विवेकवादी लेखनावर आक्षेप

विवेकवादी लेखनावर आक्षेप
इथे होणार्‍या काही विवेकवादी लेखनावर काही उपक्रमींचा पुढीलप्रमाणे आक्षेप आहे.( तो अगदी याच शब्दांत नसला तरी आशय साधारणपणे असा आहे.):-
स्वत:ला विज्ञानवादी म्हणवणारे काहीजण इथे लेखन करतात. आपण जे लिहिले आहे तेच सत्य. सर्वांनी तेच खरे मानले पाहिजे.त्याच्या विरुद्ध असेल ते सर्व खोटे.ते कोणीही खरे मानू नये, असा त्यांच्या लेखनाचा एकंदर सुर असतो.हे लेख वाचून त्रास होतो.असे लिहू नये.
या आक्षेपाचे आश्चर्य वाटते. असा अर्थ ध्वनित व्हावा असे कुठे कोणी काय लिहिले आहे?
खरे तर "माझेच खरे" अशी कोणाचीही अधिकारवाणी विज्ञानात चालत नाही.एखादा निसर्ग नियम नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकाने सांगितला म्हणून खरा आहे असे समजले जात नाही.तो नियम वस्तुनिष्ठ प्रयोगांनी सिद्ध व्हायला हवा;अथवा तर्कशुद्ध युक्तिवादाने पटवून द्यायला हवा; किंवा त्या नियमाचा सार्वत्रिक अनुभव यायला हवा तरच तो सत्य मानला जातो.विज्ञान, वैज्ञानिक, विज्ञानातील तत्त्वे यांना पूजनीय मानू नये अशी विज्ञानाची शिकवण असते.
धार्मिक क्षेत्रात अनेक गोष्टी पूज्य मानल्या जातात. त्यांचा अपमान झाला असे धर्मनिष्ठांना वाटले तर त्यांच्या भावना दुखावतात.उद्रेक होतो. विज्ञानात असे काही नसते.
पण ही झाली तत्त्वे. व्यक्तीच्या हातून प्रमाद घडू शकतात.चुका होऊ शकतात.म्हणून या विषयावरील अनेक लेख आणि प्रतिसाद वाचले. त्यांत आक्षेपात उल्लेखिलेल्या गोष्टी आढळल्या नाहीत.पण हे आक्षेप खोटे असण्याचे काहीच कारण नाही.
म्हणजे ते लेख वाचून आक्षेपकांना तसा अर्थ प्रतीत झाला असला पाहिजे.
असे का घडले? संबंधित लेख वाचून "....यात लिहिले आहे तेच सत्य आहे. सर्वांनी तेच खरे मानावे . या विरुद्ध असेल ते खोटे" असेच यात सांगितले आहे असे कांही वाचकांना का वाटले?
यावर विचार करता पुढील प्रमाणे सुचले.(ते खोटे असू शकेल हे प्रारंभीच सांगून टाकतो.)
विवेकवादी लेखन वस्तुनिष्ठ असते,व्यावहारिक, वास्तववादी असते.धादान्तवादावर(कॉमनसेन्सवर) आधारित असते. निसर्ग नियमांना धरून असते. तर्कसुसंगत तर असतेच असते.त्यामुळे बुद्धिमान व्यक्तींना ते अपरिहार्यपणे पटते. पण हे पटणे बौद्धिक पातळीवर असते.
मग इतके दिवस ज्या संकल्पना (पूर्वजन्म, पुनर्जन्म,संचित,परब्रह्म, आत्मा, स्वर्ग,मोक्ष इ.)खर्‍या मानल्या त्यांचे काय? बालपणी मोठ्या माणसांनी जे सांगितले,मोठेपणी प्रवचनात,व्याख्यानांत जे ऐकले,ग्रंथांत, संतसाहित्यात जे वाचले ते खोटे कसे असेल? सत्यच असले पाहिजे. असे भावनेला वाटते.खोटे आहे हे बुद्धीला पटत असूनही पूर्वसंस्कारांमुळे ते खरे मानण्याचा भावनेचा हट्ट म्हणजे श्रद्धा. भावनेला ही श्रद्धा सोडवत नाही.त्यामुळे बुद्धी आणि भावना यांत द्वंद्व निर्माण होते.त्याचा त्रास होतो. मग भावना बंड करून उठते."हे काय लिहिले आहे? हेच सत्य आणि असेच मानावे! आम्हांला शिकवणारे हे कोण? आम्ही हे मुळीच सत्य मानणार नाही"
खरे तर "हेच सत्य" असे लेखात मुळीच म्हटलेले नसते.ते सांगते बुद्धी. राग निघतो लेखावर) !! तर असा हा एकूण प्रकार असावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

धादान्तवाद

कॉमन सेन्ससाठी धादान्तवाद हा शब्द आवडला. धादान्त या शब्दाचा योग्य अर्थ तपासून पाहिला.

बाकी चालू द्या.

आदरभावना

हा धागा या प्रकारे सुरु केल्याबद्दल धन्यवाद.

पहिल्यांदा तुमच्या एकंदर लेखातील आशयाला सहमती दर्शवतो. कुठेतरी तपशीलात मतभेद दिसतात. त्याआधी -

व्यक्ति व्यक्तितील आदरभावना थोडी कमी पडत आहे असे मला वाटले. म्हणजे एखाद्याचे मत आपल्याशी जुळत नसेल तर त्याचा दोष त्या व्यक्तिला पटकन दिला जातो. त्या आधी तो का जुळत नाही हे बघितले पाहिजे. आता हा दोष जवळपास सगळ्यात (माझ्यासकट आणि काही अपवाद सोडून) दिसतो. कुठेतरी आपण आवर घातला पाहिजे. यानंतरची पायरी म्हणजे एकमेकाला हिणवण्याची. ती संपादक आटोक्यात आणताना दिसतात. पण त्यांचे काम कमी केले पाहिजे. कधीमधी पिटात पॉपकॉर्न खात बसून मजा येते ती गोष्ट वेगळी.

खरे तर "माझेच खरे" अशी कोणाचीही अधिकारवाणी विज्ञानात चालत नाही.एखादा निसर्ग नियम नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकाने सांगितला म्हणून खरा आहे असे समजले जात नाही.तो नियम वस्तुनिष्ठ प्रयोगांनी सिद्ध व्हायला हवा;अथवा तर्कशुद्ध युक्तिवादाने पटवून द्यायला हवा; किंवा त्या नियमाचा सार्वत्रिक अनुभव यायला हवा तरच तो सत्य मानला जातो.विज्ञान, वैज्ञानिक, विज्ञानातील तत्त्वे यांना पूजनीय मानू नये अशी विज्ञानाची शिकवण असते.

याबाबतीत मला कुह्नचे विचार पॉपर एवढेच पटतात. (http://en.wikipedia.org/wiki/Thomas_Kuhn) रसेल वा पॉपर यांचे विचार एका आदर्शवादी व्यवस्थेचे वर्णन आहे. तर कुह्न हे काय घडते यावर भाष्य करतो. मध्यंतरी आरागॉर्न यांनी एका 'हाय इम्पॅक्ट जर्नल' चे उदाहरण दिले होते ते यातलेच. कुठेतरी आपण सर्व जण हे रसेल, डोकिन्स (बाबांच्या नावाचा जप हवाच), पॉपर, आइन्स्टाईन वा एपीआय, नेचर , विकी या प्रस्थापितांची अधिकारवाणी मान्य करत असतो. (डोक्याला शीण नको म्हणत कदाचित.) याला समांतर कुणी श्रुतीस्मृती, बायबल, कुराण यापैकींची अधिकारवाणी मान्य करतात. आता ह्या दोन्ही अधिकारवाणी मानणे एकच प्रकारात मोडतात का? असा दुसर्‍या पक्षाचा प्रश्न असू शकतो. हा प्रश्न रास्त असावा. याचे उत्तर म्हणजे 'त्यात आमची भावनीक गुंतवणूक नसते. तर वेद इ. मधे तुमची असते म्हणून तुम्हाला राग येतो. ' असे देता येते. पण आपल्याला राग येत असेल तर आपली भावनीक गुंतवणूक नाकारून चालणार नाही.

आता थोडे अवांतरः

पूर्वी (म्हणजे मी ऐकले ते शंकराचार्य-मंडनमिश्र वादात) वाद करायची एक पद्धत होती. म्हणजे एक विधान करायचे. (एका वेळी फक्त एक) विरुद्ध पक्षाने त्यास सहमत असल्यास तसे सांगायचे. नाही तर असहमती दर्शवून त्याविरुद्ध पुरावा द्यायचा (त्याकाळी तो आधारग्रंथातलाच लागायचा ही गोष्ट वेगळी.) मग त्या विधानाचा निचरा होईस्तोवर वाद चालायचा. निचरा झाल्यावर् पुढले विधान केले जायचे. असे वाद मग दिवसोंदिवस चालायचे (बहुदा शेतीकाम संपले की बहुतेकांना वेळच वेळ असावा.). शेवटी एक पक्ष जिंकायचा/ किंवा जोरी बुद्धीबळासारखा अनिर्णीत.

