वैदिक ऋचांचे रसग्रहण (नासदीय सूक्त १०.१२९)

ऋग्वेदात जगाच्या उत्पत्तीबद्दल विप्रश्न करणारी काही सूक्ते आहेत. त्यात दोन "भारत एक खोज" या दूरदर्शन मालिकेच्या सुरुवातीला ऐकून आपल्या परिचयाची झालेली आहेत.

पैकी नासदीय सुक्ताबद्दल चर्चा करण्यापूर्वी दुसर्‍या एका सूक्ताबद्दल थोडे - ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात एका सूक्ताची देवता "कः", म्हणजे "कोण?" अशी आहे! त्याची सुरुवात अशी :
"हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् । स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय् हविषा विधेम ॥ १०.१२१.१"
सुरुवातीला हिरण्यगर्भ उत्पन्न झाला, भूतमात्राचा तो एक स्वामी होता. त्याने या पथ्वीला आणि आकाशाला धारण केले - कुठल्या देवाला आपण हविर्भाग अर्पण करत आहोत?

अशा प्रकारे ज्या देवासाठी यज्ञ करत आहोत, त्याच्याच बद्दल ऋषीला "कोण हा?" असा प्रश्न विचारावासा वाटला. हा खरोखर प्रश्न असल्यासच काव्य मला अधिक गहन भासते. पण याबाबत "रहसस्यभेदक" अशी एक कथाही सांगितली जाते. ऐतरेय ब्राह्मण सांगते, की वृत्राचा वध केल्यानंतर इंद्र प्रजापतीकडे आला आणि म्हणाला की आता मीच सर्वोच्च आहे. तसे ऐकल्यावर प्रजापती म्हणाला की तू सर्वोच्च तर मी कोण? तेव्हापासून प्रजापतीला "कोण" हे नाव पडले. आणि "हिरण्यगर्भ" सूक्तातील पालूपद प्रश्न नसून विधान आहे - "कोण=प्रजापती" या देवाला आपण हविर्भाग अर्पण करत आहोत. (मला स्वतःला हा रहस्यभेद पटत नाही, हे नमूद करतो.)

शंकेखोरपणे अनेक प्रश्न विचारत - कदाचित उत्तरे कोणालाच ठाऊक नाहीत ठासून सांगणारे जे नासदीय सूक्त आहे (१०.१२९) त्यातील प्रश्नांचा मात्र असा "रहस्यभेदक" विपर्यास कोणी केल्याचे मला माहीत नाही. पुढे मी याचे माझ्यावतीने मराठी भाषांतर देत आहे, ग्रिफिथ यांचे समर्थ इंग्रजी भाषांतर या दुव्यावर सापडेल.

- - - - - -
१०.१२९ । ऋषिः परमेष्ठी प्रजापतिः । छन्दः त्रिष्टुप् । देवता भाववृत्तम् ।

नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥

तेव्हा ना असणे ना नसणे होते,
धूळही नव्हती, ना आकाश पल्याड
कुठे, काय आश्रय, काय आवरण होते?
होते का पाणी गहन आणि गाढ?

न मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒ न रात्र्या॒ अह्न॑ आसीत्प्रके॒तः ।
आनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒ तस्मा॑द्धा॒न्यन्न प॒रः किं च॒नास॑ ॥ २ ॥

ना होता मृत्यू, ना अमृतत्व तेव्हा
रात्री-दिवसांचे प्रकटणे नव्हते
निर्वाताने एका स्वत:ला आणले जेव्हा,
आणिक नव्हते नाही, काहीच नव्हते.

तम॑ आसी॒त्तम॑सा गू॒ळ्हमग्रे॑ऽप्रके॒तं स॑लि॒लं सर्व॑मा इ॒दम् ।
तु॒च्छ्येना॒भ्वपि॑हितं॒ यदासी॒त्तप॑स॒स्तन्म॑हि॒नजा॑य॒तैक॒म् ॥ ३ ॥

अंधार होता, अप्रकट पाणीच पाणी
अंधाराने होते ते सगळे लपवले -
हे पोकळ झाकलेले, न-झालेले... आणि
त्यात तपातून एक महान उपजले

काम॒स्तदग्रे॒ सम॑वर्त॒ताधि॒ मन॑सो॒ रेतः॒ प्रथ॒मं यदासी॑त् ।
स॒तो बन्धु॒मस॑ति निर॑विन्दन् हृ॒दि प्र॒तीष्या॑ क॒वयो॑ मनी॒षा ॥ ४ ॥

पुढे उद्भवला प्रथम तो काम
काम म्हणजे काय तर रेत मनाचे
मनीषेने हृदयात कवींना ये ठाव -
कळे नसण्याशी नाते असण्याचे

ति॒र॒श्चीनो॒ वित॑तो र॒श्मिरे॑षाम॒धः स्वि॑दा॒सी३दु॒परि॑ स्विदासी३त् ।
रे॒तो॒धा आ॑सन्महि॒मान॑ आसन्त्स्व॒धा अ॒वस्ता॒त्प्रय॑ति: प॒रस्ता॑त् ॥ ५ ॥

ओढलेले आडवे किरण... यांपैकी
काय होते खाली नि काय बरे वर?
महिमान होते, होते रेतधारी,
स्वयंसिद्ध येथे, प्रयत्न तेथवर

को अ॒द्धा वे॑द॒ क इ॒ह प्र वो॑च॒त्कुत॒ आजा॑ता॒ कुत॑ इ॒यं विसृ॑ष्टिः ।
अ॒र्वाग्दे॒वा अ॒स्य वि॒सर्ज॑ने॒नाथा॒ को वे॑द॒ यत॑ आब॒भूव॑ ॥ ६ ॥

कोण बरे जाणतो, कोण सांगतो बोलून
कुठून उद्भवली, ही झाली कुठून?
देवही त्यापुढचे, झाले हे होऊन
कोण मग जाणतो, ही झाली कुठून?

इ॒यं विसृ॑ष्टि॒र्यत॑ आब॒भूव॒ यदि॑ वा द॒धे यदि॑ वा॒ न ।
यो अ॒स्याध्य॑क्षः पर॒मे व्यो॑म॒न्त्सो अ॒ङ्ग वे॑द॒ यदि॑ वा॒ न वेद॑ ॥ ७ ॥

उद्भवले हे होते होय ज्याच्यापासून
धारण याला करतो, का नाहीच मुळी धरत?
बघणारा जो आहे परम आकाशातून,
तो हे जाणतोच - की नाही तोही जाणत?

