मराठी या ज्ञानभाषेतून गणित-विज्ञान हे दोन विषय चांगले समजतात

मातृभाषेत.. विज्ञानशिक्षण के.जी.टू.पी.जी. लोकसत्ता सोमवार, १२ जुलै २०१०
प्रा. अनिल गोरे - सोमवार, १२ जुलै २०१०
मराठी या ज्ञानभाषेतून गणित-विज्ञान हे दोन विषय चांगले समजतात. हा अनुभव दहावीपर्यंत लाखो विद्यार्थ्यांना रोज येतो. यामुळेच अकरावी-बारावीत विज्ञान शाखेला मराठी माध्यम निवडायची इच्छा अनेकांना असते. विज्ञान शाखेचे शिक्षण मराठी माध्यमात मिळणे शक्य आहे. यासाठीच्या आवश्यक सोयीही उपलब्ध आहेत. बारावी विज्ञान शाखेची परीक्षा म्हणजे भौतिक, रसायन, जीव, गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिका दरवर्षी मराठीत काढल्या जातात.
बोर्डाच्या परीक्षेतील उत्तरे मराठीत लिहिण्याची परवानगी आहे. विज्ञान शाखेत अकरावी-बारावी मराठी माध्यम निवडले तर विषय चांगले समजतात. व गुणही जास्त मिळतात. शिवाय इंजि. प्रवेशासाठीची सीईटीसुद्धा मराठीतून देता येते. महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी या सोयीचा लाभ घेत आहेत.
यंदा बारावीला मराठी माध्यमातून विज्ञान अभ्यासक्रमाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या राज्य मंडळांकडून जाणून घेण्यात आम्हाला यश आले आहे. त्यानुसार भौतिकशास्त्राची परीक्षा ३२० विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून दिली. रसायनशास्त्राची ३२३, जीवशास्त्राची ३४५ आणि गणिताची १८८ विद्यार्थ्यांनी मराठीतून परीक्षा दिली. यावरूनच हेच सिद्ध होते की मराठीतून परीक्षा देण्याची सोय मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, त्याची सर्वसामान्य विद्यार्थी-पालकांना माहितीच नाही!
विज्ञान शिक्षणाचा दर्जा वाढावा, म्हणून ते मराठीतून घेणे उपयुक्त ठरेल. हे लक्षात घेऊन काही शाळा व महाविद्यालयात मराठीतील पुस्तके व मराठीतून शिकवणे अशा सोयी विज्ञान शाखेसाठी सुरू व्हाव्यात. यासाठी समर्थ मराठी संस्था प्रयत्नशील आहे. ज्ञानभाषा प्रकाशनतर्फे भौतिक, रसायन, जीव, गणित या विषयांची मराठी पुस्तके बनविण्याचे काम सुरू आहे. शास्त्र व गणित विषयांच्या पुस्तकाची मुद्रणप्रतही तयार आहे. आता मागणीनुसार त्याच्या प्रती छापण्यास राज्य मंडळ व बालभारतीला काहीच जड जाणार नाही.
त्याचप्रमाणे प्रवेश समित्यांचीसुद्धा मराठीतून विज्ञान शाखेचे अभ्यासक्रम सुरू करण्यास कोणतीच आडकाठी नाही. मराठीतून विज्ञान अभ्यासक्रम सुरू करीत असल्याचे पत्र उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांनी आम्हाला द्यावे. प्रवेशअर्जामध्ये तसा उल्लेख करण्यास आमची कोणतीही हरकत नाही, असे प्रवेश समिती स्पष्ट करते.
म्हणूनच, प्रश्न राहतो तो मराठी माध्यमातून विज्ञान अभ्यासक्रम अकरावी आणि बारावीलाही शिकता येतो, याबाबत जनजागृती करण्याचा. त्यासाठी समर्थ मराठी संस्थेचे कंबर कसली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना अकरावी-बारावी विज्ञान शाखेचा अभ्यास मराठी माध्यमात करायचा आहे, त्यांच्यासाठी समर्थ मराठी संस्था समुपदेशन कार्यशाळा घेतल्या जात आहेत. इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा- समर्थ मराठी संस्था, ७०५ बुधवार पेठ, पुणे ४११००२, भ्रमणध्वनी ९४२२००१६७१.

