहे हे तरी नीट बघाल की नाही सतीशराव?

म्हणूनच म्हटले ना की हसावे का रडावे ते कळत नाही.

गांगलांनी तंत्रविकासाचे काम केले नाही तरी चालेल. स्वतःच्या मार्केटिंग करताना मराठीचा उद्धार करतो आहोत असा आव नको. आधी युनिकोडला विरोध केला. आता पुन्हा युनिकोडकडे कसे काय वळले गांगल?

हा वेगळ्या चर्चेचा विषय वाटतो. ;-)

प्रतिक्रिया पचकण्या आधि लेख व्यवस्थित वाचला होता का?

अहो त्या बातमीचा आणि देवळेकरांच्या लेखाचा कसा काय संबंध लावला तुम्ही रावले! बातमी कशाबद्दल आहे आणि लेख कशाबद्दल आहे हे तरी नीट बघाल की नाही सतीशराव?

ध.ला. तुम्ही चालताना उलटे चालता का?

बातमी आधी आली होती की? लेख आधी येवून नंतर मी प्रतिसाद दिला? तो प्रतिसाद देखील 'चंद्रशेखर यांच्यासाठी...' असे लिहून दिला होता. कारण फक्त त्यांनाच त्या लेखामध्ये 'न कळण्यासारखे असे' जाणवले होते.

बातमी आज आली, त्या विशयीची घटना आधल्या दिवशी घडली होती.

हा लेख जुनाच आहे व तो 'संगणकव्यवहाराचे मराठीकरण' ह्या विशयी भावना व्यक्त करणारा आहे. पण...तो पुन्हा सादर केला चित्तरंजन यांनी.
कोणत्या कारणासाठी चित्तरंजन यांनी हा लेख टाकला होता? ते आपण व्यवस्थित वाचले होते का?

'मराठी अभ्यास परिशद' असे भव्यदिव्य नाव धारण करणार्‍या, ज्यात मराठी भाषेचे अनेक विद्वान मंडळी आहेत. हि संगठना 'महाराष्ट्राच्या मराठी' साठी नेमके काय काम करते? 'मराठी अभ्यास केंद्र' या संगठनेने निदान 'मराठी भाषेचे स्वतंत्र खाते' (वरकरणी तरी.. ) सरकारला चालू करण्यास भाग पाडले. (... 'श्री. अशोक चव्हाण ते जाहिर करायला' व 'फांदी तुटायला एकच गाठ पडली' असेही म्हणता येवू शकते.)
फक्त लेख छापणं व त्यावरील प्रतिक्रिया आगामी दिवाळी अंकात छापणं एवढेच एखाध्या भाषिक संगठनेचे काम असू शकते का?
श्री. गांगल हे वैयक्तिक पातळीवर देखील इतकं भरीव काम करीत आहेत. त्याकडे दुर्लक्श कसे करायचे? व का करायचे?

मौजा ही मौजा

हा लेख जुनाच आहे व तो 'संगणकव्यवहाराचे मराठीकरण' ह्या विशयी भावना व्यक्त करणारा आहे. पण....
मी हा लेख ह्या संकेतस्थळावरच पहिल्यांदा वाचला. माझ्यासाठी तरी हा लेख जुना नाही.

असो. आता गांगलांचे युनिकोडप्रेम उफाळून आलेले आहे. सव्वा वर्षापूर्वी असलेले गांगलांचे युनिकोडविषयक विचार खालील लेखांत वाचायला मिळतील:
१.संगणकीय मराठीचे पाऊल पडते पुढे..‘एसगांगल’ फॉन्ट (लोकसत्ता शनिवार, २ मे २००९)
१.संगणकीय मराठीच्या प्रमाणिकरणाची आवश्यकता (लोकसत्ता बुधवार, २० मे २००९)

लोकसत्तेच्या (म्हणजेच कुमार केतकरांच्या) आशीर्वादाने हा सगळा गोंधळ घातला गेला होता. ( शुभानन गांगल लोकसत्तेचे जावई आहेत की काय? ) असो.दिसते.

