एक प्रस्ताव

नमस्कार मंडळी,
काही उपक्रमींशी चर्चा करताना असे लक्षात आले, की उपक्रमावर अनुवादकांची संख्या वाढते आहे. शिवाय त्यांच्या अनुवादांत बरेच वैविध्यही आहे. उदाहरणार्थ- मूळ साहित्याच्या जातकुळीतील वैविध्य- ललित/ माहितीपर/ तांत्रिक , मूळ साहित्याच्या भाषेतील वैविध्य- संस्कृत / इंग्रजी इ. , मूळ साहित्याच्या निर्मितीच्या काळातील वैविध्य- डॉयलचा काळ/ पतंजलीचा काळ इ., अनुवादाच्या प्रकारातील वैविध्य- भाषांतर / भावानुवाद / रुपांतर, अनुवादाच्या उद्दिष्टांमधील वैविध्य- मला हे साहित्य आवडले म्हणून/ हे साहित्य इतरांपर्यंत पोहोचावे म्हणून इ.

पण या सर्व अनुवादांना एकाच व्यासपीठावर आणतात ती दोन समान सूत्रे- अनुवादित साहित्याची मराठी भाषा आणि हौशी अनुवादन (म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे यांतले कोणीही व्यावसायिक अनुवादक नाहीत. त्यामुळे प्रकाशकाच्या मर्जीप्रमाणे संपादन अशा काही तडजोडी त्यांना करायला लागलेल्या नाहीत.)

या अनुवादांत आणि अनुवादकांत अशी समानता आणि भिन्नता असल्याने त्यांच्या अनुवादप्रक्रियेबद्दल जाणून घेणे फारच रोचक ठरेल असे मला वाटते. या उद्देशाने एकूणच अनुवादप्रक्रियेबद्दल मला पडणारे काही प्रश्न मी येथे देते आहे. येथिल अनुवादकांनी शक्य झाल्यास, वेळ मिळाल्यास कृपया त्यावरची आपली मते येथे मांडावीत. सर्वांची एकत्र घेतलेली सामुहिक इ-मुलाखत समजा हवे तर. :)

प्रश्न पुढीलप्रमाणे-
१- अनुवाद करताना साधारणपणे कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात? त्या अडचणींतून आपण कसे मार्ग काढता?
(पुढील २ प्रश्न पहिल्या प्रश्नाचे पुरवणी प्रश्न आहेत. अडचणी या शब्दामधून मला काय अभिप्रेत आहे हे लक्षात येण्यासाठी)

अ- मूळ साहित्यात 'त्यांच्या' संस्कृतीबद्दल येणारे संदर्भ अनुवादित करायचे असल्यास काय करता?
तो संदर्भ तसाच ठेवता/ त्या संदर्भाच्या जवळ जाणारा आपल्या संस्कृतीतला एखादा संदर्भ त्याठिकाणी योजता/ की तो संदर्भ काढून टाकता?
संदर्भ तसाच ठेवायचे झाल्यास त्याचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास कसे देता- तळटीप घालून / लिहिण्याच्या ओघात स्पष्टीकरणात्मक वाक्य लिहून?

ब- प्रत्येक भाषेची स्वतःची नजाकत असते. एखादा अर्थ एखाद्या भाषेतून मांडण्यासाठी ज्या प्रकारे वाक्यरचना केली जाईल त्याचप्रमाणे दुसर्‍या भाषेत केली जाणार नाही. अशावेळी तुम्ही काय करता? मूळ भाषेतला वाक्यरचनाविशेष जराही धक्का न लावता जसाच्या तसा मराठीत आणता की त्याला महत्त्व न देता अर्थाचा अनुवाद करता?

२-अनुवाद करण्यासाठी साहित्य कसे निवडता? निकष काय?

३- अनुवादात इंग्रजी किंवा देजा वू सारखे अन्यभाषीय शब्द वापरण्याबद्दल आपली भूमिका काय?

४- अनुवाद केव्हा करायचा आणि रुपांतर केव्हा करायचे हे कसे ठरवता?

५-अनुवाद करताना आपल्यापुढे बरीच उद्दिष्टे असू शकतात. जसे होम्सकथांचा अनुवाद करताना कथाभागातले थ्रिल कायम राहिल यासाठी प्रयत्न करणे, व्हिक्टोरियन एराशी समकालीन भाषा वापरणे, डॉयलच्या खास शैलीला धक्का न देणे, त्या काळातले सर्व शिष्टाचार जसेच्या तसे अनुवादात आणणे इ. परंतू प्रत्यक्ष अनुवाद करताना असे लक्षात येते की एका उद्दिष्टाला धरून अनुवाद करायचे झाल्यास दुसर्‍या उद्दिष्टाची पूर्ती होत नाही. अशा वेळी आपण काय करता?

६- स्वतंत्र लेखन करताना आणि अनुवाद करताना काय फरक जाणवतो? स्वतःच्या विचारप्रक्रियेत, स्वतःच्या भाषेत आणि वाचकांच्या प्रतिसादांत?

येथे प्रतिसाद देताना कृपया आपण कोणत्या प्रकारच्या साहित्याचा अनुवाद करतो, कोणत्या भाषेतून मराठीत अनुवाद करतो ते आधी पहिल्या ओळीत सांगावे.
धन्यवाद.
राधिका

लेखनविषय: दुवे:

Comments

स्तुत्य चर्चा

मी अजूनतरी वाङ्मयाचा अनुवाद केलेला नाही. ('यू आर द विंड बिनीद माय विंग्ज' या बेटी मिडलरच्या गाण्याचा अनुवाद करण्याचा अजूनही प्रयत्न करत आहे.)
पण पूर्वी प्रियालीच्या 'आर्य' विषयासाठी राजेश कोच्चर यांच्या इतिहासविषयक पुस्तकाचा अनुवाद करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. तोही अर्धवटच आहे. :(:(

१- अनुवाद करताना साधारणपणे कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात? त्या अडचणींतून आपण कसे मार्ग काढता?
बर्‍याच वेळी अनेक शास्त्रीय शब्दांना प्रतिशब्द चटकन सापडत नाही. मग मोल्सवर्थ पहावा लागतो. यामुळे उत्साह ओसरतो.
२-अनुवाद करण्यासाठी साहित्य कसे निवडता? निकष काय?
एखादे पुस्तक / कथा / चित्रपट / गीत / कविता आपल्याला आवडले तर इतरांनाही त्याचा आस्वाद द्यावा असे वाटते. (कोणत्याही साहित्यनिर्मिती मागेही हीच प्रेरणा {उबळ ;)} असते. ) आपल्याला सांगावेसे वाटणे हाच निकष.

३- अनुवादात इंग्रजी किंवा देजा वू सारखे अन्यभाषीय शब्द वापरण्याबद्दल आपली भूमिका काय?
योग्य ठरत असतील आणि वाचकांना समजत असतील तर बिनदिक्कत ठेवावेत.

४- अनुवाद केव्हा करायचा आणि रुपांतर केव्हा करायचे हे कसे ठरवता?
अनेक वेळेला साहित्याचे वातावरण वाचकांना अपरिचित असण्याचा संभव असतो. तर कांही वेळेला प्रत्यक्ष अनुवादकर्त्याला अर्थ समजला तरी नेमका संदर्भ माहित नसतो अशावेळी रूपांतर करणे उत्तम. उदा. एस्किमो / झुलू लोकांच्या परंपरांवर बेतलेल्या कथेचा अनुवाद करणे मला जमणार नाही. त्यांचे रूपांतर करण्याचा मी प्रयत्न करीन. कारण त्या परंपरांमधील बारकावे समजावून घेऊन मग कथानुवाद करण्यापेक्षा त्यातील भावनांवर आपल्या परंपरांचे रोपण करणे मला संयुक्तिक वाटते.

बाकीच्या प्रश्नांना इथले अनुभवी अनुवादक समर्पक उत्तरे देऊ शकतील.

अरेरे

पण पूर्वी प्रियालीच्या 'आर्य' विषयासाठी राजेश कोच्चर यांच्या इतिहासविषयक पुस्तकाचा अनुवाद करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. तोही अर्धवटच आहे. :(:(

मी अद्यापही वाट पाहत असते की कधी तरी तुम्ही तो लेख टाकाल. :( स्वैर अनुवादही चालेल, थोडं मनावर घ्या प्लीज.

एक प्रश्न

कारण त्या परंपरांमधील बारकावे समजावून घेऊन मग कथानुवाद करण्यापेक्षा त्यातील भावनांवर आपल्या परंपरांचे रोपण करणे मला संयुक्तिक वाटते.

