ग्लोबल वॉर्मिंग वगैरे...

ग्लोबल वार्मिंग विषयी आपण जरा जास्तच संवेदनाशील झालो आहोत असं नाही वाटत? ठीक आहे, पृथ्वीचे तापमान फार वाढायला नको. आणि त्या तापमान वाढीत मनुष्याचा थोडासा हातभार लागलेला आहे हेही मान्य आहे...(किती आपोआपच होतय आणि किती मनुष्यजन्य हे नक्की माहीत नाही...) पण जर मनुष्यजातीवर या ग्रहाच्या तब्येतीची काळजी घ्यायची जबाबदारी असेल (दुसरं कोणीच नाही) तर तिला प्रथम आपली काळजी घ्यायला नको का? विमानातही संकटकाळी ऑक्सिजन मास्क प्रथम आपल्याला लावून नंतर लहान मुलांना लावावा अशी सूचना असते... कार्बन वाईट मान्य आहे पण वाफही वाईट (हायड्रोजन फ्युएल सेलवरच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे) म्हटले तर काय करणार? जर धूर होतो म्हणून आपल्या घरात प्रथम अन्न शिजवण्यासाठी लाकडाची चूल पेटवली नाही तर ते घर सुव्यवस्थित करून बिनधुराची ऊर्जासाधने शोधायची प्रक्रिया कशी सुरू होणार? पोट आधी भरायला नको? घर सांभाळायची शक्ती नको यायला?

मी या एकंदरीत प्रश्नाकडे अशा दृष्टीने बघतो की गेली चार अब्ज वर्षे या ग्रहावर काय परिस्थिती आहे याची काळजी करायला कोणी नव्हते. जगभर तापमान ७०+ पासून ते -१० पर्यंत वर खाली गेले, अब्जावधी प्रजाती नष्ट झाल्या. पर्यावरणाची निसर्गाने नासाडी केली तितकी करण्याची कल्पनाही करण्याची मानवाची औकाद नाही. जीवन त्यातूनही टिकले. आणि आत्ता कुठे मनुष्यजात निर्माण झाली व गेल्या काही दशकात पृथ्वीचा विचार करायला लागली तर तिचे कौतुक करण्याऐवजी तिच्यावर अपराधी भावनेचे ओझे का लादले जातेय? पर्यावरणवादींचे या बाबतीत ताळतंत्र कुठे तरी चुकते आहे असे वाटते.

या प्रश्नाला व त्यावरील चर्चेला विकसित देश विरुद्ध अविकसित देश अशीही छटा आल्याचे जाणवते. जगातल्या वीस/तीस टक्के लोकांनी गेल्या दोन शतकांत आपला विकास करून घेण्यासाठी वाटेल तशी निसर्गाची नासधूस केली (उरलेल्या सत्तर/ऐशी टक्क्यांना गुलाम करून) आणि आता तेच नाक वर करून, उच्च नैतिक भूमिका घेऊन "कार्बन वाईट इतकच काय वाफही वाईट" असे सांगतात व भारत, चीनसारख्या देशातले विचारी लोक ते ऐकून घेतात (नशीब सरकारे तरी ऐकत नाहीत) यासारखी नामुष्की नाही.

जेव्हा टाटाची नॅनो येणार असे जाहीर झाले तेव्हा भारतातल्या प्रसिद्ध पर्यावरणवाद्यांनी "किती प्रदूषण होणार या कल्पनेने माझी झोप उडाली" असे म्हटले. अमेरिकेत गेली शंभर वर्षे लिटरला पाच-सात किलोमीटर देणार्‍या घरटी दोन-तीन गाड्या उडवून, जगाच्या पाच टक्के लोकसंख्येने मौज मारण्यासाठी खनिज तेलाचे निम्मे साठे संपवले - उरलेले ऐशी टक्के जग सायकलने, पायी, लोकलने, बसने प्रवास करत असताना... आणि आज याच देशातला गोअर भाषणे देऊन नोबेल पटकावतो, व त्याचे भारतीय साथी त्याला हो ला हो मिळवून लिटरला वीस किलोमीटर देणार्‍या नॅनोमुळे झोप उडवून घेतात...

कुठे तरी काही तरी चुकते आहे...

Comments

ऑथेण्टिक नसलेल्या माहितीचा स्फोट

सहमत आहे.

आता तर पचौरी यांच्या ऐकीव माहितीवर आधारित अतिरंजित अहवालाचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे आणखीच गोंधळ उडणार आहे.
तेलाचे साठे संपणार आहेत असे मीही शाळेत असल्यापासून ऐकतोय. (मला शाळा सोडून ३२ वर्षं व्हायला आली). त्याकाळी मुंबई हाय वगैरे नव्याने साठे सापडलेले होते. आजही कृष्णा गोदावरी खोर्‍यात गॅसचे का होईना साठे सापडत आहेतच.

वातावरणबदलाने पावसाचे प्रमाण बदलेल हे खरे पण ते वाईटच होईल असे समजून ओरड चालली आहे.
(बर्ड फ्लू/स्वाईन फ्लू वगैरे बाबतही अशीच हाईप तयार होत असते).

पाण्याची वाफ दोषी असेल तर ७०% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेल्या पृथ्वीवर रोज निर्माण होणारी नैसर्गिक पाण्याची वाफ किती आणि मानव निर्मित वाफ किती हा प्रश्नच आहे. तसेच शाकाहारी जनावरांच्या ढेकरेतून बाहेर पडणारा मिथेन किती आणि इतर मार्गांनी बाहेर पदणारा मिथेन किती?

असे असले तरी आपल्याकडून जे करायचे ते आपण करीतच राहूया.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

माहीती

आता तर पचौरी यांच्या ऐकीव माहितीवर आधारित अतिरंजित अहवालाचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे आणखीच गोंधळ उडणार आहे.