- - - - - -

माझे मराठी भाषांतर शक्यतोवर शब्दश: आहे. पण कधीकधी शब्दश: भाषांतरात धोकाच असतो. उदहरणार्थ "रजस्" शब्दाचे भाषांतर मी "धूळ" असे केले आहे, ते ठीक आहे. पण आकाशाच्या जोडीने, या संदर्भात "रजस्" म्हणजे धुळीने भरलेला वायूचा थर आहे. तर ग्रिफिथनी केलेले "वायू" हे भाषांतर चूक नाहीच. "तपस्" शब्द मी जसाच्यातसा ठेवला आहे. माझी आशा आहे "ओज/तेज/उष्णता" (ताप/तापमान हे मराठी शब्द आठवा) हे सर्व अर्थ मराठी वाचकाच्या मनात ध्वनित होतील. पण "तप=नामस्मरणाचे खडतर व्रत" असा अर्वाचीन अर्थ मराठी वाचकाला सुचायचा धोका आहे.

मूळ सूक्त त्रिष्टुभात आहे, असे अनुक्रमणी म्हणते, पण अक्षरे मोजून मला ताळा लागत नाही. कदाचित काही लिखित संधी उच्चारताना विभक्त उच्चारणे योग्य -
नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ (११ अक्षरे)
न+आसी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् (११ अक्षरे, "नासीत्" असे लिहिल्याप्रमाणे म्हटल्यास केवळ १० अक्षरे)।
ऋग्वेदाच्या दहाव्या आणि पहिल्या "अर्वाचीन" मंडलांत असे संधी केलेले दिसतात. उपक्रमाच्या संस्कृत-जाणणार्‍या वाचकांकडून याबाबत मला माहिती मिळेल ही आशा आहे.

भाषांतर कुठल्याही छंदात बांधण्यात मला यश आले नाही. मूळ ऋचांमध्ये अनेक शब्दांची पुनरुक्ती आहे, ती थोडी घेऊन शिवाय भाषांतरात चरणांच्या शेवटी मुद्दाम यमके घेतली आहेत. माझ्या ओळी अगदीच लयविहीन-बेताल नाहीत असे पटवण्याचा प्रयत्न पुढील ध्वनिमुद्रणात मी केला आहे.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

या काव्यातला मोठा विरोधाभास हा आहे, की अवर्णनीय-अचित्रणीयाचे चित्र-वर्णनच जणू वाणीने चितारलेले आहे. मला तत्त्वज्ञानापेक्षा हे काव्य म्हणून अधिक भावते. नेति-नेति वचनांचे आता आपल्याला अप्रूप राहिलेले नाही, असे असू शकेल. त्यामुळे "नसणे नव्हते आणि असणे नव्हते तेव्हा..." येथे "तेव्हा" शब्द आता मला अर्थवत्तेच्या दृष्टीने खटकतो. "तेव्हा" हा कालवाचक शब्द आहे, आणि काल हे असण्या-नसण्याचे परिमाण आहे. असणे नाही आणि नसणे नाही तर "तेव्हा" ही संकल्पनाच माझ्यासाठी तार्किकदृष्ट्या नि:संदर्भ आहे. त्याच प्रकारे ऊर्ध्व-अधोदिशा ही संकल्पना स्थानसापेक्ष आहे हे गोल पृथ्वीची कल्पना पटलेल्या आपल्याला नवीन नाही - ते गोल-पृथ्वीचे सोडल्यासही ऊर्ध्व-अधोदिशा ठरवण्यासाठी पृथ्वी आणि आकाश लाग्तात. नसल्यास या दिशांचा तात्त्विक संदर्भही लागत नाही. म्हणूनच रसग्रहणासाठी गेल्या काही शेकडा वर्षांतल्या आपल्या विचारांचा विपाक आपण जरा बाजूला ठेवावा. त्या काळच्या कवीच्या मनात असणे-नसणेही नव्हते तेव्हा सुद्धा अधरूर्ध्वाची संकल्पना कोड्यात पाडणारी होती. पाणी खोल ("खोल" मध्ये "खालच्या दिशेला खूप अंतर" ही संकल्पना आहे) असण्या-नसण्याचा विचार त्या कवीच्या मनात येतो, "आडवे किरण" आणि त्याच्या "खाली-वर" असे काही असू शकते का? असा विचार कवी करतो. थोडा विचार मला जाणवते की खाली-वर ही संकल्पना, इथे-पलीकडे ही संकल्पना आपल्या मनात किती "नैसर्गिक" आहे - असणे-नाही-नसणे-नाही असा भन्नाट विचार करू शकणार्‍या कवीच्या मनःपटलावरही "जेव्हा-तेव्हा", "खाली-वर", "इथे-तिथे" या संकल्पनांचे चित्र पुसता पुसले जात नाही. आणि तरीही या संकल्पनांबद्दल कवीचे शब्द संका उत्पन्न करण्यात यशस्वी होतात, हे विशेष.

तत्त्वज्ञानाचे सोडा. मनाला हेलकावू शकणार्‍या कवित्वाने मी भारावून जातो आहे. पहिल्याच काही शब्दांत तोच तो ध्वनी/शब्द दोन-दोनदा उच्चारून अर्थाची उलटापालट करण्याची लकब अचंबित करते -
((न अ)(सद् आसीद्)) (न सद् आसीद्)
येथे ध्वनींचा खेळ विरोधाभासाला अधिकच गूढ करतो. द्विरुक्ती ही सामान्य वकुबाच्या कवीने वापरली तर सहज कंटाळवाणी होऊ शकते, पण जेव्हा अशी प्रभावी विरोधाभासी द्विरुक्ती दिसते तेव्हा कवीच्या प्रतिभेच्या धारिष्ट्याने मी अवाक होतो. अगदी शेवटच्या सानुप्रास द्विरुक्त चरणातही "सो अङ्ग वेद =तो निश्चित जाणतो" असे म्हटल्यावरही लगेच "यदि वा न वेद" म्हणून "निश्चित" शब्दाची निश्चितीच अविश्वसनीय केली आहे.

मनात भिरभिरणारी शब्दचित्रे काढून-नकारून हे सूक्त मनाला भांबावून सोडते, पण तरी अंतर्मुख करते. काव्याबद्दल माझे रसग्रहण अगदीच तोकडे आहे, परंतु प्रतिसादक या आस्वादचर्चेत रंग भरतील अशा खात्रीने मी टंकन थांबवतो.

