मुतालिकला काळे फासले हे योग्यच झाले का?

अखेर युवक काँग्रेसच्या गुंड मुलांनी श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकच्या तोंडाला काळे फासले. हा प्रमोद मुतालिक तोच ज्याच्या श्रीराम सेनेने गेल्या वर्षी व्हॅलंटाइन डेला धुडगूस घातला होता. वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर श्रीराम सेनेचे गुंड तरुण मुलांना आणि मुलींना मारहाण करताना अख्ख्या भारताने बघितले होते. पण आज मुतालिकचे मतपरिवर्तन झालेले दिसले. अर्थात तोंडाला काळे फासले गेल्यावर. आज त्याला लोकशाहीची आठवण आली. आज त्याने गुंडागिरी कल्चरचाही धिक्कार केला.

प्रमोद मुतालिकला काळे फासणे योग्य की अयोग्य? हिंसेचा विरोध हिंसेनेच करायला हवा काय?
मुतालिकसारख्यांना धडा शिकवण्यासाठी आक्रमक होणे गरजेचे आहे काय? येत्या काळात अशा चकमकी वाढतील असेही तुम्हाला वाटते काय?
ह्या घटनेची अशी चर्चा करण्याचे कारण म्हणजे आज माझ्या एका मित्राला ह्या घटनेने एवढा आनंद झाला की त्याने चक्क पेढे वाटले.
त्याची मानसिकता 'गांधीवधा'नंतर पेढे वाटणाऱ्यांच्या मानसिकतेपेक्षा वेगळी आहे काय?

Comments

योग्य

चर्चेचा प्रस्ताव सुंदर आहे. काळ्या-पांढर्‍याच्या किनार्‍यावरचा पण तरीही रेखीवपणे मांडलेला प्रश्न आहे.

मी हिंसा व अहिंसा असा विचार न करता उपयुक्त व परिणामकारक हा निकष आधी लावतो. गांधीजींनी जो लढा दिला तो संपूर्णपणे अहिंसक नव्हता. त्यांच्या उच्च नैतिक भूमिकेमुळे त्यांना जगाचं व लोकांचं पाठबळ मिळालं. जनता हे त्यांचं शस्त्र होतं. त्यांनी ती भात्यात, म्यानात ठेवली. पण त्यांचं प्रदर्शन करायला ते विसरले नाहीत. गांधींना काही झालं तर अनागोंदी माजेल हे ब्रिटिशांना ठाऊक होतं. त्यामुळे प्रत्यक्ष हिंसा व हिंसेची भीती दाखवणं यात जो फरक होता तो गांधीजींनी केला.

अर्थात absolute पातळीवर हिंसा ही वाईटच. स्वार्थ साधण्यासाठी तर ती फारच वाईट. पण एका समुदायाने आपलं मत जोरकसपणे मांडायचं ठरवलं तर त्याला अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यातला कमीत कमी हिंसा वापरून जास्तीत जास्त परिणाम साधणारा मार्ग स्वीकरला जावा. या बाबतीत तो स्वीकारला गेला. त्यांच्या शरीरावर हल्ला करण्यापेक्षा त्यांच्या प्रतिमेवर हल्ला करण्याचा हेतू होता हे स्पष्ट आहे. मुळात हिंसेचा वापर तरुण मुला मुलींवर करून सेनेने पहिला घाव घातला होता. तलवारीचा घाव ढालीवर अडवला तरी बिचार्‍या तलवारधारीच्या हाताला झिणझिण्या येणारच. ढाल आक्रमकपणे वापरून त्याला दूर ढकललं तरी तो पडणारच. किती विचार करायचा?

त्यामुळे मला हे प्रत्त्युत्तर आवडलं. जनतेचाही पाठिंबा मिळेल असं वाटतं.
इतर उपक्रमी काय म्हणतात हे जाणून घ्यायची इच्छा आहे.

राजेश

सहमत आहे!

मी घासकडवींशी सहमत आहे. कायदा हातात घेऊन स्त्रियांना मारहाण करणार्‍यांच्या तोंडाला काळे फासले ते उत्तमच झाले. इथपर्यंत आक्रमकता ठीक आहे. बातमी वाचून/पाहून फार आनंद झाला.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

काहीतरी चुकते आहे

नक्की कुठची आक्रमकता योग्य आणि कुठची नाही? हा निर्णय कोणी करायचा?
हिंसा शारिरीक नाही तोवर ती एकवेळ चालेल असे तर म्हणायचे नाही ना? वसुलि म्हणतात तसे चिमटे काढणे आणि खून करणे यात फरक आहे, पण चिमटे आयुष्यभर काढले गेले तर जी हिंसा होत असेल ती दिसत नसणारी पण हिंसाच असेल, नाही? परिणाम कोणी मोजायचा?

शेवटी आपण करतो (कठोर शब्द, वाक्ये, आरडाओरडा, काळे फासणे) ती हिंसा नसते, तो आपला कुकरची वाफ बाहेर जाताना शिटी व्हावी तसा मामुली प्रकार. बाकीचे करतात ती मात्र हिंसा, अर्वाच्यपणा, इ. इ.

असो. मुळात मुतालिक यांचे वागणे निंदनीय आहे हे झालेच. पण काळे फासणार्‍यांचेही चुकले. मुतालिक यांना याहीवर्षी मागचीच चूक करताना पकडायला हवे होते.

बाकी, अवांतर -
"माय नेम इज खान"ला पाठिंबा देण्यासाठी चित्रपट पाहायला जायला संजय निरूपम, रमेश बागवे आणि इतर यांना बरा वेळ मिळाला? मला खरे तर हा चित्रपट पाहायला जायचे आहे, पण वेळ शोधून शोधून काढावा लागतो. यांना त्यांच्या कामांमधून बरा वेळ मिळतो ?!

अतिअवांतर आणि अनाठायी

चित्रातै, स्पष्टपणे मत नोंदवत आहे, आपल्याला अयोग्य वाटल्यास क्षमस्व. श्री पाटील वगैरे मंडळींनी चित्रपट पाहण्याचे कारण प्रतिमात्मक आहे. ज्यांना मुंबई आपली वडिलोपार्जित मालमत्ता वाटते त्यांचा विरोध झुगारून चित्रपट प्रदर्शित करणे गरजेचे होते. काहीही करता येऊ शकेल हा समज या प्रदर्शनाने खोटा ठरवला आहे. गृहमंत्री तसेच इतरांचे चित्रपट पहायला जाणे या चौकटीत पहायला हवे. मला त्यांच्या वागण्यात काहीही गैर वाटत नाही.

काही मजकूर संपादित. कृपया उपक्रमवर लेखन करताना व्यक्तिगत स्वरूपाची टीका टिप्पणी करू नये.

अयोग्य कशाला?

प्रश्न जरूर विचारावे. प्रतिकात्मक वगैरे मलाही कळते. पण ते आहे अवांतरातले. पण माझ्या बाकीच्या प्रतिसादाबद्दल काय वाटते?

मौन धरणे -?

मी मौन धरले का काय हे "तिकडे" चर्चा करावी. हवे तर तिकडे खरडींमधून करू या! किंवा सरळ चर्चाविषय टाका तिकडे.

संपादित

मजकूर संपादित. कृपया उपक्रमवर लेखन करताना व्यक्तिगत स्वरूपाची टीका टिप्पणी करू नये.

व्यक्तिगत शेरेबाजी

मूळ चर्चेशी संबंधीत नसलेल्या संवादांसाठी कृपया खरडवहीचा वापर करावा.

धन्यवाद

चित्रातै, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मी मौन धरले का काय हे "तिकडे" चर्चा करावी. हवे तर तिकडे खरडींमधून करू या! किंवा सरळ चर्चाविषय टाका तिकडे.

