श्रद्धा: धार्मिकांचा प्लॅसिबो
फोर्थ डायमेन्शन - 31
श्रद्धेचा रिमोट वापरून प्रत्यक्षात एक बारिकसा खडासुद्धा आपोआप एक सेंटीमीटर मागे-पुढे सरकवता येत नाही हे माहित असूनसुद्धा श्रद्धा असल्यास डोंगर स्वत:हून चालत चालत येऊ शकतो अशी बढाई मारणारे भरपूर जण आहेत. श्रद्धेमुळे नाट्यपूर्ण घटना घडत असतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक आपल्याला नेहमी भेटत असतात. गंगेचे पाणी पिल्यानंतर अनेक दुर्धर रोग बरे झाले आहेत असे सांगणारे लोक आपल्याला नक्कीच भेटले असतील. पार्वतीमाँने पोटावर हात फिरवल्यानंतर बाईची पाळी चुकली व पोट दिसण्याइतपत पुढे आले होते असे (शपथेवर!) सांगितलेल्या शेकडो बायका महाराष्ट्र - गुजरात येथे सापडतील. शेवटी पोटात मूल नव्हतेच हा भाग वेगळा. अर्धांगवायूच्या झटक्यामुळे एखादा अवयव निकामा झालेला असला तरी ईश्वरावरील (किंवा बुवा-महाराज यांच्यावरील!) श्रद्धेमुळे ते अवयव नीटपणे काम करत आहे असे सांगणाऱ्याकडे बघितल्यावर आपण थक्क होतो. कारण अवयव निकामा झाला आहे हे उघड्या डोळ्यांना स्वच्छ दिसत असते.
सश्रद्धांचा मेंदू कसा काम करतो, हा एक संशोधनाचा विषय आहे. मेंदूतील एक बारीकशी हालचाल शारीरिक प्रक्रियेत एवढा मोठा बदल कसा काय घडवू शकतो? ज्ञानेंद्रियांच्या अनुभवाच्या विरुद्धच्या टोकाच्या गोष्टीवर आपले मन कसे काय विश्वास ठेऊ शकते? श्रद्धेला जैविक आधार असू शकेल का? असे अनेक प्रश्न आपण श्रद्धेच्या संदर्भात विचारू शकतो. 'श्रद्धेतील विसंगती' या विषयावर संशोधन करणारे कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. व्ही. रामचंद्रन यांच्या मते श्रद्धेचा संपूर्ण व्यवहार आव्हानात्मक असूनसुद्धा त्याचा नीटपणे अभ्यास झालेला नाही. काही वैज्ञानिक मात्र अलिकडे श्रद्धेबद्दल गंभीरपणे अभ्यास करत आहेत. याविषयी दोन प्रमुख विचारप्रवाह आहेत. ढोबळमानाने श्रद्धा विवेक व बुद्धीमत्ता यांच्या रसायनातून तयार झालेला व्यवहार असावा असे काही अभ्यासकांना वाटत आहे. परंतु इतर काहींना श्रद्धा पूर्णपणे भावनात्मक व्यवहार असून त्यात उत्स्फूर्ततेचाच भाग जास्त आहे असे वाटते. श्रद्धा वैचारिक विश्लेषणाचा विषय नसून पूर्णपणे भावनेचाच आहे व त्याच दृष्टीकोनातून त्याचा अभ्यास करायला हवा, असे बहुतेकांना वाटत आहे.