या उलट टी.व्ही.वरचे वाद विवाद पाहिले, तर प्रश्न काहीही असो उत्तर म्हणून भाषण ठरलेलेच असणार. प्रश्नांना टाळणारे, पिटातल्यांचे वाहवा मिळवणारे आणि नारेबाजी करणारे वाद लवकर (दिलेल्या वेळेत) संपतातपण खोली काही गाठत नाही.

उपक्रमातील काही वाद दुसरीकडे झुकणारे वाटतात

प्रमोद

असहमत

  1. दोन्ही बाजूंनी समान प्रखर त्वेष असला तर 'सत्य दोन्हींच्या बरोबर मध्येच आहे' असा त्याचा अर्थ लावणे चूक आहे.
  2. दहशतवादी (wannabe स्वातंत्र्यसैनिक) आणि सैन्य हे दोघेही गोळ्याच मारतात. पण म्हणून दोघेही समान अन्यायकारक ठरत नाहीत. आमचा तो बाब्या, आमचा राग सयुक्तिक, ही विधाने जेत्यांनी करायची असतात. जेता कोण ते फायरपॉवरवर ठरते. येथे फायरपॉवर म्हणजे वैचारिक युक्तिवादांचा वैचारिक युक्तिवादाने समाचार घेणे आणि खवचटपणाचा खवचटपणे, चिवटपणे मुकाबला करणे होय.

चर्चेत भाग घेणार. बिअर पिणार. लाह्याही खाणार.

दोन्ही बाजूंनी समान प्रखर त्वेष असला तर 'सत्य दोन्हींच्या बरोबर मध्येच आहे' असा त्याचा अर्थ लावणे चूक आहे.

बरोबर. ह्या श्रद्धावाल्यांना समन्वयवादी भूमिका अपेक्षित असते. ते कसे शक्य आहे. सूर्य पूर्वेलाच उगवतो. आणि सूर्य पूर्वेकडे उगवत असला तरी 'सूर्य थोडासा पश्चिमेकडे उगवतो बरं का' अशा प्रकारची वक्तव्ये त्यांना अपेक्षित असतात. म्हणजे ह्या अर्धवट आस्तिकांना विशेषतः

येथे फायरपॉवर म्हणजे वैचारिक युक्तिवादांचा वैचारिक युक्तिवादाने समाचार घेणे आणि खवचटपणाचा खवचटपणे, चिवटपणे मुकाबला करणे होय.

भले शाब्बास!

मजकूर संपादित.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

त्वेष

1.दोन्ही बाजूंनी समान प्रखर त्वेष असला तर 'सत्य दोन्हींच्या बरोबर मध्येच आहे' असा त्याचा अर्थ लावणे चूक आहे.
माझ्या म्हणण्याचा अर्थ 'सत्य दोन्हीच्या बरोबर मध्ये आहे' असा होत नाही. (असे मला वाटते.)
त्वेष असू नये असे वाटते. त्वेषाचे कारण जर दुसर्‍या बाजुत त्वेष आहे हे असेल तर तो वाढतच जाईल ही त्यातील भीति.

जशास तसे असावे की नाही हा गेम थिअरीचा प्रश्न आहे. कित्येकदा वादात समोरच्यापेक्षा पिटातल्यांना जिंकायचे असते. माझा असा कयास आहे की संयमाने पिटातले जास्त प्रभावित होतात. (पिटातले लोको शिटी वाजवणार का?)

प्रमोद

माझा समज

माझ्या म्हणण्याचा अर्थ 'सत्य दोन्हीच्या बरोबर मध्ये आहे' असा होत नाही. (असे मला वाटते.)

"ह्या दोन्ही अधिकारवाणी मानणे एकच प्रकारात मोडतात का? असा दुसर्‍या पक्षाचा प्रश्न असू शकतो. हा प्रश्न रास्त असावा." या तुमच्या वाक्यातील 'रास्त' या शब्दाने माझा तसा समज झाला.

त्वेष असू नये असे वाटते. त्वेषाचे कारण जर दुसर्‍या बाजुत त्वेष आहे हे असेल तर तो वाढतच जाईल ही त्यातील भीति.

"याचे उत्तर म्हणजे 'त्यात आमची भावनीक गुंतवणूक नसते. तर वेद इ. मधे तुमची असते म्हणून तुम्हाला राग येतो. ' असे देता येते. पण आपल्याला राग येत असेल तर आपली भावनीक गुंतवणूक नाकारून चालणार नाही." या वाक्यात 'राग' हा शब्द तुम्ही या चर्चाप्रस्तावातील "गोमूत्राविषयीच्या पेटंटच्या पहिल्या बातमीपासूनच माझ्या डोक्यात राग होता." या वाक्याला संदर्भून घेतला आहे असे मी गृहीत धरले. "जर मला राग येतो तर माझ्या मतांवर रागविण्याचा इतरांचा हक्क मी स्वीकारावा" असे तुमचे मत असल्याचे त्यावरून मला वाटले.
म्हणून मी असे स्पष्टीकरण दिले की रागावण्याचा हक्क सममित नसतो. वैज्ञानिक दृष्टिकोन न ठेवता केलेल्या कृतींविषयी मला राग आहे तर तर्ककठोर विचारांची मागणी केल्याबद्दल माझ्याविषयी राग आहे. (म्हणजे माझा राग हा त्वेषाविरुद्ध आलेला अजून मोठा त्वेष अशा प्रकारचा नाही.) अर्थात, माझ्या मतांवर रागावण्याचा हक्क त्यांना (माझ्या मते) नसला तरी त्यांनी रागावू नये अशी इच्छा मी व्यक्त केलेली नाही. कारण राग हे असहाय्यतेचे लक्षण आहे.

राग

कारण राग हे असहाय्यतेचे लक्षण आहे.

वाक्य आवडले.
तुमचा गोमुत्राच्या पेटंटचा राग ही त्यातच मोडतो. म्हणजे माझ्या कराच्या पैशाची अशी उधळपट्टी चालु आहे आणि मी काहीच करु शकत नाही. बरोबर?

मी मुळात अधिकारवाणी स्वीकारणे आणि त्यातील भावनीक गुंतवणूक आणि ती नाकारणे यामुळे येणार्‍या रागावर लिहिले होते. तुमचा राग त्यातला नाही.

बाकी रागावण्याचा हक्क असतो असे मी मानतो. म्हणजे संभाषणस्वातंत्र्यांतर्गत.

प्रमोद

धन्यवाद

तुमचा गोमुत्राच्या पेटंटचा राग ही त्यातच मोडतो. म्हणजे माझ्या कराच्या पैशाची अशी उधळपट्टी चालु आहे आणि मी काहीच करु शकत नाही. बरोबर?

हो.

बाकी रागावण्याचा हक्क असतो असे मी मानतो. म्हणजे संभाषणस्वातंत्र्यांतर्गत.

प्रत्येकजण प्रतिपक्षाकडून शरणागतीची अपेक्षा करतो पण "मी माझे म्हणणे तुझ्या डोक्यात घुसवू शकत नाही म्हणून माझा राग योग्य. पण तू निरुत्तर होऊनही केवळ मत बदलावे लागेल म्हणून राग करतोस ते अयोग्य." असे केवळ निरुत्तर न होणारा (अधिक फायरपॉवर) म्हणू शकतो. राग (="मला निरुत्तर करणार्‍या तुझे घर उन्हात बांधले जावे") व्यक्त करण्याचा जिताचा हक्क मान्य आहे पण राग येण्याचा नैतिक हक्क मान्य नाही.

लेख आणि श्री प्रमोद यांचा प्रतिसाद् आवडला.

हे वाक्य खास आवडले.
खोटे आहे हे बुद्धीला पटत असूनही पूर्वसंस्कारांमुळे ते खरे मानण्याचा भावनेचा हट्ट म्हणजे श्रद्धा.

-Nile

या विषयावर काहीतरी समजण्यासारखे आहे

या विषयावर चर्चेतून काहीतरी समजण्यासारखे आहे, असे मला वाटते. या बाबतीत लोकांची बरीच भावनिक गुंतवणूक आहे. ती नेमकी काय आहे? हे संवादातून कळणे कदाचित शक्य आहे.

सध्या तरी लिहायला वेळ नाही.

मजकूर संपादित.

लेख

लेखात मांडलेल्या मुद्द्यांबाबत विचार करायला हवा. श्री सहस्त्रबुद्धे यांनी मांडलेले मुद्देही विचार करण्यासारखे आहेत.

मजकूर संपादित.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

विचार आवडतातच

श्री आरागॉर्न व मुक्तसुनीत यांच्या प्रतिसादांविषयी येथे चर्चा करणे प्रशस्त होणार नाही. पन्नास प्रतिसादांचा कोटा त्यामुळे लवकर भरून जाईल व दुसरे म्हणजे अशी चर्चा या धाग्यावर अवांतर ठरेल. नंतर संपादन करून चर्चेत अर्थपूर्ण भर टाकण्यासाठी त्यांनी प्रतिसाद लिहिले असतील तर ते योग्यच आहे. पण त्याकरता लिहिलेल्या मजकुरामुळे चर्चाप्रस्तावाची व इतर चर्चा करणार्‍या सदस्यांची टर उडवली जाते, हे उमगण्याइतपत प्रगल्भता या दोनही सदस्यांत आहे. केवळ टर उडविणे हाच त्यांचा हेतू असावा असा निष्कर्ष काढण्यापुर्वी मला त्यांच्या हेतूंविषयी जाणून घ्यावेसे वाटले.

