आता पुढची लढाई...
प्रगती अभियान या संस्थेद्वारे नाशिकमध्ये कार्यरत तरुण, तडफदार आणि सदैव उत्साही व्यक्तीमत्व, अश्विनी कुलकर्णी यांचा हा लेख दै. लोकमत मध्ये पूर्व प्रसिद्ध झाला आहे. परंतु त्यावर येथेही काही विधायक चर्चा होऊ शकेल असे वाटून देत आहे.
लेख वर्तमान पत्रासाठी लिहिला गेल्याने स्वरुप आंतरजालिय लिखाणासारखे नाही याची कल्पना आहे.
तसेच अश्विनी कुलकर्णी यांना उपक्रमावर येण्यासाठी विनंती केली आहेच.
आता पुढची लढाई...
माहितीच्या अधिकारातून संवेदनशील माहिती हाती आली,
गैरकारभार झाल्याचंही दिसतं आहे; पण पुढे काय? या माहितीचं काय करायचं?
कोणाकडे दाद मागायची? माहितीच्या अधिकाराचा वापर करणाऱ्यांना संपवलं जात असताना
आता अधिकच दक्ष राहाण्याची गरज आहे.
माहितीच्या अधिकारानं सर्वसामान्य लोकांच्या हातात ताकद आली, अन्यायाविरुद्ध जाब विचारण्याची हिमत त्यांच्यात निर्माण झाली, एकटादुकटा माणूसही 'व्यवस्थे'शी लढू शकतो, आपले हक्क मिळवू शकतो, अनियमिततेवर बोट ठेवून व्यवस्थेला 'मार्गी' लावू शकतो असं एक अनोखं चित्र माहितीच्या अधिकारामुळे पहायला मिळालं.
याच कायद्याचा वापर करून आजवर भ्रष्टाचाराची, अनियमिततेची अनेक प्रकरणं बाहेर आली. अनेकांची 'खाबूगिरी' बंद झाली, चुकारपणा करणाऱ्यांना या कायद्याचा धाक वाटू लागला..
मात्र ज्यांनी या कायद्याचा वापर करून स्वच्छ, पारदर्शी व्यवहाराची अपेक्षा प्रशासनाकडून ठेवली, 'व्यवस्थे'त, कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न केला, काही प्रमाणात घडवला.. त्यांनाच 'टारगेट' करून संपवण्याचे प्रकार आता सुरू झाले आहेत.
अमित जेठवा, सत्येंद्र दुबे, मंजुलनाथ, सतीश शेट्टी, दत्ता पाटील, विठ्ठल गिते, श्रीधर मिश्रा.. काही नावं आपल्यापर्यंत पोहोचली, काही अजूनही अज्ञात आहेत. माहितीच्या अधिकारात 'प्रकरणं' खणून काढणाऱ्या या साऱ्यांनाच आपल्या प्राणांना मुकावं लागलं. धमक्या, त्रास देण्याचे विविध प्रकार तर सातत्यानं सुरूच असतात.
माहिताचा अधिकार वापरून, शासनाकडून माहिती मिळवून भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांना या अनुभवांना सामोरं जावं लागणं ही आता नित्याचीच बाब झाली आहे. या साऱ्याच घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. समाज म्हणून, लोकशाही म्हणून अंतर्मुख करणाऱ्या आहेत.
माहितीचा अधिकार वापरून भ्रष्टाचाराची नेमकी माहिती मिळवलेल्यांनी आपले प्राण गमावले. या सगळ्या घटनांमध्ये एक समान धागा सापडतो, तो म्हणजे ही सर्व प्रकरणे जमीन, खाणकाम अशाच विषयांची आहेत. हे विषय खूपच संवेदनशील आहेत हे आता सर्वांनाच ठाऊक आहे. असे जोखमीचे विषय हाताळताना कार्यकर्त्यांनीही अतिदक्ष असणे, त्यांनीही काही रणनीती आखणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कोणी एकट्याने हे धाडस न करता एका गटातून तुकड्या तुकड्याने माहिती मागवावी. मिळालेली माहिती एखाद्या इंटरनेटच्या संकेतस्थळावर अपलोड करावी. यामुळे कदाचित ज्याच्याकडे माहिती आहे तो एकटा नाही, त्याचा एकट्याचा आवाज धमक्यांनी किंवा खून करून संपणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. माहिती जेवढ्या विविध मार्गांनी पसरवता येईल तेवढी ती पसरवता आली पाहिजे. यासाठी माध्यमांचा चांगला उपयोग होऊ शकतो.
