वारांची नावे आणि ज्योतिषशास्त्र
वारांची नावे ह्या प्रियालीकृत चर्चेतला धोंडोपंत ह्यांचा प्रतिसाद इथे वेगळा लेख म्हणून देत आहोत. त्या प्रतिसादाला आलेले प्रतिसाद या लेखाच्या प्रतिसादांच्या रूपात दिलेले आहेत.
उपक्रम
......................
वारांची नावे हा विषय ज्योतिषशास्त्राचा आहे.
उदयात उदयं वारः !!
एका सूर्योदयापासून दुसर्या सूर्यदयापर्यंतच्या काळाला वार म्हणतात.
वार सात आहेत. जगात सर्वत्र वारांची नावे सारखीच आहेत आणि ती भारताने दिलेली आहेत.
आर्यभट्टांचे सूत्र आहे
आ मंदात शीघ्रपर्यंतम् होरेशा: !!
दिवसाचे होरे २४ असतात. होरा म्हणजे तास. प्रत्येक होरा एक एक ग्रहांचा असतो. सूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिलेले असते.
वरील सूत्राचा अर्थ असा की, आ मंदात... म्हणजे मंदगतीच्या ग्रहापासून ....शिघ्रपर्यंतम....शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत... होरेशा:... होरे सुरू असतात.
मंदग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत -- शनी, गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र.
शनीवारी पहिला होरा (एक तास) शनीचा, दुसरा गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथा रविचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन् वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा.....
इथे २४ तास पूर्ण झाले.
आता दुसरा दिवस सुरू होतो तो पुढील म्हणजे रविच्या होर्याने. म्हणून शनिवार नंतर रविवार येतो.
Comments
उपक्रम यांस विनंती
या प्रतिसादाचा लेख केल्याबद्दल आभार. तसेच मूळ चर्चेत या लेखाशी (तेथे प्रतिसादाशी) असहमती दर्शवणारा श्री. यनावाला यांचा माहितीपूर्ण उपप्रतिसाद आणि त्याखालील यनावालांच्या उपप्रतिसादाशी संबंधित उपप्रतिसादही येथे हलवता येतील काय?
धन्यवाद!
वारांच्या नांवा विषयी
वारांच्या नांवा विषयी
** ' गुरुवार' ला बृहस्पतिवार म्हटले जाते. कोकणात बेस्तरवार आणि ऐतवार (अनु.गुरु आणि रवि ) ही नांवे काही ठिकाणी रूढ आहेत.
** रामायणात तसेच महाभारत्तात कुठेही वार आणि राशी यांचे उल्लेख नाहीत. तिथी आणि नक्षत्रे आहेत.
** अलेक्झांडरने (सिकंदर) भारतावर स्वारी केली(इ.स.पू. ४थे शतक). तेव्हा वैदिक आणि ग्रीक संस्कृतींत देवाण घेवाण झाली. आपण वार आणि राशी या कल्पना पाश्चात्यांकडून घेतल्या. त्यानी दिली म्हणून आपणही वारांना ग्रहनामे दिली.
** आर्यभट हा इसवी सनाच्या ४थ्या शतकांतील. त्याने " वारांना नावे दिली;सात वारांची पद्धत रूढ केली " हे संभवतच नाही.
**समजा एखाद्याला दोन बायका आहेत. पहिली पासून तीन मुलगे झाले. त्यांची नांवे ठेवली धर्म,भीम, अर्जुन. दुसरीला दोन झाले ते नकुल ,सहदेव. आतां या पाच जणांचा महाभारतातील पाच पांडवांशी जेवढा संबंध आहे तेवढाच नाममात्र संबंध वारनामांचा आकाशातील ग्रहांशी आहे.ग्रहांची गती आणि वार यांचे परस्पर काही नाते नाही. त्यामुळे 'अंगारकी चतुर्थी', 'गुरुपुष्यामृत योग' इ.कल्पना निरर्थक आहेत.
यनावाला - महत्त्वाचा प्रतिसाद
आपण मांडलेल्या मुद्द्यांपैकी खालील दोन मुद्द्यांवर मी माहिती शोधत होते. पुरावा म्हणून पुढे करावा अशी माहिती मिळत नव्हती, म्हणून मूळ चर्चाप्रस्तावात तसे उल्लेख टाळले. अलेक्झांडरमुळे वैदिक आणि ग्रीक संस्कृतीत नेमकी कोणती देवाणघेवाण याबाबत अधिक माहिती कोणी पुरवू शकेल काय?
