वडार समाज : इतिहास आणि संस्कृती

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात भटक्या विमुक्तांच्या सर्वच थरातून जागृती होतांना आपल्याला दिसते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे सामाजिक क्रांतीचा पाया रचला गेला आणि उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची जाणीव निर्माण झाली. आणि शिकलेली पिढी आपल्या हक्काबद्दल आपल्या समाजातील व्यवस्थेवर लिहायला लागली. अशा गावगाड्याचे चित्रण अनेकांनी केले. मात्र एकाच जातीबद्दल संदर्भासहीत अभ्यासपूर्ण लेखन 'वडार समाज इतिहास आणि संस्कृती' या भीमराव चव्हाण यांच्या पुस्तकात वाचायला मिळते.

एकूण नऊ प्रकरणे असलेल्या या पुस्तकात 'वडार समाजाच्या इतिहासापासून ते वडार समाज घटनात्मक सवलीतीपासून कसा वंचित आहे’ इथपर्यंत मांडणी या पुस्तकात केलेली दिसते.

महाराष्ट्रात गावकुसाबाहेर पाल टाकून राहणा-या समाजापैकी एक म्हणजे 'वडार’ समाज. वडार समाजाचे मूळ स्थान ओरिसा [ओडिसा]. ओडू राजामुळे उत्कल [ओडू] देश म्हणूनही तो ओळखल्या जातो. वडार समाजाचा मुख्य व्यवसाय खाणकाम, मातीचे काम, वाळू-दगड आणि बांधकामास साहित्य पुरविणे. विहिरी खोदणे, इत्यादी. वडार जातीच्या लोकांमधे व्यवसायावरुन पोटभेद आहेत गाडीवडार, मातीवडार, पाथरवट इत्यादी. वडार समाजाची भाषा तेलगुमिश्रित अशी आहे. काही ठिकाणी ओडियाही बोलल्या जाते. अशी बरीच माहिती सदरील पुस्तकात वाचायला मिळते. त्याचबरोबर दगड फोडून वरवंटे, पाटे बनविणा-या या समाजाकडे हा व्यवसाय कसा आला त्याबद्दलही एक आख्यायिका वाचायला मिळाली.

'' नाशिक येथील पंचवटीमधे सीता एका शिळेवर बसून अंघोळ करीत असतांना एका वडाराने चोरुन पाहिले. अंघोळ करुन गेल्यानंतर या वडाराने त्या शिळेचा हातोडीने दोन तुकडे केले. त्यातील एक दगड तो वडार घेऊन गेला. त्यानंतर सितेने येऊन पाहिले तेव्हा शिळा फुटल्याचे दिसले. त्याचा राग येऊन सीतेने शाप दिला की, यापुढे तू दगड फोडत राहशील. तेव्हापासून आजपर्यंत वडाराचे वंशज दगड फोडण्याचे काम करीत आहेत ” पृ.क्र.१९७

अशा अनेक कथा, आख्यायिका, याची तपशिलवार माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. वडार समाजाचा इतिहास, ओड्र मूळ क्षत्रिय कसे आहेत, वडार शब्दाची उत्पत्ती, वडार समाजाच्या उपजाती, संस्कृती, ब्रिटीशांनी लादलेला गुन्हेगारी कायदा, लोकसाहित्य व लोकगीते, बोलीभाषा व लोकसमजुती पुस्तकात वाचायला मिळतात.

भारतातील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारा 'वडार' समाज आजही फारसा बदललेला दिसत नाही. त्याची भाषा, लोकगीते, रुढी-परंपरा, राहणीमान, वेशभूषा, यात फारसा बदल झालेला दिसत नाही. अजूनही या समाजामधे बदलांची मानसिकता दिसून येत नाही.

'वडार' समाज शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे हालअपेष्टा पाचवीलाच पुजलेली. सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय मागासलेपण आजही या समाजातून दिसून येते. सामाजिक चळवळ आणि घटनेने दिलेले अधिकार यावरही चर्चा 'वडार समाज घटनात्मक सवलीपासून वंचित’ या प्रकरणात दिसते.

'वडार' समाजाचे वास्तव चित्रण, वडारांच्या समस्या, आणि वडार समाजाबद्दल नवनवीन माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लेखकाने केलेले आवाहन या पुस्तकातून वाचायला मिळते. समाजशास्त्रीय अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल असे वाटते.

'वडार समाज
इतिहास आणि संस्कृती'
लेखक : भीमराव व्यंकप्पा चव्हाण
स्वाभिमान प्रकाशन, औरंगाबाद.
मूल्य २५०/- रुपये.

