बुडत्याला काडीचा आधार!

फोर्थ डायमेन्शन 37

बुडत्याला काडीचा आधार!

मालवाहू जहाजाला अपघात झाल्यामुळे बोटीचा कप्तान व इतर अधिकारी कसेबसे जीव वाचवत जीवरक्षक नावेत चढले. शेवटी आलेला बोटीचा कप्तान जीवरक्षक नावेंत चढत चढत सांगू लागला.
"आपण एकूण बारा जण आहोत. ही जीवरक्षक नांवही वीस जणांना पुरेल एवढी मोठी आहे. शिवाय आपल्याकडे बिस्किट, ब्रेड, चॉकलेट, जाम, सॉस, रम, व्हिस्की इत्यादी पदार्थांचा भरपूर साठा आहे. पुढील चोवीस तासात आपल्याला वाचवण्यासाठी नक्कीच कुणी ना कुणी तरी येतीलच, याची मला पूरेपूर खात्री आहे. मग आता आपण एक छोटीशी पार्टी करायला कुणाचीच ना नसावी" असे म्हणतच त्यानी तोंडाला रमची बाटली लावली व बिस्किट-चॉकलेटची पाकिटे उघडू लागला.
"आपण बिस्किटं - चॉकलेट नक्कीच खाऊ शकतो.परंतु या नावेच्या जवळच एक बाई पाण्यामध्ये गटांगळ्या खात आहे. बुडण्याची शक्यता आहे. जीव वाचवण्यासाठी आपल्याला ती हाकही मारत आहे.तिला वाचवणे आपले कर्तव्य नाही का? " त्यांच्यातील एकाने आक्षेप घेतला. इतर सर्व जण त्याच्याकडे मख्खपणे बघू लागले.
"जहाजाच्या आपत्कालीन नियमाप्रमाणे आपल्याला तसे काहीही करता येत नाही. ती बाई बुडत आहे त्यात आपला दोष नाही. परंतु आपण तिला पाण्याच्या बाहेर काढून या नावेत घेतल्यास हे जास्तीचे खाणे खाता येणार नाही. पार्टी सेलेब्रेट करता येणार नाही. का म्हणून आपण आपल्या मौजमजेपासून वंचित रहावे? " इती बोटीचा कप्तान. काही जण मनातल्या मनात होकार देऊ लागले.
"आपण तिला वाचवू शकतो व न वाचवल्यास ती मरून जाईल हे एकमेव कारण पुरेसे ठरणार नाही का? "
"जन्म व मरणाच काही खरं नसतं. ये सब ऊपरवालेके हाथ में रहता है. ती मेली तर सुटली बिचारी असे म्हणायला हरकत नसावी. ती बुडल्यास त्यात आपली काहीच चूक नाही. कुणाला रम हवी का?"