- - - - - -
(श्रेय आणि श्रेय-अव्हेर : नासदीय सूक्ताचे वाचन करण्यास मला पुन्हा पुन्हा उद्युक्त करण्याचे श्रेय उपक्रमावरील श्री. शरद यांचे. या सूक्ताविषयी इतका त्रोटक आणि अनभिज्ञ लेखनाचा दोष मात्र सर्वस्वी माझा.)

Comments

मागील एक दुवा

मागे "भाषांतर" या विषयाबद्दल चर्चा करताना पुढील प्रतिसाद मी लिहिला होता, त्यात नासदीय सूक्ताचे उदाहरण दिले होते. तो प्रतिसाद येथेसुद्धा प्रासंगिक आहे म्हणून पुन्हा डकवून देतो आहे :

- - - - -
तिथे दूरदर्शनवरच्या एका चर्चेत राजेंद्र, प्रियाली यांनी नासदीय सूक्तातील (गायलेले) उतारे, अनुवाद दिलेत. ते या चर्चेत उपयोगी पडावेत.

या मूळ वैदिक ऋचा नासदीय सूक्तातून "भारत एक खोज" च्या सुरुवातीला उद्धृत केल्या आहेत (सूक्तातली पहिली आणि शेवटची) :
नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥
(मग त्यात शेवटची ऋचा आहे...)
इ॒यं विसृ॑ष्टि॒र्यत॑ आब॒भूव॒ यदि॑ वा द॒धे यदि॑ वा॒ न ।
यो अ॒स्याध्य॑क्षः पर॒मे व्यो॑म॒न्त्सो अ॒ङ्ग वे॑द॒ यदि॑ वा॒ न वेद॑ ॥ ७ ॥
(हा दुवा स्वरांची चू.भू.द्या.घ्या. या दहाव्या मंडलातले १२९वे सूक्त बघावे.)

याचा वसंत देव यांनी केलेला हिंदी अनुवाद असा :
सृष्टि से पहले \ सत् भी नहीं था \ असत् भी नहीं \
अंतरिक्ष भी नहीं \ आकाश भी नहीं था
छिपा था क्या \ कहाँ \ किससे ढका था \
उसपल तो \ अगम अतल जल भी कहाँ था?
(पहिले पद्य)

सृष्टि का कौन है कर्ता \ कर्ता है वा अकर्ता \
उँचे आकाश में रहता \ सदा अध्यक्ष बना रहता
वही सचमुच है जानता \ या नहीं है जानता
यह किसी को नहीं पता \ नहीं है पता
(शेवटचे पद्य)

याचेच पणिक्कर यांनी केलेले इंग्रजी भाषांतर :
At first was neither Being nor Nonbeing.
There was not air nor yet sky beyond.
What was wrapping? Where? In whose protection?
Was Water there, unfathomable deep? (१)

That out of which creation has arisen,
whether it held it firm or it did not,
He who surveys it in the highest heaven,
He surely knows - or maybe He does not! (७)

याचेच ग्रिफिथ यांनी केलेले इंग्रजी भाषांतर (हे अधिक जुने) :
1. THEN was not non-existent nor existent:
there was no realm of air, no sky beyond it.
What covered in, and where? and what gave shelter?
Was water there, unfathomed depth of water?

7. He, the first origin of this creation,
whether he formed it all or did not form it,
Whose eye controls this world in highest heaven,
he verily knows it, or perhaps he knows not.

यातील दोन ऋचा "त्या मानाने" सोप्या आहेत, म्हणजे सर्व शब्द पुढच्या संस्कृतातले आहेत. त्यामुळे थोडी फार पडताळणी आपणा सर्वांस जमावी. प्रत्येक भाषांतराचे अनुवादफलीत आणि प्रयोजन वेगवेगळे आहे. वसंत देवांचा अनुवाद "अध्यक्ष" शब्द मुळातला जसाच्या तसा उचलतात - हा मोठा धोका धोका पत्करतात. अध्यक्ष चा अर्थ "अधीक्षक"="वरून बघणारा" असा आहे, पण त्याचाच प्राथमिक हिंदी अर्थ "प्रमुख अधिकारी"="प्रेसिडेंट" असा आहे. शब्दाचा आवाज तोच असला तरी संदेशन बहुधा चुकले. तसे असून पुरातन भारदस्तपणा आणि आधुनिक प्रश्नाचे कोडे या दोन्ही गोष्टींचा आपल्या शैलीत देव उत्तम रीतीने तोल साधतात.

पणिक्कर यांचे भाषांतर नेमक्या अर्थाच्या दृष्टीने ग्रिफिथ यांच्या अनुवादापेक्षा उजवे आहे, पण ग्रिफिथ यांची शैली अशी आहे, की हे एखादे पुरातन इंग्रजी पद्य जरूर वाटावे.
- - - - -

सुंदर

अतिशय सुंदर भाषांतर आणि विवेचनही.

>>त्यामुळे "नसणे नव्हते आणि असणे नव्हते तेव्हा..." येथे "तेव्हा" शब्द आता मला अर्थवत्तेच्या दृष्टीने खटकतो. "तेव्हा" हा कालवाचक शब्द आहे, आणि काल हे असण्या-नसण्याचे परिमाण आहे. असणे नाही आणि नसणे नाही तर "तेव्हा" ही संकल्पनाच माझ्यासाठी तार्किकदृष्ट्या नि:संदर्भ आहे.

माझ्यामते काळ आणि स्थळ एकाचवेळी निर्माण झाले ही संकल्पना बिग बँग सिद्धांताच्या आधी अस्तित्वात नसावी. काळ हा अनादि अनंत (तसेच अपरिवर्तनीय) संथपणे पुढे जाणारा असा समजला जाई. त्यामुळे सूक्तातील तेव्हा किंवा आधी हे शब्द क्षम्य समजावे. तसेच ऊर्ध्वाधर्व सुद्धा क्षम्य समजावे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

धन्यवाद - मात्र बिगबँगचा संदर्भ नाही

"तेव्हा" शब्द वापरलेला असूनही काव्य उच्चकोटीचे आहे. हे तर खरे.

(पण "तेव्हा" शब्दाचे अतार्किकत्व मात्र बिगबँगइतके आधुनिक नाही. शरद यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने या सूक्तावरील सायणभाष्य हल्ली वाचत आहे. "कालमापन नसता 'तेव्हा/तर्हि-तदानीम्' शब्दांना अर्थ नाही..." वगैरे चर्चा सायणाने [साधारण ज्ञानेश्वराच्या समकालीन] केली आहे. मग शंकेचे जमेल तसे निराकरणही केले आहे. "काल हा अपरिवर्तनीयपणे संथपणे पुढे जाणारा आहे" हे तत्त्व न्यूटनने स्पष्टपणे मांडले केले आहे. हे तत्त्व तसे सार्वकालिक मत नाही.)

बिग बँग...

मी प्रतिसाद लिहायला घेत होतो तो पाहिले की थत्तेंनी मला जे लिहायचे होते ते हुबेहूब लिहिले आहे. अगदी मी जी ओळ चिकटवणार होतो तिथपर्यंत... पण त्यांच्या प्रमाणेच मलाही बिग-बँगशी साधर्म्य जाणवलं. "पहा आपल्या ऋषी मुनींना सगळं कसं आधीच ठाऊक होतं" म्हणणार्यांच्या पठडीतला मी नाही. केवळ काळ या संकल्पनेचीच सुरुवात बिग-बँगपासून सुरू झाली. "त्या आधी" या संकल्पनेला तितका अर्थ राहत नाही इतकंच म्हणायचय.
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका प्रतलाची कल्पना करा. त्याला एक शंकू वरून येऊन छेद देतो व छेद देत देत खाली चाललेला आहे. छेद बिंदूपासून सुरू होईल आणि ते वर्तुळ मोठं होत जाईल. या वर्तुळावर जे एक-मितीय प्राणी राहतात त्यांच्यासाठी विश्व (वर्तुळ) मोठं मोठं होत जाईल. त्यांच्या विश्वापुरता काळ व अवकाश हे दोन्ही तो शंकू प्रतलाला टेकला त्या "क्षणी" त्या "बिंदुला" सुरू झाले. हीच कल्पना चतुर्मितीय अवकाशाला छेद देणारा पंचमितीय शंकू घेतला तर त्याचा छेद त्रिमितीय असेल अशी करता येते. (डोळ्यासमोर काही येत नाही...पण वैचारिक उडी तरी घेता येते) आणि शंकू ऐवजी खाली टोक असलेला ग्लास घेतला तर सुरुवातीच्या अल्प काळात विश्व प्रचंड मोठं कसं झालं याची कल्पना करता येते. ही प्रतिमा माझ्या तोडक्या ज्ञानावर आधारित मीच केलेली आहे. सत्य अधिक गहन असू शकेल. आधुनिक स्ट्रिंग थियरी १० किंवा २७ मिती आहेत म्हणते ते बहुधा याचसाठी.

अवांतर प्रश्न :

वेदांचा माझा अभ्यास नाही. लहानपणी वेदांतील गोष्टी नावाची पुस्तकं वाचली होती. त्यात व्रीत्रासुराची गोष्ट होती. पुढे कोसंबिंच पुस्तक वाचलं त्यात वृत्रासुराला इन्द्राने कसं मारलं याचं वर्णन होतं (इन्ग्लिश भाषांतर). ते वर्णन वाचताना मला इंद्राने धरण फोडलं असं वाटलं. यावर काही टिप्पणी देता येईल का?

राजेश

काही दुवे

या वृत्राच्या कथेबद्दल १.३२ वैदिक सूक्ताचे पाठ्य (संस्कृत) आणि इंग्रजी भाषांतर बघावे.

वरील संस्कृत दुव्यावर अनेक टंकनदोष आहेत. जमल्यास १.३३ हे सूक्त या पीडीएफ वरती बघावे.

वरील नासदीय सूक्ताच्या संदर्भाशी अवांतर होईल म्हणून येथे अधिक नाही.

उत्तम विवेचन

तत्त्वज्ञानाचे सोडा. मनाला हेलकावू शकणार्‍या कवित्वाने मी भारावून जातो आहे. पहिल्याच काही शब्दांत तोच तो ध्वनी/शब्द दोन-दोनदा उच्चारून अर्थाची उलटापालट करण्याची लकब अचंबित करते -

अगदी पटते. कारण तत्त्वज्ञानासारख्या जड विषयापासुन दुर राहणारा वर्ग यामुळे तरी डोकावेल. समश्लोकी अगदी उत्तम. गेयते मुळे अधिक प्रभावी . बायकोला पण ऐकवले.
नाना चेंगट तथा अवलिया यांनी लिहिलेल्या नासदीय सुक्तावरील भाष्याची आठवण यानिमित्ताने झाली.
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद - तिथे हिरण्यगर्भ सूक्तही आहे

अवलिया यांनी "मी मराठी" स्थळावर हिरण्यगर्भ-सूक्ताचे मराठी भाषांतरही दिले आहे.

"कोणत्या देवाला आपण हविर्भाग अर्पण करतो?" या पालुपद-प्रश्नाचा मथितार्थ ते "(त्याला सोडुन) कोणत्या देवाची हविर्द्रव्यांनी उपासना करावी? = त्याचीच उपासना करावी" असा लावतात. ते ठीकच आहे.

दुव्यांबद्दल धन्यवाद.

नासदीय सूक्त

ऋग्वेदातील ऋचामधले ही सूत्क्त माझ्याही अत्यंत आवडीचे आहे. या सूक्तामधली कल्पनाशक्ती व अज्ञाताचा शोध घेऊ पाहणारी रचनाकर्त्यांची प्रतिभा अक्षरशः दीपवून टाकणारी आहे असे वाटत रहाते.अशी रचना करणारे प्रत्यक्षात किती प्रगल्भ व बुद्धीसामर्थ्यवान असतील याची कल्पनाच करवत नाही.
ही आश्चर्यकारक रचना आपल्या सर्वांसमोर आणल्याबद्दल श्री.धनंजय यांचे मनापासून आभार.
चन्द्रशेखर

सच्चिदानंद ब्रह्म

सच्चिदानंद ब्रह्म

उपनिषदे वेदांनंतरची. तेव्हा उपनिषदांमधील "ब्रह्म" कल्पना ही वेदांनतरची म्हणावयास हरकत नाही. ब्रह्माची लक्षणे म्हणून सत्,चित् व् आनंद् यांचा उल्लेख केला जातो. किंबहूना ब्रह्माला लक्षणे असू शकत नाहीत, ते अशा लक्षणांपलिकडचे, म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात की या तीनपदांनी मिळून एकच वस्तू दाशविली जाते, "ब्रह्म". सत् म्हणजे सत्ता, जे आहे ते. नुसते आहे ते नव्हे तर जे नाहिसे होत नाही ते. नित्य असणारे, ज्याच्या अस्तित्वाला कशाने बाधा पोचू शकत नाही ते, थोडक्यात कधीही नाश न पावणारे,अक्षर, अविनाशी. या विरुद्ध ते असत् म्हणजे जड. जडाला सत्ता नाही. चित् म्हणजे जाणीव. जडाला जाणीव नाही. जाणीव असेल तरच ज्ञान होऊ शकते. आनंद हा स्वयंसिद्ध आहे. संसारात दु:खाच्या निरासामुळे प्राप्त होतो वा एखादा विषय लाभल्यामुळे होते तो आनंद नव्हे.
उपनिषदांमध्ये "सत् पासून असत् निर्माण झाले" की "असत् पासून सत् निर्माण झाले" हा वाद आहे. दोनही बाजू मांडल्या आहेत. म्हणूनच फार आधी नासदीय सूक्तात " असत् ही नव्हते आणि "सत्" ही नव्हते अशी विचारसरणी मांडली गेली असेल तर ही विचाराची भरारी कोठच्या
कोठे घेऊन जाते.
तर मला जाणून घ्यावयाचे आहे की नासदीय सूक्त व उपनिषदांचा दुवा कसा जुळवून घ्यावयाचा ? श्री. धनंजय यांनी सुरेख भाषांतर केले व इतर दुवेही दिले. आता विनंती ही की माझ्या शंकेच्या संदर्भात त्यांनी क्षराक्षराविषयी दिशादर्शन करावे.
शरद

विवेचन आवडले

भाषांतर आणि भाष्य दोन्हीही उत्तम.
काहीच नसताना जेव्हा-तेव्हा, खाली-वर या कालस्थलसापेक्ष कल्पनांना अर्थ नसला तरी मानवी मनाला अतर्क्य
अशा त्या स्थितीला(?) वर्णित(?) कसे करावे??- हा प्रश्न अजूनही सतावतो.
किंबहुना ही संकल्पनाच मानवी मनात (इतक्या पूर्वी) उद्भवू शकली याचेच कौतुक वाटते.

असेच.

तत्त्वज्ञानाचे सोडा. मनाला हेलकावू शकणार्‍या कवित्वाने मी भारावून जातो आहे. पहिल्याच काही शब्दांत तोच तो ध्वनी/शब्द दोन-दोनदा उच्चारून अर्थाची उलटापालट करण्याची लकब अचंबित करते -

असेच.

अवांतर
मआपच्या 'भाषा आणि जीवन' ह्या त्रैमासिकाच्या दिवाळी २००९ ह्या अंकात धनंजय ह्यांचा लेख प्रकाशित झाला आहे. त्यांचे अभिनंदन. दुवा: मराठी भाषेतील नकारात्मक वाक्यरचनेतील क्रियापदे

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

आवडले

भाषांतर आणि विवेचन दोन्ही आवडले.

उत्तम अनुवाद

उत्तम अनुवाद आणि रसग्रहण. धनंजय यांनी दिलेल्या दुव्यावर नासदीय सूक्ताच्या आधीच्या आणि नंतरच्या ऋचांमध्ये मात्र वरील ऋचांप्रमाणे कुतूहल आढळत नाही. असे का असावे?

आगे-मागेची सूक्ते

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आगल्या मागल्या सूक्तांबद्दल :
ऋग्वेदातील सूक्तांचा क्रम तितकासा एका-एका विषयाला धरून नाही.
आदले १०.१२८ हे सूक्त "विश्वे देवा:" सर्व देवांची स्तुती करणारे आहे.
पुढले १०.१३० हे सूक्त यज्ञाच्या निर्मितीबाबत आहे. मात्र त्या सूक्तात "त्या प्रथम यज्ञाचे तपशील काय असतील?" असे कुतूहल जरूर मांडले आहे.

"कासीत्प्रमा? प्रतिमा किं? किं निदानम्? आज्यं किम्? परिधि: क आसीत्?... १०.१३०.३"

म्हणजे तसे कुतूहल आहे.

दहाव्या मंडलातील सूक्तांचे कवी वेगवेगळे होते, आणि त्यांची नावेही पुष्कळदा दिलेली नाहीत. नासदीय सूक्ताचा कवी "प्रजापतिपुत्र परमेष्ठी=सर्वोच्च" आणि या पुढील १०.१३० सूक्ताचा कवी "प्रजापतिपुत्र यज्ञ" असा अनुक्रमणीत दिलेला आहे.
हे कवी वेगवेगळे लोक असू शकतील (असावेतच असे मला वाटते.) वेगवेगळ्या कवींना रस वाटणारे विष्य वेगवेगळे असणार यात आश्चर्य असे काही नाही. पुरुषसूक्तातील विश्वनिर्मिती आणखी वेगळीच होती...

मस्तच

अनुवाद किती चांगला आहे हे संस्कृतबद्दलच्या अज्ञानामुळे सांगु शकत नाहि.
मात्र अनुवादातील भाव/विचार आवडला. किंबहूना अनुवादापेक्षा कवीच्या कल्पनाशक्तीने प्रभावित झालो आहे. अर्थात अनुवाद नसता तर ह्या आनंदाला मुकलो असतो. त्यामुळे याबद्दल धनंजय यांचे अनेक आभार .

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

+१

अनुवाद किती चांगला आहे हे संस्कृतबद्दलच्या अज्ञानामुळे सांगु शकत नाहि.
मात्र अनुवादातील भाव/विचार आवडला.

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

सुरेख

अनुवाद सुरेखच आहे, त्यामुळे काव्याचा आनंद घेता येतो.

ह्या सूक्ताकडे काव्य म्हणून पहावे हे सुचवल्याने - तसे पाहावे लागते. नाहीतर याचा उल्लेख आपल्याला माहिती असतो तो तत्वज्ञान म्हणून.

पण वरील सूक्तातील

अंधार होता, अप्रकट पाणीच पाणी
अंधाराने होते ते सगळे लपवले -
हे पोकळ झाकलेले, न-झालेले... आणि
त्यात तपातून एक महान उपजले

हे आवडले. (अजून बाह्य जगाशी संपर्क न झालेली) बाळे आईच्या पोटात असताना बहुतेक असाच (कदाचित गडद अंधार नाही) अंधार आणि पाणी अनुभवत असतील.

नासदीय सूत्रातील पाणी

नासदीय सूक्तातील पाणी हे 'डार्क मॅटर' आहे असे मानले तर या सूक्ताचा अर्थ काही निराळाच होतो. प्रथम सर्व विश्व 'डार्क मॅट्ररने' भरलेले होते. त्यातून 'बिग बॅन्ग' नंतर उर्जा व मॅटर ही महान सत्ये बाहेर आली. असा काहीसा अर्थ लावणे शक्य आहे.
चन्द्रशेखर

उत्तम

धनंजय, उत्तम भाषांतर तसेच विवेचन. अनेक धन्यवाद.

थोडा विचार मला जाणवते की खाली-वर ही संकल्पना, इथे-पलीकडे ही संकल्पना आपल्या मनात किती "नैसर्गिक" आहे - असणे-नाही-नसणे-नाही असा भन्नाट विचार करू शकणार्‍या कवीच्या मनःपटलावरही "जेव्हा-तेव्हा", "खाली-वर", "इथे-तिथे" या संकल्पनांचे चित्र पुसता पुसले जात नाही.

असे प्रश्न प्रत्येक व्यक्तिला केव्हातरी पडत असणारच असे वाटते. कवीच्या प्रांजळपणाचे कौतुक वाटते. "जेव्हा-तेव्हा", "खाली-वर", "इथे-तिथे" या संकल्पनांशिवाय कसे कल्पावे याचा विचार करतोय.

चर्चा

मूळ लेख आणि प्रतिसाद चांगल्या चर्चेचे लक्षण आहेत. आवडले.

थोडेसे तात्त्विक विवेचन

नासदीय सूक्त हे ऋग्वेदापैकी त्यातल्यात्यात अर्वाचीन असले, तरी अन्य भारतीय साहित्याच्या आदलेच. त्यामुळे "भाववृत्त*" या विषयावर भारतातील सर्वात प्राचीन विचार म्हणजे ऋग्वेदातल्या दहाव्या मंडलातील ही काही सूक्ते होत. (*भाववृत्त=अस्तित्वाचा वृत्तांत - या शब्दाचे गोळाबेरीज इंग्रजी भाषांतर "क्रिएशन" असे करतात, ते भाषांतर अगदी नेमके नाही असे मला वाटते.)

शरद म्हणतात त्याप्रमाणे सत्-असत् यांच्याबद्दल ऊहापोह करणारी उपनिषदे ही याच्या पुढचीच. उपनिषदांच्या रचयित्यांना ही सूक्ते उपलब्ध होती, आणि त्यांचा काही संबंध लावता येतो. त्यांचा काय संबंध लावावा? याबद्दल वेगवेगळ्या दर्शनांनी आपापलेच मत कसे प्रस्थापित होते आहे असे पटवले आहे.

आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ७ ऋचांच्या या सूक्तात कुठल्याच दर्शनातील पारिभाषिक शब्द जसेच्या तसे सापडत नाहीत. "ब्रह्म" हा अद्वैत-वेदान्तातील (उत्तरमीमांसेतील) प्रमुख शब्द सापडत नाही. (ऋग्वेदामध्ये "ब्रह्मन्" हा शब्द "यज्ञातले सामर्थ्यवान शब्द" वगैरे अन्य अर्थाने सापडतो, पण या सूक्तात तेही नाही.) त्यामुळे "आनीदवातं स्वधया" = "स्वतःच्या धारणेने येणारे तत्त्व" हे ब्रह्म आहे, आणि बाकी सर्वाचा "न असत्-न सत्" असा "अत्यंताभाव" आहे, ती सर्व माया आहे असे उत्तरमीमांसक आपल्या कल्पनांचे वर्णन या सूक्तात बघतात. सांख्य "वरती प्रयत्न, खाली स्वतःला धारण करणारी तत्त्वे"' या वाक्यात पुरुष-प्रकृतीच वर्णिलेली आहेत, या गोष्टी प्रथमपासून आहेत, असा अर्थ सांगतात. वगैरे.

शब्दार्थातून काय कळते, म्हणून सर्वात उपयोगी ग्रंथ म्हणजे सायणाचे भाष्य होय. सायण हा ईसवी १३-१४व्या शतकातला विजयनगर साम्राज्यात जगला. म्हणजे वेदकाळापासून फारफार अलीकडचा. तरीही हेच एक संपूर्ण भाष्य आपल्यापाशी आहे. त्याचे भाष्य कधीकधी पटले नाही तरी आवश्यकही आहे. सायण त्यातल्या त्यात अद्वैत-वेदान्तातील निष्कर्षापर्यंत अर्थ ओढतो, तरी आधी शब्दार्थ देतोच, हे उत्तम.

सायण कित्येक उपयोगी संदर्भही देतो. म्हणजे "अम्भ बहुधा नव्हते" असे सूक्त म्हणते, पण तैत्तिरीय संहिता "होते" म्हणते, तो वेगळा प्रलयकाळ असावा. कठ उपनिषदातील मृत्यूबद्दल संदर्भ देतो, मुंडकातील तपाचा ज्ञानाशी संबंध काय तो संदर्भ देतो, वगैरे. ज्यांना या सूक्तापासून उपनिषदांपर्यंत जाणारे धागे जाणायचे कुतूहल आहे, त्यांना सुरुवात करायला सायणाच्या भाष्यात खुणा सापडतील.

आता शब्दार्थापासून आपल्याला काय कळते, ते बघूया. अर्थात मी कुठल्याही निष्कर्षाप्रत पोचणार नाही. कारण शंकराचार्य-मध्वाचार्य वगैरे वजनदार लोक वेगवेगळ्या निष्कर्षांपाशी पोचले आहेत.

पहिले दीड ऋचा नेति-नेति असेच सांगतात (किंवा किम्? विचारून नकार सांगितला जातो) :
नसलेल्या गोष्टी अशा :
१. असत्-सत्
२. धूळलोक-आकाशलोक ही जगे
३. आवरण
४. स्थान (कुठे)
५. अवलंबून असलेली भूतमात्रे (कस्य शर्मन्)
६. पाणी (त्या काळात काही विचारवंत "आधी पाणी होते, असे म्हणत असत काय, त्यांचे विशेष खंडन येथे केले आहे?)
७. मृत्यू-अमृतत्व
८. रात्री-दिवसांचे प्रकटन

सायण म्हणतो की पैकी "१. सत्-असत् नव्हते" यात बाकी सर्व आलेच, पण मूलभूत असे काय-काय नव्हते असे स्पष्टीकरण सूक्त देत आहे. ("तर्हि"=तेव्हा शब्द हा निरर्थक आहे, पण हा शब्द फक्त उपचारार्थ आहे, असे सायण सांगतो, हे वर सांगितलेलेच आहे.)

त्यानंतर प्रथम "आहे" असे वर्णन येते :
१. "अवात" अशा "स्वतःला धारण करणार्‍या"ने स्वतःला आणले (?) (आनीत्= प्राणित करणारे, असा अर्थ सायण देतो) - या वेगळे काहीही नव्हते
हे तत्त्व सत्-असत् च्या पलीकडचे आहे का? हा प्रश्न पुढील दार्शनिकांना त्रास देणारा आहे.

त्यानंतर आहे असे येते
२. तमस् = अंधार. हा खराखरचा आहे, की दुसरा कशाचा दृष्टांत आहे? "अंधार" म्हणजे कुठली अस्तित्व असलेली वस्तू असते, की प्रकाशाचे केवळ नसणे (म्हणजे प्रकाशावेगळे अंधाराचे अस्तित्व नाही)? या प्रश्नाबद्दल पुढचे दार्शनिक एक मताचे नाहीत. पण काही का असेना "सत् नव्हते, असत् नव्हते, स्वधा एकावेगळे काही नव्हते" अशा स्थितीत प्रकाशाच्या नसण्याने म्हणा, खुद्द अंधाराच्या अस्तित्वाचा म्हणा कुठल्याच प्रकारे अर्थ नाही. म्हणून "तमस्" हा कदाचित दृष्टांत असावा.

इथपासून अर्थांना वेगवेगळे फाटे फुटायला लागणार - त्या सर्व फाट्यांवर मी जाणार नाही. दृष्टांतापासून पुन्हा पुन्हा शब्दार्थापाशी यायचा प्रयत्न करीन.

(आपल्या ओळखीच्या जगात) अंधार असतो तेव्हा आपण समोर काही आहे (सत्) किंवा नाही (असत्) असे ठामपणे सांगू शकत नाही. किंबहुना समोर असणे आणि नसणे असे कुठलेच नसते. जैनांच्या स्याद्वादातील "अवक्तव्या"ची आठवण यावी. असा दृष्टांत असला, तर सृष्टीच्या पूर्वी काही असेल, किंवा नसेलही, पण ते अंधाराने झाकलेल्यासारखे असल्यामुळे होते असेही नाही, नव्हते असेही नाही.

अर्थात स्वधा-एक तत्त्व आल्यानंतर खरोखरीच "अंधार" उत्पन्न झाला अशी कथाही सूक्त सांगत असेल.

३. अंधाराने लपवलेले सलिल होते. आता पाणी नव्हते, असे पहिल्या ऋचेत सांगितल्यानंतर पाणी आहे, असे कसे असावे? पुन्हा हा दृष्टांत असण्याची शक्यता आहे. महापुरात काय कुठे आहे, हे कळत नाही, आणि अंधारामुळे पाणीच पाणी आहे, याचीसुद्धा खूण नसते (अप्रकेत) या दृष्टांताने काहीतरी होते, पण जाणणे शक्य नव्हते, असा अर्थ असू शकतो.

वर चंद्रशेखर म्हणतात की अंधाराने लपवलेले पाणी म्हणजे "डार्क मॅटर" आणि त्यातून बिगबँगातून मॅटर उत्पन्न झाले. मला त्यांची कल्पना स्फूर्तिदायक आणि काव्यात्मक वाटते. पण असे कुठल्याशा फॅशनेबल अर्थामध्ये आपण स्वतःला गुरफटून घेऊ नये असे मला वाटते. "डार्क मॅटर" म्हणजे बिगबॅगाच्या पूर्वीचे जड-वस्तुमान नव्हे. "डार्क मॅटर" म्हणजे हल्लीच्या तर्काने जाणवणारे (म्हणजे त्यातले गुरुत्वाकर्षण जाणवते/आकाशगंगेच्या गतीत दिसते) पण प्रकाशलहरींनी/दुर्बिणीतून न दिसणारे वस्तुमान... अशाच प्रकारे मला सुचलेले काव्यात्मक हल्लीचे उदाहरण म्हणजे "मृत्युशील-अमृतत्व नसलेले जीव नव्हते तेव्हा जे जीवसदृश द्रव होते ("प्रायमॉर्डियल सूप") ते "तमसो गूढं सलिलम्" असू शकेल. हल्लीच्या आवडीच्या कल्पना खूप असू शकतील, "पैकी कुठल्या एका कल्पनेला ऋषीने दूरदृष्टीने बघितले" असा विचार त्या काव्याची अनंत स्फूर्तिदायी शक्ती एका छोट्याशा स्थल-काल-लोकप्रियतेच्या चौकटीत बंदिस्त करते.

आडव्या किरणाबाबत सायण म्हणतो की हा दृष्टांत सृष्टीच्या शीघ्रत्वाबद्दल आहे. "असणे नाही-नसणे नाही" अशी परिस्थिती रोज रात्रीच्या अंधारात असते. "आडव्या" क्षितिजावर सूर्याची आडवी किरणे येतात तेव्हा एक-एक करत नव्हे तर सगळे काही एकाच क्षणात आहे किंवा नाही मध्ये बदलून जाते.

इच्छेपासून असणे-नसणे निर्माण होते, हेसुद्धा तथ्यकथन की दृष्टांत असे दोन्ही अर्थ काढता येतात. कुठल्या गोष्टीबद्दल आपल्याला (मनुष्यांना) आहे-नाही-नाही-नाही-काही-माहीत-नाही असे गाढ अज्ञान असते. पण ज्ञान व्हावे अशी प्रबळ इच्छा आपल्या मनात उत्पन्न झाली तर ते रेत-बीज मनात पडते, आणि त्या विषयाबद्दल आहे/नाही यांचे नाते आपल्याला कळून येते. हा आपला नेहमीचा अनुभव आहे. त्याच प्रमाणे वैश्विक "जाणण्याच्या इच्छे"ने विश्वात आहे/नाही हे निर्माण झाले. ही वैश्विक इच्छा ही केवळ उपमा म्हणून कवीच्या मनीषेसारखी आहे, की खरोखर त्याच मनीषेचे वैश्विक रूप आहे, असा कुठलाही अर्थ आपण घेऊ शकतो.

पुढच्या दोन ऋचा "त्यानेच सृष्टी निर्मिली की नाही, तो धारण करतो की नाही, तो जाणतो की नाही?" असे विप्रश्न करणार्‍या आहेत. यातील प्रश्नार्थक शब्दांचा अर्थ "अर्थात, त्यानेच निर्माण केली, तोच धारण करतो, तोच जाणतो, दुसरे कोणीही नाही" असे घेणे शक्य आहे. पण घेतलाच पाहिजे असे नाही. प्रश्न खरोखरचे प्रश्नच आहेत, असा शब्दार्थही योग्य वाटतो.

- - -

तत्त्वज्ञानात "अस्तित्वशास्त्र" आणि "ज्ञानशास्त्र" (ऑन्टॉलॉजी आणि एपिस्टेमॉलॉजी) हे दोन वेगवेगळे प्रकार असतात. पैकी प्राचीन काव्ये "हे असे आहे" सांगणारी खूप आहेत (अस्तित्वशास्त्र सांगणारी) पण हे "ज्ञान कसे मिळते" असे सांगणारी (ज्ञानशास्त्र सांगणारी) थोडीच. (दर्शनांमध्ये मात्र हे सांगावेच लागते.)

अशा परिस्थितीत कवीचे ज्ञानशास्त्र त्याच्या वादाच्या मांडणीतून किंवा प्रश्नोत्तरातून ताडता येते. असा काही प्रकार शेवटच्या दोन ऋचांमध्ये दिसतो.
देव याच्या पुढचे (म्हणून त्यांना माहीत नाही).
याच्यात चक्षुर्वै ज्ञान असलेले साक्षीच सत्य सांगू शकतात - स्वतः न बघता त्यांची साक्ष मान्य, पण ती साक्ष मात्र चक्षुर्वै असायला पाहिजे, असे काही तत्त्व ताडता येते. असे तत्त्व कवीच्या मनात नसले तर ओळीचा काही अर्थच लागत नाही.
जो सृजन करतो तो जाणतो (जर त्याने सृजन केले असेल तर) - म्हणजे हेतुपूर्वक कृती करून काही घडवले, तर ज्याचा हेतू, तो निर्मितीचे कारण जाणतो, असे तत्त्व आहे.
जो धारण करतो तो जाणतो (जर तो धारण करत असेल तर) - म्हणजे वस्तू कायम राहावी म्हणून ज्याला हेतुपूर्वक कृती करावी, तो त्या वस्तूचे कारण जाणू शकतो.
- - -
पण सायण हेसुद्धा एक सांगतो, की जर जग शाश्वत असेल - पूर्वापारपासून असेल - तर कोणी निर्मिले की नाही हा प्रश्नच अनुत्तरणीय आहे. जर जग चालू राहाणारच असेल, तर कोणी ते हेतुपूर्वक धारण करतो का, "चालवतो" का, हा प्रश्नच अनुत्तरणीय आहे. जर निर्मिती/धारण हे दुर्बोध असेल तर त्याबद्दल ज्ञानही कोणाकडे नाही.
यातून सायणाच्या ज्ञानशास्त्राबद्दल हे कळते - की नाहीपासून आहे करणे, किंवा जे नाश पावत आहे, त्यास सहेतुक चालू ठेवणे (पण मग सहेतुक क्रिया केली नाही तर नाश होतो, हे ठाऊक हवे) असे जेव्हा घडते, तेव्हाच आपल्याला "वस्तूचे कारण काय" हे निर्विवादपणे कळू शकते.

येथे मी माझी मते मांडली आहेत, आणि वेगळे अर्थ काढायच्या (काही) वाटाही सांगितल्या आहेत. सायणाने जिथे "माया" आणि "ब्रह्म" हे शब्द घातले आहेत, किंवा "यातून प्रलयकाळी अणू असल्याचे प्रत्याख्यान होते" असे म्हटले आहे, ते थेट शब्दार्थातून नाही. थेट दृष्टांतातून नाही. ते या ठिकाणी मी सांगितलेले नाही. अणुवाद्यांनी, सांख्यांनी, मीमांसकांनी... सर्वांनीच या सूक्ताचा अर्थ त्यांच्या दर्शनाच्या दृष्टीने लागतो असेच सांगितले आहे. अनंत स्फूर्तिदायक असे हे सूक्त सर्व वाचकांना त्यांच्या जिज्ञासेत त्यांच्या-त्यांच्या मार्गाने जाण्यास उद्युक्त करो, असे चिंतत मी येथे या लेखमालिकेची करतो इतिश्री.

वैदिक ऋचांचे रसग्रहण

सौरभ
वरील भाषान्तर आणि विवेचन अत्यन्त उत्कृष्ट. त्यावरील इतर मण्डळींच्या प्रतिक्रियाही छान आहेत. सर्वांचेच अभिनन्दन.
क्षमा करा, मी जरासे विषयन्तर करतो.
वेदांना बर्‍याच दार्शनिकांनी अपौरुषेय मानले आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे विचार कळू शकतील का ?
सध्या संस्कृतच्या अभ्यासाकरिता या विषयावर मी माहिती गोळा करतोय म्हणून विचारले.

अधिक तपशील, वेगळा धागा

ही चर्चा रोचक होऊ शकेल, म्हणून यासाठी स्वतंत्र धागा काढावा ही विनंती.

शिवाय या प्रश्नाचा ऊहापोह होऊन संस्कृतच्या अभ्यासाकरिता काय मार्गदर्शन मिळू शकेल, याबाबत चर्चाप्रस्तावात थोडा विस्तारही करता येईल.

(म्हणजे वेद पौरुषेय किंवा अपौरुषेय असले म्हणून संस्कृतच्या अभ्यासात/अध्यापनात काय फरक पडू शकेल, याबाबत चर्चेला दिशा देता येईल. नाहीतर तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळीच काही चर्चा होऊ शकेल, तुमचा हेतू सफल होण्यात आडथळा येईल.)

हे मात्र एकदम बरोब्बर

धनंजय बुवा, तुम्ही नेहेमीच एकदम बरोब्बर मुद्दे कसे काय मांडता ??? गम्मतच् आहे !!!

 
^ वर