विवेकवादी लेखनावर आक्षेप

विवेकवादी लेखनावर आक्षेप
इथे होणार्‍या काही विवेकवादी लेखनावर काही उपक्रमींचा पुढीलप्रमाणे आक्षेप आहे.( तो अगदी याच शब्दांत नसला तरी आशय साधारणपणे असा आहे.):-
स्वत:ला विज्ञानवादी म्हणवणारे काहीजण इथे लेखन करतात. आपण जे लिहिले आहे तेच सत्य. सर्वांनी तेच खरे मानले पाहिजे.त्याच्या विरुद्ध असेल ते सर्व खोटे.ते कोणीही खरे मानू नये, असा त्यांच्या लेखनाचा एकंदर सुर असतो.हे लेख वाचून त्रास होतो.असे लिहू नये.
या आक्षेपाचे आश्चर्य वाटते. असा अर्थ ध्वनित व्हावा असे कुठे कोणी काय लिहिले आहे?
खरे तर "माझेच खरे" अशी कोणाचीही अधिकारवाणी विज्ञानात चालत नाही.एखादा निसर्ग नियम नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकाने सांगितला म्हणून खरा आहे असे समजले जात नाही.तो नियम वस्तुनिष्ठ प्रयोगांनी सिद्ध व्हायला हवा;अथवा तर्कशुद्ध युक्तिवादाने पटवून द्यायला हवा; किंवा त्या नियमाचा सार्वत्रिक अनुभव यायला हवा तरच तो सत्य मानला जातो.विज्ञान, वैज्ञानिक, विज्ञानातील तत्त्वे यांना पूजनीय मानू नये अशी विज्ञानाची शिकवण असते.
धार्मिक क्षेत्रात अनेक गोष्टी पूज्य मानल्या जातात. त्यांचा अपमान झाला असे धर्मनिष्ठांना वाटले तर त्यांच्या भावना दुखावतात.उद्रेक होतो. विज्ञानात असे काही नसते.
पण ही झाली तत्त्वे. व्यक्तीच्या हातून प्रमाद घडू शकतात.चुका होऊ शकतात.म्हणून या विषयावरील अनेक लेख आणि प्रतिसाद वाचले. त्यांत आक्षेपात उल्लेखिलेल्या गोष्टी आढळल्या नाहीत.पण हे आक्षेप खोटे असण्याचे काहीच कारण नाही.
म्हणजे ते लेख वाचून आक्षेपकांना तसा अर्थ प्रतीत झाला असला पाहिजे.
असे का घडले? संबंधित लेख वाचून "....यात लिहिले आहे तेच सत्य आहे. सर्वांनी तेच खरे मानावे . या विरुद्ध असेल ते खोटे" असेच यात सांगितले आहे असे कांही वाचकांना का वाटले?
यावर विचार करता पुढील प्रमाणे सुचले.(ते खोटे असू शकेल हे प्रारंभीच सांगून टाकतो.)
विवेकवादी लेखन वस्तुनिष्ठ असते,व्यावहारिक, वास्तववादी असते.धादान्तवादावर(कॉमनसेन्सवर) आधारित असते. निसर्ग नियमांना धरून असते. तर्कसुसंगत तर असतेच असते.त्यामुळे बुद्धिमान व्यक्तींना ते अपरिहार्यपणे पटते. पण हे पटणे बौद्धिक पातळीवर असते.
मग इतके दिवस ज्या संकल्पना (पूर्वजन्म, पुनर्जन्म,संचित,परब्रह्म, आत्मा, स्वर्ग,मोक्ष इ.)खर्‍या मानल्या त्यांचे काय? बालपणी मोठ्या माणसांनी जे सांगितले,मोठेपणी प्रवचनात,व्याख्यानांत जे ऐकले,ग्रंथांत, संतसाहित्यात जे वाचले ते खोटे कसे असेल? सत्यच असले पाहिजे. असे भावनेला वाटते.खोटे आहे हे बुद्धीला पटत असूनही पूर्वसंस्कारांमुळे ते खरे मानण्याचा भावनेचा हट्ट म्हणजे श्रद्धा. भावनेला ही श्रद्धा सोडवत नाही.त्यामुळे बुद्धी आणि भावना यांत द्वंद्व निर्माण होते.त्याचा त्रास होतो. मग भावना बंड करून उठते."हे काय लिहिले आहे? हेच सत्य आणि असेच मानावे! आम्हांला शिकवणारे हे कोण? आम्ही हे मुळीच सत्य मानणार नाही"
खरे तर "हेच सत्य" असे लेखात मुळीच म्हटलेले नसते.ते सांगते बुद्धी. राग निघतो लेखावर) !! तर असा हा एकूण प्रकार असावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

