फोर्थ डायमेन्शन ९


नैतिक पेचप्रसंग व चिकित्सक विचार प्रयोग

विचारांची पार्श्वभूमी नसलेली कल्पनाभरारी केवळ मनोरंजन करू शकते. त्याचप्रमाणे कल्पनेला वाव नसलेले विचार वांझ ठरू शकतात. म्हणूनच तत्वज्ञ व वैज्ञानिक आपापल्या मूळ विचारांचा धागा पकडूनच कल्पनाविश्वात संचार करत असतात. विचारांना वा कल्पनांना जन्म देत असतात. त्यातूनच अनेक जीवनोपयोगी शोध होत असतात. माणसांचे जीवन सार्थकी लागते. तत्वज्ञ वा वैज्ञानिक ज्याप्रकारे कल्पनामिश्रित विचार किंवा विचार केंद्रित कल्पनेचा विस्तार करत असतात त्या प्रकाराला विचार प्रयोग (Thought Experiment) असे म्हटले जाते. अशा प्रयोगासाठी कार्यक्षम मेंदू पुरेसा ठरेल. इतर कुठल्याही साधनांची गरज यात भासत नाही. सॉव्रेखटस, अरिस्टॉटल, न्यूटन, आइन्स्टाइन इत्यादींच्या कर्तृत्त्वामागे थॉट एक्सपिरिमेंटचाच आधार होता. अशा विचार प्रयोगातसुध्दा नेहमीच्या प्रत्यक्ष प्रयोगाप्रमाणे अत्यंत गुंतागुंतीच्या घटकांना व अपवादांना काही वेळ बाजूला सारून थेट विचार वा गृहितकावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असते. केवळ तत्वज्ञ वा वैज्ञानिकांनाच नव्हे तर सामान्यांनासुध्दा आपापल्या कुवतीप्रमाणे विचार प्रयोगाची गरज असते. परंतु विचारापेक्षा भावनेलाच जास्त महत्व देण्याच्या आपल्या सवयीमुळे आपण आपल्या मेंदूचा पूर्ण क्षमतेने वापर करत नाही. त्यामुळे आपले अतोनात नुकसान होत असते.

विचार प्रयोगातील आणखी एका पैलूची पण चर्चा करणे गरजेचे आहे. वास्तव परिस्थितीचा सामना करत असताना आपल्याला अनेक वेळा नैतिक पेचप्रसंगांना सामोरे जावे लागते. त्याप्रसंगी संदर्भ, आशय, वा भोवतालची सामाजिक परिस्थिती या सगळयांचा विचार करू लागल्यास मूळ समस्या बाजूला पडते, आपण कुठेतरी भरकटत जाऊ लागतो व ठोस निर्णय घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ, मांसाहाराचाच मुद्दा विचारात घेत असल्यास त्याचे अनेक पैलू आपल्या समोर उभे राहतात. मांसाहाराचे फायदे-तोटे सांगावे लागतील. शाकाहार - मांसाहार यांची तुलना करावी लागेल. दोन्ही प्रकारच्या आहारामधील प्रथिनं, जीवनसत्व, उष्मांक, त्यांचे प्रमाण इत्यादींची यादी द्यावे लागेल. मांसाहार नकोच असा आग्रह धरत असल्यास सर्व जगाला पुरेसे शाकाहारी आहार पदार्थ उपलब्ध होतील का याचा विचार करावा लागेल. मांसाहारातसुध्दा कुठल्या प्रकारचा मांसाहार नको (व का नको?) हे नेमकेपणाने स्पष्ट करावे लागेल. पोल्ट्रीपिगरी फॉर्ममध्ये वाढवलेल्या प्राण्यांचे की मांसभक्षणासाठीच म्हणून पाळलेल्या प्राण्यांचे की रानावनात स्वच्छंदपणे जगणाऱ्या प्राण्यांचे याफ्की कोणते हवे व कोणते नको हे सांगावे लागेल. काही प्राण्यामध्ये जनुकीय बदल करून विपुल प्रमाणात मांस मिळण्याची यंत्रणा उभी केल्यास चालेल का? किंवा सेंद्रीय मांसाचाच आग्रह धरणार? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह करावा लागेल. मांसाहारामागील नैतिकता स्पष्ट करण्यासाठी या सर्व गोष्टींचा साधक - बाधक विचार केल्याविना चर्चा पुढे सरकू शकत नाही. यालाच कदाचित आपण चिकित्सक विचार प्रयोग असे म्हणू शकतो.

वैज्ञानिक साधनांचा वापर करून प्रयोगशाळेत करत असलेल्या प्रयोगासारखे हे विचारप्रयोगसुध्दा आपल्या गृहितकांना पुष्टी देऊ शकतात. किंवा गृहितकातील चूक स्पष्ट करू शकतात. आपल्या चुका शोधू शकतात. विचार प्रयोग हे नेहमीच बौध्दिक कसरत असते. त्यामुळे काही क्लिष्ट मुद्दे टाळून प्रयोगाला फाटे न फोडता पुढे सरकत गेल्यास मूळ समस्येला उत्तर शोधणे शक्य होईल. मांसाहार निषिध्द यामागे मूकप्राण्याबद्दल सहानुभूती हे एकमेव कारण असल्यास फॉर्ममध्ये वाढवलेल्या प्राण्यांचा मांसाहार नको या विधानाला अर्थ राहत नाही. एकदा मांस खाणे हे नैतिक ठरत असल्यास मग रस्त्यावर अपघात होऊन मेलेली कोंबडी व खाटिकांच्या सुरीखाली मेलेली कोंबडी यात फरक करता येत नाही. अशा प्रकारच्या नैतिक पेचप्रसंगांचा विचार करताना मूळ गाभ्यापर्यंत पोचल्याविना आपली भूमिका स्पष्ट होत नाही.