ह्याशिवाय

http://sites.google.com/site/shodhnews/file-cabinet

ह्या पानावरचे लेखही अवश्य वाचावे. मौजा ही मौजा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तुम्हाला व्यवस्थित वाचता येते का?

मी हा लेख ह्या संकेतस्थळावरच पहिल्यांदा वाचला. माझ्यासाठी तरी हा लेख जुना नाही.

हा लेख खरेचं तुम्ही वाचला? लेख खरेचं आधि वाचला?

माझा प्रतिसाद नकारात्मक आहे तो देखील चंद्रशेखर यांच्या प्रतिसादाला उद्देशून आहे.
तुम्ही हा लेख खरेच आधि वाचला असता, तर इतर वाचकांनी जसा आधि स्वतंत्र प्रतिसाद दिला तसा प्रतिसाद दिला असता. तुम्ही लेखावर स्वतःचे मत मांडले आहे का?

माझा तरी प्रतिसाद व्यवस्थित वाचला होता का?
मी श्री. शुभानन गांगल यांच्या व्याकरणाच्या व संगणक तंत्र याविशयीच्या माहिती प्रसवण्यावरच भाश्य केले होते. मग तसे असताना परत मलाच हे वाचा, असे का सांगताय?

तुम्हाला खरेच व्यवस्थित वाचता येते का?
आधि व्यवस्थित वाचायला शिका धम्मकलाडू. सोबत प्रतिसाद देण्याच्या खुमखुमीवरही जरा ताबा मिळवा.

चालू द्या

मी श्री. शुभानन गांगल यांच्या व्याकरणाच्या व संगणक तंत्र याविशयीच्या माहिती प्रसवण्यावरच भाश्य केले होते. मग तसे असताना परत मलाच हे वाचा, असे का सांगताय?
"मलाच"? :)गांगलांनी घातलेले गोंधळ सदस्यांना कळायला हवेत म्हणून ते दुवे सगळ्यांसाठी त्या प्रतिसादात दिले आहेत. त्यात तुम्हीदेखील आलात. उगाच कशाला पर्सनली घेत आहात. मी तुम्हाला गंभीरपणे घेतलेले आहे असे तुम्हाला वाटले असल्यास क्षमस्व.

बाकी तुमचे चालू द्या. उपक्रमावर तेवढीच मौज.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

श्री. रावले

आपल्या खुलाशाबद्दल धन्यवाद. एक गोष्ट मी नक्की ठरवली आहे. 'पूणे' शहरातील 'मराठी अभ्यास परीशद' या संगठेना चे सदस्यत्व मी आयुष्यात कधीही घेणार नाही.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सहमत/असहमत

कोर्ट/कचेरी यांचे काम मराठीतून व्हायला हवे याच्याशी सहमत आहे. मात्र याचा अर्थ वापरात असलेले इंग्रजी शब्द घालवून कृत्रिम मराठी शब्द आणणे असा नव्हे.

>फाइल, फोल्डर, ड्राइव्ह ह्यांना धारिका, संचिका, खण हे किंवा अधिक चांगले इतर मराठी पर्याय वापरणे चांगले.
फाइल हा शब्द इतका चांगला रूळलेला असताना धारिका कशाला? या बाबतील बोली भाषेचे उदाहरण घेण्यासारखे आहे. बोली भाषेत भाषाशुद्धीवर परिसंवाद वगैरे होत नाहीत त्यामुळे लोक सोपा वाटेल तो पर्याय वापरून मोकळे होतात.
"अवं दादा, कवाधरन कलेक्टर हापिसात थांबलोया, फाइल मिळाया लै टैम लागतो बगा." अशा वाक्यात धारिका, संचिका, कार्यालय कोण वापरणार?
अगदी पुण्यातली मराठी घेतली तरी असे शब्द बोलताना कुणीही वापरत नाही. (अपवाद : मराठी सायटी)

पुढच्या वेळी माझा संगणक काम करेनासा झाला आणि दुकानात जाऊन "माझ्या संगणकाच्या खणातील संचिकेवरच्या धारिका साठवून ठेवता येतील का? यासाठी कुठली कार्यप्रणाली आणि कुठले संवादपटल उपलब्ध आहे?" असे विचारले तर माझे काम होईल का?