तुमच्या मौनात किंवा त्याविषयी चर्चा करण्यात मला काडीचाही रस नाही. मी मला काय वाटले (तेही नेमके काय वाटले तेही लिहिले नाही फक्त काहीएक कळले एवढेच म्हटले होते.) ते नोंदवले. (जे आता उडालेले आहे.) आपल्या मतांविषयी नेहमीच आदर वाटतो म्हणूनच अवांतरातील खटाटोप केला होता.

प्रतिकात्मक वगैरे मलाही कळते

कळते तर मग अवांतरातील उपरोध आणि त्रागा का? (उत्तर द्यायलाच हवे असा आग्रह नाही.)

तुम्हीच सांगा...

एक जमाव(व्यक्ती) दुसर्‍या जमावावर (व्यक्तीवर) आपलं राजकीय/आर्थिक वर्चस्व निर्माण करण्यासाठी अगर वर्चस्व झुगारून देण्यासाठी (अन्यायाच्या प्रतिकारासाठी) किंवा आपल्या संरक्षणासाठी आक्रमण/हिंसा वापरतो. मी काही उदाहरणे देतो, तुम्हीच सांगा यापैकी कुठची हिंसा/आक्रमण योग्य ते.

१. शिवाजीने (बिचाऱ्या!) औरंगजेबाला ठरवून मारले.
२. भारताने पाकिस्तानवर हल्ला करून त्याचे दोन तुकडे केले. १९७१
३. आझाद हिंद सेनेने इंग्रजांवर हल्ला केला.
४. गझनी-महंमदाने सोमनाथ लुटले.
५. मराठ्यांनी अटकेपार आक्रमक दौड मारली.
६. अमेरिकेने अफगाणिस्तानावर आक्रमण केले.
७. बलात्कार करेल, छेड काढेल, या शंकेने तरुणीने तरुणाच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारला.

इथल्या बहुतेकांच्या मते, हे सर्व वाईट आहेत. फक्त प्रतिसाद पाठवून हो की नाही ते कळवा. पण कालसापेक्षता, लोकशाही नसण्याची कारणे (भारतात आजही लोकशाही नाही असे म्हणता येईल), राज्यांना वेगळे नियम अशी पळवाटीची कारणे देऊ नयेत. तत्व तेच आहे, प्रश्न तोच आहे.

बरेवाईट

ठरवणारी मी कोण? यापैकी कोठचीही गोष्ट मी केलेली नाही :)

माझ्या मते काहींनी कायदा हातात घेणे हे जर कधीकधी क्षम्य असले, तर असे काही हे इतर काहींपेक्षा थोडे अधिक "इक्वल" असतात का? याचा विचार करायला लावणे एवढाच होता.

असो.

प्रश्न सर्वांसाठी आहे...

चित्राताई,

हा प्रश्न केवळ तुमच्यासाठी नसून सर्व उपक्रमींसाठी आहे... तुमचा 'कोणी कसं ठरवायचं' हा प्रश्न मी केवळ संदर्भ म्हणून घेतला होता. बाकी तुम्ही उत्तर टाळलेलंच आहे, बाकीचे काय करतात बघू...

राजेश

टाळलेला आहे

खरे आहे. कारण इतिहासाचा वेगवेगळा अर्थ लावत असलेल्या लोकांची बरीच पुस्तके अलिकडे मी वाचली, त्यामुळे नक्की काय योग्य आणि काय अयोग्य, मानवी समाजाचा एक मोठा समाज म्हणून विचार केला पाहिजे का सगळे निगडित असल्याने काहीच पूर्ण सत्य नाही? आणि हिंसा, सत्ता, प्रदेशाची लालसा ही सगळ्यांच्या इतिहासात सारखी असल्याने ह्या पुस्तकी ज्ञानामुळे मला सर्वजण हल्ली सारखेच वाटतात. वेगवेगळ्या प्रकारे हिंसा करणारेच वाटतात.

हिंसा वाईट आणि अहिंसा योग्य असे पुस्तकी पांडित्य मला किंवा इथल्या कोणाला ज्यांनी मुतालिक यांना काळे फासणार्‍यांचे चुकले असे म्हटलेले आहे, त्यांना सरसकट दाखवायचे आहे असे वाटत नाही. पण वरील सर्व (शेवटाचे सोडून) उदाहरणे ही इतिहासकालिन आहेत. काहींचा मी ज्या समाजात वाढले त्याला फायदा झाला आहे, आणि काहींचा तोटा. पण मुतालिक यांचे उदाहरण हे या २१ व्या शतकातील, मागच्या आठवड्याचे. त्यामुळे या शतकात, जिथे लोकशाही आहे, अशा ठिकाणी लोकांनी कायदे हाती घेणे, तेही या वर्षी न केलेल्या अपराधाची सजा त्या दिवसाआधीच देणे, हे चुकीचे आहे असे नाही वाटत? यावर तुम्ही असेही म्हणाला आहात की भारतात लोकशाही नाही, आता त्यामुळे बोलणेच खुंटले. जर भारतात लोकशाही नाही, तर पुढे आपले बोलणेच होऊ शकत नाही, कारण आपण दोघे वेगवेगळ्या पातळ्यांवरून बोलू.

जेथे लोकशाही कशीही का होईना अस्तित्वात आहे, तेथे जनतेचा आवाज वेगवेगळ्या प्रकारे कायदे मोडू किंवा तोडू शकणार्‍या "उच्चपदस्थां"पर्यंत पोचवत राहणे, जिथे स्वतःला कायद्याच्या चौकटीत राहून काही करता येईल ते करणे, हे लोकशाहीतील प्रत्येक सुजाण माणसाचे काम राहते. जर जी काही मोडकी तोडकी लोकशाही आहे, ती सोडून इतर काही व्यवस्था आणायची असली, तर मात्र त्याला माझा विरोध राहील. आणि जी काही मोडकी तोडकी लोकशाही आहे, ती एकाधिकारशाहीपेक्षा निश्चित बरी.

सहमत

चित्रातैंशी सहमत आहे. हिंसा कुठे केली जावी, कुणी करावी, कशासाठी करावी (योग्यता अयोग्यता) हे चांगले मुद्दे आहेत, ज्याबाबत स्वतंत्र चर्चा होऊ शकेल. (श्री धम्मकलाडू यांना चर्चाप्रस्तावात व्यापक चर्चा अपेक्षित असावी. त्या अर्थाने राजेश यांनी विचारलेले प्रश्न योग्य आहेत. पण त्यांचे प्रश्न स्थळ-काळाच्या तपशीलांबाबत प्रस्तुत घटनेशी साधर्म्य दाखवत नसल्याने स्वतंत्र चर्चाच अधिक प्रभावी ठरेल्.) या घटनेत केंद्रात सरकार असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे, सामान्यजनांनी नाही. सरकार चालवत असलेल्या पक्षास हाच एकमेव मार्ग योग्य वाटला याचा अर्थ काय समजावा? त्यांचा हा मार्ग अंगिकारण्याचा हेतू काहीही असला तरीही सामान्यांच्या दृष्टीकोनातून झाला प्रकार चुकीचाच आहे.

लोकशाही व न्याय

इथे लोकांनी लोकशाहीचा फारच गवगवा केलेला दिसत आहे. जणु काही तिच्यापलिकडे काही नाहीच...
लोकशाही हे ध्येय नसून सामाजिक न्याय मिळवण्याचा मार्ग आहे. जर सामाजिक न्याय नसेल तर ती लोकशाही कुचकामी आहे. मला स्वत:ला ज्या समाजात दुष्ट कर्मींना योग्य शिक्षा होते (व सत्कर्मींना ती होत नाही) अशा समाजात राहायला आवडेल. ही विशिष्ट घटना त्या आदर्शाशी अनुरूप आहे असं वाटतं. तसंच ती सामाजिक न्यायाच्या दिशेला जायला उत्तेजक ठरेल असंही वाटतं.