Comments

धन्यवाद

या पुस्तक परिचयाबद्दल आभार्...उपेक्षितांचे जीवन् आणि साहित्य या दोहोंचे चित्रण जालावर होणे अत्यंत् आवश्यक आहे..सध्यातरी जालावर पांढरपेशांचाच ताबा असल्याचे दिसते

सहमत आहे

सहमत आहे,
पण त्यातही अनेक विवाद्य मुद्दे आहेत...
वेळ मिळेल आणि जमेल तसा या चर्चेत भाग घेईन.

पण हा पूर्ण वेगळा विषय आहे या धाग्याला हा जोडायला नको असे वाटले.

आपला
गुंडोपंत

वा

वा!!

एका अनवट पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
पुस्तकातील माहिती रोच़क वाटते आहे.

नक्की मिळवून वाचेन.

लेखक : भीमराव व्यंकप्पा चव्हाण
स्वाभिमान प्रकाशन, औरंगाबाद.
मूल्य २५०/- रुपये.

ही फार महत्त्वाची माहिती तुम्ही दर वेळी आवर्जून देता हे उल्लेखनीय आहे.
यामुळे अभ्यासूंना पुस्तक कुठे मिळेल हे विचारावे लागत नाही.

आपला
गुंडोपंत

+१

चांगला पुस्तक परीचय आणि नवीन माहीती.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

उत्तम

काही वर्षांपूर्वी (नेमके आठवत नाही) चित्रलेखा किंवा लोकप्रभा या पाक्षिकात महाराष्ट्रातील विविध समाजांची ओळख, इतिहास, सामाजिक स्थिती याविषयी मालिका प्रसिद्ध होत असे तिची आठवण झाली.

अवांतरः -

महाराष्ट्रात गावकुसाबाहेर पाल टाकून राहणा-या समाजापैकी एक म्हणजे 'वडार’ समाज.

पालं असे हवे का? पाल म्हटल्याने अर्थ बदलतो असे वाटते. :-)

सध्या....

सकाळच्या सप्तरंग पुरवणीत विविध समाजांमध्ये बाळाच्या जन्माचे स्वागत कसे केले जाते याबद्दल रंजक मालिका चालू आहे.

दुवा

बाकी, श्री. बिरुटे, पुस्तक परिचयाबद्दल आभार!

एक आणि अनेक

जागेनिहाय बदल होऊ शकेल, पण 'पाल' हे एकवचन तर 'पालं' किंवा (लेखी भाषेत, आणि म्हणून वापरात नसलेलं) 'पाले' हे अनेकवचन. भिंतीवरची पाल वेगळी. गावकुसाबाहेर पाल टाकणं वेगळं.
चांगला परिचय!

अनुस्वाराचे महत्त्व !

अनुस्वाराचें महत्त्व अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद. हें आपण सर्वांनीं १९६२ अगोदर केलें असतें तर आपलें नांव-गांव सुरक्षित राहिलें असतें. अजूनही वेळ गेलेली नाहीं; अर्थभेदी अनुस्वार पुनः स्थापित करावेत.
बाबा गेला आणि बाबा गेलां यांतील फरक विशद करण्यासाठी 'कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेलां'चे उदाहरण मीं नुकतेंच उपक्रमावर कोठेंतरी दिलें आहे. --वाचक्नवी

अकारान्त नपुंसकलिंगी

'पाले' असा शब्दप्रयोग चुकीचा होईल काय? (झाड -> झाडे, टरफल->टरफले, या धर्तीवर...)

माहितीबद्दल आभार

पुस्तकाच्या ओळखीबद्द्ल आभार.

चांगली ओळख

वर एका प्रतिसादात आल्याप्रमाणे जर आंतरजाल हे फक्त "पांढरपेश्यांचा ताबा" असले तरी किमान अश्या विषयाशी संबधीत काम करणारे कार्यकर्ते, संस्थाचालक व असे पुस्तक इ लेखक तरी या विषयवार चर्चा करायला मराठी संस्थळावर यावेत असे मला वाटते.

एक कल्पना उपक्रमींना सुचवावीशी वाटते की अशी पुस्तक ओळख दिल्यानंतर त्या पुस्तकात लेखकाचा फोन, इ-पत्ता असल्यास त्यांना या लेखाचा व उपक्रमाचा दुवा देउन आमंत्रण द्यावे. प्रकाशकाका बरेचदा त्यांच्यापरीन हे काम करत असतातच. तरी बिरुटेसर तुम्ही जमल्यास श्री चव्हाण यांना जरुर उपक्रमावर बोलवा अशी विनंती.