श्रद्धेच्या जैविक मूळ कारणावर बोट ठेवणे वाटते तितके सोपे नाही. ईश्वरावरील श्रद्धेमुळे शारीरिक रोग बरा होऊ शकतो याचा वैज्ञानिकरित्या अभ्यास करणे फार अवघड गोष्ट आहे. परंतु श्रद्धाविषयक अभ्यासकांना आजकाल एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. अभ्यासकांच्या मते रोगोपचारावरील श्रद्धेचे स्वरूप हे ईश्वरावरील श्रद्धेशी मिळते जुळते आहे. आणि रोगोपचारावरील श्रद्धेच्या तथाकथित परिणामांची नियंत्रित चाचणी करणे तुलनेने सोपे आहे. ताणतणावासाठी घेतलेल्या गोळ्यांमुळे होणाऱ्या अनुकूल परिणामात ऐंशी टक्के वाटा वैद्यकशास्त्रावरील श्रद्धेचा तर उरलेला वीस टक्के वाटा गोळ्यांच्या रासायनिक प्रक्रियेत असे जाणकारांचे मत आहे. पर्यायी उपचार पद्धतीच्या बाबतीत तर परिणामातील श्रद्धेचा वाटा याच्यापेक्षाही खूप खूप जास्त असणार. बरे वाटणे व बरे होणे हा फरकच सश्रद्धांच्या लक्षात येत नाही. अक्युपंक्चरच्या उपचार पद्धतीत पोटदुखीसाठी शरीरातील कुठल्याही भागात सुई टोचली तरी चालेल, पोटदुखी गायब! अशा प्रकारच्या केवळ श्रद्धेशी निगडित उपचाराच्या परिणामाला 'प्लॅसिबो इफेक्ट' असे वैद्यकीय परिभाषाकोशातील नाव आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीत प्लॅसिबोलासुद्धा उपचारात प्रक्रियेत भर दिला जात आहे. त्यामुळे श्रद्धेचे वैज्ञानिक स्वरूप समजून घेण्यासाठी, त्याची तपासणी करण्यासाठी प्लॅसिबोच्या परिणामाचा अभ्यास पुरेसा ठरू शकेल, असे अभ्यासकांना वाटत आहे.
ढोबळपणे प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे वैद्यकीय उपचारातील श्रद्धेमुळे होणारे जैविक परिणाम. प्लॅसिबोचा खराखुरा परिणाम होऊ शकतो व रोगोपचार पद्धतीतील ती एक प्रभावी शक्ती आहे, हे मान्य करायलाच हवे. परंतु प्लॅसिबो कशा प्रकारे काम करत असावा हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. यासाठी एका संशोधकाने प्रत्यक्ष प्रयोग करण्याचे ठरविले. त्याने सुदृढ, निरोगी अशा चौदा युवकांची निवड करून त्यांना दाढदुखी होण्यासाठी काही गोळ्या दिल्या. गोळ्यांचा चांगलाच 'परिणाम' दिसू लागल्यानंतर, दाढदुखी कमी होण्यासाठीचे इंजेक्शन देत असताना "या इंजेक्शनमुळे दाढदुखी थांबेल किंवा कदाचित थांबणारही नाही" असे रुग्णांना सांगत असे. इंजेक्शन सिरिंजमध्ये फक्त सलाइनचे पाणी भरलेले होते. तरीसुद्धा त्यातील बहुतेकांनी 'इंजेक्शनमुळे गुण आला' म्हणून सांगू लागले. संशोधकानी त्यांच्या मेंदूची PET चाचणी घेतली. चाचणीत त्यांच्या मेंदूत एंडॉर्फिनचा जास्त प्रमाणात स्राव झाला होता, हे लक्षात आले. जास्त प्रमाणातील एंडॉर्फिनमुळे त्यांना कमी प्रमाणात वेदना जाणवत असावेत. हाच धागा पकडून संशोधक, प्लॅसिबो उपचार घेणारे व न घेणारे अशा दोघांच्याही मेंदूतील सूक्ष्म बदलांचा अभ्यास करू लागले. PETची चाचणी घेतली. चाचणीत, केवळ मेंदूतच नव्हे तर मेंदूतील वेदनेचा अनुभव दर्शविणाऱ्या, वेदनेच्या तीव्रतेची माहिती देणाऱ्या व शरीराच्या कुठल्या भागात वेदना होत आहेत याची जाणीव देणाऱ्या भागातसुद्धा एंडॉर्फिन पसरलेला होता. इंजेक्शनच्या सकारात्मक परिणामाविषयी ज्यांचा विश्वास होता त्यांच्या मेंदूतील स्रावात लक्षणीय फरक जाणवत होता.