मी दिलेली उदाहरणं ही नवीन चर्चा करणे वा आत्ताच्या चर्चेची व्याप्ति वाढवणे यासाठी नव्हती. प्रियालींनी मला अध्याहृत उत्तरं देऊन उद्देश स्पष्ट केला आहे. त्यावर कोणी आक्षेप घेतला नसल्यामुळे मी मौनं संमतिलक्षणं मानतो - मुळात हिंसा ही योग्य की अयोग्य हिंसा कोण (आपले की परके) करतं यावर ठरतं असं दिसतं.

[राजेश यांचे] प्रश्न स्थळ-काळाच्या तपशीलांबाबत प्रस्तुत घटनेशी साधर्म्य दाखवत नसल्याने

[कंस माझा]

शिवाय हिंसा वर म्हटल्याप्रमाणे काल-सापेक्ष आहे. (हा विचार मला थोडा अभिनव वाटला...पण असो...) आणि स्थळ-सापेक्षही (हा तर फारच अभिनव विचार). जर व्यक्ती - स्थळ - काळ निरपेक्षता अशा झडून जायला लागल्या तर पुढे चर्चेचं प्रयोजन काय असा विचार येतो.

असो. तुमचं चालू द्यात.

व्यक्तिगत मताचे सामान्यीकरण

मुळात हिंसा ही योग्य की अयोग्य हिंसा कोण (आपले की परके) करतं यावर ठरतं असं दिसतं.

मुळीच नाही. आपल्यांची हिंसा योग्य आहे असे 'सर्व' उपक्रमींना वाटत नसावे. काश्मीरमधले मानवाधिकारांचे उल्लंघन असो किंवा अफगानिस्तानातील उल्लंघन असो आपपरभाव न वापरता योग्यायोग्यता ठरवता येते, अन्यथा भारतात न्यायमुर्ती तारकुंडे नसते नाही अमेरिकेत युद्धास विरोध करणारे लोक. शिवाजी महाराजांनी ज्या लढाया केल्या त्यांस स्थल-कालसापेक्ष काही कारणे आहेत, ती कारणे विचारात घेणे गरजेचे आहे. त्यात अभिनव काय आहे? काळ्या-पांढर्‍याचा हिशोब स्टॅटिक नाही. (उत्क्रांतीत जरा मानवी नैतिकतेलाही स्थान द्याना राव.)

तुमचं चालू द्यात.

काय चालू द्या?

बरेवाईट

इथल्या बहुतेकांच्या मते, हे सर्व वाईट आहेत.

चूक. :-) बरे वाईट हे सापेक्ष असते हे वरील काही प्रतिसादांवरून दिसलेच. :-)

१. शिवाजीने (बिचाऱ्या!) औरंगजेबाला ठरवून मारले. -> योग्य. शिवाजी आपला. औरंगजेब परका.
२. भारताने पाकिस्तानवर हल्ला करून त्याचे दोन तुकडे केले. १९७१ -> योग्य. भारत आपला, पाकिस्तान परका.
३. आझाद हिंद सेनेने इंग्रजांवर हल्ला केला. -> योग्य. आझाद हिंद सेना आपली. इंग्रज परके.
४. गझनी-महंमदाने सोमनाथ लुटले. -> अयोग्य. सोमनाथ आपले. महंमद परका.
५. मराठ्यांनी अटकेपार आक्रमक दौड मारली. -> योग्य. मराठे आपले.
६. अमेरिकेने अफगाणिस्तानावर आक्रमण केले. -> अमेरिकन नागरीकत्व घेतलेल्यांना अमेरिका आपली वाटेल. अन्यथा, दोन्ही परके. तरीही एका पारड्यात अफगाणिस्तान असल्याने अमेरिका योग्य.
७. बलात्कार करेल, छेड काढेल, या शंकेने तरुणीने तरुणाच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारला. ->

तरुण तुमचा भाऊ असेल तर अयोग्य. मुली फाजील असतात. एखादा मुलगा जवळ काय आला लगेच छेड काढेल अशी शंका बाळगतात. ऐश्वर्या रायच जशा. ;-)
तरुणी तुमची बहिण असेल तर योग्य. अशा फाजील मुलांना दोन चार रट्टेही दिले पाहिजेत. कराटे येत असते तर पेपर स्प्रे मारल्यावर दोन चार हातही मारायला हवे होते. :-)

माणसाला आपल्या मतलबाचे पाहायचे असते. मग आपल्या पायाखाली अयोग्य चालले असेल ते दिसत नाही. मात्र, लांबवर उभे राहून दुसर्‍यांवर टिका करणे सोपे असते. मला वाटते हे सर्वांसाठीच लागू आहे.

प्रामाणिकपणाबद्दल आभार

प्रियाली यांचे...

मात्र, लांबवर उभे राहून दुसर्‍यांवर टिका करणे सोपे असते. मला वाटते हे सर्वांसाठीच लागू आहे.

"हे लांबवर म्हंजे 'हस्तिदंती मनोऱ्यातून' का रे भाऊ?"
कारण आधी मी हा शब्दप्रयोग वापरला तो लोकांना पटलेला, आवडलेला दिसला नाही.

डिस्क्लेमर

शिवाजीने (बिचाऱ्या!) औरंगजेबाला ठरवून मारले. -> योग्य. शिवाजी आपला. औरंगजेब परका.

वरील वाक्यातील घोळ माझ्या लक्षात आला नाही. क्षमस्व! शिवाजीने अफझलखानाला मारले असे हवे. कोणा बिचार्‍याची ;-) दिशाभूल होऊ नये म्हणून हा डिस्क्लेमर टाकत आहे.

ही खरी आमचीच चूक!

प्रियालींचा श्रेय बळकवण्याचा प्रयत्न काही आंम्हास आवडला नाही...

.

.

अवांतर?

"माय नेम इज खान"ला पाठिंबा देण्यासाठी चित्रपट पाहायला जायला संजय निरूपम, रमेश बागवे आणि इतर यांना बरा वेळ मिळाला? मला खरे तर हा चित्रपट पाहायला जायचे आहे, पण वेळ शोधून शोधून काढावा लागतो. यांना त्यांच्या कामांमधून बरा वेळ मिळतो ?!

ह्या अवांतराचा काय अर्थ आहे? ते इथे देण्याचे प्रयोजन काय? चित्रपट पहाण्याइतका वेळही लोकांना मिळू नये असे का बरे वाटते? तसे असते तर चित्रपट व्यवसाय चाललाच नसता, असे वाटत नाही का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

कसलेच

कसलेच प्रयोजन खरे तर नाही! ह्या चर्चेचे तरी काय प्रयोजन आहे? तुम्ही आम्ही इथे किंवा कुठच्याही मराठी संकेतस्थळांवर लिहीण्याचे तरी काय प्रयोजन आहे?

तुम्ही तरी अवांतर तेवढे पाहून बाकी मी जे लिहीले आहे त्यावर चर्चा न करण्याचेही प्रयोजन कळले नाही, बहुदा काहीतरी कारण दिसते आहे!
तरी एवढा प्रश्न असल्यास तुम्ही वेगळी चर्चा चालू करा. मी ज्या संकेतस्थळांवर लिहीते त्यांची नावे घेऊन लिहा, तर मग मी त्यात माझ्या विचारांवरून काही लिहीण्यासारखे असल्यास लिहीन. इत्यलम्.

नविन चर्चा कशाला?