हे पुस्तक कधी (साल) लिहले आहे? व त्यातला विदा कुठल्या काळातल्या सर्वेक्षणावर् आधारीत आहे?

>महाराष्ट्रात गावकुसाबाहेर पाल टाकून राहणा-या समाजापैकी एक म्हणजे 'वडार’ समाज

आजही गावकुसाबाहेर अजुन कोण कोण रहाते? गेल्या १० ते १५ वर्षात यातल्या समाजात, त्यांच्या स्थलांतरात, आर्थीक व राजकीय कितपत बदल आले आहेत? याविषयासंबधी, पुस्तकासंबधी जे प्रश्न असतात त्याची उत्तरे द्यायला लेखक स्व:ता येत असतील तर अजुन भरीव चर्चा व त्या निमित्ताने मराठी आंतरजालाची वाढ होईल असे वाटते.

+१

असेच म्हणते.

सहजराव खूप प्रश्न विचारतात बॉ...!

आंतरजाल हे फक्त "पांढरपेश्यांचा ताबा"......
सहजराव, या विषयाला स्वतंत्र काथ्याकुटाला घ्या राव....! :)

बाय द वे, या पुस्तकाचा लेखक हा काही संशोधक नाही, तर ते एका कार्यकर्त्याचं पुस्तक आहे. तेव्हा चळवळीतून आलेल्या एका व्यक्तीने आपल्या समाजाविषयी असलेल्या तळमळीने लिहिलेले ते पुस्तक आहे. लेखक आमच्या औरंगाबादच्या विद्यापीठात 'सहाय्यक ग्रंथपाल' असल्यामुळे 'समाज' पुस्तकातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ' उपलाणी' हे दुसरं पुस्तक भटक्यांच्या जीवनावर त्यांनी नुकतेच लिहिलं आहे.

सहजराव, त्यांनी उपक्रमवर लिहावं अशी विनंती मी त्यांना जरुर करीन...!

>>हे पुस्तक कधी (साल) लिहले आहे? व त्यातला विदा कुठल्या काळातल्या सर्वेक्षणावर् आधारीत आहे?

हे पुस्तक २००७ साली प्रकाशित झाले आहे. भिमराव चव्हाण हे स्वतः वडार समाजाचे असल्यामुळे त्यांनी आपल्या समाज बांधवांकडून माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, प्रांतात भटकून अनेक विषयांचे संकलन केले. या पुस्तकात मौखिक स्वरुपातील असलेला सांस्कृतिक ठेवा त्यांनी वाचकांसमोर मांडला आहे. हे लेखन करीत असतांना त्यांनी दिलेली संदर्भ सुची पाहता त्यांनी भटक्या विमुक्तांच्या प्रकाशित लेखनातील संदर्भ घेतले आहेत तसे इतरही संदर्भ घेतले आहेत. बावीस मराठी पुस्तके, सहा नियतकालिके आणि इंग्रजी सत्तावीस पुस्तके संदर्भासाठी घेतली आहेत.

'वडार समाजाची जनगणना स्वतंत्ररित्या करण्यात यावी' अशी मागणी परिशिष्टात वाचायला मिळते.

सहजराव, १८७१ च्या 'गुन्हेगारी कायद्यात' हा समाज होता. आणि हा कायदा रद्द होता होता १९६० उजाडले. त्यामुळे या समाजाने सर्वच क्षेत्रात खूप प्रगती केली असेल असे वाटत नाही. अर्थात थोडेफार शिक्षणाने आता बदल होत आहेत ही गोष्ट खरी आहे. त्यांची पिढी शिकतांना दिसते.

लेखकांनी संकेतस्थळावर येऊन लिहावे हा आपला विचार चांगलाच आहे. सर्वच क्षेत्रातील लोक मराठी संकेतस्थळावर यायला हवीत. पण त्याला अजून बराच वेळ लागेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

संक्षिप्त पण चांगला पुस्तकपरिचय

श्री बिरुटे, ओळख छानच आहे पण त्रोटक वाटली. 'डुकरे पकडणारे' अशी ओळख निर्माण होण्याचे काय कारण असावे? पुस्तकातून या व अशासारख्या प्रश्नांवर असलेल्या माहितीवर लिहावे, ही विनंती. धन्यवाद.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

+१

सहमत आहे. उत्तम पुस्तकपरिचय, मात्र अधिक विस्ताराने वाचायला आवडलं असतं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

असेच म्हणतो.

उत्तम पुस्तकपरिचय.

दगडांपासून...