Comments

म्हणजे पुस्तके तयार नाहीत.

ज्ञानभाषा प्रकाशनतर्फे भौतिक, रसायन, जीव, गणित या विषयांची मराठी पुस्तके बनविण्याचे काम सुरू आहे. शास्त्र व गणित विषयांच्या पुस्तकाची मुद्रणप्रतही तयार आहे. आता मागणीनुसार त्याच्या प्रती छापण्यास राज्य मंडळ व बालभारतीला काहीच जड जाणार नाही.

म्हणजे आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी या विषयांच्या उत्तरपत्रिका मराठीत लिहिल्या त्यांनी पुस्तकांवरून अभ्यास केलेला नव्हता. ही माहिती अर्थपूर्ण आहे. अशीच पुस्तके कानडी, हिंदी, मल्याळी, पंजाबी, गुजराथी, गोंडी, डांगी, अहिराणी वगैरे भाषांतून छापून घ्यावीत.

यांतल्या मुलांना यां विषयांत किती गुण मिळाले आणि मुलांच्या उत्तरपत्रिका तपासताना परीक्षकांना किती सोपे वाटले, हे प्रश्न अजून अनुत्तरित राहिले आहेत. ही मुले पुढे काय करणार आहेत?

इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांची मोडतोड करणारे हेच अनिल गोरे ना? --वाचक्‍नवी

माझे शिक्षण

माझे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाले. अकरावीला इंग्रजीतून विज्ञान शाखेचे शिक्षण घेण्याची भीती होतीच. पण अकरावीला आम्हाला ज्याप्रकारे शिकवले गेले, त्यामूळे काहीच अडचण आली नाही.
अकरावीला २-३ महिने आम्हाला मराठीमिश्रीत इंग्रजीतून शिकवले गेले. त्यामूळे एकतर इंग्रजीचे एकदम दडपण आले नाही, आणि एकदा इंग्रजी अंगवळणी पडल्यावर काहीच प्रॉब्लेम आला नाही.
उदा. जीवशास्त्र-१ चे प्राध्यापक असे शिकवीतः "सर्व प्लांट्सचे क्लासीफिकेशन पुढील कॅटेगरीज मध्ये केले जाते."
२-३ महिन्यात हळूहळू सवय होत गेली आणि त्यानंतर मग १००% इंग्रजी चालू झाले. इंग्रजीतून कमी ज्ञान मिळाले, असे मला वाटत नाही.
अवांतरः ११वीला एकदा जीवशास्त्र-२ च्या प्राध्यापिका मला 'Go to the back of the class and stand up there!' असे म्हणाल्या. आता त्यांच्या हातवारे करण्याने मागे जायचे आहे, हे कळाले पण मागे जाऊन काय कराय्चे हे नाही कळले. मी मागे जाऊन बसलो! मॅडम आल्या आणि डोक्यात एक फटका मारून मराठीत उभे राहायला सांगितले!

||वाछितो विजयी होईबा||

ज्ञान भाषा

कोणत्याही भाषेमुळे माणसाच्या ज्ञानात भर पडू शकते (तिचा योग्य वापर केल्यास) मग मराठीला ज्ञान भाषा असे म्हणण्यात काय मुद्दा आहे ते समजले नाही.
चन्द्रशेखर

मलापण!

मराठीला ज्ञान भाषा असे म्हणण्यात काय मुद्दा आहे ते समजले नाही.

माझ्या मते डांगी, गोंडी, भिल्ली या सगळ्याच ज्ञानभाषा आहेत. --वाचक्‍नवी

अभिनंदन!

अभिनंदन! फार महत्वाचे कार्य करीत आहात. गुलामगिरीची मानसिकता असलेल्यांना हे समजणार नाही. प्रश्न मराठी मध्यम सोपे की अवघड हा नाही. अस्मितेचा आहे. चीन, जपानमध्ये सर्व शिक्षण फक्त आणि फक्त मातृभाषेतूनच आहे. म्हणूनते आपल्याहून एवढे प्रगत आहेत. 'बहु असोत सुंदर संपन्न...' चा अर्थ ज्यांना कळलेला नाही त्यांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊ नयेत.

 
^ वर