मराठी लिखाण आणि लैंगिकता
डिस्क्लेमर : या धाग्याच्या शीर्षकापासून आतल्या मजकूरामधे काही प्रक्षोभक लिहावे असा माझा हेतू नाही. मात्र , यात काही वावगे आढळल्यास हा धागा रद्द करावा. साहित्य, साहित्याचे वाचन यातील एका (माझ्या मते अदुर्लक्षणीय , पण सभ्यतेपायी न बोलल्या जाणार्या) पैलूबद्दल मी लिहितो आहे अशी माझी भावना आहे. इतरांना यात वावगे तर वाटू नयेच , पंण यात कुणाला भर घालावीशीही वाटावी अशी माझी आशा आहे. बाकी सर्व मी इथल्या जनताजनार्दनावर आणि संपादकांवर सोडतो.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अलिकडे मेघना पेठे यांची "नातिचरामि" ही कादंबरी पुन्हा एकदा चाळत होतो. त्यातल्या काही भागात , मानवी संबंधांबद्दल बोलत असताना , कित्येकदा लैंगिक वर्णने येतात. हे सारे वाचताना मनात विचार आला : आपले सारे आयुष्य आपण मराठी पुस्तके वाचत आलो आहोत. तर लिखित वाङ्मयात , लैंगिकता आपल्याला एक वाचक म्हणून कसकशी भेटत गेली ? या सार्याचा आपल्यावर नक्की काय परिणाम होत गेला ? या निमित्ताने , एकूण थोडे सिंहावलोकनच झाले असे म्हणायला हरकत नाही.
लहानपणी राजा-राणी-राजपुत्र-राजकुमारी इ. इ. च्या गोष्टी वाचायचो. त्याच्यात अर्थातच नाईट्-एरंट आणि डॅमसेल्-इन्-डिस्ट्रेस (आणि अर्थातच तिला डिस्ट्रेस मधे टाकणारे दूष्ट (दुष्ट नव्हे ! ;-) ) यांचा पॅटर्न असायचा. राक्षसाला/जादूगाराला पळवून नेलेल्या राजपुत्रीशी लग्न करायचे असायचे. माझ्या मते, स्त्रीला पळवून नेणे , तिच्याशी लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित करणे, नाईट्-एरंटच्या शौर्याची इतिकर्तव्यता प्रस्तुत स्त्रीस सोडवून आणून अंतिमतः तिच्याशी लगीन लावणे यात दर्शवलेली असणे यातच कुठेतरी , लैंगिकता (सेक्शुऍलिटी) जरी नव्हे , तरी लैंगिक साचेबद्धता (जेंडर स्टीरिओटाइपिन्ग) ही ठाशीवपणे नोंदली जात होती हे नि:संशय. कुमारवयात वाचल्या जाणार्या, रामायण/महाभारतामधील कथांमधे माझ्यामते लैंगिकतेचे सूचन कमी आणि सरळसरळ उल्लेख असा प्रकार होता.(लेस सटल्टी अँड मोअर ऑब्व्हियस) . रावण-सीता यांचे नाते , लक्ष्मण-शूर्पणखा एपिसोड , अंबा-अंबिका-अंबालिका प्रकरण , भीष्मप्रतिज्ञा , द्रौपदीविवाह आणि अर्थातच वस्त्रहरण या सार्यांना , अगदी बालवाङ्मयात आणतानाही , या सर्व प्रसंगांमधली जी वाहक शक्ती (ड्रायव्हींग फोर्स) - ती म्हणजे स्त्रीपुरुषांमधील आकर्षण - ती बालवाङ्मयकारानाही एका विशिष्ट मर्यादेपलिकडे शर्करावगुंठित रीतीने सांगणे अशक्यच होते. एकूणच , ठकसेन-जादूचा शंख या सार्यामधे जितकी अप्रत्यक्ष लैंगिकता होती/असते त्यापेक्षा , या प्रमुख पौराणिक कथांमधे ती निश्चितच ठळकपणे (ब्लेटंटली) होती. सुष्ट-दुष्टादि विभाजनामधेही , हा लैंगिकतेचा घटक अगदी बेमालूमपणे येऊन मिसळतो.