त्यांचे लेखन मला तरी आवडते, इतर तथाकथित आणि तर्ककर्कश्श्य विज्ञानवाद्यापेक्षा सुगम आणि जास्त मानवी वाटते. काही मूर्ख आणि भंपक विज्ञानवादी सदस्यांच्या प्रतिसादांची काळजी न करता, या लेखकांनी अजून लिहावे हीच शुभेच्छा!

वरील विधानांत विशेषणांची रेलचेल आहे जी मला योग्य वाटत नाही. दोन्ही बाजूंकडून नवीन माहिती, पुरावे प्रत्येक चर्चेत पुढे आणले जातात. कुणाचेही मतपरिवर्तन होत नसले तरी हरकत नाही पण काहीएक वैचारिक प्रवास अशा वादांतून घडतो, जो मला व्यक्तिश: सकारात्मक वाटतो.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

आवाहन

या निमित्ताने मी आता यनावालांना आवाहन करतो की,
त्यांनी आधी

  • विवेकवाद म्हणजे काय
  • विवेकवादाचे पुरस्कर्ते
  • चळवळीचा इतिहास
  • तत्कालीन समाजात विवेकवादाचे स्थान
  • तत्कालीन समाजात विवेकवादाची आवश्यकता
  • विवेकवादातील मतांतरे
  • विवेकवादाचा विरोध/खोडून काढणारे तत्वज्ञान

असे विवेकवादाची मीमांसा करून, भुमिका विषद करणारे, समजावून सांगणारे सविस्तर संदर्भासहीत लेखन करावे, मगच हा विषय चर्चेला घ्यावा.
जोवर तुमची संदर्भासहीत असलेली भुमिका लिखित स्वरूपात तुम्ही मांडत नाही, तोवर त्या विषयावरील संधिग्धता, आणि तुमचे भंपक विज्ञानवादी कंपू, हा विषय भरकटवत राहतील याची मला खात्री आहे.

असो,
काही वेळा मला येथिल तथाकथित बिनडोक विज्ञानवादी,
हे एक स्कॉटलंड येथचा सतराव्या शतकातला साम्राज्यवादी तत्वज्ञानी, डेव्हिड ह्युम याच्या सारखे वाटतात. कारण तो म्हणत असे की, 'गणित आणि तर्कशास्त्र या शिवाय जगात ज्ञान नाही....'
तो असेही म्हणत असे की तुम्ही एखादे तत्वज्ञानावरील पुस्तक उचलले आणि त्यात गणित किंवा तर्क नसेल तर ते लगेच जाळून टाकले पाहिजे.

उपक्रमावरील अनेक तथाकथित गर्वीष्ठ विज्ञानवादी अशाच प्रकारे चर्चा/वर्तन करतांना मला दिसून येतात.

आपला
गुंडोपंत
टीपः डेव्हिड ह्युम यांच्या वक्तव्याचा कोणताही दुवा/पुरावा/संदर्भ सध्या माझ्याकडे नाही. त्यामुळे संदर्भरहीत विधान केल्याने कुणास आक्षेप असेल तर आवाहन ठेवून, हा प्रतिसाद संपादीत केला तरी चालेल.

सुरुवात

हा दुवा या विषयाला धरून आहे असे दिसते.

आहे

दुवा विषयाला धरून आहे आणि जुनी चर्चा वाचनीय आहे. ही चर्चा त्या दुव्यात विसर्जित करावी.

-राजीव.

वेगळा विषय

तेथील चर्चा विवेकवादाविषयी आहे तर हा धागा विवेकवादावरील अविवेकी आक्षेपांविषयी आहे. गुंडोपंत यांचा हा उपधागा मात्र तेथे विसर्जित करणे योग्य ठरेल.

विवेकवाद

•विवेकवाद म्हणजे काय
•विवेकवादाचे पुरस्कर्ते
•चळवळीचा इतिहास
•तत्कालीन समाजात विवेकवादाचे स्थान
•तत्कालीन समाजात विवेकवादाची आवश्यकता
•विवेकवादाचा विरोध/खोडून काढणारे तत्वज्ञान

एवढे सगळे एका लेखात (लेख मालेतून) लिहिणे हे दमछाकीचे होईल. कदाचित तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यास हा एका सहामाहीचा अभ्यासक्रम असेल. एवढी मोठी अपेक्षा तुम्ही का करता आहात?

माझ्या पहाण्यात दि.य.देशपांडे यांचे मराठीतील विवेकवादावरचे पुस्तक (प्रकाशक ग्रंथाली?) आहे. तुम्ही लिहिलेल्यांपैकी काही मुद्दे त्यात मिळतील (विवेकवाद म्हणजे काय हा मुद्दा मुख्यतः). मराठीतील दि.य.देशपांडे (हे विवेकवादाचे पुरस्कर्ते), मे.पु.रेगे (हे पुरस्कर्ते नाही) या दोन तत्वज्ञांची पुस्तके लेख यासबंधी मिळतील. एकमेकाचे विरोधक असून त्यांची मैत्री होती व आदरभावना राखून त्यांनी यावर लिखाण केले. माझ्या पाहण्यात मराठीत यासारखी दर्जेदार पुस्तके विरळाच. हल्ली धनंजय यांनी रसेलच्या निबंधाचे भाषांतर केले होते त्यास मी हाच दर्जा देईन.

आता यनावाला वा धनंजय या दोघांनी मनावर घेतले आणि तुमच्या विनंतीस मान दिला तर तो सत्कार करण्याएवढा स्वागतार्ह राहील.

या उलट इंग्रजीत यावर भरपूर वाचायला मिळेल. नुसती पुस्तकांची यादी काढण्यासाठी काही दिवस खपावे लागेल.

जोवर तुमची संदर्भासहीत असलेली भुमिका लिखित स्वरूपात तुम्ही मांडत नाही, तोवर त्या विषयावरील संधिग्धता विषय भरकटवत राहील.

मूळ विषय 'बुद्धीला पटते पण भावनांना पटत नाही म्हणून अशी प्रतिक्रिया होते का? ' असा आहे. त्यात तरी विवेकवाद हा विषय नाही असे मला वाटते.

हे एक स्कॉटलंड येथचा सतराव्या शतकातला साम्राज्यवादी तत्वज्ञानी, डेव्हिड ह्युम याच्या सारखे वाटतात. कारण तो म्हणत असे की, 'गणित आणि तर्कशास्त्र या शिवाय जगात ज्ञान नाही....'
तो असेही म्हणत असे की तुम्ही एखादे तत्वज्ञानावरील पुस्तक उचलले आणि त्यात गणित किंवा तर्क नसेल तर ते लगेच जाळून टाकले पाहिजे.
उपक्रमावरील अनेक तथाकथित गर्वीष्ठ विज्ञानवादी अशाच प्रकारे चर्चा/वर्तन करतांना मला दिसून येतात.

तर्कावरचा तुमचा राग आहे हे पूर्वीच्या चर्चेतून आणि वरील विधानातून मला जाणवले. दोन अधिक दोन तीन किंवा पाच झाले तर त्यातून झालेली कला तुम्हाला भावते असे काहीसे तुमचे म्हणणे होते हे मला आठवते.

माझ्यामते तुम्ही स्वतः तर्काचा त्याग व्यवहारात करणार नाही. म्हणजे तुम्हाला मिळणारे पैसे दोन अधिक दोन तीन करत वा तुम्हाला द्यायचे पैसे दोन अधीक दोन पाच करत घेणार देणार नाही. व्यवहारात जे तत्त्व तुम्ही वापरता तेच तत्व तुम्ही तुमच्या 'श्रद्धा/विश्वास संयुक्तास'(बिलिफ स्ट्रक्चर) वापरले तर कदाचित तुमचा व्यावहारिक फायदा होऊ शकतो. (म्हणजे आयुर्वेद, होमिओपॅथी, नाडीपरिक्षा वगैरेत व्यर्थ वेळ पैसा जाणार नाही असे काहीसे.) अशी काहिशी भूमिका 'गर्विष्ट विज्ञानवाद्यांची' दिसते. तुमचा यास काय आक्षेप आहे?

प्रमोद

त्यांना लिहू द्या ना. तुम्हाला टाइप करायला सांगतायेत का ते?

एवढी मोठी अपेक्षा तुम्ही का करता आहात?

इंग्रजी विकीच्या दोन चार पानात जे बसते त्याची मराठी मध्ये लेखमाला का होते? मला ती फार काही मोठी अपेक्षा वाटत नाही. त्यांनी हे लेखन पूर्ण केले की मग पुढे चर्चा करता येईल.

पुस्तकांच्या माहितीबद्दल धन्यवाद!
अजून एक वर्‍हाडपांडे नावाचेही लेखक या संदर्भात आठवतात. विजय प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले.


तर्कावरचा तुमचा राग आहे

क्षमा करा! असा नाही. माझा राग सदैव सर्वकाही तर्ककर्कश्यतेनेच पाहावे यावर आहे.