पण मूळ परंपरांतले बारकावे समजून न घेता त्याजागी आपल्या परंपरा ठेवल्या, तर अर्थात फरक पडेल असे वाटत नाही का? उदाहरणार्थ- दिवाळीला हिंदूंचा नाताळ असे म्हटले जाते. पण म्हणून दर वेळेला नाताळाचा संदर्भा आला की त्याजागी दिवाळी ठेवता येणार नाही. जेव्हा नाताळाच्या निमित्ताने घरातले सगळे एकत्र जमले असा आशय असेल, नाताळाला फारसे रुपकात्मक महत्त्व नसेल, तेव्हा त्याजागी दिवाळी वापरता येईल. पण समजा नाताळाला रुपकात्मक महत्त्व असेल, जसे येशू ख्रिस्ताचा काही संदर्भ असेल तर त्या जागी दिवाळी वापरता येणार नाही. ख्रिश्चन धर्माच्या चालीरीतींशी आपली थोडीफार ओळख असल्याने इथे आपल्याला विसंगती लगेच लक्षात येईल. पण झुलू लोकांच्या चालीरीती समजून न घेतल्यास विसंगती लक्षात येणार नाही व अर्थाचा घोळ होईल. नाही का?

राधिका

एक प्रश्न / विनंती

प्रश्न-

दर दिवशी वृत्तपत्रात येणारा एकेक भाग वाचून लगेच त्याचे भाषांतर करून मनोगतावर (आणि माझ्या अनुदिनीवर) टाकत गेलो.

असे केल्यामुळे नंतर सगळे भाग वाचून झाल्यावर हा पुढचा भाग जर आधी लक्षात आला असता तर आधीच्या एका भागातले भाषांतर थोडे वेगळे केले असते, असे कधी वाटले का?

विनंती-

अतिरेक्यांच्या तोंडची भाषा ग्रामीण मराठी असावी,

उदाहरण देऊ शकाल का? म्हणजे मूळ इंग्रजी वाक्य व त्यासाठीचे भाषांतर असे.
राधिका

अनुवाद : माझा अनुभव

मी फार अनुवाद केले नाहीत. जी एंच्या "पारधी" या कथेचा इंग्रजीमधे अनुवाद केला ; कारण ही कथा मला आवडते आणि मुख्य म्हणजे माझ्या अमराठी मित्रांना जी एंच्या ग्रेटनेस् चा एक कवडसातरी मिळावा असे फार वाटले.

अनुवादाबद्दल मी एकूण असमाधानी राहिलो. खरे तर या कथेमध्ये स्थानिक कानडीमिश्रित मराठी भाषेचा वापर बिलकुल नाही ; त्यामुळे "संदर्भांचे स्थानांतर" करण्याची तोशीस नव्हती. पण जी एंच्या संकरित प्रतिमा , एकूण अत्यंत घट्ट् अशी वाक्यांची वीण या सर्वांचा मेळ घालता घालता "झुरळाने कैसे पतंगावे" अशी स्थिती झाली ...
माझ्या काही मित्राना अनुवाद बरा वाटला. त्यांच्यापर्यंत मूळ अनुभवाची मी धग पोचवू शकलो नाही.

हेच हवे होते

अनुवादाबद्दल मी एकूण असमाधानी राहिलो. जी एंच्या संकरित प्रतिमा , एकूण अत्यंत घट्ट् अशी वाक्यांची वीण या सर्वांचा मेळ घालता घालता "झुरळाने कैसे पतंगावे" अशी स्थिती झाली ...

थोडे विस्ताराने उदाहरणासहित सांगाल का?

मला हा अनुवाद वाचायला मिळेल का?

राधिका

उत्तम उपक्रम

रधिका,

हा उपक्रम आवडला. लक्ष्मीबाई केळकरांच्या चरित्राचा स्वैर अनुवाद मनोगतवर केलेल्यांच्या चमूत मी होतो. त्या चिमुकल्या प्रयोगात तसे विषेश काही प्रश्न आले नाहीत. पण येथे ख-याखु-या अनुवादकांचे अनुभव वाचायला आवडतील.

आपला,
(अनुवादक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

असे काही नसते हो/ एक् प्रश्न

ख-याखु-या अनुवादकांचे अनुभव वाचायला आवडतील.

असे काही नसते हो. तुम्ही एक अनुवाद केलात ना, मग खरेखुरेच अनुवादक आहात.

एक प्रश्न-
इतरांबरोबर भाषांतराचे काम वाटून घेताना काही प्रश्न उद्भवले असतीलच की. जसे या संकल्पनेसाठी अमुक व्यक्तीने आधी हा शब्द वापरला होता. पण त्या शब्दापेक्षा हा शब्द अधिक योग्य आहे. परंतू आता त्या व्यक्तीने तो शब्द आधी वापरला असल्यामुळे हा वापरता येणार नाही. असे कधी झाले का?
राधिका

आवडीचा विषय

तसे मी फार अनुवाद केले नाहीत.पण काही मुद्दे आठवले ते असे:
१. आपल्याला अनुवाद करायचा आहे की रुपांतर याचा निर्णय सुरुवातीलाच पक्का घेऊन ठेवावा. या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. एखाद्या कथेचे फक्त बीज घेऊन कथेतील पात्रे, स्थळे आणि संदर्भ आपल्या संस्कृतीत बसतील असे बदलणे हे झाले रुपांतर. उदा. नारायण धारपांचे 'लुचाई' आणि स्टिफन किंगचे 'सालेम्स लॉट.' (लुचाईत कल्पना परकीय असल्याचा उल्लेख पाहिल्याचे आठवले नाही.)
अनुवादात अनुवादक हा एक सुंदर परकीय भाषेतले साहित्य त्याच्या भाषेतील वाचकांना त्यांना समजेल अशा भाषेत उपलब्ध करुन देणारा एक 'माध्यम' असावा. मूळ कथेतली संस्कृती, पात्रांचे वागणे, नावे इ. कायम ठेवून फक्त भाषा आणि आपल्या भाषेत बदल करताना मूळ संवादाची लज्जत कायम ठेवून त्यात आपल्या भाषेचा बाज उतरवणे. उदा. शांता शेळकेंचे 'चौघीजणी'/लुइसा मे अल्कॉटचे 'लिटल विमेन', पु. लं.चे 'काय वाट्टेल ते होईल!'/'एनिथिंग कॅन हॅपन' जॉर्ज पापाश्विली.
नवीन अनुवादकांचा आपली भूमिका नक्की रुपांतरणाची आहे की भाषांतराची याबाबत बरेचवेळा गोंधळ उडालेला असतो. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णासारखे ते एकाच कथेत कधीकधी भाषांतर आणि कधीकधी रुपांतर अशा भूमिका घेत असतात. उदा. माझ्या 'नाकाखालीच!' या एका अनुवादात कथेच्या शीर्षकापासून असा गोंधळ उडालेला दिसतो. 'गिगल्ड' ला 'मनातल्या मनात खदखदून हसणे' काय, किंवा 'अंडर अवर नोज' ला 'नाकाखालीच' काय, किंवा कथेतल्या स्टेकचे भाषांतर करताना चिकन बनवणे काय. 'पशुदफनभूमी' मध्ये पण गजाननराव नामक माणसाने नायकाला सकाळी /दुपारी बीयर प्यायला बोलावणे यात जरा गडबड वाटते.
http://www.manogat.com/node/4242
http://www.manogat.com/node/3357
त्यातल्या त्यात (फक्त)मला(च) माझी 'अंतीम लढत' ही कथा चांगली अनुवादीत वाटते.
http://www.manogat.com/node/6049
(उदाहरणे सहज उपलब्ध असल्याने माझ्या कथांची दिली आहेत, मार्केटिंग म्हणून नाही.)
२. प्रत्येक भाषेचे ठराविक वाक्यप्रयोग, वाक्प्रचार असतात. त्यांचा शब्दशः अनुवाद करणे तुमच्या अनुवादाच्या तब्येतीला फार हानीकारक ठरते. 'हिज फेस ऍशन्ड' चा अनुवाद 'त्याचा चेहरा राखेने सारवल्यासारखा झाला' असा करण्याऐवजी 'त्याचा चेहरा पांढराफटक पडला' हा जास्त बरा वाटतो ना?
३. काही बाबतीत इंग्रजी/परकीय कथांतील अलिप्तपणा आणि त्यांची संस्कृती अनुवाद करताना आड येतेच. माणसे एकमेकांना न सांगता बाहेर जातात,श्रीमंत घराण्यांत नवरा बायकोच्या वेगवेगळ्या खोल्या असतात आणि त्याला जोडणारी दारं असतात,घरातल्या घरात न्याहारी किंवा रात्रीच्या जेवणाला खाली येतानाही ते कपडे बदलतात. कदाचित हेही एक कारण असावे की होम्स आणि ऍगाथा ख्रिस्ती च्या कथा अनुवादासाठी अनुवादकांना जास्त आवडतात. ते जुने इंग्रजी लेखक असल्याने त्यांच्या कथांतील उल्लेख आपल्या संस्कृतीत बसवणे तुलनेने सोपे पडत असावे.
४. अनुवाद करताना आपल्याला त्या संस्कृतीबद्दल/तिथल्या हवामानाबद्दल/सणवारांबद्दल थोडी माहिती असल्यास बरे पडते.(नसली तरी चालते.) हल्ली विकीपीडीयाने हे काम सोपे केले आहे. होम्सच्या कथांत बर्‍याचदा कॅब म्हणजे काय, ब्रोगॅम(मला उच्चार माहिती नाही) म्हणजे काय किंवा डॉग कार्ट म्हणजे नक्की कशी असते, सिक्सपेन्स म्हणजे किती ,शिलिईंग म्हणजे किती आणि सॉव्हर्जिन म्हणजे किती, यांचा पौंडाशी संबंध कसा,पूर्वीच्या काळी वीज नव्ह्ती तेव्हा तिथे गॅसबत्त्या जास्त वापरायचे का मेणबत्त्या,वर कोट न घालता नुसत्या शर्टात बाहेर पडणे असभ्य असायचे का,बायकांनी टोपी न घालता बाहेर पडणे असभ्य होते का, असे काही प्रश्न कधीकधी पडतातच.
५. काही वर्णने भाषेत बीभत्सपणा/बटबटीतपणा येऊ न देता आपल्या भाषेत आणणे जरा कठीण पडत असावे. 'गॉडफादर' च्या मराठी आवृत्तीत अशा काही ठिकाणी एका परिच्छेदाचे एक वाक्य केले आहे.
६. त्यांच्या भाषेत कोणते कोणते शब्द सुसंस्कृत नाहीत आणि कोणकोणते 'चालून जातात'? 'डॅम धिस', 'गॉड्डॅम्ड दॅट' 'लाइक हेल आय विल!' यातले 'हेल','डॅम' हा असंस्कृत शब्द आहे का? तसेच कथांमध्ये आफ्रिकन पात्रांच्या तोंडी जी वेगळी भाषा येते ती, किंवा कॉकनी भाषा यांचे भाषांतर करताना नक्की काय करायचे हा प्रश्न कधीकधी पडतो. 'स्लँग' भाषेचे अनुवाद करताना काय करावे आणि कसे करावे असा पेच पडतो.
७. काही शब्द, जे त्यांच्या संस्कृतीतले आहेत, उदा. केक किंवा पोकर यांचे भाषांतर न करता मूळ इंग्रजी शब्द तसेच राहू द्यावे असे वाटते. तिथे केकची मिठाई आणि पोकरची निखारे हलवण्याची काठी करुन आशय बदलतो असे वाटते.
(या सर्व मुद्द्यांना 'असे मला वाटते' हे शेपूट जोडून घ्यावे.मुद्द्यांची सत्यासत्यता काळानुसार बदलू शकते.)