आज थोडा विचार करताना जाणवते की, परिकथा असोत की पुराणकथा - निदान त्यांच्या बाळबोध रूपात - या सार्या पुरुषप्रधान दृष्टिकोनातून लिहिल्या गेल्या आहेत. नाईट्-एरंट आणि डॅमसेल-इन्-डिस्ट्रेस यांमधे सरळसरळ जेता/उपभोक्ता आणि जेय/उपभोग्य असे नाते आहे. महाभारतादि महाकाव्ये त्यांच्या बृहद्स्वरूपामधे वाचल्यास बहुदा त्यांच्यातील गुंतागुंतीमुळे , उप-उप-कथानकांमुळे केवळ पुरुषप्रधान आहेत असे सरसकट म्हणता येणार नाही ; मात्र त्यांच्या संक्षिप्त, बाळबोध प्रकारात हा लैंगिक असमतोल (जेंडर बायास) सरळसरळ दिसतो.
प्रस्तुत लिखाणात लैंगिकतेचा विचार हा मराठी साहित्यापुरताच मला मर्यादित ठेवायचा असल्याने , चित्रपटादि (जास्त परिणामकारक) दृक्-श्राव्य माध्यमांचा इथे विचार होणार नाही ; मात्र "अमर चित्र कथा" या ब्रँडने येणार्या कॉमिक्स (मराठी शब्द ?) ना कदाचित साहित्य आणि चलच्चित्रे यांच्या सीमारेषेवर असलेले मानावे लागेल. आणि यातही , ही कॉमिक्स पुस्तकरूपात असल्याने, त्यांची विभागणी साहित्यातच होईल. तर , या कॉमिक्स मधे अर्थातच , कथानकाच्या जोडीने चित्रेही असत. या चित्रांमधूनही स्त्री-पुरुषांच्या सौष्ठवादि संकल्पनाना , बर्यापैकी साचा मिळाला असे म्हणता येईल. याच कालावधीमधे , मँड्रेक, फँटम यांच्या "इंद्रजाल" कॉमिक्सनी हे साचे जास्त बळकट केले असे मला आठवते.
इथे ही गोष्ट नमूद करायला हवी की, कुमारवयात वाचले गेलेल्या प्रत्येक गोष्टीमधे लैंगिकताच नव्हती. इसापच्या गोष्टी होत्या , बिरबल होता, शिवाजी-राणा प्रतापादि शुद्ध शौर्यरसाचाच परिपोष करणारे हिरोज् होते. फास्टर फेणे होता , भारा भागवतादि लेखकांच्या इतर गोष्टीही होत्याच , गोट्या-चिंगी होते , किशोर-कुमार होते. चांदोबामधे , बाकी पुन्हा राजपुत्र-राजकन्या यांच्या सोबत चोर-श्रीमंत-वेताळ-विक्रम यायचे. चांदोबामधल्या कथानकांमधे जरी अर्थातच सरळसरळ लैंगिकता नसली तरी स्त्रीचा मोह, स्त्रीला जिंकणे/विकत घेणे/ती जिंकण्याचा- पर्यायाने सूचित उपभोगाचा विषय असल्याचे उल्लेख ठायीठायी होते.
मला वाटते , प्रत्यक्ष लैंगिकतेच्या प्रदेशातली पहिली पाऊले ही यापुढे दोन वेगवेगळ्या दिशांच्या पुस्तकांमधून पडत गेली. रामायण/महाभारतादि कथांच्या वाटे जेव्हा इतर पौराणिक कथानकांचे वाचन झाले ती एक दिशा आणि साहसी कथांच्या थोड्याशा अधिक पुढच्या अवस्थांमधल्या कथा-कादंबर्या.
साहसी कथांमधे कॅप्टन निमोच्या जहाजावरील सुंदर मडमा , खलाशांचे-त्यांचे प्रणयाराधन , (क्वचित प्रसंगी केलेला अतिप्रसंगही !) दर्यावर्दी , साहसी , शूरवीर , सैनिक-सेनानी यांच्यावर फिदा असलेल्या स्त्रिया , त्यांचा विरह , त्यांची मीलनप्रसंगीची लीला यांची (कुमारवाङ्मयात खपतील अशी ) वर्णने यामुळे लैंगिकतेची ओळख पूर्वीइतकी धूसर राहिली नाही.
