काही तरी भलतेच!

फोर्थ डायमेन्शन 47

काही तरी भलतेच!

"माणूस नेमका असा का वागतो या प्रश्नाचे उत्तर धर्म, संस्कृती, संस्कार, रूढी, परंपरा इत्यादीत शोधण्यापेक्षा उत्क्रांतीत शोधणे योग्य ठरेल." प्राध्यापक साळुंखे तुडुंब भरलेल्या क्लासला उद्देशून सांगत होते. "माणसाच्या चित्रविचित्र वागणुकीची मुळं उत्क्रांतीच्या इतिहासात नक्कीच सापडतील. त्याच्या प्रत्येक वागणुकीच्या छटांचा संदर्भ उत्क्रांतीच्या इतिहासात दडलेला आहे." क्लासवर नजर टाकत ते पुढे म्हणाले "कुणाला यासंबंधी चाचणी कराविशी वाटत असल्यास त्यांनी हात वर करावे."
एक हात वर आला. "सर, काही जण बेस बॉल कॅप उलटे घालतात. त्यातून काय अर्थबोध होऊ शकतो?"
एका मिनटाचीसुद्धा उसंत न घेता सर म्हणाले, "याला कदाचित दोन कारणं असू शकतील. एक, मुळात बेसबॉलची कॅप आपल्याला उन्हाच्या त्रासापासून वाचवण्यासाठी घातली जाते. परंतु तीच उलटी घातल्यास तरुणींवर इम्प्रेशन मारणे सुलभ होत असावे. प्रत्येक तरूण तरुणीला आकर्षित करण्यासाठी काही ना काही क्लृप्त्या वापरत असतो. आपण इतर स्पर्धकाहून वेगळे आहोत हे ठसवण्याचा हा प्रयत्न असावा. दुसरे कारण म्हणजे कॅप उलटी घालून मला अशा उन्हापासून संरक्षण करून घेण्याची गरज नाही असे त्याला सुचवायचे असते. मी स्वत: सशक्त असून कुणीही माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही हा मेसेज तो पोचवत असतो. माणूस समाजजीवी आहे. गटा-गटात राहणारा आहे. परंतु कॅप उलटी घालून आपण इतरापेक्षा श्रेष्ठ आहोत हेच जणू त्याला सुचवायचे असते."
------------------ ---------------------------- -----------------------
गेल्या काही दशकात उत्क्रांत मानसशास्त्र (evolutionary psychology) हा विषय बहुचर्चित ठरत आहे. याचबरोबर वादाचा विषय म्हणूनही याकडे तज्ञ व अभ्यासक नेहमीच बघत आहेत. यासंबंधात दोन विरुद्ध टोकाची मतं ऐकायला मिळत असतात. काही तज्ञांना या अभ्यासामधून माणूस प्राण्याचा संपूर्ण नकाशा आपल्यासमोर उभा राहील व त्यातून या प्राण्याच्या वैचित्र्यपूर्ण वैविध्याची जाण होईल असे वाटते. याउलट इतर काही तज्ञांना या अभ्यासामधून काढलेले बहुतेक निष्कर्ष थातुर-मातुर, उथळ, अवैज्ञानिक व वेळ मारून नेणाऱ्या भाकडकथा आहेत असे वाटते. मतभेद कितीही असले तरी माणूस हा उत्क्रांत होत आलेला प्राणी असून त्याच्या प्रत्येक अंग-प्रत्यंगाच्या रचनेला भोवतालची परिस्थिती कारणीभूत असून त्याला अत्यंत प्रतीकूल परिस्थितीतसुद्धा तगून राहण्यासाठी त्यामुळे मदत मिळत आहे याबद्दल मात्र त्यांच्यात एकमत आहे. शरीराप्रमाणे त्याच्या मानसिक जडण-घडणीलासुद्धा उत्क्रांतीच कारणीभूत आहे असे बहुतेकांचे मत आहे.
अत्यंत उत्कटतेने बाजू मांडणाऱ्या उत्क्रांत मानसतज्ञांच्या मते माणसाच्या अगदी बारीक-सारीक वर्तणुकीचे मूळ उत्क्रांतीत नक्कीच सापडते. कारण या वर्तनातूनच त्याला निवडीचा फायदा मिळाला आहे. हे वर्तनच त्याच्या तगण्याच्या लढाईत मदत करत आलेली आहे. मूल का रडते? मूल विशिष्ट खेळणीच का हाताळते? अनोळखी चेहऱ्याकडे जास्त वेळ का म्हणून निरखून बघते? मुलींच्या तुलनेने मुलं जास्त उनाड का असतात? मुली भातुकलीच्या खेळात जास्त का रंगतात? मुलं मैदानी खेळात इतका उत्साह का दाखवतात? खेळाच्या मैदानावर खेळाडू हमरी-तुमरीवर का येतात? वयात येत असलेल्या मुली सौंदर्यप्रसाधनं का वापरू लागतात? भावाभावामध्ये वैर का असते? एकमेकाचे खून करण्यापर्यंत त्यांची मजल का जाते? वरवरून पाहता विजोड वाटणाऱ्या नवरा-बायकोंचे वैवाहिक जीवन दीर्घ काळ कसे टिकते? काही बायका भांडकुदळ का असतात? काही पुरुष इतके लाळघोटेपणा कसे काय करू शकतात? तरुण-तरुणी पहिल्याच भेटीत प्रेमात कसे काय पडू शकतात? हिंसेचे आकर्षण का असते? .... असे एक ना दोन, हजारो प्रश्नांची उत्तरं उत्क्रांतीत शोधणे शक्य आहे, असे ठामपणे हे तज्ञ दावा करत असतात.
