नीतीमत्ता - उपजत की संस्कारित?

फोर्थ डायमेन्शन -21

नीतीमत्ता - उपजत की संस्कारित?
डिझेल इंजीन बसवलेली ट्रॉली रेल्वेच्या रुळावरून सुसाट वेगाने येत आहे. त्यामुळे रुळाच्या मध्यभागी खेळत असलेल्या पाच मुलांच्या जीवाला धोका आहे. आपघात होऊन पाची मुलं मरण्याची शक्यता आहे. आरडाओरडा करूनही उपयोग होणार नाही. धोका टाळण्यासाठी ट्रॉलीला दुसऱ्या रुळावर ढकलू शकणाऱ्या झडप यंत्रणेपाशी आपण उभे आहात. दुसऱ्या रूळाच्या मध्यभागीसुद्धा एक मुलगी एकटीच खेळत आहे. जर आपण ट्रॉलीसाठी रूळ बदलल्यास त्या मुलीचा जीव जाईल. रूळ न बदलल्यास मुलं मरतील. अशा प्रसंगी आपण काय कराल? पाच मुलांचा जीव वाचविण्यासाठी एका मुलीला बळी देणार की पाच मुलांना तसेच वाऱ्यावर सोडून देणार?
आपल्यापैकी बहुतेकांचा कल पाच जीव वाचविण्यासाठी एकीचा जीव घेतला तरी चालेल, असा असेल.
एक सुदृढ व्यक्ती हॉस्पिटलच्या आवारात शिरताना बघून ड्यूटीवरील नर्स आपल्या वरिष्ठ डॉक्टरांना फोनवर सांगू लागली. "सर, आपल्या येथे आता अत्यावस्थेतील पाच रूग्ण आहेत. त्यांच्यातील निकामी अवयव काढून अवयवारोपण केल्याशिवाय त्यांना वाचवणे अशक्य आहे. एकाला, मूत्रपिंड, दुसऱ्याला लिव्हर, तिसऱ्याला पुफ्फुस.... असे लागणार आहेत. आताच आपल्या हॉस्पिटलच्या आवारात एक धष्टपुष्ट अशी व्यक्ती शिरत आहे. जर त्याला मारून त्याचे अवयव काढून या रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यास हे पाचही जीव वाचतील. कृपया आपण त्याला मारण्यास अनुमती ध्यावी. "
जर तुम्ही डॉक्टराच्या जागी असता तर तुमचे उत्तर काय असू शकेल? तुम्ही अशा प्रकारची अनुमती कधीच देणार नाही.
वरील दोन्ही प्रसंगामध्ये पाच जीव वाचण्याची शक्यता आहे. परंतु पहिल्या प्रसंगात एकाला मारून पाच (कोवळे!) जीव वाचवण्यासाठी आपली पूर्ण संमती असेल. दुसऱ्या प्रसंगात मात्र पाच जीव वाचवण्यासाठी एकाला जिवेनिशी मारण्यास आपला ठाम नकार असेल.
सामान्यपणे जगभरातील बहुतांश लोकांचा निर्णय आपल्यासारखाच असेल. धर्म, भाषा, संस्कृती, शिक्षण, वय, लिंग, सामाजिक वा आर्थिक स्तर, करत असलेला व्यवसाय, इ.इ. कुठल्याही गोष्टीचा या प्रकारच्या निर्णयाला अडसर येणार नाही. तसा विचार करू लागल्यास या प्रकारच्या निकालाला कुठलाही तार्किक आधार नाही. आपण असे का निर्णय देत आहात या प्रश्नाला आपल्यापाशी उत्तर नाही. कदाचित आपल्यात उपजतच असलेली नीतीमत्ता आपल्या वर्तनाचे नियंत्रण करत असावे.