मात्र , लैंगिकतेचा पहिला सणसणीत , इन्-युअर्-फेस असा झटका जर का या कळत्या-न-कळत्या वयात अतिशय अनपेक्षितरीत्या कुठून बसला असेल तर तो होता पुराणादिक "धार्मिक" वाङ्मयातून ! घरातल्या सर्वात कर्मठ समजल्या जाणार्या काकांनी जी पुस्तके दिली , त्यातल्या काही पुस्तकांमधे जे होते त्याला विश्वरूपदर्शन - किंवा विचित्रविश्वाचे विकृद्दर्शन असे म्हणावे लागेल. सरस्वतीचा जन्म , ब्रह्मदेवाचे तिच्यामागे लागणे , इंद्राची लालसा , परशुरामाची कथा .. आणि एके दिवशी , या पुस्तकांच्या संग्रहातून हाती पडले "नवनाथ कथासार" ! बापरे ! यातील एकेका "नाथाच्या" अवतारामधे लैंगिकतेची वर्णने ठासून भरलेली होती. काही उदाहरणे पुरेशी होतील :
-स्त्री राज्यात अर्थातच केवळ स्त्रिया रहायच्या. त्यांची वंशवृद्धि कशी व्हायची ? तर त्या नगरीच्या बाहेर मारुति बसायचा. त्याच्या भुभु:काराने स्त्रियाना गर्भ रहायचा.
- कित्येक व्यक्तींचा जन्म हा पुरुषाचे "रेत" सांडून "ऋतुस्नात" स्त्रीच्या द्रवाशी त्याचा संयोग होऊन , एखाद्या प्राणी/पक्षी/माशाने खाऊन त्या श्वापदाला गर्भ राहून व्हायचा.( पहा : मीननाथाचा जन्म.)
"रेत" , "ऋतुस्नात" , "गुह्यांगे" असे कितीतरी शब्द मला ही धार्मिक पुस्तके वाचूनच कळलेले आहेत.
या सार्या धार्मिक पुस्तकांमधले जेंडर स्टीरिओटाईप्स , त्यातली एकूणच मूल्यव्यवस्था हा (थोडे सौम्यपणे बोलायचे तर ) भयानक रोचक आणि (किंचित तीव्रपणे बोलायचे तर ) प्रसंगी उलटी येईल इतपत विकृत मामला आहे.
क्रमशः
Comments
चांगला विषय !
मांडणी चांगलीच झाली आहे, पुढील भागाच्या प्रतिक्षेत !
-दिलीप बिरुटे
असेच
सुरवात छान झाली आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
हेच,
मांडणी चांगलीच झाली आहे, पुढील भागाच्या प्रतिक्षेत !
हेच म्हणतो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत, जरा अधिक विस्ताराने येऊ द्या. विषय रस वाटावा (इंग्रजी - इंटरेस्टींग?!) असा आहे! :)
आपला,
(ठकसेन) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
अमर चित्र कथां
अमर चित्र कथांमधुन ही असे बरेच् शिक्षण लहानपणीच होते. मला एक गोष्ट आठवतेय् ती एक स्त्री तेजस्वी "बीज" हातात घेऊन दुसर्या ठिकाणी पळत-पळत जाते व एका व्यक्तिचा जन्म त्या IVF मुळे होतो.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या पुस्तकात इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी जे अनेक संदर्भ घेतले आहेत पौराणीक म्हणता येईल अशा वाङ्मयातून, ते पहा. मराठी वाङ्ममयातील ज्या लैंगिकतेच्या विषयावर आपण आज चर्चा करतो आहोत, ती (म्हणजे मराठी वाङ्मयातील लैंगिकता) अळणी ठरावी इतके त्यातील लेखन 'समृद्ध' आहे. अर्थात, ते मराठीत नाही. त्यामुळे येथे मराठीची स्वतंत्र चर्चा जरूर चालू शकेल.
अवांतर : चित्त यांनी त्यांचे विशिष्ट वयातील वाचन आणि गौरी कर्वे यांचे त्याच वयातील व्यवहार यांचा जो उल्लेख केला आहे तो रंजक आहे. पिढ्यांमधील अंतरे ही अशी असावीत बहुदा.
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास'
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या पुस्तकाबद्दलची मराठीत रंगलेली एक चर्चा :
दुवा
धन्यवाद
लैंगिकता आणि मराठी लिखाण ही कधीही शिळी न होणारी चर्चा आहे.