हे सर्व खरे मानल्यास स्वार्थी जनुकांच्या लहरीनुसार आपले वागणे असेल. आपण केवळ नाचणाऱ्या बाहुल्या असून खेळवणारे सूत्रधार जनुक आहेत. आपल्या प्रत्येक आवडी-निवडीबद्दल, वर्तणुकीतील छोट्यामोठ्या छटांबद्दल उत्क्रांतीत कार्य-कारणभाव शोधता येईल. साळुंखे सराप्रमाणे ताबडतोब विश्लेषण करता येणे शक्य नसले तरी थोड्याशा अभ्यासानंतर प्रत्येक वर्तनामागील कारणभाव शोधणे जड जाणार नाही. थोडा जास्त वेळ लागला तरी उत्तर खचितपणे सापडेल.
परंतु या शास्त्राला विरोध दर्शविणाऱ्या तज्ञांच्या मते या प्रकारच्या कार्य कारणभावात काही तथ्य नाही. कारण हे सर्व ढोबळ अंदाज असून या गोष्टी प्रायोगिकरित्या सिद्ध झालेले नाहीत. (वा सिद्ध करता येत नाहीत.) त्यांचा सैद्धांतिक पाया ठोस नाही. लहानपणाच्या वर्तनातून मोठेपणी ते मूल काय होणार याचा अंदाज बांधणे शक्य माही. जनुकीय जडण-घडण (पिंड!), भोवतालची परिस्थिती (संस्कार!), परिस्थितीत होत असलेले बदल, पालन पोषण, सामाजिक दबाव, आर्थिक स्थिती, भौगोलिक वातावरण, आकलन क्षमता, इत्यादी अनेक घटक माणसांना घडवत असतात. त्याच्या वर्तनाला कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे माणसातील प्रत्येक वर्तनाच्या छटांना प्रत्येक वेळी उत्क्रांतीच्या इतिहासाच्या पानात शोधणे बालिशपणाचे वाटेल. तरीसुद्धा धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, रूढी-परंपरासारख्या इतर कुठल्याही विशदीकरणापेक्षा उत्क्रांतीच्या विश्लेषण व विवरणामागे सैद्धांतिक बैठक असण्याची शक्यता जास्त आहे. परंतु साळुंखे सरांनी सांगितल्याप्रमाणे उलटी कॅप घातलेला तरुण उत्क्रातींच्या इतक्या सर्व गोष्टींचा विचार करत असेल हे अशक्य वाटते. सहज वा गंमत म्हणूनसुद्धा त्यानी कॅप उलटी सरकवली असेल. यातून एवढा मोठा अर्थ काढावा हे काहीतरीच वाटते.
उत्क्रांत मानसशास्त्राच्या पुरस्कर्त्यांनासुद्धा इतर करत असलेल्या टीका-टिप्पणींची पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या मते यासंबंधीचे विवरण केवळ ऐकीव गोष्टी, वा ओढून ताणून आणलेल्या, काही तरी फेकून इतरांची तोंड बंद करणाऱ्या भाकड कथा नाहीत. वर्तनातील प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीसंबंधींच्या विधानामागे - जरी त्यांचे विश्लेषण वा विधान खरे (वाटत) नसले तरी - ढोबळ मानाने उत्क्रांतीचा सिद्धांत - दूरान्वये ना का होईना - दडला आहे, हे नाकारता येत नाही.
फक्त या विधानांची चाचणी घेणे जास्त अवघड आहे, हे मान्य करावे लागेल. उत्क्रांतीसंबंधीच्या गृहितकांच्या आधारे केलेल्या मानवी वर्तनांच्या अंदाजांची चाचणी कदाचित शक्य होईल, असे त्यांना वाटते. उदाहरणार्थ, मानसशास्त्रीय व मानववंश-शास्त्रीय अभ्यासामधून तरुणीला आकर्षित करण्यासाठी तरूण स्वत:च्या शरीरयष्टीचे जाहीर प्रदर्शन करत असेल का? याची चाचणी घेणे शक्य आहे. परंतु बेसबॉलच्या उलट्या कॅपमधून उत्क्रांतीचे निष्कर्ष काढणे वा उत्तर शोधणे अतार्किक ठरेल.
उत्क्रांतीच्या इतिहासातच सर्व गोष्टी दडल्या आहेत, हा समजच मूळ वादाचा विषय ठरत आहे. उत्क्रांत मानसतज्ञांच्या विरोधात असणाऱ्या तज्ञांना जुजबी उत्तराने समाधान मिळणार नाही. ठोस पुरावा दिल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. परंतु आपण सर्व उत्क्रांत होत गेलेल्या प्राण्यांच्या इतिहासाचे फलित आहोत हे मात्र नाकारू शकत नाही.