Source: Moral Minds: How Nature Designed Our Universal Sense of Right and Wrong, Marc Hauser, 2006

नीतीमत्ता उपजत असू शकते यासाठी आपण आपल्यातील भाषाज्ञानाविषयीचा मागोवा घेणे इष्ट ठरेल.नोऑम चॉम्स्की या भाषातज्ञाच्या मते जगभरातील माणसं हजारो प्रकारच्या बोली बोलत असले तरी या सर्व बोलींचे मूळ माणसाच्या जनुकीय इतिहासात कुठे तरी असायला हवे. कालांतराने त्या भाषा वेगवेगळ्या झाल्या असतील. परंतु या सर्वाना बांधून ठेवणारे एखादे समान सूत्र असले पाहिजे. भाषेप्रमाणेच नीतीमत्तेसंबंधीसुद्धा अशाच प्रकारचे विधान करणे शक्य आहे. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हापासूनच - भाषाज्ञानाप्रमाणे - नैतिकतेचे व्याकरणसुद्धा त्याच्या मेंदूत भिनलेले असते. कदाचित ती एक वेगळी व्यवस्था असू शकेल. या व्यवस्थेत काही अबोध - सुलभपणे हाती येऊ न शकणारे - तत्त्व असून त्याचा संबंध नीतीमत्तेशी जोडता येईल
नैतिकता भाषेसारखीच आहे असे ठामपणे म्हणता येत नसले तरी एक सदृशता (analogy) म्हणून त्याकडे बघता येईल. मुळात नीतीमत्ता ही एक सर्वस्वी वेगळी व्यवस्था आहे. हा काही प्राथमिक शिक्षणाचा विषय होऊ शकत नाही. केवळ संस्कारातून नैतिकतेचे धडे देता येत नाहीत. परंतु मुलांना जसा भाषेचा खजिना उपजतच मिळत असतो, तशाच प्रकारे नैतिकतेचा खजिना मिळत असावा. हा खजिना उपजतच नसता.तर मात्र प्रत्येक नैतिक पेचप्रसंगातून बाहेर पडण्यासाठी त्याच गोष्टीचा विचार करत बसावा लागला असता. इतर काहीही करायचे नाही अशी अवस्था झाली असती.
सर्व मानवी प्राण्यांना सामावून घेणाऱ्या एखाद्या अबोध अशा तात्विक चौकटीत राहूनच आपली नैतिक वैचारिक पद्धती विकसित झाली असण्याची शक्यता आहे. त्यातूनच इतरांना मदत करायचे की त्रास द्यायचे हे ठरत असावे.मात्र प्रत्येक संस्कृतीचे काही स्वतंत्र नियम असून त्यानुसारच कुणाला त्रास द्यायचे व कुणाला मदत करायचे हे ठरवले जात असावेत. नीतीमत्तेसाठी म्हणूनच अशा तत्त्वांचे पालन होत असण्याची शक्यता फार कमी आहे. सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी व आपल्या अस्तित्वावरच गदा येऊ नये यासाठी म्हणून नीतीमत्तेकडून उसने घेतलेल्या या गोष्टी असावेत.
मुळात नैतिकता सामान्यपणे काय करते? जाणते-अजाणतेपणाने सामाजिक गटांचे नियम-प्रथा ठरवत समाजाला पुढे नेण्याचे काम करते. यात अजाणतेपणा कुठून आला? जसा भाषेत येऊ शकतो तसा तो येथे आला आहे. एक मात्र खरे की नैतिकतेतील ही लवचिकता मानवी समूहगटांना एकत्रितपणे बांधून ठेवण्यात काही मर्यादेपर्यंतच यशस्वी होऊ शकते.
चांगल्याला चांगले व वाईटाला वाईट हा 'जशास तसे'चा नैतिक नियम कदाचित सर्व संस्कृतीत सापडेल. "तुमच्याशी कुणी चांगले वागत असल्यास तुम्ही पण त्यांच्याशी चांगले वागा" हा परस्पर सहकारभाव सगळ्या समाजगटात प्रकर्षाने जाणवतो. "मला कुणी त्रास देत असल्यास त्याचा सूड घेणे" ही प्रत्येकाची मानसिकता असते. दुसऱ्यानी काही चांगले केल्यास आपणही त्याची परतफेड करावी ही मानसिकतासुद्धा आपल्यात असते. कदाचित या गोष्टी माणूस उत्क्रांत होत असतानाच आलेल्या असावेत.
'दुसऱ्याना मारू नये' ही गोष्ट मग जनुकीय असेल का? निश्चितच नाही. कारण यासाठी काही अटींचे पालन करावे लागते. आपण काहीना मारतो. सर्वांना नाही. या प्रकारच्या अटींकडे प्रत्येक समाजगटाचे आंतरिक व वा बाह्य वैशिष्ट्य म्हणून बघितल्या जातात.
धर्माच्या पुरस्कर्त्यांना नेहमीच धर्म व नीतीमत्ता या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असे वाटत आले आहे. नास्तिकांना नीतीमत्ता नसते, ही त्यांची ठाम समजूत आहे. परंतु यात काही तथ्य नाही. या जगाच्या कल्याणासाठी नास्तिकांनी पण खस्ता खाल्या आहेत. त्यांचाही सहभाग फार मोठा आहे. यासंबंधात एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. धार्मिक व नास्तिक यांच्यातील नैतिकतेच्या आकलनाची पातळी वेगवेगळी असू शकते का? याचे उत्तर निश्चितच नाही असे असेल.

Comments

वैचारिक लेख

आवडला.

काही वैयक्तिक बाबतीत नैतिकता उपाजत असावी. (म्हणजे दुसर्‍या कोणाची वेदना बघून बहुतेक लोक कळवळतात, आणि पात्र-अपात्राचा विचार प्रथम न करता, वेदना कमी व्हाव्यात, असे मानतात. हा प्रकार उपजत असावा.) मात्र काही गुंतागुंतीच्या सामाजिक प्रश्नांबाबत नैतिकता शिकाऊ असावी, असे मला वाटते. (म्हणजे वेदनांबद्दल काय करावे? असा प्रश्न उद्भवला की पात्र-अपात्र असा हिशोब करतात. निर्मम खून केल्यामुळे जर कोणाला देहदंड झाला असेल, तर "त्या व्यक्तीला झटक्यात मारावे की हालहाल करून मारावे," असे विचारता लोकांकडून वेगवेगळी उत्तरे आपल्याला मिळतात. वेगवेगळ्या संस्कारांमुळे बहुधा उत्तरांमध्ये फरक असतो.)

(शीर्षक थोडेसे सनसनाटी आहे - "फक्त उपजत किंवा फक्त शिकलेली" अशा दोन टोकांनाच पर्याय म्हणून स्वीकारून एका बाजूला येणारा वाद असेल, असे शीर्षकावरून वाटले होते. पण तसे लेखात नाही. हे उत्तम.)

आणखी उदाहरणे

श्री.नानावटी यांनी दिलेल्या दोन उदाहरणांत आणखी थोडी भर घालतो.
(१) गर्दीच्या रस्त्यामध्ये एक अज्ञात व्यक्ती रायफल किंवा एके ४७ घेऊन उभी आहे. पोलिसांनी त्याला ताबडतोब मारावे कीं तो काय करतो आहे त्याची वाट पहावी ? (Encounter) . मुंबई दूरदर्शनवर पाहिलेले दृष्य :दंगलीत जमाव टॅंकरला आग लावण्याकरिता जात आहे, हातात पेटलेले पलिते आहेत, अशावेळीं पोलिसांनी गोळीबार करावा कां?
(२) युद्धामध्यें शत्रू सैनिक समोरासमोर आल्यावर गोळीबार करावा कीं "शरण ये" असे आवाहन करावे?
(३) गुरू, कसाब यांना फाशी द्यावे कां?
नीती सांगणार " कोणाचाही वध करूं नये".
एक अडीच हजार वर्षांपूर्वीचे सुभाषित पहा.

त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत !
ग्रामं जनपदस्यार्थे ह्यातमार्थे पृथिवीं त्यजेत !!
शरद

अवघड

चॉम्स्की यांच्याबद्दलचा उल्लेख नीट कळला नाही. माणसाला बोलता येऊ लागले हा जनुकीय परिणाम आहे असे चॉम्स्की यांना म्हणायचे आहे का?
लहान मुले भाषा लवकर शिकतात हाही जनुकीय परिणाम असल्याचा एक सिद्धांत आहे. यानुसार आपण मोठे झालो की हे गुणसूत्र स्विच ऑफ होते, म्हणून मोठेपणी भाषा शिकणे अवघड जाते.