भाषा म्हणजे २४ क्यारट सोन्याप्रमाणे काहीतरी शुद्ध असते आणि इतर भाषांचे शब्द वापरल्याने तिची शुद्धी कमी होते हा मोठा गैरसमज आहे. भाषेच्या मागे सांस्कृतिक घडामोडी, तंत्ऱज्ञान यांचा केवढा मोठा डोलारा असतो. याखेरीज भाषा खर्‍या अर्थाने लोकशाहीची पुरस्कर्ती आहे. सगळ्यात जास्त लोक जे बोलतात ते रूढ होते. मूठभर लोकांनी मारून मुटकून भाषेला वळण देणे हा प्रयोग सफल होणे अशक्य वाटते. १०० वर्षांपूर्वीची मराठी आणि आजची मराठी यात जो फरक आहे तसाच आजची मराठी आणि १०० वर्षांच्या नंतरची मराठी यातही राहणार आहे कारण भाषा सतत उत्क्रांत होत असते.

इथे या दुव्यातील काही भाग द्यावासा वाटतो.

HULK SMASH PEOPLE WHO CALL ORGANIC LANGUAGE DEVELOPMENT “BAD GRAMMAR.” HULK SMASH CENSORSHIP OF “BAD WORDS.” LANGUAGE BEAUTIFUL LIVING THING. SHOULD BE APPRECIATED IN WILD, NOT PUT IN CAGE. HULK SMASH ALL CAGES!

अवांतर : टोपीकराच्या भाषेचे इतके धिंडवडे निघूनही त्याची अस्मिता (किंवा जेनी) जागी का होत नाही? :प्

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

हा माझा मार्ग एकला...

सुशांत, तुला जर अशाप्रकारच्या कार्यातून काही साध्य करायचेच असेल तर फेसबुकचे किंवा लिनक्स ग्रुपचे उदाहरण घेऊन कामाला सुरुवात केल्याशिवाय ते पुढे जाणार नाही. फेसबुक त्यांचा चेहरा मराठी व् इतर भाषिक करण्यासाठी एक खास अशी पद्धत वापरते त्यात त्यांना हव्या असलेल्या शब्दांची यादी दिली आहे व लोकांना त्यास प्रतिशब्द देता येतात. अनेक प्रतिशब्द असतील तर त्यास मतदानाव्दारे निवडून तो निवडलेला शब्द लगेच वापरला जातो.

अशा चर्चा करीत बसलास तर काहीच साध्य होणार नाही.

ठीक

लेखकाने मांडलेले काही विचार मला पटतात. शब्दांचे सुलभीकरण, मराठीत मुळात वापरात असलेले शब्द बाद करून उगीच नवे शब्द शोधणे, संस्कृत प्रतिशब्दांचा भडिमार वगैरेंवर लेखकाच्या विचारांशी सहमती आहेच. परंतु संगणकीय प्रतिशब्दांचा विचार करता -

एखादी व्यक्ती मायक्रोसॉफ्ट विंडोजची मराठी आवृत्ती संगणकावर वापरात नसेल तर वरील शब्दांचा नेमका उपयोग कसा होईल? माझी "विंडोजची" "स्क्रिन" "एक्सप्लोरर", "ब्राऊजर", "रिसायकल बिन" वगैरे दाखवेल आणि मी मात्र तोंडी बोलताना "खिडकीचे पटल, चाळक, न्याहाळक, कचर्‍याची टोपली (शब्दशः भाषांतर नाही) असे बोलत राहावे का? असे करणे निदान माझ्यासाठी तरी कठीण आहे आणि मुख्य म्हणजे असे करण्याची गरज मला दिसत नाही; अस्मिता सोडून. दुसरे म्हणजे, हे शब्द निश्चित कोण करणार? (विदा आणि आत्तचा प्रकार पाहून डेटा परवडला असे मला वाटू लागले आहे.)