माहितीचा अधिकार वापरणाऱ्यांना आता फक्त हा कायदा वापरून थांबता येणार नाही तर त्याहीपलीकडच्या लोकशाहीतील विविध घटकांचा संयुक्तिक वापर करावा लागेल.
सद्यस्थितीत जेव्हा एखाद्या संवेदनशील विषयातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न एखादा कार्यकर्ता करतो तेव्हा संघटनेची ताकद गरजेची वाटते. आपण एवढी खबरदारी घेऊ शकतो. एखादा गट निर्माण करून किंवा एखाद्या गटाशी संलग्न होऊन हे विषय हाताळल्यास धोका कमी करू शकतो. अनेक भागातील, अनेक स्तरातील, ग्रामीण - शहरी कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा उपयोग करून त्याची ताकद नक्कीच वाढवलेली आहे.
माहितीचा अधिकार हे भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळालेले शस्त्र आहे. मागील पाच वर्षातील वापरातून या शस्त्राची ताकद आणि मर्यादाही लक्षात येत आहे. हा कायदा वापरून, नेमकी माहिती विचारून शासनातील गैरकारभार, नियम धाब्यावर ठेवून घेतलेले निर्णय उघडकीस आणता येतात हे नक्कीच; पण एकदा का कागदपत्रे मिळाली, ज्या माहितीतून भ्रष्टाचार लक्षात आला त्या माहितीचे नेमके करायचे काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहिती अधिकाराच्या कायद्यापलीकडे जायला लावते.
प्रशासनाच्या सर्व कारभारात भ्रष्टाचार इतका सर्वदूर पोहोचलेला आहे की त्यासाठी केवळ माहितीच्या अधिकाराचा कायदा पुरेसा नाही. या कायद्याची व्यवस्थित, संपूर्ण अंमलबजावणी व्हावी त्यामधे ढवळाढवळ करून त्याची ताकद कमी करण्याचे जे प्रयत्न वेळोवेळी होतात ते थांबवणे असेही काम आहेच. याचबरोबर भ्रष्टाचाराचा बीमोड करण्यासाठी आवश्यक अशा प्रशासकीय सुधारणांचा अभ्यास करून मागणी करणे आता गरजेचे आहे.
जमिनीच्या संदर्भात माहिती नीट उपलब्ध नसणे हेच खूप गंभीर आहे. वर्षानुवर्षे '७/१२ आपल्या दारी', एसएमएस वर माहिती मिळेल, संपूर्ण जमिनीचे रेकॉर्ड कम्प्युटराइज केले जातील, शासनाच्या संकेतस्थळावर माहिती मिळेल.. हे सर्व आपण एकतोय, यातले काहीही अजून व्यवस्थित तयार नाही. आणि आपण पाहतोच आहे की यासंबंधी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवणाऱ्यांची काय गत झाली आहे.. तेव्हा प्रशासनातील जमिनीच्या रेकॉर्डमधील पारदर्शकता आपल्याला कधी पाहायला मिळणार? भ्रष्टाचारविरोधी अभियानासाठी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असेल. माहितीचा अधिकार वापरणारे कार्यकर्ते हे एका अर्थाने भ्रष्टाचार उघडकीस आणणारे कार्यकर्ते आहेत.
बऱ्याचदा विविध प्रकारची माहिती मिळवली जाते, मिळवलेल्या कागदपत्रातूनही स्पष्ट दिसते की गैरकारभार झालेला आहे. नियम मोडलेले आहेत.. पण खरा प्रश्न येतो तो म्हणजे पुढे काय?
ही माहिती घेऊन कोणापुढे दाद मागायची? परत त्याच प्रशासनातील वरिष्ठांच्याकडे तक्रार करायची? की थेट कोर्टात केस दाखल करायची? वरिष्ठांकडे तक्रार करून काय कार्यवाही होणार? कोण इनक्वायरी घडवून आणणार? यातून कोणाला शिक्षा होईल? ..अशी रचनाच आपल्याकडे नाही.
