नामस्मरणाची ताकद व चमत्कार.

नामस्मरणाची ताकद व चमत्कार.

“तुम्ही फक्त नाम घ्या बाकी सारे मी बघतो”
श्री महाराज (सदगुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज)

श्री महाराजांचे चरित्रात व प्रवचनातून वरिल बोधवाक्य अनेकवार वाचले होते पण त्याची प्रचिती कालच पाहिली त्याबत थोडस लिहाव असं मनात आल म्हणून ……

ज्याचेबाबत हे लिहावयाचे आहे त्याचे नांव वगळून थोडक्यात….

माझा एक मावसभाउ आहे वय साधारण ४६, तो मुंबईत एका सहकारी बॅंकेत नोकरिला होता, राहला स्वतःची जागा होती, पण पहिल्यापासून आवड राम नामची. श्री महाराजांचा अनुग्रहित. पत्नी व एक लहान मुलगा असा परिवार. बॅंकेच्या नोकरित मन रमत नव्हतं म्हणून १९९६ साली पत्निला पत्नीला एक दिवस सांगितल कि माझी इच्छा फक्त रामनाम घेण्याची आहे माझ मन नोकरित रमत नाही मला अस वाटतं कि जर आपण आपल्या गांवी जाउन राहिलो तर आपली एक एकराची छोटीशी नारळ – पोफळीची बाग आहे आपल्याला चैनीत राहता येणार नाही पण अन्नाला कमी पडणार नाही. माझी इच्छा आहे कि आपण तेथे जाउन रहावे पण तुझी परवानी मनापासून असेल तरच आपण हा निर्णय घेउया. तेथे गेल्यावर मी पैसे मिळवण्यासाठी नोकरि वगैरे काहि करणार नाही. तुला दुध काढण्यापासून सारे करावे लागेल मी बागेत जरुपुरतेच लक्ष घालिन. तू शांतपणे पुर्ण विचार करुन तुझा निर्णय सांग माझी कोणतिहि जबरदस्ती नाही. पत्नीचे बालपणापासूनचे सारे आयुष्य मुंबईतच गेलेले पण ती तयार झाली आणि हा सदगॄहस्थ बॅंकेतिल १०-१२ वर्ष झालेली नोकरि सोडून गावी (एक छोटस तालुक्याचे ठिकाण आहे) पत्नी मुलासह गांवी निघून आला. घरि आधिच आई-वडिल होतेच त्यात या तिघांचे आगमन झाले. आर्थिकस्थीति बेतासबात पण त्याचे कोणालाच वैषम्य नाही. चेह-यावर सदैव समाधान. आल्यागेल्याचे अगदि अगत्याने करणार आणि त्यामुळे घरि कायमच पाहूण्यांची ये – जा चालूच आलेल्या प्रत्येकालाच जाताना जड जावे त्यामुळे तो परत परत येणार. त्या घरि गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान प्रत्येकालाच वाटतं.

१९९६ ते २००२ पर्यंत “श्रीराम जयराम जय जय राम” या मंत्राचा माळेवर मोजून केलेला एक कोटीचा जप झाला. २००२ साली गोंदवल्यात जाउन १३ कोटी जपाचा संकल्प सोडला पुर्वीचा एक कोटी जप रामर्पण केला. तेथपासून २१ जून २००९ पर्यंत नविन दोन कोटी जप माळेवर करुन झाला. हा जप करणा-याना माहित आहेच कि एक तासात ३ हजार जप होतो. प्रपंचात राहून जप करणे किती कठि़ण असतं हे वेगळ सांगायला नको.

काल दुपारी जेवायला घरि आलो व जेवल्यावर नेहमीप्रमाणे थोडावेळ वामकुक्षी घेत होतो तोच भ्रमणध्वनी वाजला माझ्या त्याच गावातिल एका समाधानी ग्राहकाने सांगितले कि नुकताच त्याचा एक व्यवहार झाला आहे व काहि रक्कम दिर्घ मुदतिसाठी गुंतवावयाची आहे त्यासंबंधी त्याला माझेशी सल्लामसलत करुन निर्णय घ्यावयाचा होता कालची सायंकाळ मोकळीच होती म्हणून लगेच भेटावयाचे ठरले. माझ आफिसचे काम उरकून मी मार्गस्थ झालो सायंकाळी ५ ते ८ पर्यंत कामाची चर्चा आटोपली. त्याच गावात माझा तो मावसभाउ रहात असल्यामुळे व त्याचेकडे ६ महिन्यात गेलेलो नसल्यामुळे मिटिंगनंतर त्याचे घरि गेलो भोजन वगैरे आटोपल्यावर गप्पा मारत बसलो होतो.

माझ्या मावसभावाचा मुलगा यंदाच १० वी पास झाला होता तेव्हा त्याचे फोनवर अभिनंदन करताना मी त्याला विचारले होते की कॉलज प्रवेशावेळी तुला काही मदत हवी असली तर निःसंकोचपणे सांग तेव्हा तो म्हणाला होता कि नकोय सोय झालेली आहे आत्ता फोनवर सांगत नाही तू प्रत्यक्ष आल्यावर सांगतो. अर्थात काल तो विषय निघाला. आम्ही दोघे मावसभाऊ व गुरुबंधू आणि एक वेगळीच नाळ जुळलेली असल्यामुळे आमच्यात नेहमिच मोकळेपणाने चर्चा होते. मी त्याला विचारले आता सांग तुला मुलाचे कॉलज प्रवेशावेळी जवळपास १५ हजार रुपये लागले तसेच यापुढे त्याचे रहाणे जेवणे वगैरेसाठी दर महा ३ हजार रुपये खर्च येणार आहे तुला हे कस काय जमणार कारण तुला नियमित असे काहिच उत्पन्न नाही त्यानंतर त्याने जे सांगितले ते त्याच्याच शब्दातः

काय सांगु तुला महाराजांची लिला अगाध आहे थांब त्यानी काय चमत्कार केला ते तुला दाखवतोच असे म्हणून त्याने एक चिठी माझ्या कडे दिली व म्हणाला वाच. चिठीत लिहिले होते कि सोबत काहि रक्कम रामनाम घेत असतानासुध्दा काहि वेळा पैशाची गरज हि लागतेच म्हणून पाठवली आहे कॄपया त्याचा स्वीकार करावा. अरे एक दिवस सकाळिच माझे दारात एक गॄहस्थ माझीच चौकशी करत हजर झाले व नागपूरहून श्री ….. यानी हि चिठी तुम्हाला दिली आहे असे म्हणून एक उघडे पाकिट माझ्या हातात दिले ते मी तू आत्ता बसलायस त्याच झोपाळ्यावर ठेवले व त्यांचेशी बोलता बोलता घरभर फिरत फिरत माडिवर महारांजाची खोली दाखवून खाली आलो तर आई म्हणाली अरे त्या पाकिटात बघितलस का ५ हजार रुपये आहेत मी त्या गॄहस्थाना विचारले तुम्हाला माहित आहे का तर ते म्हणाले हो आणि चहापाणी घेउन ते गॄहस्थ निघून गेले. त्यानंतर एक मनी आर्डरची पावती त्याने माझेकडे दिली एका अन्य व्यक्तिने ३ हजार रुपये पाठविले होते. आता हे दोघेह तसे अपरिचित त्यानी हे असे ८ हजार दिले, मे महिन्यात हिची बहिण १५ दिवस आली होती तिने जाताना मुलाला ५ हजार दिले होते आणि ८ दिवसापूर्वीच आमचे शेजारी पुर्वी नोकरीनिमित्त रहाणारि व्यक्ति ८ दिवस आमचेकडे रहायला आली होती तिने जाताना अडिच हजार मुलाचे हातात दिले. या सगळ्यात मिळून मुलाचे कॉलेज प्रवेशाचे भागले. आणि पुढे ऐक परवा मुलाची नविन गावी सर्व व्यवस्था करुन आलो आणि सास-यांचा फोन आला तुमचा मुलगा तो माझा नातू आहे व त्याचेसाठी मला काहितरि करायचे आहे तेव्हा मी जिवंत असेपर्यंत त्याचे खर्चासाठी मी दरमहा ३ हजार रुपये पाठवणार आहे तेव्हा नाहि म्हणू नका.

आणि मी काहि क्षण पुतळा झालो अंगावर रोमांच उभे राहिले श्री महाराजानी वर पहिलेच लिहिलेले वचन असे पाळले होते.

यात एक संकेत म्हणून कोणाचाच नामोल्लेख केलेला नाही आवडत्या नामाचा एक विलक्षण अनुभव म्हणून फक्त येथे लिहिला.

Comments

रसपुर्ण

अनुभव रसपुर्ण आहे. मात्र याची संगती लावणे मला अंमळ कठीण वाटले.

मात्र मनापासून असलेल्या श्रद्धेमुळे अनेक चमत्कृतीपूर्ण गोष्टी घडलेल्या माहिती आहेत.

काही वेळा पॅरॅलिसीस सारख्या विकाराने गलितगात्र असलेले लोक निव्वळ स्वतःवरील विश्वास आणि जीवनेच्छा या बळावर चालू लागल्याचीही उदाहरणे माहिती आहेत.
त्यात 'जीवनेच्छा' आणि मला या संकटातून बाहेर पडावयाचे आहे ही आत्मिक इच्छा या गोष्टींची संगती लागल्याने; आधुनिक वैद्यक शास्त्राने, 'आता बरे होणे अशक्य' म्हणून सोडले असतांना हे लोक चालू लागले.

तसे कोणते तर्क येथे मांडले जातील याची मला कल्पना नाही.

मात्र संपूर्ण श्रद्धेने जेंव्हा गोष्टी केल्या तेंव्हा फळ मिळते हे निश्चित.

आपला
गुंडोपंत

श्रीराम

आपले प्रतिपादन बरोबर आहे. याव्यक्तिची आत्यंतिक श्रध्दा हे एक कारण तसेच याचे वर्णन मकरंद बुवा रामदासी यानी अनेक ठीकाणी किर्तनातून केले (त्या गावांत येणारे सर्वच किर्तनकार, प्रवचनकार तसेच सतपुरुष याचे घरिच उतरत असतात).

सदानंद ठाकूर
आम्हाला येथे भेट द्या http://www.mutualfundconsultantindia.com

कारण

याचे वर्णन मकरंद बुवा रामदासी यानी अनेक ठीकाणी किर्तनातून केले (त्या गावांत येणारे सर्वच किर्तनकार, प्रवचनकार तसेच सतपुरुष याचे घरिच उतरत असतात).

हेच बहुधा कारण असावे.

कारण

मकरंद बुवा रामदासी गेले अनेक वर्ष हे सांगत आहेत पण पैसे वेळेला व कोणाकडे न मागता आले याला महत्व आहे. याने कधीहि कोणाकडे काहि मागितलेले नाहि व तक्रारहि केलेली नाही. गरजा कमीत कमी करुन राहण्यासाठी सुध्दा नैतिक धैर्य असावेच लागते.
आणि भिक तर सोडाच मदतहि कोणाकडे कधी मागितलेली नाही.
सदानंद ठाकूर
मराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा
http://www.mutualfundconsultantindia.com

असेल माझा हरी...

पत्नी व मुलांची जबाबदारी टाळून, स्वकष्टाने पैसे मिळवणे शक्य असूनही नोकरी सोडून नामजपासारख्या अनप्रॉडक्टिव उद्योगात आयुष्य व्यतीत करणे आणि वर लोकांच्या दयेवर (खरेतर भीकेवर) स्वतःच्या मुलांची शिक्षणे झाली हे परमेश्वरकृपेचे उदाहरण म्हणून अभिमानाने सांगणे ही आत्मवंचना आहे. असे आदर्श आपण सामान्य लोकांसमोर ठेवणार का?

विनायक

आस्तिक - नास्तिक

आस्तिक - नास्तिक वाद चार्वाक पासून चालू आहे आणि तो कयमच चालू रहाणार आहे.
व्यक्ति तीतक्या प्रवृत्ती व प्रकृती पण आपले जीवन कसे जगावे हे निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे व तो आपण नाकारु शकत नाही.
प्रामाणिकपणे व नितीमत्तेने वागणारा मग तो आस्तिक असो अथवा नास्तिक समजात असणे आवश्यक आहे व गरजेचेहि आहे.
नेहमी पापाचरण करणारा देव पुजा जरा जास्तच करतो असे लोक समाजाला बोजा असावेत.
नीतीने जगणा-याबद्दल समाजात नेहमीच आदरयुक्त आकर्षण असतं.
सदानंद ठाकूर
मराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा
http://www.mutualfundconsultantindia.com

चालायचच

आस्तिक - नास्तिक वाद चार्वाक पासून चालू आहे आणि तो कयमच चालू रहाणार आहे.

आतापर्यंत तरी चालू आहे

व्यक्ति तीतक्या प्रवृत्ती व प्रकृती पण आपले जीवन कसे जगावे हे निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे व तो आपण नाकारु शकत नाही.

मान्य. पण इतरांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्या मताशी सहमती / असहमती असु शकते.फक्त काही वेळा मत व्यक्त करताना तर्कशुद्धता/तर्ककर्कशता येते

प्रामाणिकपणे व नितीमत्तेने वागणारा मग तो आस्तिक असो अथवा नास्तिक समजात असणे आवश्यक आहे व गरजेचेहि आहे.

मान्य आहे. तितकेच अप्रामाणिकपणे व अनितीने जगणारे( सर्व सापेक्ष) लोक असणेहे स्वाभाविक आहे.

नेहमी पापाचरण करणारा देव पुजा जरा जास्तच करतो असे लोक समाजाला बोजा असावेत.

पापात देवालाही त्याला सामील करुन घ्यायचे असावे.

नीतीने जगणा-याबद्दल समाजात नेहमीच आदरयुक्त आकर्षण असतं.

काहींना असुया देखील असते. नीतीने जगणारा खरेच नीतीने जगतो आहे का? याबद्दल शंका सुद्धा असते.
प्रकाश घाटपांडे

छ्या!

जबाबदारी टाळून?
झंड.
म्हणे टाळुन. स्वेछेने गेले दोघं असे लिहिले आहे ना?
भीक?
देणार्‍याला द्यायची गरज वाटते, ती हे भागवतात. ते भीक मागायला गेले नव्हते. त्यामुळे त्यांना भिकार्‍यांच्या पंक्तीत बसवणे हे असंस्कृत पनाचे लक्षण आहे.
आणि निदान त्यांना जाणीव तरी आहे की हे पैसे म्हण्जे आपले कर्तृत्व नाही. त्याचे श्रेय ते स्वतः घेत नाहीयेत. त्यात काहीच चुक नाही. ते नामाला श्रेय नाही देनार तर काय बैंकेतल्या सोडलेल्या नोकरीला देनार? का तुम्हाला आम्हाला देणार. अर्थात ते ज्यांनी पैसे दिले आहेत त्यांच्या बद्दल कृतज्ञ असतील ही. (नसतील असे वाटत नाही.)
नामजप अनप्रॉडक्टिव?
गाढवाला वाटत असेल की मी राब राब राबल्याशिवाय मला मालकाकडुन खायला मिळणार नाही. प्रत्यक्षात तसे नसते. ज्याने चोच दिली तो चारा देतो असे लोक म्हणतात (निदान मागच्या चार पिढ्या म्हणताना मी ऐकले आहे.) परंपरागत ज्ञानापेक्षा जास्त किंवा त्याऊलट अशि माहीती कुणाला असु शकते याची शक्यता कमी. सबब, त्याविरोधात असलेले म्हणने गृहितक म्हणुन घेण्याअगोदर थोडा विचार करावा लागतो.

तुम्ही आम्ही किंवा कुणीही काम करतो, त्याचे प्रोडक्ट कशासाठी वापरतो? आहार निद्रा भय मैथुना साठी, इंद्रिय तृप्तीसाठी, अहंकार (+उरलेले ५ ) वगेरे सांभाळण्यासाठी.
प्रस्तुत गृहस्थाला हे करायचे नाहीये. तो जे करतोय (नामजप) त्यातुन त्याला आवश्यक ते प्रोडक्ट मिळत असेल तर तुमचा विरोध नसावा.
मिळत आहे कि नाही हे पोस्ट करनारे गृहस्थ सांगतील.
पण त्यांचे वैयक्तिक मत 'हेच प्रोडक्ट मिळवायचे' असे असावे की नसावे याबाबत आपला आग्रह नसावा.

आत्मवंचना?
ती कशी बुवा? ठोस पणे तसे वाटत असेल. नसतील फसवत ते स्वत:ला. निदान जाणुन बुजुन तरी.
नकळत आत्मवंचना की काय? म्हनजे त्यांना जे वाटतय ते चुकीचे आहे असे आपल्याला म्हनायचे असेल. तर त्यासाठी पुरावा द्यावा लागेल की ते चुकीचंय म्हणुन. कारण हा त्यांचा अनुभव आहे. त्यांना तसेच वाटनार. ते चुकीचे आहे हे पटवुन द्यावे लागेल ना पहिले. तुम्हाला नसेल तसा अनुभव. तुम्ही नका म्हणु तसे. पण त्यांनी म्हणने म्हणजे स्वतःला फसविणे कसे??

त्यांचा हरी असेल आनि खाटल्यावर देतही असेल. हा अनुभव आहे. त्याला खोटे पाडत बसले, तरी १००० दुसरे अनुभवी असतील.

अवांतरः

श्रीवास ठाकुर नावाचे आणखीन एक नामजप करणारे वैष्णव

ते गृहस्थ होते. आनि सादोदित नामसंकीर्तना त रमले असायचे. त्यांच्या घरी कीर्तनानंदींचा मेळा भरलेला असायचा. त्यांच्या प्रसादाची व्यवस्था नेहमीच उत्तम असायची. एकदा कुणाला तरी प्रश्न पडला तेंवा कळाले की त्यांना त्यांचा हरी खाटल्यावर द्यायचा.
-----------

हं!

सहमत आहे!

आपला
गुंडोपंत

हरी

असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी
खाटल्यावरील माणसाला हे माहित असते कि त्याला काहीतरी देणे ही हरीची गरज आहे.
प्रकाश घाटपांडे

अपारदर्शक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.सदानंद ठाकूर यांनी जे लिहिले आहे त्यात त्यांच्या मावसबंधूंचे नाव, गाव, पत्ता या सर्व गोष्टी का नाहीत? लिहिलेले सर्व जर खरे असेल तर या गोष्टी स्पष्टपणे सांगायला कोणता प्रत्यवाय? समजा मला त्यांचे दर्शन ध्यायचे आहे तर कसे घ्यावे? अथवा पत्राद्वारे मार्गदर्शनाची विनंती करायची आहे तर कोणत्या पत्त्यावर लिहावे?

अपारदर्शक

नाव पत्ता न देण्याचे कारण मला त्या माणसाचा डांगोरा पिटावयाचा नव्हता त्याला अन्यवेळी कोणाचे मदतिची गरजहि नाही. जाहिरात बाजी त्या व्यक्तिलाही आवडणार नाही. पण तुम्हाला जर खरोखर त्याला भेटावे असे वाटत असेल तर जरुर तुम्हाला मी नांव, पत्ता व फोन नंबरही कळविन जरुर खात्री करा व प्रत्यक्ष भेटून तुमचे मतहि जाहिरपणे सांगा.
कोणी आस्तिक असावे किंवा नास्तिक हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. माझे लेखावर जरुर टिका करावी विचार स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे.
मला जे चांगले वाटले ते मी लिहिले याउप्पर मर्जी ज्याची त्याची.

माझे वेबसाइट वर माझा संपर्काचा तपशिल दिलेला आहे फोन अथवा इमेलने संपर्क साधू शकता.
सदानंद ठाकूर
मराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा
http://www.mutualfundconsultantindia.com

बकवास

श्रद्धा हा वैयक्तिक विषय असला तरी ४६ हे काही पूर्णपणे नामस्मरणाला वाहून घेण्याचे वय नव्हे. ४६ व्या वर्षी जर नोकरीत मन रमत नसेल तर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचाराची गरज आहे. गावी गेल्यानंतर मी काही करणार नाही हे जो माणूस आधीच जाणतो, त्याला क्लिनिकल डिप्रेशन आले असणे शक्य आहे.
त्या घरि गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान प्रत्येकालाच वाटतं.
असली बिनबुडाची वाक्ये हे सगळ्या अध्यात्मप्रेमींचे वैशिष्ट्यच आहे. वेगळ्या प्रकारचे म्हणजे कसले समाधान? उन्हातून घरी परत आल्यावर माठातले पाणी पिताना मिळते तसले? खूप भूक लागली असताना दहीपोहे खाताना मिळते तसले? लैंगिक संबंधातून मिळते तसले?
'वेगळेच समाधान', 'दारिद्र्यातही अपार सुखाचा अनुभव', 'शब्दांत सांगता न येण्यासारखी शांती' असल्या पडताळा घेता न येण्यासारख्या शब्दबुडबुड्यांवर अध्यात्माचे तण फोफावले आहे.
जर महाराजांची लीला अगाध आहे, तर दहावी पास झालेल्या त्या मुलाला पुढील शिक्षण देण्याची गरज का भासावी? त्याला दहावीनंतरच नामस्मरणाच्या तालमीत टाकले असते तर त्यालाही महिना दहा पंधरा हजार रुपये महाराजांच्या कृपेने मिळाले असतेच की.
लेखात उल्लेख केलेल्या मुलाच्या मावशीने व आजोबांनी त्या मुलाच्या शिक्षणाला मदत केली आहे. या मुलाच्या वडीलांनी 'मी आता काहीही करणार नाही' अशी घोषणा केली असल्याने नातेवाईकांनी मदत करणे साहजिकच आहे. याचे श्रेय नामस्मरणाला कशासाठी?
'ऐहिकतेच्या मागे लागू नका, पारलौकिक सुख हेच महत्वाचे. संसार हा असार भवसागर आहे, नामस्मरण, जपजाप्य यांच्या वल्ह्यांनी वल्हवत तो पार करायचा आहे' असल्या बकवास तत्वज्ञानाने मराठी माणसाचे अपरिमित नुकसान झाले आहे. असले लेख लिहून भाबड्या मनाच्या मराठीजनाना आणखी खाली ढकलू नये.

सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोति मे!

थ्री चीअर्स

अप्रतिम प्रतिसाद श्री. सन्जोप राव.

थ्री चीअर्स फॉर यू.
चन्द्रशेखर

दुर्दैवी

अरेरे! श्री. सन्जोप राव यांचा

अतिशय दुर्दैवी प्रतिसाद!

आपला
गुंडोपंत

का?

का म्हणून?

रावसाहेब नमस्कार

तुमचे प्रतिपादन अगदि खरे आहे ४६ हे वय या गोष्टी करण्याचे खचितच नाही. मग या गोष्टी करण्याचे वय काय हेहि सांगितलेत तर आणखी बरे होइल अन्य जनाना फायदा होइल.
ज्याप्रमाणे शेअर बाजारात गुंतवणूक करावयाची असेल तर केव्हाहि पण नियमितपणे करावी अगदि थोडि थोडि का होइना, दिर्घ मुदतित फायदाच होतो. इथे असे म्हणतात कि बाजारात मंदि आली कि मी गुंतवणूक करेन तो कधीच गुंतवणूक करित नसतो. असो विषय हा नव्हे. त्याचप्रमाणे ज्याला भगवंताचे नाम घ्यावयाचे आहे त्याला वयाचेच काय कसलेच बंधन नसते.
काहो संत ज्ञानेश्वरानी वयाच्या १६ व्या वर्षी श्री ज्ञानेश्वरी लिहिली ते त्यांचे वय होते काय? त्यानी समाधि २१ व्या वर्षी घेतली हे तरि वय होते काय. हे सुध्दा थोतांड आहे असे म्हणावयाचे असेल तर विषयच संपला. कारण कोणी असेहि म्हणू शकेल ज्ञानेश्वरांबाबत जे आहे तेही सारे खोटेच आहे किंवा ते अस्तित्वातच नव्हते असेहि काहि म्हणू शकतिल.
माझा एक मित्र आहे कोणती चर्चा सुरु झाली व त्याचे मुद्दे संपले कि तो म्हणतो तुम्ही काहिहि सांगितलेत तरि मला पटणारच नाही मग चर्चा करायचीच कशाला. मला खात्री तुम्हि त्याचेसारखे नाहित कारण तुम्हि हुषार आहात तुमचे लेखातूनहि ती प्रतिपादित झालेली आहे.
साहेब तुम्हाला एक सांगतो सगळ्याच गोष्टी तर्कावर घासून नाही घेता येत अनेक थोर व ब्रिलीयंट व्यक्तिनीही हे मान्य केले आहे. एकाला जे अनुभव येतिल ते तसेच दुस-याला येतिल असेही नाही.

समाधानाचे मोजमाप हे ज्याने त्याने त्याचे आवडिनुसार करावे. दारुड्याला दारु पिण्यात, जुगा-याला जुगार खेळण्यात, दुस-याला मदत करणा-याला मदत करण्यात व नाम घेणा-याला नाम घेण्यात समाधान मिळते. चांगले काय व वाइट काय हे समाज ठरवतो.

मुलाला दहावी नंतर शिकवण्याची गरज आहे कारण त्याचे आयुष्य हे त्याचे स्वतःचे आहे. त्याने नाम घ्यावे कि न घ्यावे हा त्याचा प्रश्न आहे व त्याला पुढे शिकण्यात रस आहे म्हणून त्याला नामाच्या तालमित घेतले नाही. दुसरी गोष्ट नातेवाईकानी अथवा दुस-या कोणी मदत करावी अशी अपेक्षा माझे मावस भावाची अजिबात नव्हती. कोणत्याही उद्देशाने नाही मात्र वस्तूस्थिती लिहिणे गरजेचे वाटल्याने लेखात न लिहिलेली हकिगत सांगतो. त्याची एक नारळ पोफळिची छोटी बाग आहे हा उल्लेख केलेला आहे याचे उत्पन्न वर्षातून ४ -५ वेळा मिळते तो ज्या व्यापा-याला नारळ सुपारि देतो त्याला त्याने विचारले होते कि तू मला दर महा पैसे देशिल का? व माझे हिशेबातून ते तू कापुन घेशिल का? मग माझीच काय होयची ती ओढाताण होइल व त्याला माझी व पत्नीचीहि मानसिक तयारी आहे. त्याला त्या व्यापा-यानेही तयारि दाखवली होती. हा विषय मला वाढवावयाचा नाही.

आता मराठी माणसाचे नुकसानी बाबत तर नामस्मरणापेक्षा अन्य गोष्टीनेच त्याचे जास्त नुकसान झाले आहे ते सर्वज्ञात असल्यामुळे त्यावर जास्त लिहण्याची गरज नाही.

तुम्ही सुज्ञ आहात चारिबाजुने विचार कराल व विचाअंती मत बनवाल याची मला खात्री आहे.

सदानंद

सदानंद ठाकूर
मराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा
http://www.mutualfundconsultantindia.com

ज्ञानेश्वरांशी तुलना

कृपया असल्या रिकामटेकड्या व्यक्तींची ज्ञानेश्वरांशी तुलना करू नये.
काजव्याची कुणी सूर्याशी तुलना करते का?
आय होप यू वुड गेट माय पॉइंट.
चन्द्रशेखर

ज्ञानेश्वरांशी तुलना

माननिय चंद्रशेखरजी
मला वाटतं कि मी श्री ज्ञानेश्वरांचे वयाचा संदर्भासाठी उल्लेख केला आहे. यात तुम्हाला तुलना कोठे आढळली?

सदानंद ठाकूर
मराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा
http://www.mutualfundconsultantindia.com

आदर्श

आदर्श कितीही मोठा असु शकतो, हे पटावे.

मुद्दे

संजोपरावांनी मांडलेले मुद्दे अचूक आहेत. नामस्मरणाचे सामर्थ्य जर इतके अगाध असते तर त्यांच्यासाठी कोणीही काहीही न करता त्या सर्वांचे जीवन आपल्याआप व्यवस्थित चालत राहिले असते. नामस्मरण करणार्‍या लोकांना निदान आहार , निद्रा यांची गरज भासत नाही काय? "यत्न तो देव जाणावा", "सामर्थ्य आहे चळवळीचे, जे जो करील तयांचे" असा सकारात्मक उपदेश समर्थ रामदासस्वामींनी दिला होता. हे विसरून जाऊन त्यांचे आजचे शिष्य जर निष्क्रियतेचा उपदेश लोकांना देत असतील तर ते समर्थांचे योग्य प्रतिनिधित्व करत नाहीत असे माझे स्पष्ट मत आहे. असला उपदेश समाजाने मानायचे कांहीही कारण नाही. केवळ त्यागभावना कोणालाही श्रेष्ठ बनवत नाही. त्या त्यागातून जर कोणाचा फायदा होत असेल तर त्याला काही महत्व आहे. थोडा वेळ नामस्मरण करणे, एकाग्र चित्ताने ध्यान धरणे वगैरे गोष्टी करणे मन:शांतीसाठी चांगल्या आहेत, परंतु सारे उद्योग सोडून काही कोटी वेळा नामाचा जप करण्यामुळे त्या प्रभू रामचंद्रांना तरी काय आनंद मिळत असेल हे अतर्क्य आहे.

.

संजोपरावांनी मांडलेले मुद्दे अचूक आहेत.

रावांस पत्र वाचावे. मतपरिवर्तन व्हावे अशी इच्छा आहे.

नामस्मरणाचे सामर्थ्य जर इतके अगाध असते तर त्यांच्यासाठी कोणीही काहीही न करता त्या सर्वांचे जीवन आपल्याआप व्यवस्थित चालत राहिले असते.

तरच ते अगाध? वा!
समजा त्यांचे जीवन सुरळीत चाल ले असते, तर त्यांनी नामालाच श्रेय दिले असते अन् तुम्हाला पट त नसेल तर तुम्ही नेहमी दुसर्या गोष्टींना.
हा तिढा असा सुटनार नाहि.

नामस्मरण करणार्‍या लोकांना निदान आहार , निद्रा यांची गरज भासत नाही काय?

गरज भासते हे उघड आहे, ती भागतेय हे इथे सांगितले आहे.

असला उपदेश समाजाने मानायचे कांहीही कारण नाही.

ठाकुर साहेब मनात म्हणत असतील 'समाज मानतच नाही हो, काय सांगु?'

त्यागातून जर कोणाचा फायदा होत असेल तर त्याला काही महत्व आहे.
कुणाचा म्हणजे इतरांचा असे म्हनायचे असावे.
समजा, त्यांनी त्यांचा वैयक्तिक फायदा पाहीला, आनि नामाच्या नादी लागले. त्यात तुमचा किंवा इतरांचा फायदा त्यांनी पाहीला नाही. तर त्यांना 'फायदा तोटा' कळत नाही म्हणावे फार तर. पण त्यांनी इतरांचा फायदा होत असेल तरच त्याग करावा, असे का? त्यांचा प्रश्न आहे. त्यांना केवळ स्वतःचे जीवनापुरता विचार करायचा असेल तर आपली हरकत नसावी.

थोडा वेळ नामस्मरण करणे, एकाग्र चित्ताने ध्यान धरणे वगैरे गोष्टी करणे मन:शांतीसाठी चांगल्या आहेत, परंतु सारे उद्योग सोडून काही कोटी वेळा नामाचा जप करण्यामुळे त्या प्रभू रामचंद्रांना तरी काय आनंद मिळत असेल हे अतर्क्य आहे.

कबुल

जपजाप्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
***********************************
श्री.सन्जोप राव, श्री. आनंद घारे, श्री.विनायक आणि श्री.चंद्रशेखर यांनी व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे. नामजपाने भ्रामक मानसिक समाधाना व्यतिरिक्त काही साध्य होऊ शकते यावर कोणीही सुबुद्ध विचारी व्यक्ती विश्वास ठेवणार नाही.(सतत दोन बोटांत घासून घासून जपमाळेचे मणी गुळगुळीत होतील एव्हढेच.)

सहमत

यनावाला सरांशी सहमत आहे. नामजपाचा हा दहापंधरा मिनिटांचा उतारा एकाग्रतेसाठी किंवा मनःशांतीसाठी कदाचित उपयोगी ठरत असावा. मात्र त्याचा जास्त डोस घेतला की हँगओवर येईल असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

भ्रामक?

नामजपाने भ्रामक मानसिक समाधान?
आणि मग नक्की कशाने मिळते आहे समाधान असे वाटते?

अहो आजचे जगही प्रगती नावाच्या भ्रामक कल्पने मागे धावतेच आहे ना?
आणि त्याचा परिणाम तर अजून भयानक आहे ते चंद्रशेखर यांनी कृष्णविवरे लिहून दाखवले आहेच.
आणि सगळ्या सुबुद्ध विचारी व्यक्ती जग जास्तीत जास्त वेगाने नाश पावावे या साठी प्रयत्न करित नाहीयेत काय?

मग हे आपले घर आपणच कसे व का नासवावे? या कल्पनेवर जगातल्या सगळ्या सुबुद्ध विचारी व्यक्ती विचार का करत नाहीत?

आपला
गुंडोपंत

रावांस पत्र

श्रद्धा हा वैयक्तिक विषय असला तरी ४६ हे काही पूर्णपणे नामस्मरणाला वाहून घेण्याचे वय नव्हे.
परस्पर विरोधी विधाने.
वयक्तिक ना? मग ते ६व्या वर्षी असू दे नायतर ४६ व्या वर्षी.
अर्थात आपण वाहून घ्या/ घेवू नका असे कुणी आपल्याला कसे म्हनु शकेल.
उपदेश करत असताल तर .... 'त्यांना' मान्य होइल असे दिसत नाही. शिवाय इतर लोक आपलेच ऐकत आहेत (म्हणजे नामस्मरणात जीवन वाहुन घेत नाहीत)
जर नोकरीत मन रमत नसेल तर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचाराची गरज आहे.
बापरे.
असहमत. निश्चित कारण माहित नाही. पण असहमत. त्यांचा गाडा दुसर्‍या करियर मधे हाकुन दाखवला त्यांनी. हा प्रकार engagement change चा आहे.
गावी गेल्यानंतर मी काही करणार नाही हे जो माणूस आधीच जाणतो, त्याला क्लिनिकल डिप्रेशन आले असणे शक्य आहे.

नसणे ही शक्य आहे. आले आहे हे कशावरुन म्हणावे?
त्या घरि गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान प्रत्येकालाच वाटतं.
असली बिनबुडाची वाक्ये हे सगळ्या अध्यात्मप्रेमींचे वैशिष्ट्यच आहे. वेगळ्या प्रकारचे म्हणजे कसले समाधान? उन्हातून घरी परत आल्यावर माठातले पाणी पिताना मिळते तसले? खूप भूक लागली असताना दहीपोहे खाताना मिळते तसले? लैंगिक संबंधातून मिळते तसले?
'वेगळेच समाधान', 'दारिद्र्यातही अपार सुखाचा अनुभव', 'शब्दांत सांगता न येण्यासारखी शांती' असल्या पडताळा घेता न येण्यासारख्या शब्दबुडबुड्यांवर अध्यात्माचे तण फोफावले आहे.

?
आपला या प्रकाराला विरोध आहे हे कळाले, पण प्रत्येक गोष्टीचे 'तण' हे कशा ना कशा वर असतेच. याचे तण या बुडबुड्यांवर आहे.
समान उदाहरण घेवु. समजा, मी लैंगिक सुखाच्या विरोधात आहे. वृत्तपत्रातील अर्धनग्न चित्रांच्या विरोधात आहे. आनि त्यातुन मिळणारे सुख हे क्षणभंगुर आहे, खोटे आहे वगेरे मते मांडतो. तर याला प्रतिवाद म्हनुन "आपन त्या सुखाची प्रचिती घेने आवश्यक आहे" असे म्हनता ये इ ल. मला सुख मिळाले की मि तसे म्हणनार नाही. (म्हणजे मी आपल्याला उपदेश करतोय की आपन प्रचिती घ्या.) समजा, मला प्रचिती आली, अन् मी दुसर्‍याला सांगितले तर हा बुद्धिभेदाचा प्रकार होवु शकत नाही.

जर महाराजांची लीला अगाध आहे,>>>

भुरकुंडीच्या लेखात वाचले होते की, कौंप्युटर इंजिनीयर ला मोटारीची दुरुस्ती करता येत नाही म्हनुन हिणवले होते.
रावसाहेब, समजा महाराजांची लीला म्हणजे ते नामस्मरण करण्याचे बळ व तत्सम सेवा सुविधा पुरवतात. एरिआ ऑफ स्पेशलायझेशन हे आहे तर इतर गोष्टी ते करु शकले नाहीत तरी हरकत नसावी. अन् महाराज म्हटले "तुम्ही फक्त नाम घ्या बाकी सारे मी बघतो". तर जोवर एखादा नाम घेत नाही तोवर ते सारे बघतील याची काय ग्यारंटी?
त्याला दहावीनंतरच नामस्मरणाच्या तालमीत टाकले असते तर
त्यालाही महिना दहा पंधरा हजार रुपये महाराजांच्या कृपेने मिळाले असतेच की. >>>

मग त्याला गरज नसली नसती ना हो!
आनि मग महाराजांनी पुरवले ही नसते दहा हजार. मग काय म्हणाला असतात? ठाकुर साहेब कदाचित गरज भागली असे सांगायचा प्रयत्न करत असतील असे मला वाटते.

विरोध करण्याच्या नादात होते असे कधी कधी.


'ऐहिकतेच्या मागे लागू नका, पारलौकिक सुख हेच महत्वाचे. संसार हा असार भवसागर आहे, नामस्मरण, जपजाप्य यांच्या वल्ह्यांनी वल्हवत तो पार करायचा आहे' असल्या बकवास तत्वज्ञानाने मराठी माणसाचे अपरिमित नुकसान झाले आहे. असले लेख लिहून भाबड्या मनाच्या मराठीजनाना आणखी खाली ढकलू नये.

मराठी माणुस हे करताना फारसा दिसत नाही (<१%) ( सर्वस्वी नामाला वाहुन घेणे वगेरे <<< १%).
आपला रोख कदाचित स्वार्थ आनि परमार्थ दोन्ही नीट न करण्यांकडे असावा. तसे असेल तर कुणीही सहमत व्हावे.
माझ्या मते, त्यांनी नोकरी सोडली तरी त्यांचे ठीक चालु आहे याचा राग येणे सहाजिक आहे (आपल्याला आला आहे असे म्हणत नाही). पण असे करुन त्यांचे ठिक चालले आहे, इतर जे असे करतात त्यांचेही जर ठिक चालले असेल तर.... generally this what i (and anyone else i saw) sees while choosing a career.

नाही, म्हणजे नाम जपात करियर असा विचार नाही करत पन, अमुक एक करियर केले तर पोटापाण्याचे कसे होइल? मान मिळतो का? इथिकल आहे का? कुटुंबाचे कसे होइल? त्यात मी सुखी असेन का? असा विचार लोक करत असावेत.
इथे म्हने महाराज ईंशुरंस काढुन देतात. “तुम्ही फक्त नाम घ्या बाकी सारे मी बघतो” (पुरे पैसे वापस वगेरे ही असेल, विचारुन पहावे लागेल). तर प्रोब्लेम असा दिसत नाहीये. बकवास तत्त्वज्ञान म्हनताल तर ज्यांनी फॉलो केले त्यांचे अनुभव तसे सांगत नाहीत. मग जे लोक त्याचा प्रयोग करुन न पाहताच विधाने (तिही विरोधी) त्यांचे विधान का स्वीकारावे हे न कळे.

see it with a non pre occupied point of view

a person changed whatever he was doing from A to B
in that process, he did something which generally ppl don't do.
but his 'things' are going on nicely, which shud b an unexpected or unusual thing for normal ppl bcoz he did he did something which generally ppl don't do.
same is experience of many others who did the thing that he did (then whatever it may be , let it be)
thats all.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर : नामजपाशी संबधित नाही. मला वाटते, गीता ऐकल्यानंतर अर्जुनाने लढाई केली आणि तो संन्यास घेवुन हिमालयात गेला नाही. अशीही उदाहरने असतात. तत्वज्ञान न अभ्यासता झिडकारु नये आनि मी केला "तोच आनि तेवढाच अभ्यास असतो" असे दामटू नये. अवांतर होते. प्रतिसाद नाही.

झकास!

तोच आनि तेवढाच अभ्यास असतो
सहमत आहे.

हो नारळीकर स्कूल च्या लोकांना 'जे जे काही भारतीय ते ते भंपक' असे भासवण्याची सध्या फ्य्याशन आहे.

परंतु काही लोकांना सो कॉल्ड समाजसेवकांचे अनेक वर्षे काही न करता देणग्यांवर बसून खाणे पुरोगामी वाटते!

आपला
गुंडोपंत

फॅशन

हो नारळीकर स्कूल च्या लोकांना 'जे जे काही भारतीय ते ते भंपक' असे भासवण्याची सध्या फ्य्याशन आहे.

'जे जे भंपक ते ते भारतीय' म्हणून त्याचा पुरस्कार करायचा हीच फॅशन सध्या जोरात चाललेली दिसते.

छान आहे.

>> आवडत्या नामाचा एक विलक्षण अनुभव म्हणून फक्त येथे लिहिला. <<
छान आहे.

नामस्मरण वायफळ आहे असे काहींचे म्हणणे दिसते तर प्रपंचाच्या खटपटी सोडून नाम घेत राहणे हे चूक असे काही म्हणत असावेत. काहींना नाम घेणे पसंत दिसते. तर काहींना वाटते की प्रपंचाची खटपट ते गृहस्थ करतच आहेत पण आता ती खटपट दुय्यम प्राधान्याची झाली आहे. वा वा मोकळी चर्चा वाचायला मजा आली.

काधी संधी मिळाली तर नामस्मरण करुन वृत्तींमध्ये काही फरक पडतो का ते बघीन म्हणतो.

खरेतर नामस्मरणासारख्या इतरही साधनांचा उपयोग वृत्तीमध्ये फरक पडणे, माणसाला शाश्वत समाधान मिळणे वगैरे असतो. त्यामागे जात असताना जर लौकीक बाबांमध्ये काही 'अचानक' मदत वगैरे मिळाली तर त्याने आपण प्रगती पथावर आहोत असे वाटणे अणि याचा झालेला आनंद इतरांना सांगावा असे वाटणे स्वाभाविक वाटते. आत्मबोधासाठी साधना करणार्‍याला प्रापंचिक बाबींची सोय कशी लावावी याची चिंता असणारच आणि त्या मध्ये झालेली मदत देवाकडून मिळाली असे वाटून त्याला उत्साह येणार आणि आपल्या सारख्या इतर साधकांना हा अनुभव सांगून त्यांनासुद्धा उत्साह मिळावा असे वाटणे हे सुद्धा स्वाभाविक आणि शक्य दिसते.

पण ती मदत म्हणजे आपल्या साधनेमुळे झालेला परिणाम आहे हा आपला वैयक्तिक आपल्या दृष्टीकोणामुळे निघालेला निष्कर्ष असू शकतो असा विचार सुद्धा व्हायला हवा. कारण या निष्कर्षाशी इतर सहमत नसतील आणि या एकाच गोष्टीमुळे साधनेचा हेतू, त्याची फळे यावर भलत्याच दिशेने चर्चा होऊ शकते असा ही विचार करणे गरजेचे आहे असे मला वाटते.

बाकी नामस्मरण या विषयावर तुकाराम, रामदास, गोंदवलेकर महाराज, गुरुदेव रानडे, रामकृष्ण-सारदामाता, योगी अरविंद-मदर, स्वामी रामदास (केरळ) अश्या अनेकांनी बरेच काही स्वानुभवातून लिहून/म्हणून ठेवले आहे. यातले थोडेफार वाचन करून मणी झिजण्यापेक्षा थोडा जास्त उपयोग नामस्मरणाने होतो असेही माझे मत बनले बनले आहे :)

--लिखाळ.

ठाकुर साहेब

मी पण प्रपंची लोक पाहिले/ऐकले आहेत. जे काहीतरी करतात. चोरी, नोकरी, धंदा, नाम जप वगेरे. त्यांचा चरितार्थ त्याने चालतो.
आता एक काल्पनिक उदा. घेवु. माझे मावस भाऊ पतपेढीत आहेत. त्यांना आकडेमोडीचे काम असते. ते ते करतात. त्यांच्या मुलाच्या दहावीनंतर त्यांनी त्याच कार्यातुन मिळालेले पैसे त्याच्या शिक्षणासाठी वापरले. त्यांचा बॉस फार चांगला आहे. तो म्हणतो की, तुम्ही फक्त इथे काम करा, मी आहे ना काळजी घ्यायला. त्यांच्या सांगण्यावरुन माझ्या बंधुंनी सहकारी दुध डेअरी तली नोकरी सोडली. (बायकोला विचारुन वगेरे) तू शांतपणे पुर्ण विचार करुन तुझा निर्णय सांग माझी कोणतिहि जबरदस्ती नाही. पती-पत्नींचे बालपणापासूनचे सारे आयुष्य गुराखीत गेलेले पण ती तयार झाली. त्यांच्या चेह-यावर सदैव समाधान. आल्यागेल्याचे अगदि अगत्याने करणार आणि त्यामुळे घरि कायमच पाहूण्यांची ये – जा चालूच आलेल्या प्रत्येकालाच जाताना जड जावे त्यामुळे तो परत परत येणार. त्या घरि गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान प्रत्येकालाच वाटतं.
मागेच त्यांनी हेड औफिसात जाउन ठेवींची संख्या, रक्कम तेरा कोटी करणेचे ठरवले. आपल्याला तर माहित आहेच कि हे किती अवघड काम आहे.

आता यात आनि तुमच्या उदाहरणात किती साम्य आहे याचा मी विचार करत आहे.
तुमच्या महाराजांची नामाची एजंन्सी आहे, अन त्याचे मार्केटिंग एजंटही आहेत. जसे पतपेढीच्या शाखा आहेत तसे तुमचे ही प्लेस ओफ ओपरेशन (मंदिर) आहे. गरजेच्या वेळी पैसे मिळाले याचे नामालाच ते श्रेय देता म्हणता, तसे हे ही कामालाच श्रेय देतात.
फक्त कदाचित तुमच्या भावाला एक्सॅक्टली कुठुन येणार पैसे हे माहित नसावे.

आम्ही बॉस ची हां जी हां जी करतो, जै हो जै हो करता.
तर, महाराज आनि त्यांचा बॉस यातील फरक स्पष्ट केलात तर बरे वाटेल.

नामाचा एवढाच चमत्कार असेल तर ते वरचढ कसे हे ही स्पष्ट करावे, ऊगाच चमत्कार चमत्कार का म्हणावे? आमचे आकडेमोडीचे काम ही एवढे देवु शकते.

कदाचित आपण >> आवडत्या नामाचा एक विलक्षण अनुभव म्हणून फक्त येथे लिहिला. << असे लिहुन लूप होल तयार ठेवले असेल.

आपला नम्र
परमतसहिष्णु
------------
यात किंवा इतर प्रतिसादात मी कुठेही आपला, नामाचा, भावांचा, रावांचा, महाराजांचा, इतरांचा व्यक्तिगत अपमान करण्याचा प्रयत्न केला नाही. तसे वाटत असल्यास संबंधितांनी माफ करावे.

हे वाचलेच नव्हते. :)

ठाकूर साहेब,
देवाच्या शक्तीवर आमचा विश्वास आहे, पण नामजपाने काही चमत्कार होईल यावर मात्र काही विश्वास नाही.
तुमच्या मावस भावाने नौकरी सोडायला नको होती. सहाव्या वेतन आयोगात खूप पगार वाढला असता.
आता खूप सुखात आहोत, असे दाखविण्याशिवाय त्यांना कोणता पर्यायही नाही असेही वाटते.
अशा कै च्या कै अनुभवाने भोळ्याभाबड्या श्रद्धांळूची श्रद्धा वाढत असेल, पण अशा अनुभवाने आमची देवावरची श्रद्धा मात्र डळमळीत होते हो ! :(

-दिलीप बिरुटे

छे छे!!

छे छे!

सर डळमळीत होण्याचे काही कारण नाही आपल्याला.

हे लोक आजवर या अध्यात्माच्या रस्त्यावर कधीही गेले नाहीत.
आणि सल्ले मात्र जोरात देतात. जे आजिबातच गेले नसतात ते जास्त कडवे असतात.

हेच लोक कंदिलाचे चित्र कागदावर काढून, "हा घ्या कंदिल चांगला प्रकाश पडलेला आहे, पाहा!"

असे म्हणून अंधारात कंदिलाची चित्रे विकण्यात पटाईत असतात.

ज्यांनी भंपक पणा बाजूला ठेवून दोन्ही बाजूंनी अभ्यास केलेला असतो, ते जरा शांतपणे विचार करू शकतात. आणी कोणत्याही अतिरेकी प्रतिक्रिया देत नाहीत.
मागे असाच ज्योतिष विरोधाचा विषय झाला तेंव्हा मी मागे ही त्यातल्या एकाला विचारले होते की ज्योतिषाचा तुमचा अभ्यास काय? तर तेथून कोणतेही उत्तर न देता, फरार होणेच त्यांनी पसंत केले होते यावरून यांचा भंपक पणा उघड व्हावा!

आजही यातल्या एकानेही कधी श्रद्धेने नामच घेतले नसणार. आणि घेतले तेंव्हा यांचे लक्ष देवळा पेक्षा चपलेकडेच असणार.
जर कधी हे आपले तर्क शास्त्र मनापासून बाजूला ठेवून, काही काळ निव्वळ अनुभव म्हणून यात रमु शकले तर त्यांनाही आनंदाचा अनुभव येईलच. कारण त्यावर काही कुणाचा कॉपीराईट नाही.

परंतु एके काळी योगासनांनाही विरोध करणार्‍यांच्या कुळीतील हे लोक आहेत हे विसरू नका आणि यांच्या विचारांवर भरवसा ठेवू नका, आकरण ते कधी बदलतील हे त्यांचे त्यांनाच माहित नसते. उदा. मंगेश पाडगावकरच घ्या ना! एके काळी बुवाबाजी ला विरोध करणारे नवा करार चे भाषांतर करून ' आत्मिक समाधान' मिळवतात. तेंव्हा त्यांच्या मागे गेलेले होते त्यांचे आता काय? ज्या सो कॉल्ड नारळीकरस्कूल चे हे लोक आहेत, ते स्वतः 'कल्पना सूचण्यासाठी' म्हणे विष्णु पुराण वाचतात!

आपली श्रद्धा मात्र डळमळीत होण्याचे कारण आही हे वरीला विचारांवरून पटावे असे वाटते.

आपला
गुंडोपंत

ज्योतिष आणि नामस्मरण

श्री. गुंडोपंतांनी ज्योतिषाचा विषय येथे आणल्यामुळे मला उत्तर देणे भाग आहे.
एखादी गोष्ट जेंव्हा काल्पनिक व शास्त्रीय रित्या सिद्ध न करता येणार्‍या पायावर उभी केली जाते तेंव्हा ती चुकीची आहे हे सांगण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते असे मला वाटत नाही. रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणारे भंपक असतात असे प्रतिपादन करण्यासाठी पोपटवाल्याकडे उमेदवारी करण्याची गरज नसते.
नामस्मरणाला कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. मग ते नाव पुटपुटणे असो किंवा मनाचे श्लोक किंवा गीता पठण असो.
जेंव्हा मनावर खूप ताण असतो तेंव्हा तो अशा उपायांनी कमी करता येतो. मी स्वतः अशा प्रसंगी गीता पठण करतो.
पण याचा अर्थ असा नव्हे की आपल्या सर्व जबाबदार्‍या दुसर्‍यावर टाकून मी गीता पठण करत राहीन. अडचणी सोडवल्या तर सुटतात. त्यांच्यापासून पळून जाऊन नाहीत. या चर्चेचा विषय असलेली व्यक्ती मुलांची जबाबदारी दुसर्‍यावर सोडून देते हे वाचल्यावर मनात प्रश्न असा आला की या व्यक्तीने मुले हवी म्हणून जन्माला घातली की ती चुकीने झाली? काहीही असले तरी स्वतःची जबाबदारी स्वतः पार पाडणे यातच खरा पुरुषार्थ आहे. पळून जाणारे नामस्मरण करोत नाहीतर दुसरे काही. ते निंद्यच आहे.
चन्द्रशेखर

पुन्हा तेच.

तुम्ही मुलांसाठी जॉब वगेरे करता आनि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करता. तसे हे सद् गृहस्थ नाम जप करतात आनि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. आनि निदान या केस मधे तरी त्यांचे भविष्य सुरक्षित झाले आहे असे तात्पुरते होइना दिसुन येते.

आपला मुख्य मुद्दा नाम जप भविष्य सुरक्षित करते किंवा नाही असा असल्यास तसे मांडावे. पळुन जाणे म्हटलात म्हणुन विचारले.
-----------------------
इथे ज्योतिष्य नको. आता सारे जण ज्योतिष्य थांबवा.

हेच

एखादी गोष्ट जेंव्हा काल्पनिक व शास्त्रीय रित्या सिद्ध न करता येणार्‍या पायावर उभी केली जाते तेंव्हा ती चुकीची आहे हे सांगण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते असे मला वाटत नाही.
जर अभ्यासच केला नसेल तर त्यावर टीकाही करण्याचा अधिकार नाही, असे मला वाटते.

जगात अनेक गोष्टी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध होत नाहीत म्हणून भंपक आहेत, चुकीच्या आहेत, असेच असेच असते काय?
आधी अमेरिकेत आलेल्या व नंतर जागतिक झालेल्या मंदीनंतर अनेकांना शेअर बाजार हा भंपक प्रकार वाटू लागला. तसेच अनेक अर्थशास्त्रज्ञ तोंडावर आपटले. कारण त्यांना मंदीचे भाकित करता आले नाही. म्हणून अर्थशास्त्र हे भंपक शास्त्र आहे असे विधान करता येईल काय?

अवकाशातील इथर अथवा क्वांटम का काय भौतिकातील एक कण अनेक ठिकाणी एकाच वेळी असु शकेल वगैरे प्रकारच्या अनेक संज्ञा भंपक मानायच्या काय?

असो, मला शास्त्रातले काही कळत नाही. त्यामुळे त्यावर मी काही भाष्य करणार नाही. तसेच पोपटवाले भविष्य कसे सांगतात याचाही काही अभ्यास नाही, मी तसे काही करत नाही. तुम्ही पोपट वाल्याकडे उमेदवारी करावी की नाही याविषयी मी स्वतः करीयर काँसेलर नसल्याने काही म्हणणार नाही. मात्र पत्रीकेत बुध उत्तम असेल, आणि गुरु ची साथ असेल तर वेळ आल्यावर ज्योतिषाचा अभ्यास करालच, हे नक्की! फक्त तेव्हा, मनाला फार त्रास करून घेऊ नका इतकेच!

जेंव्हा एखाद्या कुंडलीतील ग्रहयोग काही विशिष्ट पद्धतीने आलेले दिसतात तेंव्हा त्या व्यक्तिच्या जीवनात काही गोष्टींची संगती लागतांना दिसते.

यावर माझाही अनेक वर्षे विश्वास नव्हताच. परंतु मी टीका करण्या आधी जरा 'बघायला काय हरकत आहे?' अश्या विचाराने माझ्याच कुंडलीकडे निरखून पाहिले असता काही गोष्टी मला संगती मध्ये दिसून आल्या. मग त्यातला रस वाढून त्या विषयाचे वाचन करत सुटलो. आणि काही आश्चर्यकारक आडाखे सापडू लागले. यामुळे मीही चकित होत गेलो.

तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही, गंमत म्हणून का होईना एकदा तुम्हीच पाहा तुमची कुंडली. नाही तरी त्यात तुमचा काय तोटा होणार आहे?

आवांतर:
आजही मी या आडाख्यांमुळे चकित होतच असतो.
मागे काही काळापुर्वी आमच्याकडे एक बाई आल्या होत्या. त्यांच्याशी बोलत असता काही चमत्कारीक संदर्भ सापडत गेले. मी बहुदा काही भूतकाळातील संदर्भ तपासूनच मग पुढे काय घडू शकेल यावर विचार करतो. कुंडलीतील योगांनुसार त्यांना विचारले की सुमारे २५ ऑगस्ट २००७ च्या दरम्यान तुमचा काही काळ फार वाईट गेला असवा असे वाटते.
तर नेमक्या त्याच काळात (२३ ऑगस्ट) त्यांचे एक अपत्य त्यांच्या पासून दुरावले आहे असे कळले. आता यातील पंचमाचा संबंभ मी नीट वाचला असता तर मी त्यांना अपत्या संदर्भात वाईट काळ गेला असावा असेही म्हणू शकलो असतो. परंतु सांगण्याचा मुद्दा हा की, सगळेच वाचता येत नाही, तसे सुचत नाही.

तसेच त्यांच्या नवर्‍याच्या पत्रीकेतील शनि मंगळ व चंद्राच्या आपापसातील संबंधांमुळे व गुरुचा कोठेही संबंध नसल्याने त्याच्या मनस्थितीची चौकशी केली असता त्यास आयुष्याचा फार मोठा काळ डिप्रेशन भेडसावत होते असे कळले.

मी असे म्हणत नाही की कुंडलीतील योगा प्रमाणे सगळेच काही वाचता येते. यात माझी काही कमतरता आहेच. परंतु काही गोष्टी स्पष्टपणे दिसतात हे मात्र मला वारंवार जाणवते.

असो,
माझी बकबक आता थांबवतो.

आपला
गुंडोपंत

नाम जप

मंगेश पाडगावकरांच्या उदास बोध मध्ये बुवा शक्ती बाबत लिहिलेले पंक्ती बुवाबाजीच्या मानसिकतेचे विश्लेषण करतात.
"माणसे खपाट खंगलेली, आतुन आतुन भंगलेली
अदृष्य्य दहशतीने तंगलेली , आधार नाही
प्रत्येकास येथे हवा, कोणीतरी जबरी बुवा,
जो काढील सार्‍या उवा, मनातल्या चिंतेच्या
आधि म्हणे 'जय साई' मगच अधिकारी लाच खाई
अजुन पकडला गेला नाही,कृपा म्हणे बाबांची
आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही
आपण भिडायचे नाही, आयुष्याला
कणा झिजुन गेला पार, शिरजोरापुढे सर्व लाचार
बुवा नाम जपाचा उच्चार, नशा देई
प्रकाश घाटपांडे

जरा

अवांतरच होता

पण खास पाडगावकरी होता

हेच ते मंगेश पाडगावकर ना?

अच्छा!
ख्रिश्चन धर्मातील
"नवा करार" चे मराठी भाषांतर करून लोकसत्ता मध्ये बोलतांना आत्मिक समाधान मिळाले असे म्हणणारे हेच ते मंगेश पाडगावकर नाही का?

हं! चालायचेच! पश्चिमे कडून आलेले (बायबल सकट) सर्व चांगले मानणार्‍यांचे तण वाढले आहे, त्यातलेच हे ही एक झुडूप असावे!

आपला
गुंडोपंत

ताकद आणि चमत्कार

नामस्मरणात ताकद असण्यास हरकत नसावी. एखादी गोष्ट डोक्यात घोळवून मन एकाग्र होत असेल तर त्याचे रूपांतर ताकदीत होणे शक्य वाटते.

चमत्काराबद्दल बोलायचे झाले तर दैवी चमत्कार असतात किंवा पूर्वीही होते असे मला वाटत नाही. काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतात किंवा चटकन त्यांचे विश्लेषण करणे एखाद्याला शक्य होत नाही ती व्यक्ती अशा गोष्टींना चमत्कार म्हणते.

आता वरील लेखात आलेले उदाहरण घेतले तर नामस्मरणामुळे सदर व्यक्तीच्या जीवनात चमत्कार घडले असे वाटत नाही. कोणत्याही प्रकारचे नामस्मरण न करताही असे चमत्कार रोज घडतात आणि नामस्मरण करूनही फायदा न झाल्याची अनेक उदाहरणे दिसतील.

असो, नामस्मरण करून अतोनात नुकसान झाले असे सांगणारे संदर्भ कधी पुढे येतील काय?

गोंदवलेकर महाराजांचे नाव

वरील लेखाच्या सुरुवातीला गोंदवलेकर महाराजांचे नाव दिले आहे.

गोंदवलेकर महाराजांबद्दल माझ्या आईवडलांना फार आदर आहे. त्यांनी वाचून दाखवलेली गोंदवलेकर महाराजांची काही प्रवचने मी ऐकली आहेत. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांचे पुस्तक माझ्यापाशी आहे. या आप्तसंबंधामुळे माझी या सत्पुरुषाबाबत माझ्या मनात श्रद्धा नसली तरी मानाची जागा आहे.

वरील लेखात गोंदवलेकर महाराजांची भयानक थट्टा केलेली आहे आणि नालस्ती केली आहे, असे माझे मत आहे. वास्तवीक माझ्यासारख्या अ-भक्ताने लिहिण्यापेक्षा त्यांच्या शिष्यपरिवारातल्या कोण्या व्यक्तीने हा प्रतिसाद लिहिणे रास्त असते. अजून वर कोणीही तसे केलेले नाही, म्हणून मला हा प्रतिसाद लिहावासा वाटतो.

लेख वाचताना सुरुवातीच्या परिच्छेदात समाधानाबद्दल उल्लेख आला, त्यावरून माझा लेखाबद्दल चांगला ग्रह झाला होता. पुढे वाचताना दिसले, की ही तर गरज होती तेव्हा पैसे मिळाल्याची चमत्कारकथा आहे.

माझ्या आईच्या सांगण्यावरून माझा असा (योग्यच) ग्रह झाला होता की नामस्मरणाने समाधान मिळते, पारमार्थिक प्रगती होते - अशा काही दिशेने गोंदवलेकर महाराजांची शिकवण आहे. परंतु गरजेचे पैसे प्राप्त होतील हा विचारही नामस्मरणाच्या संदर्भात येऊ शकतो, हे मला गोंदवलेकर महाराजांच्या संदर्भात मुळीच ठीक वाटत नाही.

मी आताच पुस्तकातली काही थोडी प्रवचने बघितली. नामस्मरणाचा ऐहिक प्राप्ती होण्याशी काहीएक संबंध गोंदवलेकर महाराज सांगतात असे मला आढळून आले नाही. इतकेच काय पान ३५६ वर (२१ डिसेंबरच्या प्रवचनात) "भगवंत हा प्रपंचासाठी साधन बनवू नये, तो साध्य असावा." असे स्पष्ट म्हटले आहे. पान २५ वरच्या प्रवचनात (२५ जानेवारीच्या प्रवचनात) पहिले काही शब्द असे आहेत - "नाम हे प्रपंचाकरिता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही..."

आता माझे गोंदवलेकर महाराजांबद्दलचे ज्ञान नातेवाइकांकडून ऐकीव, आणि काही चार-दहा प्रवने वाचली तितपतच आहे. लेख लिहिणार्‍याचे ज्ञान अधिक आहे, काही शंका नाही. नामस्मरणाचा उल्लेख गरजेचे पैसे मिळवण्याच्या संदर्भात करावा असे गोंदवलेकर महाराजांनी अन्यत्र म्हटले असेलही. "बाकी सारे मी बघतो" म्हणजे "मी पैशाचेसुद्धा बघतो" अशा अर्थाने गोंदवलेकर महाराजांनी म्हटले असेल हे शक्य आहे. पण मला मात्र वाटत नाही की त्यांच्या प्रवचनात अशी घोर विसंगती असेल.

वर माझ्या काही सुविचारी आणि सश्रद्ध मित्रांनी अश्रद्ध प्रतिसादकर्त्यांना चांगलेच फैलावर धरले आहे. अश्रद्ध लोकांची हेटाळणी ही वरच्या लेखात गोंदवलेकर महाराजांच्या विचारांच्या झालेल्या विचक्यापेक्षा त्यांना अधिक धोकादायक वाटते, असे बहुतेक असावे. कुठला धोका अधिक? हे प्रत्येकाने स्वतःसाठी ठरवायचे आहे. परंतु माझ्या सश्रद्ध मित्रांनी पुनर्विचार करावा, असे मी त्यांना विनवतो. आणि लेखकानेही "गोंदवलेकर महाराजांची नामस्मरणाबद्दलची मते अशा पैशाच्या व्यवहारात गुंतवावीत का?" याबाबत पुनर्विचार करावा.

श्रद्धा नसलेल्या माझ्या श्रद्धेबद्दल विनवण्या कोणी श्रद्धावानाने का ऐकाव्यात हा सुद्धा प्रश्नच आहे म्हणा.

तरी हा प्रतिसाद मी केवळ माझ्या आप्तेष्ट असलेल्या गोंदवलेकर-भक्तांबद्दलच्या आत्मीयतेमुळे लिहिला आहे. नाहीतर भक्तीच्या नावाखाली कुठल्या विवक्षित विचारवंताच्या मतांना नासवून लोक श्रद्धेबद्दल आपला वृथाभिमान दृढ करतात, त्याविषयी मला फारसे सोयरसुतक नाही. कुठल्याही प्रकारे लोक आनंदी झाले, वृथाभिमानाने का होईनात, तर ते लोकांनी दु:खी असण्यापेक्षा बरे.

घरी कामधेनू पुढे ताक मागे।

धनंजय,
प्रतिसाद आवडला.
मी वर लिहिलेल्या प्रतिसादात

खरेतर नामस्मरणासारख्या इतरही साधनांचा उपयोग वृत्तीमध्ये फरक पडणे, माणसाला शाश्वत समाधान मिळणे वगैरे असतो.

...... पण ती मदत म्हणजे आपल्या साधनेमुळे झालेला परिणाम आहे हा आपला वैयक्तिक आपल्या दृष्टीकोणामुळे निघालेला निष्कर्ष असू शकतो असा विचार सुद्धा व्हायला हवा. कारण या निष्कर्षाशी इतर सहमत नसतील आणि या एकाच गोष्टीमुळे साधनेचा हेतू, त्याची फळे यावर भलत्याच दिशेने चर्चा होऊ शकते असा ही विचार करणे गरजेचे आहे असे मला वाटते.

असे लिहिले ते तुमच्या प्रतिसादातल्या भावनेतूनच. पण ते अगदी सौम्य अथवा संदिग्ध झाले असावे असे आता वाटते.

कोणाही संताकडे, तत्वज्ञानाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र दृष्टीकोण असतो. आणि तो परिस्थितीनुसार, अनुभवातून घडत बदलत असतो. त्यामुळे वरील चमत्काराची कथा वाचून मला राग आला नाही इतकेच. पण नामाच्या महिम्याबद्दल, वृत्तींमध्ये होणार्‍या बदलांबाबत काही वाचायला मिळाले असते तर मला अधिक आवडले असते.

समर्थ म्हणतात - घरी कामधेनू पुढे ताक मागे। अशी आपली अवस्था होऊ नये असे संतांना वाटत असते.
--लिखाळ.

नालस्ती नाही

पण चुकीचा मुद्दा मांडला हे निश्चित.
कमीपणा आणला असे दिसते.
म्हणुन मी विचारत होतो की बॉस पेक्षा वेगळेपणा तो काय ठेवलाय महाराजांना?

धनंजयशी सहमत

गोंदवलेकर महाराजांच्याबद्दल आमच्याकडेपण आदर असलेले आई-वडीलांसकट अनेक पाहीले आहेत. अर्थात त्यांच्या आणि माझ्या मनात जे काही चांगले वाटते तसेच व्यावहारीक आणि पारमार्थिकदृष्ट्या आदरणीय वाटते त्याबद्दल श्रद्धा बाळगतो. अश्रद्ध नक्कीच नाही आणि अंधश्रद्धापण नाही. चमत्कार वगैरेपण मान्य होत नाही.

माझ्याकडेपण गोंदवलेकर महाराजांचे प्रवचनाचे पुस्तक आहे. पण आत्ता त्यातील एखादा उतारा शोधण्याऐवजी, त्याचा सारांश असलेल्या एका कवितेतील ओळी आठवल्या त्या येथे सांगतो: (आर्या वृत्तात आहेत)

नामात रंगुनीया, व्यवहारी सर्व भोग सेवावे |
हाची सुबोध गुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ||

थोडक्यात गोंदवलेकर महाराजांनीपण आयुष्य उपभोगू नका म्हणून सांगितलेले नाही. त्यामुळे वर अजानुकर्णाने म्हणल्याप्रमाणे नामस्मरण म्हणजे नशाच होत नाही ना ह्याचादेखील विचार आत्मपरीक्षण म्हणून करायला हवा असे वाटते.

नामस्मरण हे ज्ञानेश्वरांपासून (एकतत्व नाम दृढ धरी मना), तुकाराम (अवघा तो शकुन हृदयी देवाचे चिंतन)- रामदासांपर्यंत (प्रभाते मनी राम चिंतित जावा) आणि नंतर गोंदवलेकर महाराजांनी (श्रीरामजयरामजयजयराम) पण कायम सांगितलेला एक साधा उपाय आहे. एखाद्यास संगीत ऐकून बरे वाटू शकते तर कुणाला कशाने. प्रयत्न करून जर कुणाला त्यातून समाधान लाभत असेल आणि मन:शांती लाभत असेल तर त्यात गैर काहीच नाही. मात्र स्वतः तो प्रयोग न करता, अनुभुती न घेता इतरांना बडवणारे विज्ञाननिष्ठ असू शकतील असे वाटत नाही.

आता लेखकाला: आपल्या विचारांना विरोध झाला म्हणून हा लेख काढून् टाका असे सांगणे पटले नाही. जर खरीच श्रद्धा असेल तर ती विरोधात पण टिकली पाहीजे. एव्हढ्याशा टिकेने माघार घेते ती कसली श्रद्धा? एकतर ती निराशा झाली अथवा अहंकार. दोन्ही जाण्यासाठीच नामस्मरण करा असे सांगितले आहे ना?

------

लेख मागे

सदर ले़ख श्री महारजांची क्षमा मागुन मी मागे घेत आहे.
डिलिट करण्यची पध्दत कळल्यास आभारि राहिन.
धन्यवाद

सदानंद ठाकूर
मराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा
http://www.mutualfundconsultantindia.com

धन्य!

धन्य आहात!
काढायचाच होता तर आधीच दिलाच कशाला होता मग?

आणि, ते भावालाही विचारायला सांगा नोकरीत परत घेतेय का ब्यांक ते!
तेव्हढेच कुटूंबाचे हाल तरी थांबतील. आणि नातेवाईकांना नि लोकांनाही यांना पैसे देण्यासाठी शोधत फिरायला नको.

संपादकांना विनंती आहे की, हा लेख आजिबात काढू नये, कारण यात विवीध जनांकडून नामजपातील भंपकपणाचा व्यवस्थितरित्या समाचार घेतला गेला आहे.
यामुळे उपक्रमाचे धोरण स्पष्टच व्हायला मदत होईल. आणि असले लेख इथे येण्या ऐवजी सनातन ऑर्ग वर आपोआपच जातील. ;))

-गुंडोपंत

लेख राहू द्या !

>>सदर ले़ख श्री महारजांची क्षमा मागुन मी मागे घेत आहे.

महाराजांबद्दल अनादार आमच्याही मनात नाही. कोणीतरी, जीवनात सुखाने कसे जगता येईल याबद्दल काही चांगल्या टीप्स देत असेल तर ते वाईट नाही, नसावे. इतरांनी त्यांचा विचार जीवनात आणायचा प्रयत्न करावा, असा ढोबळ अर्थ आम्ही घेतो. मात्र चर्चेतील जो उत्तरार्ध आहे, त्याबद्दल मतभेद होऊ शकतात.
नामस्मरणाने एखाद्याला बळ मिळू शकेलही, आपण जे काम करत आहोत ते काम करतांना आपल्यापाठीमागे (सोबत) एक शक्ती आहे, अशा विश्वासाने जगण्याच्या रहाटगाड्यात आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. पण नामस्मरण केल्याने भौतिक सुख (पैसे मिळणे) मिळते, हा विचार टिकणारा नाही. असे वाटते.

अवांतर : आपल्या मावस भावाने बँकेतील नौकरी सोडली याचे मात्र राहून-राहून वाईट वाटते. त्यांना कोणीतरी समूपदेशन करणारे भेटले असते, तर त्यांनी नौकरी सोडली नसती असेही वाटते.

-दिलीप बिरुटे

लेख मागे घेउ नये.

लेख मागे घेउ नये. तुमचा लेख तसा काही नुकसान करत नाही आहे त्यामुळे मागे घेण्याची गरज नाही. उलट एका चांगली चर्चा सुरु आहे.

सर्वजण सर्व नेहमीचे कामधाम सोडून नामस्मरण करत बसले तर काय होईल व सर्वांवर काय परिस्थीती ओढावेल? त्यामुळे मला तरी सर्वांसाठी उपयुक्त नसेल तर केवळ नामस्मरणात आयुष्य जगणे ही एक वैयक्तिक निवड इतकेच म्हणावे लागेल त्यापेक्षा आधीक महत्व त्या जीवनपद्धतीला देउ इच्छीत नाही.

नोकरी सोडून नामस्मरणाला वाहून घेणे त्या व्यक्तिचा वैयक्तिक निर्णय आहे व त्याच्या घरचे त्यावर टिप्पणी करतील ही आपली चर्चेची बाब नाही जोवर त्यांचा खर्च करदात्याला उचलायला लागत नाही. तसेही मुळ लेखक किंवा घटनेतील व्यक्ती कोणाला त्यांनी केले तसेच करायला सांगत नाही आहे की पैसे मागत आहे.

समांतर-अवांतर

जरा नामस्मरण, देव धर्म सोडून जरा सामाजीक उपक्रम -

असाही एक मुद्दा मांडायचा आहे की आपली जी एक सध्याची एक जीवनशैली (शिक्षण - नोकरी/मजुरी शोधणे - शेती-धंदा करणे, घर-गाडी - पुढची पिढी )/ समाजरचना आहे त्यातुन तसे जगण्यातुन बाहेर पडून जगण्याचा एक पर्याय उपलब्ध असलेला चांगला. १००% साक्षर समाज कुठेतरी असेलही. पण १००% रोजगार असलेला म्हणजे सर्व जण पोटापाण्याचा उद्योग करत आहेत, कोणीही बेघर/बेरोजगार नाही आहेत असा कुठलाच देश नाही. याचा अर्थ जगभर असे लोक सध्यातरी सापडतीलच की जे "लौकीकदृष्ट्या अनप्रॉडक्टिव उद्योगात" आयुष्य व्यतीत करत असतील. तर त्यांच्यासाठी काही स्वयंपुर्ण ग्रामनिवास कल्पना किंवा आदिवासी जसे जंगलात एक आयुष्य जगत आले आहेत. म्हणजे नामस्मरण किंवा कुठल्या कल्ट मधे न जाता अशी काही सामाजीक व्यवस्था आहे / असावी का? त्यांची डिग्नीटी (??) राहून त्यांना काही विशिष्ट अटी पाळून सन्मानाने (भिक-दयेवर न जगायला लागता, उपहास न होता)जगु देईल.

+१

चंद्रशेखर, धनंजय आणि सहजरावांचे प्रतिसाद आवडले.

हा लेख आणि सदर व चर्चेमुळे खुलभर दुधाची गोष्ट मात्र जरूर आठवली.

(अश्रद्ध) अदिती

खुलभर दुधाची गोष्ट

आम्हाला एक खुलभर दुधाची गोष्ट आठवली. गोष्ट त्या गोष्टीशी जवळीक साधणारीच आहे फक्त आशयात फरक आहे. .... राजाने केलेल्या आवाहनानुसार नगरीतल्या लोकांनी शिवमंदिरात बाहेर ठेवलेल्या हंड्यात दुध ओतायचे ठरवले. सकाळी उठुन अभिषेकाच्या वेळी पाहतो तर् काय? हंड्यात सगळे पाणीच. जे लोक दुध घेउन गेले होते त्यांनी विचार केला कि नगरीतील बाकीचे लोक चोर आहेत आपण एकट्याने दुध टाकले तरी ते लोक पाणीच टाकणार. मग आपण टाकलेल्या दुधाला काही अर्थच रहाणार नाहि असे म्हणुन त्यांनी पाणीच टाकले. दुसर्‍या प्रकारच्या लोकांनी विचार केला कि नगरीतील बाकी लोक् सज्जन आहेत.मग एवड्या मोठ्या दुधात आपले तांब्याभर पाण्याचा काय कळणार् पण नाही असे म्हणुन त्यांनी पण पाणीच टाकले. परिणामी शेवटी पानीच.
असो . तर एवड्या श्रद्धा / अश्रद्धे च्या हलकल्लोळात एवढीशी नामस्मरणाची श्रद्धा/अश्रद्धा ती काय?
(श्रद्धेचा आदर करणारा अश्रद्ध)
प्रकाश घाटपांडे

श्रद्धा आणि अश्रद्धा

माझ्या कल्पनेप्रमाणे ही चर्चा श्रद्धा आणि अश्रद्धा किंवा आस्तिक वा नास्तिकपणा या संबंधातली नाही. हे वैयक्तिक प्रश्न ज्याने त्याने हाताळायचे आहेत याबद्दल दुमत नाही. नामस्मरणाच्या महात्म्यामुळे पैशाची व्यवस्था होते हा समज माझ्यासह अनेक लोकांना मान्य नाही आणि अशा लेखामुळे कोणाची दिशाभूल होऊ नये असे मला वाटले म्हणून त्यावर प्रतिक्रिया दिली.
जयंत नारळीकर आणि मंगेश पाडगावकर यांचा यात कांही संबंध नसतांना त्यांच्यावर विनाकारण चिखलफेक झाली.

 
^ वर