Comments

लेखात अधिक खोली हवी...

या लेखात उत्क्रांतीवादी मानसशास्त्राची टीका करायची आहे, समर्थन करायचे आहे की मर्यादा दाखवून द्यायच्या आहेत याचा अंदाज येत नाही. सूर टीकेचा वाटला तरी दोन्ही दगडांवर पाय ठेवल्यासारखा वाटतो. साळुंखे हे प्रातिनिधिक असल्याचा आभास निर्माण होतो. नावावरून हे नवे थेर काही पसंत नाही असे वाटते... पण लेखात दोन तीन वेळा उत्क्रांतीचा गवगवा केलेला आहे.

हे सर्व खरे मानल्यास स्वार्थी जनुकांच्या लहरीनुसार आपले वागणे असेल. आपण केवळ नाचणाऱ्या बाहुल्या असून खेळवणारे सूत्रधार जनुक आहेत.

हा तर्क कुठून येतो हे कळले नाही. कृपया गृहितकांवरून सिद्ध करा किंवा कोणाही मान्यताप्राप्त उत्क्रांतीवादी मानसशास्त्रज्ञाच्या विधानाचा संदर्भ द्या. हा मुद्दा जवळपास याच शब्दात उत्क्रांतीविरोधकांनी रिचर्ड डॉकिन्सच्या सेल्फिश जीन विरोधात मांडला होता. तो खोडून काढून देखील पंचवीस वर्षं होऊन गेली. ( हे वाक्य त्याच चर्चेच्या संदर्भात आले का? अन्यथा 'स्वार्थी ' जनुकाचा इथे संबंध काय?)

उत्क्रांत मानसतज्ञांच्या विरोधात असणाऱ्या तज्ञांना जुजबी उत्तराने समाधान मिळणार नाही.

कुठच्या तज्ञांचं जुजबी उत्तरांनी समाधान होतं?

एकंदरीत फारच उथळ व ढिली चर्चा वाटली.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

विचार प्रयोग

  1. फोर्थ डायमेन्शन हे सदर विचार प्रयोगावर (thought experiment) भर देण्यासाठी मुळात लिहिलेले आहे. हे प्रयोग फक्त विचार सुचवितात समस्यांना उत्तरं देत नाहीत. त्यामुळे कदाचित लेखात अधिक खोली हवी असे वाटण्याची शक्यता आहे. प्रयोग करत असताना काही मोजक्या inputs वरून ouputs काय येऊ शकतात यांचा अंदाज करण्याइतपत हे लेख आहेत. हाच धागा पकडून इतर ठिकाणी माहिती शोधावे, विचार करावा अशी कल्पना त्यामागे आहे.
  2. रिचर्ड डॉकिन्सचा स्वार्थी जनुकाचा मुद्दा इतर अनेक वैज्ञानिकांनी खोडून काढला असला तरी विचार प्रयोगाची ती गरज होती म्हणून त्याचा उल्लेख केला आहे.
  3. याचबरोबर उत्क्रांती सिद्धांताला न सुटलेले प्रश्न अजूनही आहेत. या संबंधातील एक लेख न्यू सायंटिस्टच्या अंकात आलेला असून डॉकिन्स, पिंकर, रिचर्ड फॉर्टी, फ्रान्स डी वॉल इ.इ. वैज्ञानिकांचा त्यात सहभाग आहे.
  4. विचार प्रयोगाच्या मर्यादेमुळे लेखातील चर्चा उथळ व ढिली वाटली असेल. परंतु उत्क्रांती, जनुक, यासारखे विषय आता राजेश घासकडवी छान व सखोलपणे हाताळत असल्यामुळे त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही.