मूळ प्रश्न हा आहे की गैरकारभाराची तक्रार कोणाकडे करायची? त्याची शहानिशा कोण करणार? कोर्टाकडे जाण्याचा पर्याय माहितीचा अधिकार वापरणाऱ्यांना परवडणार आहे का? यासाठी अॅण्टी करप्शन ब्युरो, विजिलन्स विभाग, मानव अधिकार आयोग, लोक आयुक्त, लोक न्यायालय अशा लोकशाहीतल्याच काही संस्थांचा उपयोग आपण करू शकतो का हे पाहायला पाहिजे. त्यासाठी एका स्वतंत्र, विशेष, निम्न न्यायिक, रचनेची मागणी करायला हवी. जेथे आपण आपली माहिती पुरावा, दाखला देऊन, कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा करू शकतो.
माहितीचा अधिकार एकट्याने वापरता येतो. संघटनेची ताकद नसतानाही एक एक विषय हातात घेऊन प्रशासनाला जाब विचारता येतो. हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे. माहितीचा अधिकार नीटपणे वापरला जावा, अधिकाधिक लोकांपर्यंत तो पोहोचावा, अंमलबजावणीतील त्रुटी सातत्याने सरकारपुढे आणून ते अधिक सामर्थ्यवान बनवण्याचाही प्रयत्न आजवर अनेकदा झाला. वेगवेगळे विषय घेऊन माहिती मिळवायला सुरुवात झाली आणि खरं तर ही माहिती मिळवता मिळवताच अनेक जण सामाजिक कार्यकर्ते झाले.
माहितीच्या अधिकारात काम करताना, संवेदनशील माहिती मिळवताना आता खूपच सावध असायला हवं. आपल्या विषयात काम करणाऱ्या गटाशी संलग्न असण्याने धोका कमी होऊ शकतो. माहिती लपवण्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांची ताकद आहे. मिळालेली माहिती हुशारीने, तत्परतेने पसरवली गेली तर भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईलच, अशा भ्रष्टाचाऱ्यांशी लढण्याची ताकदही मिळेल.
- अश्विनी कुलकर्णी
प्रगती अभियान
pragati . abhiyan @ gmail . com
वेबसाईट www.pragatiabhiyan.org
Comments
उत्तम लेख
ज्ञानप्रबोधिनीत राष्ट्रवाद अभ्यास मंडळात हा विषय त्यांनी मांडला होता. उत्तम चर्चा झाली होती
प्रकाश घाटपांडे
गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत
जमीन आणि खनिज संपत्ती म्हणजे सर्व प्रकरणे गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत आहेत. आणि पोलिसांकडे जायचे तर ते ही त्यांच्याच अखत्यारीत!
म्हणजे हाक ना बोंब सामान्य माणसाची अशी स्थिती आणणे अगदीच सोपे आहे.
तरीही
हे वाक्य मला महत्त्वाचे वाटले. येथे रणनीती महत्त्वाची आहे.
तरीही भ्रष्टाचाराची प्रकरणे शोधण्याचे काम थांबत नाही, हा एक दिलासा आहे.
उपक्रमावरील एक सदस्य ठणठणपाळही असे काहीसे काम करत असतात का?
त्यांची भाषा बरेचदा आक्रमक असते पण त्यांनी एक जनहित याचिकाही दाखल केली होती असे आठवते.
त्यांचा अनुभव काय आहे?
-निनाद
चांगला लेख
लेख आणि माहीती चांगलीच आहे.
काही मुद्दे मांडावेसे वाटतातः
जमीन आणि खनिज संपत्ती म्हणजे सर्व प्रकरणे गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत आहेत. आणि पोलिसांकडे जायचे तर ते ही त्यांच्याच अखत्यारीत!
शक्यतोवर माहीती गोळा करताना अथवा त्याला पब्लीसिटी देताना त्यात होणार्या गैरव्यवहारावर प्रकाश पडावा, गृहमंत्री कोण अथवा पोलीस कोण यावर नाही. (तो आपोआप नंतर पडेलच). त्यामुळे अशा कामाला राजकीय वळण न लागता सामाजीक जनहीताचे वळण लागेल, जो मूळ उद्देश असावा.
येथे रणनीती महत्त्वाची आहे.
रणनिती काय फक्त भ्रष्टाचार विरोधकच करतात असे समजू नका! ;)
हो
मान्य.
पण व्यवस्थेच्या विरोधात उभे राहताना मंत्रालय एक आहे ही बाब ध्यानात ठेवली पाहिजे इतकेच.
मंत्री वेगळे असले तरी सगळे झालेले खुन याच अखत्यारीत आहेत, ही बाब नजरेआड कशी करावी?
-निनाद
उत्तम विचार
खरच चागला उपक्रम.