** रामायणात तसेच महाभारत्तात कुठेही वार आणि राशी यांचे उल्लेख नाहीत. तिथी आणि नक्षत्रे आहेत.
** अलेक्झांडरने (सिकंदर) भारतावर स्वारी केली(इ.स.पू. ४थे शतक). तेव्हा वैदिक आणि ग्रीक संस्कृतींत देवाण घेवाण झाली. आपण वार आणि राशी या कल्पना पाश्चात्यांकडून घेतल्या. त्यानी दिली म्हणून आपणही वारांना ग्रहनामे दिली.
अनेक धन्यवाद!
वारांची नावे
"भारतीय ज्योतिषशास्त्राचा इतिहास " हा शं.बा.दीक्षित लिखित ग्रंथ आहे. (इथे ज्योतिष हा शब्द 'खगोलशास्त्र' या अर्थी आहे.'फलज्योतिष'या अर्थी नव्हे).त्यांत वारांच्या उपपत्ती विषयी लिहिले आहे. "वार आणि राशी या संकल्पना आपणाकडे खाल्डियन (बहुधा इजिप्त) संस्कृतीतून आल्या "असे त्या ग्रंथात म्हटले आहे.
दिशा
यनावाला आणि प्रियाली,
तुम्ही लिहिलंत की अलेक्झँडर बरोबर आलेल्या ग्रीकांकडून आपल्याकडे वारांची नावं आली. हे उलट दिशेनी नसेल झालं ह्याबद्दल काही पुरावा आहे का? महाभारत आणि यवन आक्रमण ह्या मध्ये तसा बराच काळ गेला असावा.
ग्रीकांकडून भारताबद्दलची विधानं ह्यामध्ये मला स्ट्राबो चं लेखन आवडतं. हा स्वतः कधीच भारतात आला नाही, परंतू मेगास्थिनिस आणि इतर प्रवाशांच्या वर्णनावरून त्यानी छान वृत्त लिहिलं आहे.
एक माहितीपूर्ण दुवा इथे :
http://www.fordham.edu/halsall/ancient/strabo-geog-book15-india.html
स्ट्राबो
निदान माझ्याकडे तरी तसा पुरावा नाही (परंतु याचा अर्थ माझे वाचन अत्यल्प आहे असा घ्यावा म्हणूनच मी चर्चाप्रस्तावात हा विषय टाळत होते.) परंतु महाभारत आणि ग्रीक यांच्या दरम्यान जे ग्रंथ, नाटके लिहीली गेली त्यात वारांची नावे येतात का हे माहित करून घ्यायला हवे.
सर्वप्रथम स्ट्राबोच्या दुव्याबद्दल अनेक धन्यवाद. हा दुवा मी गेले कित्येक दिवस त्यातील डायोनायसिस आणि हेरॅक्लीसच्या निसा मुक्कामाबाबत शोधत होते, एकदा वाचला होता नंतर विसरून गेले, धन्यवाद! असो. हा दुवा वाचायला मला वेळ् लागेल तेव्हा फार बोलत नाही. परंतु मेगास्थिनीसवर मात्र पूर्ण विश्वास ठेवणे कठीण वाटते. त्याचा कल अलेक्झांडरचा प्रचार आणि गवगवा करणे याकडे थोडा अधिक होता असे वाटते. स्ट्राबोही प्रत्यक्ष भौगोलिक परिमाणांपेक्षा होमरवर जरा अधिकच अवलंबून होता असे वाटते. अलेक्झांडरबद्दल प्रभावी लिखाण जे जमेस धरले जाते ते केवळ प्लुटार्क आणि एरियन यांचे. (अर्थात, एरियनही मेगास्थिनीसला ग्राह्य धरतो आणि स्ट्राबोचे महत्त्व कमी नाहीच, अनेक धन्यवाद)
मला यात खोलवर फारसे माहित नाही, मागे कधीतरी वाचलेले ज्ञान आहे एवढेच. तेव्हा चू भू दे घे.
हा लेख केवळ भारताबद्दल
प्रियाली,
स्ट्राबोचा निदान हा लेख तरी केवळ त्यातल्या भारताबद्दलच्या माहितीच्या बाबतीत उत्कृष्ट वाटला होता. त्यात अलक्षेंद्राबद्दल थोडी माहिती आहे, पण तो त्याचा रोख नाही. विषेषतः प्रकरण ५९ मध्ये त्याचं तात्कालीन ब्राह्मणांबद्दलचं विधान वैचित्र्यपूर्ण आहे. त्याच बरोबर तो "गार्मान" अशा एका जमातिचं वर्णन करतो ते कोण होते कळत नाही. वर्णनावरूनतरी ते कदाचित ह्रषी (शुद्धलेकन - ह्रषी मधला ह्र नीट कसा उमटवायचा कळत नाही) असतील असे वाटते.
तुम्हाला अलक्षेंद्राच्या भारतीय आक्रमणाविषयी माहिती हवी होती कि एकंदर प्राचीन ग्रीकांनी भारताबद्दल काय लिहिलय ही माहिती हवी होती? भौगोलिक लेखांमध्ये रोमन पंडित टॉलेमीचं भारताबद्दलचं लिखाण बरंच आहे.
खिरे
कोणतीही माहिती
खिरे
मला खरतरं कोणतीही माहिती चालण्यासारखी आहे म्हणूनच मी स्ट्राबोही वाचेनच. सध्या मी अलेक्झांडर वाचत असल्याने वर तसे लिहीले. (गोंधळ झाला असल्यास क्षमस्व!) स्ट्राबोप्रमाणे इंडिका नावाच्या प्राचीन ग्रंथातही अशी माहिती आढळते परंतु तो बहुधा आता उपलब्ध नाही असे वाटते.
हा दुवा वाचलाच पाहिजे.
अपभ्रंश, माझा नाही
सर्किटराव,
अलक्षेंद्र हा केवळ ऍलेक्झँडर ह्या नावाचा अपभ्रंष आहे. आता असं बघा, जेंव्हा आपण इंग्रजीत बोलतो, तेंव्हा आपण भारताला इंडिया ह्या नावाने संबोधतो, मग तेंव्हा हे विशेषनाम आहे म्हणून आपण अमेरिकेतल्या लोकांना इंडिया नाही भारत म्हणा असा आग्रह धरतो का? जगातले अनेक लोक त्याला सिकंदर ह्या नावाने ओळखतात, मग त्यांनी पण ते नाव सोडावं का?
आपल्या भाषेला सोयिस्कर असं नाव वापरायला मला काही हरकत वाटत नाही. शिवाय हे नाव मी दिलेलं नाहिये - आर्य चाणक्याने सुद्धा ह्याच नावाने त्याला संबोधलय, मला ते जास्त सहाजिक वाटतं म्हणून मी ते वापरलं. तेंव्हा हा मुद्दाम केलेला खोडसाळपणा नाही, नुस्ता परिपूर्ण सांस्कृतिक वारसा आहे.
अलक्षेन्द्र
अलेक्झांडरचे 'अलक्षेन्द्र' हे चांगले भारतीकरण आहे. लेखक ह. ना. आपटे यांच्या 'चंद्रगुप्त मौर्य ' कादंबरीत अलेक्झांडरला "अलिक्सुंदर" आणि त्याचा सेनापती सेल्युकस निकेटरला "सलूक्षस निकत्तर" असे म्हटले आहे. सॉक्रेटिसला हिंदीत सकलान (की असेच काहीसे) म्हणतात.
सुक्रात व अफलातून
हिंदी/उर्दू/अरबी इ. मध्ये सॉक्रेटिसला सुकरात/सुक्रात आणि प्लेटोला अफलातून म्हणतात.
- दिगम्भा
अफलातून!!
अफलातूनचे मूळ वाचून कमाल वाटली. माहितीबद्दल आभार, दिगम्भा.
अलक्षेंद्र/ अलेक्झांड्रोस
सर्केश्वर, (बघा आंम्हीही सर्किटचे सर्केश्वर करतोच नाही का? ह. घ्या.)
खेद कसला? अलक्षेंद्र हे भारतीयकरण खूप प्रसिद्ध आहे. मला वाटते चंद्रप्रकाश द्विवेदींच्या चाणक्यमध्येही हे नाव वापरले गेले आहे. फार्शीतून हिंदू आणि ग्रीकांनी सिंधुचे -इंडु-इंडस केले (ग्रीकमध्ये "ह" उच्चार नाही असे वाटते. H=इटा) आणि ते इंडस, इंडिया, हिंदू आपण आजही आपल्यासाठी वापरतो आणि म्हणतो "गर्वसे कहो हम हिंदू है|" त्यात किती खेद लपला आहे तो पहा.
असो, तत्कालिन लोक आपल्या भाषांतील आणि उच्चारांतील त्रुटींसहित शब्द स्वीकारत असत. जर, चंद्रगुप्ताचे सँडोकस होते. (खूप मागे पहिल्यांदा अलेक्झांडर वाचला तेव्हा हे श्री.सँडोकस कोण ते मला बराचवेळ कळले नव्हते.) तर अलेक्झांडरचे अलक्षेंद्र का नाही. (म्हणजे आपल्या लोकांनी मागे का रहायचे?) खिरेंनी सहजच तो शब्द वापरला होता असे वाटते तो कायम व्हावा असे त्यांचे म्हणणे नसावेच. :)
असो. अलेग्झांडर नाही हो. :( अलेक्झांडर, त्यात ग्रीक xi क्साई येतो. Ἀλέξανδρος असा.गॅमा नाही. मूळ ग्रीकमध्ये त्याला अलेक्झांड्रोस असे म्हणतात. अलेक्झांडर हे कालांतराने पडलेले नाव आहे.
कापसाला सिंडॉन
ग्रीक भाषेत कापसाला सिंडॉन म्हणायचे असे इतिहासाच्या पुस्तकांत वाचल्याचे आठवले.
माझे बाळबोध मत
फार्शीतून हिंदू आणि ग्रीकांनी सिंधुचे -इंडु-इंडस केले (ग्रीकमध्ये "ह" उच्चार नाही असे वाटते. H=इटा) आणि ते इंडस, इंडिया, हिंदू आपण आजही आपल्यासाठी वापरतो
तुझ्या ज्ञानभांडाराबाबत पुरेपुर आदर बाळगून प्रियाली मी असे म्हणेन की काही भारतीय भाषांमध्ये यशवंतचे जसवंत, चालो चे हालो, यशोदा चे जसोदा, यमुनाचे जमना, सांजे चे हांजे, सप्ताहचे हप्ता असे होते, त्याच प्रमाणे सिंधुच्या तीरावर राहणारे ते हिंदु झाले.
प्रतिपादनात चूक झाली असेल कान पकडून उठाबशा काढायला सिद्ध असणारा,
आपला कृपाभिलाषी,
ऋजु
आकाशदर्शन ऍट्लास पुस्तक
अवांतर : साधारण तीस वर्षांपूर्वी "गो. रा. परांजपे" ह्यांनी लिहीलेलं "आकाशदर्शन ऍट्लास् - अर्थात हा तारा कोणता" हे पुस्तक मी खूप वापरलं आणि मला ते खूप आवडायचं. ते अजुनही उपलब्ध आहे का? ह्या पुस्तकाचं वैशिश्ठ्य म्हणजे ह्यात सर्व तार्यांची आणि नक्षत्रांची मोठ मोठ्या नकाशांसह मराठी नावं दिली होती. अशी माहिती असलेलं कुठलं इतर पुस्तक कुणाच्या बघण्यात आलं आहे का? असल्यास असं पुस्तक इथे अमेरिकेत कसं विकत घेता येईल?
सात वार
**सात वार स्वाभाविक नाहीत. ते मनःकल्पित (आर्बिट्ररी) आहेत.कोणत्याही नैसर्गिक घटनेचे आवर्तन सात दिवसांनी होते आहे असे सहजतेने दिसत नाही.(तिथी दृश्य म्हणून स्वाभाविक आहेत.)
वार सहा अथवा दहा असते तरी अंगवळणी पडले असते.
** महाभारतात इतक्या घटना आहेत की त्याकाळी वार रूढ असते तर महाभारतात वारांचा उल्लेख निश्चित आला असता.
** बायबलानुसार ईश्वराने सहा दिवसांत सृष्टी निर्माण केली आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली."रविवारी काम करू नये.करणारा आढळल्यास त्याला शिक्षा करावी" अशी जुन्या ( किंवा नव्या )करारात धर्माज्ञा आहे.
**आपले सर्व सण तिथींशी निगडित आहेत.वाराशी एकही नाही.ख्रिस्तिधर्मीय ईस्टर,गुड फ्रायडे हे सण वारांशी जोडले आहेत.
**आपल्याकडे इ.स.च्या ४थ्या शतकातील एका ताम्रपटावर वाराचे नाव लिहिले आहे. त्यापेक्षा जुना लेखी पुरावा सापडत नाही.(शं. बा. दीक्षितकृत भारतीय ज्योतिष शास्त्राचा इतिहास)
माहितीपूर्ण
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण प्रतिसाद.
खरंतर कामाचा दिवस व सुटीचा दिवस असे दोनच प्रकारचे वार आहेत.