नाडीपरिक्षा- काही चिकित्सक प्रश्न
नाडीग्रंथ हा विषय इतका चघळून झाला आहे तरीही विषय चिकित्सेसाठी खुला ठेवला पाहिजे असे आम्हाला वाटते. सन ९५-९६ ते २००२ या काळात आम्ही या विषयात वाहुन गेलो होतो. पुण्यात हा विषय देखील प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता. त्याकाळात आम्हाला नाडीवाल्या लोकांना विचारायचे काही प्रश्न पडले होते आज ही आहेत. बघा तुम्हाला कसे वाटतात.
१) या नाडी केन्द्रात नाडी बंडलांची संख्या किती आहे? एका बंडलात किती नाडी पट्टया असतात?
२) आपण महाराष्ट्रात जी नाडी बंडले आणलीत ती महाराष्ट्राचे संबंधाने सॉर्टिंग करुन आणलीत का? हे सॉर्टिंग कसे केले?
३) आजतागायत अगस्त्य नाडी केन्द्रात जे लोक नाडी पटटी पाहून गेले व आज हयात नाहीत ( उदा. १९ व्या शतकाच्या आधी जन्मलेले) अशा लोकांच्या नाडी पट्टया आपण जपून ठेवता की टाकून देता?
४) आपल्या पत्रकात जी नोट दिली आहे त्या नुसार असे दिसते की जनरल कांडम व्यतिरिक्त ११ कांडम विशिष्ट प्रकारचे भविष्य सांगण्या करिता आहेत. तसेच आणखी चार ही स्पेशल कांडे आहेत. या प्रत्येक कांडाकरिता स्वतंत्र पट्टी आहे का?
५) पट्टीत जन्मकुंडली असते की जन्मकुंडलीचा तपशील असतो?
६) भविष्य जन्मकुंडलीचे आधारे लिहिलेले असते की अंतर्ज्ञानाने?
७) अंतर्ज्ञानाने असेल तर कुंडली पट्टीत कशासाठी असते?
८) अंगठयाचा ठसा घेतल्यावर विवक्षित पट्टी ही त्याच व्यक्तिची आहे हे निश्चित करण्यासाठी आपण अनेक प्रश्न विचारता.
९) आंगठयाचा ठसा तर एकाचा दुसऱ्या सारखा कधीच नसतो मग एवढे प्रश्न विचारण्याची आवश्यकता काय?
१०) आजमितीस भारताची लोकसंख्या १०० कोटींचे वर आहे. प्रत्येक व्यक्तीची पट्टी महर्षींनी लिहिली आहे काय?
११) वर्षभरात सुमारे एक हजार माणसांच्या पट्टया आपल्याकडे पाहून झाल्या असतील का?
१२) तसे असेल तर एक व्यक्ती बरोबर सोळा पट्टया या हिशोबान या वर्षात १६ हजार पट्टया आपल्या संग्रही आहेत का?
१३) माणसांची संख्या पहाता पट्टयांची संख्या आम्हाला अपूरी वाटते मग या पट्टया एवढया माणसांना कशा पुरतात?
१४) ज्या व्यक्तींच्या पट्टया वाचून झाल्या आहेत त्या पट्टयांचा नंतर तुम्हाला काय उपयोग होतो?
१५) आपल्याला जर त्याचा उपयोग होत नसेल तर त्या व्यक्तिने ती पट्टी मागितली तर त्याला आपण द्याल का?
१६) हयात नसलेल्या माणसांच्या पट्टया तुमच्या संग्रहात असणारच त्यातील काही पट्टया आम्हाला अभ्यासासाठी द्याल का?
१७) पट्टयात व्यक्तींची नांवे असतात असे आपण म्हणता, आम्हाला ती वाचता येत नाहीत. ती नांवे तिथे आहेत याची खात्री आम्हाला करता यावी यासाठी तुम्ही देवनागरी असलेली ही अक्षरे कूट लिपीत कशी असतात हे तुम्ही लिहून द्याल का?
१८) मनुष्य ज्या दिवशी तुमच्या कडे येतो त्या दिवसाच्या आधीच्या घटना पट्टीत लिहिलेल्या असतात की नसतात?
Comments
फलज्योतिषचिकित्सकांसाठी काही प्रश्न
१. काही ज्योतिष्यांची काही भाकिते संख्याशास्त्रीय शक्यतेपेक्षा जास्त खरी होतात हे आपल्याला मान्य आहे का?
२. अश्या भाकितांबद्दल काकतालीय न्यायाशिवाय अन्य काही स्पष्टीकरण आपल्याजवळ आहे काय?
३. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक जसे हातातून लिंबे, उदी काढून दाखवून ती हातचलाखी असल्याचे दाखवून भोंदू साधूंचा पर्दाफाश करतात तसा फलज्योतिषचिकित्सक फलज्योतिष्यांचा करतात का?
४. संख्याशास्त्रीय शक्यतेपलिकडे नक्की किती टक्के भाकिते खरी झाली म्हणजे फलज्योतिष हे शास्त्र होते? (एक उदाहरण म्हणून)३५% खरी झाली तर शास्त्र आणि २५% झाली तर थोतांड हे कोणी ठरवले?माझ्या समजुतीप्रमाणे अगदी एका ज्योतिषाचे एक भाकित जरी खरे ठरले तरी त्यावर अधिक संशोधन करणे आवश्यक होते.
५. खर्या होणार्या भाकितांबद्दल अधिक संशोधन करण्याची गरज आहे असे आपल्याला वाटते का?
६. नसेल तर आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार तर या भाकितांचे स्पष्टीकरण देता येणे शक्य आहे का?
७. हे शास्त्र थोतांड आहे इतकेच नव्हे तर सामान्य अडाणी जनतेला फसवण्यासाठी ब्राह्मणांनी तयार केले आहे असे एका थोर महात्म्याचे विचार आपण एका संकेतस्थळावर दिले होते त्याच्याशी आपण सहमत आहात का? महात्म्यांच्या विचारात शास्त्रीय विचार किती आणि ब्राह्मणद्वेष किती याचा सारासार विचार न करता केवळ फलज्योतिषविरोधी आहे इतक्याच भांडवलावर आपण त्याला उचलून धरलेत असा आक्षेप कोणी घेतला तर आपले काय उत्तर आहे?
कृपया "माझा हा लेख वाचा आणि तो लेख वाचा" असली मोघम उत्तरे न देता स्पष्ट अणि थोडक्यात उत्तरे इथेच द्यावीत ही विनंती.
विनायक
प्रलंबित ठेवतो
सध्यस्थितीत विषय नाडीग्रंथांपुरता विचारार्थ आहे म्हणुन प्रलंबित ठेवतो. कारण विषयांतराचा धोका आम्हाला जास्त वाटतो.
पुनरावृत्ती तसेच शब्दोच्छल टाळण्यासाठी यासंबंधीत अगोदरच उपलब्ध असलेली माहिती देणे आम्हाला संयुक्तिक वाटते. फलज्योतिष हा विषय अघळपघळ आहे. ज्या वेळी ही माहिती उपक्रमावर दिली त्या त्या वेळी आलेल्या शंका/कुशंका/आक्षेप यांना उत्तरे देण्याचा त्यावेळी प्रयत्न केलाच होता.थोडक्यात उत्तरे दिली तर अन्वयार्थ हा अर्थाशी विसंगत असु शकतो असे आम्हाला वाटते.
तुर्तास थोडक्यात व आपल्याला 'समाधान' वाटेल अशी उत्तरे देण्याची क्षमता आमच्यात नाही असे समजावे. आपल्या लेखनात संशोधनाविषयी कळकळ आहे, आस्था आहे या बद्दल आमच्या मनात किंतु नाही.
प्रकाश घाटपांडे
विषय नाडीपट्टीचा...
विषय नाडीपट्टीचा चालू आहे. नाडीपट्टीवाल्यांकडून काही उत्तरे अपेक्षीत आहेत. तेव्हा हे फलज्योतिषाची चर्चा मधेच कशी सुरु झाली ?
प्रतिसाद संपादित.
-दिलीप बिरुटे
चांगला प्रश्न
विचारलात बिरुटेसर
नाडीभविष्यावर सदर लेखकाने असेच किंवा हेच प्रश्न आधी विचारले होते आणि त्याची समाधानकारक उत्तरे मिळाली नव्हती. तसेच फलज्योतिषचिकित्सकांनाही मी हेच प्रश्न विचारले होते त्याचीही उत्तरे त्यांनी दिली नव्हती. यावरून नाडीभविष्यवाले आणि फलज्योतिषचिकित्सक दोघेही सारखेच प्रमाणिक किंवा अप्रामाणिक आहेत हेच दाखवायचे होते.
असो. मला माझी उत्तरे मिळाली. विषय संपला.
विनायक
प्रश्न चांगले आहेत
ओक साहेब उत्तरे किंवा प्रतिप्रश्न (किंवा अन्य दुवा देणे) करतीलच.
तरी घाटपांडेसाहेब यातील कोणती उत्तरे १९९६ पासून आजवर मिळाली व कोणते प्रश्न अजुन अनुत्तरीत?