मी भाजीवाल्यांशी, रिक्षावाल्यांशी आणि कोणत्याही श्रमजीवींशी त्यांनी जास्त पैसे घ्यावेत म्हणून घासाघीस करतो आणि देतो. ते बहुतेकवेळा मी जास्त देउ नयेत यासाठी अडून बसतात, जबरदस्तीने माझ्या खिशात परत कोंबण्याचा प्रयत्न करतात. हे फक्त नाशकातच नाही तर इतर अनोळखी ठिकाणीही घडले आहे, घडते आहे. यामुळे माझा खूप फायदा होतो. (हवे असल्यास यादी देईन.) तर्ककर्कश्य न राहिल्याचा फायदा!

अर्थातच तुमचे तत्व आणि विवेचन गैर लागू -

आवांतरः
आयुर्वेद आणि होमिओपॅथी वापरण्यात मला माझा फायदाच झालेला आठवतो.
उलट काही प्रसंगी नवीन वैद्यकाने नुकसान झाल्याचेच आठवते, त्यात माझा भरपूर वेळ पैसा गेला आहे!

आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~

स्वार्थ

मी भाजीवाल्यांशी, रिक्षावाल्यांशी आणि कोणत्याही श्रमजीवींशी त्यांनी जास्त पैसे घ्यावेत म्हणून घासाघीस करतो आणि देतो. ते बहुतेकवेळा मी जास्त देउ नयेत यासाठी अडून बसतात, जबरदस्तीने माझ्या खिशात परत कोंबण्याचा प्रयत्न करतात. हे फक्त नाशकातच नाही तर इतर अनोळखी ठिकाणीही घडले आहे, घडते आहे. यामुळे माझा खूप फायदा होतो. (हवे असल्यास यादी देईन.) तर्ककर्कश्य न राहिल्याचा फायदा!

नेहमीच्या भाजीवाल्याकडे शक्य आहे (इटरेटेड प्रिझनर्स डायलेमा असे त्याचे वैज्ञानिक नाव आहे) पण अनोळखी ठिकाणी तसे वागून काय फायदा होतो?

क्षमा करा! असा नाही. माझा राग सदैव सर्वकाही तर्ककर्कश्यतेनेच पाहावे यावर आहे.

बुद्धी ही भावनांपेक्षा अधिक फायदेशीर असते (ही व्याख्या आहे, सिद्धता मागू नका). कोणत्याही फायद्यासाठी गुंतवणूक करावी लागते. भावनांच्या विरुद्ध जाणे हा त्या गुंतवणुकीचा एक भाग असू शकतो. "तर्क करण्याची/तर्काने आलेले निष्कर्ष स्वीकारण्याची कुवत 'माझ्याकडे' नाही" असे विधान केल्यास तर्काच्या विपरीत वागणुकीवर टीका होणार नाही. अपंगांसाठी एखादा डबा राखीव ठेवू, अख्ख्या लोकलभर अरेरावी/त्रास नको. दुबळेपणासाठी स्पेशल वागणूक ही भीक असते हे विसरू नये.

इंग्रजी विकी

त्यांना लिहू द्या ना. तुम्हाला टाइप करायला सांगतायेत का ते?

त्यांनी का तुम्हीही लिहा सत्कार करू. (पसंत पडले तर जाहीर.)

इंग्रजी विकीचा लेख (दुवा दिल्याबद्दल धन्यवाद) अगदीच तोकडा आहे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची त्यात उत्तरे नाहीत.

माझा राग सदैव सर्वकाही तर्ककर्कश्यतेनेच पाहावे यावर आहे.

ज्यावेळी तुमच्या भावनेशी/श्रद्धास्थळांशी /कलात्मक बाबींशी तर्क भिडतो तेंव्हा तुम्हाला तो तर्ककर्कश वाटतो का?
हा प्रश्न विचारायचा उद्देश म्हणजे यनावाला यांना नेमके असे का होते हे जाणून घ्यायचे आहे असे दिसते.

मी भाजीवाल्यांशी, रिक्षावाल्यांशी आणि कोणत्याही श्रमजीवींशी त्यांनी जास्त पैसे घ्यावेत म्हणून घासाघीस करतो आणि देतो. ते बहुतेकवेळा मी जास्त देउ नयेत यासाठी अडून बसतात, जबरदस्तीने माझ्या खिशात परत कोंबण्याचा प्रयत्न करतात. हे फक्त नाशकातच नाही तर इतर अनोळखी ठिकाणीही घडले आहे, घडते आहे. यामुळे माझा खूप फायदा होतो. (हवे असल्यास यादी देईन.) तर्ककर्कश्य न राहिल्याचा फायदा!

तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. मी देखील श्रमजीवींशी असे वागायचा कधीकधी प्रयत्न करतो. पण त्याला मी तर्कपूर्ण म्हणतो. (म्हणजे संपत्तीची विभागणी करणे.) पण जर तुम्ही जास्त पैसे देऊ करून कमी पैशात काम करीत असाल (श्रमजीवींबरोबर) तर तो माझ्या तर्कात बसत नाही.
हेच तुम्ही सराईत व्यापार्‍याशी/भांडवलदाराशी कराल का? म्हणजे घर विकणारा बिल्डर, वाहन विकणारा, विद्युत उपकरण विकणारा. यातूनही तुम्हाला फायदा झाल्याचे तुम्हाला जाणवले का?

आयुर्वेद आणि होमिओपॅथी वापरण्यात मला माझा फायदाच झालेला आठवतो.
उलट काही प्रसंगी नवीन वैद्यकाने नुकसान झाल्याचेच आठवते, त्यात माझा भरपूर वेळ पैसा गेला आहे!

एखाध्या आयुर्वेद वा होमिओपॅथी औषधाने एखाद्या रोगात फायदा होत असेल तर तेच औषध नवीन वैद्यकात वापरायचा कुणाचा आक्षेप असेल असे वाटत नाही. यातील आयुर्वेदाची काही औषधे नवीन वैद्यकात आली आहेत (घटक वेगळे काढून) असे मला वाटते. होमिओपॅथीचे मात्र तसे घडले नाही. (प्रयत्न करूनही.) आधुनिक वैद्यकाच्या एखाद्या औषधाने कुणाचे नुकसान होत असेल तर त्या परिस्थितीत ते औषध देणे थांबवावे असेच त्यातील तत्व असावे.

हे असे म्हणणे तर्ककर्कश आहे का?

प्रमोद

अक्षर

त्यांनी का तुम्हीही लिहा सत्कार करू.
माझे अक्षर चालणार असेल, तर माझी लिहिण्याची तयारी आहे. त्यांना काय म्हणायचे आहे ते मात्र त्यांना सांगावे लागेल. सत्काराची अपेक्षा येथे नाही.

मी देखील श्रमजीवींशी असे वागायचा कधीकधी प्रयत्न करतो. उत्तम उत्तम!!
एका विषयावर तरी आपली सहमती होते आहे! हरकत नाही!

हेच तुम्ही सराईत व्यापार्‍याशी/भांडवलदाराशी कराल का? म्हणजे घर विकणारा बिल्डर, वाहन विकणारा, विद्युत उपकरण विकणारा. यातूनही तुम्हाला फायदा झाल्याचे तुम्हाला जाणवले का?
हो नेहमीच करतो! दर वेळी फायद्याची अपेक्षा असतेच असेही नाही खरे तर बरेचदा ती नसतेच. झालेला फायदा हा साइड इफेक्ट असतो.

हेच तुम्ही सराईत व्यापार्‍याशी/भांडवलदाराशी कराल का? म्हणजे घर विकणारा बिल्डर, वाहन विकणारा, विद्युत उपकरण विकणारा. यातूनही तुम्हाला फायदा झाल्याचे तुम्हाला जाणवले का?

मी मागे पाटील बिल्डर कडून फ्लॅट घेतला. तर त्यांनी मला काहीही न म्हणता घराचे सर्व काम करून दिले. सामान हलवायला एक माणूस दिला. शिवाय वर्षभर एक माणूस दर आठवड्याला सगळे व्यवस्थित आहे की नाही अशी इमारतीची पाहणी करायला येत असे. अजूनही आमचे उत्तम संबंध आहेत. अधून मधून ते आमच्या कडे आणि आम्ही त्यांच्याकडे येत जातही असतो.
मी त्यांना फ्लॅट घ्यायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलेल्या रकमेपेक्षा रु. ११००० जास्त दिले होते - त्यांनी न मागता! त्यांनी मला तेथेच हात जोडून नमस्कार केला व म्हणाले की येथून पुढे तुमचे घर ही माझी जबाबदारी - त्यांनी ती पार पाडली! शिवाय आजही मला महापालिकेत कोणत्याही कामासाठी जावे लागत नाही. त्यांचा माणूस येतो आणि माझे काम करून आणतो. शिवाय त्यांच्या शेतात काही नवीन आले की आमच्याकडे वाण येते वगैरे वगैरे... यात काय फायदा झाला हे मला तसे माहिती नाही. पण उत्तम काळजी घेणारा मित्र मिळाला.