एखादे ठिकाणी कारभार संपूर्णतः मराठीत चालत असेल, जसे, मराठी संकेतस्थळांवरील पर्याय निवडण्याकरता किंवा संपूर्ण मराठीतून टंकणार्‍यांकरता परिभाषिक शब्द उपयोगाचे आहेत. अन्यथा, गोंधळ ठरलेला.

फाइल, फोल्डर, ड्राइव्ह ह्यांना धारिका, संचिका, खण हे किंवा अधिक चांगले इतर मराठी पर्याय वापरणे चांगले.

धारिका, संचिका या शब्दांपेक्षा फाइल आणि फोल्डर हेच शब्द गेले कित्येक वर्षे वापरात आहेत. त्यावेळी संगणकही नव्हते आणि संगणकीकरणही झाले नव्हते. फायलीत, फायलीने, फायलीला असे प्रत्यय लावून हा शब्द मराठी झालेला आहे. फोल्डरने, फोल्डरला वगैरे शब्द वापरले तरी फोल्डरात हा शब्द सहसा वापरलेला ऐकलेला नाही, तेथे फोल्डरमध्ये असे म्हटले जाते. (चू. भू. दे. घे.) परंतु फोल्डरात, फोल्डरातून असे म्हणणे कठीण वाटत नाही.

आकलनसुलभतेचा लेखातील उहापोह मजेशीर आहे. लेखक म्हणतात -

अजूनही आपल्याकडचा फार मोठा समाज आपला ज्ञानव्यवहार आणि सामाजिक व्यवहार मराठीत करत असतो. (हे संख्याबळ किती काळ टिकेल हा प्रश्न आता सहज दुर्लक्षिता येणार नाही.) अशा समाजाला संगणकीय व्यवहार सहज कळावा हे आपले एक उद्दिष्ट असणार आहे.

असा समाज संगणकही वापरतो का? हा प्रश्न येथे प्रथम विचारायला हवा. मी तीन आणि चार वर्षांच्या मुलांना लीलयेने संगणक वापरताना पाहिले आहे. त्यांना कोणतीच भाषा लिहिता वाचता येत नाही. केवळ संगणकावर दिसणारी चित्रे आणि त्यांना ठेवलेली नावे ;-) लक्षात ठेवून ते बरेचसे संगणकी व्यवहार करत असतात.

लेख ठीक आहे. आवडला असे म्हणता येत नाही कारण लेखाचा विषय नवा नाही, लेखातून आलेले मुद्देही नवे नाहीत (मनोगतावर या विषयावरच्या ओसंडून वाहणार्‍या चर्चा मिळतील.), लेख केवळ संगणक क्षेत्रावर का लिहिलेला आहे (वैद्यकीय क्षेत्र, इतर अभियांत्रिकी, प्रसारमाध्यमे, कायद्याशी संबंधित शब्दांवर पुढील भाग आहेत का?) आणि या अशा लेखांचे नेमके प्रयोजन काय असते हे मला कळत नाही.

अवांतरः मायक्रोसॉफ्टच्या साईटवर मला खालील वाक्य मिळाले -

प्रमुख Windows XP उपयोजक संवाद माध्यमासाठी Windows XP परिवाराचा मराठी संवाद माध्यम संच हा मराठी उपयोजक संवाद माध्यम पुरवतो. या मराठी संवाद माध्यम संचास प्रस्थापनेच्या वेळी आपल्या Microsoft Windows ची ग्राह्यता देणे आवश्यक आहे. ग्राह्यतेमुळे Windows ची प्रत ही सत्यापत आणि संपूर्ण अनुज्ञप्ती असल्याचे निश्चित होते.

अशा मराठीचे सुलभीकरण करण्याचे कोणी मनावर घेतले असेल तर माझा संपूर्ण पाठिंबा आहे.

बहुतेक पटण्यासारखा लेख

बहुतेक पटण्यासारखा लेख आहे.

उद्दिष्टांपैकी तिसरे उद्दिष्ट मला अधिक पटते - (इ) आकलनसुलभता.

