अन्-वाण्टेड् - 72
फोर्थ डायमेन्शन -28
अन्-वाण्टेड् - 72
हॉस्पिटलमध्ये असलेल्या एका प्रौढ स्त्रीला सकाळी झोपेतून जागे होत असताना आपल्या शेजारी एक परपुरुष अर्धवट मूर्छितावस्थेत झोपला आहे हे लक्षात आले. तितक्यात एक डॉक्टर "मॅडम, आय ऍम व्हेरी सॉरी, तुमच्या शेजारी झोपलेला हा माणूस फार मोठा गायक आहे. परंतु त्याचे दोन्ही मूत्रपिंड खराब झाले आहेत. हा रुग्ण अत्यावस्थेत असल्यामुळे आपली परवानगी न घेता रुग्णाला तुमच्या किड्नीशी जोडून आम्ही तुर्तास त्याला जिवंत ठेवत आहोत. तुमची हरकत नसल्यास पुढील नऊ महिने असेच ठेवणार आहोत. त्यानंतर तो पूर्णपणे बरा होऊ शकेल."
या विषयी लोकांना 'हे नैतिकतेला धरून आहे का' असे विचारल्यास "क्रेझी, असे कधीच कुणावरही सक्ती करू नये" असेच म्हणत ही कल्पनाच धुडकावून टाकतील. परंतु त्या स्त्रीने "मला या गायकाचे गाणे फार आवडते. आपण त्याला वाचवायला हवे. माझ्या किड्नीशी खुशाल जोडा." असे म्हटल्यास आपल्याला नक्कीच समाधान वाटेल. फक्त आपण तिच्यावर सक्ती करू नये एवढाच आपला आग्रह असतो.
दोनेक महिन्यानंतर ती स्त्री "हे मला झेपत नाही, मला त्रास होतो" असे म्हणत जोडलेले मूत्रपिंड काढून टाकण्यास भाग पाडते. आता मात्र लोकांची प्रतिक्रिया अगदीच वेगवेगळी असेल. 'तिने तसे करू नये', वा 'तिने केलेले अगदी योग्य', 'अगोदर होकार का दिला', 'नऊ महिने भरकन निघून जातील', '270 दिवस.. का म्हणून तिने सोसावे..... ' असे अगदीच टोकाचे मतप्रदर्शन करू लागतील.
Source: Moral Minds: How Nature Designed Our Universal Sense of Right and Wrong, Marc Hauser, 2006
याच मंडळींना गर्भपाताच्या नैतिकतेविषयी विचारल्यास 'भ्रूणहत्या निषिद्ध आहे' असे म्हणू लागतील. परंतु अत्यंत वेगळ्या परिस्थितीतील वास्तव प्रसंगाची मांडणी करत त्यांच्या मनाचा वेध घेतल्यास गर्भपाताला मान्यता देतील. गायकाच्या मूत्रपिंडविकाराऐवजी स्त्रीच्या पोटातील गर्भवाढ व नंतरचा गर्भपात याविषयी सर्वेक्षण घेतल्यास बहुतेकांचा कल गर्भपात करण्याकडे असेल. कोण जाणे स्त्रीच्या पोटात वाढत असलेले मूल कदाचित मोठेपणी फार मोठा वैज्ञानिक, राजकीय वा सामाजिक नेता, निष्णात डॉक्टर, महान कलाकार यापैकी काहीही होऊ शकेल. तरीसुद्धा आपण गर्भपाताला बिनधास्तपणे मान्यता देत आहोत. कारण आज आपल्या येथील समाजाला लोकसंख्या नियंत्रित करायची आहे. त्यासाठी वाटेल ते करायची मानसिकता या समाजाची आहे. त्यासाठी नानाविध उपाय योजण्यात आल्या आहेत. अपत्याचा धोका न पत्करता लैंगिक समाधानासाठी कुठलीही जबरदस्त किंमत द्यायला हा समाज तयार आहे. स्वैराचाराकडे झुकत चाललेली ही वृत्ती अत्यंत टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडत आहे. कुटुंब नियोजनाच्या कृत्रिम उपायाऐवजी संयमित वा योजनाबद्ध लैंगिक सुख असे कुणीतरी सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक त्याला वेड्यात काढतील. कारण अन्न, वस्त्र, निवारा (व टीव्ही आणि मोबाइल!) या प्रमाणेच (उच्छृंखल) लैंगिक सुखसुद्धा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लागणारी अत्यंत गरजेची गोष्ट ठरत आहे. संभोगातून (क्रिकेट) सामना जिंकण्याकडे व संभोगातून समाधीकडे जात असलेला हा लैंगिक प्रवास या समाजाला कुठे नेत आहे याची कल्पना न केलेलीच बरी. मुळातच हा गर्भपाताचा प्रकार केवळ 'आता नको /कधीच नको' वा 'अन्-वाण्टेड्' या मानसिकतेवर आधारलेली आहे.
जर 'आता नको/कधीच नको' अशा गोष्टींची यादीच करायची असे ठरवल्यास नको असलेल्या गर्भाप्रमाणे इतर अनेक गोष्टी असू शकतील. उदाहरणार्थ वयोवृद्ध-आजारी (व कटकटीचे) आई-वडील, शारीरिक वा मानसिकरित्या असलेले अपंग, किडा-मुंगीसारखे जीवन जगणारे भणंग, व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती, औषधोपचारांच्या आवाक्याबाहेरचे रुग्ण, चौकाचौकात तोंड वेडावत त्रास देणारी मुलं, देवळांच्या बाहेर बसून भीक मागणारे कुष्टरोगी, इ. इ. अशी ही यादी बरीच वाढवता येईल. जर अन्-वाण्टेड् हाच निकष असल्यास गर्भपाताप्रमाणे यांचाही 'निकाल' लावण्याची तरतूद का केली जात नाही?
गर्भपात व अशा 'अन्-वाण्टेड्' यांची तुलना करू नये असाही एक मतप्रवाह असू शकेल. कारण गर्भ ही एक entity म्हणून अस्तित्वात असते. मेंदूचा पूर्ण विकास झालेला नसल्यामुळे त्या पोटच्या 'गोळ्या'ला बाहेर काढण्यात गैर काही नाही असे वाटेल. परंतु वरील यादीतसुद्धा काही जणांच्यात 'मेंदू' असूनही नसल्यातच जमा असतो. मग गर्भपाताचे निकष त्यांना का लागू करू नये? पोटातला गोळा प्रतिकार करू शकत नाही म्हणून उपाय योजित असल्यास जर्जर झालेले वृद्धही प्रतिकार करत नाहीत. मग त्यांची पण विल्हेवाट करायला काय हरकत आहे? वृद्धाश्रमाचे कितीही कौतुक होत असले तरी ती एक अपराधीपणाच्या जाणीवेला दिलेला (बाजारीकरणाचा) मुलामा हे मनात कुठेतरी नक्कीच टोचत असते.
यावर अंतिम उपाय म्हणून काहींना इच्छामरण-दयामरण हे पर्यायही सुचतील. मुळातच वृद्धत्वातील परावलंबित्व वा दीर्घकालीन-खर्चिक आजारपण यांच्या भीतीतूनच अशा प्रकारचे विचार डोक्यात येत असावेत. अंत्यावस्थेतील रुग्णाचे हाल पाहवत नाहीत हेही एक कारण या मानसिकतेत असावे. व्हेंटीलेटर्स, कॅथेटर्स इत्यादीमुळे बाहेरुन बघणाऱ्यांना अत्यंत किळसवाणे वाटत असावे. परंतु हे वैद्यकीय तंत्रज्ञान आपल्या भल्यासाठी असून थोडासा मनस्ताप सोसण्यास कुणाचीच हरकत नसावी. मुळात असले विचार मनात येणे हा आधुनिक समाजव्यवस्थेचा पराभव आहे. सक्षम व लोकाभिमुख समाजव्यवस्थेत नक्कीच ही भीती निराधार ठरली असती.
दयामरणाचेच उदाहरण घेतल्यास आपल्या येथील पूर्वीची सती जाण्याची रूढी हा इच्छामरण-दयामरणाचाच प्रकार होता असे म्हणता येईल. त्या काळातील समाजाची स्त्रिंयाकडे बघण्याच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळेच तरुण/प्रौढ विधवांच्या मनात मरणाचे विचार येत असावेत. पुरुषप्रधान समाजात आर्थिक वा सामाजिक सत्तेत स्त्रीला कुठल्याही प्रकारचा वाटा देवू नये याच मानसिकतेतून विधवांच्या या 'गौरवशाली आत्महत्ये'चे उदात्तीकरण झाले असावे, त्याला धार्मिक अधिष्ठान मिळाले असावे व त्यांना जिवंतपणे चितेवर ढकलले जात असावे.
विदर्भ - मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येलासुद्धा इच्छामरण असे गोंडस नाव देऊन (व इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देऊन) कर्जमाफी, सबसिडी, सात-बारा कोरा करणे या झंझाटातून सुटका करून घेणे शक्य होईल. धर्माने याला 'समाधी' असे नाव देऊन आपली सुटका अगोदरच करून घेतली आहे. गळ्याला फस लावून घेतला तर प्राणायाम समाधी, उंचावरून उडी घेतली तर प्रकाश समाधी, स्वतला गुदमरून टाकले तर भूसमाधी, गोळी मारून घेतली तर अग्नीवेध समाधी, पाण्यात बुडले तर जलसमाघी, गाडीच्या खाली जीव दिल्यास वाहन समाघी असे वर्गीकरण करत आध्यात्मिक समाधान करून घेता येईल. जीवन जगण्यासाठी आहे, संपवण्यासाठी नाही हे एकदा लक्षात आल्यास मात्र अशा प्रकारे विचार करण्याच्या मानसिकतेला नक्कीच कलाटणी मिळेल.
म्हणूनच नीतीची चाड असलेला समाज 'अन्-वाण्टेड्' च्या यादीत भर घालण्यापेक्षा कुणाच्याही आयुष्यात 'अन्-वाण्टेड्' ची स्थिती येता कामा नये यासाठी प्रयत्न करत राहील.
परंतु या समाजाला नैतिकतेचे धडे देणार कोण?
Comments
कूठपर्यंत
कुठपर्यंत जगण्यासाठी आहे? कधीतरी ते संपणारच. ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी जिवंत समाधी घेतली ती आता आपले जीवनकार्य संपल्यामुळे कि अन्य कारणाने? हे तपासता येणार का?
यावज्जीवेत सुखं जीवेत ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत्|
भस्मिभुतस्य् देहस्य पुनर: गमनः कुतः||
प्रकाश घाटपांडे
गाभा पटला पण ...
जीवन जगण्यासाठीच आहे, जिण्यासाठी नाही. प्रत्येकाची जिण्याची आणि जगण्याची व्याख्या वेगवेगळी असेल ना? लादलेल्या संबंधातून झालेल्या गर्भधारणेचे काय? रोज सकाळी उठल्यावर आपण जिवंत आहोत याचं दु:ख होणार्या गलितगात्र लोकांचं काय? वृद्धापकाळातलं किंवा अपघाताने आलेलं कायमचं परावलंबित्त्व मान्य नाही, सहन होत नाही अशा लोकांसाठी काय, रोजचंच जिवंत मरण?
नाही आवडणार. "हा माझ्यासारखाच माणूस आहे, म्हणून मी हे भोगायला तयार आहे" हे उत्तर आवडेल. आणि आवडलं नाही तरीही मान्य करेन त्या व्यक्तीने कोणत्याही क्षणी दिलेला स्पष्ट नकार.