गोंधळ उडालेला आहेच त्यामुळे त्याच्याशी सहमत. मात्र म्हणून त्यात तथ्यच नाही असे समजणे मात्र गैर आहे. भारतातील हिमनग हे नक्की वितळत आहेत, त्याबद्दल जीऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडीयाचे संशोधन (डेटा कलेक्शन/ऍनॅलिसिस) हे क्लायमेट चेंज अथवा ग्लोबल वार्मिंग शब्द येण्याआधीपासूनच चालू आहे. त्याचे परीणाम कदाचीत आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष दिसतीलच असे नाही. मात्र आपल्या लगेचच्या पुढच्या पिढ्यांना मात्र नक्कीच पहायला मिळेल.

तेलाचे साठे संपणार आहेत असे मीही शाळेत असल्यापासून ऐकतोय. (मला शाळा सोडून ३२ वर्षं व्हायला आली). त्याकाळी मुंबई हाय वगैरे नव्याने साठे सापडलेले होते. आजही कृष्णा गोदावरी खोर्‍यात गॅसचे का होईना साठे सापडत आहेतच.

शाळेत सांगितले हे खरे पण ते कधी संपणार म्हणून सांगितले? साठे सापडत असले तरी ते पुरेसे आहेत का? नसल्यास आपली अर्थव्यवस्था तयार करताना ती कशी तयार करता येईल ह्याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. पूर्ण तेलावर आधारीत अर्थव्यवस्था करणे शक्य आहे का? आज देखील हजार माणसांच्या मागे तेलाचे देशांतर्गत उत्पादन यात आपण अमेरिकेपेक्षा बरेच मागे आहोत. त्यात अमेरिका ही बाहेरचे तेल जास्त वापरते, तितके वापरणे आपल्याला शक्य देखील नाही. असे असताना त्यांनी प्रदुषण केले मग आम्ही केले म्हणून काय बिघडले हे बोलून आपण काहीच साध्य करत नाही. नाधड तितकी कपॅसिटी ना धड नवीन तंत्रज्ञान. म्हणून भारत-चीन-ब्राझील-साऊथ अफ्रिका या देशांनी एकत्रीत जी तंत्रज्ञानाची मागणी केली आहे ती जास्त योग्य आहे. शिवाय ज्या प्रदुषणाचे परीणाम अमेरिकेने पण भोगले आहेत. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणी प्रमाणे त्यातून आपण शिकणे गरजेचे आहे कारण नाहीतर लोकसंख्या घनतेने आपल्याकडे अधिकच परीणाम घडू शकतात....

वातावरणबदलाने पावसाचे प्रमाण बदलेल हे खरे पण ते वाईटच होईल असे समजून ओरड चालली आहे.
तुम्ही काही चांगले परीणाम ऐकले आहेत का? असल्यास अवश्य सांगा. यावर अधिक लिहीता येईल पण तुर्तास इतकेच...मात्र बर्‍याचदा (पर्यावरणवादी नाही तर) या विषयातील शास्त्रज्ञ "सोप्या भाषेत/उदाहरणात) सांगतात त्याप्रमाणे, आपण जगत असलेली सृष्टी /निसर्ग म्हणजे टॉस केलेले नाणे छाप अथवा काटा म्हणून न पडता त्याच्या टोकावर (एजवर) उभे असल्यासारखी आहे. ह्यात अर्थातच सुलभीकरण आहे पण मुद्दा जो आहे तो संतुलनाचा आहे.

पाण्याची वाफ दोषी असेल तर ७०% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेल्या पृथ्वीवर रोज निर्माण होणारी नैसर्गिक पाण्याची वाफ किती आणि मानव निर्मित वाफ किती हा प्रश्नच आहे.
हे (पाण्याची वाफ दोषी असणे) मी काही ऐकलेले नाही. असे कोण म्हणते? माहीती अवश्य कळवा, कारण त्याचा पाठपुरावा करायला आवडेल. मात्र याचा संदर्भ जर समुद्राच्या पाण्याशी असला तर एक अथवा दोन डिग्रीच्या फरकाने माश्यांचे पॉप्युलेशन बदलते, समुद्रपातळी उंच होऊ लागते वगैरे आहेच. मालदीव बेटांचे काय होत आहे याची कल्पना असेलच...

तसेच शाकाहारी जनावरांच्या ढेकरेतून बाहेर पडणारा मिथेन किती आणि इतर मार्गांनी बाहेर पदणारा मिथेन किती?

हीच तर भानगड आहे... शाकाहारी जनावरांना अर्थात गायींना येथे त्यांचे नैसर्गिक अन्न खायला देत नाहीत. कारण त्यांना धष्टपुष्ट करून गोमांस तयार करायचे असते.त्याची बाजारपेठ मोठी आहे. येथे गायींच्या चार्‍यातपण गोमांस मिसळले जाते, शिवाय कॉर्न, सोयाबीन - अर्थात ज्यांचे नको इतके पिक येते त्याचा उपयोग म्हणून वापरले जाते. त्यात विविध इंजेक्शने दिली जातात. जे वर पावसासंदर्भात म्हणले तेच आहारा संदर्भात. संतुलन बिघडल्याने त्याचे परीणाम पण होणारच. गायींच्या पोटातले बॅक्टेरीया त्याला कसे रीऍक्ट करतात हे देखील त्यामुळे बदलते आणि परीणामी मिथेन वाढतो. अशा आहारातील फरकानेच मॅड काऊ डिसिज तयार झाला होता. आता त्यामुळे व्हर्माँट सारख्या राज्यातील शेतकरी गायींना चारा देऊ लागले आहेत आणि त्यावर संशोधन :-) करत त्यातून मिथेन कसा कमी तयार होतो हे देखील दाखवू लागले आहेत. भारतात उलट परीणाम आहे निकृष्ट खाणे अथवा उपाशी राहण्याने गायींचे त्रास वेगळे आहेत, परीणाम जरी समान होत असले तरी.