मराठी संकेत स्थळांचा असा वापर नक्कीच मोलाचा ठरेल.
जरी प्रत्येक सदस्याने आपण काय करत आहोत ह्याची जरी माहिती संकेत स्थळावर नमूद करत ठेवली तर ती माहिती बर्याच जणांना माहित होईल. त्यामुळे सदस्याचे प्रसंगी धैर्य वाढेल आणि त्याला काही मदत हवी असेल तर त्याला मिळू हि शकेल.
मी स्वतः ठणठणपाळ साहेबांना विनंती केली होती कि आपण माहिती अधिकाराची उदाहरणे नित्य देत चला.
जेणेकरून आमच्या सारख्या सामान्य माणूस हा कायदा वापरायला धजावेल.
ठणठणपाळ साहेब, आपली भाषा शैली जरी आक्रमक असली तरी त्यामध्ये कळकळ आहे आणि ती पोहोचतेच.
आपण लिहित रहा हीच विनंती.
(बाकी मतभेद हे चालायचेच.)
असो
छान लेख
याच विषयावर टिव्हीवर एक चर्चा ऐकली होती त्यात ह्या अधिकाराचा वापर करणार्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांना विनंती केली होती की ह्या बातम्या लगेच टिव्हीवर दाखवा. त्यामुळे जरी मुळ केसला फायदा झाला नाहि तरी टिव्हीवर आलेली बातमी व प्रसिद्धीच त्या कार्यकर्त्यांसाठी सुरक्षकाची भुमिका बजावते.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
आणि
बरोबर! सुरक्षा तर मिळतेच आणि असा गैरव्यवहार होतो आहे याची नोंदही कुठे तरी होते.
(चॅनल्सना या भावात कव्हरेज मिळते ते वेगळेच)
मात्र ही नोंद व्यवस्थित रितीने (डॉक्युमेंटेड?) व्हावी. यासाठी इंटरनेट माध्यमाची मदत घ्यावी असे आवाहन यात आहे.
अशी एक जरा बटबटीत साईट आहे - http://www.rtiindia.org/forum/content/
येथे भरपूर माहिती आहे.
यातला फंडामेंटल फॅक्टस सेक्शन मध्ये काही वाचण्यासारखे आहे.
-निनाद
अतिशय महत्वाच्या विषयावरील लेख
अतिशय महत्वाच्या विषयावरील लेख. मात्र हा लेख लोकमतमध्ये पूर्वी प्रसिद्ध झाला आहे असे लिहिले आहे. त्यामुळे कालच्या टिळक आणि जिनांवरच्या लेखाचीच वेळ याच्यावरही येईल असे वाटते. लोकमतमध्ये जिथे प्रसिद्ध झाला आहे त्या पानाची लिंक देता येईल का? नाहीतर कॉपी-पेस्ट ठेवावा लागेल.
अवांतरः pragati . abhiyan @ gmail . com
इ-मेलमधल्या स्पेसेस मुद्दामून दिल्या आहेत का?
लेखिकेची पूर्वपरवानगी
निनाद हे उपक्रमावरचे जुने लेखक आहेत. त्यांनी लेखिकेची पूर्वपरवानगी घेतली असावी असे वाटते. म्हणूनच लेखिका येथेही येईल असे ते म्हणतात. त्यांच्या उत्तराची आपण वाट बघू. निनाद यांनी खुलासा करावा.
बाकी, लेख उत्तम. अशा उपक्रमांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
खुलासा
धन्यवाद प्रियाली!
खुलासा केला आहेच.
अश्विनी कुलकर्णी यांना आमंत्रण दिले आहेच.
परंतु त्या सदैव प्रवासात नाहीतर प्रशिक्षणाच्या कामात गुंतलेल्या असतात असा अनुभव आहे.
'लेखन प्रवासात होते' असे त्यांनी सांगितले आहे.
आशा आहे की त्या लवकरच येथे येतील.
-निनाद
परवानगी
लेखिकेच्या परवानगीची काळजी नसावी,
अन्यथा मी येथे लेख दिला नसता याची खात्री बाळगावी!
दुवा:
दै. लोकमत मध्ये दिनांक १ ऑगस्ट २०१० रोजी, मंथन पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या या लेखाची लिंक.
इमेल मध्ये स्पेसेस मुद्दाम दिल्या आहेत. लेखिकेला स्पॅम इमेल्सचा त्रास होऊ नये या कारणाने.