तुमच्या प्रतिसादात पटकन उत्तर द्यावे असे काहीही आढळून आले नाही. (नंतर काही सुचल्यास नक्की लिहीन) अवांतर मात्र चांगलेच अस्थानी आणि असंबद्ध असल्याने लगेच उठून दिसले, म्हणून प्रथम त्यावर प्रतिसाद दिला.
आता असे प्रत्येक अवांतरावरुन नविन चर्चा सुरू केली तर अवघड होईल. कुणी कुणाला प्रतिसाद देण्याची गरजच राहणार नाही.
चित्राताईंना प्रतिसाद 'नविन चर्चा', त्यावर वसुलिंना उत्तर 'नविन चर्चा', असे चालू राहिले तर नुसत्याच चर्चा घडत राहतील प्रतिसाद मात्र शून्य.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

कायदा हातात घेणे

श्रीरामसेनेने मिडीयासमोर केलेली हिंसा आणि प्रस्तुत प्रसंगातली हिंसा या दोन्ही गोष्टी लोकशाहीची प्रक्रिया मोडलेली असण्याच्या , कायदा-सुव्यवस्थेच्या एकंदर व्यंगात्म स्थितीच्या द्योतक आहेत. भारतात झुंडशाही चालते; पुरेसे गुंड जमवता आले तर कायद्याची यंत्रणा काहीही करत नाही; त्या यंत्रणेला सहज गप्प करता येते ही खरी शोकांतिका. मुतालिकांच्या विरोधात झालेली हिंसा ही, त्यांनी आणि त्यांच्या सेनेने केलेल्या हिंसेपेक्षा अधिक वाईट किंवा अधिक योग्य नाही. आणि या दोन्ही घटना इतरत्र घडत असलेल्या घटनांपेक्षा वेगळ्या नाहीत. अशा स्वरूपाची झुंडशाही शिवसेना-मायनेमइजखान प्रकरणात सुद्धा पहायला मिळते आहे.

थोडक्यात, पात्रे बदलतात, स्थल-काल बदलतात , प्रसंग बदलतात , प्लॉट् मात्र तोच राहातो , बघे तेच रहातात , इतकेच.

गोंधळ

मुतालिकांच्या विरोधात झालेली हिंसा ही, त्यांनी आणि त्यांच्या सेनेने केलेल्या हिंसेपेक्षा अधिक वाईट किंवा अधिक योग्य नाही.

म्हणजे काय?

एखाद्याला चिमटा काढणे आणि खून करणे ह्यातला फरक तुम्ही मानता की नाही? (चिमटा काढला काय आणि खून पाडला काय दोन्ही घटना म्हणजे एखाद्याची कळ काढणेच, असे आपण म्हणतो का?)

कायदासुद्धा वेगवेगळ्या गुन्ह्यांना वेगवेगळी शिक्षा सुनावतो. चोरी करणे आणि खून पाडणे ह्या दोन्ही गोष्टी गुन्हेच आहेत पण म्हणून दोन्हीला एकच शिक्षा नाही. महिलांना मारहाण करणे आणि तोंडाला काळे फासणे ह्या गोष्टी तुम्हाला एकाच स्तरावर दिसता आहेत म्हणजे तुमचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतो.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

ठीक

या दोन घटनांचे गांभीर्य वेगवेगळे आहे. मान्य.

मुद्दा असा की, महिलांना मारहाण करणार्‍यांना योग्य ती कडक शिक्षा प्रस्तुत व्यवस्थेमधे झालेली आहे असे दिसत नाही. (मला तर या संपूर्ण घटनेचा तपशील अज्ञात आहे. परंतु झालेली नसावी असे मी मानतो. त्यामुळे मारहाण झाली , शिक्षा झाली नाही इत्यादि इत्यादि गोष्टी धरूनच चालतो आहे. ) त्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून काळे फासण्यात आले - पर्यायाने परत कायदा हातात घेऊन हिंसा करण्यात आली. या संदर्भातले माझे बाकीचे विवेचन वर आलेले आहेच.

असो. माझ्या मूळ मुद्द्याला प्रकाशात आणल्याबद्दल आभारी आहे.

आनंद वाटला पण निंदनीय

श्री मुतालिक यांना कशी का होईना शिक्षा झाली म्हणून आनंद वाटला पण क्षणैकच. जरा व्यापकपणे पाहील्यास हे कृत्य निंदनीय वाटते. महाराष्ट्राला ठाकरे कुटूंबियांनी अशा प्रकारच्या गुंडगिरीचे परिणाम काय होतात याचे चांगलेच धडे दिले आहेत/ देत आहेत.

असेच म्हणतो.

आनंद वाटला पण निंदनीय. झुंडशाहीला झुंडशाहीने उत्तर ही बाब लोकशाहीला मारक आहे. जर आपण लोकशाही स्विकारली आहे तर त्याचे तत्व स्वीकारायला हवे.
प्रकाश घाटपांडे

दोन वेगळे मुद्दे, वेगळ्या भाषा...

आपण एक विशिष्ट तत्वप्रणालीचा - लोकशाहीचा - स्वीकार केला आहे. याचा अर्थ आपण एक आदर्श प्रक्रिया व आदर्श परिस्थिती ही ध्येय म्हणून स्वीकारली आहे. यात कायदा हातात घेण्याच्या सर्वच कृती घृणास्पद, झुंडशाही त्याज्य. ही आदर्श व्यवस्था झाली. पण भारतात ती सध्या नाही. भारतात आक्रमकता ही संदेश पाठवण्याची "भाषा" आहे. पण झुंडशाही रोखायची असेल, तिला मर्यादा घालायची असेल, तिला "यापुढे जायचं नाही" असा संदेश पाठवायचा असेल, तर तीच भाषा वापरावी लागते. भाषेतच बदल करायचा, तर ते सांगणं सुद्धा आजच्याच भाषेत होणं स्वाभाविकच आहे. slippery slope, means and ends, violence for peace.. वगैरे अर्गुमेंट्स आहेत, पण तरीही अन्यायाचा प्रतिकार करा असा तुमचा आतला आवाज सांगत असेल तर?

या दोन्ही गोष्टी लोकशाहीची प्रक्रिया मोडलेली असण्याच्या , कायदा-सुव्यवस्थेच्या एकंदर व्यंगात्म स्थितीच्या द्योतक आहेत.

सद्य परिस्थिती काय आहे याबाबत वाद नसावा. ती वाईट आहे हा एक मुद्दा झाला. बंद पडलेल्या गाडीला धक्का मारून स्टार्ट करावी लागते हे नामुष्कीचं लक्षण आहे, कबूल. ती चावी फिरवल्याबरोबर सुरू झाली पाहिजे, हेही मान्य. पण जोपर्यंत ती बंद आहे तोपर्यंत मेकॅनिककडे नेण्यासाठी काय करायचं हा दुसरा प्रश्न आहे. सद्यस्थिती समर्थपणे बदलायची कशी?

आजची परिस्थिती वाईट आहे असं म्हणून धुमसत बसणं; किंवा धक्के न मारता नुसती न चालणारी चावी फिरवत, नव्या आदर्श भाषेत समजावून सांगणं हे दोन्ही पर्याय निरुपयोगी वाटतात.

ज्यांना हे चूक वाटतंय त्यांनी काळे फासून या विषयाला जितकी प्रसिद्धी मिळाली, जितकं जनमत जागृत झालं, तितकंच परिणामकारक दुसरं काय करता येईल हा पर्याय सुचवावा. नाही तर ते केवळ हस्तिदंती मनोर्‍यात बसून खालच्या ठिपक्यांविषयी केलेलं रुक्ष बोलणं होईल.

मुतालिक यांचं राजकीय भविष्य आणि या व्हॅलेंटाइन्स डे ला काय होतंय या लक्ष ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत असं वाटतं...