असे असले तरी आपल्याकडून जे करायचे ते आपण करीतच राहूया.
सपुर्ण प्रतिसादानंतर ही ओळ वाचल्यावर कधी तरी ऐकलेल्या मिष्कील ओळी आठवल्या... देवावर विश्वास नाही पण नक्की काहीच कळत नाही, म्हणून मग "देवळासमोरून जात असताना, थांबलो घटका दोन (पटकन नमस्काराची ऍक्शन करायला), कारण उद्या खरेच (मेल्यानंतर) भेटला तर त्याने विचारायला नको, आपण कोण?" ;) (कृ. ह.घ्या.)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पर्यावरण

>>वातावरणबदलाने पावसाचे प्रमाण बदलेल हे खरे पण ते वाईटच होईल असे समजून ओरड चालली आहे.
तुम्ही काही चांगले परीणाम ऐकले आहेत का? असल्यास अवश्य ....

सध्याची जीवसृष्टी अस्तित्वात येण्यास ग्लोबल वॉर्मिंग बर्‍याच अंशी जवाबदार आहे असे ऐकले आहे.

पाण्याच्या वाफेविषयी दुसरा प्रतिसाद लिहिला आहे.

आपल्याला जे करता येईल.....
मी स्वतः शक्यतो हे उपाय करीत असतो आणि त्याबद्दल घरच्यांचा रोषही ओढवून घेतो. उदा. इन्व्हर्टर लावल्याने विजेचा दुप्पट वापर होतो म्हणून इन्व्हर्टर लावत नाही आणि लोडशेडिंग चालू झाले की घरच्यांच्या नजरा झेलतो. पाणी तापवायला वीज वापरत नाही गॅसवर तापवतो. जवळ (२ किमी पर्यंत) चालत जातो (आणि व्यायामाचा फायदा घेतो).
आता गॅसगीझर ऐवजी सोलर गीझर लावायच्या प्रयत्नात आहे. सोलर इन्व्हर्टरच्याही प्रयत्नात आहे. वगैरे.....
आणि आता पचौरी प्रकरण झाले म्हणून हे करणे थांबविणार नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

एक चांगला नकाशा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सध्याची जीवसृष्टी अस्तित्वात येण्यास ग्लोबल वॉर्मिंग बर्‍याच अंशी जवाबदार आहे असे ऐकले आहे.

या संदर्भात ब्रिटीश हवामानखाते आणि इतर संस्थांनी तयार केलेला इंटरऍक्टीव्ह मॅप आणि त्यातील माहीती बघण्यासारखी आहे.

वरील नकाशा ब्राउजरमुळे दिसला नाही तर तो येथे पहाता येईल.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सहमत आहे.

चर्चेतल्या विचारांशी सहमत आहे. ऍल गोर वगैरे लोकांनी ह्याप्रकाराचा थोडा जास्तच बाऊ केला आहे असे वाटते. चर्चेच्या निमित्ताने बियॉन लॉम्बर्गची आठवण आली.

कुठे तरी काही तरी चुकते आहे, असे नक्कीच वाटते.

नैतिक प्रश्न वा तांत्रिक प्रश्न...

लॉम्बर्गचे विचार दाखवून दिल्याबद्दल आभार.

कधी कधी काही प्रश्न हे मुळात तांत्रिक स्वरूपाचे न राहाता त्यांच्या चर्चा भावनिक पातळीवर येतात व त्यांना नैतिक स्वरूप प्राप्त करून दिले जाते. त्यामागे प्रश्न सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग, इतर प्रश्नांच्या मानाने त्याचे महत्त्व याचा सम्यक विचार होण्याऐवजी नीतीमत्तेचा बडगा घेउन त्याने इतरांना व स्वतःला बडवण्याचे प्रकार दिसतात. पर्यावरणाचा प्रश्न त्या पातळीवर आलेला आहे असे वाटते. मानवी समाजात इतका वैचारिक कलकलाट असूनही "तरी कसे फुलतात, गुलाब हे ताजे?" असाच प्रश्न पडतो.

राजेश

अपराधबोध

उरलेले ऐशी टक्के जग सायकलने, पायी, लोकलने, बसने प्रवास करत असताना... आणि आज याच देशातला गोअर भाषणे देऊन नोबेल पटकावतो, व त्याचे भारतीय साथी त्याला हो ला हो मिळवून लिटरला वीस किलोमीटर देणार्‍या नॅनोमुळे झोप उडवून घेतात...

बरोबर. पण एकंदरच माणसाने आपल्या गरजा कमी करण्याची गरज असे वाटत नाही का? मुळात माणसाने एवढे शिकायलाच नको होते. विज्ञानाने एवढी प्रगती करायलाच नको होती, असे कधी कधी वाटून जाते. अपराधबोध तर झाला नसता!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बहुतांश विचार पटले.

बहुतांश विचार पटले.

मात्र असे वाटते की, सरसकट पर्यावरणवाद्यांना एका बाजूला न ठेवता, त्यांच्या चळवळीचे इतर काही विचारात घेता येणारे मुद्दे आहेत का ते पाहता येईल. तुमचा मुद्दा "ग्रीन हाऊस" बद्दल आहे ह्याचे भान ठेवत मला काही विचार मांडावेसे वाटतात-

आपल्याकडे पेट्रोलमधे रॉकेल टाकून बऱ्याच गाड्या चालवल्या जातात अशावेळी त्यांच्यामागे दुचाकीवरुन जाणे नकोसे वाटते. कालबाह्य झालेल्या तंत्रज्ञानाच्या टू-स्ट्रोक गाड्या आजही आपल्याकडे बनवल्या जातात त्याने नक्कीच प्रदुषण वाढते व एखाद्या शहरापुरते प्रदुषण विचारात घेता काहीतरी बदल व्हायला हवेत असेही वाटते.
तेलाच्या व्यापारात ज्यांचे हात गुंतलेले आहेत ते त्यांच्या नफ्याचा विचार करत तेलाच्या किंमती चढ्या ठेवण्याचा प्रयत्न करतात. अनेक गरीब देशांना त्यांची परकीय चलनाची गुंतवणूक अशा व्यापारात करावी लागते. ती गुंतवणूक तेलाच्या रुपाने आपण अक्षरशः जाळून टाकतो.