वर दिलेल्या दुव्यावर एक भयंकर मनोरंजक प्रतिसाद वाचला.
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हे पुस्तक निखालस प्रामाणिक आहे हे मानले. पण त्यात पारायण करण्यासारखे काय आहे नक्की?
(काही भाग संपादितः संपादक)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
शक्यता
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हे पुस्तक निखालस प्रामाणिक आहे हे मानले. पण त्यात पारायण करण्यासारखे काय आहे नक्की?
राजवाडे यांची काही पुस्तके आमच्या काळात इतिहासाच्या अभ्यासक्रमात होती. त्याकाळी त्याचे विद्यार्थी त्याची पारायणे करताना मला माहिती होते. असो.
मैलाचा दगड
>>'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हे पुस्तक निखालस प्रामाणिक आहे हे मानले. पण त्यात पारायण करण्यासारखे काय आहे नक्की?
खरं सांगु का ! संशोधन कसे असावे, केले पाहिजे, इतिहासातील दस्तऐवजांची मांडणी कशी करावी, त्याचबरोबर त्यातील विषयासाठीही ज्यांना कोणास हे पुस्तक पारायण करावे असे वाटते त्यापैकी आम्ही एक आहोत. संशोधन कार्यातील ते पुस्तक म्हणजे मैलाचा दगड आहे, असे वाटते.
पुढील भागात जेव्हा या पुस्तकातील विषयासंबधी विवेचन येईल तेव्हा, आम्ही लेखनमालिकेतील लेखकाला टोकल्याशिवाय राहणार नाही ! :)
-दिलीप बिरुटे
पारायण
पारायण कशासाठी करतो त्यावर ते अवलंबून. त्यातील 'रोचक' तपशीलांसाठी पारायण करण्यासारखे काहीही नाही (त्यासाठी मूळ ग्रंथच मिळवून संग्रही ठेवलेले बरे. एक तर असे भले-भले ग्रंथ संग्रही आहेत ही बढाई मारता येते आणि आपला कार्यभागही साधू शकतो). पण मुळात राजवाड्यांचे पुस्तक सोशल अँथ्रोपोलॉजी या मूळच्या समाजशास्त्र नामक या विषयातले आहे हे ध्यानी घेतले तर पारायणे करावी लागतात. डांग्यांच्या प्रस्तावनेसकट ते पुस्तक वाचले की हा मु्द्दा स्पष्ट होतो. अर्थात, तसे पारायण करताना त्याच रोचकता रहात नाही. आजच्या नीतीमत्तेच्या चौकटीत ते वाचू लागलो तर, राजवाड्यांनी किंवा डांग्यांनी म्हटल्याप्रामाणे, आपली 'संस्कृती' काय होती हे समजून येते आणि डोके बधीर होते. आजच्या नीतीमत्तेची चौकट न लावता पाहिले तर समाजव्यवस्था कशी उत्क्रांत होत गेली हे निकोपपणे समजून घेता येऊ शकते. अर्थात, हे भान आवश्यक आहे की, ते पूर्ण पुस्तक नाही. राजवाड्यांना ते पूर्ण करता आलेले नाही. आरंभीचे काही लेखच त्या पुस्तकात समाविष्ट आहेत.
मराठी लेखन आणि लैंगीकता हा मूळ विषय असल्याने सहज आठवलेले -
कशी तुज समजावू सांग या गीतामध्ये कडेकडेने केलेले वर्णन शृंगारक्रियेचेच आहे. श्वासांचे प्रबंध, अक्षय करू यज्ञयाग वगैरे शब्दयोजना शृंगाराचीच आहे. ओठांचे वर्णन मुळातून ऐकण्यासारखे आहे.
'मालवून टाक दीप'चा उल्लेख कसा टाळता येईल?
ज्ञानोबा उत्पातांच्या एका लावणीतील ओळी -
श्रृंगार करूनी सजले
तुम्हाजवळी एकांती
बिलगुनी ओ बसले
गच लखलख बॉर त्वा लुटली
राया माझ्या झाडाला पालवी फुटली
आणखी एका अज्ञात लावणीतील ओळ - अहो आबा, जरा सरकून बसा की नीट, हात चोळीत चाललाय कुठं
अलीकडची कारभारी दमानं... ही लावणी.
धन्यवाद.
थोडक्यात वरील सर्व प्रतिसादांत नमूद केलेल्या उदात्त हेतूंसाठीच वाचक विवाहसंस्थेच्या इतिहासाची पारायणे करताना आढळतो, असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. मोडकांच्या मते पारायणात रोचकता नाही. थोडक्यात अतिशय कष्ट घेऊन ह्या छोट्या पुस्तकाचे पुन्हा पुन्हा वाचन करावे लागते. (विवाहसंस्थेच्या इतिहासाच्या नक्की कुठल्या अध्यायांचे पारायण करावे, हा प्रश्न उरतोच.)
"एक तर असे भले-भले ग्रंथ संग्रही आहेत ही बढाई मारता येते आणि आपला कार्यभागही साधू शकतो" असे मोडकांनी म्हटले आहे. त्यात तथ्य वाटते आहे. "बाई/बुवा मी किती 'पुढारलेली'/'पुढारलेला' आहे हे दाखविण्यासाठी विवाहसंस्थेच्या इतिहासाची किती पारायणे केली आहेत हे सांगणे आवश्यक आहे का? बहुधा नसावे.
माझ्या ज्ञानात भार घातल्याबद्दल मी सर्व उपप्रतिसादकांचा आभारी आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
टू सेट द रेकॉर्ड़ स्ट्रेट
धम्मकलाडू,
मोडकांच्या मते पारायणात रोचकता नाही.
थोडक्यात अतिशय कष्ट घेऊन ह्या छोट्या पुस्तकाचे पुन्हा पुन्हा वाचन करावे लागते.
(विवाहसंस्थेच्या इतिहासाच्या नक्की कुठल्या अध्यायांचे पारायण करावे, हा प्रश्न उरतोच.)
"एक तर असे भले-भले ग्रंथ संग्रही आहेत ही बढाई मारता येते आणि आपला कार्यभागही साधू शकतो" असे मोडकांनी म्हटले आहे. त्यात तथ्य वाटते आहे. "बाई/बुवा मी किती 'पुढारलेली'/'पुढारलेला' आहे हे दाखविण्यासाठी विवाहसंस्थेच्या इतिहासाची किती पारायणे केली आहेत हे सांगणे आवश्यक आहे का? बहुधा नसावे.
नमस्कार.
हाहाहाहाहाहा.
वरील सर्व असे तुम्ही म्हटले आहे, म्हणजे त्यात मी आलो.
मी असे म्हटलेले नाही. त्यातील 'रोचक' तपशीलांसाठी पारायण करण्यासारखे काहीही नाही असे माझे वाक्य आहे. अवतरणांचे महत्त्वही असतेच. आपल्या मनातील विचारांप्रमाणे वाक्याची मोडतोड करून ते मांडत तुम्ही पुढे बरेच काही लिहित गेलात, पण ते व्यर्थ आहे. त्या पुस्तकातील ही 'रोचक' (अवतरणे ध्यानात घ्यावीत) उद्धृते आणि त्यांचा अनुवाद सोडल्यानंतर राजवाड्यांचे भाष्य शिल्लक राहते आणि समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यासाठी ते रोचक (इथे अवतरणे नाहीत हेही ध्यानी घ्यावे) असते.
पुढे कंसात 'त्यासाठी' हा पहिलाच शब्द आहे. त्याचा अर्थ वाक्यातील 'रोचक' तपशीलांसाठी या शब्दांचा जो आहे तोच आहे.
वेल, त्या पुस्तकात केवळ 'रोचक' संस्कृत श्लोक आणि त्यांचे भाषांतरच वाचायचे असेल त्यासाठी फारसे कष्ट घेण्याची गरज नाही. पण आपली संस्कृती वगैरे मुद्यांवर राजवाडे मतप्रदर्शन करतात तेव्हा, ते खोडून काढायचे असेल तरीदेखील, कष्ट घ्यावे लागतात.
सोशल अंथ्रोपोलॉजीच्या दृष्टीने अभ्यास करताना हा प्रश्न येतच नाही. त्या अभ्यासात संपूर्ण पुस्तक वाचावेच लागते. अभ्यासक सामान्यपणे त्या स्तरापर्यंत आलेला असतोच. आता त्याहीपलीकडे त्या 'रोचक'तेत एखादा अडकून पडत असेल तर त्याला राजवाड्यांचा त्याहीवेळी नाईलाज होता आणि आजही असेल इतकेच.
मला जे म्हणायचे आहे ते स्पष्ट आहे. त्याचा तुम्ही नेमका कोणता अर्थ घेताहात हे तुमच्या पुढच्या वाक्यातून (ज्याचे अवतरण चिन्ह सुरू झाले आहे, पण थांबलेले नाही) दिसते. ही दोन्ही वाक्ये एकाच संदर्भात मी घेतोय. ते भलेभले ग्रंथ म्हणजे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास नव्हे हे माझ्या मूळच्या प्रतिसादावरून स्पष्ट व्हावे. कारण तेथे मूळ ग्रंथ असा शब्दप्रयोग आहे. हा तपशील तुमच्या नजरेतून सुटलेला दिसतो. त्यामुळे पुढे "विवाहसंस्थेच्या इतिहासाची किती पारायणे" वगैरे मुद्दा माझ्या प्रतिसादांपुरता गैरलागू ठरतो.
मी प्रतिसाद देत असतो. कोणाच्या ज्ञानात भर घालण्याचा उद्योग मी करीत नाही.
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या विषयावर पुस्तकातील मूळ मुद्यांपेक्षा इतरच चर्चा उगाचच आणि बरीच झाली आहे. ती माझ्या बाजूने येथेच थांबवतो. मूळ विषयावरच्या पुढच्या लेखनाची वाट पाहतो.
धन्यवाद
धन्यवाद मोडकसाहेब. अभ्यासाच्या, पारायणाच्या गरजेचे अनेक कंगोरे लक्षात आले. "जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!" हे उपक्रमाचे बोधवाक्यच आहे. त्यामुळे अनायासे का होईना ज्ञानात भर पडली तर आनंदच होतो. एवढे मनाला लावून घेऊ नये, ही विनंती.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
पौगंडावस्थेतील वाचन
पौगंडावस्थेतील वाचन हा या सार्या संदर्भातला महत्त्वाचाच टप्पा मानायला हवा. वर गौरी देशपांडे यांच्या संदर्भातला किस्सा रोचक आणि त्यावर मोडकांनी केलेले , पिढ्यांमधील अंतराचे निरीक्षण अचूक आहे.
आमच्या ओळखीमधे एक वृद्ध गृहस्थ होते. वेदशास्त्रपुराणे आणि इतर धार्मिक साहित्याचे वाचक. १४-१५ वर्षांचा असताना , त्यांच्या संग्रहातून मला "अनंगरंग" या प्राचीन ग्रंथाचा मराठी (आणि बहुदा संक्षिप्त ) अनुवाद मिळाला होता. तोवर नवनाथ कथासार वाचून झाल्याने "अनंगरंगा"चा धक्का प्रचंड नव्हता ; मुख्य म्हणजे त्यातील संपूर्ण आशय लैंगिक कृतींच्या , अवयवांच्या , विचारांच्या संदर्भातला असला , तरी इतर कृतक्-धार्मिक साहित्यातील मजकूराप्रमाणे त्याचे स्वरूप उत्तेजक ("टिटीलेटींग्" चा मराठी शब्द?) नव्हते. काही आकृत्याही होत्या. हे सारे पौगंडावस्थेत असलेल्या समजूतदारपणाच्या अभावामुळे जरी पुरेसे "मजेदार" वाटले असले तरीही , बहुदा आधुनिक ज्ञानाच्या संदर्भात या सार्याचे संदर्भ आता पुरातन गोष्टींच्या इतपतच शिल्लक असले तरी यात काहीतरी विचार आहे , पुराणे आणि इतर उठवळ प्रकार नि यात फरक आहे याची जाणीव तेव्हाही झालेली होती.
याच वयात वरवर चाळायला मिळालेले एक विनोदी पुस्तक म्हणजे "ब्रह्मचर्य हेच जीवन , वीर्यनाश म्हणजे मृत्यू" हे (बहुदा स्वामी शिवानंद असे लेखकाचे नाव असलेले) पुस्तक. त्यात रक्ताच्या काही हजार थेंबातून वीर्याचा एक थेंब बनतो ( का याच्या उलटे कायसेसे ) असे विनोदी उल्लेख होते. त्या वयात हे सर्व वाचायची भूक (ऍपेटाईट्) खूप असले तरी , दुर्दैवाने (?) मला हे पुस्तक इत्थंभूत वाचता आलेले नव्हते.
काही लेखकांची नावे
मराठी साहित्यातील उघडउघड लैंगिक वर्णन पहिल्यांदा रत्नाकर मतकरींच्या (ऍडम नावाच्या?) एका सुमार पुस्तकात वाचल्याचे आठवते. नंतर लायब्रीत केवळ शृंगारिक लेखन करणाऱ्या अनेक लेखकांची नावे कळाली. त्यात प्रा. पोपटराव भसे (यांची चंद्रप्रभा वगैरे नावाची पुस्तके होती). बीभत्स असे लेखन करणारी जोडगोळी आशू रावजी-दिनू कानडे (यांची पुस्तके गोव्यातील प्रकाशकांनी छापलेली असत असे आठवते. इतर 'सामान्य' पुस्तकांत न दिसणारी - कायदेशीर कारवाईचे अधिकार मडगांव कोर्टाच्या कार्यक्षेत्रात - अशा अर्थाची सूचना त्यांच्या पुस्तकातच पाहायला मिळे.) प्रा. व. बा. बोधे यांचे काही लेखनही याच प्रकारातले वाटले. या व्यतिरिक्त एक देवधर (विजय देवधर नसावेत) नावाच्या लेखकाने केलेल्या शृंगारिक-साहसकथा-गुप्तहेरकथांच्या लेखनालाही जोरदार उठाव असे. मला वाटते मेनका, अप्सरा वगैरे मासिकांमध्ये लिहिणारे अनेक लेखक असे लैंगिक लेखन करण्यात पटाईत होते. पुण्यातील दत्तवाडीतील कोण्या प्रकाशकाने छापलेल्या त्यांच्या पुस्तकांना लायब्रीत जोरदार मागणी असे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
काही इतर
वर उल्लेखलेल्या लेखकगणातले अजून एक ठळक नाव म्हणजे चंद्रकांत काकोडकर. ६० च्या दशकात यांच्या "श्यामा" नावाच्या कादंबरीवर अश्लीलतेचा खटला भरला गेला होता आणि यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती.
पौगंडावस्थेत असताना , लायब्री ("लायब्ररी" नव्हे ;-) ) मधली काही "निवडक" पुस्तके उचलण्याची एक युक्ती माझ्या या क्षेत्रातल्या आद्यगुरुने शिकवली होती. ती अशी की , अशा खुमासदार लेखकाची एखादी कादंबरी उचलावी आणि एखाद्या "फ्लिकर" प्रमाणे त्याची पाने अंगठ्याने भरभर उलटवावी. "फ्लिकर" जिथे थांबेल ती पाने म्हणजे या कादंबर्यांमधली विशेष "रंगीत" पाने होत. हीच पाने परत परत वाचली गेलेली असल्याने , फ्लिकर तेथे थांबतो. आपल्याला हवे असलेले "ज्ञानकण" तेथे वेचावेत. या न्यायाने ही पुस्तके घरी नेऊन वाचण्यातला धोका टाळता येतो ; एरवी निरुपयोगी असलेल्या या कादंबर्यांमधून आपल्याला हवे तेच "सत्व" वेचता येते आणि हे सर्व "लायब्री"च्या एका कोपर्यात उभे राहूनच. ही दीक्षा त्याने मला दिल्यानंतर मी "गुरुमाऊली ! काय हा साक्षात्कार ! " असे म्हणून त्याच्या चरणांशी पडायचा तेव्हढा बाकी होतो ! ;-)
दुर्गाबाई भागवतांनी मराठी साहित्यात काहीही अश्लील नाही ; जे आहे ते सुमार आहे, उठवळ आहे ; पण अश्लील म्हणवण्यासारखे काहीही नाही अशा स्वरूपाचे विधान केल्याचे स्मरते.
वाचतो आहे
लहानपणी माझे बहुतेक वाचन इंग्रजीत होते. मराठी वाचन थोडेच आणि "बालयोग्य" सोज्ज्वळ होते.
ही चर्चा वाचून बरेच काही कळत आहे, माहिती रोचक आहे.
