चेकलिस्ट मॅनिफेस्टो

फोर्थ डायमेन्शन 47

चेकलिस्ट मॅनिफेस्टो

प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपण काही उद्दिष्टे ठरवतो. ते साधण्यासाठी काही संकल्प करत असतो. (व एक-दोन दिवसात हे संकल्प हवेत विरूनही जातात!) उदा: नियमित व्यायाम, कमीत कमी फास्ट फुड खाणे, वजनात घट, संस्कृत (?) किंवा इतर एखाद्या भाषेचा अभ्यास, समग्र फुले, आंबेडकर वाचून काढणे इ.इ. परंतु यांच्याच जोडीला (किंवा फक्त) आपण यानंतर आपल्या व्यवहारात कमीत कमी चुका करण्याचा संकल्प केल्यास (व ते उद्दिष्ट गाठता आल्यास) आपल्या जीवनात फार मोठा बदल होवू शकतो. कारण जितक्या चुका कमी तितका मनस्ताप कमी.
याच विषयावर आधारित डॉ अतुल गवंडे यांचे चेकलिस्ट मॅनिफेस्टो या नावाचे एक पुस्यक

अलिकडेच प्रसिद्ध झाले आहे. अतुल गवंडे हे अमेरिकेतील एक ख्यातनाम सर्जन, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक, न्यूयॉर्कर या नियतकालिकाचे विज्ञानविषयक स्तंभलेखक, मॅकऑर्थर पारितोषक विजेते आहेत. त्यांचे हे तिसरे पुस्तक असून, त्यानी आपले पहिले पुस्तक कॉम्प्लिकेशन्स मध्ये वैद्यकीय व्यवसायातील काही अनिष्ट पद्धतींना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टरांना देवत्व बहाल करणाऱ्या रुग्णांच्या मानसिकतेचा फायदा घेणाऱ्या या व्यावसायिकांनी ईश्वर बनण्याचा हट्ट सोडून एक चागला माणूस व्हावे यावर गवंडेनी भर दिला आहे. यानंतरचे त्यांचे पुस्तक बेटर मध्ये काही डॉक्टर्स इतर सामान्य डॉक्टरांपेक्षा वेगळे असे काय करतात म्हणून यशस्वी होतात याचे विश्लेषण केले आहे. चेकलिस्ट मॅनिफेस्टो चे उपशीर्षकच How to get things right!
अतुल गवंडेंच्या मते डॉक्टर्सकडूनही चूक होऊ शकते व त्यांच्या ह्या चुका, जेव्हा रुग्ण विकलांग होतो वा दगावतो तेव्हा त्या अक्षम्य ठरतात. यातील बहुतांश चुका टाळण्याजोगे असतात. केवळ डाक्टरांच्या बेपर्वाईमुळे वा निष्काळजीपणामुळे त्या चुका वरच्यावर डोके काढतात. त्यामुळे डॉक्टरासकट सर्व संबंधितावर पश्चात्तापाची पाळी येते. यावर गवंडेनी अत्यंत साधा व सोपा उपाय सुचविला आहे, तो म्हणजे चेकलिस्ट ! काळजीपूर्वकपणे स्वत:च तयार केलेल्या नियामक यादीमुळे (व त्याचे पालन करत राहिल्यामुळे) डॉक्टरांची प्रतिष्ठा जपली जाते, रुग्णांचे हाल (व पैसे!) वाचतात व वैद्यकीय व्यवसायाची होत असलेली बदनामी रोखता येते. डॉक्टर मंडळींच्या निष्काळजीपणामुळे दरवर्षी जगभरातील सुमारे 70 लाख रुग्ण कायमचे विकलांग होतात. सुमारे 10 लाख रुग्ण मृत्यृमुखी पडतात. दररोज 1-2 याप्रमाणात बोइंगसारख्या विमानाचा अपघात होऊन सर्वच्या सर्व प्रवासी मेले तरी वर्षभराचा आकडा डॉक्टरांच्या चुकीमुळे दगावलेल्या रुग्णांच्या आकड्यापेक्षा नक्कीच कमी ठरेल. रुग्णांची तुलना विमान अपघाताशी करता येत नसली तरी वैद्यकीय सुरक्षेचे दाखले अत्यंत खराब आहेत हे मात्र नक्की.