इक्विलिब्रियम

आंबेडकरांचा हा लेख मी दोन वर्षांपूर्वी वाचला होता. तुम्ही हा प्रश्न गंभीरपणे विचारला आहे असे गृहित धरुन एक मुद्दा आठवला तो लिहितो.

अनेक समूह (टोळ्या) आहेत. एखाद्या समूहात सुरुवातीला विवाहयोग्य स्त्रियांची व पुरुषांची संख्या सुरुवातीला समान आहे. मात्र यापैकी एखाद्या स्त्रीने समूहाबाहेर विवाह केला तर एका विवाहयोग्य पुरुषाला एका स्त्रीची कमतरता जाणवते. त्यामुळे समूहाबाहेर विवाह करण्यास तिला बंदी. आणि हा समूह म्हणजेच जात.

त्याच अनुषंगाने विधवाविवाहास बंदी, एखाद्या विवाहयोग्य स्त्रीचे निधन झाल्यास, काऱ्या विवाहयोग्य पुरुषासाठी विवाहाची कशी सोय आहे, मात्र विधुर पुरुषांच्या विवाहास मान्यता अशा अनेक पैलूंचे आंबेडकर यांनी विस्ताराने विश्लेषण केले आहे.

हे सर्व विश्लेषण आकडेवारीवर आधारित असल्याने त्याला संख्याशास्त्र असा शब्द मी वापरला आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संख्याशात्र

हो प्रश्न गंभीरपणेच विचारला होता. तुम्ही जे स्पष्टीकरण दिले आहे ते संख्याशास्र नव्हे आकडेवारी आहे. आकडेवारी म्हणजे संख्याशास्त्र नव्हे. संख्याशास्त्र हे आकड्यांवर आधारित आहे पण म्हणजे जिथे जिथे आकडे आले ते सगळेच संख्याशास्त्र नव्हे. 'संख्याशास्त्र' हा शब्द डॉ. आंबेडकरांनी वापरला आहे का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

संख्याशास्त्र?

लेख मुळातून वाचायला हवा.

मूळ टोळ्यांमधून जाती निर्माण झाल्या हे मान्य.
पण जेव्हा विवाह ही पद्धत नव्हती तेव्हाही टोळीच्या अंतर्गतच लैंगिक व्यवहार होत. अजूनही प्राण्यांमध्ये टोळीच्या अंतर्गतच पुनरुत्पादन होते. काही प्राण्यांमध्ये एक नर आणि अनेक माद्या अशी टोळी असते तर काहींमध्ये अनेक नर आणि माद्यांची टोळी असते. माकडांमध्ये अनेक नर अनेक माद्या अशी टोळी असते आणि त्यांचे अंतर्गतच लैंगिक संबंध असतात. माणूस माकडसदृशच प्राणी असल्याने माणसाच्या टोळ्यांमध्येही अशीच अनेक नर-मादी सिस्टिम असावी. तीच एण्डोगामी जातिव्यवस्थेतही चालू राहिली. तिचा उगम असा माणूस हा प्राणी असण्यात आहे.

यात संख्याशास्त्र कुठे आहे असे वाटत नाही.

मात्र प्राण्यांमध्ये एका टोळीचा दुसर्‍या टोळीशी संपर्क जवळजवळ नसतो. जेव्हा तो येतो तो संघर्षात्मक असतो. माणसात मात्र तो संपर्क संस्कृतीच्या माध्यमातून येतो. त्यातही एण्डोगामी मात्र चालू राहते.

अशा रीतीने जात ही एक नैसर्गिक घटना असावी. (जातिव्यवस्था = जातींची उतरंड, एका जातीने दुसर्‍या जातीला दडपणे या मात्र नैसर्गिक गोष्टी नाहीत).