मी मध्ये होंडाची प्लेझर नावाची गाडी घेतली. तेथे सुरेश नावाचा सेल्समन होता. त्याला मी काय बार्गेन करणार? किती झाले विचारले, त्याने सांगितले तेव्हढे दिले, इतर गप्पा मारल्या. माझा काही तोटा झाला असे मला वाटले नाही. उलट सर्व्हीसींगला गेलो की सगळे जण आनंदाने भेटायला येउन जातात. आत जाऊन 'पंतांची गाडी आली आहे' म्हणून वर्दी देतात. युसुफ (म्याकॅनिक) स्वतः मला भेटायला येतो. कशी चालते आहे गाडी वगैरे चौकशी करतो अगत्याने काही सुचनाही देतो. मला जमले नाही तर गाडी घ्यायला घरी माणूस येतो. सर्व्हीस करून गाडी घरी येते. नक्की काय फायदा झाला कल्पना नाही. पण खुप माणसे जोदली गेली. रस्त्यात कुठेही भेट झाली की त्यांना मला पाहून आनंद होतो. मला भेटावेसे वाटतेघाच माझा फायदा असे मला वाटते.

मागे मी आमचा इलेक्ट्रीकचा हिटर बदलून गॅसचा करून घेतला. तो मुलगा (मिलिंद) ते सगळे करायला घरी आला. मग मीच त्याला सांगितल्या पेक्षा ३०० रुपये जास्त दिले. ते तो परत करायला लागला तर त्याला म्हंटले की अरे तुला खाऊ साठी पॉकेटमनी! तर तो इतका खुश झाला, मग बर्‍याच गप्पा झाल्या. त्याने हिटर बसवण्याचे सगळे काम मस्त करून दिले. रंग निघाला होता तेथे स्वतःच आणून लाउन पण दिला. शिवाय २ -४ वेळा काय करायचे आणि काय करायचे नाही याचे प्रात्याक्षिकही करून घेतले. अधून मधून चक्कर मारतच असतो तो सहज म्हणून. त्यानेच गॅस वाल्याला त्याने सांगून ठेवले आहे पंतांकडे दर महिन्याला गॅसची टाकी आलीच पाहिजे असे. ती ही येतच असते.

रिक्षावाला म्हणतो की पंत दारातून हात करत जा मी घ्यायला येतो ना!
चालत कशाल स्टॉपवर येता?

भाजीवाले माझ्यासाठी खास भाज्या फळे काढून ठेवतात. त्यांच्यासाठी मी व्हरांड्यातल्या डब्यातून पैसे ठेवतो. ते घेउन जातात. आदी अडचणीला जास्तही घेउन जातात - परत आणून देतात.

बँका, आरटी ओ, बिले भरणा, टेलिफोन अशा कोणत्याही रांगेत उभे राहायची मला वेळच येत नाही. कुणी तरी तेथे भेटतोच जो मला सरळ आत घेउन जातो. किंवा घरी पाठवून देतो. आणि मग माझे काम होउन घरी येते.
अडीअडचणी आणि आनंदाच्या प्रसंगी ही सगळी मंडळी मला 'आपला मानतात' हा माझा सगळ्यात मोठा फायदा बास्स! अजून काय पाहिजे?

आता तुमचे तर्ककर्कश्श्य अनुभव सांगा!

आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~

मुद्याला बगल

अनोळखी ठिकाणी, जेथे परत जाणे झाले नाही, तेथेही अशा वागणुकीचा फायदा होत असल्यास सांगा. ओळखीच्या जागी चांगले वागण्याचे तर्ककर्कश कारण उपलब्ध आहे.

तर्ककर्कश अनुभव

तुमचे अनुभव वाचून मजा वाटली. बड्या व्यापारांसमोर हा प्रयोग मी करुन बघीन.

मला तर्ककर्कश म्हण॑जे काय नेमके माहित नाही.
मधे मायक्रोवेव्ह घेतला होता. डव्यासोबत आत फिरणारी तबकडी आलीच नाही. मग तो व्यापार्‍याला विचारले त्याने टंगळमंगळ करत दिवस काढले. शेवटी कंझ्मुमर कोर्टात जाऊ का विचारले तेव्हा ती तबकडी आली. याला तुम्ही तर्कसंगत म्हणाल का तर्ककर्कश हे काही मला माहित नाही.

प्रमोद

वैधानिक इशारा

सदर प्रयोग आपापल्या जबाबदारीवरच करावा.
वसुली करायला मी तेथे असणार नाहीये!

मी मागितल्यापेक्षा जास्त पसे जरूर देतो.
पण मला सेवा मिळाली नाही, तर गल्ल्यावर चढून,
"मादरचो$!! टाक माझे पैसे" म्हणून कानफट झोडून दुकानाच्या काचाही फोडण्याची तयारी ठेवतो!

वसुलीची तयारी असेल तर बिन्धास्तपणे जास्त पैसे द्यायला हरकत नाही.

आपला
गुंडोपंत

सुविधा

अतिरिक्त पैसे दिल्यास सुविधा मिळतात. या सुविधांसाठी तुम्ही किंमत देता व तुम्हास अतिरिक्त सेवा मिळते. यात तर्क कुठे हरवला आहे असे दिसत नाही.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

मी अतर्क्य

मी अतर्क्य वागतो असे मला म्हणायचे नाही.
जगात (दिलेल्या परिस्थितीत) तर्कसंगत वागण्याला काय पर्याय आहे?
पण सदैव तर्ककर्कश्य वागावे असे मात्र मला वाटत नाही.

आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव डॉकिन्स तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~

आक्षेप नेमका कोणावर?

लेखाचे शीर्षक "विवेकवादी लेखनावर आक्षेप" असे असले तरी यनावालांनी स्वतःच्या लेखनावर लोक आक्षेप का घेतात हे अंतर्मुख होऊन तपासावे. उदा. "भ्रमाचा भोपळा" किंवा "नामसंकीर्तन साधन पै सोपे" या लेखांवर लोकांनी जे आक्षेप घेतले आहेत (काही माझेही आहेत) त्यांचे निराकरण आपण केले आहे का? टीकेमध्ये तथ्य असल्याचे किंवा आपल्या विचारांच्या मांडणीमध्ये दोष असल्याचे कधी तरी मान्य केले आहे का? बरे आधीच्या लेखावरच्या शंकांचे निरसन होत नाही तोवर दुसरा लेख येतो त्यामध्ये तरी आधीच्या लेखांवरच्या प्रतिक्रियांची दखल घेतली असते का?

"सामान्यज्ञान"नावाच्या लेखावरून तुम्ही सर्वसामान्य माणसाला अगदी मूर्ख समजता असे वाटते. मान्य आहे की कॅपिलरी ऍक्शन वगैरे माहिती नसल्याने (काही) सामान्य लोकांनी त्यावर एक दोन दिवस विश्वास ठेवला, पण एकदा कारण कळल्यावर तो फुगा एक दोन दिवसात फुटला. आजघडीला गणपती दूध पितो यावर कोणी विश्वास ठेवत असेल असे वाटत नाही. त्यामुळे आता इतक्या वर्षांनी हा विषय उकरून बघा हे लोक किती मूर्ख होते असे सांगण्यात काय हशील आहे?

याची दुसरी बाजू अशी की "गणपती दूध पितो" हे असत्य आहे कॅपिलरी ऍक्शनमुळे तसे वाटते हे समजल्यावर हा प्रकार एक दोन दिवसात संपला. पण "फलज्योतिष थोतांड आहे" हा लोकांचा समज वि़ज्ञानवादी इतकी वर्षे आरडाओरडा करीत असूनही हजारो वर्षे कायम आहे याचे कारण फलज्योतिष थोतांड असल्याचे "कॅपिलरी ऍक्शन"च्या तोडीचे वै़ज्ञानिक स्पष्टीकरण अजूनही वि़ज्ञानवाद्याला देता आलेले नाही हे मान्य करणार का?

या मुद्द्यांवर जमले तर विचार करा इतकेच सांगतो.

विनायक

स्पष्टीकरण आहे

कार्यकारणभाव माहिती नसला तरी घटनेची वैज्ञानिक निरीक्षणे करता येतात (कार्यकारणभाव असे काहीच नाही असेही एक मत आहे). सच्छिद्र पदार्थाच्या मूर्तीने दूध शोषल्यास त्यात भारावून जाण्यासारखे काही नाही. त्याचप्रमाणे, अच्छिद्र मूर्तीच्या पायाशी मूळ दुधाच्या आकारमानाएवढे थारोळे जमते हे इम्पिरिकल निरीक्षण सर्वांनाच शक्य होते. (त्यामागचा कार्यकारणभाव कॅपिलरी ऍक्शन/वर्महोल/सुपरफ्लुईडिटी/क्वांटम टनेलिंग ते नंतर बघता येते.) लोकांनी तसे केले नाही म्हणून त्यांना दोष देणे योग्य आहे.
'फलज्योतिषाचे दावे खरे ठरतात' असे काही इम्पिरिकल निरीक्षणच नाही. तुम्हाला नक्की स्पष्टीकरण कशाचे हवे आहे?
'फलज्योतिषाचे दावे खरे वाटतात' या इम्पिरिकल निरीक्षणाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण असे की लोक वैयक्तिक अनुभवाला भाव देतात.