स्वाईन फ्लू
स्वाईन फ्लूची साथ येणार आहे आणि पुण्यात ३२ बळी जाणार आहेत आणि त्यानिमित्ताने उपक्रमावर पुणेकरांची घाऊक टवाळी होणार आहे याचा फलज्योतिष्यांना, किंवा नाडीपरिक्षकांना काही सुगावा लागला होता काय?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हॅहॅहॅ
मला वाटत अत्री जीव नाडी या इंटरॅक्टीव नाडी मध्ये असा सुगावा लागु शकतो.
प्रकाश घाटपांडे
पर॑त नाडी
लेख वाचून माझ्या मनातलेच प्रश्न तुम्ही विचारले आहेत असे वाटते. मला आश्चर्य एकाच गोष्टीचे नेहमीच वाटत आलेले आहे. असल्या खुळचट आणि अशास्त्रीय मानसिक अडगळींच्या(यांना विषय म्हणणे सुद्धा शक्य नाही.) मागे, शिकले सवरलेले लोक कसे काय लागतात? त्यांची सारासार विवेक बुद्धी लोप पावते का?
चन्द्रशेखर
चिकित्सेच्या दृष्टिकोनातून.
चिकित्सेच्या दृष्टिकोनातून.
श्री. घाटपांडे सर,
आपले प्रश्न रास्त आहेत, परंतु काही लिहिणेपूर्वी एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आपणांस ह्या प्रश्नांची उत्तरे सिद्ध ('रेडिमेड्') हवी आहेत काय? चिकित्सकाच्या दृष्टीने पाहू जाता अशी सिद्ध उत्तरे चिकित्सेस योग्य असतात काय? दुसर्याने दिलेल्या उत्तरांवर विसंबून अशी चिकित्सापूर्ति होते काय? पुन्हा, एखाद्याने दिलेल्या उत्तरांवर आपला विश्वास बसेल की न बसेल हे कसे सांगणार? न्यायशास्त्राच्या नियमांनुसार पहावयाचे झाल्यास, एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व आपणांस मान्य नसल्यास 'ती तशी अस्तित्त्वात नाही' असे सिद्ध करणे हे आपले उत्तरदायित्त्व ठरते. 'अस्तित्त्व दाखवा' असे आपण म्हणाल, तर ती मंडळी अस्तित्त्व दाखविण्यास सिद्ध आहेतच. परंतु मग ती चिकित्सा कशी होणार?
आपण आपल्या लेखात नाडिशास्त्र हा शुद्ध भंपकपणा आहे असे मांडले आहे खरे, परंतु आपल्याच लेखात अनेक मुद्दे अस्पष्ट आहेत.
उदा:
नाडिशास्त्रावरील आपले सिद्धांत कसे एकांगी आहेत हे एवढ्यावरूनच कळावे. ह्यापुढील संपूर्ण लेख हा अशा ठिसूळ पायावर आधारलेला असल्यामुळे मी विचारात घेत नाही.
असो. एक फलज्योतिषचिकित्सक तथा अभ्यासक ह्या नात्याने नाडिज्योतिष हा विषय आपल्याला वर्ज्य नाही आणि आपण अनेक प्रश्न अनुत्तरित असूनदेखील आपण चिकित्सेसाठी खुले आहात हा आपला मोठेपणाच मानावा लागेल. तरी मी पूर्वी सुचविल्याप्रमाणे आपण अथवा आपल्यासारखे विचार असणारे इतर जे त्यांच्याकडून नाडिशास्त्राच्या सत्यासत्यतेविषयक एक ’परिक्षणयोजना’ करण्यात यावी आणि तिचा अहवाल सादर करण्यात यावा. आपण स्वत: अथवा आपल्या मार्गदर्शनाखाली इतर कोणी प्रातिनिधिक पुढाकार घ्यावा; श्री. ओक सर आणि त्यांच्याप्रमाणे मते बाळगणारी इतर मंडळी ह्यांस नाडिकेंद्रात घेऊन जावे आणि नाडिज्योतिषाचे खरे स्वरूप उघड करून ह्या मंडळींची सर्वांची दिशाभूल झाली असल्याचे प्रत्यक्ष पुराव्यानिशी सिद्ध करावे. इतरही कोणा व्यक्ति अथवा संस्थेस नाडिज्योतिषाच्या सत्यासत्यतेबद्दल शंकाकुशंका असतील तर त्यांनी ते श्री. घाटपांडे सरांचेकडे सादर करावेत. असे केल्याने ह्या कार्यास एक सामुहिक प्रतिनिधित्व प्राप्त होईल.
शक्य असल्यास पुढील कार्यक्रम ठरवावा.
-
हैयो हैयैयो!
प्रयोग
आम्ही या विषयावर पत्रकार परिषद घेउन एक आवाहन केले होते ते येणे प्रमाणे
पाच हजार वर्षापूर्वी अगस्त्य ऋषिंनी लिहिले आहे असे सांगितले जाणाऱ्या नाडी भविष्याचा पडताळा घेण्याचा प्रयोग
फलज्योतिष चिकित्सा मंडळ हे फलज्योतिषाची चिकित्सा करणाऱ्या मंडळींचा एक अनौपचारिक ग्रुप आहे. मंडळातर्फे नाडी भविष्य या ज्योतिष पध्दतीचा अभ्यासप्रकल्प जनहितार्थ हाती घेण्यात आला आहे. या विषयाच्या अनुषंगाने सर्व वाचन साहित्य मंडळाकडे विनामूल्य उपलब्ध आहे.या विषयावरील लोकांचे विविध अनुभव व मते जाणून घेण्याकरिता मंडळाने दि. १-४-२००१ रोजी खुल्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात पूर्वदूषितग्रह न बाळगता सत्यासत्यता तपासावी असा सूर होता.
उपलब्ध माहितीनुसार गेल्या एक वर्षात दक्षिणेकडून आलेली अशी चार केंद्रे पुण्यात कार्यान्वित झाली आहेत. तेथील माहितीपत्रकानुसार अंगठयाचा ठसा वा पत्रिकेवरुन नाडी पटटी शोधून व्यक्तीचे नांव, आईवडिलांचे नांव, पति/पत्नी, व्यवसाय, भावंड, संतती इ. खुलासा केला जातो. प्रत्यक्षात संबंधिताने अंगठयाचा ठसा दिल्यावर त्याच्याकडूनच अनेक प्रश्न विचारुन ही माहिती काढून घेतली जाते याची आम्ही खात्री केली आहे. नाडी पट्टीतील मजकुर हा कूट तामिळ लिपीत असतो असे तेथे सांगितले जाते. त्यावरुन ते हिंदीत प्रश्न विचारतात. नाडीपट्टी शोधण्यासाठी असे प्रश्न विचारावे लागतात असे नाडीवाचक सांगतात. सर्वांच्याच पटटया सापडतात असे नाही असे नाडी केन्द्राने अगोदरच सांगितले आहे. पट्टी सापडल्यास वाचनाचे रूपये तीनशे आकारले जातात.
आम्ही असे म्हणतो की, पोलीस खात्याच्या अंगुलीमुद्रा तज्ज्ञांच्या मते अंगठयाचा प्रत्येक व्यक्तिचा ठसा हा 'युनिक` असतो. त्या ठशाचे पॅरामिटर्स पुन्हा कधीही रिपीट होत नाही. तसे नसते तर अंगुलीमुद्राशास्त्र केव्हाच मोडीत निघाले असते. चोर सोडून संन्याशाला फाशी बसली असती. मग व्यक्तीचे नांव आणि ठसा हे दोन्ही पॅरामीटर्स अन्य कुणातरी व्यक्तीचे बाबत जुळतील अशी शक्यताच नाही हे ठामपणे म्हणता येते. मग या दोन पॅरामीटर्सच्या आधारे त्यांना व्यक्तीची पट्टी निश्चित करण्यासाठी कुठलीच अडचण येता कामा नये. तरीही पटटी हुडकून काढण्यासाठी सोपे पडावे म्हणून हे दोन घटक कमी आहेत असे घटकाभर मानू. जन्मसाल व पित्याचे नांव हे अजून क्ल्यू देउ. स्वत:चे नांव व ठसा या 'नेसेसरी कण्डीशन` झाल्या. अंगठयाचा ठसा, स्वत:चे नांव, पित्याचे नांव व जन्मसाल या 'सफिशंट कण्डीशन` झाल्या. असे करत करत व्यक्तीच्या ठशाबरोबर व्यक्तीचे नांव, व्यक्तीचे जन्मसाल, महिना, आठवडा, व्यक्तीच्या आईचे नांव, वडिलांचे नाव, पती/ पत्नीचे नांव, स्वत:चा व्यवसाय, शिक्षण, भावंडाची माहिती, संततीची माहिती तयार देउ व मोअर दॅन सफिशंट या कण्डीशनपाशी येवून ठेपू. याआधारे आम्ही नाडी केन्द्राला खालील प्रयोग सुचवला आहे.
मंडळाचे सदस्य मा. श्री. रिसबूड यांनी नाडी केन्द्राला एक रजिस्टर्ड पत्र पाठविले असून त्यात संशोधनासाठी हा प्रयोग करण्याचे आवाहन केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, आम्ही आपणास जन्मतारीख व वेळ सोडून वरील सर्व माहिती देउ. सोबत सील केलेली कुंडली देउ. ठसा व माहितीवरून नाडीपटटीतील कुंडली केंद्राने शोधावी. ती जर सील केलेल्या कुंडलीशी जुळली तर आपल्या नेहमीच्या फीच्या दुप्पट फी आम्ही देउ. पत्राला त्यांनी लेखी उत्तर दिले नाही. परंतु रिसबूडांनी फोनवर विचारणा केली असता आपण हा प्रयोग दि.१३ एप्रिल २००१ रोजी सायंकाळी पाच वाजता करु असे तोंडी सांगितले आहे.
या पत्रकाद्वारे मंडळ पत्रकारांना असे आवाहन करिते की, त्यांनी सदर प्रयोगाचे वेळी प्रत्यक्ष उपस्थित रहावे प्रसंगी स्वत:च्या अंगठयाचा ठसा देउन कुंडली शोधण्यास नाडी केन्द्रास उद्युक्त करावे व नाडी भविष्याची सत्यासत्यता पडताळून जनतेसमोर आणावी. त्यासाठी पत्रकारांना पत्रकार भवन येथून नाडीकेंद्रापर्यंत नेण्याआणण्याची सोय फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे करण्यात येत आहे. तरी सर्वांनी दि.१३.४.२००१ रोजी सायं. ५.०० वा. पत्रकार भवन, नवी पेठ, या ठिकाणी उपस्थित रहावे.
=============================================================
वरील प्रयोगाला पत्रकार आले नाहीत. पण आम्ही दोन तीन लोक सोबत घेउन सिंहगड रोड च्या नाडीकेंद्रात ठरल्याप्रमाणे गेलो. प्रत्यक्ष प्रयोगात तुमची माहिती तुमच्या जवळच ठेवा आम्हाला तिची गरज नाही असे सांगून तुमचे फक्त ठसे आम्ही घेतो असे सांगितले. आम्ही तिघांचेही ठसे त्याला दिले. आता पट्टी सापडेपर्यंत थांबा असे त्याने आम्हाला सांगितले. दरम्यानच्या काळात मुंबईहून आलेल्या एका दांपत्याची नाडीपट्टीही सापडली व नाडीवाचनही झाले. अर्ध्या तासानंतर तुम्हा तिघांच्याही नाडी पट्टया या केंद्रात नाहीत. आम्ही त्या मद्रासवरुन मागवून घेउ व तुम्हाला फोन करु असे सांगून आम्हास वाटेला लावले. त्यानंतर आजतागायत अनेकदा फोन करुनही आमच्या पट्टया सापडल्या नाहीत यावरुन सूज्ञ वाचक काय ते समजून घेतील.
त्याअगोदर एकदा माझी पत्नी मंजिरी ता. २३-२-२००१ रोजी श्री रिसबूड व श्री प्रकाश पेंडसे यांच्या समवेत पुण्यातल्या नाडी-केंद्रात गेली. तिने तिच्या अंगठयाचा ठसा, पूर्ण नाव व जन्मतारीख सांगितली पण जन्मवेळ मात्र माहीत नाही असे सांगितले. काही काळानतंर ज्योतिष्याने नाडी-बंडलातली एकेक पट्टी भराभर उलटत तिला बरेच प्रश्न विचारले. तिची रास धनू आहे हे दरम्यानच्या काळात तिच्या जन्मतारखेवरून पंचांगातून त्याने काढले असावे, म्हणून एक पट्टी समोर धरून व तिच्यात वाचल्यासारखे करून त्याने तिला विचारले की तुमची रास धनू आहे का ? मंजिरी म्हणाली की तिला माहीत नाही. श्री. रिसबूड शेजारीच बसले होते, त्यांनी त्याला विचारले की पट्टीवर धनू रास लिहिली आहे काय ? तो होय म्हणाला. त्यावर रिसबुडांनी म्हटले की मग त्या पट्टीत लग्न कोणते लिहिले आहे ते सांगा. तो जरासा घुटमळला व म्हणाला की ते आत्ता कळणार नाही, वो तो बाद मे आयेगा. आणखी काही प्रश्न विचारून झाल्यावर त्याने सांगितले की तुमची पट्टी सापडत नाही. हा त्याचा हुकुमी एक्का होता. पट्टी सापडत नाही असे म्हटले की खेळ खलास. पट्टी सापडली असे म्हणायची सोय नव्हती कारण जन्मवेळ दिलेली नसल्यामुळे लग्न-रास काढता येत नव्हती, ती काय सांगायची हा पेच त्याला पडला असता. त्यातून त्याने अशी सुटका करून घेतली.
एक नाडीज्योतिषी भोंदु निघाला म्हणुन सर्व तसेच असतात काय? असे म्हणुन एक नाडीचक्र किंवा चरक चालु होतो. अनुभव घेण्या अगोदर तर्कबुद्धीच्या पातळीवर् दावे तपासता येतात.
प्रकाश घाटपांडे
माझ्या मूळ प्रतिसादास पूरक विचार.
माझ्या मूळ प्रतिसादास पूरक विचार.
नमस्कार,
कदाचित ’खुल्या गप्पांचा’ ’कार्यक्रम’ ’एप्रीलच्या पहिल्या दिवशी आयोजित’ करण्यामागचा गर्भितार्थ लक्षात घेऊन पत्रकारमित्र आले नसावेत असे आपले एकवार उगाच वाटून गेले. असो. ’चिकित्सा’ सारख्या भक्कम शब्दासह ’मंडळ’, आणि ’मंडळी’ असे ’अनौपचारिक’ शब्द उपयोजिल्यामुळे विषयाकडे काय गांभीर्याने पाहिले जाते आहे, असाही एक प्रश्न त्यांना पडला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
असो. अशा ’जनहितार्थ’ हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता असावी असे एक सर्वसामान्य मत आहे. विशेषत: विश्वास ठेवणारे आणि विश्वास न ठेवणारे असे दोन वर्ग असतील तेथे ही पारदर्शकता राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. नाडिग्रंथ ह्या विषयाच्या अनुषंगाने पाहता आपण आपले प्रयोग करून आपले सिद्धांत मांडले तेंव्हा त्या प्रयोगास साक्ष म्हणून नाडिग्रंथांवर विश्वास ठेवणार्या वर्गाचे सदस्य उपस्थित होते की नाही हे आपल्या प्रतिसादावरून स्पष्ट होत नाही. असे असता, आपला प्रयोग हा पूर्णत: एकांगी आहे असे आरोपिल्यास आपले काय म्हणणे आहे, हे कळावे.
ह्या आणि अशा इतर साध्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न केला आहे काय? असा शोध आपण केला नसल्यास "प्रत्यक्षात संबंधिताने अंगठयाचा ठसा दिल्यावर त्याच्याकडूनच अनेक प्रश्न विचारुन ही माहिती काढून घेतली जाते याची आम्ही खात्री केली आहे" हे आपले प्रतिपादन संपूर्णतः पोकळ ठरेल. आपल्या संशोधनासाठी आपण ’नाडिभविष्य हे थोतांड असते’ असे गृहितक घेतले आहे असे आपल्या त्या विषयावरील मूळ लेखावरून प्रतीत होते, त्यावरून हा सर्व शोधविचार एकांगी असल्याचे पुनश्च एकवार सिद्ध होते. तरी आपले संशोधन हे पूर्वग्रहभारित आहे असे कोणी आरोपिल्यास आपले काय म्हणणे आहे, हे कळावे.
उपरोक्त विविध कारणांची समाधानकारक उत्तरे मिळेपर्यंत आपण दाखल्यादाखल दिलेल्या कथेतील इतर घटनांचा विचार करणे शक्य होत नाही.
-
हैयो हैयैयो!
काही पुरक
1. नाडिकेंद्रांमध्ये पट्टी शोधण्यासाठी आपल्या अंगठ्याचा छाप का द्यावा लागतो?
नाडी वाल्यांच्या मते आंगठयाचा छाप हा पट्ट्यांची बंडले शोधण्यासाठी उपयोगी असतो
2. तो तसा दिल्यानंतरसुद्धा आपणांस काही प्रश्न का विचारले जातात?
एकसारख्या वर्णनाच्या अनेक व्यक्ती असु शकतात त्यातुन नेमकी हीच् ती व्यक्ती हे निश्चित करण्यासाठि त्याचा वापर् होतो. अधिक माहिती ओकांच्या पुस्तकात दिले आहे. उदा. बाकी वर्णन जमले पण बायकोचे नाव आईचे नाव इ जुळले नाही तर ती म्हणजे पट्टीतील व्यक्ती नव्हे असे समजुन ती पट्टी बाजुला करुन दुसरी पट्टी घेतली जाते.
3. ते तसे विचारावे लागतात असे नाडिवाचकाने सांगितले, तर ते तसे का विचारावे लागतात असे आपण त्यांना विचारले काय?
वरील प्रमाणे
4. पोलीसखात्याच्या अंगुलीमुद्रातज्ज्ञांची कार्यपद्धति आणि जे स्वत:स ’अंगुलीमुद्रातज्ज्ञ’ असे म्हणवून घेत नाहीत अशा नाडिवाचकाची कार्यपद्धतति ह्यात काही साम्य अथवा अंतर आहे काय?
एक अंगठयाचा ठसा हा दुसऱ्या सारखा कधीच नसतो हे सर्वसामान्य लोकांना माहित आहे. त्यामुळे आंगठयाच्या ठशाचे महत्व जाणीवपूर्वक जतन केले आहे. त्या अंगठयाच्या ठशाचे वर्णन नाडीपटटीत येते. त्यामुळे अंगठयाचा ठसा ही अगस्ती नाडी साठी महत्वाची गोष्ट बनते. जर ठसा युनिक आहे व त्याच्या वरुन त्यांना बंडलाच सॉर्टिंग करता येते तर वर्णनावरुन पट्टी का ठरवता येउ नये? पट्टीतील व्यक्ती तीच आहे का यासाठी प्रश्न विचारावे लागतातच ना!
5. ह्या दोन पद्धती वेगळ्या आहेत अथवा नाहीत हे सिद्ध करण्यापूर्वीच दोहोंना एकाच परिमाणाने मोजणे हे चिकित्सेच्या दृष्टीने कसे योग्य ठरते?
हा सिद्ध करण्यापुर्वीच्याच प्रक्रियेचा भाग आहे. संशयाचा भाग म्हणा हव तर. आंगठ्याच्या ठशाचा नेमका काय उपयोग व रोल हे जाणुन घेण्यासाठी
आपण ओकांची पुस्तके वाचलीत का?
प्रकाश घाटपांडे
चुकून आलो
ही नाडीपरीक्षा तर चक्क थोतांड दिसते आहे. आम्ही चुकून इथे आलो. नाडीवैद्य करतात ती नाडीपरीक्षा असा आमचा समज झाला होता. असो.
बाकी प्रकाशराव, तुमच्या चिकित्सक चिकाटीची किंवा चिकाटीच्या चिकित्सेची दाद द्यायलाच हवी. चालू द्या. शुभेच्छा!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
थोतांडच...
धम्मक लाडवाशी सहमत आहे.
घाटपांडे साहेबांच्या चिकित्सक चिकाटीची किंवा चिकाटीच्या चिकित्सेची दाद द्यायलाच हवी.
पूर्णपणे विषयांतर(?)
घाटपांडेसाहेब,
भृगू संहितेत भृगू महर्षींनी ढोबळ ५ लाख पत्रिका दिल्या आहेत. त्याबद्दल काही शास्त्रीय/ वैज्ञानिक संशोधन झाले आहे काय?(बालपणी मराठीतून भृगू संहिता पाहिल्याचे आठवते. एका भागात पत्रिका तर दुसर्या भागात भविष्य असे काहीतरी त्याचे स्वरूप होते.)
५ लाख हा 'स्टॅटिस्टिकली सिग्नीफिकंट' आकडा आहे असे वाटते. इतका मोठा विदा उपलब्ध असताना (पत्रिका => भविष्य) १००-२०० पत्रिकांपुरते संशोधन कशाला करावे? भृगू संहितेतील पत्रिका ज्यांच्या पत्रिकांशी जुळतात अशा दहा हजार प्रौढ (> ५० वर्षे) व्यक्तींची भृगू भविष्ये आणि जीवने ताडून पाहता येतील.
असा विचार पूर्वी कधी झाला होता काय?
आणखी अवांतर -
पृथ्वीतलावरील समस्त जिवंत मानवांच्या नाडीपट्ट्या अतित्वात आहेत असे गृहित धरू.
प्रत्येकाची नाडीपट्टी वेगेवेगळी असली पाहिजे (असे पूर्वीच्या वाचलेल्या माहितीवरून वाटते. चूक असेल तर कृपया दुरुस्त करावी.)
कारण व्यक्तीचे 'नाव', अपत्ये, जन्मवेळ आणि जन्मठिकाण कोणत्याही दोन व्यक्तींबाबत तंतोतंत जुळणे अशक्य वाटते. त्यामुळे / तसेच जीवनातील घटना नेहमीच वेगवेगळ्या असाव्यात.
म्हणजे एकूण अंदाजे ६,९३,९४,७५,००० (आणि वाढत आहे...७ अब्ज म्हणू) नाडीपट्टया आजमितीस उपलब्ध असणे गरजेचे आहे.
एका नाडीपट्टीचे घनफळ १०सेमी *२ सेमी *३ सेमी = ६०सेमी^३ असावे असे वाटते. (नसेल तर नक्की किती असते?)
सर्व नाडीपट्टया संग्रहित करण्यास ६०घनसेमी *७ अब्ज = ४२ घनकिमी आकारमान लागेल.
कमीतकमी ४० घन किमी तरी लागेलच. (२ किमी*२किमी*१० किमी)
समजा एका ठिकाणी ४ मिटर * ४ मिटर * ४ मिटर = ६४ घनमिटर जागेत (खोलीत) नाडीपट्ट्या साठवल्या आहेत. तर अंदाजे साडेसहा लाख खोल्या सर्व नाडीपट्ट्या साठवण्यास लागतील.(ही संख्या भविष्यात वाढणार्या लोकसंख्येस गृहित धरले तर आणखी वाढेल.)
'असे नव्हे', 'असे नसते', 'हे गृहितक चूक आहे' अशा कोणत्याही आक्षेपांचे स्वागत आहे. कृपया चुका दाखवून द्याव्यात.
भृगुसंहिता
बहुतेक आता आम्हाला भृगूसंहिता हा 'आजचा चार्वाक' दिवाळी १९९६ मधील भला थोरला लेख टाकावा लागेल असे दिसते. तोपर्यंत http://mr.upakram.org/node/843 येथील प्रश्न क्र.४१ चे पुनरावलोकन करा.
ढवळे भृगुसंहितेत १९०१ ते २०० मधील जन्मलेल्या व्यक्तिंसाठी एकुण ४८८६ प्रकारचे कुंडली आराखडे एकुण ३०० प्रकारच्या भाकित वर्णनाशी संलग्न केले आहेत.(स्त्रियांसाठी १०० )
विकिपिडियात ५ लाख आकडा कुठुन आला या अंदाज मला लागत नाही
अवांतर मधील जागेचा हिशोब बघा तुमीच् आता! एका व्यक्तिसाठी १६ पट्ट्या तेही फक्त अगस्ती नाडीच्या. अशा अजुन अन्य महर्षींच्या पण नाड्या आहेत त्यांच्या पट्ट्या परत वेगळ्या.
प्रकाश घाटपांडे
काही उत्तरे
माझ्या आधीच्या प्रतिसादांवरून माझी नाडीपट्टीबद्दलची मते जग(!)जाहिर आहेत. त्यामुळे अधिक लिहित नाहि. मात्र २ प्रश्न तर्कदुष्ट वाटले:
जरी (जर) पट्ट्या अंतर्ज्ञानाने असल्या तरी पडताळणीसाठी पट्टीमधे कुंडल्या असणे गैर वाटत नाही नव्हे ते आवश्यक वाटते. कारण ज्योतिषाचे (मतभेदांसकट का होईना) काहि नियम आहेत. तेव्हा हा रेफरंस पडताळणीसाठी पट्टीवाल्यांनी वापरल्यास नवल ते काय?
गरज नाहि. पट्टीवाल्या महर्षींना (अंतर्ज्ञानाने) माहित असेलच की किती लोक पट्ट्या बघायला येणार आहेत, त्यांच्याच पट्ट्या बनविल्या की काम झाले.
अर्थात बाकी (मला) वैध वाटलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहित, कारण ती उत्तरे देताच येणार नाहित / त्या प्रश्नांची उत्तरे अस्तित्वातच नसावीत / असल्यास ती देऊन स्वतःचा व्यवसाय हे पट्टीवाले कमी करणार नाहित याबद्दल माझी खात्री पटु लागली आहे.
जाता जाता: अश्या प्रश्नांमुळे / जाहिर विरोधी भुमिकेमुळे-पुराव्यांमुळे या फलज्योतिष/नाडी वगैरे विष्यांपासून किती लोक दुरावतात व कीती लोक (उलट मिळालेलेल्या अनायसे) प्रसिद्धीमुळे / निर्माण झालेल्या कुतुहलामुळे त्यात गुंतत जाता हा विदा रोचक ठरावा.
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
गंमतच्चे
मी इथ नविनच आलेय् आणि आल्यापसुन हा विषय पाहते आहे...... वाचण्यात इन्ट्रेस्ट् आला आहे. हैहैयो साहेबान्नि मांडलेल्या प्रश्नांना काही उत्तरे अहेत का ओ विरोधि... का उगिचच संशोधन म्हणुन् धुळफेक् कराय्चिय
सौ. बक्कुबाई बिलंदर
प्रतिसाद संपादित.