विश्वासघात!
फोर्थ डायमेन्शन 39
विश्वासघात!
बॉबी फार लाडात वाढलेली मुलगी. श्रीमंत आई-वडिलांची एकुलती एक लेक. त्यामुळे ऐषारामी जीवनाची चटक लागलेल्या बॉबीचे लग्न होईल की नाही याचीच तिच्या आई - वडिलांना सतत चिंता. परंतु तीसुद्धा एकाच्या प्रेमात पडली. आणा - भाका झाल्या. बॉबी (एकदाची!) बोहल्यावर चढली. यथासांग लग्न पार पडले. आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. बॉबी नांदू लागली. बॉबीला नवरा आवडू लागला. लग्न होऊनसुद्धा नवऱ्यावरील तिचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही.
लग्नानंतरच्या तिच्या आयुष्यात फार फरक पडला नाही. दिवसभर काही तरी इकडचे तिकडचे करत टाइमपास करत असे. दुपारची वामकुक्षी झाल्यानंतर चाळा म्हणून टीव्हीसमोर बसत असे. एकदा असाच कुठला तरी (रद्दड!) कार्यक्रम पहात होती. कार्यक्रमाच्या विषयीच्या एका प्रश्नाला अचूक उत्तर दिल्यास 'नैनिताल या थंड हवेच्या ठिकाणी पाच दिवस (चार रात्र!) पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचे' बक्षीस ठेवण्यात आले होते. सहज म्हणून बसल्या बसल्या काही तरी खरडून तिने एक उत्तर पाठवले. आश्चर्य म्हणजे दोन चार दिवसांनी बक्षिसपात्र यादीत तिचे नाव झळकले. ती खुश होती. तिच्या प्रवासाला कुणाचाही आक्षेप नव्हता. बॉबीला पण अशा एकट्या प्रवासाची भारी हौस.
नैनितालमधील पहिला दिवस अगदी मजेत गेला. दुसऱ्या दिवशी नैनितालच्या एका बागेत फिरत असताना काय आश्चर्य! तिच्या बालपणीच्या मित्राची गाठ पडली. तोही एकटाच होता. दोघानाही हा एक सुखद धक्काच होता. दोघांनी मिळून चहा - नाष्टा केला. बालपणीच्या आठवणीच्या गप्पा रंगल्या. तिला त्याच्या गप्पांचा विषय आवडू लागला. गप्पा मारत असतानाच तो स्वत:विषयी बोलू लागला. एकटेपणाची खंत व्यक्त केली व आपल्या बरोबर रात्र काढण्यासाठी विनवणी करू लागला. क्षणभर बॉबीला यात काही तरी गैर आहे असे वाटले नाही. एवढ्या लांब ठिकाणी अनोळख्या प्रदेशात आपण काय करत होतो हे कधीच कुणाला कळणार नाही याची पक्की खात्री दोघानाही होती.
परंतु यात एकच समस्या होती. बॉबीचे लग्न झाले होते. व तिचे नवऱ्यावर अतिशय प्रेम होते. येथे प्रश्न परस्पर विश्वासाचा होता. 'जे माहित नाही वा माहित होण्याची सुतराम शक्यता नाही, त्यामुळे कुणाचा विश्वासघात होणार नाही वा कुणाला दुखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असे विचारचक्र तिच्या डोक्यात सुरू झाले. उलट एक रोमांचकारी 'अनुभव' मिळेल, मित्राला दिलासा मिळेल, शिवाय असे काही केल्यामुळे कुणाचेच नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच होईल. थोडीशी वाकडी वाट केल्यास आभाळ कोसळून पडणार नाही. अठराव्या शतकातील अभिजनाप्रमाणे बॉबीच्या नवऱ्याने कमरेच्या खाली शीलरक्षक पट्टी (चॅस्टिटी बेल्ट!) बांधून नैनीतालला पाठविले नाही. तरीसुद्धा मित्राच्या त्या 'आमंत्रणा'ला तिने चक्क नकार दिला.
मित्राच्या 'आमंत्रणा'ला नकार देण्यासाठी बॉबीकडे सबळ असे कुठले कारण होते?
तुमच्यावर कुणीतरी पूर्ण विश्वास टाकला आहे व तुम्ही त्याचा विश्वासघात केल्यास काय होऊ शकेल? विश्वासघात केला आहे हे दुसऱ्या व्यक्तीला कधीच कळणार नसेल तर, बॉबीच्या मते, काहीच नुकसान होणार नाही. हे सर्व मनाचे खेळ आहेत. तिच्या नवऱ्याला यासंबंधात कधीच, काहीच कळले नाही तर तिच्यावरील त्याच्या विश्वासात अजिबात फरक पडणार नाही. "कुणालाही दुखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही" याची मनोमन खात्री असल्यास, व हेच कारण तिला ग्राह्य वाटत असल्यास मित्राच्या 'त्या' आमंत्रणाला साद देण्यास कुणाचीच हरकत नसावी.