टिकणे हा निकष?

एखादी चुकीची समजूत दीर्घकाळ टिकून राहिली असेल तर त्यावरून चुकीच्या समजूतीस विज्ञान समजले जावे, असे तुमच्या प्रतिसादातून ध्वनित होत आहे. 'टिकून राहणे' हा निकष कितपत योग्य आहे? जातीव्यवस्था शतकानुशतके टिकून आहे म्हणजे तिला काही वैज्ञानिक आधार आहे असे समजावे काय?

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

जातीव्यवस्था आणि फलज्योतिष यांची तुलना चुकीची

जातीव्यवस्था शतकानुशतके टिकून आहे म्हणजे तिला काही वैज्ञानिक आधार आहे असे समजावे काय?

डॉ. आंबेडकरांनी जातीव्यवस्थेचे मूलगामी विश्लेषण करताना जातीव्यवस्थेला स्त्री-पुरुषांचे संख्याशास्त्रीय संतुलन राखण्यासाठीचा एक सिद्धांत कारणीभूत आहे असे म्हटले होते. तो लेख www.ambedkar.org या स्थळावर उपलब्ध आहे. दुर्दैवाने मला ऑफिसातून ते संकेतस्थळ ऍक्सेस करता येत नसल्याने नेमका दुवा देता येत नाही.

तो सिद्धांत आणि एकंदर जातीव्यवस्था ही विशिष्ट समूहासाठी अत्यंत अन्यायकारक आहे यात काहीच वाद नाही. जातीव्यवस्थेचे समर्थन करण्याचा यात हेतू नाही. पण जातीव्यवस्था टिकून राहण्याचे कारण काय आहे याचे स्पष्टीकरण ज्या दुव्यात दिले आहे तो दुवा येथे देणे एवढेच या प्रतिसादाचे प्रयोजन आहे.

जातीव्यवस्था आणि फलज्योतिष यांची तुलना त्यामुळे चुकीची आहे. जातीव्यवस्था ही जैव, भौतिक किंवा रसायनशास्त्र अशा वैज्ञानिक पायावर आधारलेली नाही तर संख्याशास्त्र या वैज्ञानिक पायावर आधारलेली आहे. जर संख्याशास्त्राला विज्ञान मानत असाल तर.

फलज्योतिषाची मूळ तत्त्वे वेगळी आहे. मी दोन तज्ज्ञ ज्योतिषांशी सहज चर्चा केल्या. त्यात विवेकवाद्यांचे काही आक्षेप मी त्यांच्यासमोर मांडले. आकाशातील दूरस्थ ग्रह व तारे हे निर्जीव गोळे आहेत. त्यांचा मानवी जीवनावर काहीही प्रभाव पडत नाही असा एक सामान्य आक्षेप फलज्योतिषावर नेहमी घेतला जातो. त्यावर त्यांचे मत असे होते की सूर्य (रवी) हा एक तारा आहे आणि चंद्र हा एक उपग्रह आहे. या फलज्योतिषातील घटकांचा मानवावर होणारा परिणाम जसा आपल्याला सामान्य डोळ्यांनी (लेमॅन्ज़ आईज़) दिसतो. आणि प्रत्येक व्यक्तीसाठी तो वेगवेगळा असतो हेही कळते. तसेच शनी, मंगळ यांपासूनही मानवावर काही परिणाम होत नसेल का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चूक काय?

जातीव्यवस्था आणि फलज्योतिष यांची तुलना त्यामुळे चुकीची आहे. जातीव्यवस्था ही जैव, भौतिक किंवा रसायनशास्त्र अशा वैज्ञानिक पायावर आधारलेली नाही तर संख्याशास्त्र या वैज्ञानिक पायावर आधारलेली आहे. जर संख्याशास्त्राला विज्ञान मानत असाल तर.

फलज्योतिषाची मूळ तत्त्वे वेगळी आहे. मी दोन तज्ज्ञ ज्योतिषांशी सहज चर्चा केल्या. त्यात विवेकवाद्यांचे काही आक्षेप मी त्यांच्यासमोर मांडले. आकाशातील दूरस्थ ग्रह व तारे हे निर्जीव गोळे आहेत. त्यांचा मानवी जीवनावर काहीही प्रभाव पडत नाही असा एक सामान्य आक्षेप फलज्योतिषावर नेहमी घेतला जातो. त्यावर त्यांचे मत असे होते की सूर्य (रवी) हा एक तारा आहे आणि चंद्र हा एक उपग्रह आहे. या फलज्योतिषातील घटकांचा मानवावर होणारा परिणाम जसा आपल्याला सामान्य डोळ्यांनी (लेमॅन्ज़ आईज़) दिसतो. आणि प्रत्येक व्यक्तीसाठी तो वेगवेगळा असतो हेही कळते. तसेच शनी, मंगळ यांपासूनही मानवावर काही परिणाम होत नसेल का?

प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा परिणाम काय?
जरी वेगवेगळा परिणाम होतो असे गृहीत धरले तरी शनी, मंगळ, राहू, केतु, यांचे फलज्योतिष टिकण्याचे ते कारण आहे का? म्हणजे वरीलप्रमाणे सगळा विचार करून लोक ज्योतिष्याकडे जातात का? की (ज्याप्रमाणे व्यक्तिप्रामाण्य मानून जातींच्या उच्चनीचतेवर विश्वास ठेवतात त्याप्रमाणे) व्यक्तिप्रामाण्य मानून ज्योतिष्याकडे जातात? शिवाय जातींचा उच्चनीचपणा गृहीत धरला तरी जातींना जी अन्यायकारक वागणूक मिळत असे त्याचे ते समर्थन होऊ शकत नाही. शोषक वागणुकीसाठी केवळ ग्रंथ/व्यक्तिप्रामाण्य हेच आधार होऊ शकतात. अशा प्रकारे जातिव्यवस्था टिकणे फलज्योतिष टिकण्यासारखेच दिसते.

ऍप्पलं आणि ऑरेंजी

जरी वेगवेगळा परिणाम होतो असे गृहीत धरले तरी शनी, मंगळ, राहू, केतु, यांचे फलज्योतिष टिकण्याचे ते कारण आहे का? म्हणजे वरीलप्रमाणे सगळा विचार करून लोक ज्योतिष्याकडे जातात का?

डॉक्टरकडे जाताना Clonazepam चे रासायनिक पृथःकरण काय आहे आणि त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत याचा विस्ताराने विचार करुन कोणताही रोगी जात नाही.

शिवाय जातींचा उच्चनीचपणा गृहीत धरला तरी जातींना जी अन्यायकारक वागणूक मिळत असे त्याचे ते समर्थन होऊ शकत नाही. शोषक वागणुकीसाठी केवळ ग्रंथ/व्यक्तिप्रामाण्य हेच आधार होऊ शकतात. अशा प्रकारे जातिव्यवस्था टिकणे फलज्योतिष टिकण्यासारखेच दिसते.

मी कुठेही जातीव्यवस्थेचे समर्थन केलेले नाही. मी स्वतः रुढअर्थाने उच्चवर्णीय जातीतील नाही. माझ्या जातीमुळे होणारा माझा अपमान किंवा हिणवले जाणे वगैरे जातीव्यवस्थेचे चटके मी अनेक ठिकाणी सोसलेले आहेत. जातीव्यवस्थेचे शोषक स्वरुप समर्थनीय आहे असे माझ्या आजपर्यंत लिहिलेल्या कुठल्याही प्रतिसादात दाखवावे. फलज्योतिष टिकणे व जातिव्यवस्था टिकणे हे वेगळे मुद्दे आहेत त्यांची गल्लत करु नये.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गैरसमज

डॉक्टरकडे जाताना Clonazepam चे रासायनिक पृथःकरण काय आहे आणि त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत याचा विस्ताराने विचार करुन कोणताही रोगी जात नाही.

फलज्योतिष टिकण्यामागे वैज्ञानिक पाया आहे असा आपला दावा होता (c.f. "जातीव्यवस्था आणि फलज्योतिष यांची तुलना त्यामुळे चुकीची आहे. जातीव्यवस्था ही जैव, भौतिक किंवा रसायनशास्त्र अशा वैज्ञानिक पायावर आधारलेली नाही..."), त्याला आक्षेप घेण्यासाठी मी प्रश्न विचारला आहे.

मी कुठेही जातीव्यवस्थेचे समर्थन केलेले नाही. मी स्वतः रुढअर्थाने उच्चवर्णीय जातीतील नाही. माझ्या जातीमुळे होणारा माझा अपमान किंवा हिणवले जाणे वगैरे जातीव्यवस्थेचे चटके मी अनेक ठिकाणी सोसलेले आहेत. जातीव्यवस्थेचे शोषक स्वरुप समर्थनीय आहे असे माझ्या आजपर्यंत लिहिलेल्या कुठल्याही प्रतिसादात दाखवावे. फलज्योतिष टिकणे व जातिव्यवस्था टिकणे हे वेगळे मुद्दे आहेत त्यांची गल्लत करु नये.