यावरून, आपल्याला जे अपेक्षित आहे ते घडून येण्यासाठी जाणीवेच्या पातळीवर या प्रक्रिया घडत असावेत असा अंदाज बांधता येईल. श्रद्धासुद्धा जाणीवपूर्वक व बुद्ध्यापुरस्कर घडत असलेली प्रक्रिया असून आपल्या मनातील इच्छा-आकांक्षांना पूरक म्हणून ते कार्य करत असावे. आपल्याला नेमके काय हवे याची संपूर्ण जाणीव असेल तरच श्रद्धा (व प्लॅसिबो) परिणामकारकरित्या कार्य करू शकतात. रुग्णाला अज्ञानात ठेऊन प्लॅसिबोचा प्रयोग केल्यास कधीच गुण येणार नाही. तुमचे परिचित तुम्हाला बरे वाटावे यासाठी प्रार्थना करत आहेत हे तुम्हाला माहित असेल तरच तुम्हाला बरे वाटण्याची शक्यता आहे. तुम्हाला न कळत हजारो लोकांनी प्रार्थना केली तरी ती व्यर्थ ठरण्याची शक्यता आहे.
इंद्रियांच्या अनुभवांचासुद्धा श्रद्धेत प्रमुख सहभाग असतो. कारण आपण करत असलेली अपेक्षा कुठूनही उद्भवू शकते. श्रद्धा केवळ मानसिक समाधान देत नसून त्या इच्छाशक्तीद्वारे काही मर्यादित प्रमाणात शारीरिक बळही ती देऊ शकते. पार्किन्सनच्या रुग्णांना प्लॅसिबोच्या उपचारानंतर बरे वाटू लागते. प्लॅसिबोसंबंधातील चाचणीत त्यांच्या मेंदूत, शरीराच्या हालचाली करण्यास उत्तेजन देणाऱ्या डोपामाइनचा श्राव जास्त प्रमाणात आढळला. अशा प्रकारची वाढ औषध सेवनानंतर होत असते. परंतु यावेळी औषधाचे काम प्लॅसिबो करत होता. प्लॅसिबो म्हणून दिलेल्या गोळ्या/इंजेक्शनमुळे पार्किन्सनच्या रुग्णांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यातून डोपामाइनचा स्राव होऊ लागल्यामुळे शारीरिक हालचाली करण्याची इच्छा होऊ लागली. काही मर्यादेपर्यंत अवयव कामही करू लागले. गंमत म्हणजे दुर्धर रोगानी जर्जरित झालेल्या व औषधोपचारांच्या सकारात्मक परिणामाबद्दल साशंक असलेल्या रुग्णावर प्लॅसिबोचा कितीही मारा केला तरीही त्यांच्या अवस्थेत काहीही फरक पडत नाही. अल्झामाइरच्या रुग्णांच्यात मुळातच जाणीवेचा अभाव असतो. त्यांच्या आशा उंचावल्या नसतात. त्यामुळे त्यांच्यावरील प्लॅसिबो उपचार निरर्थक ठरतो. कारण त्यांच्यात कुठलीही अपेक्षाच नसते. त्याचप्रमाणे अक्युपंक्चरचा परिणाम लहान मुलावर होत नाही. कारण पर्यायी रोगोपचाराच्या प्लॅसिबो प्रक्रियेची त्यांना जाण नसते, अपेक्षा नसतात.
प्लॅसिबोच्या संदर्भात अनुभव व अपेक्षा हातात हात घालून काम करत असतात. वैद्यकीय उपचारावरील रुग्णाची अढळ श्रद्धा एकूण उपचार प्रक्रियेत महत्वाचे ठरते. 'अपेक्षेनुसार अनुभव' हा श्रद्धेचा गाभा आहे. त्यामुळे धार्मिक श्रद्धेच्या संदर्भात धर्माबद्दलच्या इच्छा व आकांक्षा व धर्मश्रद्धेतून आलेले अनुभव फार महत्वाचे ठरतात. केवळ धर्मावरील श्रद्धाच नव्हे तर इतर अनेक प्रकारच्या श्रद्धा आपल्या मनात कायम कोरून ठेवल्यासारखे असतात. कितीही विरोधी पुरावे दिले तरी त्या मानसिकतेत तसूभरही बदल होत नाही. बदल करण्यास नकार दिल्यामुळे नुकसान होत आहे हे माहित असूनसुद्धा आपण आपापल्या श्रद्धेशी घट्ट चिकटून बसतो, हट्टाला पेटतो.
डॉ. व्ही रामचंद्रन यांचा संशोधनाचा विषय वैद्यकीय उपचारावरील श्रद्धेमुळे उद्भवणारी वैचित्र्यपूर्ण परिस्थिती असा आहे. यातून श्रद्धेचे नेमके स्वरूप काय असेल हे कळू शकेल. अर्धांगवायूचाच एक प्रकार असलेल्या ऍनोग्नोसियाच्या रुग्णांच्या एका गटाचा अभ्यास करत असताना गटातील काही रुग्ण त्यांच्या शरीरातील हातासारखा अवयव निकामा झाला आहे यावर विश्वास ठेवायलाच तयार नव्हते. हात नेहमीसारखाच असून फक्त आता तो नीट नाही अशा समजूतीत ते वावरत होते. त्यापैकी एका रुग्णाला डॉक्टरांनी " मी तुला भूल येण्याचे इंजेक्शन देतो. काही काळ तुझा हात बधीर राहील" असे म्हणत लुळ्या पडलेल्या हाताला सलाइनच्या पाण्याचे इंजेक्शन दिले. तो रुग्ण खरोखरच हात बधिर झाला आहे असे म्हणू लागला. इंजेक्शनचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी रुग्णाच्या दुसऱ्या निरोगी हाताला पण इंजेक्शन दिल्यावर रुग्णाने 'भूल काम करत नाही' म्हणून तक्रार केली. अजून काही अशाच प्रकारच्या रुग्णावरील प्रयोग कमी-जास्त प्रमाणात सामान्यपणे याच प्रकारात मोडत होते. हे रुग्ण आपापल्या हाताकडे एकाग्र नजरेने बघत हाताची भूल उतरण्याच्या प्रतीक्षेत होते. त्या सर्वांना आपला हात खरोखरच व्यवस्थित आहे यावर पूर्ण विश्वास होता..या रुग्णांना हात हलवण्यास सांगितल्यानंतर सांधेदुखी, स्नायूत बिघाड असे काही तरी कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. या गटातील रुग्णांच्या मेंदूच्या तपासणीत ज्यांच्या उजव्या मेंदूत बिघाड आहे तेच फक्त आपण रुग्ण आहोत हे मानण्यास तयार नव्हते. परंतु ज्यांच्या डाव्या मेंदूत बिघाड होता त्यांना मात्र आपण अर्घांगवायूचे रूग्ण आहोत याची जाणीव होती. उजव्या मेंदूतील कमतरतेमुळे माणूस प्रश्न विचारण्याची क्षमताच हरवून बसतो. प्रत्यक्ष पुराव्यावर विश्वास ठेवायलाही तयार होत नाही.
श्रद्धेतील विसंगती ऍनोरेक्सिया व बायपोलार डिसऑर्डर (कधी उन्माद तर कधी औदासीन्य) मुळे उद्भवण्याची शक्यता असते. ऍनोरेक्सिया-ग्रस्त रोगी स्वत: हडकुळा असूनसुद्धा आरश्यात बघत 'आपण फार मोठे पैलवान आहोत' अशी समजूत करून घेत असतो. बायपोलार डिसऑर्डरचे रुग्ण नेहमीच आपल्या नादात असतात. कधी स्वत:ला ग्रेट व कधी कचरा अशी समजूत करून घेत असतात. त्यांचा स्वत:च्या स्वत:वर अजिबात विश्वास नसतो. अशा प्रकारचे आजार सामान्यपणे भावनेतील बाधेमुळे होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे श्रद्धेतील विसंगतीसुद्धा अशा प्रकारच्या भावनाविकारांचे कारण असू शकते.
काही वैज्ञानिकांच्या मते श्रद्धा - ईश्वरावर की वैद्यकीय औषधोपचारावर, हा मुद्दा गौण आहे - ही एक भावनिक स्थिती असते. ज्याप्रकारे सुख, समाधान, आनंद, इ.इ. मेंदूतील एका विशिष्ट स्रावांना कारणीभूत ठरतात तसाच काहिसा प्रकार श्रद्धेच्या बाबतीतही घडत असावे. श्रद्धा सामान्य स्थितीत असलेल्या मेंदूत बदल घडवून आणते. भावनोद्रेकाच्या स्थितीत असलेल्या मेंदूप्रमाणेच डोपोमाइन व सेरोटोनिन श्रद्धेच्या स्थितीतही कार्य करत असतात. आध्यात्मिकतेच्या आहारी पडलेल्यांच्यातसुद्धा याच न्युरोट्रान्समिटरचाच सहभाग असतो.
अजून एका अभ्यासामध्ये जितक्या जास्त प्रमाणात दुखणे तितक्या तीव्रतेने प्लॅसिबो गुण देतो हे लक्षात आले. जेव्हा जास्त दुखत असते तेव्हाच वेदनेपासून मुक्त होण्याची इच्छा तीव्र होते. अशा प्रसंगात प्लॅसिबोचा आधार मिळत असल्यास रुग्णाची इच्छा पूर्ण होते. कारण प्लॅसिबोमुळे मेंदूत होत असलेला एंडॉर्फिनचा स्राव वेदना कमी करणाऱ्या मेंदूच्या संवेदनशील भागात पसरू लागतो व रूग्णाला वेदनेतून मुक्ती मिळाल्यासारखे वाटू लागते. धार्मिक श्रद्धांच्या बाबतीतही नेमके हेच घडते.
श्रद्धा ही एक जैविक घटना असून त्यामुळे मेंदूत होत जाणाऱ्या बदलांचे मोजमोप करणे आता शक्य आहे. जीवन जगण्यासाठी अत्यंत गरजेचा असलेल्या आत्मविश्वासात श्रद्धेमुळे बळकटी मिळत असेल. श्रद्धेतून आत्मविश्वास की आत्मविश्वासातून श्रद्धा हा प्रश्न बाजूले ठेवला तरी माणूस श्रद्धेच्या मागे एवढा का धावत आहे याचे चित्र स्पष्ट होत आहे, हे मात्र खरे.
Comments
मार्कट्वेन आणि बेंजामिन फ्रँकलिन
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रभाकर नानावटी यांच्या लेखातील विचारांशी सहमत आहे. या संदर्भात अगदी अलिकडेच वाचलेली दोन उद्धृते ,भाषांतरित न करता मूळची आहेत तशीच अशी:
१) इन हिज निअर्ली फरगॉटन १९०३ बुक,"ख्रिश्चन सायन्स" ,मार्क ट्वेन रोटः"दि पॉवर व्हिच अ मॅन'स इमॅजिनेशन हॅज ओव्हर हिज बॉडी, टु हील इट ऑर मेक इट सिक,इज अ फोर्स व्हिच नन ऑफ अस इज बॉर्न विदाऊट.द फर्स्ट मॅन हॅड इट ,द लास्ट मॅन विल पझेस इट."
२)बेंजामिन फ्रँकलिन रोटः"देअर आर सो मेनी डिसऑर्डर्स व्हिच क्युअर देमसेल्व्ज.ऍन्ड सच अ डिस्पोझिशन इन् मनकाइंड टु डिसीव्ह देमसेल्व्ज ऍन्ड वन अनदर.
......लिव्हिंग लाँग हॅज गिव्हन मी फ्रि॑क्वेंट ऑपॉर्च्युनिटीज ऑफ़ सीईंग सर्टन रेमेडिज क्राइड अप ऍज क्यूरिंग एव्हरिथिंग , ऍंण्ड यट सून आफ़्टर टोटली लेड असाईड ऍज यूसलेस. "
वेबसाइट्
http://thisman.org/
अभ्यासकांसाठि हि वेबसाइट् ह्यात अनेक विचार एकत्र केले अहेत :-) जगातल्या खुप लोका ंच्या स्वप्नात हा येतो असे श्रद्धावान् म्हण्तात. काहि लोक तर तो देव आहे म्हणाले युट्युबावर !!!!!!!!
सौ.बक्कु
प्लासिबो
प्लासिबो मुळे श्रद्धा टिकुन आहे. सश्रद्ध माणसाला "औषधम् जान्हवी तोयम्"
अश्रद्ध माणसावर औषधाचा परिणाम फार कमी होतो असे डॉक्टर सांगतात.
सश्रद्धतेतुन अश्रद्धतेकडे वा उलट प्रवास ही देखील जैविक घटना आहे त्याचेही मोजमाप झाले पाहिजे
प्रकाश घाटपांडे
विकर्म
अहो नानावटीसाहेब श्रद्धेची इतकी चीरफाड करून काय करायचे आहे हे कळलेच नाही.
मला काही गोष्टींच्या पुढ्रे मेंदु घासण्या पेक्षा मागेच ठेवलेला बरा वाटतो.
पुर्वी मी ही पुढेच घासत बसायचो. मग काही काळाने लक्षात आले यात काही अर्थ नाही.
कारण श्रद्धा ही अनुभवून पाहणे जास्त इंटरेष्टींग असते.
जसे गाण्यात पी एच डी केली म्हणून गायलाही चांगलेच येईल असे काही नसते. तसेच शद्धेवर खुप अभ्यास केला म्हणजे त्याची 'अनुभुती' उकलून पाहता येझील असे काही 'मला' वाटत नाही.
असो,
आपली आपली आवड!
आपला
गुंडोपंत
टाळणं कठीण असावं!
सश्रद्ध असा वा अश्रद्ध, श्रद्धा टाळून पुढे जाणं कठीण असावं असं लेख वाचून वाटला. लेख आवडला. प्रतिसादांमधूनही चांगल्या लिंक्स दिल्याबद्दल आभार.
अनुभूती ही व्यक्तीगत पातळीवर येत असावी. तुम्हाला तुमच्या श्रद्धेपोटी जी आणि जशी अनुभूती येईल तशीच अनुभूती दुसर्या सश्रद्ध माणसाला येईलच असं नाही. पण कोणाची अनुभूती श्रेष्ठ हे ठरवणं हा दोन्ही श्रद्धावान लोकांवर केलेला अन्याय असेल असं वाटतं. तसंच, काही चिरफाड करणार्या लोकांना हे करण्यातच आनंदाची, समाधानाची अनुभूती येत असेल, तर तेही होऊन जाऊ देत. 'अश्रद्ध' माणसाला असा अनुभव, माहिती आनंददायक वाटत असणार.
गुंडोपंताचं "आपली आपली आवड" हे म्हणणंही १००% मान्य.
अदिती
सहमत आहे
प्रतिक्रियेशी सहमत आहे.
आपल्या मनातील प्रतिक्रिया व्यक्त झाल्याच्या योगायोगाची 'अनुभुती' नोंदवतो.
प्रकाश घाटपांडे
आता बोला!
एका 'रीसर्च'विषयीची ताजी बातमी पहा.
नाडी अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला नाही तर टॅक्टाईल स्पिरिच्युअल ऑफ्थॅल्मॉलॉ़जीची पदवी घेणे हा पर्याय उपलब्ध झालेला आहे.