नैतिकता जनुकीय आहे किंवा नाही हा अवघड प्रश्न आहे.* नेचर वि. नर्चर हा वाद बराच प्रसिद्ध आहे. नैतिकतेच्या कल्पना त्या-त्या समाज आणि संस्कृतीवरही अवलंबून असतात. युरोपमध्ये बहुतेक देशांमध्ये देहांतशासन अनैतिक आहे पण भारत किंवा अमेरिकेत याला योग्य मानले जाते. काही बाबतीत नैतिकतेची सीमारेषा धूसर असल्याचेही दिसून येते. गर्भपात, इच्छामरण, स्टेम-सेल संशोधन, क्लोनिंग या सर्वांमध्ये काय नैतिक आणि काय अनैतिक हे कुणी ठरवायचे आणि कसे?

*याबाबत शास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांचे मत वेगळे आणि रोचक आहे. ते म्हणतात, "The phrase 'the child should cheat' means that genes that tend to make children cheat have an advantage in the gene pool. If there is a human moral to be drawn, it is that we much teach our children altruism, for we cannot expect it to be part of their biological nature." -- The Selfish Gene, pp 139.

----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

लहान मुले आणि भाषा (अवांतर)

लहान मुले भाषा लवकर शिकतात हाही जनुकीय परिणाम असल्याचा एक सिद्धांत आहे. यानुसार आपण मोठे झालो की हे गुणसूत्र स्विच ऑफ होते, म्हणून मोठेपणी भाषा शिकणे अवघड जाते.

हा सिद्धांत (मला) नवीन आणि रोचक आहे (मला पटत नसला तरी). याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल काय?

माझ्या कल्पनेप्रमाणे लहान मुले भाषा प्रौढांच्या तुलनेत लवकर शिकतात याचा संबंध एखादे गुणसूत्र स्विच ऑफ होण्याशी नसून 'कोर्‍या पाटी'शी असावा. पाटी कोरी असते तेव्हा दोन फायदे असतात. पहिला फायदा म्हणजे कोणताही पूर्वग्रह नसल्याने भाषा कानावर पडते तशी, इतर कोणत्याही भाषेचा फिल्टर न लावता शिकली जाते. उलट दुसरी, तिसरी, पन्नासावी वगैरे भाषा शिकताना अगोदर अवगत असलेल्या भाषेशी नकळत तुलना होऊन, सामाईक तत्त्वे शोधतशोधत, आपोआपच त्या फिल्टरमधून शिकली जाते. (हा मेंदूच्या रिसोर्स ऑप्टिमायझेशनचा भाग असावा काय? म्हणजे एखादी भाषा शिकण्याकरिता जर मेंदूची क्ष संसाधने लागत असतील, तर दुसरी भाषा शिकताना एकूण २क्ष संसाधने व्यस्त होण्याऐवजी दोहोंमध्ये जेथेजेथे समान सूत्र सापडेल तेथेतेथे शोधण्याचा प्रयत्न करून संसाधनांची बचत करण्याचा मेंदूचा सब्कॉन्शस प्रयत्न वगैरे? कल्पना नाही. यावर कोणी प्रकाश पाडू शकल्यास उपयुक्त ठरेल. अनेकदा दोन भाषा सारख्याच प्रमाणात कानावर पडणारी लहान मुले सुरुवातीस दोन्ही भाषांत अनभिज्ञ असल्याने दोन्ही भाषा उत्तम प्रकारे आत्मसात करू शकतात, उलटपक्षी 'मातृभाषा' ही समाजभाषा असलेल्या मुलुखाबाहेर वाढणार्‍या लहान मुलांच्या बाबतीत अनेकदा शाळेच्या कारणामुळे वगैरे 'मातृभाषे'पेक्षा समाजभाषा खूपच अधिक प्रमाणात कानावर पडली किंवा मुलांकडून बोलली गेली, तर अशा मुलांना समाजभाषा उत्तमरीत्या अवगत असण्याची आणि 'मातृभाषे'त खूपच कच्ची राहण्याची शक्यता खूप असते, असे दिसून येते.) दुसरा फायदा म्हणजे, जसजशी पाटी भरत जाते तसतसा (बहुधा संसाधने कमीकमी होत गेल्याने?) मेंदूच्या नवनवीन गोष्टींच्या बाबतीतल्या ग्रहणशक्तीचा एक्स्पोनेन्शियल डीके होत असावा, असे वाटते (ही मात्र माझी अत्यंत रानटी अटकळ अर्थात वाइल्ड गेस आहे; चूभूद्याघ्या.), त्यामुळे पाटी कोरी असताना ग्रहणशक्ती खूपच अधिक प्रमाणात असावी. ('वन कॅनॉट टीच ऍन ओल्ड डॉग न्यू ट्रिक्स' या उक्तीमागील मूलभूत तत्त्व हेच असावे, असे वाटते. चूभूद्याघ्या.)

अर्थात ही झाली माझी समजूत. पर्यायी थियर्‍या आणि सिद्धांत समजून घ्यायला जरूर आवडेल.

बाकी मूळ लेखातील नैतिकतेबाबतीतील प्रश्नांच्या बाबतीत अजूनही विचाराधीन आहे. परंतु, intuitively, नैतिकता ही उपजत नसून संस्कारित असावी असे मानण्याकडे (माझा) कल आहे.


"I am not what I think I am. I am not what you think I am. I am what I think you think I am." -?????.

स्टीव्हन पिंकर यांचे "लँग्वेज इन्स्टिन्क्ट"

भाषेला अवगत करण्याचे "इंद्रिय" हे उपजत असते, याबद्दल स्टीवन पिंकर यांचे पुस्तक "लँग्वेज इन्स्टिन्क्ट" खूप वाचनीय आहे. त्याचा गोषवारा या विकी पानावर सापडेल.

पिंकर आपल्या बाजूची अनेक उदाहरणे देतात :
१. वेगवेगळ्या जमातींचे लोक मिसळून (गुलाम म्हणून वगैरे) कुठेही आणले, तर ते एक अव्यवस्थित मिश्रण बोलतात - याला भाषाविज्ञानात "पिड्गिन" म्हणतात. पण एखाद पिढीतच त्या ठिकाणची बालके एक व्यवस्थित (सिस्टिमॅटिक) व्याकरणाची क्रियोल-भाषा तयार करतात. (फ्रेंच-आफ्रिकन मिश्रणाची एक विशिष्ट भाषा "क्रियोल" [विशेषनाम] आहे, तर अशा प्रकारच्या सर्वच भाषांना भाषावैज्ञानात क्रियोल [सामान्यनाम] म्हणतात.)
२. जन्माने बहिरी बालके हातवार्‍यांनी बोलतात - कुठल्याही मुद्रा-भाषेशी संबंध आला नाही तरी - हस्तमुद्रांची "सिलॅबले" ("बॅब्लिंग") बनवतात.
३. जन्मबधिर बालकांचे आईवडील प्रेमाने आपल्या देशातील हस्तमुद्रांची भाषा शिकतात, पण त्यांच्या मुद्रा व्याकरणाच्या दृष्टीने अव्यवस्थित असतात. अशा आईवडलांकडून शिकणारे मूलही मुद्राभाषेचे व्याकरण आपोआप व्यवस्थित करून घेते.
(वगैरे.)

आभार

उदाहरणे रोचक आहेत. लेखाच्या दुव्याबद्दल आभार. लेख वाचून मगच (मी) अधिक मतप्रदर्शन करणे इष्ट ठरेल.

पुनश्च आभारी आहे.

पिजिन भाषा

जन्माने बहिरी बालके हातवार्‍यांनी बोलतात - कुठल्याही मुद्रा-भाषेशी संबंध आला नाही तरी - हस्तमुद्रांची "सिलॅबले"

("बॅब्लिंग") बनवतात.
जन्मबधिर बालकांचे आईवडील प्रेमाने आपल्या देशातील हस्तमुद्रांची भाषा शिकतात, पण त्यांच्या मुद्रा व्याकरणाच्या दृष्टीने अव्यवस्थित असतात. अशा आईवडलांकडून शिकणारे मूलही मुद्राभाषेचे व्याकरण आपोआप व्यवस्थित करून घेते.

हे फार रोचक आहे.

काही भाषावैज्ञानिकांच्या मते मराठीदेखील पिजिन भाषा आहे. (बहुधा pidgin चा उच्चार पिजिन असावा.)

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

पिजिन बरोबर धन्यवाद

या शब्द मी एका शिक्षिकेकडून "पिड्गिन" असा लहानपणी ऐकला, आणि गंमत म्हणजे त्यानंतर कधी कानांनी ऐकला नाही, फक्त अनेकदा वाचला.

पण "पिजिन" असा उच्चारच बरोबर आहे. धन्यवाद.

(संपादकांना विनंती - भाषेच्या उपजतेतेबाबतचा धागा वेगळा करावा. खालील विनंतीचे अनुमोदन.)

टोकपिसिन (पिजिन/क्रेओल/अवांतर)

पापुआ न्यू गिनीच्या अधिकृत भाषांपैकी एक भाषा टोकपिसिन ('टोक' = 'टॉक'पासून, 'पिसिन' = 'पिजिन'पासून) ही मूळची वेगवेगळ्या प्रशांतमहासागरीय बेटांवरील जमातींचे लोक मिसळून झालेली इंग्रजी भाषेचा पाया असलेली पिजिन भाषा परंतु आता क्रेओल भाषा असून अनेक लोकांची मातृभाषा आहे, असे कळते.

अवांतर: 'पिजिन' आणि 'अपभ्रंशभाषा' यां दोन संज्ञांचा काही संबंध असावा का? (तशा या संज्ञा - विशेषतः 'अपभ्रंशभाषा' ही संज्ञा - मला फारशा कळलेल्या नाहीत, तेव्हा चूभूद्याघ्या. परंतु अधिक माहिती करून घ्यायला आवडेल.)


"I am not what I think I am. I am not what you think I am. I am what I think you think I am." -?????.

भाषा आणि गुणसूत्रे

भाषेशी संबंधित असे FOXP2 या नावाचे गुणसूत्र सापडले आहे. या गुणसूत्रात बिघाड असल्यास त्या माणसाला भाषा शिकण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करणे कठीण जाते. या संबंधात एका कुटुंबाचा अभ्यास केला असता पिढ्या-न-पिढ्या सर्वांना हा रोग असल्याचे आढळून आले. त्या सर्वांमध्ये या गुणसूत्रात बिघाड होता. याबद्दल अधिक माहिती इथे.

गुणसूत्र स्विच ऑफ होण्याबद्दल कुठे वाचले होते आता आठवत नाही. संदर्भ मिळाल्यास देतो. मुले भाषा लवकर शिकतात याचा संबंध लर्निंग कर्व्हशीही असावा. मुले मोबाईल किंवा संगणकही अल्पावधीत आत्मसात करतात.

धनंजय यांचा दुवाही रोचक आहे. स्टीफन पिंकर यांचे एक व्याख्यान इथे पहाता येईल.
जाता जाता एक रोचक दुवा : अलेक्झांडर आर्गुएल यांचे संकेतस्थळ. यांना ५८ भाषा अवगत आहेत!

संपादकांना विनंती : भाषा आणि गुणसूत्रे ही चर्चा कृपया वेगळी काढता येऊ शकेल काय?

----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32

नैतिकता

मला असे वाटते की नैतिकता किंवा नीतीमत्ता हा एक अतिशय सापेक्ष विषय आहे. एका समाजात जे वर्तन अतिशय सामान्य आणि नैतिक वाटते ते दुसर्‍या समाजात अनैतिक समजले जाते. एखाद्या पुरुषाने स्त्रीचे सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे हे भारत आणि इतर् मुस्लिम राष्ट्रे सोडली तर बाकी ठिकाणी अनैतिक समजले जात नाही. या शिवाय नीतीमत्ता कालसापेक्ष सुद्धा असते. शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांनी परपुरुषाशी बोलणे हे ही अनैतिक समजले जात होते.
बहुतेक वेळा नीतीमत्ता किंवा नैतिक वर्तणूक ही स्त्रियांवर लादली जात असते. त्यांनी काय नेसावे? कसे वागावे? याचे नियम पुरुषच ठरवतात. एकविसाव्या शतकात आता आपण हे मान्य करायला हवे की सामाजिक नीतीमत्ता वगैरे प्रत्यक्षात काही नसते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या नीतीच्या कल्पनेप्रमाणे वागण्याचा पूर्ण हक्क आहे. नाहीतर आपण आणि तालिबान यात फरक तो काय राहिला?
चन्द्रशेखर

सापेक्ष कल्पना

नीतिमत्ता ही निरपेक्ष कल्पना नाही हे उघडच आहे. बहुतेक वेळा प्रत्येक कृती ही नैतिक की अनैतिक याविषयी सुटे सुटे नियम आहेत असे बर्‍याच लोकांना वाटते. परंतु तसे काही नसते. काय समर्थनीय आणि काय त्याज्य यासंबंधात समाजाची एक ब्रॉड कल्पना असते. त्या ब्रॉड कल्पनेवरून एखादी गोष्ट नैतिक की अनैतिक ते ठरवले जाते. समाज हा समाज म्हणून टिकण्यासाठी हे नियम केलेले असतात.

ही पायाभूत विचारसरणी वेळोवेळी बदलत असते. त्यामुळे एका काळात नैतिक असलेली गोष्ट दुसर्‍या काळात अनैतिक समजली जाते. पूर्वी मुलीचे लवकर लग्न करून दिले जाई कारण मुलगी वयात येण्यापूर्वी विवाह करून देणे हे नैतिक समजले जाई. आज लग्ने उशीरा केली जातात याला मुली आता उशीरा वयात येतात हे कारण नसून वयात येण्यापूर्वी विवाह करणे अनैतिक समजले जाते.

दुसर्‍या एका धाग्यावर योग्यतेनुसार संपत्तीचे वाटप नैतिक असे मांडले आहे. परंतु हे तत्त्व काही निरपेक्षपणे नैतिक नाही. तर ते समाजाने नैतिक म्हणून ठरवायचे/ठरवले आहे. अधिक जुन्या काळात अमूक कुळात जन्मला म्हणून जास्त अधिकार याला नैतिकता समजले जाई. आज आपण सर्व समान असण्याच्या गोष्टी तरी करतो. गेल्या शतकातील मधल्या काही काळात सर्वांना संपत्तीचे समान वाटप हे (काही देशांत) नैतिक तर (इतर देशांत) अनैतिक समजले जाई.

नीतीची सार्वकालिक व्याख्या करायची म्हटले तर 'आपल्या वागण्याने इतरांना दु:ख (वेदना) होतील असे न वागणे म्हणजे नैतिक वागणे'. अशी करता येईल किंवा 'दुसर्‍यांनी जसे वागावे असे आपल्याला वाटेल तसेच आपण वागणे' म्हणजेच नैतिक आचरण म्हणता येईल.

नितिन थत्ते

जनुकीय

>>>'दुसऱ्याना मारू नये' ही गोष्ट मग जनुकीय असेल का? निश्चितच नाही.

'आपल्या गटातील, टोळीतील दुसर्‍यांना मारू नये' असे हवे. हे निश्चितच जनुकीय म्हणजे आपल्या पशुत्वाचा वारसा आहे.
तसेच परस्त्री मातेसमान हे तत्त्वही आपल्या गटातील स्त्रियांनाच (सांगण्यापुरते का होईना) लागू असते. दुसर्‍या गटातील प्रत्येक स्त्री भोग्य हे अजूनपर्यंत चालू असलेले 'नैतिक' तत्त्व आहे. फक्त हल्ली ते करताना दुसर्‍या गटातील पुरूषांनी केलेल्या तसल्याच कृत्याची साक्ष समर्थनासाठी काढली जाते.

 
^ वर