कायमच धक्कास्टार्ट

ज्यांना हे चूक वाटतंय त्यांनी काळे फासून या विषयाला जितकी प्रसिद्धी मिळाली, जितकं जनमत जागृत झालं, तितकंच परिणामकारक दुसरं काय करता येईल हा पर्याय सुचवावा.

अधोरेखित केलेला परिणाम निश्चितपणे झालाय असे खात्रीने सांगता येत नाही. या प्रकाराचे दुष्परिणामही विचारात घेणे गरजेचे आहे. एखाद्यास विरोध करायचा असल्यास गुंडगिरीने करावा, अशी मनोधारणा वाढीस लागत आहे. भारतात अनेक चळवळी सुरू आहेत. लोक शांतपणे विधायक मार्गांनी याचा विरोध करू शकतील. लांब जाण्याची गरज नाही. श्री घाटपांडे, श्री मोडक हे मालमत्ता हक्कांवर गदा आणल्यानंतर कशा चळवळी होऊ शकतात, याबद्दल अधिक माहिती देऊ शकतील. पर्याय सूचविता न येणे म्हणजे 'हस्तिदंती मनोर्‍यात' बसणे, हे गृहीतकाशी सहमत नाही.

बंद पडलेल्या गाडीस सुरू करता येत नसल्यास एक-दोनदा धक्के देणे ठीक आहे पण मेकॅनिककडे न जाता नेहमीच धक्के देणे हेही चुकीचे आहे. धक्का देणे सोपे पडते म्हणून त्याचे दूरगामी परिणाम लक्षात न घेतल्यास अधिक धोका संभवतो.

काय बोलणार...

हल्ली राजकिय चर्चांवर प्रतिसाद देणे अवघड झाले आहे. :) प्रत्येकालाच आपला मुद्दा बरोबर वाटतो आणि बरोबर असणारे मुद्दे अनेक आहेत. त्यामुळे प्रत्येक मुद्याला अनेक विरोधक आहेत. विरोध करणे जास्त प्रभावी झाले आहे. प्रत्येकाला आपली मांडी उघडी पडायची भिती आहे. म्हणून एकाची उघडी पडली की सगळे जण गलका करतात. कारण यांच्या मांड्यांवरचे लक्ष तिकडे जाईल.
येथे सगळे लोक लोकशाहीचा उदोउदो करताना दिसतात. साध्या संकेतस्थळांच्या लोकशाहीच्या चर्चा आणि कृत्ये काय आहेत हे अनेकांनी अनुभवले आहे. लोकशाहीची व्याख्या स्वतःला समजावता आली आणि आणखी काही जणांना पटवून देता आली तरी खुप झाले.

भारतात कोणी ही उठून काहीही करू शकते म्हणून भारताची लोकशाही महान आहे. मग तो मुतालीक असो, शहारुख असो वा कोणती सेना असो. प्रत्येकाचा उद्देश आपले अस्तित्व दाखवणे आणि कॅश करणे हेच झाले आहेत.

एखाद्याला भारतात प्रेम व्यक्त करायला अजुनही भिती वाटते अथवा एकीला कोणी प्रेम व्यक्त केल्यावर ते मान्य न केल्यास होणार्‍या परिणामांची भिती वाटते. या भितीला लोकशाही मदत नाही करु शकत. पण मग मुतालीक ने भिती घातली तर कोणाला तरी राग येतो. लगेच बिचारी लोकशाही एकदम कोणी बदमाशाने प्रपोज केल्याच्या भितीने दबून जाते. मग तिचे पाठीराखे येतात. त्याला भारतात मानवाधिकार अथवा कायदा म्हणतात. लोकशाही भितीमुक्त होते. मग पुढच्या वर्षी हे पाठीराखे अभय मिळाल्याच्या नशेत येतात आणि मुतालिकला काळे फासतात आणि परत मग लोकशाहीला भिती वाटते. अरे मग या लोकशाहीला अशी सारखी भिती का वाटते? का सगळेचजण तिच्यावर एकसारखे प्रेम नाहीत करत?

पाक्यांचा पुळका आणा, लोकशाही खुष, मुख्यमंत्री बदला, लोकशाही खुष, महागाई पेक्षा परप्रांतियांना संरक्षण देणे हे जास्त महत्वाचे आहे असे म्हणा, लोकशाही खुष. एक सेलिब्रिटी बना आणि लोकलमधून फिरा, लोकशाही खुष. पण त्याच लोकलमध्ये स्फोट होतो, कोणी येऊन गोळीबार करतो, त्यावेळी सुद्धा लोकशाही खुष. जेंव्हा कोणी मुतालिक सारखे गुंड जमा होतात तेंव्हा मात्र लोकशाही नाखुष.

असो, जाता जाता एकच प्रश्न पडतो की या महान लोकशाहीत लोकांना प्रेम व्यक्त करायला एकच दिवस का गरजेचा आहे? बाकीच्या दिवसांमध्ये लोकांना सुद्धा मग इतर दिवसांमध्ये लोकशाहीला वाटते तशी भिती वाटते का?






तीव्र आक्षेप

त्याची मानसिकता गांधीवधानंतर पेढे वाटणाऱ्यांच्या मानसिकतेपेक्षा वेगळी आहे काय?

गांधीवध? वध हा सबळांकडून दुष्टांचा होतो किंवा एखाद्या दुष्ट शासनकर्त्याकडून एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा होतो अशी माझी कल्पना आहे. राम खर-दूषणाचा वध करतो. बहुधा, ख्रिस्ताला क्रूसावर चढवल्याने त्याचा वध केला असे म्हणता येईल. (माझ्यामते ती देखील हत्याच आहे.) पण वध हा सांगून सवरून किंवा युद्धात केला जातो. आरोपीला वधस्तंभापर्यंत नेण्याचे दाखलेही दिसतील. भगतसिंगाच्या फाशीला वध म्हणता येईल का? किंवा म्हटले जाते का? नसल्यास,

एका ७४ वर्षांच्या निशस्त्र म्हातार्‍यावर अनपेक्षितपणे बंदूकीतून गोळ्या झाडणे हा वध कसा असू शकेल? ते भेकड कृत्य आहे.

सहमत आहे

गांधीहत्या असेच म्हटले पाहिजे. वध हा शब्द अयोग्य वाटतो.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

वध हत्या

>>गांधीहत्या असेच म्हटले पाहिजे. वध हा शब्द अयोग्य वाटतो.
सहमत. ज्यांनी खून केला त्यांनी (पक्षी त्यांच्या जवळच्यांनी) पण गांधीहत्याच (गांधीहत्या आणि मी: ले गोपाळ गोडसे) म्हटले आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

बरोबरच

तुमचे म्हणणे बरोबरच आहे. ह्या भेकड कृत्याला 'वध' म्हणणे चुकीचेच. 'गांधीवध' म्हणणाऱ्यांनीच पेढे वाटले होते, हे सत्य आहे. एक मानसिकता ह्या शब्दाशी निगडित आहे. ती अधोरेखित करण्यासाठी तो शब्द तिथे आवश्यकच आहे. फक्त तिथे उद्धरण चिन्हे टाकायला हवी होती. क्षमस्व. माझ्या विनंतीनुसार राहून गेलेली उद्धरणे टाकल्याबद्दल मी संपादंकाचा आभारी आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हम्म!

'गांधीवध' म्हणणाऱ्यांनीच पेढे वाटले होते, हे सत्य आहे. एक मानसिकता ह्या शब्दाशी निगडित आहे. ती अधोरेखित करण्यासाठी तो शब्द तिथे आवश्यकच आहे. फक्त तिथे उद्धरण चिन्हे टाकायला हवी होती.

आता कळले.

अनिल अवचट आणि गांधीवध

अठ्ठेचाळीस साली मी चार वर्षांचा होतो. गांधीवधानंतर उसळलेल्या दंगलीची थोडीफार आठवण आहे. ब्राह्माण मंडळी गांधीहत्येला ‘गांधीवध’ असे संबोधत असत. गावात नव्वद टक्के मराठे. माझे वडील त्यांचेच डॉक्टर. पण जमावाने आमचा दवाखाना फोडून उद्ध्वस्त केला. सकाळी मी घाबरत जरा जवळ गेलो, तर रस्त्याभर केसपेपर्स. रस्ता पांढराच दिसला. त्या काळात आम्ही कोणी घराबाहेर पडत नव्हतो. घरात सर्व घाबरलेले वातावरण. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. तो भीतीदायक सुन्नपणा मला अजूनही आठवतोय. नंतर जरा वाढत्या वयात कळले, की वडिलांना ठार मारायला लोक त्यांना शोधत होते. राजाराम पाटील आणि भगवंता पाटील या वडिलांच्या मित्रांनी त्यांना लपवले, म्हणून ते वाचले. नाहीतर आमचे-माझे-काय झाले असते, कोण जाणे. पुढं वातावरण निवळलं. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हा भेद बाजूला पडून गाव ढवळलं गेलं.

अनिल अवचटांच्या 'गांधीजी भेटत गेलेले' ह्या लेखातून.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

भेदक वास्तव...

गांधीवध म्हणणे अथवा तसे वाटणे अयोग्यच आहे. गांधीहत्या पण कुठल्याही अर्थाने समर्थनीय नाही. मात्र अवचटांच्या वरील उतार्‍यातील खालील वाक्यांमधून एक भेदक वास्तव समजते...

पण जमावाने आमचा दवाखाना फोडून उद्ध्वस्त केला. सकाळी मी घाबरत जरा जवळ गेलो, तर रस्त्याभर केसपेपर्स. रस्ता पांढराच दिसला. त्या काळात आम्ही कोणी घराबाहेर पडत नव्हतो. घरात सर्व घाबरलेले वातावरण. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. तो भीतीदायक सुन्नपणा मला अजूनही आठवतोय. नंतर जरा वाढत्या वयात कळले, की वडिलांना ठार मारायला लोक त्यांना शोधत होते.

असे हिंसात्मक प्रकार अनेक निष्पापांच्या बरोबर त्यावेळेस महाराष्ट्रात गांधीहत्येच्या नावाखाली खूप झाले. यातील अनेकजण हे गांधीवादी अथवा गांधीजींना मानणारे होते. माझे आजोबा देखील गांधीवादी होते आणि चरखा वापरायचे.... असो.

एकाने गांधीहत्या केली, इतरांनी गांधीवादाची हत्या केली आणि असले प्रकार लपवून केवळ गांधीजींच्या नावाने राजकारणी आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांनी आजही सुतकात असल्या सारखे गळे काढत बसत गांधीजींना प्रिय असलेल्या उरल्यासुरल्या सत्याची हत्या केली असे वाटते.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विचारांची हत्या

एकाने गांधीहत्या केली, इतरांनी गांधीवादाची हत्या केली आणि असले प्रकार लपवून केवळ गांधीजींच्या नावाने राजकारणी आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांनी आजही सुतकात असल्या सारखे गळे काढत बसत गांधीजींना प्रिय असलेल्या उरल्यासुरल्या सत्याची हत्या केली असे वाटते.

बरोबर. नेत्याच्या विचारांची हत्या अनुयायी करणारच. त्यात नविन ते काय? जगात असा कोणता नेता आहे, ज्याच्या विचारांची हत्या त्याच्याच अनुयायांनी केलेली नाही? पण म्हणून त्याचे खापर नेत्यावर फोडले जाणे हे अयोग्य आहे. अनेकांचा गांधीद्वेष त्यातूनच येतो असे वाटते.

असे हिंसात्मक प्रकार अनेक निष्पापांच्या बरोबर त्यावेळेस महाराष्ट्रात गांधीहत्येच्या नावाखाली खूप झाले. यातील अनेकजण हे गांधीवादी अथवा गांधीजींना मानणारे होते. माझे आजोबा देखील गांधीवादी होते आणि चरखा वापरायचे.... असो.

तुम्ही आजोबांचा वारसा पुढे चालवून त्या हल्लेखोर भ्याडांना उत्तर दिले पाहिजे. गांधींची हत्या होईल पण त्यांच्या विचारांची होणार नाही हे दाखवून देण्यासारठी याहून मोठी संधी कोणती?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

संधी

नेत्याच्या विचारांची हत्या अनुयायी करणारच. त्यात नविन ते काय? जगात असा कोणता नेता आहे, ज्याच्या विचारांची हत्या त्याच्याच अनुयायांनी केलेली नाही?

कृपया माझ्या प्रतिसादातील वाक्ये नीट वाचावी ही विनंती. मी त्या मधे गांधीजींच्या बाबतीत त्यांच्या विचारांची हत्या अनुयायांनी असे म्हणलेले नाही. मात्र गांधीजींचे नाव घेत हिंसा केली ज्याच्याकडे राजकारणी आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांनी डोळेझाक केली असे म्हणले आहे.

पण म्हणून त्याचे खापर नेत्यावर फोडले जाणे हे अयोग्य आहे. अनेकांचा गांधीद्वेष त्यातूनच येतो असे वाटते.

ज्या हिंसक पद्धतीने प्रसंग घडलेत त्याच्या बद्दल काही न वाटता अथवा लिहीता , "त्यात नवीन काय", इतकेच म्हणणे आणि केवळ ज्यांचा कुणाचा गंधीद्वेष आहे इतकेच सिद्ध करण्याची धडपड करणे हे दुर्दैवी आहे. असो, व्यक्ती तितक्या प्रकृती.

तुम्ही आजोबांचा वारसा पुढे चालवून त्या हल्लेखोर भ्याडांना उत्तर दिले पाहिजे. गांधींची हत्या होईल पण त्यांच्या विचारांची होणार नाही हे दाखवून देण्यासारठी याहून मोठी संधी कोणती?

मी करतोच. (एक सुतकताई सोडून :-) ) म्हणूनच ज्यातील् जे चांगले ते घेतो. कुणाचाच द्वेष करत नाही की कुचेष्टा... मात्र हे फक्त माझे काम नाही तर गांधीजींना जे मानतात त्यांचे आहे. तुम्ही काय करता हे जाहीर केल्यास आमच्यासारख्यांना अजून स्फुर्ती येईल.

किमान आजचा पुण्यातील बाँबस्फोट तरी येथे हिंसेच्या निषेधासंदर्भातील धाग्यात निषधार्ह वाटतो का ते कळवावे ही विनंती.

धन्यवाद

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

या कोणत्या ताई?

मी करतोच. (एक सुतकताई सोडून :-) )
सुतक असे मुलीचे नाव असते? हां हां... सूतकताई होय! आत्ता कळाले!
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

धन्यवाद दादा :-)

सूतकताई होय! आत्ता कळाले!

धन्यवाद, कुणाचे शब्दात चुकते तर कुणाचे शेरोशायरीत... चालायचेच.

-------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

कुचेष्टा

कृपया माझ्या प्रतिसादातील वाक्ये नीट वाचावी ही विनंती. मी त्या मधे गांधीजींच्या बाबतीत त्यांच्या विचारांची हत्या अनुयायांनी असे म्हणलेले नाही. मात्र गांधीजींचे नाव घेत हिंसा केली ज्याच्याकडे राजकारणी आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांनी डोळेझाक केली असे म्हणले आहे.

