धर्मसंकल्पनेची वैज्ञानिक चिकित्सा

फोर्थ डायमेन्शन 32

धर्मसंकल्पनेची वैज्ञानिक चिकित्सा

ईश्वर वा धर्मावरील श्रद्धा हे एक अजब रसायन आहे. आपण आपल्या रोजच्या व्यवहारात थोड्या फार प्रमाणात चिकित्सक बुद्धी वापरत असतो. अगदी एक-दोन रुपयांची भाजी घ्यायची असली तरी चवकशी करतो. पारखून बघतो, घासाघीस करतो, चार ठिकाणी हिंडून निर्णय घेतो. सामान्यपणे कुठलीही गोष्ट असो, त्याची सत्यासत्यता, लाभ-नुकसान पडताळूनच ती गोष्ट स्वीकारतो. मनाला न पटल्यास त्याकडे दुर्लक्ष करतो. फक्त ईश्वर व धर्माच्याबाबतीत मात्र आपण आपली ही व्यावहारिक (चौकस) बुद्धी गहाण टाकतो. आपली चिकित्सकता हायबरनेशनच्या अवस्थेत जाते.
देव-धर्माच्या संदर्भातील बहुतेक घटना व त्यांचे तपशील तद्दन तकलादू, अत्यंत विसंगत व विरोधाभासाने भरलेले असूनसुद्धा त्यांची जुजबी, प्राथमिक चिकित्सासुद्धा कधीच केली जात नाही. धर्माच्या क्षेत्रात पाण्यावरून चाललेली शेकडो उदाहरणं आहेत. चालत जाताना नदी - समुद्र यांचे दोन तुकडे झालेले आहेत. बघता बघता 60-70 किलो वजनाची चालती-बोलती माणसं अदृष्य झालेली आहेत. विमानातून भुर्रकन उडून गेलेली आहेत, भूकंप वा इतर काही नैसर्गिक आपत्ती नसतानासुद्धा आपोआपच एकटी - दुकटी व्यक्ती पृथ्वीच्या गर्भात गेलेली आहेत. दगडाला पाय लागल्यानंतर त्यातून माणूस निघाला आहे. पाणी शिंपडल्यावर जिवंत माणूस दगड झाला आहे. मृत व्यक्ती जिवंत झालेली आहेत. जन्मापासूनच आंधळे असलेले देवाच्या कृपेने बघू शकतात. दोन्ही पायाने पांगळे असलेले पर्वत चढू लागतात. शेकडो वेळा, दिवसे न दिवस एखाद्या नावाचा पुनरुच्चार करत गेल्यावर कर्क रोग वा अर्धागवायूची रोगलक्षणं गायब झाली आहेत. संगमरवरी मूर्तीच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहत आहेत. असे एक ना दोन, हजारो अगम्य, कल्पनातीत, गूढ अशा गोष्टींचा सुळसुळाट देव व धर्मासंबंधी असून अशा गोष्टी गेली हजारो वर्षे धर्माच्या बाजारात राजरोसपणे दुकानं थाटून आहेत. भविष्यातील गोष्टींचे अचूक वेध घेणारे, सुख-समाधानाचे लयलूट करणारे, मन:शांतीची खात्री देणारे, सर्व अडी-अडचणी दूर करणारे, दु:ख निवारण करणारे, भूक - तहान विसरायला लावणारे, आपल्यातील अद्भुत शक्तीने असाध्य, दुर्धर रोगांवर अक्सीर इलाज करणारे अनेक महाभाग देव - धर्माचे दलाल म्हणून या क्षेत्रात पाय रोवून भरभराटीला आलेले आहेत. हातचलाखीने अफाट (अवैज्ञानिक) गोष्टी करून सामाऩ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारे स्वत:कडे अतिभौतिक व अतींद्रिय शक्तीं आहे असे दावे करत लोकांना लुबाडणाऱ्यांना अजूनही समाजमान्यता मिळत आहे.
देव - धर्म यांचे उदात्तीकरण करणाऱ्या चित्र विचित्र आख्यायिका जगातील सर्व धर्मात आहेत. गंमत अशी आहे की यांचा देव माणसासारखा वागतो, माणसाचे सर्व चांगले - वाईट गुण त्याला चिकटवलेले असतात. धर्माचे नीती-नियम राजे-महाराजे, मुल्ला-मौलवी, भटजी - शेटजी वा शोषण करणाऱ्यांचे भले करण्यासाठीच केल्यासारखे वाटतात. धर्माचा भर नेहमीच चमत्कार वा चमत्कारसदृश घटनांवर असतो. मुळातच माणसांना चमत्कार फार आवडतात. चमत्कारांची ही तहान भागवण्यासाठी धर्माइतका चांगला श्रोत इतरत्र शोधूनही सापडणार ऩाही. देव-धर्माचे आकर्षण अगदी बालपणापासूनच असते. व वय वाढत गेले तरी ही बालबुद्धी जशीच्या तशीच जोपासली जाते.
ज्या गोष्टींची आपण तर्क वा विज्ञानाच्या आधारे पडताळा घेऊ शकत नाही अशा सर्व गोष्टीवर सश्रद्ध धार्मिक कसे काय विश्वास ठेऊ शकतात हे एक न सुटणारं कोडं आहे. अशा गोष्टीबद्दल थोडी जरी शंका व्यक्त केल्यास या गोष्टी तर्क वा विज्ञानाच्या आवाक्याबाहेरचे म्हणून तोंडं बंद केल्या जातात. वैज्ञानिकांना मात्र अशा प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असते. उत्क्रात जीवशास्त्रज्ञ आजकाल या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन करत आहेत. उत्क्रांत संकल्पनेचा जनक, चार्लस् डार्विनने आपल्या सिद्धांतात ईश्वर वा धर्म या संकल्पनांना स्थान दिले नव्हते. परंतु उत्क्रांतीच्या आजच्या अभ्यासकांना या संकल्पनांचा मूळ शोधण्यात जास्त रस आहे. त्यांच्याबद्दल तर्क वितर्क लढवत आहेत. कदाचित उत्क्रांतीच्या सिद्धांतातील राहून गेलेल्या काही कच्च्या दुव्याविषयी अधिक माहिती या संकल्पनेच्या अभ्यासातून मिळण्याची शक्यता त्यांना वाटत असावी. गंमत अशी आहे की ज्या गोष्टी जीवशास्त्रज्ञ गेली दीडशे वर्ष ठामपणे मांडत होते, त्याच्या अगदी विरुद्ध टोकाची भूमिका आताचे उत्क्रांत वैज्ञानिक घेत आहेत. या वैज्ञानिकांना ईश्वर वा धर्म या संकल्पनेमुळे उत्क्रांतीला काही लाभ झाला असेल असे वाटत आहे. धर्म वा ईश्वरासंबंधीचे काही गुणविशेष आपल्यात उपजतच असू शकतील, याचाही विचार केला जात आहे. जर तसे असल्यास हे गुणविशेष मानवी अस्तित्वाला कसे पोषक ठरत गेले याचाही अभ्यास केला जात आहे.
धर्माबाबत विचार करणारे जीवशास्त्रज्ञ ढोबळपणे खालील चार मुद्दयावर भर देत आहेत:

 • इहलोकातील व्यवहाराच्या स्पष्टीकरणासाठी व माणसांच्या दैनंदिन जीवनशैलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आध्यात्मिक जगाचा आधार धर्म देत असतो.
 • मार्क्सने म्हटल्याप्रमाणे धर्माची ही अफूची गोळी माणसांच्या दैनंदिन जीवनातील चढ-उतारामुळे होत असलेल्या दु:खाची तीव्रता कमी करू शकते व माणसांना सुखाच्या काल्पनिक आनंदात ठेवते.
 • सामाजिक व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या नीती-नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास धर्मभावना उद्युक्त करते. आणि
 • धर्मावरील श्रद्धा माणसांना एकसंध समाजाचा घटक म्हणून बांधून ठेऊ शकते.
 • मनोवैज्ञानिक सिग्मंड फ्रॉयडला "धर्म आध्यात्मिकतेतून नियंत्रणाचे कार्य करते" हे मान्य होते व कदाचित ते शक्यही असेल. (त्यात कॉमन सेन्स व तार्किकतेचा कितपत वाटा आहे हा प्रश्न वेगळा!) धर्मपालनामुळे दुर्धर रोग बरे झालेली उदाहरणं आहेत. काही प्रमाणात धार्मिकांना भविष्यकाळातील आगामी घटनांचा वेध घेणे शक्यही झाले असेल. परंतु धर्मश्रद्धा जगातील अनियमिततेचे नियंत्रण करू शकत नाही, नैसर्गिक नियमांना पायबंद घालू शकत नाही हे सुस्पष्ट असताना धर्माचा उगम उत्क्रांतीच्या मागची शक्ती आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटते. कदाचित धर्म उत्क्रांतीचे एक उपसाधन म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहे असे म्हणता येईल. मेंदू उत्क्रांत होत असताना केव्हा तरी काही कारणामुळे धर्मसंकल्पना सुचली व त्यातून उत्क्रांतीला फयदा होत गेला असावा, असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल.
  दुसऱ्या मुद्याच्या बाबतीत विचार करताना मार्क्सची धर्माविषयीची टिप्पणी जास्त समंजस वाटते. धर्मावर श्रद्धा न ठेवणाऱ्यापेक्षा धार्मिक व्यक्तींना धर्म सुख-समाधानाची अनुभूती देते. धार्मिक व्यक्ती तुलनेने जास्त दिवस जगतात. शारीरिक वा मानसिक आजारांना ते सहसा बळी पडत नाहीत. औषध वा रोगोपचाराविना ठणठणीतपणे बरे होतात. कदाचित हे दावे नास्तिकांना ऱुचणार नाहीत. परंतु फील गुड फॅक्टर व धर्म यांच्यात काही तरी नातं असाव इतपत तरी विश्वास ठेवायला हरकत नसावी.
  इतर दोन मुद्दे एकसंध असा व अडी-अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करणारा समाज व त्या समाजाचा घटक असलेल्या व्यक्ती यांच्याशी निगडित आहेत. धर्म हा एके काळी जाती-जमात वा टोळी-टोळीत विखुरलेला होता. त्या धर्माचे व जमातीचे काही नीती नियम ठरलेले होते. त्यामुळे जमात एकसंध राहण्यासाठी मदत मिळत होती. हे सर्व लहान-सहान धर्म भूत, पिशाच, चेटूक, चमत्कार यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या. बुद्धी, विचार, तर्क, यांच्यापेक्षा भावना, उत्स्फूर्तता, व तगण्यासाठीचे प्रयत्न यांनाच तेथे जास्त महत्व दिले जात होते. विवेकी वर्तणुकीपेक्षा धार्मिक अनुभवांना प्राधान्य दिले जात होते. खरे पाहता धर्माने आखून दिलेल्या नीती-नियमांची चौकट प्रत्येकाला एकसुरी (कंटाळवाणी) जीवन जगण्यास भाग पाडत होती. सामाजिक विषमतेला खत-पाणी घालत होती. धर्मगुरूंचे प्रस्त वाढवण्यात हे नीती-नियम मदत करत होते. त्या तुलनेने आताचे धर्म व त्याचे नीती-नियम राज्यशासन व धर्मव्यवस्था यांच्यात कटुता येऊ नये यासाठी केलेली जुजबी सोय या स्वरूपात आहेत. त्यामुळे आजची धर्मव्यवस्था स्वातंत्र्य, समता, न्याय, विज्ञान, सर्जनशीलता इत्यादींना जीवनमूल्य मानणाऱ्या आधुनिक समाजव्यवस्थेला कितपत एकसंध ठेऊ शकेल याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. या जीवनमूल्यांचा मागमूसही नसलेले आताचे संस्थात्मक धर्म समाजबांधणीला निरुपयोगी ठरत आहेत.
  उत्क्रांतीच्या संदर्भात धर्मसंकल्पनेची चिकित्सा केल्यास वर उल्लेख केलेल्या चौथ्या मुद्यात काही प्रमाणात तथ्य आहे असे वाटते. समाजव्यवस्थेला घट्टपणे बांधून, टिकवून ठेवण्यासाठी धर्माचा नक्कीच उपयोग झाला असेल. धर्मावर निर्भर असलेला समाज कर्मकांड, रूढी, परंपरा, यांच्या जंजाळात कायमचाच अडकून पडलेला असतो. अगदी साधे साधे वाटणारे झोप, आहार, लैंगिक सुख इ.इ. प्रकारचे दैनंदिन व्यवहार असोत किंवा जन्म, मृत्यु, विवाह, बालसंगोपन इत्यादी गोष्टी असोत, धर्माच्या कर्मकांडाची बळजबरी असतेच. प्रत्येक लहान मोठ्या जीवन व्यवहाराला उत्सवी वा सार्वजनिक स्वरूप देण्यात धर्माचा हातखंडा असतो. त्यामुळे धर्माला जीवनव्यवहारापासून तोडणे अशक्यातली गोष्ट वाटू लागते.
  कर्मकांड पाळत असताना आपला मेंदू अक्षरश: बधिरावस्थेत असतो. मेंदूच्या बधिरतेच्या कारणांचा शोध घेत असताना वैज्ञानिकांना आपल्या मेंदूत एंडॉर्फिन या संप्रेरकाचा स्राव मोठ्या प्रमाणात आढळला. एंडॉर्फिन शरीरातील वेदना नियंत्रकाचे काम करतो. वेदनेच्या संदर्भातील शरीरातील स्नायूंचे कार्य संपल्यानंतर एंडॉर्फिनचे कार्य सुरु होते. उरली सुरली वेदना वा दु:ख संपवून मनाला सामान्य अवस्थेत आणण्याचे काम एंडॉर्फिनचे आहे. एंडॉर्फिन जेंव्हा मेंदूचा ताबा घेतो तेव्हा आपल्याला एक सुखद जाणीव होऊ लागते. ती एका प्रकारची नशाच असते. म्हणूनच कदाचित धार्मिक स्वत:ला आनंदी, सुखी, समाधानी समजून घेत असावेत. एंडॉर्फिन आपल्या रोगप्रतिकारक शक्तीत अनुकूल बदल करत असल्यामुळे धार्मिकांचे काही रोग बरे झाल्याची उदाहरणं सापडतात. तुलनेने ते जास्त निरोगी आहेत असे त्याना वाटू लागते.
  म्हणूनच धार्मिक व्यवहारात कर्मकांड, रूढी यांना नको तितके महत्व दिले जात असावे. सामूहिक भजन, प्रवचन, कीर्तन, गाणी, नृत्य, शरीराच्या चित्र-विचित्र हालचाली, प्रार्थना, जप, तप, ध्यान, पारायण, उपवास, शारीरिक क्लेष, नवस, प्राण्यांचे बळी इत्यादी गोष्टी एंडॉर्फिन उत्तेजित करण्यास मदत करतात, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. स्थळ-काळ ठरवून सामूहिकपणे अशा गोष्टी घडत असल्यास समाजातील व्यक्ती-व्यक्तीत बंधुत्वाचा प्रत्यय येऊ शकतो. परस्परामध्ये सामंजस्य वाढण्यात मदत होऊ शकते. सांघिक भावनेत वाढ होते. आत्मीयता वाढते. आत्मविश्वास वाढतो. खरे पाहता एंडॉर्फिनचा श्राव फक्त धार्मिक व्यवहारातच होतो असे नसून आपल्या आवडत्या छंदांच्या वेळीसुद्धा होतो. शारीरिक व्यायाम, पोहणे, आवडते मैदानी खेळ इत्यादी प्रकारातही एंडॉर्फिनचा श्राव होतो. त्यामुळे सुखद अनुभव येतो व आपल्याला काही काळ बरे वाटू लागते. परंतु धार्मिक भावना यांच्यापेक्षा काही तरी जास्त देत असावे. समूहात असताना एंडॉर्फिनच्या श्रावाचा वेग वाढतो, असेही आढळले आहे.
  एक मात्र खरे की धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे. केवळ एंडॉर्फिनचा श्राव होत असल्यामुळे समाज दीर्घकाळ टिकून आहे यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. व ही गोष्ट त्यांच्यातील काही शहाण्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धार्मिक व्यवहारांना व कर्मकांडांना एका वेगळ्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला असावा. त्यासाठी पारलौकिक सुखाची कल्पना पुढे आली असावी. पारलौकिक (अंतिम) सुखाचे गाजर पुढे करून लोकांना धर्माच्या जाळ्यात ओढण्यात आले असावे. काही काळानंतर पारलौकिक सुखाचा जोरही कमी पडला असावा. फक्त त्याच्याच जोरावर धर्माला (व धर्मगुरूंना!) पाठिंबा मिळवणे दुस्तर झाले असावे. म्हणूनच आता धर्माला विज्ञानाच्या दावणीत बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. धर्माची रचना, मानसिकता व जाणीवांच्या पातळीवर जाऊन करण्याचा घाट घातला जात असावा. याच मानसिकतेच्या जोरावर राजकीय वर्चस्व गाजविण्यात काहींना यशही मिळत आहे. म्हणूनच मार्क्सला धर्म ही अफूची गोळी असे म्हणावेसे वाटले!

  Comments

  वेळ

  वेळ लागेल वाचून प्रतिसाद द्यायला.

  नितिन थत्ते

  आन्ना

  आन्ना ते शिवधनुष्य हाये. जडच आस्तय पेलायला.पेल्याल अस्ल कि मंग हल्क जातय.
  प्रकाश घाटपांडे

   
  ^ वर