मी तसा आरोप केला नाही. जातिव्यवस्थेसाठी ग्रंथ/व्यक्तिप्रामाण्य आवश्यक असल्याचा मी दावा केला आहे.

फलज्योतिष टिकणे व जातिव्यवस्था टिकणे हे वेगळे मुद्दे आहेत त्यांची गल्लत करु नये.

तीच तर चर्चा चालू आहे.

हो

फलज्योतिष टिकण्यामागे वैज्ञानिक पाया आहे असा आपला दावा होता

हो. याची माझ्या वाचनात कारणे साधारणपणे खालीलप्रमाणे

१. फलज्योतिषाचे नियम धादांतवादाचे किंवा अनुमानधपक्याचे नसून गणिती सूत्राने बांधलेले आहेत.
२. इच्छा असल्यास कोणालाही फलज्योतिष शिकता येते. गणिताचे माफक ज्ञान, खगोलशास्त्राची माहिती, ग्रहांच्या गती यावर आधारित कुंडली मांडता येते.
३. प्रो. कृष्णमूर्ती यांच्या पद्धतीनुसार विंशोत्तरी महादशा मांडून प्रत्येक दशा, विदशा व त्यांचे स्वामी काढून विशिष्ट कालावधीचे भाव काढता येतात. या भावांकांवर आधारित नियम नोंदलेले आहेत त्याचा पडताळा घेणे सहजशक्य होते.

हे मला वैज्ञानिक प्रयोगाप्रमाणे वाटते. इथे जादूची कांडी फिरवून कुंडली तयार केली जात नाही किंवा पोपटाला एक चिठ्ठी उचलायला सांगितली जात नाही. मला रात्री वेळ मिळाल्यास कृष्णमूर्ती यांच्या पुस्तकातील नेमके संदर्भ देणे शक्य होईल. ही माहिती या पुस्तकाच्या पहिल्या वाचनात मला मिळाली आहे. त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गैरसमजाचे कारण

मला वाटले की "फलज्योतिष टिकण्यामागे वैज्ञानिक पाया आहे असा आपला दावा होता". म्हणजे असे की "फलज्योतिष खोटे असूनही का टिकले?" वगैरे. विनायक यांचा तसा युक्तिवाद होता, तुम्ही त्याचेच स्पष्टीकरण देत आहात असे मला वाटले. "फलज्योतिष खरे आहे" हा या उपधाग्याचा विषय नाही.

माझा दावा

मला वाटले की "फलज्योतिष टिकण्यामागे वैज्ञानिक पाया आहे असा आपला दावा होता". म्हणजे असे की "फलज्योतिष खोटे असूनही का टिकले?" वगैरे. विनायक यांचा तसा युक्तिवाद होता, तुम्ही त्याचेच स्पष्टीकरण देत आहात असे मला वाटले.

फलज्योतिष खोटे असूनही टिकले असा माझा दावा नक्की नाही. "फलज्योतिष थोतांड आहे" असा पुकारा विज्ञानवादी करीत असूनही ते टिकले असा आहे. खरा विषय यनावालां लेख "विवेकवादी लेखनवावर आक्षेप" असा आहे, यनावालांचे स्पष्टीकरण अपेक्षित आहे. फलज्योतिषावर मी लिहायला नको होते असे आता वाटते कारण तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे, इथे उगीच विषयांतर होते आहे.

विनायक

अंशत: सहमत

'फलज्योतिषाची सत्यता' या विषयावर जुने धागे आहेत. येथे ते विषयांतर नको हे मान्य.

तुमचा मूळ युक्तिवाद अशा प्रकारे होता:

  • "गणपती दूध पितो" हे असत्य आहे पण कॅपिलरी ऍक्शनमुळे तसे वाटते.
  • "फलज्योतिष खरे आहे" हे असत्य आहे पण क्षयज्ञ मुळे तसे वाटते.

'कॅपिलरी ऍक्शन' असे सांगितल्यामुळे लोकांना "गणपती दूध पीत नाही" हे पटले. क्षयज्ञचा शोध वैज्ञानिकांना न लागल्यामुळे "फलज्योतिष थोतांड आहे" असा पुकारा विज्ञानवादी करीत असूनही लोकांचा फलज्योतिषावरील विश्वास योग्य आहे.

  1. हा युक्तिवाद "फलज्योतिष खरे आहे" असा नाही.
  2. या युक्तिवादाला मी येथे प्रतिसाद दिला आहे.

परिणाम

>>त्यांचे मत असे होते की सूर्य (रवी) हा एक तारा आहे आणि चंद्र हा एक उपग्रह आहे. या फलज्योतिषातील घटकांचा मानवावर होणारा परिणाम जसा आपल्याला सामान्य डोळ्यांनी (लेमॅन्ज़ आईज़) दिसतो. आणि प्रत्येक व्यक्तीसाठी तो वेगवेगळा असतो हेही कळते.

असा सूर्य आणि चंद्र याम्चा कोणता वेगवेगळा परिणाम मानवावर झालेला सामान्य डोळ्यांनी दिसतो ते त्या ज्योतिषांना विचारून येथे सांगावे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

अवश्य


असा सूर्य आणि चंद्र याम्चा कोणता वेगवेगळा परिणाम मानवावर झालेला सामान्य डोळ्यांनी दिसतो ते त्या ज्योतिषांना विचारून येथे सांगावे.

माझ्या मते त्यांना उष्माघात वा निर्जलीकरणासारखे परिणाम अभिप्रेत असावेत. पुढील भेट झाल्यावर मी हे प्रश्न विस्ताराने विचारीन.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वेगवेगळे?

  1. ज्योतिष्यांचा युक्तिवाद असा होता की "जर क तर ख". मुळात जर "क असते" हेच त्यांनी तुमच्यासमोर सिद्ध केले नाही तर ख चे अस्तित्व कसे पटविले?
  2. उष्माघात वा निर्जलीकरण हे परिणाम वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळे होतात? चंद्राचा मानसिक रोगांवर परिणाम होत नाही हे आधीच नमूद करतो.

जातीव्यवस्था, फलज्योतिष

जातीव्यवस्था ही जैव, भौतिक किंवा रसायनशास्त्र अशा वैज्ञानिक पायावर आधारलेली नाही तर संख्याशास्त्र या वैज्ञानिक पायावर आधारलेली आहे.

संख्याशास्त्र वापरून जातीव्यवस्था निर्माण कशी झाली याविषयी जमल्यास वेगळा लेख लिहावा. मला तरी जातीव्यवस्थेच्या उगमाचे एकच कारण दिसते - शोषण. शोषण करणे जातीव्यवस्थेने शक्य होते. फलज्योतीष या थोतांडाने शतकानुशतके तेच काम केले आहे. (फलज्योतिषाच्या व्यवसायात एकाच जातीचे लोक प्रामुख्याने दिसतात.) एका वरच्या जातीत जन्माला आलेली व्यक्ति कनिष्ठ जातीत जन्माला आलेल्या व्यक्तिपेक्षा जैवशास्त्रीयदृष्ट्या सारखीच आहे. परंतु जातीव्यवस्था अशा वैज्ञानिक सत्यांना नाकारते. वैज्ञानिक दृष्ट्या थोतांड असलेल्या, मुद्दाम निर्माण केलेल्या गैरसमजांवर आधारीत व्यवस्था शतकानुशतके टिकते. (ती टिकण्यासाठी नक्कीच अनेक कारणे शोधता येतील, माझ्या प्रतिसादात त्या कारणांविषयी काहीच भाष्य नाही.) या टिकण्यामुळे जातीव्यवस्थेस वैज्ञानिक अधिष्ठान असल्याचे सिद्ध होत नाही. टिकणे हा निकष वैज्ञानिक सत्यासत्यता ठरवण्यासाठी वापरता येणार नाही. धनंजय, घाटपांडे प्रभृतींनी केलेल्या संख्याशास्त्रीय प्रयोगातून फलज्योतिषाचे निष्कर्ष थोतांड असल्याचे सिद्ध झाले आहे. (अर्थात ते तसे आहेत यासाठी संख्याशास्त्रीय प्रयोगांची आवश्यकता नाही, असे माझे मत आहे.)

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

आंबेडकरांचा लेख वाचावा

संख्याशास्त्र वापरून जातीव्यवस्था निर्माण कशी झाली याविषयी जमल्यास वेगळा लेख लिहावा.

जातीव्यवस्था ही संख्याशास्त्र वापरुन कशी निर्माण झाली असावी याबाबत आंबेडकरांनी विस्ताराने लेख लिहिला आहे. एका समूहात असलेल्या लग्नायोग्य स्त्री व पुरुषांच्या संख्येमध्ये असमानता निर्माण होऊ नये हे जातीव्यवस्था निर्माण होण्यामागचे मूळ कारण असावे असा त्यांचा कयास आहे. तो लेख आंबेडकरांच्याच शब्दात विस्ताराने वाचता येईल. द सिलेक्टेड वर्क ऑफ डॉ. आंबेडकर या पुस्तकात त्यांचे काही निवडक लेख समाविष्ट आहेत त्यात तो लेख वाचता येईल. हे माझे मत नसून आंबेडकरांचा कयास आहे.