'डुकरे पकडणारे' अशी ओळख निर्माण होण्याचे काय कारण असावे?
कुत्री, गाढव, डुकरे, कोंबड्या, यांना वडार समाजाने संपत्ती व शिदोरी मानली आहे. डुकरे वाढविण्यासाठी त्यांना फारसा खर्च करावा लागत नाही. गटार, कचर्‍यावर पडलेले खाद्य, इत्यादीवर ते जगतात. मटनही खायला मिळते आणि विकले तर पैसेही मिळतात. त्यांची स्पेशल अशी डुकरे पकडणारी ओळख त्यात दिसत नाही. जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी दगडापासून हत्यारे व साधने बनविणे ही त्यांची ओळख पुस्तकात वाचायला मिळते.

'' वड्ड किंवा ओड्ड म्हणजे बांध, बंधारा असा तेलगू अर्थ आहे. पूर्वी हा समाज बांध, बंधारे, घालण्याचे काम करीत असे म्हणून वड्ड व वड्डू असे नाव पडले. कालांतराने वड्ड वड्डू शब्दापासून वडार, वड्ड म्हणून ओळखले जाऊ लागले'' [पृ. ३७]

पण, डुकरे पकडणारे ते 'वडार' असा एक समज आहेच. पुस्तक वाचण्यापूर्वी माझाही तोच समज होता.
असो, या शिवाय अजून यावर काही माहिती मिळाली तर टंकीन.

-दिलीप बिरुटे

चोळी

वडारणी चोळी घालत नाही. सीतेने कांचनमृगाचे कातड्याची चोळी करण्याची मनीषा बाळगली आन पुढचे रामायण झाले. त्याच्या पेक्षा ती भानगडच नको. नकोच ती चोळी म्हणुन वडारणी चोळी घालत नाहीत अशी एक समजुत आहे.
प्रकाश घाटपांडे

करेक्ट....!

>>सीतेने कांचनमृगाचे कातड्याची चोळी करण्याची मनीषा बाळगली आन पुढचे रामायण झाले. त्याच्या पेक्षा ती भानगडच नको.

करेक्ट..! 'वडार समाजातील स्त्रिया स्वत:ला सीतेचे वंशज समजतात' पण लेखक म्हणतो की, याला काही ऐतिहासिक आधार नाही.

-दिलीप बिरुटे

इथेही ऐतिहासिक!

त्याला लेखकाच्या प्रमाणपत्राची गरज आहे काय?
केवळ स्त्रिया सीतेच्या वंशज असणे जीवशास्त्रीय दृष्ट्या हास्यास्पद आहे. त्या स्त्रियांची मुलगेही सीतेचे वंशज होतील की! पुरुष आणि स्त्रिया स्वत:ला राम-सीतेचे वंशज मानत असतील तर वेगळी गोष्ट आहे.

चोळी

वडार पुरुषदेखील चोळी घालत नाहीत असा माझा समज आहे. तसं असेल तर वडार समाज या विशिष्ट बाबतीत तर्कसंगत वागतो असंच म्हणावं लागेल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सहमत

वडार समाजातील स्त्री, पुरुष व इतरेजन चोळ्या घालत नाहीत या निरीक्षणाशी सहमत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तर्क(ट)संगत

ROTFL
'इतर जातीतील पुरुषही चोळी घालत नाहीत' या निरीक्षणावरून सर्वच जातींतील पुरुष स्वत:ला सीतेचे वंशज मानत असल्याचा निष्कर्षसुद्धा काढता येतो.

वंशज कसे काय?

सीतेने चोळीसाठी हट्ट धरला होता, तर वडार स्त्रीया चोळी घालत नाहीत. ही वंशजनिष्कर्ष काढण्यातील तर्कविसंगती नाही काय?

फार फार तर ज्या चोळीसाठी रामायण झाले तसले रामायण होऊ नये म्हणून वडार स्र्त्रीया चोळी घालत नाहीत हा निष्कर्ष काढता येईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

योग्य तर्क

'वडार समाजातील स्त्रिया स्वत:ला सीतेचे वंशज समजतात' म्हणून त्या चोळी घालत नाहीत असा मूळ मुद्दा होता.
त्या चोळी घालत नाहीत त्यावरून त्या सीतेच्या वंशज ठरतात असं कोणी म्हटलं नाही.
तुम्ही वडार पुरुष हेदेखील त्यांचेच वंशज असल्याचं म्हटलं म्हणून मी म्हटलं वडार पुरुषही चोळी घालत नाहीत. (म्हणजे चोळी न घालण्याची परंपरा मोडत नाहीत)

दुसरं उदाहरण देतो. समजा माझ्या खापरपणजोबांचा त्यांच्या मिशांवरून अपमान झाला, तेव्हापासून आमच्या कुलातले पुरुष मिशा ठेवत नाहीत. आता त्यांच्या मुली, नाती, पणती यासुद्धा त्यांच्या वंशातल्याच - तर त्याही मिशा ठेवत नाहीत हे व्हॅक्युअसली ट्रू आहे. पण मिशा न ठेवणारे अमेरिकेतले जवळपास सर्व पुरुष आमच्या कुळातले होत नाहीत. ते मिशा न ठेवण्याची कारणं स्वतंत्र असू शकतील.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

कसा?