धर्मवाङ्मयात जरी वर्णांपासून (वर्णसंकराने किंवा कशाने) जाती बनल्या असे वर्णन असले तरी ते खरे नाही. कोकणस्थ आणि देशस्थ हे ब्राम्हण या जातीचे पडलेले तुकडे नसून 'कोकणस्थ ब्राह्मण' आणि 'देशस्थ ब्राह्मण' या स्वतंत्र जाती आहेत. त्याचमुळे कोकणस्थ आणि देशस्थ यांच्यात बेटीव्यवहार नव्हता.

जेव्हा व्यापार आणि भौगोलिक हालचाली होऊ लागल्या तेव्हा देशाटन करणार्‍या जातींना अधिक अनुभववैविध्यामुळे काही अधिक बौद्धिक आणि इतर ज्ञान प्राप्त असावे आणि त्यामुळे आपला प्रदेश कधीही न सोडलेल्या टोळ्यांवर वर्चस्व मिळवणे त्यांना शक्य झाले असावे.

हा शेवटचा परिच्छेद हे माझे स्वतःचे विचार आहेत त्यामुळे ते बरोबर असतीलच याची खात्री नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

नाही

>>याची दुसरी बाजू अशी की "गणपती दूध पितो" हे असत्य आहे कॅपिलरी ऍक्शनमुळे तसे वाटते हे समजल्यावर हा प्रकार एक दोन दिवसात संपला. पण "फलज्योतिष थोतांड आहे" हा लोकांचा समज वि़ज्ञानवादी इतकी वर्षे आरडाओरडा करीत असूनही हजारो वर्षे कायम आहे याचे कारण फलज्योतिष थोतांड असल्याचे "कॅपिलरी ऍक्शन"च्या तोडीचे वै़ज्ञानिक स्पष्टीकरण अजूनही वि़ज्ञानवाद्याला देता आलेले नाही हे मान्य करणार का?

तसे नसावे. गणपती दूध पितो ही त्याच विशिष्ट दिवशी नव्याने निर्माण झालेली समजूत होती. ती लगेच दूर होऊ शकली. जी समजूत शेकडो हजारो वर्षे आहे ती लवकर जात नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

आक्षेपांची वही

खूपदा चर्चेत बोलायचे ते राहून जाते. हे बहुदा अनवधानाने घडते. (किंवा कंटाळ्याने/हरल्याने).

यासाठी मला एक उपाय सुचतो. तो म्हणजे आक्षेपांची वही तयार करणे. ही वही खरडवही सारखी वैयक्तिक पण सार्वत्रिक वा एखाद्या धाग्यात तयार करता येईल.
समजा धाग्यात केली तर मूळ आक्षेपाच्या धाग्याचा दुवा त्यात असेल. या धाग्यात (आक्षेपवहीच्या) उत्तर लिहिण्यास बंदी असावी. उत्तर मूळ धाग्यात द्यावे. त्यानंतर इथली नोंद काढून टाकावी.

प्रमोद

गतानुगतिकता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विनायक लिहितातः"आजघडीला गणपती दूध पितो यावर कोणी विश्वास ठेवत असेल असे वाटत नाही. त्यामुळे आता इतक्या वर्षांनी हा विषय उकरून बघा हे लोक किती मूर्ख होते असे सांगण्यात काय हशील आहे?"

इथे लोकांना दूरान्वयाने सुद्धा मूर्ख म्हटलेले नाही.त्या दिवशी एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी गणपतीला दूध पाजण्यासाठी रांगा कशा लावल्या? ही गतानुगतिकता कुठून आली? असा मला प्रश्न पडला. त्यांतील अनेक लोकांना आज विचारले तर ते लज्जित होतात. आपले त्या दिवशीचे वर्तन त्यांनाच अनाकलनीय वाटते. या गतानुगतिकतेचे कारण मी माझ्यापरीने शोधायचा प्रयत्न केला आहे. हे वर्तन आपल्या
टोळीवाल्या पूर्वजांच्या जनुकातून आले आहे असे काहीसे म्हटले आहे. मात्र लोकांना मूर्ख म्हटलेलेच नाही.