मी प्रतिसादात स्पष्ट केले होते की जातीव्यवस्थेमागे जैव, रासायनिक किंवा भौतिकशास्त्र असे वैज्ञानिक कारण नाही. त्यामुळे

एका वरच्या जातीत जन्माला आलेली व्यक्ति कनिष्ठ जातीत जन्माला आलेल्या व्यक्तिपेक्षा जैवशास्त्रीयदृष्ट्या सारखीच आहे. परंतु जातीव्यवस्था अशा वैज्ञानिक सत्यांना नाकारते.

हे वाक्य अनावश्यक आहे.

जातीव्यवस्था निर्माण होण्यामागचे कारण आणि नंतर त्या व्यवस्थेचा झालेला गैरवापर हे दोन स्वतंत्र मुद्दे आहेत. आंबेडकरांनी संख्याशास्त्रीय कारणे देऊन जातीव्यवस्थेचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. आपण संख्याशास्त्राला विज्ञान मानत नसाल तर तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे.

धनंजय, घाटपांडे प्रभृतींनी केलेल्या संख्याशास्त्रीय प्रयोगातून फलज्योतिषाचे निष्कर्ष थोतांड असल्याचे सिद्ध झाले आहे.

धनंजय आणि घाटपांडे यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. मात्र मला स्वतःला फलज्योतिषाचे किमान ३ निष्कर्ष दोन वेगवेगळ्या ज्योतिषांकडून पडताळून पाहता आले आहेत. हे निष्कर्ष मोघम स्वरुपाचे ठोकताळे नसून दिनांक व वेळ काढण्याइतपत अचूक आले आहेत. हे निष्कर्ष पाहण्यापूर्वी मी स्वतः ज्योतिषाविषयी साशंक होतो. (व अजूनही आहे कारण माझ्या कुंडलीतच तसे लिहिले आहे.) धनंजय आणि घाटपांडे यांनी केलेल्या प्रयोगापेक्षा मला आलेल्या अनुभवावर विश्वास ठेवावा वाटतो व फलज्योतिषाची चिकित्सा व्हावी असे वाटते. त्यामुळे मी त्याला अजूनतरी थोतांड मानणार नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संख्याशास्त्राचा वापर

एका समूहात असलेल्या लग्नायोग्य स्त्री व पुरुषांच्या संख्येमध्ये असमानता निर्माण होऊ नये हे जातीव्यवस्था निर्माण होण्यामागचे मूळ कारण असावे ...

हे कारण असू शकेल. आंबेडकरांचा लेख जरूर वाचेन. हे कारण समजा खरे असले तरीही हे संख्याशास्त्रीय कारण नाही. उदा. माझ्या मूळ खेड्यात अनेक वर्षे दुष्काळ पडल्याने ६०-७० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. तेव्हा स्थलांतराचे कारण 'दुष्काळ पडणे' हे आहे. संख्याशास्त्राचा वापर माझ्या खेड्यातील कुठल्याही व्यक्तिने स्थलांतर करतांना जाणीवपूर्वक संख्याशास्त्राचा वापर केला नसावा. तसेच जातीव्यवस्थेच्या निर्मीतीमागे काही एक कारण असू शकेल पण जाणीवपूर्वक संख्याशास्त्राचा वापर करून जातीव्यवस्था आली नसावी. त्या अर्थाने जातीव्यवस्थेच्या उगमामागे संख्याशास्त्रीय कारण नाही पण संख्याशास्त्राचा वापर करून त्या कारणाचा शोध घेता येतो.

जातीव्यवस्था निर्माण होण्यामागचे कारण आणि नंतर त्या व्यवस्थेचा झालेला गैरवापर हे दोन स्वतंत्र मुद्दे आहेत.

ते तसेच आहे. टिकलेली आहे म्हणून जातीव्यवस्थेला वैज्ञानिक आधार आहे हे मान्य नाही. टिकण्याची कारणे आहेत. त्यांचे विश्लेषण करता येईल. पण टिकली आहे म्हणून जातीव्यवस्था वैज्ञानिक नाही.

फलज्योतिषही टिकले आहे असा श्री विनायक यांचा दावा आहे. टिकले आहे म्हणून त्यात तथ्य आहे असे त्यातुन प्रतित होते. फलज्योतिष टिकले आहे याची सामाजिक-मानसिक कारणे शोधता येतील. पण टिकून आहे म्हणून तथ्य नाही.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

हिअर यू गो.

टिकलेली आहे म्हणून जातीव्यवस्थेला वैज्ञानिक आधार आहे हे मान्य नाही. टिकण्याची कारणे आहेत. त्यांचे विश्लेषण करता येईल. पण टिकली आहे म्हणून जातीव्यवस्था वैज्ञानिक नाही.

फलज्योतिषही टिकले आहे असा श्री विनायक यांचा दावा आहे. टिकले आहे म्हणून त्यात तथ्य आहे असे त्यातुन प्रतित होते. फलज्योतिष टिकले आहे याची सामाजिक-मानसिक कारणे शोधता येतील. पण टिकून आहे म्हणून तथ्य नाही.

याचा अर्थ दोहोंमागची कारणे वेगवेगळी असावीत आणि त्यामुळेच जातीव्यवस्था व फलज्योतिष यांची तुलना चुकीची आहे असे माझे मत होते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

निकष

दोन्हीही टिकून आहेत. म्हणून तुलना संयुक्तिक आहे. जशी जातिव्यवस्था टिकून आहे म्हणून शास्त्रीय ठरत नाही तसेच फलज्योतिष टिकून आहे म्हणून शास्त्रीय ठरत नाही. केवळ टिकणे हा निकष असू शकत नाही यासाठी ही तुलना योग्यच आहे.

दोन्हींची टिकण्याची कारणे निराळी आहेत का? अर्थातच आहेत. पण प्रस्तुत चर्चेत तो दुय्यम मुद्दा आहे.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

मूळ मुद्दा

मूळ विषय फलज्योतिषावर सुरु असताना त्याचे टिकणे आणि जातिव्यवस्थेचे टिकणे यांचा अन्योन्यसंबंध आपण 'टिकणे' या एकाच शब्दावर लावला व त्यामुळे चर्चेला फाटे फुटले असे दिसते.

केवळ टिकणे हा योग्यतेचा निकष मानणे हे चूक आहे. पण 'का टिकते आहे' याची मीमांसा करणे योग्य. येथे जातिव्यवस्था वाईट आहे असे मानून 'ती टिकली' या न्यायाने 'फलज्योतिष टिकले' म्हणून तेही वाईट असे मानून त्याला झोडपण्याचा प्रयत्न योग्य नाही असा माझा मूळ मुद्दा होता.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हेत्वारोप

मूळ उपप्रतिसाद तुमच्या परिशीलनासाठी पुन्हा देत आहे.

एखादी चुकीची समजूत दीर्घकाळ टिकून राहिली असेल तर त्यावरून चुकीच्या समजूतीस विज्ञान समजले जावे, असे तुमच्या प्रतिसादातून ध्वनित होत आहे. 'टिकून राहणे' हा निकष कितपत योग्य आहे? जातीव्यवस्था शतकानुशतके टिकून आहे म्हणजे तिला काही वैज्ञानिक आधार आहे असे समजावे काय?

वरील विधानांत 'येथे जातिव्यवस्था वाईट आहे असे मानून 'ती टिकली' या न्यायाने 'फलज्योतिष टिकले' म्हणून तेही वाईट असे मानून त्याला झोडपण्याचा प्रयत्न योग्य नाही' या आरोपास कशी पुष्टी मिळते हे मला कळलेले नाही.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

उपचर्चेचा समारोप

केवळ टिकणे हा निकष योग्य नाही ह्यावर आपल्या दोघांची सहमती आहे.

ज्योतिषशास्त्र टिकणे आणि फलज्योतिष टिकणे या दोघांमागे 'टिकण्याची कारणे' वेगळी असावीत असा आपल्या दोघांचाही अंदाज आहे.

त्यावरुन आपण दोघेही एकच युक्तीवाद वेगवेगळ्या शब्दात करत आहोत असे मानून या उपचर्चेला पूर्णविराम द्यावा असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

योग्य युक्तिवाद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"दोन्हीही टिकून आहेत. म्हणून तुलना संयुक्तिक आहे. जशी जातिव्यवस्था टिकून आहे म्हणून शास्त्रीय ठरत नाही तसेच फलज्योतिष टिकून आहे म्हणून शास्त्रीय ठरत नाही. केवळ टिकणे हा निकष असू शकत नाही यासाठी ही तुलना योग्यच आहे."


श्री.अक्षय यांचा हा युक्तिवाद अगदी तर्कशुद्ध आहे. मला त्यात कोणतीही तार्किक चूक दिसत नाही.

संख्याशास्त्र?

जातीव्यवस्था ही जैव, भौतिक किंवा रसायनशास्त्र अशा वैज्ञानिक पायावर आधारलेली नाही तर संख्याशास्त्र या वैज्ञानिक पायावर आधारलेली आहे. जर संख्याशास्त्राला विज्ञान मानत असाल तर.

जातीव्यवस्था ही संख्याशास्त्रावर आधारलेली आहे म्हणजे काय?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

 
^ वर