ज्यांना मानवाच्या अतिहव्यासाचा त्रास झाला आहे असे लोक नक्कीच पर्यावरणवाद्यांना पाठींबा देतात. युनियन कार्बाईड सारख्या कंपन्या अमेरीकेबाहेर का स्थापल्या गेल्या ह्याची जाणीव भोपाळकरांना चांगलीच झाली आहे. ते विसरुन कसे चालेल? पुण्यातील कचरा ज्या गावात टाकला जातो, त्यांच्या समस्या त्यांनाच जास्त बोचतात.

चेर्नोबिलमुळे विस्थापित झालेल्या लोकांना त्यांचे अनुभव आयुष्यभर चट्के देणारेच आहेत. अशा घटना जरी एखाद-दुसऱ्या असल्यातरी त्या महत्वपूर्ण आहेत व त्या पुन्हा आणि मोठ्या प्रमाणावर घडू नयेत ह्याची काळजी घेतली जावी हेच पर्यावरणवाद्यांचे लक्ष असेल तर त्यास पाठींबा दिलाच पाहिजे.

असे अनेक मुद्दे आहेत की, जे खोडले जाऊ नयेत असे वाटते.

पर्यावरणराव, जरा हसा की...

पर्यावरण स्वच्छ असावं, फारशा प्रजातींचा नाश होऊ नये, एकंदरीत निसर्गाला न दुखवता जगावं याला विरोध नाही. तत्त्व मान्यच आहे, पण त्याची अंमलबजावणी गंडलेली दिसते. प्रश्न संतुलनाचा आहे. व दृष्टीकोनाचा आहे. कार्बन वाढतोय, तापमान वाढतेय म्हटल्यावर झाडेही वाढणार या कल्पनेने तुम्ही आनंदी का होताना दिसत नाही? सगळ्यांतून वाईटच निघणार हा पक्का विश्वास का?

प्रदूषणाचा प्रश्न गेली शंभर वर्ष हळू हळू कह्यात येतोय. पुण्याची कसली गोष्ट सांगताय, मँचेस्टर व पिट्स्बर्ग मध्ये सर्व घरांवर, झाडांवर काळा धुराचा थर होता. आजकाल या "थराच्या" गोष्टी दिसत नाहीत. आणि हे बदललं पाहिजे हा विचार वाढलेला आहे. जागृती होतेय, प्रयत्न होताहेत, कायदे आहेत ... आणि इतकं असून आठ्या आणि तक्रारी वाढत का आहेत? एकदा तरी बसून शांतपणे दरडोई प्रदूषण किती कमी झालंय, कारखान्यांत काम करूनही जिवंत राहाणारे वाढले आहेत याची आकडेमोड करा - जिवाला थोडं बरं वाटून घ्या हो.

मानवजातीने तांत्रिक प्रगती केलेली असली तरी पर्यावरणाच्या प्रश्नावर काही करू शकेल इतकी तिची शक्ती नाही. छोट्या उपद्रवी शक्तीपासून मोठ्या विधायक शक्तीपर्यंत वाटचाल करणं आवश्यक आहे. त्यासाठी विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा विकास आवश्यकच आहे. भट्टी पेटवू, विटा भाजू व मग त्यातल्या काही विटांचं धुराडंही बांधू, काय? पण धूर होतो म्हणून भट्टीच पेटवायची नाही असं कसं चालेल?

गरजाच कमी करता आल्या तर कोणाला नको आहेत? पण हे स्थित्यंतर करताना ज्यांच्या मूलभूत गरजा भागलेल्या नाहीत त्यांच्या गरजा भागवण्याचीही गरज आहे. (फारच गरजा आल्या. कमी करायलाच पाहिजेत...गरजा जयजयकार...)

राजेश

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार...

प्रदूषणाचा प्रश्न गेली शंभर वर्ष हळू हळू कह्यात येतोय. पुण्याची कसली गोष्ट सांगताय, मँचेस्टर व पिट्स्बर्ग मध्ये सर्व घरांवर, झाडांवर काळा धुराचा थर होता. आजकाल या "थराच्या" गोष्टी दिसत नाहीत. आणि हे बदललं पाहिजे हा विचार वाढलेला आहे. जागृती होतेय, प्रयत्न होताहेत, कायदे आहेत ... आणि इतकं असून आठ्या आणि तक्रारी वाढत का आहेत? एकदा तरी बसून शांतपणे दरडोई प्रदूषण किती कमी झालंय, कारखान्यांत काम करूनही जिवंत राहाणारे वाढले आहेत याची आकडेमोड करा - जिवाला थोडं बरं वाटून घ्या हो.

I wish :-) मँचेस्टर (इंग्लंडमधील की न्यू हँपशायर मधील?) आणि पिट्सबर्ग (हे मी अमेरिकेतील समजत आहे, नसल्यास कृपया सांगावे) या दोन्ही बद्दल नंतर कधीतरी. आज योगायोगाने महाराष्ट्र आणि प्रदूषणाबद्दल सकाळमधील बातमी वाचल्यावर हसा कसले, हसं होतय असे वाटले.

आणि ही बातमी फक्त सांडपाण्याच्या संदर्भातील आहे. इतर प्रदुषणाबद्दल नाही. ते किती आहे हे समजून घेण्याची अजून आपल्याकडे (भारतात) जास्त लक्षच दिले जात नाही असा अनुभव आला आहे. ("आपण काय बाबा, अजून विकसीत होत आहोत, अजून जलशुद्धीकरण आणि मलनि:सारण याचेच काम भरपूर आहे... इतर ठिकाणी लक्ष देयला वेळ कुठे" असे एकदा सुनावले गेले होते... :( )

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

कळले नाही

कार्बन वाढतोय, तापमान वाढतेय म्हटल्यावर झाडेही वाढणार ...

हे कसे ?

झाडे कार्बन (म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड) खातात...

खाद्य वाढले की त्यावर जगणारे जीव वाढणार हे उघड आहे...
हा, हा वा हा दुवा पहावा शेवटच्या दुव्यामध्ये चांगली बातमी ही कशी थोडीशी वाईट आहे हे सांगण्याचा कसोशीने प्रयत्न आहे...

झाडे लावल्याने ग्लोबल वार्मिंग कसे कमी होऊ शकेल...काही अब्ज झाडे लावली तर प्रश्न सुटू शकेल.

http://www.angelfire.com/fl4/globalcooling/

राजेश

सहमती/ असहमती

श्री घासकडवी, लेखातील बर्‍याच मुद्द्यांशी (विकसित-विकसनशील, अल गोर वगैरे) सहमत आहे.

त्ता कुठे मनुष्यजात निर्माण झाली व गेल्या काही दशकात पृथ्वीचा विचार करायला लागली तर तिचे कौतुक करण्याऐवजी तिच्यावर अपराधी भावनेचे ओझे का लादले जातेय? पर्यावरणवादींचे या बाबतीत ताळतंत्र कुठे तरी चुकते आहे असे वाटते.

याबाबत मात्र असहमत आहे. मनुष्यजातीने गेल्या शतकात पर्यावरणावर परिणाम करणार्‍या अनेक गोष्टी केल्या आहेत. निसर्गाने केलेल्या बदलांएवढे हे बदल मोठे नसले तरी निसर्गाच्या तुलनेत किती कमी काळात हे बदल घडले आहेत हे ध्यानात घ्यायला हवे.

तापमानवाढ होते आहे का? किती मानवनिर्मीत आणि किती नैसर्गिक, तापमानवाढ होतच असल्यास मानवजातीस काही करणे शक्य होणार आहे का? या प्रश्नांवर चर्चा होतच आहे. तापमानवाढ हे निमित्त म्हणून का होईना प्रदुषणाविषयी (जी नि:संशय समस्या आहे) लोकांना संवेदनशील बनवत आहे, हेही नसे थोडके.

पर्यावरणवादी हा एक् 'धर्म्' बनला आहे

पर्यावरणवादी असणे मुळात चांगले आहे पण आजकाल हा एक धर्म बनला आहे. पर्यावरणवाद जागरुक वैज्ञानिक दृष्टी सोडून बाबागिरी करु लागला आहे. अमक्या एकाने सांगितले म्हणजे ते खरे मग त्यावर प्रश्न विचारणे, चर्चा करणे, प्रयोगांवर, वापरलेल्या डेट्यावर, निष्कर्षांवर शंका घेणार्‍याला पाखंडी म्हणून हिणवायचे असे प्रकार् फार् होत् आहेत्. चुका करणारे पर्यावरण् तज्ञ लोक् चूक कबूल न करता उलटे उर्मटपणे वागताना दिसतात. (उदा. पचौरी).
हौसे, नवसे, गवसे लोक् आपल्या फायद्याकरता तपमान वगैरे नोंदीत हवे ते सोयिस्कर् बदल् करुन् आपले संशोधन् प्रकाशित् करतात्, घसघशीत् अनुदान्, देणग्या, नोबेल वगैरे मिळवतात् आणि मग् कुणी खंडन् केले तर् आपले स्थान् वापरुन् त्याचा पराभव् करु बघतात्. ह्यामुळे खरे तर् सामान्य माणूस् ह्या रॅकेटपासून दूर् जाणार् आणि ह्या चळवळीचे त्यातून् नुकसानच होणार.

सकाळचा दुवा + अजून जास्त

राजेश यांनी वर माझ्या मूळ प्रतिसादात दिलेला सकाळचा दुवा चालत नसल्याचे लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे. तेंव्हा सर्वांनी हा http://bit.ly/9vHN5i दुवा वापरून पहा.

आता या चर्चा-विषयावर थोडे अधिकः

पर्यावरण बदल - कारणे, परिणाम आणि कृती -पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे मी साधारण अडीचएक वर्षांपुर्वी येथे लेख लिहीले होते. ते मी लिहीले म्हणजे तेच बरोबर असे येथे म्हणायचा उद्देश नाही पण या संदर्भात माझी भुमीका काय आहे हे नक्की त्यातून समजू शकेल.

वर (चर्चाप्रस्तावात) उल्लेखलेले विचार आणि `त्यातील लॉजीक वाचताना मला अमेरिकेतील रिपब्लिकन समर्थक रेडीओ अथवा टिव्हीवरील चर्चा ऐकत आहे असे वाटले. ( "राईट विंग" ह्या शब्दातून अर्थ भलता होतो आणि तसे मला येथे कुणाला म्हणायचा उद्देशही नाही आणि तसे येथे कोणी असेल असे वाटतही नाही!).

मला कामामुळे अनेक महाभाग दोन्ही बाजूने भेटलेले आहेत. त्यातील कुणाला समजावणे सोपे आहे हा मिलीयन डॉलर्सचा प्रश्न आहे :-) तरी देखील पर्यावरणवाद्यांमुळे बर्‍याचदा प्रश्न कितीही गंभीर असला तरी त्यातील तर्कट विरोधामुळे सगळेच बिघडते हे पाहीले आहे. अर्थात सर्वच असे नसतात. माझा अनेकांबद्दलचा खूप चांगला अनुभवही आहे, जे जमिनीवर पाय ठेवून पुढचे बघत असतात.

तरी देखील क्लायमेट चेंज हा असाच एक गंभीर प्रकार आहे ज्याचे तर्कट पर्यावरणवाद्यांमुळे गांभिर्य समजण्याऐवजी हसे होते. आता एका अशाच चळवळीचे उदाहरण देतो - त्याचे नाव दुर्दैवाने माझ्या डोक्यातून आत्ता गेले आहे, आठवल्यास नंतर सांगेन. ही चळवळ माझ्या माहीतीप्रमाणे युरोपात विशेष करून ब्रिटनमधे चालू झाली. क्लायमेटचेंज मुळे स्थानिक समाज हा प्रकार वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नको इतके "लोकल कम्युनिटी" करण्याकडे यात कल आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स, न्यू इंग्लंड भागातील पण हवामान बदलणार असल्याने आणि बॉस्टनमधील सागरपातळी वाढणार असल्याने त्यावर लगेच आत्तापासून (जे २०४०-४५ मधे घडण्याची शक्यता आहे त्या प्रमाणे) वागणे चालू केलेले काही हेतू शुद्ध पण अव्यावहारीक असलेले माहीत आहेत... हे म्हणजे अजून ४० वर्षात म्हातारपण येणार म्हणून वाकत चालायची प्रॅक्टीस करायची का पेन्शन/प्रॉव्हीडंट फंड/४०१के मधे पैसे घालण्याचा विचार करायचा यातील फरक आहे. मात्र असले संवेदनाशील सर्वच आहेत हे मान्य नाही. फारच कमी आहेत आणि त्यांच्यामुळे धोरण-राजकारण-अर्थकारण चालू आहे असे वाटत नाही.

जर धूर होतो म्हणून आपल्या घरात प्रथम अन्न शिजवण्यासाठी लाकडाची चूल पेटवली नाही तर ते घर सुव्यवस्थित करून बिनधुराची ऊर्जासाधने शोधायची प्रक्रिया कशी सुरू होणार? पोट आधी भरायला नको? घर सांभाळायची शक्ती नको यायला?

चूल पेटवू नका असे कोणी म्हणत नाही. मात्र त्यात प्रदुषण आणि सुरक्षितता बघणे हे महत्वाचे आहे. भारतात तसेच इतर विकसनशील/अविकसीत देशांत आजही चुल आणि मूलच नसून चुलीमुळे (इन डोअर एअर क्लालीटीमुळे) मूल जन्माआधीच जाणे अथवा अधू होणे होत आहे... अशा वेळेस आमचे राष्ट्र गरीब आहे म्हणत काही करायचे नाही का याच संकेतस्थळावर आलेल्या चर्चेप्रमाणे प्रश्न समजून उपाय शोधायचे हा मुद्दा आहे. आमच्या भागात (बॉस्टन) तसेच उत्तरेतील बहुतांशी राज्यात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे घरात हिटींग असणे महत्वाचे असते. ते तेल अथवा नैसर्गिक वायू अथवा इलेक्ट्रीसिटीने होते. तरी देखील त्यात देखील चुलीप्रमाणे कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. त्यात अनेक मृत्यू हे नसमजूनच झाले आहेत (कारण वास नाही धूर नाही). आता मॅसॅचुसेट्समधे कायदा करून कार्बनमोनॉक्साईड डिटेक्टर लावणे बंधनकारक केले आहे.... का? कारण जीवाचे महत्व आहे. भारतात आजही आपला प्रश्नच नीट समजून न घेतल्याने सरकारी पातळीवर कुठेतरी न आवडणार्‍या आयएएस अधिकार्‍यास बसवून असली कामे शास्त्रापुरती चालू ठेवली जातात असे वाटते. म्हणून कधी जागतीक बँक तर कधी युएस इपिए पैसे देऊन उत्तेजन देत असते.

मी या एकंदरीत प्रश्नाकडे अशा दृष्टीने बघतो की गेली चार अब्ज वर्षे या ग्रहावर काय परिस्थिती आहे याची काळजी करायला कोणी नव्हते. जगभर तापमान ७०+ पासून ते -१० पर्यंत वर खाली गेले, अब्जावधी प्रजाती नष्ट झाल्या. पर्यावरणाची निसर्गाने नासाडी केली तितकी करण्याची कल्पनाही करण्याची मानवाची औकाद नाही. जीवन त्यातूनही टिकले. आणि आत्ता कुठे मनुष्यजात निर्माण झाली व गेल्या काही दशकात पृथ्वीचा विचार करायला लागली तर तिचे कौतुक करण्याऐवजी तिच्यावर अपराधी भावनेचे ओझे का लादले जातेय? पर्यावरणवादींचे या बाबतीत ताळतंत्र कुठे तरी चुकते आहे असे वाटते.

ह्यातील विचार हा विज्ञाननिष्ठ वाटण्याऐवजी "असेल माझा हरी..." प्रमाणे दैववादी वाटला. असे वाचले होते की त्सुनामीच्या वेळेस कारनिकोबार बेटावरील वन्यप्राण्यांना जमिनीतील हालचालींनी काहीतरी वेगळे जाणवले आणि ते उंच ठिकाणि गेले. त्याबरोबर तेथील ३०-४० हजार वर्षे जुने असलेली आदीवासी प्रजा देखील काही विचार न करता त्यांच्यापाठोपाठ डोंगरावर गेली आणि वाचली. दुर्दैवाने आपल्या अधुनिक माणसाने त्याकडे लक्ष दिले नाही आणि ते मात्र त्याच भागात या त्सुनामीत बळी पडले... मग आता यात देखील आदीवासींसारखेच राहणे हाच पर्याय समजायचा की सेन्सरयुक्त यंत्रणापण तयार करायची? "पण" अधोरेखीत करण्याचे कारण इतकेच की आणिबाणीच्या परिस्थितीत आदिवाश्यांसारखे वागले तर यासंदर्भात काहीच बिघडणार नाही असेदेखील म्हणता येईल... पण त्याचबरोबर पुढे होणार्‍या नैसर्गिक आपत्तिस तोंड देण्यची देखील वैज्ञानिक तयारी करणे महत्वाचे आहेच...

या प्रश्नाला व त्यावरील चर्चेला विकसित देश विरुद्ध अविकसित देश अशीही छटा आल्याचे जाणवते. जगातल्या वीस/तीस टक्के लोकांनी गेल्या दोन शतकांत आपला विकास करून घेण्यासाठी वाटेल तशी निसर्गाची नासधूस केली (उरलेल्या सत्तर/ऐशी टक्क्यांना गुलाम करून) आणि आता तेच नाक वर करून, उच्च नैतिक भूमिका घेऊन "कार्बन वाईट इतकच काय वाफही वाईट" असे सांगतात व भारत, चीनसारख्या देशातले विचारी लोक ते ऐकून घेतात (नशीब सरकारे तरी ऐकत नाहीत) यासारखी नामुष्की नाही

वाफ वाईट हा प्रकार मी प्रथमच ऐकत आहे. भारताने आणि चीनने इतर विकसीत राष्ट्रांचे म्हणून ऐकण्याची गरज नाही तर त्यातून वास्तव शोधून वागण्याची गरज आहे. यावर भारतातपण खूप काम चालले आहे. याचा संदर्भ केवळ पर्यावरणाशीच नसून त्यातून निर्माण होणार्‍या सामाजीक तसेच अगदी संरक्षणाच्या संदर्भात देखील आहे. प्रगत राष्ट्रांनी एका ठरावीक वेळेत बाहेरून येणार्‍या लोकांवर बंदी घालण्याचे (अर्थात घट्ट पकड करणे - पूर्ण बंदी ऑफिशियली करणार नाहीत) ठरवले आहे असे मधे चांगल्या प्रकाशनात वाचल्याचे आठवले. आज बांग्लादेशींचा जमाव येण्याचे कारण हे देखील एकीकडे क्लायमेट चेंज, दुसरीकडे आर्सेनीकचे प्रचंड प्रदुषण (जे नैसर्गिक आहे, पण त्यावर उपाय पटकन केले गेले नाहीत) आणि तिसरीकडे त्यामुळे अधिकच आर्थिक असे तिहेरी आहे... हे एक उदाहरण झाले.

ऍल गोअरने एकदा चांगला किस्सा (वर्णन करत) सांगितला होता. "१९९१ ला रिओ अर्थ समीट झाले, नंतर अमेरिकेत क्लिन एअर ऍक्ट अजून कडक झाला, कॅप अँड ट्रेड वास्तवात आले. तात्काळ अमेरिकन ऑटोमेकर्सनी ५० वकीलांना (पळवाटा शोधण्यासाठी) नेमले तर होंडा-टोयोटा या कंपन्यांनी (डीझाइन अमुलाग्र बदलण्यासाठी) ५० इंजिनियर्सना घेतले. आज अमेरिकन ऑटोमेकर्सची काय अवस्था आहे आणि (रिकॉल झाले असले तरी) टोयोटा आणि होंडा कुठे आहेत हे बघण्यासारखे आहे. " थोडक्यात आपण संगणक क्रांतींचा खूप चांगला फायदा करून घेतला. आजच्या पर्यावर्णीय प्रश्नांना संधी समजून असेच केले पाहीजे असे वाटते. आपल्याला त्याची गरजही आहे आणि ताकदही आहे. फक्त नसेलच तर इच्छाशक्ती.

निव्वळ नॅनो तयार करून भागत नाही तर त्याबरोबर तसे रस्ते आणि दळणवळणयंत्रणा पण लागते. आजही आपण त्यात खूपच कमी आहोत. त्यात सेफ्टीरूल्स नाहीत. वगैरे वेगळेच. शिवाय अमेरिकेने केले म्हणून ते बरोबर कसे ठरते? त्याला विरोध करा की. आपले सरकारी अधिकारी आंतर्राष्ट्रीय कराराच्या वेळेस चांगले तसे करतात आणि ते योग्य देखील आहे. मात्र देशाच्या भूमीवर पाय ठेवल्यावर बाटलीतल्या पाणी शिवाय जर पाणी पित नसले तर नक्की आपला काय विकास झाला आहे?

म्हणूनच, "गेल्या काही दशकात/शतकात (पर्यावरणाची) परिस्थिती सुधारली आहे की नाही" याचा जर भारताच्या संदर्भात विचारच करायचा असेल तर आपण पाणी कसे पितो, पुण्यासारख्या शहरात तोंडावर फडके का बांधतो, दिल्लीत विमाने धुक्यामुळे का उतरत नाहीत, मुंबईत पाणी कसे तुंबते, बंगलोरचे बघता बघता काय झाले आहे" हे सर्व अलिप्तपणे बघितले तर समजेल. अर्थात हे म्हणताना मला काही आनंद होत नाही आहे, चीड मात्र नक्की येते....

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

जुनी माहिती

>>वाफ वाईट हा प्रकार मी प्रथमच ऐकत आहे.

मी पूर्वी पण ऐकले होते. ढगाळ रात्री थंडी कमी का पडते असे कधीतरी कारणे द्या मध्ये शिकलो होतो.

विकीवरील ग्रीनहाऊस इफेक्टच्या पानावरील माहिती.
ग्रीनहाऊस गॅसेस्
बाय देअर परसेंटेज कॉण्ट्रिब्यूशन

वॉटर व्हेपर ३६.७०%
कार्बनडायऑक्साईड ९.२६%
मिथेन ४.९%
ओझोन ३.७%

द मेजर नॉन गॅस कॉण्ट्रिब्यूटर टु द अर्थ'स् ग्रीनहाऊस इफेक्ट्, क्लाऊड्स्, ऑल्सो ऍबसॉर्ब् ऍण्ड् एमिट.......
वर नॉन गॅस कॉण्ट्रिब्यूटर मध्ये क्लाऊड लिहिले आहे तेही बर्‍याच अंशी पाण्याच्या वाफेचेच बनलेले असतात.
(एक भयानक शंका: गेल्या काही वर्षांत पर्यावरणवादी लोकांचे ऐकून आपण रेफ्रिजरंट म्हणून सी एफ सी चा वापर थांबवला आहे. त्यामुळे ओझोन च्या थराचा नाश थांबला आहे. पण इथे तर ओझोन ग्रीनहाऊस वायू म्हटले आहे. मग पर्यावरणवाद्यांचे ऐकल्यामुळे ओझोन वाढून तर हिमनद्या वितळत नाहियेत? म्हणजे ओझोन वाढवावा तर ग्रीनहाऊस परिणाम होणार....कमी होऊ द्यावा तर सूर्याचे अतिनील किरण पृथ्वीवर येणार. इकडे आड तिकडे विहीरच म्हणायची की).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

चर्चा चला चला के... (सगळे च चंद्रातले च)

विकाससाहेब,

चांगलंच दणकट उत्तर दिलंत की. हे उत्तर एवढ मोठं तर मूळ लेख केवढा असेल याची कल्पना येते (न वाचता)... उगाच नाही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहेत (दक्षिणार्ध व पश्चिमार्ध का नसतो याचा विचार कुणी केला आहे का?) असो. एवढा टवाळपणा केल्यानंतर समर्थांनी डोळे वटारले, तेव्हा मुकाट्याने प्रतिसाद लिहितो.

आपण म्हणता की दोन्ही बाजूचे लोक भेटले आहेत. याचा अर्थ तुम्ही मधले, संतुलित विचार करणारे असा होतो. आपल्या उत्तरावरूनही तसेच वाटते, तेव्हा स्वागत, मीही ना इकडचा ना तिकडचा. (टेनिस कोर्टच्या मध्यरेषेवर प्रेक्षकात बसून बॉल इकडून तिकडे जाताना बघणारा. कदाचित तुम्हीही तसेच मध्ये असाल - पण प्रेक्षकात पलिकडल्या बाजूला...पुन्हा समर्थ बघताहेत...)

चूल व धूर तुम्ही फारच शब्दशः घेतलत. मी चूल हे इण्डस्ट्रीचं प्रतीक म्हणून वापरलं होतं. उद्योग चालले की सुबत्ता वाढते, लोक श्रीमंत होतात व त्यांचे पोट भरलेले असल्यामुळे व खिशात पैसे असल्याने त्यांना पर्यावरणाकडे लक्ष देता येतं. पुढच्या-पन्नास शंभर वर्षातले प्रयत्न व त्याचे परिणाम मॅक्सिमाईज करायचे असतील तर आत्ताच सुरूवात करण्याऐवजी खाऊन पिऊन शिकून समर्थ (डोळे वटारणारे समर्थ नव्हे) होऊ मग भिडू असा माझा मुद्दा होता.

पण चार अब्ज वर्षांचं माझं आर्ग्युमेंट अजून आहे बरं का...निसर्ग इज बरं का, सो मच मोअर स्ट्राँगर आणि सो मच मोअर ब्लाइंडर म्हणून सांगू....आपण ह्युमन्स, म्हणजे काय काहीच नाही, नथिंग..

मानवाची स्वतःची सुरक्षा आधी, नंतर निसर्गाची हे अध्यहृत आहे. त्सुनामीचा इथे संबंध काय हे कळले नसले, तरी या प्राण्यांच्या 'अतिंद्रिय'(?) शक्तीसंबन्धी वाचायला आवडेल. संदर्भ पाठवावा ही विनंती.

प्रदूषणाबाबतीत पुण्याच्या लोकांकडून तक्रारी खूप ऐकल्या आहेत. पण तो (मूळचाच) तक्रारी स्वभाव वाढल्यामुळे की काय हे कसे कळावे? काहीतरी त्या पलिकडील व्यक्तिनिरपेक्ष मानदंड असावा असे वाटते. मी म्हणेन "प्रदूषणामुळे अकाली (पन्नासच्या आधी) मरणार्‍यांची संख्या वाढली आहे का?" हा योग्य आहे. आपणांस अधिक चांगला सुचल्यास कळवावे. आकडेवारी कशी जमवायची हे पुढे बघू.

असो. फारसे काही म्हणण्याजोगे शिल्लक नाही. हो, नॅनोच्या सुरक्षेविषयी खूप लोक सेफ्टी रूल्स नसल्यामुळे काळजीत आहेत. स्कूटरपेक्षा ते कसे धोकादायक आहे हा प्रश्न पडतो इतकेच.

पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या व अशा सर्व विषयांवर ज्वलंत चर्चा चालू राहाणे अतिशय महत्त्वाचे आहे.

जय हिंद जय महाराष्ट्र!

संदर्भ...

उगाच नाही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहेत. (दक्षिणार्ध व पश्चिमार्ध का नसतो याचा विचार कुणी केला आहे का?)
खरे आहे. लिहायचे ते सर्वबाजूंनी उगाच अर्ध नाही :-)
त्सुनामीचा इथे संबंध काय हे कळले नसले, तरी या प्राण्यांच्या 'अतिंद्रिय'(?) शक्तीसंबन्धी वाचायला आवडेल. संदर्भ पाठवावा ही विनंती.

मी अतिंद्रिय वगैरे काही म्हणलेले नाही कारण त्या शब्दाच्या विविध छटा आहेत आणि माझा त्यातील काहीच उद्देश नव्हता... तरी देखील मला जे म्हणायचे आहे त्या संदर्भात नॅशनल जिऑग्राफिकचा हा दुवा पहा.

.निसर्ग इज बरं का, सो मच मोअर स्ट्राँगर आणि सो मच मोअर ब्लाइंडर म्हणून सांगू...

म्हणूनच पृथ्वीला लिव्हींग प्लॅनेट म्हणतात. "गया" मूळ ग्रीक शब्द - हा अधुनिक संदर्भात असाच वापरतात. विंदांच्या प्रसिद्ध कवितेत पण "रक्तांमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावेत" हे अशाच अर्थाने वापरले होते. निसर्ग झाला काय अथवा पृथ्वी झाली काय स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहेत. पण माणसाला मिळालेला निसर्ग माणसाने हावेने कसाही वापरला तर त्यातून माणसाचाच नाश होणार आहे. आणि तहान लागल्यावर विहीर खणता येत नाही. खाऊनपिऊन समर्थ होता येते तसेच सुस्ती (आणि मस्ती-उन्माद) पण येऊ शकते... गांधीजींचे चांगले वाक्य आठवले: "Earth provides enough to satisfy every man's need, but not every man's greed"

असो.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मीथ्?

या विषयावर नासाच्या एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाबरोबर(प्राव्हयसीचा विचार् करुन् नाव् सांगु शकणार् नाही) गप्पा झालेल्या (काही कारणाने माझ्या प्रोफ. चे ते गेस्ट होते, अनौपचारीक् गप्पा वगैरे झाल्या) त्यात त्यांनी दिलेली माहिती आकडेवारी ग्लोबल वॉर्मिंग 'मीथ' नाही या बद्दल 'कन्वींन्सींग' होती. मी त्यांना तो 'डेटा' मागितला होता, पण सध्या त्यावर संशोधन चालु असल्याने देउ शकत् नाही असे उत्तर मिळाले.

जमल्यास दोन् पैसे भर् टाकेन्, पण् त्या आधी संपुर्ण चर्चा वाचेन म्हणतो.

 
^ वर