अशा प्रकारे विचार करण्याची पद्धत थंड डोक्याचे, हिशोबी, मतलबी, भावनाशून्य आहे असे वाटण्याची शक्यता आहे. परंतु अशाच प्रकारे विचार करण्याची पद्धत सर्व सामान्यपणे रूढ होत आहे. एवढेच नव्हे तर त्याला समाजमान्यता पण मिळत आहे. ज्या गोष्टी आपल्याला अत्यंत चुकीच्या, अनैतिकतेच्या व इतरावर अन्याय करणारे असे वाटत असतात, त्याच गोष्टी इतराना मात्र, कुणाचेच (जास्त) नुकसान होत नसल्यास, पूर्णपणे स्वीकारार्ह वाटू लागतात. बँकेवर दरोडा घालण्याचा वा कुणाच्या तरी घरात घुसून चोरी करण्याचा मनात विचार आला तरी घाबरणाऱ्या एखाद्या पापभिरू व्यक्तीलासुद्धा एटीएम् मधून जास्त पैसे मिळाल्यास ते परत न केल्याबद्दल काहीही वावगे वाटणार नाही. कारण त्याच्या मते, यात बँकेचे काहीच नुकसान होत नाही. किंवा त्यामुळे बँकेतल्या कुठल्याही व्यक्तीला त्याचा फटका बसणार नाही. संप काळात किंवा उग्र आंदोलन छेडताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल कुणालाही हळहळ वा वाईट वाटत नाही. अपराधीपणाची जाणीव होत नाही. कारण जे नुकसान होत आहे ते आपल्या शासनाचे होते व शासन आपल्या सर्वांकडून कररूपाने जबरदस्त पैसे वसूल करतच असते. त्यामुळे त्याकाळातील तशाप्रकारचे वर्तन क्षम्य ठरत असावे.
अशा प्रकारची कृती आपल्या नैतिकतेत बसते का? ज्या कृतीच्या अंतिम परिणामात फायदा जास्त व किंचित नुकसान होणार आहे हीच नैतिक कृतीची व्याख्या असेल का? कदाचित नैतिकतेची ही व्याख्या आपल्या जीवनाच्या अनेक पैलूवर दूरगामी परिणांम करणारी ठरेल. त्यामुळे विश्वास, निष्ठा, घनिष्ट संबंध, प्रामाणिकपणा, सचोटी, इत्यादी सर्व संकल्पनांची पुनर्तपासणी करावी लागेल.
विश्वासाचेच उदाहरण घेतल्यास सामाजिक व्यवहारात परस्पर विश्वास हाच व्यक्तिगत संबंधांचा मूळ पाया असतो. पाया ढिसूळ झाल्यास इमारत कोसळण्याची शक्यता असते. अनेक वेळा, कळत न कळत, आपण गृहित धरलेल्या विश्वासाला तडा गेलेला असतो. व आपण ते विसरू शकत नाही. आयुष्यभर कष्ट करून जमवलेले पैसे बँकेत ठेवल्यानंतर बँकेचे संचालक अफरातफर करत असल्यास वा मनमानी करत ठेवीदारांच्या पैशाची उधळपट्टी करू लागल्यास आपल्याला अपार दु:ख होणे सहजिक आहे. तसे पाहिल्यास हा विश्वास फार खोलातला होता असेही नाही. कारण बँकेत पैसे जमा करताना बँकेवरील विश्वासाव्यतिरिक्त इतर अनेक बाबींचाही आपण विचार केलेला असतो.
आपण ज्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवलेला असतो त्यांनी आपला शब्द फिरवल्यास किंवा न पाळल्यास आपल्या मनाला चटके बसतात. हा विश्वासघात फार मोठी जखम करू शकतो. मानवीसंबंधात निष्ठेला फार मोठे महत्व आहे व निष्ठेला पर्याय नाही. निष्ठेला तडा गेला असला तरी आयुष्यभर त्याची वाच्यता काही वेळा केली जात नाही. त्यातच विश्वासाचे रहस्य आहे.
बॉबी काही क्षणिक सुखासाठी मित्राबरोबर शय्यासोबतीसाठी तयार झाली असती तर तिने निष्ठेलाच उधळून टाकल्यासारखे होईल. नवऱ्याला हा विश्वासघात कधीच कळणारही नाही. परंतु विश्वासाचा पाया निष्ठा असते हे तिला पक्के ठाऊक आहे. म्हणूनच तिने मित्राच्या आमंत्रणाला नकार दिला असावा.