बाकी दोन उद्दिष्टे फार धूसर आहेत. एखाद्या क्रियेच्या बाबतीत किंवा एखाद्या घटनेच्या बाबतीत त्या उद्दिष्टांबद्दल विचार वस्तुनिष्ठपणे लागू करता येत नाही.

पैकी पहिले उद्दिष्ट - अस्मिता - मला नीट समजलेलेच नाही."माझ्या भाषेत व्यवहार करू शकतो" ही भावना उत्तम आहेच. मात्र "माझी भाषा" म्हणजे कुठले-कुठले ध्वनी अध्याहृत आहेत, हेच कळत नाही. येथे नवीन शब्द आपलेसे करायचे आहेत.

दुसरे उद्दिष्ट मला बहुतेक पटते - भाषासमृद्धी.

मला सर्वात अधिक कार्यक्षम वटणार्‍या तिसर्‍या लेखकाने मुद्दामूनच गौण मानले आहे. कारण कधीकधी इंग्रजी शब्द आकलनसुलभ आहे, असे लेखकाला पटते. तरी तो पर्याय त्यांना ग्राह्य नाही.

एका अर्थशास्त्रीय किंवा नैतिक मुद्द्याची अयोग्य सरमिसळ पहिल्या उद्दिष्टात केल्यामुळे थोडा गोंधळ होतो आहे. येथे भाषा-समाजाच्या बलाबलाचा आणि अगतिकतेचा मुद्दा आणला आहे. मात्र बलाबल आणि अगतिकता ही भाषिक नव्हे. आर्थिक दुबळेपणा असू शकतो. दुबळा व्यक्ती अगतिक असू शकतो.

इंग्रजी भाषा वेगवेगळ्या देशातले शब्द आत्मसात करून समृद्ध होते, ते अमेरिकेच्या (पूर्वी ब्रिटनच्या) बळामुळे प्रशंसनीय, मात्र मराठी भाषा जर अन्यभाषिक शब्द आत्मसात करून समृद्ध झाली, तर ती भाषासमृद्धी निंदनीय! यातील तर्क फार दुबळा आहे. आर्थिक दुबळेपणा आणि अगतिकता निंदनीय आहे, इतपत समजते. समृद्धी निंदनीय आहे, ही तर्काची झेप मात्र कुठे पाय रोवू शकत नाही.

भाषा परकीय शब्द घेते, तेव्हा आपल्याला मानवते तसे बदलून घेते. ध्वनिरूपे बदलून घेते. इंग्रजी "ठेइब्ल्" हे हिंदीमध्ये "टेबुल" होते, तर मराठीत "टेबऽल". याचे सामान्यरूप वगैरे होते, त्याबद्दल वर ऋषिकेश यांनी चर्चा केलेलीच आहे.

बाकी "नेमका अर्थसंदर्भ", "तंतोतंत जुळणारी संज्ञा" वगैरे चर्चा पटण्यासारखी आहे.

जे शब्द सोपे वाटतील, रुळतील तेच टिकतील

कोणत्याही इतर भाषेतील शब्दांचे मराठीकरण (किंवा मोठ्या परीघात भारतीयीकरण) ही मुळातच एक स्वाभाविक प्रक्रिया आहे.
तिच्यासाठी कृत्रिम प्रयासांची गरज नसावी.
त्याला कारण आहे तो भारताचा सांस्कृतिक इतिहास. सिंधू संस्कृतीतील लोक कोणती भाषा बोलत असत याबद्दल एकमत नाही. तरीही ती एक द्रविड भाषा होती असे क्षणभर समजले
तरी आजवर भारतीय उपखंडात ज्या भाषा उत्क्रांत होत गेल्या त्यांत द्रविडी, संस्कृत, अरबी, फारसी,इंग्रजी, पोर्तुगीज अशा अनेक भाषांतल्या वेगवेगळ्या शब्दांची भर मोठ्या प्रमाणावर पडत गेलेली आहे. त्यामुळे समकालीन भाषांत वैचित्र्य आले असे भासले तरी ते दीर्घकालीन वैगुण्य न ठरता एतद्देशीय भाषाच समृद्ध झाल्या हे नाकारता येत नाही.

