मराठीतून संगणन - एक पुढचे पाऊल

इंग्रजी सॉफ्टवेअरचा मराठी अवतार हा अनेकदा क्लिष्ट आणि बोजड वाटतो. काही ठिकाणी तर तो हास्यास्पद वाटावा अशी पातळी गाठतो. फायरफॉक्सच्या मराठी अवतारातील न आवडलेल्या गोष्टी मी मागे मनोगतावरील एका चर्चेत मांडल्या होत्या.

http://www.manogat.com/node/14847

हे असं होतं याच कारण जे प्रोग्रामर्स स्थानिकीकरण करतात ते काही मराठी भाषेतील पंडित नसतात. ते इतरांचे सहकार्य घेऊन इंग्रजी भाषेला प्रतिशब्द शोधतात. असे भाषांतर अनेकदा संदर्भ सोडून केलेले असल्यामुळे खुद्द मराठी माणसांना देखील ते आपले वाटत नाही. याचा काय असेल तो एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकावा यासाठी सी-डेक आणि रेड-हेट यांनी कंबर कसली आहे. ज्यांना यात रस असेल त्यांनी सहकार्य करावे असे मला वाटते. यातून तयार होणारी शब्दसंपदा ही (माझ्या माहितीप्रमाणे) मोफत व मुक्त स्रोत राहणार आहे.

https://fedorahosted.org/fuel/wiki/fuel-marathi

काम तसे पाहिले तर अगदी साधे आहे. ५७८ इंग्रजी शब्दांचे संदर्भासहित भाषांतर तेही सामान्य मराठी माणसाला समजेल असे. पुण्यात भरणार्‍या या कार्यशाळेत जे उपस्थित राहू शकणार नाहीत ते खाली दिलेल्या तक्त्यात आपल्या सूचना मांडू शकतात.

http://tinyurl.com/m5qgh3

एका थोर संशोधकाने आपल्या मित्राला अनेक पानांचे पत्र लिहिले आणि त्यात खाली लिहिले की मला एका पानाचेच पत्र लिहायचे होते पण तितका वेळ नव्हता म्हणून हे १० पानी पत्र लिहित आहे! थोडक्यात लिहिणे आणि सोप्या भाषेत लिहिणे हे खायचे काम नाही असे तर त्याला यातून सुचवायचे नसेल ना?

Comments

खूप खूप आभार

Expunge काढून टाका/नष्ट करा
Filter गाळणी
Hibernate शीतनिद्रा
Hyperlink दुवा

नंदन यांनी वर दिलेले काही शब्द सुचविले आहेत.
टि.व्ही. वरील एका सुप्रसिद्ध निवेदिकेच्या भाषेत सांगायचे झाले तर, नंदन यांचे खूप खूप आभार.

पण त्यांनी सुचविलेला Grid साठी "जाळी" हा शब्द मला तितकासा पटला नाही. ओपन ऑफिसमध्ये हा शब्द नेमका कोठे येतो ते पाहायला हवे.

शब्द

>>Hibernate शीतनिद्रा<<
संगणकाच्या बाबतीत शीतनिद्रा या शब्दापेक्षा विश्रांती, सुप्तावस्था हे शब्द मला बरे वाटतील.

शंतनू, माहितीसाठी धन्यवाद.
--लिखाळ.

"शीतनिद्रा" मला आवडला

कारण या परिस्थितीत संगणकातील प्रक्रियक (प्रॉसेसर) थंड होऊ दिला जातो. विद्युत्प्रवाह पूर्णपणे खंडित केला जातो (हायबर्नेट करणारा प्राणी दैनंदिन खुराक बंद करतो तसा).

पंधरा मिनिटे काही न केल्यास माझा संगणक साध्या सुप्तावस्थेत जातो (अशी व्यवस्था मी केली आहे), पण टिचकी मारताच त्याला जाग येते.

सुप्तावस्था म्हणजे स्लीप् मोड

सुप्तावस्था म्हणजे Sleep मोड शी सुसंगत् आहे जो Hibernation पेक्षा वेगळा आहे. (Hibernation व कंप्युटर् ची ती अवस्था संबंध आहे म्हणुन् तो शब्द आला असे मला वाटते.

मला विचाराल (कशाला विचाराल् म्हणा ;) ) तर तो शब्द तसाच् ठेवावा. जसे Oxford ने इतर भाषांतील्(प्रतिशब्द अस्तित्वात् नसलेले) शब्द् आत्मसात् केले तसे आपणही प्रत्येक वेळी (मोडके-तोडके) भाषांतर् करण्यापेक्षा तसाच् शब्द वापरावा.