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

गॉडफादर

गॉडफादर' च्या मराठी आवृत्तीत अशा काही ठिकाणी एका परिच्छेदाचे एक वाक्य केले आहे.

याचे मराठी आवृत्ती कुठली?

अवांतर - मागे एकदा (बहुदा राजेंद्र यांनी) सत्या गॉडफादरचे रुपांतर कसे आहे याबद्दलचे स्पष्टीकरण दिले होते. ही अशी रुपांतरे खासच.
अतिअवांतर - रुपांतराबद्दल विशाल भारद्वाजांच्या 'मकबूल' व 'ओंकारा' याच्या मूळ कथानकाबद्दल कयास बांधणे कठीण गेले. या रुपांतरणांवर (विषयांतर होत नसल्यास) कुणी प्रकाश टाकू शकेल काय?

पुस्तक

मराठी पुस्तकाचे नाव पण 'गॉडफादर' च आहे. लेखक कोण आठवत नाही. आज बघून सांगते.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

गॉडफादर

गॉडफादरचा मराठी अनुवाद रविंद्र गुर्जर यांचा आहे. त्यांचा पॅपिलॉनचा मराठी अनुवादही सुरेख आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

रविंद्र गुर्जर

रविंद्र गुर्जर यांचा गॉडफादर, पॅपिलॉन बरोबरच सत्तर दिवस हा अनुवादही (खरतरं या लेखकाचा कोणताही अनुवाद) वाचाच! पुस्तक खाली ठेववणार नाही याची ग्यारंटी :)

ओंकारा

ओंकारा हा शेक्सपियरचा 'ऑथेल्लो' आहे असे ऐकले होते.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

अजून एका समर्थ 'अनु'वादक

'अनु' यांच्या प्रतिसादाची वाटच पाहत होतो. त्यांचे सगळेच अनुवाद/रुपांतरे मलातरी आवडतात.
-ऋषिकेश

छान/ एक प्रश्न

छान प्रतिसाद.
एक प्रश्न-

काही वर्णने भाषेत बीभत्सपणा/बटबटीतपणा येऊ न देता आपल्या भाषेत आणणे जरा कठीण पडत असावे. 'गॉडफादर' च्या मराठी आवृत्तीत अशा काही ठिकाणी एका परिच्छेदाचे एक वाक्य केले आहे.

अनुवाद करताना मूळ साहित्याचे थोडेफार संपादन करून घेणे आपल्याला योग्य वाटते का? याचे उत्तर हो असल्यास संपादन कशाप्रकारच्या भागाचे करणे योग्य राहील? बीभत्स, बटबटीत वर्णनाबद्दल तर आपण म्हटले आहेच, पण आपण भा.रा.भागवत यांचे होम्सकथांचे अनुवाद वाचलेत, तर असे लक्षात येईल की ते कथेच्या सुरुवातीला वॉटसन पहिल्या
परिच्छेदात जी लांबण लावतो ती बरेचदा संपादित करतात. अशा प्रकारच्या संपादनाबद्दल आपले मत काय?
राधिका

संपादन

संपादन हे बर्‍याच मुद्द्यांवर अवलंबून असावे असे वाटते:
१. अनुवादीत लिखाणाचा टारगेट ऑडीयन्स / वाचकवर्ग.
काही 'ऍडल्ट' भाग मूळ लिखाणात असल्यास तो तसाच्या तसा अनुवादीत करावा की नाही हे तुम्ही पुस्तक/लिखाण कोणत्या वर्गाला लक्ष्य मानून लिहीता यावरही असते. (आणि तुम्ही कितवे लिखाण/अनुवाद करताय यावरही!) शिवाय 'ऍडल्ट'/'प्रौढांसाठी' वाल्या भागाचा अनुवाद केल्यावर तो वाचून पहावा/परिचितांना आणि काही त्रयस्थांना वाचायला द्यावा. तो भाग प्रामाणिकपणे वाचकांपर्यंत पोहचवताना तुम्ही मूळ लिखाणाचे सौंदर्य गमावत तर नाही आहात ना? काही गोष्टी आपल्या संस्कृतीला/तुमचा लक्ष्य वाचकवर्ग ज्या भागात राहतो त्या भागाला अनोळखी आणि त्यामुळे वाचायला कंटाळवाण्या तर नाहीत ना? किंवा ते भाषांतरीत वर्णन आवडले तर 'यांच्या लेखनात 'तसे' काही असते' या आशेने आकर्षित झालेल्या मोजक्या आंबटशौकी वाचकवर्गाची तुमच्या पुढच्या लिखाणांत/पुढच्या कथांत 'तसे' काही नसले तर निराशा तर होणार नाही ना?ते पुढचे लिखाण निराशेने फेकून तर देणार नाहीत ना? किंवा, 'तसे काही' असणे हा तुमच्या पुढच्या लेखनाची गुणवत्ता ठरवण्याचा एकमेव आवश्यक निकष तर बनणार नाही ना?('तसे असते' म्हणून यांचे लिखाण चवीने वाचले जाते अशा एक लेखिका मला माहिती आहेत, पण त्यांच्या चाहत्यांच्या रोषाच्या भयाने नाव लिहीत नाही. आणि तुमचा लक्ष्य वाचकवर्ग पूर्ण भारत/परदेश/सर्व जग हाही असू शकतो, पण तितक्या कक्षा विस्तारण्यासाठी आधी तितके लिखाण करुन ते त्यांच्यापर्यंत पोहचवावेही लागते.)

२. तो बीभत्स भाग आपल्या संस्कृतीत कितपत ओळखीचा आहे?
बरेचदा मूळ लिखाणात ५-७ वाक्यात लिहीलेला एखादा भाग जर आपल्या संस्कृतीला त्याची माहिती नाही म्हणून आधी भाषांतरीत करुन नंतर तो समजावा म्हणून त्याच्याविषयी लांबलचक तळटिप लिहून समजवावा लागणार असेल तर वाचकाचा वाचनात रस किती टिकून राहील?आणि तुम्ही जर अष्टपैलू वाचन असलेल्या आणि तो भाग समजेलच अशा वर्गासाठी तळटिप न देता लेखन करणार असाल तर असा वर्ग समाजात कितीसा आहे?(याचे चपखल उदाहरण देता येत नाहीय, पण हा मुद्दा महत्त्वाचा असावा असे वाटते.)

३. बीभत्स नसलेला/पण तरीही मूळ लेखनात लांबलचक असून काहीच मुद्दा न सांगणारा भाग:
असा भाग वगळावा/त्रोटक करावा असे मलातरी वाटते. डॉयलच्या कथांमध्ये सुरुवातीला वॅटसनने लावलेला पाल्हाळ(काहीच ठिकाणी पाल्हाळ, बाकी ठिकाणी पाल्हाळही वाचणे रोचक असू शकते.) वाचक 'डॉयलच्या कथा चांगल्या असतात आणि पुढे काहीतरी रोचक घडतेच' या आशेने हा पाल्हाळ विनातक्रार वाचतात, पण डॉयलच्या कथेचा अनुने केलेला अनुवाद वाचताना ही पुण्याई,वाचकांचा लेखकाच्या लिखाणावर हा विश्वास अनुच्या(किंवा व्हूएव्हर कन्सर्नड अनुवादकाच्या) पदरी असेलच असे नाही. त्यामुळे तुम्ही हा पाल्हाळ अनुवादात घेणार असाल तर वाचकाला तो पाल्हाळ वाचल्याचा चांगला मोबदला नंतरच्या परिच्छेदांत मिळेल असा विश्वास तुमच्या आधीच्या/सध्याच्या लिखाणातून निर्माण करणे/तो टिकवणे ही तुमची/अनुवादकाची जबाबदारी असते असे वाटते.

४. या सर्व मुद्द्यांना 'असे मला वाटते' हे शेपूट जोडून वाचावे. ही सर्व माझी मते आहेत, अत्यंत जुनाट/अज्ञ/संकुचितही असू शकतील, ती सर्वांना पटावीत असा माझा आग्रह नाही आणि ती पटवण्याचा/त्या मतांवरच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेनच असे सांगता येणार नाही.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

धन्यवाद

धन्यवाद
राधिका

आशा दामले यांचे अनुवाद

अलिकडे मला आशा दामले यांच्या अनुवादांबद्दल ऐकायला मिळाले. त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्या टोनी मॉरिसन या अमेरिकन लेखिकेच्या "बिलव्हेड्" कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे. अमेरिकन दूतावासात झालेल्या प्रकाशनाच्या समारंभाबद्दल :

http://mumbai.usconsulate.gov/pr092807.html

दामले यांनी खालील मराठी पुस्तकांचे इंग्रजीमधे अनुवाद केलेले आहेत :
"आनंदी गोपाळ"
"अजिंठा"
"अफगाण डायरी"

अनुवादांव्यतिरिक्त त्यांचे स्वतंत्र लिखाण असलेले एक पुस्तक (नाव विसरलो आहे) म्हणजे पाच पाश्चात्य लेखक/विचारवंतांचा मराठीमधे करून दिलेला परिचय. ते पाच लेखक म्हणजे : टोनी मॉरीसन, माया ऍन्जेलो, मार्टीन लुथर किंग, सॅम्युएल बेकेट् व सोल्झेनेत्सिन्.

विस्ताराने

सगळेच जण एका वाक्यात उत्तरे का देत आहेत? जरा सविस्तर उदाहरणांसहित द्या की. मग मजा येईल.
राधिका

सुंदर चर्चा

मनोगत दिवाळी अंकासाठी मी डालची एक कथा अनुवादित/रुपांतरित करून पाठवली होती. रोऍल्ड डाल हा लहान मुलांसाठीही उत्तम पुस्तके (चॉकलेट फॅक्टरी वगैरे) लिहित असल्याने त्याची मोठ्या माणसांशी बोलण्याची (लिहिण्याची) शैली साधारण तशीच वाटली. छोट्या छोट्या वाक्यांमध्ये स्पष्टीकरण देत असल्यामुळे त्यामुळे फारशी अडचण आली नाही. शिवाय अनेक पर्यायी शब्द मोल्सवर्थ वरून व वाचक्नवी यांच्या मदतीने मिळाले.

या चर्चेत अनुवादकांचे अनुभव व सूचना वाचायला आवडतील.


आम्हाला येथे भेट द्या.

एक प्रश्न

लहान मुलांच्या कथेचा अनुवाद करताना काय वेगळेपणा वाटला? म्हणजे अमुक एका वाक्याचे भाषांतर २ प्रकारे करता येईल. ही कथा मोठ्यांसाठी असती तर तसे केले असते पण लहानांची आहे म्हणून असे केले. असे कधी झाले का?
राधिका

क्षमस्व

मी सांगण्यात थोडा घोटाळा केला हे उघड आहे.
रोऍल्ड डाल हा प्रामुख्याने लहान मुलांसाठी लिहिणारा लेखक. लहान मुलांना आवडणारी अतिशय छोटी छोटी पण चुरचुरीत वाक्ये टाकणे ही त्याची खासियत.

मात्र त्याने "फक्त प्रौढांसाठी" असलेल्या मूळ इंग्रजी कथेतील वाक्येही छोटी छोटी व चुरचुरीत होती असे म्हणायचे होते. लहान मुलांसाठी अनुवाद केलेला नसल्याने त्याबाबत मला सांगता येणार नाही.


आम्हाला येथे भेट द्या.

डॉ अशोक रा केळकर यांची चौकट, पुढे प्रश्नांना माझी उत्तरे

माझे भाषांतरकार्य (किती वेळ घालवला त्या परिमाणाने) मुख्यतः स्पॅनिश मधून मराठीत आहे. साहित्यप्रकार "वैचारिक ललित". पण प्रताधिकाराच्या विचारामुळे ते काही कुटुंबीयांवेगळे कोणीही वाचलेले नाही.

--------------------------------------
तुमच्या नेमक्या प्रश्नांचे माझ्या दृष्टीने उत्तर देण्यापूर्वी मी डॉ. अशोक रा. केळकर यांच्या एका लेखाच्या एका भागाची धावती ओळख करून देतो.
त्यांचा "अनुवाद : शास्त्र की कला" हा लेख "मध्यमा : भाषा आणि भाषाव्यवहार" संचात पुनर्प्रकाशित झाला. (मेहता पब्लिशिंग हाऊस, १९९६)

त्यात तुमच्या प्रश्नाच्या मुळाशी जाणारी एक चौकट अशी, की (अगदी चुकीचे अर्थ टाळा, मूळ भाषेतला अर्थ नीट समजा, वगैरे काळजी घेतल्यानंतर) सुयोग्य अनुवाद कुठला ते दोन स्वतंत्र निकषांवर ठरवावे.

१. अनुवादक्रियेचे केंद्रवर्ती प्रयोजन कोणते?
(क) मूळपाठ्याचे अर्थांकन अनुवादभाषेतील प्रतिपाठ्यातून नीट उलगडून सांगणे, हे ते केंद्रवर्ती प्रयोजन. या निकषावर जो उतरेल, तो आदर्श छायानुवाद.
(ख) मूळपाठ्याचे अर्थांकन अनुवादभाषेत एरवी स्वाभाविकपणे कसे झाले असते, तसे प्रतिपाठ्यातून शब्दांकित करणे हे केंद्रवर्ती प्रयोजन. या निकषावर जो उतरेल, तो आदर्श भावानुवाद.
टीप : भाषाजोडी जेवढी अर्थांगदृष्ट्या आणि शब्दांगदृष्ट्या जवळची, तेवढ्या प्रमाणात जो छायानुवाद, तोच भावानुवाद (किंवा जो भावानुवाद, तोच छायानुवाद) असे निघण्याची शक्यता जास्त -- उदाहरणार्थ, हिंदी उर्दू ही भाषाजोडी. निदानपक्षी, छायानुवाद आणि भावानुवाद यांत फारसा फरक नसतो -- उदाहरणार्थ, मराठी-गुजराती ही भाषाजोडी.
...

याचे उदाहरण ते देतात :
मामा : (छायानुवाद) mother's brother; (भावानुवाद) uncle
अर्थातच, "mother's brother"मध्ये अर्थाचा नेमकेपणा आहे, पण "uncle" मध्ये एरवी वापरतो ते इंग्रजी आहे. केंद्रवर्ती प्रयोजन नेमका मूळ अर्थ सांगणे असेल - म्हणजे काही भागांत मामाची मुलगी लग्नाला योग्य मानतात, (काकाची मुलगी मुळीच चालत नाही), त्याचे इंग्रजीत तंतोतंत वर्णन करायचे असेल तर प्रयोजन छायानुवादच अनिवार्य करते. पण लहान मूल चंद्राला आपुलकीने सहज चांदोमामा म्हणते, असे काही वर्णन इंग्रजीत करायचे असेल, तर ते प्रयोजन भावानुवादच अनिवार्य करते.
अनुवादकाने प्रयोजन आधी ठरवल्याशिवाय आदर्श अनुवाद कुठला ते सांगता येत नाही.

२. अनुवादक्रियेपासून निष्पन्न होणार्‍या अनुवादपाठ्याचा मूळपाठ्याशी नेमका अनुबंध कोणता असेल? परभृत भाषाप्रयोग कितपत परभृत ठेवायचा?
(क) मूळपाठ्याशी इमान राखण्याला जितकी प्राथमिकता, तितके चांगले. परभृत भाषाप्रयोग हा परभृत राहाणार, हे खुलेपणाने मान्य करणे योग्य (ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं?) या निकषावर उतरेल, तो आदर्श परायत्त अनुवाद.
(ख) अनुवाद भाषेशी इमान राखण्यात जितकी प्राथमिकता, तितके चांगले. परभृत भाषाप्रयोग हा छुपेपणे परभृत राहावा, हे योग्य (अनुवाद अनुवादच वाटला नाही, तर किती चांगले!) या निकषावर उतरेल, तो आदर्श स्वायत्त अनुवाद.
टीप : ... भाषाजोडी जेवढी अर्थांगदृष्ट्या आणि शब्दांगदृष्ट्या जवळची, तेवढ्या प्रमाणात परायत्त अनुवाद आणि स्वायत्त अनुवाद एकमेकांच्या जवळ येतात.
...
उदाहरणार्थ, दीर्घ काव्याचा 'समश्लोकी' अनुवाद करणे, म्हणजे तो परायत्त ठेवण्याचा प्रयत्न करणे. अनुवाद केवळ श्लोकशः न करता पंक्तिशः करणे म्हणजे तो अधिकच परायत्त करणे...

काव्याचा अनुवाद परायत्त करण्यात अनुवादकास रस असतो, कारण काव्यगुण कित्येकदा जितका अर्थात असतो तितकाच पदविन्यासात, पदलालित्यात, वगैरे असतो. मूळ काव्याचे ते अंग अनुवादित न केल्यास काम अर्धवट राहिल्यासारखे वाटू शकेल. काही गद्य काव्यमय असते, त्याबद्दल हेच.

याचे मिळून चार प्रकार होतात :
१. परायत्त छायानुवाद
२. स्वायत्त छायानुवाद
३. परायत्त भावानुवाद
४. स्वायत्त भावानुवाद
हे प्रकार विशद करण्यासाठी केळकरांनी एकाच मूळपाठ्याचे चारही अनुवादप्रकार करून उदाहरण दिले आहे.

मूळपाठ्य : (इटॅलियन) त्रादुत्तोरे त्रादित्तोरे

इंग्रजी अर्थ : traduttore = translator; tradittore = traitor
मासलेवाईक वेगवेगळे अनुवाद खूप भिन्न दिसावेत म्हणून भाषाजोडी इटॅलियन-मराठी अशी जरा दूरची घेतली आहे असे वाटते.

परायत्त छायानुवाद : भाषांतरकर्ता घातकर्ता.

परायत्त असल्यामुळे मुळातले यमक अनुवादात आले. छायानुवाद असल्यामुळे अर्थास अर्थ नेमका आहे. (व्याकरणदृष्ट्या शुद्ध असले तरी कोणी मराठी माणूस आपणहून असा प्रयोग करेल असे वाटत नाही.)

स्वायत्त छायानुवाद : भाषांतरकर्ता हा विश्वासघातकी असतो.

स्वायत्त असल्यामुळे 'हा', 'असतो' असे मुळात नसलेले शब्द टाकून एरवी बोलतात तसे मराठी वापरले. छायानुवाद असल्यामुळे अर्थास अर्थ नेमका आहे.

परायत्त भावानुवाद : भाषांतरकर्ते तेवढे घातकर्ते.

यमक जमवून घेतले आहे म्हणून परायत्त. पण एकवचन/अनेकवचन हा नेमका अर्थ घालवला. (केळकरांच्या मते "भाषांतरकर्ता तेवढा घातकर्ता" असे मराठी कानांना बरोबर वाटत नाही. म्हणून अनेकवचनात अर्थ थोडा बदलला तरी काय? असे म्हणणे म्हणजे भावानुवाद.)

स्वायत्त भावानुवाद : भाषांतरकर्ता कायम दगाबाज.

हा पदशः/यमक/अल्पाक्षरत्व ठेवणारा नाही, म्हणून स्वायत्त. "कायम" मराठी माणसाच्या तोंडात चपखल बसतो, तो अर्थ मुळात नसला तरी काय? असे म्हणणे म्हणजे भावानुवाद स्वीकारणे.

(केळकरांनी अनुवाद या विषयावर पुष्कळ अधिक ऊहापोह, आणखी कित्येक मुद्दे मांडले आहेत. पण इथवर माझ्याकडून इतकेच पुरे.)

------------

आता तुमच्या प्रश्नांची माझ्या वतीने उत्तरे :

१- अनुवाद करताना साधारणपणे कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात? त्या अडचणींतून आपण कसे मार्ग काढता?
अ- मूळ साहित्यात 'त्यांच्या' संस्कृतीबद्दल येणारे संदर्भ अनुवादित करायचे असल्यास काय करता?

दक्षिण अमेरिकेतल्या गावात चर्चचा, नाचाचा, ख्रिश्चन नावाचा, संदर्भ जसाच्या तसा ठेवतो. अपवादाने असे काही सापडते की आपला संदर्भ घातला तरी कथेत व्यत्यय येत नाही. उदाहरणार्थ, त्यांच्या शहरी संभाषणात कोणी मुद्दामून त्यांच्या गावठी भाषेतली एखादी म्हण दिली. तशी एखादी म्हण मराठीत असली, तर ती द्यायला मला काही हरकत वाटत नाही.

संदर्भ तसाच ठेवायचे झाल्यास त्याचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास कसे देता- तळटीप घालून / लिहिण्याच्या ओघात स्पष्टीकरणात्मक वाक्य लिहून?
होर्हे लुईस बोर्हेस या लेखकाची मी बरीच भाषांतरे केली आहेत. तो पुष्कळदा अभिजात काळातील युरोपियन दाखले, संदर्भ देतो, जे की आजकालच्या वाचकांना ओळखीचे नसतात. तेव्हा खुद्द स्पॅनिशमध्येच त्याच्या पुस्तकांत (संपादकाकडून, कधीकधी लेखकाकडून तळटिपा असतात.) या अपवादात्मक लेखकासाठी मी मराठीत खुशाल आपल्या तळटिपा घालतो.

ब- प्रत्येक भाषेची स्वतःची नजाकत असते. एखादा अर्थ एखाद्या भाषेतून मांडण्यासाठी ज्या प्रकारे वाक्यरचना केली जाईल त्याचप्रमाणे दुसर्‍या भाषेत केली जाणार नाही.
यासाठी अनुवादाचे प्रयोजन महत्त्वाचे. स्पॅनिशमध्ये लांबलचक पल्लेदार वाक्ये वापरतात, त्यात अनेक वर्णने आणि घटना एका वाक्यात खुलून-खुलवून येतात. तितकी लांब वाक्ये मराठीत सहसा लिहिली जात नाहीत. मुळात अर्थाच्या कुशल विन्यासाच्या दृष्टीने ते वाक्य मोडवत नसले तरीही कादंबरीत मी त्या वाक्याचे छोटे तुकडे करतो. कारण कादंबरीत आपल्याला कुठल्या एका वाक्यात न गुरफटता कथा पुढे सरकवायची असते. लघुकथा ही थोडीशी कवितेसारखी असते. तिथे मी शक्य तितका प्रयत्न करून शब्दविन्यास जशास तसा ठेवायचा प्रयत्न करतो. कधीकधी येणेप्रमाणे तडजोड करतो. समजा असे जाणवले की मूळपाठ्यात यमके किंवा अनुप्रास असलेले शब्द वापरायची लेखकाची शैली आहे, पण अमुक एका वाक्याच्या अनुवादासाठी तसे शब्द मराठीत नाहीत. तर त्या वाक्यात त्या नजाकतीचे शब्द नाही योजत. पण पुढच्या वाक्यात मूळपाठ्यात अनुप्रास/यमक नसेल, पण मराठीत अनुप्रास असलेले नेमके शब्द असतील, तर मुद्दामून तसे नजाकतीचे मराठी शब्द त्या दुसर्‍या वाक्यात घ्यावे.

२-अनुवाद करण्यासाठी साहित्य कसे निवडता? निकष काय?
माझ्या आवडीचे, आणि माझ्या गुंतागुंतीच्या शैलीला समांतर असे.

३- अनुवादात इंग्रजी किंवा देजा वू सारखे अन्यभाषीय शब्द वापरण्याबद्दल आपली भूमिका काय?
अनुवादात वापरत नाही. पण पाठ्यात जर तो कोणाचा संवाद असेल, तर संवादात आजकाल थोडेफार इंग्रजी शब्द येतात, तसे त्या लिखित संवादातही यावेत. मूळ स्पॅनिशमध्ये जर फ्रेंच, इंग्रजी, किंवा लॅटिन शब्द आला, (म्हणजे मुळातच एक "परदेशी" शब्द आहे), तर तो परदेशी शब्द तसाच्या तसा ठेवतो - म्हणजे अनुवादातही तो शब्द "परदेशी" असतो.

४- अनुवाद केव्हा करायचा आणि रुपांतर केव्हा करायचे हे कसे ठरवता?
शक्यतोवर अनुवाद करतो. एकच मोठे रूपांतर केलेले आहे. इथे उपक्रमावर संस्कृतातल्या व्याकरणमहाभाष्याचे. पण तिथे मला काही आपले सांगायचे होते, आपल्या भाषेच्या/समाजाच्या संदर्भात सांगायचे होते, आणि संस्कृतातल्या तपशिलात (त्या प्रकल्पापुरते बोलतो) मला मुळीच रस नव्हता. तरी त्यातही त्यातील दोन ऋचांचा सम-पद-खंड नेमक्या अर्थाचा अनुवाद करण्यास झटलो - कारण तो कवितांचा अनुवाद झाला!

५-अनुवाद करताना आपल्यापुढे बरीच उद्दिष्टे असू शकतात. ... परंतू प्रत्यक्ष अनुवाद करताना असे लक्षात येते की एका उद्दिष्टाला धरून अनुवाद करायचे झाल्यास दुसर्‍या उद्दिष्टाची पूर्ती होत नाही. अशा वेळी आपण काय करता?
उद्दिष्टांची क्रमवारी आधी लावायची, असा प्रयत्न करतो. म्हणजे दोन उद्दिष्टांचा विरोध झाला तर कुठल्या उद्दिष्टास राखून कुठले बाजूला सारायचे, ते त्या नियमाप्रमाणे ठरवावे. त्या सर्व उद्दिष्टांपैकी एक तरी उद्दिष्ट सर्वात महत्त्वाचे असावे, जेणेकरून पूर्ण कृतीत एकतरी उद्दिष्ट अबाधित साधत राहावे.

६- स्वतंत्र लेखन करताना आणि अनुवाद करताना काय फरक जाणवतो? स्वतःच्या विचारप्रक्रियेत, स्वतःच्या भाषेत आणि वाचकांच्या प्रतिसादांत?
अनुवाद करताना आपल्या विचारप्रक्रियेत आणि मूळपाठ्यात तफावत आहे का? असा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. मूळ लेखकाच्या अर्थाला आपल्या विचारांपेक्षा अधिक मान देतो. याचा मनास जुलूम वाटू नये, म्हणून शक्यतोवर आवडीच्या लेखकांचेच भाषांतर करावयास घेतो. माझ्या भाषांतरास अजून फारच थोडे वाचक लाभले आहेत. त्यामुळे याविषयी काही सांगता येत नाही.

धन्यवाद/ छान क्लृप्ती

समजा असे जाणवले की मूळपाठ्यात यमके किंवा अनुप्रास असलेले शब्द वापरायची लेखकाची शैली आहे, पण अमुक एका वाक्याच्या अनुवादासाठी तसे शब्द मराठीत नाहीत. तर त्या वाक्यात त्या नजाकतीचे शब्द नाही योजत. पण पुढच्या वाक्यात मूळपाठ्यात अनुप्रास/यमक नसेल, पण मराठीत अनुप्रास असलेले नेमके शब्द असतील, तर मुद्दामून तसे नजाकतीचे मराठी शब्द त्या दुसर्‍या वाक्यात घ्यावे.

ही क्लृप्ती फार आवडली, असा विचार कधी केला नव्हता.

बाकी केळकरांचे विवेचन सुंदरच आहे. ते इथे दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.छायानुवाद, भावानुवाद, स्वायत्त, परायत्त वगैरे संज्ञा फार आवडल्या. ते अशा चपखल तांत्रिक संज्ञा त्याही मराठीत निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. भाषाविधी, भाषानिधी वगैरे ठाऊक असेलच.

अवांतरः

त्यांचा "अनुवाद : शास्त्र की कला" हा लेख "मध्यमा : भाषा आणि भाषाव्यवहार" संचात पुनर्प्रकाशित झाला. (मेहता पब्लिशिंग हाऊस, १९९६)

-आता हे पुस्तक मिळवले पाहिजे. तुमचे बुकशेल्फ पहायला मिळायला हवे एकदा.

राधिका

उत्तरे

मी सध्या एक अनुवाद (इंग्रजी-मराठी) करण्याच्या प्रयत्नात आहे. अनुवाद करताना मलाही असेच प्रश्न पडले होते/आहेत. त्यांची माझ्या मते उत्तरे अशी.

१- अनुवाद करताना साधारणपणे कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात? त्या अडचणींतून आपण कसे मार्ग काढता?
अ- मूळ साहित्यात 'त्यांच्या' संस्कृतीबद्दल येणारे संदर्भ अनुवादित करायचे असल्यास काय करता?
मला आलेली मुख्य अडचण म्हणजे बरेचदा प्रतिशब्द सापडले नाहीत तर नेमक्या शब्दांमध्ये तोच अर्थ आणणे अवघड जाते.

संदर्भ तसाच ठेवायचे झाल्यास त्याचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास कसे देता- तळटीप घालून / लिहिण्याच्या ओघात स्पष्टीकरणात्मक वाक्य लिहून?
मलाही हा प्रश्न पडला होता. चर्चा वाचल्यावर तळटीप देणे योग्य वाटते.

ब- प्रत्येक भाषेची स्वतःची नजाकत असते. एखादा अर्थ एखाद्या भाषेतून मांडण्यासाठी ज्या प्रकारे वाक्यरचना केली जाईल त्याचप्रमाणे दुसर्‍या भाषेत केली जाणार नाही.
संपूर्ण सहमत. मला वाटते ह्या नजाकतीचे जसेच्या तसे भाषांतर होणे अशक्य आहे. म्हणूनच विनोदी साहित्याचा अनुवाद करणे कठीण असते, कारण त्या-त्या भाषेतील गमतीजमती दुसर्‍या भाषेत नसतात.

२-अनुवाद करण्यासाठी साहित्य कसे निवडता? निकष काय?
आवड, दुसरा निकष नाही.

३- अनुवादात इंग्रजी किंवा देजा वू सारखे अन्यभाषीय शब्द वापरण्याबद्दल आपली भूमिका काय?
वापरायला हरकत नाही. देजा वूचे भाषांतर करणे अशक्य आहे. इथे परत कुठल्या प्रकारचा अनुवाद आहे त्यावरही अवलंबून आहे. (संदर्भ : धनंजय यांचा प्रतिसाद)

४- अनुवाद केव्हा करायचा आणि रुपांतर केव्हा करायचे हे कसे ठरवता?
पहिलाच प्रयत्न आहे आणि हा अनुवाद आहे.
बाकीच्या प्रश्नांची उत्तरे देण्याइतका अनुभव नाही.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सहमत

अशीच उत्तरे मनात घोळत होती.

मला निसटलंच पाहिजे

"मला निसटलंच पाहिजे" ह्या नावाचा एक अनुवाद वाचला होता. दुर्दैवाने मूळ पुस्तकाचे व अनुवादकाचेही नाव आठवत नाही. ४ जण - सोबत एक तरुण मुलगी - सैबेरियाच्या उत्तरेला असलेल्या एका तुरुंगातून हिमालयापर्यंत - भारतात येतात त्याची अगदी खिळवून ठेवणारी कथा.

काळ्या रंगाचे मुखपृष्ठ होते.

कोणाला काही माहिती आहे का याबद्दल?


आम्हाला येथे भेट द्या.

बहुतेक

बहुतेक प्रभाकर पेंढारकर का?.. मि ही वाचलं आहे हे पुस्तक!! फार सुंदर भाषांतर आहे

रिकामे डोके

या पुस्तकाचे मूळ नाव, अनुवादक व लेखक याबाबतीतले सारे काही स्मृतीतून स्वच्छ पुसून गेले आहे. त्यामुळे प्रभाकर पेंढारकर ऐवजी खुशवंत सिंग म्हणाले तरी मी... :(((

पण मूळ पुस्तकाबद्दल काही माहिती?


आम्हाला येथे भेट द्या.

एकाच् माळेचे...

माझीही स्थिती तुमच्या सारखिच :) ही सत्यघटना होती असा दावा लेखकाने केला आहे. त्या प्रवासात त्याला यती दिसल्याचाही दावा आहे.
पण लेखकाचे नाव आदी तपशील विसरलो.. कोणास माहीत आहे.. तोपर्यंत गुगलून काढतो... बघु काही सापडलं तर :)

बरोबर

यति दिसल्यानंतर की दिसण्यापूर्वी त्यांच्या गटातील एक जण बर्फातील खाचेतून खाली पडतो व त्याचा अंत होतो. शिवाय याकाच्या दुधापासून बनवलेला चहा , काळ्या चहामध्ये वास मारणार्‍या लोण्याचे तरंगणारे पुंजके व त्या तरुणीची वडिलांप्रमाणे काळजी घेत असलेला त्यांचा गटप्रमुख

फारच अप्रतिम

विषयांतराबद्दल अतिशय दिलगीर आहे :((


आम्हाला येथे भेट द्या.

मिळालं बॉ!

हे आणि हेही वाचा. मुळ लेखक स्लवोमिर राविक्झ् (Slavomir Rawicz ). मुळ कादंबरी "द लाँग वॉक".. आता फक्त अनुवादक शोधायचा आहे :)
विषयांतराबद्दल खरोखरच अतिशय दिलगीर आहे :((
(पण काय आहे एखादा शंकेचा किडा दोक्यात शिरला ना की त्याचं निराकरण होईपर्यंत जाम त्रास देतो! :-) )

-(किडेमारू) ऋषिकेश

ब्राव्हो

अतिशय धन्यवाद. राविझ आठवत होते. पण लेखक म्हणून नाही तर एक पात्र म्हणून...

शंकेच्या किडेला मी दातात अडकलेली पेरूची बी म्हणतो. म्हंजे बघा डाऊट ह्या शब्दाला दोन मराठी प्रतिशब्द मिळाले. :)

आता लई बिल झाले पुरे करतो.


आम्हाला येथे भेट द्या.

मला निसटलंच पाहिजे

अनुवादकाचे नाव ~ लागू श्रीकांत
राजहंस प्रकाशन

जीए-शांता शेळके

जीएंनी शांताबाईंना लिहिलेल्या पत्रातील खालील ओळी विषयास पूरक आहेत.

"तुमच्याइतकेच मलादेखील अनुवादाविषयी प्रेम वाटते. आणि फार पूर्वीपासूनच तसे वाटत आले आहे. मला मुळातच काव्याची कसलीही देणगी नसल्याने माझे प्रयत्न गद्यापुरतेच मर्यादित राहिले. परंतु तशी देणगी असलेल्यांनी Rilke, St. John Perse इत्यादी कविता अनुवादित कराव्यात असे फार वाटते. ( Perse च्या कविता तर Nobel Prize मिळाल्यानंतर खुद्द T.S.Eliot ने इंग्रजीत आणल्या. ) विशेषतः काव्याचा अनुवाद करताना तर शब्दकळेच्या बाबतीत आपण किती उणे पडतो हे जाणवते. व इतक्या प्रयत्नानंतरही मूळ गंध मराठीत आणता येईल असा विश्वास नाही, पण जर ती किमया साधली, तर मात्र जो आनंद आहे, तो आपल्या स्वतंत्र निर्मितीपेक्षाही जास्त असतो. त्यादृष्टीने तुम्ही अनुवाद करत रहावे असे मला फार वाटते. काही वेळा एखाद दुसर्‍या ओळीशी खेळत राहणे, हीच माझी मर्यादा. Rilke ची एक ओळ अशी आहे, "O Trees of Life, when will your winter come!" रिल्केला हिवाळा म्हणजे आयुष्याचा उदास शेवट वाटत नाही. ती एका दृष्टीने जीवनाची परिपूर्त्ती आहे, तर नव्या जीवनाचे आश्वासन आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या कलाकुसरीने विणलेल्या लेसप्रमाणे वाटणार्‍या त्याच्या काव्यातून नेमका, शब्दबंदिस्त अर्थ काढणे हीच गोष्ट मुळी कठीण आहे - म्हणून तो दर वेळी नवा वाटतो.
'जीवन-वृक्षांनो, तुमचा हिवाळा कधी येईल? माझ्या जीवन-वॄक्षांनो, पानगळीची मंत्र-फुंकर तुमच्यावर केव्हा पडणार आहे?... तुमची पानगळ तुमच्याकडे माहेरी केव्हा येणार आहे? हिवाळा तुमच्या तपाचे फळ केव्हा आणणार आहे? तुमच्या पालवीतच असलेला हिवाळा कधी उमलणार आहे?' इत्यादी इत्यादी. रिल्के हयात नाही हे माझे नशीबच म्हटले पाहिजे..."


आम्हाला येथे भेट द्या.

तोच चंद्रमा नभात

शांता शेळक्यांनी जीएंचे ऐकून का ते माहीत नाही आणि किती कविता अनुवादीत केल्या तेही माहीत नाही. पण त्यांच्या एका मुलाखतीत बघितल्याचे आठवते त्या प्रमाणे, "तोच चंद्र्मा नभात" हे सुधीर फडक्यांनी गायलेले गाणे हे त्यांनी एका संस्कृत काव्याचा (मला वाटते "कालीदासाचे") अनुवाद होता. त्यांनी ते काव्य संस्कृत मधूनम्हणून दाखवले आणि नंतर त्यावरून "तोच चंद्रमा" कसे सुचले ते सांगीतले.

बाकी "चौघी जणी" हे त्यांचे भाषांतर पर्सिद्ध आहेच.

अरे वा

छान उतारा. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
राधिका

वा

एकसे एक प्रतिसाद आलेले आहेत. चर्चाप्रस्ताव टाकल्याबद्दल स्वतःवरच खूश झाले आहे. सगळे प्रतिसाद परत नीट वाचून परत प्रतिसाद देईन. आणखी अशाच छान प्रतिसादांच्या प्रतीक्षेत.
राधिका

अनुवादाचे उदाहरण

६- स्वतंत्र लेखन करताना आणि अनुवाद करताना काय फरक जाणवतो? स्वतःच्या विचारप्रक्रियेत, स्वतःच्या भाषेत आणि वाचकांच्या प्रतिसादांत?

तिथे मिसळपावावर माझ्याच मराठी सुनीताचा इंग्रजी अनुवाद दिला आहे.
६. चे उत्तर : मूळ रचना स्वयंपूर्ण असल्यामुळे - "योग्य शब्द भेटला का?" चे निकष वेगळे असतात. अनुवादात मूळपाठ्याशी फार प्रतारणा होऊन चालत नाही. कमीतकमी या उदाहरणात "कवीच्या मनातला खरा अर्थ कळला की नाही" या शंकेची गुंतागुंत नव्हती!
आता वाचक काय प्रतिसाद देतात कोणास ठाऊक.

वाचले

मराठी सुनीत व अनुवाद दोन्ही फारसे कळले नाहीत. बाकी चित्रा यांच्या त्यावरील प्रतिक्रियेशी पूर्णपणे सहमत.
राधिका

विलास सारंग यांचे काम

राधिका यांची प्रशंसा करावीशी वाटते की एखाद्या "मिशन" प्रमाणे त्या अनुवाद या प्रकाराकडे पहात आहेत. प्रसिद्ध समीक्षक विलास सारंग यांच्या अनुवादविषयक टिप्पणीबद्दल मी मागे केव्हातरी बोललो होतो. तर त्यांच्या कामाचे स्वरूप समजावे म्हणून त्यांच्या पुस्तकांचे काही फोटो टाकत आहे.

main page
Index Page
About Eka Koliyaane : page 1
About Eka Koliyane : page 2

भले शाब्बास.

अनुक्रमणिकेसकट पानांचे फोटो टाकल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. आता हे पुस्तकही कुठे मिळेल, याचा शोध घेते.

सर्वांना एक विनंती-
अशा स्वरुपाची, म्हणजे चांगली भाषांतरे किंवा भाषांतरप्रक्रियेबद्दल लेख असलेली पुस्तके माहित असल्यास, कृपया सुचवावी.

बाकी सर्वांनी अंतर्नादच्या दिवाळी अंकातील अनुवादाचा वेगळा भाग आहे तो वाचला का, त्यातील लेखांचे विषय चांगले आहेत. उदाहरणार्थ- कथेचा चित्राच्या माधम्यातील अनुवाद वगैरे. उत्तम अनुवाद या नावाचा आणखी एक दिवाळी अंक वाचनीय आहे, त्यात एका चित्रपटाच्या पटकथेचा अनुवाद आहे व अरुणा ढेरेंचा 'भाषांतरः एक सर्जनशील अनुभव' नावाचा लेखही चांगला आहे.

बाकी प्रशंसा वगैरे करण्याची जरूरी नाही. अनुवाद हा माझा प्रचंड आवडीचा विषय आहे. कोणताही अर्थ एका भाषेतून दुसर्‍या भाषेत जाताना काय फरक पडतो, व तो तसा पडू नये अथवा आपल्याला हवा तसा फरक पडावा यासाठी अनुवादक काय करतात याबद्दल फार कुतुहल वाटते.
राधिका

माझे मत

१- अनुवाद करताना साधारणपणे कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात? त्या अडचणींतून आपण कसे मार्ग काढता?
उत्तर - अडचणी मुख्य म्हणजे भाषेच्याच अर्थात विशिष्ट शब्दाच्याच येतात... पण त्यातून माझा मार्ग असा कि हिन्दी अनुवाद असल्यास शब्दाच्या जवळचा उर्दू शब्द टाकायचा. त्याने काम सोपं होतं...

अ- मूळ साहित्यात 'त्यांच्या' संस्कृतीबद्दल येणारे संदर्भ अनुवादित करायचे असल्यास काय करता?
तो संदर्भ तसाच ठेवता/ त्या संदर्भाच्या जवळ जाणारा आपल्या संस्कृतीतला एखादा संदर्भ त्याठिकाणी योजता/ की तो संदर्भ काढून टाकता?
संदर्भ तसाच ठेवायचे झाल्यास त्याचे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास कसे देता- तळटीप घालून / लिहिण्याच्या ओघात स्पष्टीकरणात्मक वाक्य लिहून?
उत्तर - एकदा जर्मनी बद्दल तिथल्या पर्यटन सम्बन्धी अनुवाद केले होते, तेव्हां "टेक्नीकल" शब्दांचे किंवा जागेचे नाव, किंवा एखादी "इवेंट" चा शब्द जसं च्या तसं अनुवाद केला आणि त्याला भर म्हणून माझ्या कडून एखादी ओळ टाकली त्याला "इंटरेस्टिंग" करायला... असो

ब- प्रत्येक भाषेची स्वतःची नजाकत असते. एखादा अर्थ एखाद्या भाषेतून मांडण्यासाठी ज्या प्रकारे वाक्यरचना केली जाईल त्याचप्रमाणे दुसर्‍या भाषेत केली जाणार नाही. अशावेळी तुम्ही काय करता? मूळ भाषेतला वाक्यरचनाविशेष जराही धक्का न लावता जसाच्या तसा मराठीत आणता की त्याला महत्त्व न देता अर्थाचा अनुवाद करता?
उत्तर - मान्य... प्रत्येक भाषेचे आपापले खास नियम असतात, म्हणून विशेष सन्दर्भ "ब्रैकेट" मधे टाकतो आणि "म्हणी" आल्या तर त्याला आपल्या भाषेत नव्या म्हणी कशा होतील या कड़े लक्ष ठेवतो...

२-अनुवाद करण्यासाठी साहित्य कसे निवडता? निकष काय?
उत्तर - सध्या तरी "ऑक्स्फ़ोर्ड डिक्शनरी" सोड़ून दुसरे काही चाळावे लागले नाही...

३- अनुवादात इंग्रजी किंवा देजा वू सारखे अन्यभाषीय शब्द वापरण्याबद्दल आपली भूमिका काय?
उत्तर - इंग्रजी शब्द न टाळण्यासारखे आल्यास मी त्याला "...." मधे लिहीतो... त्यात काही गैर नाही...

४- अनुवाद केव्हा करायचा आणि रुपांतर केव्हा करायचे हे कसे ठरवता?
उत्तर - ????? प्रश्न नाही कळला...

५-अनुवाद करताना आपल्यापुढे बरीच उद्दिष्टे असू शकतात. जसे होम्सकथांचा अनुवाद करताना कथाभागातले थ्रिल कायम राहिल यासाठी प्रयत्न करणे, व्हिक्टोरियन एराशी समकालीन भाषा वापरणे, डॉयलच्या खास शैलीला धक्का न देणे, त्या काळातले सर्व शिष्टाचार जसेच्या तसे अनुवादात आणणे इ. परंतू प्रत्यक्ष अनुवाद करताना असे लक्षात येते की एका उद्दिष्टाला धरून अनुवाद करायचे झाल्यास दुसर्‍या उद्दिष्टाची पूर्ती होत नाही. अशा वेळी आपण काय करता?
उत्तर - आतापर्यन्त असे अनुवाद केले नाहीत म्हणून अनुभव नाही...

६- स्वतंत्र लेखन करताना आणि अनुवाद करताना काय फरक जाणवतो? स्वतःच्या विचारप्रक्रियेत, स्वतःच्या भाषेत आणि वाचकांच्या प्रतिसादांत?
उत्तर - अर्थात स्वतन्त्र लेखन करताना "पूर्ण स्वतन्त्रता" असते, ती अनुवादा मधे अर्थातच नसणार... तरी विचार प्रक्रिया ही चालूच राहते, कारण कुठले वाक्य आणि शब्द कसे "सूट" होतील ह्याचा विचार करावाच लागतो...

सुरेश चिपळूणकर
http://sureshchiplunkar.blogspot.com

धन्यवाद

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार
राधिका

वैदिक ऋचांचे तीन अनुवाद, अभ्यासण्या योग्य!

तिथे दूरदर्शनवरच्या एका चर्चेत राजेंद्र, प्रियाली यांनी नासदीय सूक्तातील (गायलेले) उतारे, अनुवाद दिलेत. ते या चर्चेत उपयोगी पडावेत.

या मूळ वैदिक ऋचा नासदीय सूक्तातून "भारत एक खोज" च्या सुरुवातीला उद्धृत केल्या आहेत (सूक्तातली पहिली आणि शेवटची) :
नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥
(मग त्यात शेवटची ऋचा आहे...)
इ॒यं विसृ॑ष्टि॒र्यत॑ आब॒भूव॒ यदि॑ वा द॒धे यदि॑ वा॒ न ।
यो अ॒स्याध्य॑क्षः पर॒मे व्यो॑म॒न्त्सो अ॒ङ्ग वे॑द॒ यदि॑ वा॒ न वेद॑ ॥ ७ ॥
(हा दुवा स्वरांची चू.भू.द्या.घ्या. या दहाव्या मंडलातले १२९वे सूक्त बघावे.)

याचा वसंत देव यांनी केलेला हिंदी अनुवाद असा :
सृष्टि से पहले \ सत् भी नहीं था \ असत् भी नहीं \
अंतरिक्ष भी नहीं \ आकाश भी नहीं था
छिपा था क्या \ कहाँ \ किससे ढका था \
उसपल तो \ अगम अतल जल भी कहाँ था?
(पहिले पद्य)

सृष्टि का कौन है कर्ता \ कर्ता है वा अकर्ता \
उँचे आकाश में रहता \ सदा अध्यक्ष बना रहता
वही सचमुच है जानता \ या नहीं है जानता
यह किसी को नहीं पता \ नहीं है पता
(शेवटचे पद्य)

याचेच पणिक्कर यांनी केलेले इंग्रजी भाषांतर :
At first was neither Being nor Nonbeing.
There was not air nor yet sky beyond.
What was wrapping? Where? In whose protection?
Was Water there, unfathomable deep? (१)

That out of which creation has arisen,
whether it held it firm or it did not,
He who surveys it in the highest heaven,
He surely knows - or maybe He does not! (७)

याचेच ग्रिफिथ यांनी केलेले इंग्रजी भाषांतर (हे अधिक जुने) :
1. THEN was not non-existent nor existent:
there was no realm of air, no sky beyond it.
What covered in, and where? and what gave shelter?
Was water there, unfathomed depth of water?

7. He, the first origin of this creation,
whether he formed it all or did not form it,
Whose eye controls this world in highest heaven,
he verily knows it, or perhaps he knows not.

यातील दोन ऋचा "त्या मानाने" सोप्या आहेत, म्हणजे सर्व शब्द पुढच्या संस्कृतातले आहेत. त्यामुळे थोडी फार पडताळणी आपणा सर्वांस जमावी. प्रत्येक भाषांतराचे अनुवादफलीत आणि प्रयोजन वेगवेगळे आहे. वसंत देवांचा अनुवाद "अध्यक्ष" शब्द मुळातला जसाच्या तसा उचलतात - हा मोठा धोका धोका पत्करतात. अध्यक्ष चा अर्थ "अधीक्षक"="वरून बघणारा" असा आहे, पण त्याचाच प्राथमिक हिंदी अर्थ "प्रमुख अधिकारी"="प्रेसिडेंट" असा आहे. शब्दाचा आवाज तोच असला तरी संदेशन बहुधा चुकले. तसे असून पुरातन भारदस्तपणा आणि आधुनिक प्रश्नाचे कोडे या दोन्ही गोष्टींचा आपल्या शैलीत देव उत्तम रीतीने तोल साधतात.

पणिक्कर यांचे भाषांतर नेमक्या अर्थाच्या दृष्टीने ग्रिफिथ यांच्या अनुवादापेक्षा उजवे आहे, पण ग्रिफिथ यांची शैली अशी आहे, की हे एखादे पुरातन इंग्रजी पद्य जरूर वाटावे.

(लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. लिखाणात शक्यतोवर दहा टक्क्यांपेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. )

सुरेख

इतके सुरेख उदाहरण इतक्या जवळ आहे हे लक्षात आले नव्हते. :)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

वा

हे तीन रोचक अनुवाद इथे दिल्याबद्दल धन्यवाद :)
राधिका

 
^ वर