निष्ठेत 'कुणीही दुखवले जात नाही' हा हिशोबीपणा नसतो. विश्वास ही काही उपभोग्य वस्तू नसून काम झाले की फेकून दिले जावे. व माणूस म्हणजे जखमावर जखम झेलू शकणारा एक हाडा-मांसाचा गोळा नव्हे.
बॉबीच्या वर्तनामुळे कुणीही दुखवले जाणार नाहीत हे खरे असले तरी परस्पर संबंधाचे हजारो तुकडे होतील त्याचे काय?
Comments
विचार
पण नवर्याला हा विश्वासघात वाटला असता कि नाही? याचा विचार इथे गौण मानला आहे. बॉबीने आमंत्रण स्वीकारले असते व नंतर तिने ती नवर्याला सांगितले असते व नवर्यालाही तो विश्वासघात वाटला नसता तर?
आपल्या विचारांशी / सदसदविवेकबुद्धीशी आपण प्रामाणिक आहोत का? हा खरा मुद्दा आहे
प्रकाश घाटपांडे
विश्वासघात(?)
येथे विश्वासघात नेमका कशाकशाने होतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. शारीरिक संबंध ठेवले तर विश्वासघात होतो असा सार्वत्रिक समज दिसतो. ठीक.
शारिरीक संबंध न ठेवता, मानसिक बांधिलकी ठेवणे हा कितपत विश्वासघात आहे? समजा, बॉबीच्या मित्राने तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली नसती परंतु "मी एकटा आहे. आपण परत गेल्यावरही आपल्यातील मैत्री/ संबंध कायम ठेवू. त्यात शारीरिक काही नाही फक्त नियमित भेटीगाठी घेऊ. सिनेमा-हॉटेलिंग करू." अशी मागणी मित्राने केली असती आणि बॉबीने नवर्याला सांगून ही मैत्री ठेवली असती तरीही भविष्यात त्या दोघांतील विश्वासाला तडा जाण्याची मोठी शक्यता आहेच.
एकदा लग्न केल्यावर नवरा बायकोच्या संबंधात फक्त विश्वासच महत्त्वाचा असतो ही फक्त पुस्तकी कल्पना आहे. इथे मालकी हक्क असतो. आणि आपल्या हक्काच्या गोष्टीवर दुसरा मालकी सांगू लागतो (शारीरिक किंवा मानसिक) हे सहज पचणारे नसते.
हे आणि त्याखालची उदाहरणे १००% पटली नाहीत. १००% असे म्हटले कारण असे होणारच नाही असे म्हणता येत नाही. तरीही, जो खर्या अर्थी पापभिरू आहे तो ते पैसे परत कसे करावेत यावर विचार करेल आणि ते खर्च करताना त्याला टोचणीही लागेल.
घाटपांडे म्हणतात तसे, प्रश्न आपण आपल्या सद्सद् बुद्धीशी प्रामाणिक आहोत का? आणि आपण आपल्याला जे पटते ते प्रामाणिकपणे व्यक्त करू शकतो का हा खरा प्रश्न आहे.
माफ करा
माफ करा. पण या लेखात अनेक मुद्दे दडले आहेत. अथवा येथे एका विवाहित स्त्रीचाच विचार केलेला आहे. या आणि अशा मुद्यांवर जास्त चर्चा करावी असे वाटते.
आता तुमचा प्रश्न :
सरळ आणि साधे कारण आहे. क्षणभराच्या आनंदासाठी आणि काही काळच एकत्र घालवलेल्या व्यक्तिपासून एच आय व्ही ची बाधा होण्याची भीती हे एकच कारण जास्त महत्वाचे आहे असे वाटते. बाधा झाल्यास मग तिला, तिच्या नवर्याला आणि नवरासुद्धा बॉबी सारखाच विचार करणारा असल्यास इतर कोणाला अशी शृंखला तयार होऊन बाधा होण्यार्यांची संख्या वाढण्याची शक्यता हा सुद्धा विचार असू शकतो.
बाकी सांगा कि अशी निष्ठावान लोकं/संस्कृती भारतात आहे असा भारतीयांचा दावा आहे. तर मग भारतात एच आय व्ही ची बाधा असणार्यांची संख्या हि पहिल्या काही देशांमध्ये क्रमांक लागण्या इतकी का आहे?
असहमत
या भीती वर मात करण्यासाठी उपाययोजना आहेतच ना? त्या बॉबीला माहीत नसतील असे सकृतदर्शनी वाटत नाही
हेच तर म्हणतो.
प्रकाश घाटपांडे
छान
लेख खूप छान आहे आवडला.
छान
लेख खूप छान आहे आवडला.