माझ्या संग्रहातील पुस्तके -५

फार दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रदर्शनात ह. मो. मराठे यांच्या बहुचर्चित लेखाचे 'ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?' या नावाचे पुस्तिकारुप आणि त्याला जणू उत्तर म्हणूनच संजय सोनवणींनी लिहिलेली 'ब्राह्मण का झोडपले जातात?' ही पुस्तिका पाठीला पाठ लावून ठेवलेली दिसली. ही दोन्ही पुस्तके विकत घेऊन वाचली. वाचताना खूप मनोरंजन झाले, काही वेळा हसूही आले. पण दोन्ही पुस्तके वाचून संपवल्यावर बाकी मन विषण्ण झाले. 'जात नाही ती जात' हे आधीपासून माहिती होते, पण आता 'जाता जाणार नाही ती जात' असे वाटावे इतका विखार या दोन्ही पुस्तकांत भरलेला आहे. या दोन्ही पुस्तकांत उल्लेखलेले विविध वर्तमानपत्रांतील आणि पुस्तकांतील संदर्भ आणि विविध लोकांची वक्तव्ये यांमुळे ही पुस्तके अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक वाटावी अशी झाली आहेत खरी, पण एका जातीचा दुसर्‍या जाती इतका तिरस्कार करु शकतात हे कळाल्यावर एकसंध समाज वगैरे निव्वळ कागदी गफ्फा वाटू लागल्या. या दोन्ही पुस्तकांमधले सगळे मुद्दे या लेखात मांडणे शक्य नाही - तशी गरजही नाही.पण या पुस्तकांमधील काही मुद्द्यांनी बाकी डोके चकरावून गेले. विस्तारभयास्तव या पुस्तिकेमधल्या हमोंच्या पुस्तिकेचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.सोनवणींच्या पुस्तकांतील मुद्द्यांविषयी पुन्हा कधीतरी.

'ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?'
ह. मो. मराठे
'विद्वेषाच्या विरोधात जागृती मंच' द्वारा प्रकाशित
पाने ९६, किंमत २५ रुपये

मराठेंच्या पुस्तकात आपल्याला हे पुस्तक का लिहावे वाटले (मूळ स्वरुप 'किस्त्रीम दिवाळी २००४) हे त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या मुद्द्यापासून सुरु झालेले मराठेंचे विवेचन नंतर सरळसरळ ब्राह्मण विरुद्ध् मराठा समाज या मुद्द्यावर येते. ब्राह्मण्याची खूण म्हणून मानले जाणारे जानवे (आणि शेंडी) या गोष्टीचा कालबाह्य झालेली गोष्ट म्हणून आपल्याला त्याग करावा असे कसे वाटले आणि ब्राह्मण नव्हे तर कोणत्याच जातीचा असे लेबल लावून घेण्याला आपली कशी ना आहे यावर विस्ताराने लिहून मराठेंनी आपल्या पुरोगामीपणाची बैठक तयार केली आहे. (पाच वर्षांपूर्वीची हा लेख प्रसिद्ध झाला. सहा महिन्यापूर्वी पुण्यात झालेल्या ब्राह्मण महासंमेलनात एका विदुषींनी शेंडी आणि जानवे यावचा ब्राह्मणांनी त्याग करावा असे म्हणताच गदारोळ झाला होता!) हाच पुरोगामीपणा ब्राह्मणांनी ब्रिटिशांच्या काळापासून कसा अवलंबला आहे, याविषयीही मराठे लिहितात. (जातीव्यवस्था आणि वैचारिक मागासलेपणा आजही टिकवून ठेवण्यातला ब्राह्मणांचा सहभाग याविषयी मराठे इथे काही बोलत नाहीत) ब्राह्मण समाजाविरुद्ध ब्राह्मणेतरांच्या मनात असलेला आकस याबाबत मराठेंनी दिलेली उदाहरणे आपण कोणत्या जगात, कोणत्या समाजात रहातो आहोत याविषयी मनात शंका निर्माण करणारी आहेत. यातली काही विधाने विविध वक्यांनी आपल्या भाषणांत केलेली आहेत, काही लेखकांनी आपल्या लिखाणात लिहिलेली आहेत, तर काही मराठेंनी आपल्या लेखात 'ब्राह्मणांवरील आरोप' या मथळ्याखालील एकत्र केलेली आहेत. यातील काही मुद्द्यांचे मराठेंनी स्पष्टीकरणही दिले आहे. (ते वेगळ्या रंगात दाखवले आहे)यातले काही मुद्दे असे:
१.मुंबई, गुजराथ येथील दंगलीतून आपल्या पोलिसांतील ब्राह्मणवादी विकृती सगळ्या जगानं पाहिल्या!
२.ब्राह्मणांची पोटे भरण्यासाठी समाजाला अंधश्रद्धेच्या व रुढींच्या गर्तेत अडकवणार्‍या कर्मकांडांतून मुक्त करण्याचा फुलेंचा प्रयत्न होता
३.आज मराठी साहित्यात अशी स्थिती आहे की बहुजन समाजातील लेखकांना ब्राह्मणाचा आशीर्वाद मिळावा लागतो. आजही ब्राह्मण लेखकांच्या मान्यतेखेरीज बहुजन समाजातील लेखक मान्यता पावत नाही.
४.तत्कालिन समाजव्यवस्थेने संत ज्ञानेश्वरांना ब्राह्मण म्हणून मान्यता दिली नसल्याने संत ज्ञानेश्वर ब्राह्मण नव्हते
५.आज ब्राह्मण लोकांनी जे शिक्षण बहुजन समाजापर्यंत पोचवले आहे, त्याचा अभ्यास त्यांनी दहा वर्षांपूर्वीच केला असून त्याद्वारे नोकर्‍याही मिळवल्या आहेत. आता नको असलेल्या त्या शिक्षणाला त्यांनी बहुजन समाजाला दिले आहे.
६.हिंदुत्ववाद्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर चरित्र लिहिले, नाटके लिहिली, चित्रपट निर्माण केले,एकपात्री प्रयोग केले आणि त्यातून भरपूर पैसा कमावला
७.देशातील राजकीय नेते सत्ता मिळवण्यासाठी बहुजन समाजाचा वापर करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोध्रा हत्याकांड. या हत्याकांडात किती ब्राह्मण मेले याची सरकारने आकडेवारी द्यावी असे आवाहन मी सतत करत आहे.
८.आपण एतद्देशिय असल्याचे ब्राह्मण भासवत आहेत. संस्कृत ही ब्राह्मणांची भाषा आहे, म्हणून बहुजनांनी तिचा स्वीकार न करता इंग्रजीचा स्वीकार करावा.
९. इथल्या आदिवासींच्या जमिनींवर आक्रमण झाले, म्हणून आदिवासी राजा दशरथाकडे गेले, पण त्याच्या मुलाने मात्र आदिवासींना राक्षस म्हणून चिरडले
१०. शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी विषप्रयोग करुन ठार मारले. संत तुकारामांच खून ब्राह्मणांनी केला.
११.रामदासांची व (शिवाजी) महाराजांची प्रत्यक्षात कधीही भेट झाली नाही, तसेच भवानीने तलवार दिल्याची कुठेही नोंद नाही. यापाठीमागे महाराजांच्या कर्तृत्वाचे श्रेय हिरावून घेण्याचे षडयंत्र ब्राह्मणांचे होते
१२.परकियांनी देशावर् इतकी वर्षे राज्य केले, त्यावेळी त्यांच्याकडे नोकरी करणारे लोक म्हणजे आत्ताच्या ब्राह्मणवाद्यांचे पूर्वजच होते. त्यामुळे तेच खरे देशद्रोही आहेत.
१३. भांडारकर संस्थेवर जो हल्ला झाला तो ब्राह्मण समाजाला समोर ठेवून झाला होता.
१४.शिवाजींचा लढा मुस्लिमांविरुद्ध् नव्हे तर ब्राह्मण आणि त्यांनी तयार केलेल्या विषमतेविरुद्ध होता. (महाराजांच्या मंत्रीमंडळातील आठपैकी सात मंत्री ब्राह्मण होते. शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला घेऊन देणारे बापूजी देशपांडे, पुरंदर किल्ल्यावर महाराजांना सर्वाधिक सहाय्य करणारे नीळकंठ सरनाईक, महाराजांच्या हेरखात्याचे पहिले प्रमुख नानाजी देशपांडे हे सर्व लोक ब्राह्मण होते. शिवाजी महाराजांची सुमारे २०० पत्रे उपलब्ध आहेत, त्यातील सुमारे १०० पत्रांत त्यांनी ब्राह्मणांना काहीतरी दान केल्याचा किंवा इनाम दिल्याचा उल्लेख आहे. 'महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती' हा उल्लेख स्वतः महाराजांनी एक पत्रात केला आहे. खुद्द महाराजांना स्वतःला 'गोब्राह्मणप्रतिपालक' म्हणवून घ्यायला संकोच वाटत नव्हता. अफजलखानचा वकील ब्राह्मण होता हे ब्राह्मणद्वेषाचे कारण असल्यास अफजलखानचे अनेक देहरक्षक मराठा होते व त्यातले दोघेजण शिवाजी महाराजांचे जवळचे नातेवाईक होते, हेही लक्षात घेतले पाहिजे.)
१५.मुस्लिमांनी शिवाजीची बदनामी कधीच केली नाही, मात्र परदेशातील लेनच्या डोक्यात इथल्या ब्राह्मणांनी विकृती घतली.
१६.बहुजनांनी इतिहास घडवला, पण तो ब्राह्मणांनी लिहिला, म्हणून ब्राह्मण इतिहासाचे पद्धतशीर रीत्या विकृतीकरण करत आहेत.
१७.दादोजी कोंडदेव आणि रामदास महाराज यांना जबरदस्तीने शिवाजी महाराजांचे गुरु बनवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात दादोजी कोंडदेव हे स्वराज्याच्या विरोधात होते. महाराष्ट्रातील ब्राह्मणांचा महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध होता, म्हणून राज्याभिषेकासाठी गागाभट्टांना काशीहून बोलावण्यात आले. रामदास हा माणूस जर शिवाजींचा गुरु होता तर तो (मूळ वाक्यातील एकवचनी उल्लेख) महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित का नव्हता? ( छत्रपतींच्या राज्यभिषेक काळात गागाभट्ट हे नाशिक मुक्कामी होते, राज्याभिषेकाचा प्रस्ताव गागाभट्टांकडूनच आला, त्यावर महाराजांनी आपले कुलगुरु अनंत भट आणि बाळकृष्ण आर्वीकर यांना बोलावून त्यांचे मत घेतले. त्यांनी आणि नाशिक, त्र्ञंबकेश्वर येथील ब्राह्मणांनी संमती दिल्यावरच राज्याभिषेक करण्याचे ठरले. रामदास हे संन्यासी होते. अशा प्रसंगी बैरागी, संन्यासी यांनी उपस्थित राहू नये हा परिपाठ आहे)
१८. रामदास हे चारित्र्यहीन होते (मूळ शब्द 'रंडीबाज)
१९.थुंकण्याची मडकी आपल्या गळ्यात बांधण्याची सक्ती दलितांवर ब्राह्मण पेशव्यांनी केली.
२०.कोल्हापूरच्या शाहू महाराजांना कार्तिक स्ननाच्या वेळी पुराणोक्त संकल्प सांगणारा नारायणभट या वेश्यावृत्तीचा होता. त्याला आणण्यासाठी सरकारी गाडी वेश्यावस्तीत पाठवावी लागत असे.
२१. 'भांडारकर झांकी है, शनिवारवाडा बाकी है'
२२.विद्यापीठीय आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम ब्राह्मणांनी लिहिल्यामुळे दलितांना या परीक्षांत म्हणावे तसे यश मिळत नाही, व हे कारस्थान वर्षानुवर्षे चालत आले आहे.
२३. हिंदुधर्म हा आमचा नसून तो विदेशी आर्य ब्राह्मणांचा आहे असे शिवधर्माच्या स्थापनेत पुढाकार घेतलेल्यांचे म्हणणे आहे. "शिवधर्म हिंदुविरोधी नाही, पण ब्राह्मणविरोधी आहे, त्यामुळे या धर्मात ब्राह्मणांना प्रवेश नाही" असे शिवधर्म स्थापनेच्या मेळाव्यात झालेल्या भाषणांत म्हटले गेले," शिवधर्म स्थापनेच्या आजच्या प्रसंगी आम्ही बहुजनांनी ब्राह्मणांबरोबरचे सर्व संबंध तोडले आहेत. यापुढचे सर्व विधी बिनशेंडीच्या माणसाने करायचे आहेत. यापुढे शिवधर्मियांसाठी मनुस्मृती, मत्स्यपुराण हे विकृत ग्रंथ त्याज्य आहेत. भटा ब्राह्मणांची सर्व बौद्धिक, सांस्कृतिक, मानसिक गुलामगिरी झुगारायची आहे. या पुढील असे विकृत धार्मिक ग्रंथ केवळ जाळायचेच नाहीत, तर असे धर्मग्रंथ लिहिणार्‍यांनाही आम्ही जाळल्याशिवाय राहणार नाही" असेही म्हणण्यात आले.
२४.जिजाऊंच्या उच्च, उदात्त, मानवी रुपावर दैवतीकरणाचे एकही पुट चढणार नाही याविषयी आपण सदैव जागरुक राहू या असे मानणार्‍या शिवधर्माच्या प्राथमिक संहितेत बाकी जिजाऊंचे पूजन करुन बालकाचे नामकरण करावे असे म्हटले आहे. या संहितेत जिजाऊंची आरतीही दिली आहे.

ब्राह्मण समाजाला टिपण्यासाठी सगळा ब्राह्मणेतर समाज असा पचंग बांधून तयार झालेला आहे असा वाचकाचा समज करुन देण्यात जवळजवळ यशस्वी झाल्यानंतर 'शस्त्राघाता शस्त्रच उत्तर' या न्यायाने मराठे आपले आणि आपल्या लेखाला आलेल्या प्रतिसादांमधले काही विचार मांडतात. ते वाचून तर औषधापेक्षा आजार परवडला असे वाटू लागते. त्यातले काही विचार असे:
१. शेवटी जीवन मरणाचाच प्रश्न आला तर ब्राह्मणही काही विचार करतील. कोंडलेले मांजर जसे हिंसक बनते तसे ब्राह्मणांसही व्हावे लागेल (!). ते शस्त्र हातात घेऊन नाही तर डोके लढवून.
२.धम्मप्रवर्तन दिनानिमित्त लाखो दलित मुंबई व नागपूर येथे जमा होताततसे वर्षातील कोणतेतरी दोन दिवस ठरवून त्या दिवशी लाखो ब्राह्मणांनी शहराशहरातून व गावोगावातून मिरवणुका काढल्या पाहिजेत.
३.ब्राह्मणांची व्होट बँक संघटित करणे आवश्यक आहे
४. यापुढे ब्राह्मणांनी भिक्षुकीची किंवा पौरोहित्याची कामे बंदच करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ज्यांची मुलेबाळे व्यवस्थित नोकरी धंदा करीत आहेत, त्या भिक्षूकांनी भिक्षुकीची कामे ताबडतोब थांबवावीत.
५.वास्तविक पहाता आजचा तरुण ब्राह्मणवर्ग रानावनात राहून अदिवासी लोकांच्या आश्रमशाळा चालवण्याचे, त्यांन औषधोपचार करुन सेवा करण्याचे विधायक काम करण्यात गुंतला आहे.
६. ब्राह्मण महासंमेलनात व्यक्त करण्यात आलेले विचारः ब्राह्मण मुलींनी ब्राह्मणेतरांशी अजिबात लग्ने करु नयेत. ती कधीच सुखाची होत नाहीत ( या उद्गारांना तरुण ब्राह्मण स्त्रियांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला) ब्राह्मणांनी संततीनियमन अजिबात करु नये. ब्राह्मणांनी प्रजा वाढवावी. सरकार काही ब्राह्मणांना पोसत नाही. ( या उद्गारांना टाळ्यांच्या गजरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला!)
६. १९६० नंतर सर्व क्षेत्रातील खालपासून वरपर्यंतची सर्व सत्ताकेंद्रे ब्राह्मणेतरांच्य हाती गेली आहेत,आणि ब्राह्मणांना कटाक्षाने दूर ठेवले जात आहे. हे आता अटळ आहे
तथापि जगात संपूर्ण चुकीचे असे काही नसते या न्यायाने या स्फोटक पुस्तिकेत विवेक शाबूत ठेऊन केलेले काही विचारही वाचायला मिळाले. त्यातले काही असे:

१. ब्राह्मणांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सिंधी, गुजराथी समाज हा ब्राह्मणांपेक्षाही अल्पसंख्याक असतानादेखील त्यांच्याविरुद्ध ब्राह्मणांविरुद्ध आहे तितकी अप्रीती नाही. याचे कारण कुठेतरी आपला आहंभाव असावा.सर्वात जास्त ब्राह्मणद्वेष महाराष्ट्रातच का याचाही विचार करणे आवश्यक आहे. स्वार्थी, अप्पलपोटे, जातीचा दुराभिमान बाळगणारे, इतरांना तुच्छ लेखणारे, सामाजिक समस्यांचे भान नसलेले, धर्माच्या आधारे बहुजन समाजाचे शोषण करणारे अशी ब्राह्मणांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. ही प्रतिमा बदलवली पाहिजे व त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत.
२. आजवर ब्राह्मण गरिबीत जगले. यापुढे ब्राह्मणांनी गरीबीचा नव्हे तर श्रीमंतीचा ध्यास घेतला पाहिजे.
३. ब्राह्मणवाद हा फक्त ब्राह्मणांतच असतो असे नाही. महाराष्ट्रात फक्त मराठी मुख्यमंत्रीच असला पाहिजे असे म्हणणार्‍या बॅ. अंतुलेंच्या मंत्रीमंडळातील एक महिला मंत्री यासुद्धा ब्राह्मणवादीच ठरतात. कै. वसंतराव नाईक यांना 'वंजारडा' आणि कै. यशवंतराव चव्हाण यांना 'कुणबट' या विशेषणांनी संबोधणारे नेते होऊन गेलेच ना? शूद्र व अतिशूद्रातील एका जातीने दुसर्‍या जातीला नीच समजणे हेसुद्धा 'ब्राह्मण्य' च आहे.

एखाद्या कलाकृतीने आपल्याला अस्वस्थ केले तरे ते त्या कलाकृतीचे यश मानावे असा संकेत आहे. या पुस्तिकेने मी अस्वस्थ झालो, पण ते या पुस्तिकेचे यश असे म्हणायला मन तयार होत नाही. सोनवणींची पुस्तिका वाचून तर ही अस्वस्थता वाढली.
हे सगळे काय चालले आहे?

Comments

देशाचे दुष्मन

यावरुन मला "देशाचे दुष्मन" हे दिनकरराव जवळकर लिखित १९२५ सालचे पुस्तक आठवते. त्यावेळी नगरपालिकेत फुल्यांच्या पुतळ्याचा वाद निर्माण झाला होता. त्याला उत्तर म्हणुन जवळकरांनी हे पुस्तक लिहिले.त्यातील भाषा अत्यंत विखारी वाटावी अशी आहे.केशवराव जेधे यांनी ते प्रकाशित केले होते. पुस्तकाला केशवराव बागडे यांची प्रस्तावना आहे. त्यात ते म्हणतात,"या पुस्तकातील भाषापद्धती अगर विचारप्रदर्शनपद्धती ब्राह्मणांना आवडणार नाही; परंतु त्यामुळे रुष्ट न होता, सदर गृहस्थांचे पुस्तक वाचून त्यावर एकंदर पुर्व परिस्थिती ध्यानात घेउन विशेषतः रा. चिपळुणकर यांनी केलेली महात्मा फुले यांची निंदा लक्षात घेउन शांतपणे मनन केले पाहिजे. क्रियेस प्रतिक्रिया हा निसर्गदेवीच्या साम्राज्यातील अबाधितपणे व अव्याहतपणे परिणामकारक होणारा नियम आहे. तदनुरोधाने महात्मा ज्योतिराव यांची निंदा करणार्‍यांना प्रत्युत्तर मिळणे साहजिक आहे. या प्रत्युत्तरादाखल केलेल्या प्रयत्नाने चिडुन जाउन प्रत्याघात करण्याचाही मोह कित्येकांना अनावर होण्याचा संभव आहे. परंतु त्यायोगे जनतेचा अगर देशाचा फादा न होता तोटाच होणार ही गोष्ट सर्वांच्या नजरेस आणणे माझे कर्तव्य आहे...."

उदाहरण म्हणुन जरी काही वाक्ये द्यायची म्हटल्यावर कुठली द्यायची हा प्रश्न पडावा अशी रचना या ग्रंथात आहे.
"..हातात वर्तमानपत्रे आहेत, चार भिकार पुस्तकर्ते अभिप्रायाच्या उष्ट्या तुकड्यासाठी पगडीच्या झिरमिळ्या झेलून आहेत, तोपर्यंत हे 'लोकमान्य' त्वाचे ढोंगधत्तुरे टिकतील; पण समाज जागा झाला तर या 'टिळक महाराज' उत्माताच्या देशद्रोही *** बीजाला क्रोधाच्या संतप्त यज्ञात भस्मसात केल्याखेरीज रहाणार नाही"

"कोणताही मनुष्य जन्माने नीच ठरत नाही, कृतीने ठरत असतो. ब्राह्मण लोक कृतीने नीच ठरले आहेत. त्यांच्यापेक्षा दुसरा नीच समाज जगात सापडणार नाही.सर्पाशी सहकार्य करा, तो तुमचा फक्त जीव घेउन एकट्याचा नाश करेल! पण ब्राह्मणाशी सहकार्य कराल तर तो तुमच्या पिढ्यान पिढ्या हीन ठरवुन तुमचा वंश गुलाम बनवील. जो ब्राह्मण 'ब्राह्मण' म्हणवुन ने घेता 'हिंदु' या नावाखाली आपल्यात समानतेने मिसळुन जाईल- रक्तामासाने एक होईल तोच आपला समजावा.नुसती तोंडी पोपटपंची लढवून वेळेवर जात दाखवणारे भटॊपाध्याय दुश्मन समजुन त्यांच्यापासुन दूर रहावे..."

जवळकरांचे सवाल १ ला, सवाल २रा, मर्द हो नाके कापुन घ्या, १९५० सालची ब्राह्मण परिषद , शेतकर्‍याचे हिंदुस्थान, क्रांतीचे रणशिंग अशी पुस्तके आहेत.

सुगावा प्रकाशन, चित्रशाळेजवळ, सदाशिव पेठ पुणे ३० येथे अशी अनेक विद्रोही पुस्तके हमखास आजही उपलब्ध असतात.

प्रकाश घाटपांडे

इतिहास

ब्राह्मणविरोध (खरे तर ब्राह्मणद्वेष) पहिल्याने दिसतो तो लोकहितवादी आणि जोतिराव फुल्यांच्या लेखनात. इ. स. १८४८ मध्ये लोकहितवादींनी "शतपत्रे" लिहिली त्यात दुसरा बाजीराव, नाना फडणीस तसेच सामान्य ब्राह्मण लोक कसे मूर्ख, नालायक आहेत ते लिहिले होते. त्याचा अत्यंत सविस्तर, तर्कशुद्ध आणि आक्रमक भाषेत समाचार विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या निबंधमालेतून घेतला. नाना फडणीसाबद्दल समकालीन इंग्रज इतिहासकार किती आदराने लिहितात ते त्यांनी लिहिले आहे.

जोतिराव फुल्यांनी आपल्या लिखाणातून ब्राह्मणद्वेष पसरवला. एकच उदाहरण देतो "ज्ञानेश्वर आणि मुकुंदराज या भोंदू साधूंनी सामान्य जनतेला मुसलमानांविरुद्ध लढायला प्रवृत्त करून भारतातले पवित्र महंमदी पाऊल थोपवले." जोतिराव फुल्यांना एका ब्राह्मण कुटुंबातील लग्नसमारंभातून हाकलून दिल्याने ते ब्राह्मणद्वेष्टे झाले असे वाचले आहे. आता ते ब्राह्मणद्वेष्टे नव्हते याचा पुरावा म्हणून काही लोक "१८८२ मध्ये टिळक आणि आगरकर डोंगरीच्या तुरूंगातून सुटल्यावर फुल्यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला होता" असे उदाहरण देतील. त्यातही थोडे राजकारण आहे. कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे तत्कालीन राजा शिवाजीचा छळ करीत असे पुरावे कागलकर या गृहस्थाने टिळक आणि आगरकरांना दिले, त्यावर अवलंबून राहून या दोघांनी बर्व्यांविरुद्ध केसरीत लिहिले. पुढे ते पुरावे खोटे ठरले आणि टिळक- आगरकरांना डोंगरीच्या तुरुंगात १०१ दिवसांची शिक्षा झाली. ज्या कागलकरांनी हे काम केले त्यांचे पुत्र दत्तक द्यायचे होते आणि बर्वे त्याविरुद्ध होते. टिळक - आगरकरांमुळे बर्व्यांचे दिवाणपद गेले, कागलकरांचे पुत्र दत्तक गेले आणि ते पुढे शाहू महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. पुढे टिळक - आगरकरांना आपली चूक समजल्यावर माधवराव बर्व्यांचे आणि आगरकरांचे संबंध मैत्रीचे झाले पण टिळक मात्र बर्व्यांशी कधीही बोलले नाहीत.

त्या काळात ब्राह्मणद्वेष इतका होता की अगदी आगरकरांनीही "ज्याचा त्याचा ब्राह्मणांवर कटाक्ष" असा या लोकांवर टीका करणारा अग्रलेख केसरीत लिहिला होता. पुढे सुधारक विचारांच्या केशवसुतांनी "आम्ही नव्हतो आमचे बाप उगाच का मग पश्चात्ताप" अशा ओळी लिहिल्या.

पुढे अर्थातच दिनकराव जवळकर, केशवराव जेधे, वगैरेंनी ब्राह्मणद्वेषाची परंपरा पुढे चालवली. १९४८ मध्ये गांधीवधानंतर निरपराध ब्राह्मणांच्या हत्या, घरांची मालमत्तेची जाळपोळ वगैरे गोष्टी कमीत कमी १०० वर्षे सुरू असलेल्या ब्राह्मणद्वेषाचा परिणाम म्हणता येतील. भाई माधवराव बागल, नागनाथ नायकवडी यांचेही ब्राह्मणविरोधी लेखन वाचले आहे. काही वर्षांपूर्वी कॉ. शरद पाटलांचे "अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र" असे पुस्तक वाचले. आजही आ.ह. साळुंखे (यांचा मराठीत ब्लागही आहे), पुरुषोत्तम खेडेकर यासारखे लोक ब्राह्मणद्वेषाची परंपरा पुढे चालवत आहेत.

एक सन्माननीय अपवाद म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यांनी आपल्या भाषणातून लोकांना "ब्राह्मण लोकांचा आदर्श ठेवा. आज ब्राह्मण आईबाप स्चतः अर्धपोटी राहूनही मुलांना शिकवतात तसे तुम्ही करा" असे सांगितले. १९२७ मध्ये महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात ब्राह्मणेतर पुढार्‍यांनी (मराठा) आंबेडकरांना "ब्राह्मणांना सत्याग्रहात येऊ देणार नसलात तर तुम्हाला पाठिंबा देऊ" अशी अट घातली होती त्यांना तुमचा पाठिंबा नसला तरी चालेल पण जे लोक मनापासून सत्याग्रहात येऊ इच्छितात त्यांना दूर लोटणार नाही असे खडसावले.

दलित पंथरच्या काही लोकांशी माझे जवळचे संबंध होते, अजूनही आहेत. त्यातले लोक सांगत "खेड्यामध्ये आम्हाला ब्राह्मण लोकांनी कधीही त्रास दिला नाही. आम्हाला त्रास देणारे लोक मराठा. त्यांच्या शेतावर, घरी, लग्नसमारंभात आम्ही वेठबिगारासारखे राबतो."

विनायक

संपादक हो !

संपादक महोदय ,
वरील प्रतिसादातील काही संदर्भ नसलेली वाक्ये संपादीत होण्याची प्रतिक्षा करत आहे !
किंवा...

''जोतिराव फुल्यांनी आपल्या लिखाणातून ब्राह्मणद्वेष पसरवला'' या खोडसाळ वाक्याच्या विरोधात आम्ही लिहिण्याचा प्रयत्न करु...तेव्हा आमच्यावर संपादकांनी मेहरनजर ठेवावी, ही नम्र विनंती...!

अवांतर : सावली पडली तर विटाळ होतो, अशा ब्राह्मणाबद्दलही काही प्रतिसादात येऊ द्या !

-दिलीप बिरुटे

चिल!

चिल बिरुटेसाहेब! :)

तुमचे अभ्यासपूर्ण मत मांडण्याची संधी तुम्हाला आहे ना?

सूचना नकोत

संपादकांना अमुक एका लिखाणातील अमुक भाग संपादित व्हावा वगैरे आशयाच्या सूचना करण्याची अनिष्ट प्रथा बंद करावी.यातून संपादक मंडळींवरचा अविश्वास प्रकट होतो. ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशा स्वरुपाची (कित्येक वेळा झालेली) चर्चाही मला अपेक्षित नाही. (तरीही ती करु इच्छिणार्‍यांचे स्वागत). या दोन समाजामधली तेढ कमी कशी होईल आणि जातीव्यवस्थेचे विसर्जन कसे होईल यावर काही सकारात्मक चर्चा झाली तर बरे.
मढी उकरुन काढू नयेत, हे मलाही पटते. वैयक्तिक पातळीवर मी जात या कल्पनेचा त्याग करण्याचा प्रयत्न करत आहे. ते सगळीकडे कसे होईल हे पहाणे यातच समाजाचे हित आहे, असे मला वाटते.
अवांतरः या संदर्भात उपक्रमावर वावर असलेल्या काही प्रसिद्ध मंडळींची झालेली चर्चा (प्रत्यक्ष, जालावर नव्हे) आठवते. रामदासस्वामींना उद्देशून त्यांच्या शिष्योत्तमाने लिहिलेला 'ब्राह्मण झाला कितीही भ्रष्ट, तरी तो तीन्ही लोकी श्रेष्ठ' या (अर्थाच्या) मतापासून ते आपल्याला ब्राह्मण असल्याची लाज वाटते या मतापर्यंत अनेक मते व्यक्त झाल्याचे आठवते. त्या चर्चेत तरुण वयाच्या काही लोकांनी जात ही कल्पना त्यांच्या दैनंदिन आयुष्यातून जवळजवळ हद्दपार झाली असल्याचे सांगितले होते. आपण कुठल्या जातीचे आहोत याचा रोजच्या आयुष्यात काही संबंध येत नाही, किंबहुना जात ही कल्पनाच कालबाह्य होत चालल्याचे त्यांचे मत आशा पल्लवित करणारे वाटले होते.
सन्जोप राव

सूचना

संपादकांना अमुक एका लिखाणातील अमुक भाग संपादित व्हावा वगैरे आशयाच्या सूचना करण्याची अनिष्ट प्रथा बंद करावी.

ही आणखी एक सूचना.

जातीपातींचे विषय सूज्ञांनीच टाळायचे नाही म्हटल्यावर जात निघून जायची कशी? अश्या विषयांना फुंकर घालून आग आणखी भडकते. तेच या लेखात झालेले दिसले.

-राजीव.

मनातलं बोललात !

जातीपातींचे विषय सूज्ञांनीच टाळायचे नाही म्हटल्यावर जात निघून जायची कशी? अश्या विषयांना फुंकर घालून आग आणखी भडकते. तेच या लेखात झालेले दिसले.

सहमत आहे !

-दिलीप बिरुटे

महात्मा फूले...

>>जोतिराव फुल्यांनी आपल्या लिखाणातून ब्राह्मणद्वेष पसरवला.

लेख अजून वाचला नाही, त्यामुळे प्रतिसाद अवांतर वाटू शकतो,पण वरील एका प्रतिसादातील खटकणार्‍या वाक्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न तोकडाही असू शकतो. पण फुल्यांविषयी जे जाणीवपूर्व गैरसमज कसे करुन दिल्या जातात त्याचे उत्तम उदाहरण वरील प्रतिसादातील वाक्य असावे.

हिंदूधर्मातील गुणदोषांच्या बाबतीत सामाजिक न्यायाची भुमिका मांडतांना अशा व्यवस्थेचा पुरस्कार करणार्‍या ब्राह्मांणावर त्यांनी जी तिखट प्रतिक्रिया नोंदवली, तेव्हा त्या विचारांचा त्रास काही कर्मठ लोकांना होणे साहजिकच होते. धर्माचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करणार्‍यांना ठोकले तर फुल्यांचे चुकले कुठे ? आपण अशावेळी न्यायाच्या बाजूने राहिले पाहिजे. जे ढोंग होते, ज्याची भिती दाखवून गोरगरिबांना फसवले जात होते, तेव्हा त्यांनी अशा चोरांना ठोकले तर त्याला ब्राह्मण द्वेष म्हणावा यासारखी दुसरी संकूचित वृती कोणती नसावी. जे अनिष्ट होते त्याला त्यांनी टीकेचा विषय बनवला. अनिष्ट गोष्टी टाकून दिल्या पाहिजे यासाठी त्यांनी झोंबणारी टीका केली. हजारो वर्षापासून रोमा-रोमात भिनलेला अनिष्ट विचार बदलून टाकणे सोपे नव्हते. धर्मग्रंथातील विचार सांगण्याचा हक्क केवळ इश्वरकृपेने आम्हालाच आहे, ज्ञानाचा अधिकार आम्हालाच असल्याने अज्ञानी लोकांना लुबाडणे, देव आमच्याशी बोलतो, देवाशी संपर्क साधण्याची कला आम्हालाच आहे,असे म्हणून भोळ्या भाळ्या जनतेला फसवणार्‍यांच्या चड्ड्या खेचल्या तर त्याला ब्राम्हणद्वेषाचे नावे देऊन मोकळे व्हावे, हे आम्हाला काही पटणारे नाही.
तूर्तास इतकेच...

-दिलीप बिरुटे

केसरीकारांचे दुटप्पी धोरण

विचार वेध संमेलन:अध्यक्षीय भाषण या पुस्तकातील हा उतारा:
ब्राम्हणेतरांना सन्मान मिळाला तर जातीमुळे आणि तोच सन्मान जर ब्राम्हणांस मिळाला तर पात्रतेवरून असा दुटप्पीपणा त्या काळी केसरीने केला होता.

केसरीकारांच्या दुटप्पी धोरणाची परंपरा आपण अजूनही पुढे नेत आहोत.

बरोबर

अज्ञानी लोकांना लुबाडणे, देव आमच्याशी बोलतो, देवाशी संपर्क साधण्याची कला आम्हालाच आहे,असे म्हणून भोळ्या भाळ्या जनतेला फसवणार्‍यांच्या चड्ड्या खेचल्या तर त्याला ब्राम्हणद्वेषाचे नावे देऊन मोकळे व्हावे, हे आम्हाला काही पटणारे नाही.

अंधश्रद्धेला जात नाही. अब्राह्मणी परंपरेत असलेले देवऋशी, मांत्रिक, भगत हे देखील तेच् करतात. त्यामुळे हा काही ब्राह्मणद्वेष नाही. फुलेंनी सत्यशोधकी पर्याय दिले.
प्रकाश घाटपांडे

सकारा्त्मकतेच्या शोधात

"ज्ञानेश्वर आणि मुकुंदराज या भोंदू साधूंनी सामान्य जनतेला मुसलमानांविरुद्ध लढायला प्रवृत्त करून भारतातले पवित्र महंमदी पाऊल थोपवले."

क्रूपया पूर्ण सन्दर्भ द्यावा. जूनी मढी उकरून काढण्यापेक्षा चर्चा जर आहे ते असे का आहे यावर केन्द्रीत केली तर बरे वाटेल (मूळ लेखाचाही हाच हेतू असावा असे वाटते). पूर्वग्रह सोडल्याशिवाय उत्तर सापडणे कठीण आहे.

आंबेडकरांचे वेगळेपण

महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या प्रसंगी काँग्रेस व इतर पक्षांकडून सहानुभूती वगळता इतर मदत मिळत नसल्याने सत्यशोधक समाजाकडून मदत घ्यावी असा आग्रह आंबेडकरांना अनेकांनी केला होता. त्यावेळी आंदोलनात एकही ब्राम्हण असेल तर आम्ही सहभागी होणार नाही असे सत्यशोधक समाजाच्या जेधे-जवळकर यांनी सांगितले. आंबेडकरांनी मात्र या गोष्टीला विरोध केला होता. हा प्रसंग मीही वाचला आहे. आंबेडकरांचे वेगळेपण अशा अनेक प्रसंगांतून दिसून आले आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सन्मान्य डॉ. आंबेडकर आणि संस्कृत

आंबेडकरांचे वेगळेपण अशा अनेक प्रसंगांतून दिसून आले आहे.

ज्यावेळी हिंदी ही राष्ट्रभाषा असावी असा प्रस्ताव संसदेत आला त्यावेळी त्या प्रस्तावाला दाक्षिणात्यांनी कडाडून विरोध केला. त्यावर अनेक चर्चा फैरी झडल्या. त्यात संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी असा प्रस्ताव सुद्धा बहुमताने पुढे आला होता. ज्याला डॉ. आंबेडकर ह्यांनी संपूर्ण पाठिंबा जाहीर केला किंबहुना त्यांनीच पं. श्री. लक्ष्मीकांत मैत्र ह्यांच्या सहयोगाने हा प्रस्ताव मांडला होता. इतकेच नव्हे तर त्यांचे संसदेत आपसात संस्कृत भाषेतूनच संभाषण चालले ज्याची बातमी प्रत्येक महत्त्वाच्या वृत्तपत्रात मुखपृष्ठावर आली होती.

The Leader - 13 Sept. 1949 They confer in Sanskrit - An incident of agreeable surprise was the conversation in Sanskrit between Dr. Ambedkar and Pt. Lakshmikant Maitra, both of whom have given notice of an ammendment suggesting Sanskrit as an official language.

दै. हिन्दुस्तान १२-०९-१९४९ राजभाषा संस्कृत हो - इस विषय में प्रश्न किएँ जाने पर डा. अम्बेडकरने पी.टी.आय. के संवाददाता से कहा - क्यों ! संस्कृत में क्या दोष है ?

दै. आज १५-०९-१९४९ डा. अम्बेडकरका संस्कृत में वार्तालाप - भाषा के प्रश्न पर अम्बेडकर तथा पं. लक्ष्मीकांत मैत्र आपस में संस्कृत में बातचीत करने लगे । स्मरण रहे कि आप दोनों ने संस्कृत को राजभाषा मानने के लिएँ संशोधन उपस्थित किया हैं ।

इतर इंग्रजी वृत्तपत्राचे संदर्भ माझ्या खरडवहीत वाचावेत ही वि.वि. इथे रोमन अक्षरे टंकता येत नाही आहेत.

ह्या पार्श्वभूमीवर वारंवार तोंडाने आंबेडकरवादाची जपमाळ ओढणार्‍या आणि त्याच वेळी संस्कृतला विरोध करणार्‍या ढोंगी व दुटप्पी तथाकथित दलित नेत्यांची किव येते. त्यांना मा. आंबेडकर कळलेच नाहीत असे खेदाने म्हणावे लागते. मात्र कळून-सवरून जर ते खोट्या अहंकारापायी संस्कृतला विरोध करत असतील तर तो त्यांचा दोष नसून त्यांच्या ह्रस्वदृष्टीचा दोष आहे असेच म्हणावे लागेल.
_______________________________________________
भो भद्र: कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

सहमत

ह्या पार्श्वभूमीवर वारंवार तोंडाने आंबेडकरवादाची जपमाळ ओढणार्‍या आणि त्याच वेळी संस्कृतला विरोध करणार्‍या ढोंगी व दुटप्पी तथाकथित दलित नेत्यांची किव येते. त्यांना मा. आंबेडकर कळलेच नाहीत असे खेदाने म्हणावे लागते. मात्र कळून-सवरून जर ते खोट्या अहंकारापायी संस्कृतला विरोध करत असतील तर तो त्यांचा दोष नसून त्यांच्या ह्रस्वदृष्टीचा दोष आहे असेच म्हणावे लागेल.

सहमत आहे.

संस्कृत = ब्राह्मण असे समीकरण करून राजकारण करणे सोपेच जाते.
संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी असा प्रस्ताव मान्य झाला असता तर आज अनेक बाबतीत परिस्थिती वेगळी असती हे निश्चित!

असो.

आपला
गुंडोपंत

नवीन माहिती

आंबेडकरांचे मत संस्कृतला राष्ट्रभाषा करावे असे होते ही माहिती मला नवीनच आहे. या विषयावर आणखी सविस्तर माहिती देणारा वेगळा लेख लिहिलात तर वाचायला आवडेल.

विनायक

धन्यवाद

ही नविन माहिती विस्तृत संदर्भासह दिल्याबद्दल धन्यवाद.

पटले नाही

आंबेडकरांनी संस्कृतबाबत व्यक्त केलेल्या मताची तारीख १९४९ आहे असे दिसते. स्वतः आंबेडकरांच्या लेखनात कालानुरुप परस्परविरोधी मते व्यक्त झाली आहेत. किंबहुना स्वतः आंबेडकरांनीच हे मान्य करताना खालील वाक्याचा आधार घेतला आहे.
Emerson has said that consistency is the virtue of an ass and I don't wish to make an ass of myself. No thinking human being can be tied down to a view once expressed in the name of consistency. More important than consistency is responsibility

मात्र आंबेडकरांचे भाषाविषयक अधिकृत धोरण किंवा मत ज्याला म्हणता येईल हे १९५५ साली प्रकाशित झालेल्या त्या्च्या "थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स" या पुस्तकात वाचता येईल. या पुस्तकात व्यक्त केलेल्या मतांनुसार केंद्र सरकारची राज्यकारभाराची भाषा ही सुरुवातीला हिंदी असावी आणि त्यानंतर संपूर्ण भारत सुशिक्षित झाल्यावर ती इंग्रजी करण्यात यावी असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर एक राज्य - एक भाषा असे तत्त्व असावे (जे तत्कालीन सरकारच्या एक भाषा एक राज्या या तत्त्वाशी विसंगत होते.) आंबेडकरांचा मृत्यू १९५६ मध्ये झाला त्यामुळे हे मत आंबेडकरांचे शेवटचे मानता येईल.

दुसरी गोष्ट अशी की आंबेडकरांचे जे काही तुटपुंजे लेखन मी वाचले आहे त्यात कुठेही संस्कृताबद्दल द्वेष किंवा प्रेम असे कटाक्षाने व्यक्त झालेले नाही. आंबेडकर स्वतः मराठी, इंग्लिश, फारशी, उर्दू, संस्कृत आणि पाली या भाषा उत्तमप्रकारे जाणणारे होते. किंबहुना पालीभाषेसाठी शब्दकोश तयार करण्याचे काम त्यांनी केले आहे असे वाटते. (??) मात्र आंबेडकरांनी त्यांच्या सर्व भूमिकांमध्ये भावनांपेक्षा विवेकवादाचा पुरस्कार केला आहे. संस्कृतातील प्रसिद्ध असलेल्या साहित्याबाबत - वेद, स्मृती, उपनिषदे आणि भगवद्गीता याबाबत आंबेडकरांची मते ही तीव्र विरोधाची होती. सांख्यिकी वगळता संस्कृत लेखनामध्ये तत्त्वज्ञानविषयक किंवा मानवी जीवनमूल्यांविषयक स्वतःचे असे काहीही भाष्य नाही असे त्यांचे मत होते.

तिसरी गोष्ट अशी की एखाद्या राष्ट्राची भाषा किंवा धोरण हे सर्वसामान्यांच्या सोयीप्रमाणे असावे असे त्यांचे मत होते. तत्कालीन परिस्थितीमध्ये संस्कृतला राष्ट्रभाषा केल्याने सर्वसामान्यांची काही सोय झाली असती असे वाटत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माझे मत

"थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स"

हे पुस्तक वाचल्यावरच देईन. महापुरुषांशी संबंधित विषयांत पुस्तके / ग्रंथ न वाचता मते देण्याची घिसाडघाई करणे योग्य नव्हे. नाहीतर लोक उचलली जीभ लावली टाळ्याला असे म्हणतात.
_______________________________________________
भो भद्र: कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

संदर्भ वगैरे

मी वाचलेली पुस्तके

शतपत्रे - लोकहितवादी
जोतिराव फुले समग्र वाङमय
निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर
आगरकर लेखसंग्रह
देशाचे दुश्मन - दिनकरराव जवळकर
अब्राह्मणी सौंदर्यशात्र - कॉ. शरद पाटील
शोध बाळगोपाळांचा - य. दि. फडके
लोकमान्य टिळक - "केसरी" तील अग्रलेखांचे तीन खंड
न. चि. केळकर - टिळक चरित्र तीने खंड

विनायक

धन्यवाद

अहो सन्दर्भ म्हणजे पुस्तकाचे नाव आणि प्रूष्ठ क्रमान्क हे मला अपेक्षित होते. आपण वाचलेल्या पुस्तकान्ची यादी दिल्याबद्दल धन्यवाद.

हे असे का? | पुढे काय?

हे असे का? याची कारणे इतिहासात सापडतीलही. गेल्या काही दशकांत या इतिहासाचा सोयीस्कर अर्थ लावून राजकीय फायदा उठवण्याचे प्रयत्न झाल्याने प्रश्न चिघळल्यासारखा वाटतो. विनायक यांनी त्यांच्या प्रतिसादात लिहिले आहे "खेड्यामध्ये आम्हाला ब्राह्मण लोकांनी कधीही त्रास दिला नाही. आम्हाला त्रास देणारे लोक मराठा. त्यांच्या शेतावर, घरी, लग्नसमारंभात आम्ही वेठबिगारासारखे राबतो" हे खरेच आहे. खेड्यांमध्ये किंवा महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये ब्राह्मणद्वेष तितका नाही जितका पुणे परिसरात आहे. त्याला पुण्यातील ब्राह्मणांची तुम्ही लेखात म्हटल्याप्रमाणे "जातीचा दुराभिमान बाळगणारी, इतरांना तुच्छ लेखणारी" वृत्ती जबाबदार असावी असे वाटते. इतरत्र ब्राह्मण समाज इतर समाजात बर्‍यापैकी मिसळून गेला आहे आणि त्यांना एकमेकाविषयी थोड्या प्रमाणात का होईना आदर आहे. पुन्हा ब्राह्मणांतील पोटजातींपैकी काही अधिकच कट्टर*/आक्रमक असल्याने इतर जातीयांचे एकूण ब्राह्मणसमाजाविषयी प्रतिकूल मत तयार होते. पुण्यात बर्‍याच तरूण ब्राह्मणांमध्ये अजूनही इतर जातींच्या लोकांविषयी तुच्छतेची भावना आहे.

महत्त्वाचा मुद्दा असा की पुढे काय? तर मला वाटते हा प्रश्न काळाच्या रेट्यापुढे आणि व्यावसायिकतेच्या पार्श्वभूमीवर फार दिवस टिकणार नाही. तसेही जेव्हापासून खाजगी कंपन्या रोजगाराचा सर्वात मोठा स्रोत झाल्यात आणि जेव्हापासून खाजगी शिक्षणसंस्था सरकारी संस्थांच्या तोलामोलाच्या झाल्यात आणि जेव्हापासून आंतरराष्ट्रीय कवाडे भारतीयांसाठी उघडलीत तेव्हापासून या प्रश्नाचे महत्त्व बर्‍याच लोकांसाठी काहीही नाही. जे काही महत्त्व आहे ते उत्तरोत्तर कमीच होत जाईल.

* थोडे अवांतर वाटेल असा विचार मागे एका चर्चेत निघाला होता. "बाटलेला मुसलमान अधिक कडवा असतो" या म्हणीनुसार "नव्याने ब्राह्मण समाजात आलेले अधिक आक्रमक असतात". कोकणस्थ ब्राह्मण किंवा ज्यांना चित्पावन म्हटले जाते त्यांच्या आक्रमकपणामुळे ब्राह्मणद्वेष वाढला असावा. हा समाज काही शतकांपूर्वी ब्राह्मण म्हणून समजू जावू लागला असे अभ्यासकांचे मत असल्याने सगळेच ब्राह्मण हे भारतीय नाहीत असा प्रचार हल्ली केला जातो. (डिस्क्लेमरः हे माझे मत नाही.)

रसपूर्ण

* थोडे अवांतर वाटेल असा विचार मागे एका चर्चेत निघाला होता. "बाटलेला मुसलमान अधिक कडवा असतो" या म्हणीनुसार "नव्याने ब्राह्मण समाजात आलेले अधिक आक्रमक असतात". कोकणस्थ ब्राह्मण किंवा ज्यांना चित्पावन म्हटले जाते त्यांच्या आक्रमकपणामुळे ब्राह्मणद्वेष वाढला असावा.

आपले मत रसपूर्ण आणि चिंतनीय आहे.
पण असे नवीन ब्राह्मण येऊ शकणे नंतर चित्पावन कोकणस्थांनी बंद केले असावे का?

आपला
गुंडोपंत

वाद वेदोक्ताचा

या ब्लॉगवरील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाबाबत लिहिलेला वाद वेदोक्ताचा हा लेखही वाचनीय आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

:(

जाता जाणार नाही ती जात हेच खरे!

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

मंडळी उपाय सांगा आणि ते तुम्ही किती अमलात आणता तेही सांगा.

जात कशी वाईट असे म्हणता म्हणता माझ्या जातीचे (जतींबद्दलच्या विचारचे किंवा माझ्या जातीच्या (प्रश्नार्थक) महारुषांचे) समर्थन मी किती अहमआहिकेने करतो हे दाखवण्यासाठी चर्चेचा मोठा भाग खर्ची पडतो आहे. ब्राह्मण काय , मराठा काय किंवा महार काय जातीचा अभिमान बाळगणारे, लाज बाळगणारे तिच्या समर्थनासाठी पुस्तकीज्ञान खर्ची करणारे सगळेच लबाड आहेत. मी किती पूरोगामी हे न सांगता आमची जात कशी पूरोगामी हे सांगण्याची आता नवी टूम निघाली आहे. जातीची या व्यवस्थेची असली फडतूस समर्थनगीरी करण्यापेक्षा म्हणू द्या ना कोणत्याही जातीला कुणालाही काही. तुमच्या माझ्या पूर्वजांचे नाव घेऊन कुणी बोलले तर प्रतिवाद करा. ही जात अशी होती म्हणणा-याला ती जात तशी नव्हती असे सांगणे हा ही जातीचाच प्रसार आहे. शेवटी भुकेल्या पोटाशी जेव्हा सगळ्या गोष्टी येऊन पोहोचतात तेव्हा जात कुठे असते. तेव्हा फक्त मुलभूत प्राणच तेवढा असतो ना. मग त्याचीच धरा ना लाज जरा. कुणाची जात ओळखण्याचा प्रयत्न करणार नाही की माझी जात कुठे दाखवणार नाही अशी प्रतिज्ञा अमलात आणा. जातींनी पूर्वी पापे केली ती काही जातींनी भोगली आता आम्ही पापे करू तुम्ही भोगा हे कुठपर्यंत. विवेक जागा करा. याचाही शेवट होईल. स्वतःपासून सुरूवात कराल तर आशावादी रहायला काहीच हरकत नाही. शेवटी जातीप्रथा वाईट किती यावर खरडत बसण्यापेक्षा ही नाहीशी करायला काय उपाय करता येईल आणि तो स्वतः तुम्ही किती अमलात आणता ते सांगा.

सहमत!

कुणाची जात ओळखण्याचा प्रयत्न करणार नाही की माझी जात कुठे दाखवणार नाही अशी प्रतिज्ञा अमलात आणा

याचे पालन आम्ही काही मित्र गेली ५-६ वर्षं करतो आहोत, महाविद्यालयात असताना ठरवले होते कि कुणी ही जात विचारली कि भारतीय आहोत असे सांगायचे. तेव्हाच सर्व "जाती-दर्शक गोष्टींचा" त्याग केला.

सहमत

कुणाची जात ओळखण्याचा प्रयत्न करणार नाही की माझी जात कुठे दाखवणार नाही अशी प्रतिज्ञा अमलात आणा.
सहमत आहे. अडचण कुठलाही सरकारी फॉर्म भरताना येते.

----

सरकारचे काय जाते?

अडचण कुठलाही सरकारी फॉर्म भरताना येते.

अडचण येण्याची शक्यता कमी आहे कारण खरेतर सरकारला आपल्या जातीशी काहीएक घेणे देणे नसते. मी गेली अनेक वर्षे अश्या अर्जांमध्ये हिंदु असे लिहित आलेले आहे. आजपर्यंत तरी कोणी त्यावर आक्षेप घेतलेला नाही.

१-२ जणांनी कुतुहलापोटी विचारले तेव्हा मी त्यांना "तुम्ही आम्ही सकल हिंदु बंधु बंधु" हे गीत उलगडून सांगितले.

असो. पुढच्या वेळी आपण जात ह्या रकान्यात झेझेर, टिलोम्ब, कपुड, ढणेर, सलोप, टपीट असे काही सुद्धा लिहून पहा. कोणीही आक्षेप घेणार नाही.

जाता जाता : आमच्या वर्गात एक आचरेकर नावाची मुलगी होती. ती सदैव लोकांना आपण दैवज्ञ ब्राह्मण आहोत असे सांगायची मात्र ज्या दिवशी बाई वर्गात इ.मा.व. अर्ज भरायला आणायच्या त्या दिवशी ती सोनार असायची. आम्हाला ५-६ वीत ह्या गोष्टींची मजा वाटायची.

माझी दुसरी एक मैत्रिण अखंड सारस्वत म्हणजे कसे योग्य विचार करणारे, सुशिक्षित, पुढारलेले आहेत त्याची टिमकी वाजवायची. पण ज्या दिवशी मी म्हटले की पायात चामड्याचे विशेष बुट घातले आहेत म्हणून एका अपंग मुलाला मंगेशीच्या देवळात प्रवेश नाकारला जातो आणि त्याचा जाहीर निषेध एकाही बुद्धिनिष्ठ सारस्वताने करू नयेत ह्या दोन्ही गोष्टी गर्हणीय आहेत तेव्हापासून ती टिमकी कायमची म्यान झाली आहे.

खरोखरच जातप्रथा मानणे आणि त्याचा दुरभिमान बाळगणे हे दोन्ही घातुकच.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

एक प्रसंग

सरकारी नोकरीत पहिला दिवस. हेडक्वार्टरला हजर झालो.
शासकीय कर्मचार्‍याची विहित नमुन्यात माहिती भरायची होती. समोरचा माणुस माहिती विचारत होता. मी दिली. धर्म - जात कॉलम आला.
मी म्हणालो माणुसकी हाच धर्म व मानव जात. निसर्गानुसार पुरुष जात. मी तुम्हाला अभिप्रेत असलेला जात धर्म वगैरे मानीत नाही. सगळे हॅहॅहॅ करुन हसले.
समोरचा म्हणाला आम्हाला माहित आहे तुझा चुलता इथच आहे. त्यांची जी जात धर्म तोच तुझा. आमी लिहितो बरोबर. आरे बाबा शासकीय नोकरीत राखीव जागांची भानगड असते म्हणुन प्रत्येकाची जन्मानुसार जात लागते इथे. बिंदुनामावली साठी. तु मान नाहीत नको मानु!

प्रकाश घाटपांडे

जात - रिलोडेड

इथे अडचण म्हणजे रकान्यात काय भरायचे ही अडचण नाही. मुद्दा हा की जोपर्यंत हा रकाना अस्तित्वात आहे तोपर्यंत जात जाणार कशी? या रकान्याचा अर्थ असा होतो की आजही जातीला सरकारची मान्यता आहे. आणि सरकारची मान्यता असेल तर लोकांची मान्यता असणे साहजिकच.

जात हा एक भाग झाला. पोटजातींचे काय? माझ्या मावसभावाचे सासर कोकणस्थ. प्रत्येक समारंभात "देशस्थ आणि गैरशिस्त" हे ऐकावेच लागते. मागे एका दाक्षिणात्य मित्राबरोबर जेवताना त्याला हे सांगितले तर तो हसला. म्हणाला, "इट्स नथिंग, इट्स जस्ट टिझिंग." मग त्याने त्याची गोष्ट सांगितली. तो मद्रासी ब्राह्मण, पोटजात विसरलो. तो जर एखाद्या अय्यंगाराच्या घरी गेला तर ते त्याला अस्पृश्यासारखे वागवतात. त्याला वेगळ्या भांड्यातून पाणी देणे, स्पर्श न करणे इ. मी म्हणालो, बाबा रे, तू त्यांच्या जातीतला, त्यांची भाषा बोलणारा. तुला ते असे वागवतात तर मला तर झुरळ, किडा-मुंगीची किंमत देतील. तो परत हसला. मी काय समजायचे ते समजलो.

शाळेत असताना साने गुरूजींची खरा तो एकची धर्म ही कविता रोज म्हणायला लागायची त्यावेळी तिचा अर्थ कळला नाही कारण दंगा करण्याकडे जास्त लक्ष असायचे. आता अर्थ कळतो आहे पण वळत नाही. गुरूजी कधी भेटले तर त्यांना विचारायचे आहे, ही कविता मदर टेरेसा, गांधी यांच्यासाठी आहे हो. आमच्यासारख्या सामान्य, पूर्वग्रहाने ग्रासलेल्या, रूढींच्या बेड्यात अडकलेल्यांसाठी पण काहीतरी लिहा ना.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

अय्यर

तो अय्यर असावा.
(द्रविड अय्यरांना आर्य व अय्यंगरांना निमाआर्य समजतात असे द्रविडाकडून ऐकून आहे. हल्ली तामिळनाडूत अय्यर दुर्मिळ आहेत, मुंबईतवगैरे दिसणारे तामिळ साधारणपणे अय्यर आहेत ज्यांना (कलयिंगार) करुणानिधीचे तुपातल्या तामिळमधले भाषण कळणारही नाही अशीही भिती ऐकून आहे.)

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

रकाने

सरकारी रकाने, वेगवेगळ्या जातींच्या आर्थिक स्थितीचा तुलनात्मक अभ्यास व त्या भेदाचा जातीशी असलेला संबंध आरक्षणाच्या माध्यमातून हटवण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याने त्याला तो फारसा खटकत नाही.

रकाने हटवल्याने किंवा जातीवाचक शब्द असांसदिक/बेकायदा ठरवल्याने जाती जातील असे वाटत नाही. १०० कोटी भारतीय किंवा ८० कोटी हिंदू एक आहेत ही संकल्पना रुजणे कठीण आहे. माणसाला इतके मोठे आकडे झेपत नसावेत. (वसुधैव कुटुंब म्हणणार्‍या श्रीकृष्ण (की व्यास) यांच्या काळी लोकसंख्या किती होती हे पाहणे रोचक ठरावे.) भारत एक असलाच तरी माझा प्रांत, माझा तालुका हे चालायचेच. तशीच माझी जात ही अस्मितेच्या भुकेच्या शमनासाठी व स्वतःच्या ओळखीसाठी गरजेची आहे असे वाटते. (शेवटी समोरचा तुमच्या सारखाच आहे हे कितीही समजावले तरी पचणे कठीणच. वेगळेपण, श्रेष्ठत्व शोधणे सहाजिक असावे.)

त्यामुळे जाती जाणार ही आशा पुसट आहे. मुद्दा आहे श्रेष्ठत्वाचा व इतरत्र म्हटल्याप्रमाणे 'मिरवण्याचा'. तुमची / माझी भाषा, जात किंवा धर्म शास्त्रीय दृष्टया श्रेष्ठ सिद्ध होणार नसल्याने, एखाद्या अफ्रिकन टोळीच्या कितीही वेडगळ वाटणार्‍या पोषाखां व प्रथांप्रमाणे यांचा ही 'सांभाळ' करावा असे त्याला वाटते.

जाती पासून दूर जाण्यासाठी आपल्या प्रांतातून बाहेर राहणे व पूर्णवेळ काम मिळवणे हे प्रभावी (व यातला क्षुल्लकपणा लक्षात येण्यास पुरेसे) पर्याय आहेत असे वाटते.

अवांतर - जातीवर कितीही चर्चा केल्याने त्याच्यालेखी जातीयता वाढत नाही. उलट त्यात काय वेगळेपणा आहे, आपल्या प्रमाणेच त्यांच्याही वेडगळ प्रथा, समज, दुराभिमान आहेत हे जाणताना मजा येते. असेच धर्मा/प्रांता/भाषेबाबत.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

साशंक

सरकारी रकाने, वेगवेगळ्या जातींच्या आर्थिक स्थितीचा तुलनात्मक अभ्यास व त्या भेदाचा जातीशी असलेला संबंध आरक्षणाच्या माध्यमातून हटवण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याने त्याला तो फारसा खटकत नाही.

याबाबत साशंक आहे. स्वातंत्र्यानंतर आरक्षण या हेतूने करण्यात आले होते हे मान्य. पण सध्याच्या स्थितीमध्ये आरक्षणाच्या सर्व पैलूंचा तुलनात्मक अभ्यास झाला आहे का याची कल्पना नाही. नसल्यास तो व्हायला हवा असे वाटते.
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली

येता येता:

आमच्या गावात पुराणिक काका राहतात. त्यांना मटण-मांसाचा अतिशय त्रास होई. मांसमच्छी खाणारे लोक किती पापी आहेत हे सांगताना त्यांची जीभ थकत नसे. आम्ही त्यांच्या मुलीची ओळख आमच्या गावातल्या अब्दुल खाटकाच्या मुलाशी करून दिली. दोघांनी पळून लग्न केलं. आता पुराणिककाका टिमकी वाजवत नाहीत.

आमच्या गल्लीत सावंत मामा राहतात. ब्राह्मणांच्या सपक जेवणाला ते नेहमी नावं ठेवतात. त्यांच्याही मुलीने एका कर्‍हाडे ब्राह्मणाशी लग्न केलं. आता सावंतकाका तिच्या घरी जाऊन तेच सपक जेवण भुरके मारत जेवतात.

आमच्या इमारतीत एका पंडित आडनावाच्या बाईंनी एका दलिताशी लग्न केलं. आपल्या मुलांना आरक्षण मिळावं म्हणून सर्व खटपट या बाई स्वतः आनंदाने करायच्या.

----------------------
संपादक हो, तुम्हाला वरील वाक्यांत काहीच आक्षेपार्ह दिसत नसणार कारण मृदुलाताई तांब्यांच्या प्रतिसादासारखाच माझा प्रतिसाद आहे.

जात कशी वाईट असे म्हणता म्हणता माझ्या जातीचे (जतींबद्दलच्या विचारचे किंवा माझ्या जातीच्या (प्रश्नार्थक) महारुषांचे) समर्थन मी किती अहमआहिकेने करतो हे दाखवण्यासाठी चर्चेचा मोठा भाग खर्ची पडतो आहे.

खरं बोललात बघा बाबासाहेब.

अहो, माझी जात वाईट नाही हे दाखवताना दुसर्‍या जाती कशा बदमाश आहेत हे दाखवण्यातही वेळ वाया जातोच की. सृष्टीलावण्यांच्या प्रतिसादासारखा.

मी गेली अनेक वर्षे अश्या अर्जांमध्ये हिंदु असे लिहित आलेले आहे.

त्याने काय मोठा फरक पडतो? आडनावावरून जात बर्‍याचदा कळून येते आणि आडनावावरून पटकन कळली नाही तर बोलण्यावरून कळते आणि तरीही कळली नाही तर जी वाटेल ती मानून घेतातच लोक.

- राजीव.

एक शंका

कारण मृदुलाताई तांब्यांच्या प्रतिसादासारखाच माझा प्रतिसाद आहे.

ह्या कोण आता? त्यांचा तुमचा संबंध काय?

(काही मजकूर वगळला. --संपादक)
________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

हे कोणते समाजशास्त्र?

अहो, माझी जात वाईट नाही हे दाखवताना दुसर्‍या जाती कशा बदमाश आहेत हे दाखवण्यातही वेळ वाया जातोच की. सृष्टीलावण्यांच्या प्रतिसादासारखा.

जगात कोणतीही जात वाईट नसते. मात्र माणसे वेगळ्या विचारांची असू शकतात. लक्षात घ्या, मी वाईट हा शब्द वापरत नाही आहे. अशी वेगळ्या विचारांची माणसे समाजातील सर्व घटकात असतात. कोणत्याही जातीला बदमाश हे संबोधन आपण का वापरता?

तसेच मी अनेक वनवासी कुटुंबांमध्ये अनेक महिने वाढले. त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य बनून. त्यामुळे त्यांची जात ती माझी जात. असे असताना माझी जात कशी वाईट नाही हे दाखवण्याची मला आवश्यकताच काय?
(काही मजकूर वगळला. वैयक्तिक रोख टाळावा. -- संपादक)
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

मुद्दा

मुद्दा कागदावर लावण्याचा नाही आहे, तर जात मिरवण्याचा आहे. समाजात वावरताना जात मानु नका, त्या जातित जन्माला आलात म्हणुन सरकारी कागदावर मांडा हवे तर.

चर्चा महत्त्वाची

हल्लीच ज्योतिबा फुले यांचे थोडे लेखन वाचायला घेतले आहे. त्यामुळे येथील चर्चेत मला रस आहे, आणि त्याबद्दल उत्तर देत आहे. हा विषय मुळातल्या "माझ्या संग्रहातील पुस्तकां"पासून वाहावत चालला आहे, असे जाणवते, म्हणून वरील फुले यांच्याबाबतचे काही प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवलेत तर बरे, असे मला वाटते.

फुले यांचे लेखन कालबाह्य तर नाहीच. हल्लीच "पुराणातील कथा अतिप्रगत विज्ञानाचे इतिवृत्त आहे का?" असा विषय उपक्रमावर निघाला होता. त्याविषयी फुल्यांनी बारीक विचार केला आहे (पुराणातील चमत्कारी कथा तथ्यात्मक असल्याच्या विरोधात त्यांचे मत आहे.) पुराणे तथ्यात्मक आहेत असा विचार जर अजून चर्चा करण्यालायक आहे, तर ती पुराणे जात्यंधतेने बुजबुजलेली आहेत, हे फुल्यांचे निरीक्षण आणि त्यांचा त्याविषयी तळतळाट निश्चितच चर्चेच्या दृष्टीने कालबाह्य नाही.

योगायोगाने वर विनायक यांनी दिलेल्या वाक्याचा मथितार्थ असलेले वाक्य मी वाचत असलेल्या एका पुस्तकात आहे.

नाव : सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक
प्रकाशक : गजेंद्र विठ्ठल रघुवंशी, २४२ (ब) शुक्रवार पेठ, पुणे-२
(मूळ ग्रंथाचे प्रकाशनवर्ष १८८९; माझ्याकडील आवृत्तीची प्रकाशन तारीख दिलेली नाही)

फुले यांचे स्फोटक लेखन वाचताना या ग्रंथाची प्रस्तावना लिहिणारी रमेश रघुवंशी यांचे पुढील शब्द विचारात घेणे योग्य आहे :

फुल्यांनी आयुष्यभर ब्राह्मणी मनोवृत्तीवर अगदी कडाडून हल्ला केला. दुर्दैवाने त्यांचे विचार पूर्णपणे समजून न घेता बहुजनसमाजातील स्वार्थी व दुष्ट पुढार्‍यांनी त्यांचा ब्राह्मणद्वेष फक्त घेतला व खेडोपाडी ब्राह्मण जातीच्या लोकांचा छळ केला. ... "बाह्मणी आडपडद्यात गुलामगिरी" हे त्यांच्या ग्रंथाचे नाव या दृष्टीने मोठे सार्थ आहे. फुल्यांचा राग ब्राह्मण जातीवर नव्हता तर ब्राह्मणी मनोवृत्तिवर होता. हेच नेमके त्यांच्या अनुयायांनी व त्यांच्या शत्रूंनी अजूनपर्यंत ओळखलेले नाही. (पान ४)
महात्मा फुल्यांच्या काळात ज्ञान-विज्ञान एवढे वाढले नव्हते. मानसशास्त्रात एवढी प्रगती झाली नव्हती. म्हणून या सर्वाचा दोष त्यांनी ब्राह्मण जातीवर लादला आहे. आज मानसशास्त्राच्या शोधामुळे आपण सांगू शकतो, ब्राह्मणदेखील या कल्पनेचे बळी होते. तेही निष्ठापूर्वक ही मूल्य मानत होते. ते उच्च स्थानी होते, पण इतरांएवढेच अज्ञानी होते. ... मोगलाई आली, आंग्लाई आली, ते आपल्यावर राज्य करू लागले... आपल्या मूर्ख धार्मिक रीतिरिवाजांमुळे... जातीजातीत भिंती निर्माण झाल्या. आपण हिंदूंमध्ये कधी एकोपा निर्माण झाला नाही तो या वेडगळ तत्त्वज्ञानामुळे, हे ब्राह्मणांच्या डोक्यात कधी शिरले नाही. (पान ७)

विनायक म्हणतात, त्या आशयाची वाक्ये पान ३४ वर सापडतात.
***पान ३४ वर यशवंत ज्योतीराव फुले प्रश्न विचारतात की "...मुसलमान... ऋषी मंडळाचे शापास भ्याले असावे. (का?)
त्याला ज्योतीराव उत्तर देतात त्यात ही पुढील वाक्ये येतात.

"परंतु ते (मुसलमान लोक) थोडे ऐश्वर्याच्या मदांत बेफाम झाले असतां अति पटाईत मुकुंदराज, ज्ञानोबा, रामदास वगैरे ... त्यांनी प्राकृत भाषेत विवेकसिंधु, ज्ञानेश्वरी, दासबोध वगैरे अनेक प्रकारचे ... ग्रंथ रचून ... शिवाजीसारखे महावीरास फसवून त्यास मुसलमान लोकांचे पाठलाग करावयास लावले." (येथे "..." असे गाळलेले शब्द बहुतेक करून त्या ग्रंथकर्त्यांची टीका करणारे तपशील आहेत. विनायक यांच्या वाक्यासारखे तितके शब्द येथे उद्धृत करणे मला संदर्भासाठी पुरेसे वाटते.)

***

धन्यवाद

सविस्तर संदर्भ आवडला.

सहमत

फुल्यांचा राग ब्राह्मण जातीवर नव्हता तर ब्राह्मणी मनोवृत्तिवर होता. हेच नेमके त्यांच्या अनुयायांनी व त्यांच्या शत्रूंनी अजूनपर्यंत ओळखलेले नाही.

या मताशी सहमत आहे.

दोन प्रश्न

ब्राह्मण कोणास म्हणावे?
ब्राह्मण्य म्हणजे काय?
या प्रश्नांवर गेली शंभर वर्षे चर्चा घुटमळते आहे.भल्या भल्यांचा तोल अशा चर्चांमध्ये ढळतो.
प्रकाश घाटपांडे

दोन उत्तरं

ब्रह्म जानाति इति ब्राह्मण |
ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण.
पंडितः समदर्शनः | असा एक श्लोक आहे गीतेमधे. ते ब्राह्मण्य.
जन्माने सारे शुद्र. (असा श्लोक ही आहे, आठवत नाहीये (मदत))
जन्माने जात ठरत नाही.
दैवी चातुर्वर्ण व्यवस्था ही चांगली, नि:पक्षपाती होती.
चातुर्वर्णं मया सृष्टं गुण कर्म विभागशः | असे भगवान कृष्ण गीतेत म्हणतात.

यात जन्माचा संबंध नाही.
जन्माचा फायदा जरूर होतो: जसे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर.
पण कुमारवयातच (वय वर्षे ५ पासुन पुढे) मुले गुरुगृही जात असल्याने तिथे त्यांच्यातल्या आवडी निवडी, कल, गुण, कामगिरी वगेरे वर ठरणार पुढे ते कोण बनणार ते.
ब्राह्मणाच्या पोटी जन्म न घेतलेले ब्राह्मण अशी उदाहरणे ही आहेत. ब्राह्मणाघरी जन्म घेवुन ही कर्माने हीन असणारे 'ब्रह्मबंधु' म्हणजे ज्याचा कुणी नातेवाईक ब्राह्मण आहे, पण तो स्वत: नाही.

सारी गडबड जन्माने जात ठरविण्यापासुन चालु होते. आज ही ऍडमिनीस्ट्रेटर्, वैश्य, कामगार वगेरे वर्गवारी समाजात दिसुन येते. चार वर्ण किंवा जाती वगेरे ह्या गोष्टी पुन्हाएकदा पहिल्यासारख्या कामावरुन ठरविल्यागेल्या तर बरे होईल.

अवांतरः जुनी शिक्षण पद्धत बरी होती. आताची मेकॉलेप्रणित मात्र मातीपासुन नाळ तोडते.

 
^ वर