"वडार पुरुषही चोळी घालत नाहीत" या विधानामागे 'परंपरा न मोडणे(=वंशज समजणे)' हा उद्देश तुम्ही सुचविला. म्हणजे "वडार पुरुष चोळी घालत नाहीत त्यावरून तेही स्वतःला सीतेचे वंशज समजतात" असा तुमचा दावा होता. तो निराधार असल्यामुळे मी एक पीजे मारला.

माझा मूळ मुद्दा एवढाच होता की वडार पुरुष हेदेखील राम-सीतेचे वंशज असल्याचा दावा केला नाही तर त्यांच्या स्त्रियांचा सीतेच्या वंशज (अंश/अवतार असल्याचा दावा केल्यास गोष्ट वेगळी) असल्याचा दावा हास्यास्पद आहे.

दुरुस्ती

वडार समाजातील लोक स्वतःला (राम)सीतेचे वंशज मानत असल्याने त्यांच्या स्त्रिया चोळी घालत नाहीत. असे मूळ विधान असायला हवे होते.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

चांगला परिचय

वेगळ्या पुस्तकाचा चांगला परिचय. प्रगतीचे तथाकथित वारे अशा अनेक लोकांपासून अद्याप दूरच आहे. स्वतंत्र भारताची कदाचित ही सर्वात भीषण शोकांतिका.
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का

पुस्तक परिचय आवडला

पुस्तक परिचय आवडला

+१

असेच म्हणतो.

-राजीव.

रामनाथ चव्हाण

छान पुस्तक परिचय. मला वाटतं, रामनाथ चव्हाण यांचेही याच विषयावर पुस्तक आहे. आत्ता त्याचे नाव आठवत नाही. आठवल्यावर नक्की देईन. तेही असेच वाचनीय आणि माहितीपूर्ण पुस्तक आहे. बाकी, 'चोळी'च्या मुद्यावरून रावसाहेब कसबेंच्या पुस्तकातील एक किस्सा आठवला. राम मंदिराचे आंदोलन तेव्हा जोरात सुरू होते. कसबेंच्या घराशेजारी काही वडार मजूर काम करत होते. जवळून अडवानींची रथयात्रा जाणार होती. गर्दी जमली होती. वडार जोडप्याने विचारले, हे काय चाललेय? त्यावेळी कसबेंनी त्यांना रामाच्या मंदिरासाठी हे निघालेत आयोध्येला असे सांगितले. त्यावर त्या वडार महिलेने फण्णकन, उद्गार काढले, यांना काय माहित रामासाठी काय त्याग करावा लागतो. तो आम्ही केलाय. आमच्या चोळ्या सीतेच्या हरणाच्या कातडीच्या चोळी प्रेमासाठी आम्ही सोडून दिल्यात.

(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !

जाती जमाती / रामनाथ चव्हाण

'जाती जमाती' हे रामनाथ चव्हाण यांचे पुस्तक आहे. त्यात 'वडार' समाजाबद्दल माहिती नाही. पण इतर अनेक जाती जमातींचे ओळख करुन देणारे तेही एक चांगले पुस्तक आहे. जिज्ञासूंनी त्याचा आस्वाद घ्यावा.

जाती जमाती
लेखक : रामनाथ चव्हाण
प्रकाशक: अनिलकुमार मेहता,
मेहता पब्लीशिंग हाऊस,
१२१६, सदाशिव पेठ,
पुणे. ४११०३०
मूल्य ६० रुपये.
प्रथमावृत्ती : एप्रील १९८९.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच एक..

पारधी समाजा विषयी असेच एक पुस्तक वाचले होते, बहुतेक गिरीश प्रभुणे लेखक असावेत. बरेच दिवस झाले वाचून, नक्की आठवत नाही.

वडारवाडीबद्दल आणखी

छान पुस्तक परिचय. ह्यानिमित्ताने वडार जातीचा शोध घेतल्यावर रत्ना एन.राव ह्यांच्या "सोशल ओर्गनायज़ेशन इन ऍन इंडियन स्लम: स्टडी ऑफ़ अ कास्ट स्लम" हे पुस्तक गवसले. अवश्य वाचावे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर