पर्यावरण बदल - कारणे, परिणाम आणि कृती -पूर्वार्ध

या लेखाचा उद्देश "जगबुडी होतेय" म्हणून ओरडण्याचा अथवा घाबरवण्याचा नसून जे काही खरेच होत आहे त्याची जाणीव करून देणे एवढाच आहे. बदलत्या पर्यावरणाचे परिणाम हे शेवटी श्रीमंतांपेक्षा गरीबांना आणि प्रगत राष्ट्रांपेक्षा विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांना भोगावे लागणार आहेत. एकीकडे आपण - भारतीय आपल्या राष्ट्रपतींच्या द्रष्टेपणाला मानून २०२० पर्यंत प्रगत राष्ट्र होण्याचे स्वप्न बाळगत आहोत आणि ते चांगलेही आहे. पण प्रगत राष्ट्र होण्यासाठी अर्थकारणाबरोबरच, समाजकारण, समाजस्वास्थ्य आणि राष्ट्रीय सुरक्षा हे पण खांब लागणार आहेत. हे काम फक्त सरकारचे नाही... अमेरिकेत गेले ६-७ वर्षे बुश सारखा विरोधक राष्ट्राध्यक्ष असूनही पर्यावरण चळवळ आणि त्यावरील कामे (पैसे कमी होऊनही) कमी झालेली नाहीत.

"वातावरण बदल" अर्थात "climate change" अथवा "जागतिक तापमान वृद्धी" अर्थात " global warming", हे सध्याचे परवलीचे शब्द झाले आहेत. प्रगत राष्ट्रांमधे यावरून बरीच चर्चा चालू आहे. युरोपियन राष्ट्रे यात पुढे आहेत तर अमेरिका दुभागलेली आहे - आणि राजकीय दृष्ट्या ठोस पावले उचलण्याच्या विरोधात आहे. २००१ साली जेव्हा जॊर्ज डब्ल्यू बुश अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा तर त्यांनी, "असे काही नाहीच" असे म्हणून सुरवात केली. आता ते, "असे काही तरी आहे.." इथपर्यंत म्हणायला लागले आहेत पण त्यांना या विषयावरील जागतिक निर्णय घेताना आणि कृती निश्चित करताना भारत आणि चीन यांना देखील सहभागी करून घ्यायचे आहे. भारत-चीन म्हणतात की आम्ही विकसनशील राष्ट्रे असल्यामुळे विकसित होण्यासाठी उर्जा लागणारच (जी वातावरण बदलाचे एक मुख्य कारण आहे), तेव्हा प्रगत राष्ट्रांनी त्यात जास्त पुढाकार घेऊन पाऊले उचलावीत. या संदर्भात "वातावरण बदल" आणि भारत यांचा काय संबधा आहे ते पाहू. परंतु त्याआधी -

"वातावरण बदल" म्हणजे नक्की काय?

EPA.GOV

पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचे जे वेगवेगळे थर असतात त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टीसाठी अनुकूल असे तापमान तयार झाले. सूर्याची किरणे जमिनीवर येतात आणि काही अंशी परावर्तित होऊन परत अवकाशात जातात. पण १८-१९व्या शतकातील औद्योगिक क्रांती आणि नंतरचा भरमसाट विकासाचा वेग, यामुळे जगातील विशेषत: सुरवातीस विकसित जगातील उर्जेचा वापर, गाड्या आणि पर्यायाने इंधन, कचयाचे प्रमाण, जमीनीचा भरमसाट वापर वाढत गेला. त्यामुळे मुख्यत: कार्बन डायऒक्साईड आणि मिथेन हे वायू वातावरणात वाढू लागले. कार्बन डाय ऒक्साईड हा आपल्या उच्छःस्वासातीलच असल्यामुळे थेट प्रदूषण म्हणून धरला गेला नाही. पण तो वातावरणात झपाट्याने वाढायला लागल्यामुळे त्याचे आवरण ज्याला "ग्रीन हाऊस इफ़ेक्ट" असे संबोधतात ते तयार झाले. त्या आवरणाचा परिणाम म्हणून जी सूर्यकिरणे सहज परावर्तित होऊन अंतराळात जाऊ शकत होती ती या आवरणांना छेदता येऊ न शकल्यामुळे वातावरणात राहू लागली. त्याचा परिणाम म्हणून तापमान वृद्धी होऊ लागली. उष्ण प्रदेश अधिक उष्ण होण्यात, समशीतोष्ण प्रदेश उष्ण होण्यात तर शीत प्रदेश हे समशीतोष्ण होण्याकडे कल होऊ लागला. गेल्या दशकात वातावरणातील तापमान सरासरीपेक्षा सातत्याने अधिक होऊ लागले. त्याच बरोबर असेही लक्षात येऊ लागले की हा बदल सरळसोट म्हणजे "तापमान वृद्धी" या एकाच पद्धतीत मोडणारा नाही आहे. कारण टोकाचे वातावरणीय बदल कधी कधी एकाच ठिकाणी जाणवू लागले - गोठवणारा कडाका किंवा उन्हाची होळी! मग कधी बॊस्टनमधे थंडीतील वारा अधीक बोचरा होऊ लागला तर कधी पॆरीस मधे उष्माघाताने माणसे मरू लागली.

"वातावरण बदलाचे" परिणाम

वातावरण बदलाचे बरेच दृश्य-अदृश्य परिणाम सांगता येतील पण थोडक्यात:

  • NASA.gov

    हिमनग वितळू लागले: दोनही धृवांपासून ते गंगोत्रीपर्यंत हिमनग वितळू लागले आहेत. परिणामी एकीकडे समुद्रातील पाणी वाढून समुद्राची पातळी वाढू लागली आहे आणि किनारपट्टी कमी होऊ लागली आहे तर इतर काही ठिकाणी नद्यांना पूर येणे वाढू लागले आहे.

  • सुपीक जमिनीत पाणी वाढून तिची शेतीची क्षमता कमी होवू लागली आहे.
  • समुद्राच्या तळातील पाण्याचे सरासरी तापमान वाढल्यामुळे चक्रीवादळांच्या जोराचे प्रमाण वाढू लागले आहे.
  • सार्वजनिक आरोग्यावरील परिणाम
    climatescience.gov
  • सुरक्षा!

वरील परिणाम हे जागतिक पातळीवर होत आहेत पण त्यातील कदाचित दोन धृवांवरील बर्फ़ वितळण्याचा भाग सोडल्यास त्याचे सामाजिक-राजकीय-संरक्षण आणि आर्थिक परिणामांना भारतास आणि भारतीयांस सामोरे जावे लागणार आहे. उदाहरणादाखल बांगलादेशी विस्थापित/घुसखोर (जो काही योग्य-अयोग्य शब्द वाटेल तो) यांचा विचार करा. बांगलादेशात त्रिभूज प्रदेश आहेत. वातावरण बदलामुळे त्यातील भूभाग गंगेच्या वाढत्या पाण्याने कमी होत आहे. दुसरीकडे समुद्राच्या वाढ्त्या पाण्याने जमीने खारी आणि परिणामी नापीक होत आहे. बाकी कुठलेही कारण (धर्म, राजकारण, पैसा इत्यादी) असो-नसो अस्तित्वाचा लढा होत असलेल्या जमावाला जिथे जाणे शक्य आहे तिथे आणि ज्या पद्धतीने जावे लागेल तसे, जाणे भाग पडणार. परिणाम भारताच्या सुरक्षेवर, समाजकारण, अर्थकारण आणि राज्कारणावर पडणार, किंबहुना पडतो आहे.

यासाठी आपण काय करायला हवे?

यावरील काही अमेरिकेतील अनुभव आणि विचार मी उत्तरार्धात लिहीन...

धन्यवाद

विकास देशपांडे

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम!

जागतिक औष्मीकरणावर अत्यंत माहितीप्रद लेख!

उत्तम लेख!

लेख आवडला. पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे. जागतिक तापमानवाढीवर राष्ट्रसंघ आणि इतर निष्पक्ष वैज्ञानिकांनी नि:संदिग्ध माहिती देऊनही "ग्लोबल वऑर्मिंग इज़ अ मिथ" असा राजकीय आणि व्यावसायिक कृपेने चाललेला प्रचार हून हसावे की रडावे हेच कळत नाही.

बांगलादेशाचे आपण दिलेले उदाहरण अतिशय योग्य आहे. मध्यंतरी बीबीसीवर एक माहितीपट पाहिला होता त्यात बांगलादेशावर होणारे वैश्विक तापमानवाढीचे दुष्परिणाम दाखवले होते. भारतातही हिमालयातील हिमाचे आवरण वितळल्यामुळे पाण्याची कमतरता भासेल की काय अशी भीती वाटते आहे.

भारतातील हिमनग

आपल्या दोघांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या वेब साईटवर रालोआ च्या सरकारच्या वेळेस या संदर्भात खालील माहीती होती जी सध्याचे सरकार आल्या नंतर् लुप्त झाली. (वास्तवीक आपली सर्वच सरकारे पर्यावरणाबाबत उदासीन आहेत असे मला वाटते):

हिमनगाच्या वितळण्यामुळे काही वर्षे सतत गंगा-यमुना आणि इतर उत्तरेकडील नद्यांमधे पाणी वाढणार असून त्यामुळे महापूर येऊन घाऊक प्रमाणात जनता विस्थापीत होऊ शकते आणि नंतर याच भागात बर्फ (हिमनग) कमी झाल्यावर नद्यांमधले पाणी कमी होऊन कोरडा दुष्काळ पडू शकतो. एकूण ४० कोटी लोकसंख्येला यामुळे हाल सहन करावे लागणार आहेत.

तसेच मध्यंतरी वाचनात आल्याप्रमाणे गंगोत्रीचा हिमनग पण झपाट्याने वितळत आहे. हा दुवा वाचण्यासाठी पहा. थोडक्यातः

१९३५ मधे वितळण्याचा वेग हा वर्षाला ७ मीटर होता तो १९९० मधे वर्षाला १८ मीटर झाला. २००६ पर्यंत २१% गंगोत्री वितळून गेली आहे..

खालील चलत् चित्र पहा:

विकास

भारतावर होणारे परिणाम

विकास, दुव्यांबद्दल धन्यवाद! वैश्विक तापमानवाढीचा फटका दक्षिण आशियातील देशांना अधिक प्रमाणात बसेल हे आता स्पष्ट झाले आहे. हिमालयातील हिम वितळल्याने हिमालयात उगम पावणार्‍या आणि बारमाही वाहणार्‍या नद्या बारमाही राहणार नाहीत. त्याचा फटका उत्तर भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही बसेल असे वाटते. दक्षिण-मध्य भारतातील अनियमित पाऊस आणि बारमाही पाण्याची हमी असलेल्या प्रदेशात पाण्याचे कमी होणारे प्रमाण यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई वाढतच राहील असे वाटते. भारताच्या प्रचंड लोकसंख्येमुळे पाणी पुरवण्याचे इतर प्रयत्न जर युद्धपातळीवर केले नाहीत तर तोकडेच पडतील. या गंभीर धोक्याची नोंद घेणे आणि वैश्विक तापमानवाढ रोखण्यासाठी प्रयत्न करणे भारतीयांना इतरांहून अधिक आवश्यक आहे.

चिंटुला होणारा वैश्विक ताप! ;)

सहमत आहे

दक्षिण-मध्य भारतातील अनियमित पाऊस आणि बारमाही पाण्याची हमी असलेल्या प्रदेशात पाण्याचे कमी होणारे प्रमाण यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई वाढतच राहील असे वाटते.

सहमत आहे आणि मागील काही वर्षांपासून हे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. केवळ मुंबईचेच उदाहरण लिहायचे तर पूर्वी मुंबईतील तापमान ३५ डी. से. च्या वर जात नसे. ते आता उन्हाळ्यात सहज जाते. थंडीचे महिने तर जवळपास नाहीतच. मोठ्या शहरातील कार्बन डायॉक्साईडचे वाढते प्रमाणही याला कारणीभूत आहेच.

लेख चांगला जमला आहे. उत्तरार्धाच्या प्रतिक्षेत. असे वेगळे लेख वाचायला आवडतात.

हीट आयलंड इफेक्ट

मोठ्या शहरातील कार्बन डायॉक्साईडचे वाढते प्रमाणही याला कारणीभूत आहेच.

या परीणामाला "Heat Island Effect" असे म्हणतात. बेसुमार गाड्या, डांबरी रस्ते, झाडांची कमतरता, इमारती आणि त्या इमारतींना लागणारी उर्जा अशी अनेक कारणे या मागे आहेत.

लेख आवडला...

वेळात वेळ काढून हा विषय मुद्देसूदपणे येथे मांडल्याबद्दल आभार.

उत्तम

विकास,
उत्तम लेख. या प्रश्नाची गंभीरता जास्तीत जास्त लोकांना जाणवायला हवी. तरच यातून मार्ग निघू शकेल.
उत्तम लेख. या प्रश्नाची गंभीरता जास्तीत जास्त लोकांना जाणवायला हवी. तरच यातून मार्ग निघू शकेल.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

मानवी आणि सामाजिक अभिप्रेरणा

लेख आवडला.

"सामाजिक-राजकीय-संरक्षण आणि आर्थिक परिणामांना भारतास आणि भारतीयांस सामोरे जावे लागणार आहे. "

हे आपले म्हणणे पटते. अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाउंडेशन human and social dynamics या विषयांतर्गत आत्तापासूनच संशोधनासाठी खूप चालना देत आहे. पर्यावरण बदलामुळे माणसांचे जे स्थलांतर होते त्यामुळे इतर भूप्रदेशांनाही ह्या बदलांकडे "हे आमच्या सीमारेषेच्या आतले नाहीत" म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवाय सीमारेषा बदलत राहतात हे देखील सत्य आहे. त्यामुळे या विषयांचा अभ्यास करून या स्थलांतराचे दूरगामी आणि हानीकारक परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तहान लागली की विहीर खणण्यापेक्षा याचा विचार आत्तापासून करावा लागेल.

चित्रा

छान लेख

लेख आवडला पण त्याचबरोबर नुकतेच नासाच्या एका शास्त्रज्ञाने रेडियोवरील मुलाखतीत वैश्विक तापवृद्धी रोखण्यासाठी आपण शक्ती वाया घालवतो अश्या आशयाचे विधान केल्याचे ऐकले.
सध्या असणारे पृथ्वितलावरील हवामान हे मानवजातीसाथी आदर्श आहे हे कशा वरून? आणि त्याचबरोबर होणारे बदल हे अपायकारकच आहेत का? की वातावरणात हे घडणारे बदल हे अपरिहार्य असून पृथ्विच्या इतिहासात पुर्वापार पासून असे होतच आले आहे? असा काहिसा त्यांचा युक्तिवाद आहे.
अर्थात ह्या विचारचे लोक शास्त्रज्ञ जगताक कमी असले तरी ते सुद्धा ह्या क्षेत्राततील जाणकार असल्याने आमच्या सारख्या ह्या विषयी अज्ञान असणार्‍यांना संभ्रमित करतात. विकासराव आपले मत ह्यावर जाणून घ्यायला आवडेल.
- वरूण.

एन पि आर

धन्यवाद,

एन् पि आर् वर मी नासाच्या प्रमुख शास्त्रज्ञाची मुलाखत संचालकाच्या वक्तव्यानंतर ऐकली होती. आपल्या "बॉस च्या विधानाबद्दल आपले का म्हणणे आहे" असे विचारल्यावर त्याने सभ्य भाषेत अशा आशयाचे उत्तर् दिले की त्यांचा (बॉस चा) काहीतरी वैचारीक गोंढळ उडाला आहे.

पाणी अडवा?

सुपीक जमिनीत पाणी वाढून तिची शेतीची क्षमता कमी होवू लागली आहे

पाणी अडवा, पाणी जिरवा या महाराष्ट्रातल्या तत्त्वाच्या विरुद्धच वाक्य दिसते आहे हे!

पाणी अडवा पण साचवू देऊ नका

पाणी अडवा, पाणी जिरवा या महाराष्ट्रातल्या तत्त्वाच्या विरुद्धच वाक्य दिसते आहे हे!

जेंव्हा शेतीमधे गरजे पेक्षा जास्त पाणी वापरले जाते तेंव्हा जमिनीची धूप होते आणि पिकांना फायदा पण होते नाही. माझ्या माहीतीप्रमाणे पाणी अडवा-पाणी जिरवा मोहीमेत भूगर्भातीतल् जलस्त्रोत जे अशाच अति वापराने कमी झाले आहेत त्यातील पाणी वाढवण्याची ही मोहीम आहे आणि त्याची गरज ही आहे.

सहमत

त्याबरोबर हेही पाहायला हवे
१. भारतातली विशेष आर्थिक क्षेत्र वा अन्य कारणाने सतत कमी होत जाणारी जमीन्.
२. शेतकर्याची दिशाहीन स्थिती.
३. प्रचन्ड विषमता
४. ग्रामीण, शहरी या भेदाबरोबरच मोठी आर्थिक विषमता
यावर चर्चा व्हायला हवी.

 
^ वर