पण भाषाभाषांतील देवघेव ही जितकी स्वाभाविक आहे असे भासते वा भासवण्यात येते तशी ती खरोखर असतेच असे नाही हेही आपण ध्यानात घ्यायला हवे. त्यातली स्वाभाविकता आणि अगतिकता ह्या दोन्ही गोष्टी चिकित्सक बुद्धीने तपासायला हव्यात. ज्या दोन भाषांच्या संबंधांबाबत आपण बोलतो आहोत त्या भाषांचे राजकीय-सामाजिक बलाबल काय ह्याचे भान ठेवले नाही तर ह्या तथाकथित स्वाभाविक देवघेवीची परिणती ही एका भाषेने स्वाभाविकपणे दुसरा भाषा मटकावण्यात होते.

-याउलट 'भाषाभाषांतील देवघेव ही स्वाभाविकच आहे'. तो भास नाही. त्याहीपेक्षा भारतीय भाषांनी इतर भाषांकडून घेणे हे स्वाभाविक/सवयीचे आहे. येथील भाषांनी इतर भाषांतील शब्दांना विरोध न करता त्यांनाच मटकावल्याचे दिसून येते. हे केवळ भाषेपुरतेच मर्यादित नाही. एकूणच भारतीय संस्कृती अशी लवचिक/सर्वसमावेशक आहे. विचार, पेहराव, आचारपद्धती, खानपान, सणसमारंभ या अनेक बाबतीत ही लवचिकता दिसून येते. हे काहीसे विषयांतर असले तरी 'भारतीय जनसमूहाची मनोभूमिका' समजावून घेणे हे लेखाच्या विषयाशी सुसंगत आहे असे वाटते.

मुळात भाषेची दोन प्रमुख अंगे - नामे आणि क्रियापदे यांच्या बाबत विचार करता जनसामान्य पुन्हापुन्हा ऐकल्यानंतर त्याचे स्वाभाविक स्वभाषीकरण करतात. भाषेच्या या प्रवाहाला कोणतीही कृत्रिम बंधने वळवू शकत नाहीत - किमान वळवू नये असे वाटते.
ज्ञानाचे - विचारांचे आदानप्रदान करण्याचे एक माध्यम म्हणून भाषेकडे पाहिले पाहिजे. तिच्यात अमुकच शब्द असले तर ती शुद्ध, उत्कृष्ट, स्थानिक असे ठरवू नये. भाषा काळानुरूप बदलली तरी तिच्यात वैगुण्य आले असे समजण्याचे कारण नाही. काळाच्या एकूण परिप्रेक्ष्यात भारतातील प्रमाणभाषाही आजवर प्रत्येक शंभर वर्षांना बरीचशी बदललेली दिसेल. पण जोवर त्या भाषेत ज्ञानेश्वर, तुकाराम,सावता,गोरोबा, चोखा,जना, शिवाजी महाराज, वामनपंडित,पेशवे, अनिल,मर्ढेकर,खांडेकर,बहिणाबाई,कुसुमाग्रज,जीए,विंदा,गदिमा, पुलं,सुर्वे,ढसाळ,भट,फ्रान्सिस दिब्रेटो इ.इ.इ. अनेक लिहिते झाले आणि त्यांच्यासारखेच अनेक इतरही लिहीत राहतील आणि त्यांचे लेखन वाचक वाचत राहतील तोवर ही भाषा बोलीतही जिवंत राहील. तिचे स्वरूप बदलेले असेल इतकेच!

(खरेतर भाषेने लिपीचेही बंधन मानण्याचे कारण नाही.)

ही एका सामान्य मराठी माणसाची मते मानण्यास हरकत नाही.