विचारप्रवर्तक, पण

उत्क्रांतीच्या तत्त्वातून मनुष्याच्या वागणूकीचे कितपत स्पष्टीकरण मिळू शकते, याबद्दल मतमतांतरे आहेत.
"अशी मतभिन्नता आहे" हे जर कोणाला माहीत नसेल तर हा लेख वाचून खचित माहिती होईल.

परंतु कित्येकदा श्री. नानावटी यांची उदाहरणे मला पटत नाहीत. बेसबॉल टोपीचे उदाहरण कमालीचे विज्ञान-पद्धत-विरोधी वाटते.

प्राध्यापक विज्ञान-पद्धतीने विचार करणारा असता, तर त्याने असे काही म्हटले असते :
पुढील विधाने आपण निरीक्षण करून तपासूया :
१. टोपी उलटी घालणार्‍यांची अपत्ये सामान्यपणे टोपी उलटी घालणारी असतात. सकृद्दर्शनी टोपी उलट घालण्याचा स्वभाव आनुवांशिक असू शकल्याचा निष्कर्ष आपण काढू शकतो.
२. पिढ्यांचा क्रम निरीक्षिला तर टोपी उलटी घालणार्‍यांची अपत्ये अधिक जगतात/स्वतः अधिक अपत्ये पैदा करतात. सकृद्दर्शनी टोपी उलटी घालण्याच्या स्वभावाने वंशसातत्यात सापेक्ष वृद्धी होते, असा निष्कर्ष आपण काढू शकू.
१. आणि २. असे दिसल्यास टोपी उलटी घालण्याचे स्पष्टीकरण उत्क्रांतीच्या तत्त्वात दिसते असे आपण म्हणू.
ही जनावरे असती तर आपण कदाचित काही प्रयोग करून सिद्धता पूर्ण करू शकलो असतो. पण मनुष्यांमध्ये असे प्रयोग अनैतिक आहेत. तस्मात् जितपत नैतिक तत्त्वात जमते तितपत स्पष्टीकरण आपण उत्क्रांतीच्या तत्त्वातून दिलेले आहे.

उत्क्रांत मानसशास्त्राच्या अतिरेकाचा विरोध करणारासुद्धा विज्ञान-पद्धतीने विचार करणारा असता, तर साधारण अशाच प्रकारे निरीक्षण-बद्ध तर्क सांगून विरोध करेल.

पण वरील लेखात वादी-प्रतिवादी पश्चात्-बुद्धीने वाटेल ते स्पष्टीकरण देत आहेत. ही तर अंधश्रद्धा आणि कल्पनाविलास झाला. उदाहरणार्थ विरोधक सुद्धा लेखात असा विरोध करतो :

परंतु साळुंखे सरांनी सांगितल्याप्रमाणे उलटी कॅप घातलेला तरुण उत्क्रातींच्या इतक्या सर्व गोष्टींचा विचार करत असेल हे अशक्य वाटते. सहज वा गंमत म्हणूनसुद्धा त्यानी कॅप उलटी सरकवली असेल. यातून एवढा मोठा अर्थ काढावा हे काहीतरीच वाटते.

विचार करत असेल हे अशक्य वाटते! त्या तरुणाला विचारून तो काय विचार करतो ते समजू शकेल ना. अशक्य वाटण्याचा संबंध काय? आणि त्याहूनही - वाटण्या-न-वाटण्याचा उत्क्रांतीशी संबंध काय आहे. या प्रतिवाद्याला उत्क्रांतीची तत्त्वेही माहीत नाहीत आणि निरीक्षणातून काही कळू शकेल याचे भानही नाही.

- - -

मनुष्याच्या वागणुकीत वंश आणि संस्कार यांचा वेगवेगळा असा वाटा किती ("नेचर व्हर्सेस नर्चर"), एकमेकांचा परिणाम बदलणारा वाटा किती ("जीन-एन्व्हायरनमेंट इंटरॅक्शन"), हे प्रश्न जैव-वैज्ञानिकाना सतावत आहेत. वैज्ञानिकांमध्ये आंतरिक आणि एकमेकांतले वैचारिक संघर्ष होत आहेत, हे खरेच.

पण या लेखातून दोन हट्टी आणि कल्पनाविलासी वैचारिक परंपरांमधली वांझोटी वादावादी असल्याचा भास होतो आहे.

 
^ वर