गवंडेंच्या मते चेकलिस्टचा वापर रुग्णसुरक्षेसाठी नाट्यमय कलाटणी देऊ शकते. उदाहरणार्थ कॅथेटर्ससाठी ऑपरेशन करत असताना नेमके काय करावे यासंबंधीचे साधे असे पाच उपाय बहुतेक मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकविले जात असतात. परंतु यासंबंधीच्या एका सर्वेक्षणानुसार अनेक मोठमोठे, नावाजलेले हॉस्पिटल्ससुद्धा त्याची दखल घेत नाहीत. त्यामुळे जन्तूसंसर्ग होऊन रुग्णाचा मृत्यु होतो. अमेरिकेतील मिशिगन स्टेटनी उपायांची काटेकोर अंमलबजावणीचा बडगा उगारल्यावर केवळ तीन महिन्यात मृत्युच्या प्रमाणात 66 टक्क्यानी घट झाली. 18 महिन्यात 1500 जीव वाचले व 17.5 कोटी डॉलर्सएवढा खर्च वाचला. हे सर्व आकडे अत्यंत बोलके आहेत.
चेकलिस्ट हा काही जादुई प्रकार नाही, हेही लक्षात ठेवायला हवे. कारण प्रत्येक रुग्णाचा आजार गुंतागुंतीचा, किचकट व अनेक वेळा या क्षेत्रातील अत्यंत निष्णात तज्ञांनासुद्धा आव्हानात्मक ठरत असतो. आजारपणाचे चित्र विचित्र असे अनेक कंगोरे असतात. तरीसुद्धा विचारपूर्वक केलेली नियामक यादी व त्याचे काटेकोर पालन यामुळे रुग्णांचे जीव वाचतात, यावर गवंडेंचा भर आहे. जन्तूसंसर्गा (infection) मुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत 50 टक्क्यानी घट होण्याची शक्यता आहे, असा गवंडेंचा दावा आहे. त्यानी याविषयीचे केलेले नीरिक्षण व त्याचे निष्कर्ष आश्चर्यचकित करणारे आहेत.
अशाप्रकारचे किचकट, गुंतागुंतीचे विषय हाताळताना इतर लेखक अत्यंत रुक्षपणे मांडणी करतात. त्यामुळे वाचक पहिली 8-10 पानं वाचत असतानाच कंटाळतो. परंतु अतुल गवंडे यांची लेखनशैली वेगळ्या प्रकारची आहे. अनेक जिवंत व प्रत्यक्षात घडलेल्या उदाहरणांची पानोपानी पेरणी केल्यामुळे वैद्यकशास्त्रासारखा गंभीर विषय वाचतानासुद्धा वाचक कंटाळत नाहीत. उदाहरणांची व्याप्ती हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, रुग्ण या मर्यादेतच न ठेवता कन्स्ट्रक्शन्स कंपन्या, हॉटेल्स, बॅंक्स इत्यादी ठिकाणी घडलेल्या प्रसंगांचा वापर फार खुबीने केल्यामुळे आपल्याला तो विषय पटकन समजतो. 'ऑपरेशन करणाऱ्या सर्जननी ऑपरेशनपूर्वी आपल्या सर्व सहकाऱ्यांची नावे माहित करून घ्यायला हवे' हे एक चेकलिस्टमधील कलम आहे. अगदी साधा सरळ, कॉमन सेन्सचा भाग आहे व यात काय विशेष असेही वाटेल. परंतु भूलतज्ञाचेच नाव माहित नसल्यामुळे सर्जनचे ऑपरेशन पूर्णपणे फेल गेलेल्या उदाहरणांचा दाखला गवंडे देतात. डॉक्टर बाहेरच्या बघ्यांना हीरो वाटत असला तरी त्यांचे सहकारी, सहायक, नर्स, वॉर्ड बॉय, इत्यादींना तो एक त्यांच्यासारखाच हाडामासाचाच माणूस असतो. त्यामुळे या सर्वांचे सहकार्य न लाभल्यास फार मोठा घोटाळा होऊ शकतो. शेवटी मुख्य डॉक्टरलाच याची जवाबदारी पेलावी लागते. रुग्णाच्या जिविताच्या सुरक्षेबद्दलच्या सूचना कुठुनही आले तरी त्यांचे स्वागत करायला हवे. नर्स काय सांगू शकते हा तुसडेपणा नक्कीच भूषणावह ठरणार नाही.
चेकलिस्टचा वापर वा त्याची अंमलबजावणी केल्यामुळे चुटकीसरशी सर्व प्रश्न सुटतील वा सर्व

काही सुरळित होत जाईल याची हमी कुणी देणार नाही वा त्या भ्रमातही आपण राहू नये. आपण म्हणू तीच पूर्व दिशा या तोऱ्यात राहणाऱ्या डॉक्टरांच्यावर अंकुश ठेऊ शकणाऱ्या अतुल गवंडेसारख्या चॅम्पियनची या व्यवसायाला गरज आहे, हे मात्र मान्य करायला हवे. कारण या व्यवसायातील व्यावसायिकांचा निष्काळजीपणा, अहंभाव, तुसडेपणा, पैशाची हाव इत्यादीमुळे रुग्ण हताश होत आहेत व हा व्यवसाय आपली विश्वासार्हता गमवत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानचा पुरेपूर वापर व / वा पाण्यासारखा पैसा ओतला तरी रूग्ण बरा होईल याची खात्री नाही. वैद्यकीय व्यावसायिकांच्या संवेदन बधिरतेमुळे रुग्ण भांबावून जात आहे. अशा वेळी अतुल गवंडे यांची पुस्तकं दिशादर्शक ठरतील.
चेकलिस्ट ही काही अत्यंत नावीन्यपूर्ण, वा अफलातून आताच उद्भवलेली संकल्पना नाही. प्राथमिक शाळेचा विद्यार्थीसुद्धा दुसऱ्या दिवशीच्यासाठी आपण नेमके कुठले गृहपाठ करावेत, कुठली पुस्तकं घेवून जावेत, कंपास, ड्राइंग बॉक्स घ्यावे की नाही याचा विचार करतो. परंतु जसजसे मोठेपणी आपण आपापल्या व्यवसायात गुरफटून जातो तेव्हा न कळत चेकलिस्टसारख्या साध्या साध्या गोष्टींचे विसर पडतो. समोरचा क्लायंट वा माणूस कदाचित बोलणारही नाही. परंतु आपले काही तरी चुकते हे तरी निदान लक्षात यायला हवे. न्हणूनच अशा चुका (परत परत!) होऊ नये यासाठी चेकलिस्ट अत्यंत प्रभावी ठरू शकेल. चेकलिस्ट ही केवळ वैद्यकीय व्यवसायासाठीच नव्हे तर इतर - ज्याना आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे - या सर्वांसाठी आहे.
संदर्भ