लोकांचे जाऊ द्या हो

तुम्ही एवढे विवेकवादी, ज्ञानी, पुरोगामी वगैरे. पेशवाईच्या आधीपासून बालविवाहाची चाल सुरू होती याचा तुम्हाला विसर पडावा? आता तुम्हाला कोणी विचारले तर तुम्हीही लज्जित व्हाल. आपला हा विचारही टोळीवाल्या पूर्वजांच्या जनुकातून आला असे आम्ही म्हणावे का? उगीच काहीतरी बडबडायचे.

विनायक

आक्षेप

उत्तर व्यनी ने पाठवायचे का? :-)

असो उत्तर यनावालांना माहीत आहे. त्यांना भाग २ करायचा आहे म्हणून कदाचित लिहले नसावे पण क्रमशः तर लिहले नाही आहे. त्यामुळे मला ते उत्तर इथेच लिहणे सोपे झाले आहे.

उत्तर आहे - वाचकांचे पूर्वग्रहदुषीत विचार! आजच्या घडीचे जगातले सगळ्यात मोठे पोल्युशन! ते बाजुला केले की बघा मॅटर खतम!

आता पूर्वग्रह कसा ओळखावा, पूर्वग्रह बाजुला कसा काढून ठेवावा, बाजुला काढून ठेवलेल्या पूर्वग्रहापासुन उपयुक्त वस्तु कश्या बनवाव्यात, काही पूर्वग्रह - नवे व जुने, विवेकवाद सेल्फ हेल्फ मॅन्युअल, विवेकवादाने २१ दिवसात पृथ्वीचा स्वर्ग कसा बनवला इ इ यावर एक लेख नव्हे लेखमालाच लिहाच.

कंटाळा + टंकाळा

या वादाचा कंटाळा आणि टंकाळा आला आहे.
ज्याला जो विषय आवडतो/रुचतो/पटतो/इतरांना सांगावासा वाटतो त्यावर लिहावे व ज्यांना त्यात रुची आहे त्यांनी वाचावे. आवड्यास/नावडल्यास/पटल्यास/न पटल्यास/पुरवणी मते असल्यास/विरोध असल्यास तो मांडावा/मांडु नये.

यात काय व किती व कितीदा लिहावे यावर फारतर एकदा मत प्रदर्शित करावे. नाहितर सोडून द्यावे. प्रत्येक धागा वाचायची/आवडायची सक्ती थोडीच आहे?

लेखन जोपर्यंत उपक्रमाच्या धोरणात बसते तोपर्यंत काहिहि लिहिण्यास हरकत नसावी असे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

हेच

खरे तर "माझेच खरे" अशी कोणाचीही अधिकारवाणी विज्ञानात चालत नाही.एखादा निसर्ग नियम नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकाने सांगितला म्हणून खरा आहे असे समजले जात नाही.तो नियम वस्तुनिष्ठ प्रयोगांनी सिद्ध व्हायला हवा;अथवा तर्कशुद्ध युक्तिवादाने पटवून द्यायला हवा; किंवा त्या नियमाचा सार्वत्रिक अनुभव यायला हवा तरच तो सत्य मानला जातो.विज्ञान, वैज्ञानिक, विज्ञानातील तत्त्वे यांना पूजनीय मानू नये अशी विज्ञानाची शिकवण असते.

१००टक्के सहमत. हीच गोष्ट मी संधी मिळेल तेंव्हा सांगत असतो. "माझे सांगणे ऐकू नका, तुम्हाला काय पटते ते पहा" असेच माझे म्हणणे असते.
दुसरी गोष्ट; वैज्ञानिक सृष्टीचे कोणतेही नियम बनवू शकत नाहीत. निसर्गाने बनवलेले नियम ते समजून घेतात आणि सप्रयोग किंवा तर्कशुद्ध युक्तीवादाने सिद्ध झाल्यानंतर इतरांना सांगतात.
सुंदर लेख. विवेकवादी लेखनावर आक्षेप का घेतले जातात हे आता सर्वांना माहीत आहे.

उत्तम लेख

लेखातील विचारांशी पूर्ण सहमत आहे. निळ्या शाईत लिहिलेला शेवटचा परिच्छेद विशेष आवडला.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

 
^ वर