-निनाद
खुलाश्याबद्दल धन्यवाद
खुलाश्याबद्दल आणि लिंकबद्दल धन्यवाद. अतिशय महत्वाच्या विषयावरील लेख कुठल्यातरी कारणाने उडवला जाऊ नये अशीच अपेक्षा होती.
>> इमेल मध्ये स्पेसेस मुद्दाम दिल्या आहेत. लेखिकेला स्पॅम इमेल्सचा त्रास होऊ नये या कारणाने.
असेच वाटले, म्हणून स्पष्टीकरणासाठी विचारले.
पुनश्च धन्यवाद.
लेख आवडला
चांगला आणि विचारप्रवर्तक लेख.
मिळालेली माहिती एखाद्या इंटरनेटच्या संकेतस्थळावर अपलोड करावी. यामुळे कदाचित ज्याच्याकडे माहिती आहे तो एकटा नाही, त्याचा एकट्याचा आवाज धमक्यांनी किंवा खून करून संपणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. माहिती जेवढ्या विविध मार्गांनी पसरवता येईल तेवढी ती पसरवता आली पाहिजे. यासाठी माध्यमांचा चांगला उपयोग होऊ शकतो.
माहितीचा अधिकार वापरणाऱ्यांना आता फक्त हा कायदा वापरून थांबता येणार नाही तर त्याहीपलीकडच्या लोकशाहीतील विविध घटकांचा संयुक्तिक वापर करावा लागेल.
सहमत, आणि पाठिंबा देखील.
प्रशासनाच्या सर्व कारभारात भ्रष्टाचार इतका सर्वदूर पोहोचलेला आहे की त्यासाठी केवळ माहितीच्या अधिकाराचा कायदा पुरेसा नाही. या कायद्याची व्यवस्थित, संपूर्ण अंमलबजावणी व्हावी त्यामधे ढवळाढवळ करून त्याची ताकद कमी करण्याचे जे प्रयत्न वेळोवेळी होतात ते थांबवणे असेही काम आहेच. याचबरोबर भ्रष्टाचाराचा बीमोड करण्यासाठी आवश्यक अशा प्रशासकीय सुधारणांचा अभ्यास करून मागणी करणे आता गरजेचे आहे.
प्रशासकीय सुधारणा काय असाव्या याबद्दल पण आले तर बरे होईल.
यासोबत.
माहितीच्या अधिकाराचा जसा शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार बाहेर आणण्यासाठी उपयोग होऊ शकतो तसाच तो शासन यंत्रणा समजण्यास होऊ शकतो. आजची शासनयंत्रणा ही काफ्काच्या पुस्तकासारखी वागते. शासन यंत्रणेचा नोकरशहांचा जेवढा अभ्यास असतो तेवढा सामान्य जनतेचा आणि राजकीय पुढार्यांचाही नसतो. त्यामुळे येस मिनिस्टर सदृश यंत्रणा राजकीय पुढार्यांसाठी तर सामान्य लोकांसाठी एक अगम्य यंत्रणा असते. शासकीय भाषा, कागदपत्र ठेवायच्या पद्धती यामुळे माहितीचा अधिकार सगळ्यांना वापरायला कठीण होतो.
माझ्या एका आर्किटेक्ट मित्राने एक सुंदर मुद्दा काढला होता. मुंबईत वरळी बांद्रा पूल बांधण्यात आला. त्याचा एकंदर खर्च भागिले त्याचे क्षेत्रफळ हा एक कॉन्स्टन्ट म्हणून घेतला. तसाच त्याने हल्ली बांधलेल्या स्कायवॉकचा खर्च व क्षेत्रफळ यांचा भागाकार काढला. त्याच्या लक्षात आले की मुंबईतील सागरीपूल खूप स्वस्तात झाला. यावरचा उपाय म्हणून त्याने एम एम आर डी ए ला माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली. त्याला एक दिवस पत्र आले की त्यांनी मागवलेली माहिती काही हजार पानांची आहे. त्याची प्रत काढण्याचा खर्च काही हजारांचा आहे. त्यानंतर त्याने एवढी पाने घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्याला संबधित कागदपत्रे दाखवण्यासाठी आमंत्रण आले (प्रती न काढता). त्या कागदपत्रात भल्यामोठ्या आकडेमोडी होत्या. जे समजावून घेण्यास त्याला खूप वेळ लागला असता. म्हणून हे प्रकरण बारगळले.