सहमत

शक्य तोवर प्रचलित शब्द वापरा असे म्हणेन.

विश्रांती, सुप्तावस्था
या शब्दांशी सहमत. येक्दम बेष्ट कारण शाळेपासून गेलेला आहे!

(शीतनिद्रा तसा योग्य वाटत नाही... मग उन्हाळ्यात उष्णनिद्राही असते की काय असे वाटते. ;) )

आणि शब्दही मला नविन आहे.

आपला
गुंडोपंत

सहभाग

आंतरजालावरील मराठीसाठी
हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे असे वाटते.

यात आपण सामील झालो नाही तर नंतर, आंतरजालावरचे मराठी बेकार असते हो , ही बोंब ऐकुन घ्यावी लागेल. कारण यात सहभागी होण्याची संधी आपल्या सर्वांना मिळाली आहे.

यनावाला, वाचक्नवी, संजोपराव, नंदन, धनंजय, ऋषिकेश, सहजराव, विकास, प्रियाली, प्रकाश घाटपांडे, अदिती, तो ., प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, चित्तरंजन
आणि इतर सर्वच 'मराठी जागरूक' सदस्यांनो,
या प्रकल्पात सहभाग द्या!

सहभागी होणे अगदीच सोपे आहे - फक्त शंतनू ने दिलेल्या
दुव्यावर जा,
तुमचा जीमेल पत्ता द्या आणि
समोरच एक शब्दांचा तक्ता उलगडेल.

यात इंग्रजी शब्दांना सहजतेने मान्य होतील आणि चपखलतेने बसतील असे शब्द सुचवायचे आहेत.

बास्!

शब्द सुचवतांना हा शब्द कुठे वापरला जाणार आहे,
हे ही दिलेलेच आहे त्यामुळे शब्दाची पार्श्वभूमी समजायला अवघड जाऊ नये!

तेंव्हा या सगळे या!

कुणाला आपल्या पीढीने काय काम केले मराठीसाठी? असे विचारण्याची वेळ येवू देवू नका -
संधी आली आहे त्याचा फायदा घ्या!
न जाणो परत कधी सी डॅक आणि हे सगळे लोक परत एकत्र येतील?

शब्द सुचवतांना त्याचा दैनंदिन वापरात उपयोग होइल असेच सुचवा भो!
मी फाईल ला फाईल म्हणणेच पसंत करेन.
म्हणजे रेल्वेला आगगाडी किंवा रेल्वेच म्हणा,
अग्निशक्तीचलितलोहवाहन वगैरे म्हंटले तर काय कळणार?

आणि इतके करून एखादा शब्द न पटला, तर त्यावर चर्चाही करू या.
काय म्हणता?

आपला
मनापासून साद घालणारा,

गुंडोपंत

अजून

या आणि शब्दसंपदा या प्रकल्पात,

डॉ. निलिमा गुंडी, यास्मिन शेख यासरख्या व्यक्तींचा सहभाग असणे फार म्हणजे फार आवश्यक आहे.
कुणी त्यांना यात आणू शकेल का?

मला वाटते अंतर्नाद या मासिका द्वारे यास्मिन शेख यांच्या संपर्क साधता येईल.
परंतु निलिमा गुंडी यांचा संपर्क माहिती नाही.

आप्ल्याला काय करता येईल या विषयी?

आपला
गुंडोपंत

छान प्रकल्प

अत्यंत चांगला प्रकल्प
आधीच वाचला होता. मात्र कामामुळे वेळ देता येत नव्हता.. आतापर्यंत ६८ सुचवण्या टाकल्या आहेत.. त्यातील अनेकांवर इथे चर्चा करता येईलच. बाकी उर्वरीत शब्दांसाठी पुन्हा वेळ होताच सुचवण्या टाकेन

माझ्यापेक्षा श्री वाचक्नवी, श्री धनंजय यांसारख्या मराठी व संस्कृत दोन्ही भाषांमधील वाचन असणार्‍यांनी भर टाकावी ही विनंती

शंतनूराव,
या उत्तम प्रकल्पाबद्दल आभार आणि तो तडीस जाओ अश्या मनापासून शुभेच्छा

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

अंतिम यादी

सर्वसंमतीने प्रकाशित झालेली अंतिम यादी त्याच पानावर उपलब्ध आहे. मराठीतून सॉफ्टवेअर बनवताना शक्यतो हेच शब्द वापरावेत म्हणजे एकसूत्रता येईल.

http://tinyurl.com/m5qgh3

या चर्चेत भाग घेतलेल्यांचे आभार.

 
^ वर