"ये सुसाईड क्या होता है?" - "जब अंग्रेज लोग खुदकुशी करते है तो उसे सुसाईड कहते है|"
"ये गुडबाई क्या होता है?" - "जब अंग्रेज लोग चले जाते है तो गुडबाई कहते है|"

+१

कोणत्याही इतर भाषेतील शब्दांचे मराठीकरण (किंवा मोठ्या परीघात भारतीयीकरण) ही मुळातच एक स्वाभाविक प्रक्रिया आहे.
तिच्यासाठी कृत्रिम प्रयासांची गरज नसावी.

+१

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

योग्य

अतिशय बरोबर आहेत हे विचार. आवडले.
मराठीमाणूस

माहितीसाठी

देवळेकर ह्यांचा लेख अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा आणि त्यांची मते घ्यावी म्हणून इथे प्रकाशित करण्यात आला आहे. मराठी अभ्यास परिषदेची उद्दिष्टे परिषदेच्या संकेतस्थळावर दिलेली आहेत आणि ती राजकीय नाहीत. जगभरातल्या मराठी भाषेच्या अभ्यासकांना मराठी अभ्यास परिषदेचे नाव सुपरिचित आहे.

मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ.

प्रतिसाद लेख म्हणून स्थलांतरित करण्यात आला आहे: मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ.

हा प्रतिसाद

हा प्रतिसाद कृपया स्वतंत्र लेख म्हणून उपक्रमावर टाकावा. अधिक चर्चा करणे सोयिस्कर ठरेल असे वाटते.

संपादक ह्यांस

अदिती ह्यांनी सूचना केल्याप्रमाणे माझा वरील प्रतिसाद हा लेख म्हणून घालावा ही विनंती.

श्री. रावले ह्यांच्या माहितीत भर

रावले ह्यांनी आपल्या प्रतिसादात लेखाचा लेखक हा 'मराठी-अभ्यास-केंद्र' ह्या संघटनेचा सदस्य आहे हे विधान केले आहे. श्री. रावले ह्यांना असलेली ही माहिती शिळी झाली आहे. सध्या देवळेकर हे ह्या संघटनेशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाहीत.

गांगलांचे नवे शोध

निसर्गाने मानवाला ‘गद्य, पद्य, संगीत’ ऐकायला तीन भिन्न कान दिले नाहीत. एकाच कानाने ते उमगतात. त्यातील भिन्नता कशामुळे उमगते? भाषेने काय-कसे-किती स्वीकारले आहे? असा तौलनिक अभ्यास ‘साऊंड कोड’मुळे शक्य होणार आहे. ‘मानवी भाषांची भविष्यातील उपयोगक्षमता संगणकातून पडताळणे’, यासाठी हे आवश्यक ठरते. त्यासाठी मराठी भाषा सुयोग्य आहे, संस्कृत नाही.
मानवी भाषेतून अभिप्रेत अर्थापर्यंत ‘पोचवणाऱ्या’ वा ‘न पोचवणाऱ्या’ सामान्य-संवादाला ‘गद्य’ म्हणतात. मनातला ‘अर्थ’ दुसऱ्यापर्यंत जसाच्या तसा कधीच पोचत नाही. याला ‘स्मृती, अनुभव, विचार, भावना’, लिंग, वय, स्थळ, कारण, नातेसंबंध’, ‘ग्रहणशक्ती, एकाग्रता, विमनस्कता, तजेला, चित्तविभ्रम’, ‘आजारीपण, शिथिलता, थकवा, वृद्धत्व, तारुण्य, बाल्य’ अशी असंख्य कारणे आहेत. ‘संवादात’ भाग घेणाऱ्या प्रत्येकाची ‘वर्तमानकालीन स्थिती’ असे याला म्हणता येते.

दै. लोकसत्तेत शुभानन गांगल ह्यांचा साऊंड कोड : भाषांच्या जागतिकीकरणात मराठीचे योगदान लेख वाचावा. अतिशय मौलिक आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काही शब्द. सहज सुचले म्हणून.

download उतरून घेणे, उतरवणे
save साठवणे
install जमा करणे, बसवणे
start आरूढ करणे, सुरु करणे .
browser भटक्या, फिरस्ता, टेहळ्या,

मराठीमाणूस

 
^ वर