गांधींचे नाव घेत हिंसा केली म्हणजेच त्यांच्या (अहिंसेच्या) विचारांची हत्या केली नाही का? आणि कोण बरे हे तथाकथित बुद्धीवादी ज्यांनी कायम डोळेझाक केली?

ज्या हिंसक पद्धतीने प्रसंग घडलेत त्याच्या बद्दल काही न वाटता अथवा लिहीता , "त्यात नवीन काय", इतकेच म्हणणे आणि केवळ ज्यांचा कुणाचा गंधीद्वेष आहे इतकेच सिद्ध करण्याची धडपड करणे हे दुर्दैवी आहे. असो, व्यक्ती तितक्या प्रकृती.

मूळ मुद्दा हा गांधीवादाचे नाव घेऊन त्यांच्याच विचारांची पायमल्ली करणे हा होता, ज्यात नविन काहीच नाही. 'एकाने गांधीहत्या केली, इतरांनी गांधीवादाची हत्या केली 'हाच मुद्दा ठसवायचा होता ना? मग त्यात नविन काहीच नाही. हिंसा किती झाली त्यामूळे कुणाचे किती नुकसान झाले ही उपचर्चा होईल, त्यावर इथे कशी काय टिप्पणी करता येईल?

मी करतोच. (एक सुतकताई सोडून :-) ) म्हणूनच ज्यातील् जे चांगले ते घेतो. कुणाचाच द्वेष करत नाही की कुचेष्टा... मात्र हे फक्त माझे काम नाही तर गांधीजींना जे मानतात त्यांचे आहे. तुम्ही काय करता हे जाहीर केल्यास आमच्यासारख्यांना अजून स्फुर्ती येईल.

'तुम्हाला' जे चांगले वाटते ते घेता. तसे सगळेच म्हणतात. वाईट कशाला कोण घेईल? द्वेष करत नाही कुचेष्टा करत नाही असेही 'तुम्हाला' वाटते. ह्याच धाग्यावर एका सदस्याला आपण शेरोशायरीतली जुनी चूक उकरुन डिवचले आहे, ती काहींच्या दृष्टीने कुचेष्टाच ठरू शकते. राहिला प्रश्न मी काय करतो?आमच्यावर कधी काळी अन्याय झाला, कुणी आमचेही घर पेटवायचा प्रयत्न केला ह्याविषयी मी 'आज' (संदर्भ नसताना/गरज नसताना) गळे काढत नाही.

किमान आजचा पुण्यातील बाँबस्फोट तरी येथे हिंसेच्या निषेधासंदर्भातील धाग्यात निषधार्ह वाटतो का ते कळवावे ही विनंती.

निषेधासंबधीत धाग्यात निषेधार्ह म्हणजे काय? समर्थनीय का? पुण्यातले स्फोट् इथे कसे काय आले? पुण्यातले स्फोट, सतीश शेट्टींचा खून, मुंबईवर हल्ला ह्या सगळ्यावर इथेच संताप नोंदवायचा का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

उत्तर

गांधींचे नाव घेत हिंसा केली म्हणजेच त्यांच्या (अहिंसेच्या) विचारांची हत्या केली नाही का?

गांधीचे नाव घेतले म्हणजे गांधीवादी होत नसतात.

मूळ मुद्दा हा गांधीवादाचे नाव घेऊन त्यांच्याच विचारांची पायमल्ली करणे हा होता, ज्यात नविन काहीच नाही.

अच्छा! म्हणजे ते काही विशेष महत्वाचे नाही तर...मग गांधीजींवरून काहीच चर्चा करायला नको असे म्हणायचे आहे का? माफ करा, पण ताटात तोंडी लावायला जसे लोणचे घेतले जाते, तसा काहीसा गांधीवाद अथवा गांधीजी आहेत असे म्हणायचे आहे का? गांधीवाद नीट पाळला जात नाही, त्यात भोंदूगिरी होत आहे, फुकटचे नाव घेऊन त्याचा आजही वैचारीक हिंसेला वापर होत आहे या बद्दल खेद वाटायच्या ऐवजी, त्यात नविन काहीच नाही असे म्हणावेसे वाटणे हे दुर्दैवी आहे.

ह्याच धाग्यावर एका सदस्याला आपण शेरोशायरीतली जुनी चूक उकरुन डिवचले आहे, ती काहींच्या दृष्टीने कुचेष्टाच ठरू शकते.

एखादी गोष्ट जर समजून सांगितली आणि त्यामुळे गंभीर विषयाच्या चर्चेतील विषयाला धरून काहीच न लिहीता, होणारे "ताई" वगैरेचे अवांतर टळणार असेल तर रे समजावणे असते, कुचेष्टा नाही. तसे कुणाला वाटले तर तो त्यांचा गैरसमज आहे. माझ्या मनात तसे काही नाही...

निषेधासंबधीत धाग्यात निषेधार्ह म्हणजे काय? समर्थनीय का? पुण्यातले स्फोट् इथे कसे काय आले? पुण्यातले स्फोट, सतीश शेट्टींचा खून, मुंबईवर हल्ला ह्या सगळ्यावर इथेच संताप नोंदवायचा का?

नका नोंदवूत. मात्र आपली मते अवश्य नवीन चालू केलेल्या चर्चेत मांडावीत ही विनंती.

धन्यवाद

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

नक्कीच झाले

असे हिंसात्मक प्रकार अनेक निष्पापांच्या बरोबर त्यावेळेस महाराष्ट्रात गांधीहत्येच्या नावाखाली खूप झाले. यातील अनेकजण हे गांधीवादी अथवा गांधीजींना मानणारे होते.

याबरोबरच मूळ लेखातील "राजाराम पाटील आणि भगवंता पाटील या वडिलांच्या मित्रांनी त्यांना लपवले, म्हणून ते वाचले." हे वाक्यही नजरेस पडले असेलच. गांधी हत्येच्या काळात जे झाले ते निश्चितच अयोग्य होते. त्याची भलावण करताना आज कोणी दिसत नाही परंतु काहीजण ती भरलेली खपली आजही काढण्याचा प्रयत्न करतात असे दिसून आले आहे. गांधीहत्येनिमित्त अनेक निष्पापांना हिंसेला सामोरे जावे लागले परंतु पुढे भविष्यात त्याचा कित्ता गिरवला गेला नाही. (कृपया, इंदिरा गांधींचे उदाहरण नको. दोघा गांधींचा काही एक संबंध नाही.) नथुरामच्या फॅनक्लबबाबत मात्र तसे म्हणता येत नाही.

एकाने गांधीहत्या केली, इतरांनी गांधीवादाची हत्या केली आणि असले प्रकार लपवून केवळ गांधीजींच्या नावाने राजकारणी आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांनी आजही सुतकात असल्या सारखे गळे काढत बसत गांधीजींना प्रिय असलेल्या उरल्यासुरल्या सत्याची हत्या केली असे वाटते.

गांधीहत्या झाली नसती, एकाने केली नसती, जमावाने केली असती तरीही कालांतराने गांधीवादाची हत्या झालीच असती. हे असे कोणत्या लोकोत्तर नेत्याबाबत होत नाही तेही सांगावे. म्हणजे, एकट्या गांधीजींना आणि गांधीवाद्यांना टार्गेट केले आहे असे तरी वाटणार नाही. :-) शिवाजी महाराजांच्या नावाखाली आणि रामाच्या नावाखाली जो सावळा गोंधळ चालतो त्याविषयी न बोललेले बरे.

कारण

गांधी हत्येच्या काळात जे झाले ते निश्चितच अयोग्य होते. त्याची भलावण करताना आज कोणी दिसत नाही परंतु काहीजण ती भरलेली खपली आजही काढण्याचा प्रयत्न करतात असे दिसून आले आहे.