Source: Lifeboat Earth, Onora Nell

वर उल्लेख केलेल्या प्रसंगातील संभाषणाचा गोषवारा भूकंप, अतीवृष्टी, अनावृष्टी, वादळाचा तडाखा, महापूर, इत्यादी प्रकारच्या आपत्काळातील कुठल्याही प्रसंगामध्ये थोडा फार सारखाच असतो. परंतु हा प्रसंग केवळ नैसर्गिक वा अनैसर्गिक अपघातासंबंधी नसून एकूण अतीविकसित राष्ट्रांची अविकसित राष्ट्रासंबंधीच्या (किंवा श्रीमंतांची वंचितासंबंधीच्या) मानसिकतेवर प्रकाश टाकणारा आहे हे वाचकांच्या लक्षात आले असेल.
जीवरक्षक नाव व त्यात बसलेली मग्रूर मंडळी अतीविकसित राष्ट्र व बुडत असलेली स्त्री अविकसित राष्ट्र यांचे प्रतिनिधीत्व करत आहे, असे ढोबळ मानाने म्हणता येईल. ज्या प्रकारे नावेतील प्रवासी उन्मत्तपणे वागत आहेत त्यावरून अतीविकसित राष्ट्रांच्या मानसिकतेचा अंदाज येईल. आपल्याजवळ सर्वाना पुरेल एवढे अन्न, औषधी, व इतर गरजेच्या सर्व वस्तू आहेत. मात्र आपल्या चैनीच्या आड येणाऱ्यांची काळजी करायची गरज नाही, हाच संदेश बोटीतले (व अतीविकसित राष्ट्/श्रीमंत) पोचवत आहेत. त्यांच्या मते एखाद्याचा जीव गेला तरी चालेल, परंतु स्वत:साठी चॉकलेट, रम-व्हिस्कींची कमतरता भासू नये, स्वत:पुरते बघणे योग्य. हीच मानसिकता सर्रासपणे सगळीकडे आढळते. बोटीतल्यांची वर्तणूक अनैतिक वाटत असल्यास आपल्या सर्वांची वर्तणूकसुद्धा थोड्या फार फरकाने तितकीच अनैतिक ठरू शकेल.
बोटीतल्यांचा इतराबरोबर काहीही वाटून घेण्यालाच कडवा विरोध आहे. एखाद्या बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी अजिबात प्रयत्न न करणे (वा जुजबी प्रयत्न करणे) हा जितका गुन्हा आहे तितकाच किंवा त्याच्या अनेक पटीतला गुन्हा सर्व गरजेच्या वस्तूंचा साठा करून ठेवणे व त्यातील थोडासाही वाटा इतरांना न देणे यात आहे. अतीविकसित राष्ट्रांची ही प्रतिमा सुस्पष्ट व नेमकी आहे, यात शंका नाही.
जीवरक्षक नावेचे हे उदाहरण ऱूपककथा म्हणून कितपत समर्पक आहे? नावेत साठवलेल्या गरजेंच्या वस्तूंवर नावेत बसलेल्यांचा हक्क नाही का? तो एका प्रकारे मालमत्तेचाच अधिकार ठरतो. तो जर हिरावून घेण्याचा विचार करत असल्यास मालमत्ता संपादन करण्याच्या स्वातंत्र्यावरच गदा आणल्यासारखे होणार नाही का? बोटीत ठेवलेल्या सर्व वस्तूवर बोटीतल्यांचा हक्क असून ते कुणीही हिरावून घेवू शकत नाही. त्यामुळे गरजेप्रमाणे समान वाटप हा तत्व येथे अन्यायकारक ठरेल,
वास्तव जगात आहार व इतर गरजेच्या वस्तू आपल्या सर्वासाठी, सर्वांमध्ये वाटून घेण्यासाठी आपली वाट पहात बसलेल्या नसतात. त्याच्यासाठी श्रम करावे लागतात, कौशल्य वापरावे लागते. कच्या मालांचे उत्पादन करावे लागते. शारिरिक, बौद्धिक कष्ट घ्यावे लागतात. काही प्रक्रियांचा वापर करावा लागतो. मगच ती संपत्तीच्या स्वरूपात संग्रहित होते.व ही संपत्ती कमवावी लागते. त्यामुळे एखाद्याने त्याच्याजवळील संपत्ती इतरामध्ये सम वा विषम प्रमाणात वाटप करण्याचे नाकारल्यास तो अपराध ठरत नाही. 'माझ्या हक्काचे जे आहे, तेच मी माझ्यापाशी ठेवत आहे' याला आपल्याकडे उत्तर नाही.
क्षणभर अतीविकसित विरुद्ध अविकसित हा प्रश्न बाजूला ठेवून वर उल्लेख केलेल्या प्रसंगाचे विश्लेषण करू लागल्यास काही गोष्टी लक्षात येवू लागतील. बोटीतील अन्न - ओषध, पेय व इतर वस्तूवर बोटीतल्यांचा पूर्ण अधिकार आहे हे मान्य. तरीसुद्धा आपण बोटीत बसलेले असताना आपल्या डोळ्यादेखत एक असहाय स्त्री बुडत आहे, हे बघून "तिला मरू दे, आपण रम पिऊ या" असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल. जोपर्यंत बोटीत भरपूर अन्नसाठा आहे, बोटीत बसण्यास जागा आहे, तरीसुद्धा बुडणाऱ्याला न वाचविता बोटीवर न घेता, स्वत:च्या मौजमजेसाठी म्हणून खुशाल तिला मरणाच्या दारी ढकलून देणारी मानसिकता नक्कीच तिरस्करणीय आहे.
संयुक्त राष्ट्र संघ सर्व अतीविकसित राष्ट्रांना त्यांच्या एकूण उत्पन्नातील केवळ एक टक्का उत्पन्न अविकसित राष्ट्रांना देण्याची विनंती कित्येक वर्ष करत आली आहे. काही देश या विनंतीला मान देऊन भरीव प्रमाणात मदतही करत आहेत. एकूण उत्पन्नामधील एक टक्का वाटा दिल्याने अतीविकसित राष्ट्रांच्या जीवनशैलीवर वा त्यांच्या राहणीमानावर किचितसुद्धा परक पडणार नाही. उलट मागासलेल्या देशांच्या किमान गरजा भागवण्यासाठी त्यांची नक्कीच मदत होईल.
जीवरक्षक नावेतील प्रसंग आठवल्यास त्या बुडत्या बाईला वाचवल्यामुळे, तिला बोटीत जागा दिल्यामुळे फार मोठे कर्तव्य केले किंवा जीवन सार्थकी झाले असे नाही. जर तिला वाचविण्याचा प्रयत्न न केल्यास मात्र ते एक घोर अपराध ठरेल.
परंतु आपण आता राबवत असलेल्या नवआर्थिक धोरणानुसार श्रीमंताना आणखी जास्त श्रीमंत केल्यास त्यांच्या सुख-सोईयुक्त (वा चंगळवादी) जीवनशैलीतून गरीबांच्याकडे पैसा झिरपत जातो व गरीबी आपोआप नष्ट होते म्हणे.
बुडत्यांना काडीचा आधार देणाऱ्या या आर्थिक धोरणाचे मग काय करायचे?