Comments

उत्तम माहिती

उत्तम माहिती व परिचय. माझ्या माहिती प्रमाणे अतुल गवांदे असा मराठी उच्चार आहे.गावंडे असा देखील असु शकतो. निळु दामले यांनी त्यांच्या गप्पा त ही माहिती दिली होती. तेव्हा त्याचे उच्चारण गवांदे असेच केले होते. आमचेकडे कधीकधी पौराहित्य करणार्‍या एका गुरुजींचे नाव गवांदे होते तसेच आमच्या शेतात गुरे राखणार्‍या गड्याचे नाव पण शंकर गवांदे असे होते. मला त्याचे त्यावेळी आश्चर्य वाटत असे.
एकदा राम बापट पुणे विद्यापीठात भाषण करताना सहवक्त्यांचा उल्लेख लक्ष्मण माने ऐवजी लक्ष्मण साने असा करीत होते. नंतर त्यांना श्रोत्यांनी निदर्शनास आणुन दिल्यावर ते म्हणाले अरे हो! यामुळे सामाजिक संदर्भ असलेली जातच बदलते
प्रकाश घाटपांडे

+१

उत्तम माहिती व परिचय! त्यांच्या नावाचा अमेरिकन उच्चार 'गवांडे' असा केलेला दिसतो. मूळ आडनाव 'गावंडे' असावे असा एक कयास!

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

गवांदे की गवंडे ?

इंग्रजी लेखनातून उच्चार घेतल्यामुळे कदाचित हा घोळ झाला असावा. जर गप्पात उल्लेख गवांदे असा केलेला असल्यास वरील लेखात तसे यायला हवे होते. संपादकानी त्याप्रकारे लेखातील चूक दुरुस्त केल्यास इतरांनाही ते कळू शकेल. (मला ही दुरुस्ती कशी करावी हे माहित नाही)
वरील दुरुस्ती करत असताना (दुसर्‍या परिच्छेदाच्या पहिल्या ओळीतील पुस्यक ऐवजी पुस्तक व (शेवटून तिसर्‍या ओळीतील) न्हणूनच ऐवजी म्हणूनच अशी दुरुस्ती करावी ही विनंती.
चू.भू.दे.घे.

यादी

पूर्वी विसराळू लोक एखादी गोष्ट करायची असेल तिच्या नावे जानव्याला गाठ बांधायचे ते आठवलं. अर्थात, ती गाठ कशासाठी बांधली आहे हेही ते विसरायचे... सध्या आपण स्मार्ट फोनमध्ये खरडी किंवा ध्वनिमुद्रित टिप्पणी ठेवतो. पण आमच्यासारखे महाभाग फोनच विसरतात. असो.

आपण चेकलिस्ट हे सुव्यवस्थितपणाचं प्रतीक म्हणून मांडलेलं आहे. संदर्भ वैद्यकीय व्यवसायाचा आहे, कारण तिथे जीवनमरणाचा प्रश्न येतो. व एखादी साधी चूक महाग पडू शकते. जिथे मार्गच नाही तिथे काही इलाज नाही, पण सगळ्या सुविधा असताना केवळ 'अरेच्चा, हे विसरलोच बरं का' मुळे नुकसान होणं ही नामुष्कीची गोष्ट आहे. हे इतर व्यवसायांना व आपल्या वैयक्तिक, दिवसेंदिवस जास्त जास्त गुंतागुंतीच्या होत जाणाऱ्या आयुष्यालाही लागू आहे, हेही नोंदलेलं आहे. बऱ्याच संस्था,व्यवसाय ही चेकलीस्ट पद्दती त्यांच्या दैनिक व्यवहारात अंगीभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. संगणकामुळे हे अधिक सुकर झालेलं आहे.

वरवर साध्या वाटणाऱ्या यादीचं महत्त्व सांगणाऱ्या पुस्तकाची चांगली ओळख आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर