झोपेत पडणारी स्वप्नं

झोपेत पडणारी स्वप्नं जागेपणी आठवतात तेव्हा ती निरर्थक, विस्कळित व असंबद्ध वाटतात. तरीदेखील स्वप्नांबद्दल माणसांना नेहमीच एकप्रकारचे कुतूहल वाटत आले आहे.

सिग्मंड् फ्रॉइड् ने स्वप्नांचे मानसशास्त्रीय विश्लेषण करून काही तर्काधिष्ठित अनुमाने काढली आहेत. बर्‍याच अंशी ती आपल्या अनुभवांशी जुळतात. ती अशी
१) बहुतेक स्वप्नं जाग आल्याआल्याच विसरायला होतात.
२) बहुतेक स्वप्नं वाईट असतात. म्हणजे ती पाहतांना भीति, असुरक्षितता, काळजी या भावना उत्पन्न होतात. मनावर दडपण येते. फारच थोडी स्वप्नं चांगली, हवीहवीशी वाटणारी असतात.
३) एकच स्वप्न पुन्हा पुन्हा पडू शकते. मला याचा अनुभव आहे. मी १९६४ साली शेवटची पदवी परीक्षा उत्तीर्ण झालो. पण "परीक्षा १५ दिवसांवर आली आहे व एका महत्वाच्या विषयाचे पुस्तक अजून एकदाही हातात घेतले नाही याचे मनावर दडपण आले आहे" हे स्वप्न मला नंतर कित्येक वेळा पडले आहे व अजूनही मधूनमधून पडत असते.
४) स्वप्न ही पाहणार्‍या माणसाची स्वतःची निर्मिति असते. ती त्या माणसाच्या स्वतःच्या स्वतःलाच समजेल अशा सांकेतिक भाषेत असते.
५) स्वप्नं मनांतील अतृप्त इच्छा पूर्ण करतात. (तरीदेखील ती वाईट असतात हे जरा चमत्कारिक वाटते). आमच्या एका मित्राला हे पटत नाही कारण त्याची आवडती नटी कधीही त्याच्या स्वप्नांत आलेली नाही.
६) स्वप्नांतील इच्छापूर्ति उघड उघड नसून प्रच्छन्न असते. कारण प्रत्येकाच्या मनातला एक भाग सेन्सॉरची कात्री घेऊन बसलेला असतो. हा भाग झोपेतही जागा असतो. त्याचे निर्मात्यावर (पाहणार्‍यावर) कडक नियंत्रण असते. कदाचित यामुळेच आमच्या उपरोल्लेखित मित्राला त्याची आवडती नटी तिच्या ओळखू येणार्‍या रूपात दिसत नसावी.

बर्‍याच वर्षांपूर्वी एका मराठी मासिकांत स्वप्नांवर लिहिलेला एक लेख वाचनांत आला होता. (लेखकाचे नाव आता आठवत नाही). त्यांत शेवटचा परिच्छेद कोड्यात टाकणारा होता. त्याचा मथितार्थ असा होता -
स्वप्नांतल्या गोष्टी जागेपणी आठवतात तेव्हा त्या असंबद्ध, अतार्किक वाटतात. पण स्वप्न पाहात असतांना त्या असंबद्ध वाटत नाहीत, तर्कसंगतच वाटतात. त्यामुळे त्यावेळी आपण जागे नसून स्वप्नांत आहोत अशी शंका आपल्याला येत नाही. इतकंच काय, पण त्यावेळी आपण स्वप्नात तर नाही ना हे पाहण्यासाठी स्वतःला चिमटा काढून पाहिला तरी आपण स्वप्नांत नाही, जागेच आहोत अशी आपली खात्री पटते.
मग आता सांगा, या क्षणी हे वाचत असतांना तुम्ही स्वप्नांत नसून जागे आहात याविषयी तुमची खात्री आहे? (पाहिजे तर स्वतःला चिमटा काढून पहा).

Comments

चर्चा

http://mr.upakram.org/node/1545 इथे चर्चा झाल्याचे स्मरते. अर्थात हा विषय गुढ आणि रम्य आहे.चर्चा पुढे रंगु शकते.
प्रकाश घाटपांडे

प्राचीन आणि सुफलां चर्चाविषय

मला वाटते जगातल्या बहुतेक तत्त्ववेत्त्यांनी स्वप्नात आणि जागृतावस्थेत होणार्‍या संवेदनांची तुलना केली आहे. त्यातून बरेच गहन विचार मांडले आहेत.

मुळात हा प्रश्न पडायचे कारण एक गृहीतक आहे, ते असे : जागृतावस्थेतील संवेदना सत्य आहेत आणि स्वप्नावस्थेतील संवेदना मिथ्या. यात जर "सत्य" आणि "मिथ्या" संकलपनांचा अर्थ ठरवलेला असला तर ते गृहीतक बाद करावे लागते. (नाहीतर "सत्य" आणि "मिथ्या" संकल्पनांना वेगळे, काटेकोर अर्थ द्यावे लागतात.)

यातील काही विचारवंतांनी दिलेली उत्तरे सर्वांना माहीतच आहेत :
१. शंकराचार्य अशी समस्या सोडवतात की स्वप्नावस्थेतील आणि जागृतावस्थेतील संवेदना दोन्ही मिथ्या/मायावीच आहेत.
२. रसेल अशी समस्या सोडवतात की स्वप्नावस्थेतील आणि जागृतावस्थेतील संवेदना दोन्ही सत्यच आहेत.
...
वगैरे. अशा प्रकारे हा चिरंतन प्रश्न अनेक प्रगल्भ विचारांचा जन्मदाता आहे.

(तसाच हा चिरंतन प्रश्न अनेक उथळ विचारांचा जन्मदाता आहे - आमच्या कॉलेज कंपूमध्ये रात्री-बेरात्री या विषयावर विविध पदार्थांच्या अमलात चर्चा झालेली आहे. त्यातील तपशील आठवत नाहीत, पण ते विचार फार गहन नव्हते, असे अंधुक स्मरते.)

माझी स्वप्नं!

मला अनेकदा हव्याश्या वाट्णा-या, व्हाव्यात अश्या वाट्णा-या गोष्टी एकाच स्वप्नात गुंफुन् येतात. मी कधीच अभ्यास् करीत् नाहि त्यामुळे, पेपर एक विषयाचा, अभ्यास् केलाय् दुस-याचा अशी स्वप्नं तर नेहमीचीच. माझ्या अनुभवाप्रमाणे (मला रोज न चुकता स्वप्नं पड्तात्, म्हणजे अनुभव बराच आहे असे म्हणायला हरकत नाही. ;) )स्वप्नातही काहि तत्वं पाळली जातात (किंवा स्वप्ने पाळतात् असं म्हणा), उदा. सामाजीक वगेरै, पण काही मात्र छेदली जातात्, विषेशत: ज्यावर पुर्ण विश्वास नाहीत् अशी. (जर् असे असेल तर तुमच्या मित्राच्या प्रश्नाचे उत्तर अवघड नाही.)

अर्थात, अनेक प्रकारची स्वप्ने आहेत, पण सगळ्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी, सभोवताल्च्या आकलनाशी वा आपण नकळत् केलेल्या तर्कवितर्कशी काहितरी संबंध असतो. आता वर धनंजय यांनी म्हट्ल्याप्रमाणे, हा प्रश्न माझ्या अनेक उथळ विचारांचा जन्मदाता ही असू शकतो. :)

एक स्वप्न

सकाळी सकाळी जाग आली. अंथरुणावर उठून बसल्याबसल्या जांभई दिली. पुन्हा स्टाइलिशपणे एक चुटकीही तोंडासमोर वाजवली. आणि पाचर बसल्यासारखे तोंड उघडेच राहीले. काही केल्या बंद होईना.अंगाचा थरकाप उडाला. आरशासमोर जाऊन उभा राहिलो. माझी ती केविलवाणी अवस्था बघून डोळ्यातून आसवे ओघळली. आता काय करावे. तशास अवस्थेत कसेबसे कपडे घातले आणि तोंडाला हात लावून बाहेर आलो. रस्त्याच्या पूढच्याच वळणावर एक हॉस्पिटल होते. तिथे गेलो. लोक विचित्र नजरेने पहात होते. वेटींगरुम मध्ये दोनजण आधीच होते. तोंडाला हात लावलेल्या अवस्थेत तिथे बसलो. एकेक क्षण युगासारखा वाटत होता. तेवढ्यात डॉक्टरांनी आत बोलावले. तोंडाला चार वेळा हाताने इकडून तिकडून तपासले. मग म्हणाले, "उशीर केलात. लवकर आला असतात तर काही करू शकलो असतो." सगळे ब्रम्हांड आठवत होते. आईवडील, भाऊबहीण, माझे कॉलेजचे मित्र. आता आपलं कसं होईल. हॉस्पिटल बाहेर आलो. सैरभैर.............................. जाग आली तेव्हा अंग घामाने थबथबलेले होत. हे स्वप्न होतं या आनंदाने हरखुन गेलो. आरशापूढे जाऊन तोंड हवे तसे उघडून मिटून बघितले. आयुष्यातल्या पूढच्या प्रत्येक जांभईच्यावेळी हे स्वप्न मला वाकूल्या दाखवून जाते. अगदी आजतागायत.

स्वप्नांचा जसा आपल्या दैनंदिन जीवनातल्या घटनांशी संबंध असतो तशीच ती बहूतेकवेळा अतर्क्य असतात. एखादे स्वप्न पडतांनाच हे स्वप्न आहे व हे आपल्याला आगोदर पडले होते याची जाणीव ही काही वेळा होत असते. स्वप्नात काही कारणाने जाग आली तर पून्हा लगेच झोपल्यावर त्या स्वप्नाची लिंक पून्हा जुळते याचा ही अनुभव ब-याच जणांनी घेतला असेल. एकूण काय तर जाणीवेच्या कक्षेबाहेर धावू पाहणारा हा विषय चर्चेला भरपूर अवकाश देणारा आहे. माझे स्वप्न खुपच अतार्कीक. असे वाटणा-यांनी आपली अशी स्वप्ने (अर्थात खरीखुरी) शेअर करायला हे चांगले निमित्त ठऱावे.

माजे स्वप्न

(हे माजे सप्न असले, तरी समस्त हमालबंधूंचे देखील आहे.)

मोठ्ठे लगेज म्हनून ६० रुपये रेट ठरिवला, पन मालकाने ५० दिले. आनि ते निघाले कापसाचे बंडल ! लय भारी ! आनि जाग आली.

- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है

 
^ वर