Comments

हे उदाहरण

प्रत्यक्ष परिस्थितीला पूर्णपणे लागू पडत नाही. एक स्त्री बुडतांना दिसत आहे म्हणण्याऐवजी जहाजातील हजार माणसे इकडे तिकडे धडपडत आहेत आणि लाइफबोटीत वीसच जागा असून त्यातल्या बारा भरल्या आहेत असे म्हणणे जास्त बरे पडेल. त्या अवस्थेतसुद्धा तेराव्या माणसाला यायला नको म्हणणारे निर्दय लोक भेटतील.
समाजवाद आणि साम्यवादाचे अनेक प्रयोग झाले आहेत आणि होत आहेत, पण समान वाटपाचा प्रयत्न करतांना उत्पादनच कमी होते आणि कोणालाही काही मिळत नाही असा अनुभव बहुतेक ठिकाणी आला आहे.

तात्पर्य

ही रूपक कथा जरी असली तरी नग्न सत्य आहे. मात्र त्यात वर आनंदरावांनी म्हणल्याप्रमाणे (अगदीच हजार नाही पण) अनेक माणसे धडपडत असणार हे वस्तुस्थितीला धरून होईल. टायटॅनिक मधील या संदर्भातील शेवटशेवटचा भाग आठवला. अनेक लोकं असले तरी प्रत्येक मदतनौका सर्वांना घेण्याचा प्रयत्न करत नव्हती. पण तो झाला अशा आपत्कालीन परीस्थितीतील भाग....

अतिप्रगत राष्ट्रांचे अनिर्बंधपणे नैसर्गिक साधने वापरणे आणि तसेच स्वतःच्या हावेपोटी इतरांना भोगायला लावणे हे "बळी तो कान पिळी" या न्यायाने कायमच चालत आले आहे... आज अमेरीका करताना दिसत असेल पण ब्रिटीशांनी तेच स्वतःच्या साम्राज्याचा सूर्य मावळू नये म्हणून भारतासहीत सर्वच अंकीत राष्ट्रात केले. तेच डचांचे, फ्रेंचांचे आणि पोर्तुगिजांचे...

म्हणून यावर उपाय काय असावा? आपण पण तसेच वागावे का? तर नाही पण स्वत:चा राष्ट्रीय स्वार्थ समजून काही अंशी शिस्तीत पण समाजाला दिशा देणे. आज अमेरिकेत जरी रिपब्लीकन्स आणि डेमोक्रॅट्स असे दोन प्रमुख मतभेद असलेले पक्ष आणि विचारसरणी दिसल्या तरी जेंव्हा राष्ट्राचा स्वार्थ येतो तेंव्हा सर्व एकत्र येतात. आपल्याकडे काय होते हे केवळ चीनच्या युद्धाच्या वेळेसच दिसून आले असे नाही....

"पावसामुळे सतत लोकलगाड्या रद्द होत असतात. स्वतःचे विद्यार्थी आणि त्यांच्या परीक्षा अडचणीत येतील म्हणून एक प्राचार्य त्या काळजीच्या भरात येणारी गाडी पकडण्यासाठी पुढे जातो गर्दीत धक्का लागून अर्धा फलाटाखाली जातो, पाय तुटतात... तसाच कसाबसा फलाटावर तडफडत पडून राहतो. आजूबाजूची माणसे जणू काही झालेच नाही अशा थाटात गाडी पकडतात अथवा निघून जातात. योग्य वेळेस उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मरण ओढावते..." ही काही रुपकात्माक कथा नाही तर माहीतीतील एका व्यक्तीच्या संदर्भातील घडलेले वास्तव आहे. "दहा दहाची लोकल गाडी, सोडीत आली पोकळ श्वास, घड्याळातल्या काट्यांचा अन् सौदा पटला दिन उदास, मी एक मुंगी, तू एक मुंगी, ही एक मुंगी ती एक मुंगी" असे जे काही मर्ढेकरांनी म्हणून ठेवले आहे त्याचे भेदक दर्शन मुंबईच्या फलाटांवर, पुण्याच्या रस्त्यावर आणि इतरत्र कायम घडते. जेंव्हा आपण आपल्याच माणसांची एक सामाजीक जाणीव ठेवू शकत नाही तर देशाची काय ठेवणार? जर आपण आपली काळजी घेणार नसलो तर इतरांना त्याचे काय पडलेले असणार?

समाजवाद आणि साम्यवादाचे अनेक प्रयोग झाले आहेत आणि होत आहेत, पण समान वाटपाचा प्रयत्न करतांना उत्पादनच कमी होते आणि कोणालाही काही मिळत नाही असा अनुभव बहुतेक ठिकाणी आला आहे.

भांदवलवादाने सर्वांना श्रीमंत होण्याचा हक्क आहे असे म्हणत उघड हावेस प्रोत्साहन दिले आणि एक दडपशाही तयार केली तर समाजवाद/साम्यवादाने सगळेच गरीब राहू पण समान राहू म्हणत निव्वळ भोंदूगिरी करत छुपी हावच ठेवली....

 
^ वर