गांधीहत्येनंतरच्या हिंसाचाराची आज कोणी भलावण करत नसतील, पण सतत गांधीहत्या हा विषय आणायचा त्यावरून जातीवरून असे संदर्भ देयचे की आजही खपली काय जखम चिघळतच रा़हणार. अशावेळेस, नाण्याची दुसरी बाजू अर्थात "गांधीहत्येनंतरचा हिंसाचार", दाखवावी लागते.

शिवाजी महाराजांच्या नावाखाली आणि रामाच्या नावाखाली जो सावळा गोंधळ चालतो त्याविषयी न बोललेले बरे.
दोन चूका मिळून एक बरोबर होत नाही. जे चूक वाटते त्यावर अवश्य टिका करावी.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

हम्म!

पण सतत गांधीहत्या हा विषय आणायचा त्यावरून जातीवरून असे संदर्भ देयचे की आजही खपली काय जखम चिघळतच रा़हणार. अशावेळेस, नाण्याची दुसरी बाजू अर्थात "गांधीहत्येनंतरचा हिंसाचार", दाखवावी लागते.

सतत गांधीहत्या हा विषय येण्यापेक्षा सतत गांधीहत्येची भलावण हा विषय पाहिलेला आहे. असो. आपापला दृष्टीकोन.

अशावेळेस, नाण्याची दुसरी बाजू अर्थात "गांधीहत्येनंतरचा हिंसाचार", दाखवावी लागते. -- दोन चूका मिळून एक बरोबर होत नाही.

इतरांनी केली तर चूक. आपण केले तर बरोबर. अजब न्याय आहे. असो.

चूक-बरोबर

सतत गांधीहत्या हा विषय येण्यापेक्षा सतत गांधीहत्येची भलावण हा विषय पाहिलेला आहे. असो. आपापला दृष्टीकोन.

"गांधीवध" हा चुकीचा शब्द वापर जो वापर मला देखील मान्य नाही पण मात्र गांधीहत्या म्हणत, कधी इतर विचार, पुढारी, संघटना आणि जातींना नावे ठेवल्याचे मात्र सातत्याने दिसते. असो. नक्कीच आपापला दृष्टीकोन! (या वाक्याशी मात्र सहमत! :-) )

अशावेळेस, नाण्याची दुसरी बाजू अर्थात "गांधीहत्येनंतरचा हिंसाचार", दाखवावी लागते. -- दोन चूका मिळून एक बरोबर होत नाही.

इतरांनी केली तर चूक. आपण केले तर बरोबर. अजब न्याय आहे. असो.

मी दोन चुका मिळून एक बरोबर होत नाही हे सर्वप्रथम शिवाजी आणि रामाच्या वाक्यासंदर्भात लिहीले होते. जर त्यांचे अनुयायी चुकीचे वागत असले तर गांधीजींचे वागले तर काय बिघडले असा कुठेतरी अर्थ, "हे असे कोणत्या लोकोत्तर नेत्याबाबत होत नाही तेही सांगावे", यावाक्यातून वाटला. मला खात्री आहे, आपण तशी भलावण करत नाही आहात, पण तो/हा प्रतिसाद ह्या संदर्भात ज्या पद्धतीने गेले ६० वर्षे गांधीजींचे नाव वापरत राजकारणी आणि तथाकथीत बुद्धीवाद्यांनी जनतेला भूलत ठेवले त्याच्याशी होता.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

नथुरामची पुण्यतिथी

गांधीहत्या म्हणत, कधी इतर विचार, पुढारी, संघटना आणि जातींना नावे ठेवल्याचे मात्र सातत्याने दिसते. असो. नक्कीच आपापला दृष्टीकोन!

याचबरोबर, नथुरामची पुण्यतिथी-जयंती अशा गोष्टींनाही खतपाणी घातले जाते, हे आपल्याला माहित असावेतच. असे करणारी काही "प्रसिद्ध" मराठी संकेतस्थळेही आहेत.

मी दोन चुका मिळून एक बरोबर होत नाही हे सर्वप्रथम शिवाजी आणि रामाच्या वाक्यासंदर्भात लिहीले होते. जर त्यांचे अनुयायी चुकीचे वागत असले तर गांधीजींचे वागले तर काय बिघडले असा कुठेतरी अर्थ, "हे असे कोणत्या लोकोत्तर नेत्याबाबत होत नाही तेही सांगावे", यावाक्यातून वाटला. मला खात्री आहे, आपण तशी भलावण करत नाही आहात,

कृपया, आपल्या मनातून गैर अर्थ काढू नका. जर गांधीहत्या म्हणत काही पुढारी संघटना जातींना नावे ठेवतात म्हणून मीही लगेच गरज नसतानाही गांधीवादी कसे तकलादू आहेत हे दाखवणार याला उद्देशून माझा प्रतिसाद आहे. अनेकदा, गांधी"वधाचे" नाव काढले रे की काढले (ज्याची भलावण वर्तमानात होताना दिसते) की मग आमच्यावरही अन्याय झाला होता (भूतकाळात, इतिहासात. ज्याची भलावण आज कोणीही करत नाही) असे सांगणारे प्रतिसाद येतात त्याला उद्देशून आहे.

मी दोन चुका मिळून एक बरोबर होत नाही

दोन चुका मिळून एक बरोबर होत नाही हे कुठेही आणि कधीही सत्य आहे. जर ते गांधींच्या अनुयायांना लागू आहे तर शिवाजी आणि रामाच्याही आणि त्याचबरोबर गांधीवधाची भलावण करणार्‍यांनाही आणि गांधीवधाचे नाव काढले म्हणून गांधीवाद तकलादू आहे हे दाखवणार्‍यांनाही. गेले ६० वर्षे गांधीचे नाव घेऊन दिशाभूल करणे आणि गांधीवध यांचा परस्परसंबंध तर अनाकलनीय आहे.जर गेली ६० वर्षे क्ष जमातीने गांधींची हत्या केल्याने तिला त्रास द्यावा किंवा छळ करावा असा प्रचार करण्यात आला असेल तर संदर्भ आवडतील.

नथुराम इ.

याचबरोबर, नथुरामची पुण्यतिथी-जयंती अशा गोष्टींनाही खतपाणी घातले जाते, हे आपल्याला माहित असावेतच. असे करणारी काही "प्रसिद्ध" मराठी संकेतस्थळेही आहेत.

नथुराम गोडसे यांची जयंती/पुण्यतिथी जर कोणाला साजरी करावीशी वाटत असेल तर त्यांना त्यापासून थांबवण्याचा काही कायदेशीर/नैतिक अधिकार आहे का? 'खतपाणी घातले जाते' मधून ही काही बेकायदेशीर कृती आहे की काय असा अर्थ निघू शकतो.

आणि ही काही एकुलती एक केस नाही. अफजल खानाने अनेकांवर अन्याय/अत्याचार केले, शिवाजीने अफजल खानाला मारले, तरी आज अफजल खानाच्या थडग्यावर ('समाधी' शब्द योग्य न वाटल्याने 'थडगे' हा शब्द tomb या अर्थाने) इमारत बांधून महत्त्व वाढवण्याचे प्रकार होत आहेत. (त्यातून अफजलखानवधाचे चित्र लावणे काही मुस्लिमांना गणपतीच्या मूर्तीवर दगडफेक, दंगल करण्याइतपत अपमानास्पद वाटू शकते.)

असो. थोडक्यात काय, शोधल्यास दोन्ही बाजूंनी टोकाची भूमिका असणारी (डिवाइजिव) अशी अनेक उदाहरणे सापडतील. दोन्हीकडच्या लोकांना आपापली भूमिका योग्य वाटते. आणि दोन्ही बाजूंच्या लोकांना आपापले मत उघडपणे मांडण्याचे स्वातंत्र्य आहे.

 
^ वर