विचारप्रयोगाप्रमाणेच वास्तवातसुध्दा जसेच्या तसे प्रसंग घडतीलच याची काही खात्री देता येत नाही. विचार प्रयोग फक्त विचार देतात; समस्यांना उत्तरं देणार नाहीत. काही वेळा आपल्याला सुचलेली उत्तरं अव्यावहारिक किंवा अशक्यातली आहेत असेही वाटतील. केवळ आपल्यालाच नव्हे तर इतर कुणालाही त्याची अंमलबजावणी शक्य नसेल. परंतु आपली बौध्दिक क्षमता वाढवण्यासाठी, आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी विचार प्रयोग फार उपयोगी पडू शकतात. अशक्य वा अव्यवहार्य असली तरी चालेल परंतु आपल्या विचाराची साखळी तुटता कामा नये, विचार करण्याची सवय मोडता कामा नये याची काळजी घेतल्यास अनेक गोष्टी साध्य होतील. आपली नैतिक भूमिका स्पष्ट होत राहील. वैचारिक गोंधळ कमी होईल व विवेकवादी चिकित्सक विचारामुळे पेचप्रसंगाना सामोरे जाणे सुलभ होईल.

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला विषय

लेख आवडला.

आपल्या विचाराची साखळी तुटता कामा नये, विचार करण्याची सवय मोडता कामा नये याची काळजी घेतल्यास अनेक गोष्टी साध्य होतील.

मागे उपक्रमावर आलेल्या लेखांची आणि चर्चांची या निमित्ताने आठवण झाली.

निर्णयप्रसंगी विचारप्रयोग

लेख आवडला.

कुठल्याही निर्णयप्रसंगी (जेव्हा उपजत "इन्स्टिंक्ट"ने किंवा मज्जातंतूच्या प्रतिक्षिप्त "रिफ्लेक्स"ने काम चालत नसेल, तर) वैचारिक प्रयोगच कामी येतात.

आज कचेरीत उशीरा पोचतो आहे, वरिष्ठांशी संवाद नेमका कसा हाताळूया? असा विचार करताना, वेगवेगळे पर्याय योजून, वरिष्ठांची त्यावरची संभाव्य उत्तरे कल्पून, मगच आपण निर्णय करतो. अशा प्रकारे वैचारिक प्रयोग मानवाला स्वभावसुलभ आहेत.

नैतिक पेचप्रसंगातसुद्धा कित्येकदा आणीबाणीच्या प्रसंगी "रिफ्लेक्स"च चालतो. प्रक्षिप्त गर्दीच्या आत असल्यास गर्दीबरोबर दगड फेकणे. किंवा गुंडांची टोळी कुणाला त्रास देत असेल तर शक्यतोवर दुरूनच वेगळी वाट पकडणे, असले नैतिक निर्णय बहुतेक वेळा नीट विचार न करताच आपण घेतो.

परंतु तर्कशुद्ध नैतिक निर्णय घेण्यापुरता वेळ जेव्हाजेव्हा असतो, तेव्हा आपण सर्वच वैचारिक प्रयोगांना शरण जातो.

"आपल्याला जग कसे समजते" याबद्दल आपल्या वैचारिक चौकटीची एकत्र चाचणी पुष्कळदा वैचारिक प्रयोगांनीच करावी लागते. लेखात सांगितल्याप्रमाणे यातून एक तर चुकलेले गृहीतक सापडते, चुकलेला तर्क सापडतो, किंवा विचार माहितीच्या अभावाने आडला, तर कुठली माहिती मिळवली पाहिजे त्याविषयी कल्पना मिळते. हे विज्ञानाचे मर्म आहे, असे लेखातून जाणवते, आणि पटते.

धर्मसंकट

हा विषय धर्मसंकट व त्यावरील नैतिक तोडगे असा देखील मांडता येईल.
प्रकाश घाटपांडे

चिकित्सक विचारप्रयोग

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रभाकर नानावटी यांचा हा लेख हा लेख दोनदा वाचला.लेख विचारप्रवर्तक असून त्यात मांडलेली मते पटण्यासारखी आहेत.श्री. नानावटी लिहितात"केवळ तत्वज्ञ वा वैज्ञानिकांनाच नव्हे तर सामान्यांनासुध्दा आपापल्या कुवतीप्रमाणे विचार प्रयोगाची गरज असते. परंतु विचारापेक्षा भावनेलाच जास्त महत्व देण्याच्या आपल्या सवयीमुळे आपण आपल्या मेंदूचा पूर्ण क्षमतेने वापर करत नाही. त्यामुळे आपले अतोनात नुकसान होत असते."
हे मला पूर्णतया पटते. भावनेला गौणस्थान देऊन सर्वांनी शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर जगातील अनेक समस्या सुटतील. (पण नजिकच्या भविष्यात तरी तसे होणे नाही हे धरतीवरचे वास्तव आहे.)

 
^ वर