अशा उदाहरणात हे लक्षात येते की प्रशासन यंत्रणा सहजतेने सामान्य जनांचा येस् मिनिस्टर करू शकते. यावरचा एक उपाय म्हणजे शासनयंत्रणा कशी चालते, नेमके काय मागायचे, याचे शिक्षण मिळणे, पुस्तिका मिळणे (वा प्रत्येक खात्याच्या पद्धतीवर पुस्तिका लिहिणे.)
मला असे वाटते की शासनयंत्रणेतील निवृत्त लोक हे कदाचित चांगल्या रितीने सांगू शकतील. पण त्यांना लिहिते/बोलते करावे लागेल. संघटीत प्रयत्न देखील लागतील.
प्रमोद
ते पण..
मला असे वाटते की शासनयंत्रणेतील निवृत्त लोक हे कदाचित चांगल्या रितीने सांगू शकतील. पण त्यांना लिहिते/बोलते करावे लागेल. संघटीत प्रयत्न देखील लागतील.
कल्पना चांगली आहे, पण ते देखील कधी काळी शासनाचा भाग होते त्यामुळे मर्यादा येऊ शकतात. :-)
कार्य
आपली सहमती आणि पाठींबा घेऊन काही करण्यात रस आहे - कळावे.
आपल्या मित्राचा अनुभव वाचून आठवले -
अश्विनी यांनाही असे अनेक अनुभव आले आहेत. त्यांच्याशी गप्पा मारतांना सांगितले होते की, त्यांनी धान्य वितरण या विषयी नाशिक जिल्ह्यातील माहिती मागवली होती. यात फक्त जिल्हा अधिकार्यांकडे केलेल्या धान्य मागणीचा आकडा हवा होता. एका तालुक्यातून, "१६००० पाने आहेत, रु. २ प्रति पान प्रमाणे पैसे पाठवावेत" असे उत्तर आले होते!
फार मोठे काम आहे!
पण मला वाटते ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटनेकडे पोलिस खाते आणि न्यायालये कशी चालतात, याचे उत्तम प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे. आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते, आदिवासी कायद्याची अगदी लेटेस्ट माहिती तळागाळातल्या कार्यकर्त्या पर्यंत पोहोचेल, याची काळजी घेतांना दिसले आहेत. पोलिसांचे अधिकार आणि मानवी अधिकार यांचीही जाणीव यांना असते किंवा सभांमधून करून दिली जाते.
पायलट किंवा गाईड प्रोजेक्ट म्हणून त्याकडे पाहायला हरकत नसावी.
-निनाद
छान लेख
केवळ माहिती अधिकाराने काय करता येईल याबद्दल स्वप्नं असणे व ती प्रत्यक्षात आणताना येणाऱ्या अडचणींना तोंड देणे या वेगळ्या गोष्टी आहेत. हा लेख रणनीतीविषयी असल्यामुळे, व त्यात एक सकारात्मक भावना असल्यामुळे आवडला. एकंदरीत हा अधिकार रुळलेला आहे, व त्यावर दोन्ही बाजूंनी रस्सीखेच चालू दिसते. सहस्रबुद्धे यांनी लिहिल्याप्रमाणे, कागद पाठवता येणार नाही कारण खूप मोठा आहे या प्रकारची कारणं देता येण्यासाठी कागदही मोठे होऊ शकतील.
याप्रकारच्या कामाला आर्थिक मदत कुठून होते?
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
गरज
मी जे काही पाहिले आहे त्यानुसार, बरेचदा स्वतःच्या खिशातून आर्थिक गरज भागवली जाते!
या विषयी काय आर्थिक पर्याय असावेत, आणि ते कसे प्रत्यक्षात आणता येतील, यावर चर्चा करायला आवडेल.
अमेरिकेतही असे घडते का?
तेथे पैसा कसा येतो?
-निनाद
लढले पाहिजे
मिळालेली माहिती वैयक्तिक न राहता ती सर्वांपर्यंत पोहचली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा हा आवडला की, गैरकारभाराची माहिती मिळाली की, संबंधितांवर कार्यवाही करण्यासाठी तक्रार केली पाहिजे. पण तक्रार करण्याऐवजी प्रकरण 'मिटवण्यावर' काही कार्यकर्ते भर देतात तो हा या कायद्याचा दुरुपयोग आहे. त्यावरही काही कार्यवाही व्हायला हवी असे वाटले.
-दिलीप बिरुटे