आता हळूहळू आठवत आहे, आणि मराठी (बाल) साहित्यातील अनुभव मुक्तसुनीत यांच्यासारखेच आहेत. चांदोबा कथांमध्ये लैंगिक आकर्षण अभिप्रेत तर असेच, पण बायकांची चित्रे जुन्या शरीर-सुख-आदर्शाला मानणारी होती.
धार्मिक वाङ्मयाबाबतही तसाच अनुभव. सप्तशतीत दुर्गेची निर्मिती होत असताना तिचे लैंगिक अवयव यमाने निर्माण केले, हा तपशील आहे. ६वी-७वीत प्रसाद प्रकाशनची पुराणांची मराठी भाषांतरे वाचलीत. तर रेत, गर्भ वगैरे गोष्टींबद्दल खूप कुतूहल वाटले.
मराठीतच आमच्या घरी होते ते लैंगिकतेबद्दलच "शास्त्रीय" पुस्तक वाचले. ते बर्यापैकी पुढारलेल्या विचारांचे होते. (म्हणजे संभोग हा स्त्री-पुरुष दोघांच्या शरीरसुखासाठी असावा, केवळ अपत्यप्राप्तीकरिता नाही, हे मूलभूत तत्त्व होते.) पण लेखकाचे नाव आठवत नाही. कारण आईवडलांना न सांगता हे पुस्तक वाचत होतो.
इंग्रजी साहित्यातही उघड-उघड लैंगिक आकर्षणाची साहित्यिक वर्णने बहुधा ८वी-९वी पुढेच वाचली. (संभोगवर्णने [पोर्नो] वगैरे प्रकार कॉलेजात जाईपर्यंत हातात आले नव्हते.)
मुक्तसुनीत यांच्या लहानपणाच्या अनुभवाचे पडसाद मलाही आठवत आहेत. पुढच्या भागांत ना.सि.फडके ते बा.सी.मर्ढेकर असा प्रवासही वाचायला आवडेल. कारण या अभिजात दुनियेत मात्र मी फिरलेलो नाही.
के पी भागवत
पुर्वी के पी भागवत या लेखकाची लैंगितेवर त्या काळच्या शास्त्रीय दृष्टीतुन लिहिलेली पुस्तके होती. आजही उपलब्ध आहेत.
प्रकाश घाटपांडे
लेखाचा विषय रोचक आहे.
लेखाचा विषय रोचक आहे.
आपण वर्णन केलेल्यातल्या काही धार्मिक पुस्तकांनी माझे सुद्धा बरेच रंजन केले आहे. आणि त्याचमुळे आता 'आपल्या संस्कृतीमध्ये अमुक-तमुक बसते का?' असे वर्तमानपत्रांत आणि संकेतस्थळांवर उच्चरवाने विचारले जाणारे लेखन पाहिले की त्याहुन जास्त रंजन होते :)
लैंगिकता चांदोबा सारख्या मासिकांच्या चित्रांतून आणि कथांतून कशी आपल्या मनात शिरकाव करते हे निरिक्षण छान वाटले.
पुढे लिहा.
लेखात अनेक नेहमिच्या मराठी शब्दांची आपल्याला अभिप्रेत छटा दाखवण्यासाठी कंसात वापरलेला इंग्रजी शब्द रसभंग करणारा वाटला. आवश्यकता असल्यास अजून एखादे वाक्य जोडून आपण योग्य अर्थछटेपर्यंत वाचकाला आणू शकता. तसेच मराठी साहित्यातील एका बाजूकडे पाहताना नाईट्-एरंट आणि डॅमसेल्-इन्-डिस्ट्रेस या सारखे शब्द-कल्पना पुन्हा उल्लेखलेल्या सुद्धा मला व्यक्तिशः काही फारशा पटल्या नाहित.
--लिखाळ.
धन्यवाद.
सूचनांबद्दल धन्यवाद.
जमल्यास मूळ लेखाचा मसुदा बदलून संपादकांना तो पुन्हा पोस्ट् करण्याची विनंती करेन म्हणतो.
नाईट्-एरंट आणि डॅमसेल्-इन्-डिस्ट्रेस यांना काही मराठी/भारतीय समांतर शब्द आहेत काय ?
नवीन शब्द घडवावे का?
अर्थछटा अगदी तीच नसली तरी "शूर शिलेदार" आणि "त्रस्त कन्या" असे शब्द वापरता येतील का?
शूर शिलेदार आणि...
शूर शिलेदार तर खास ! :) खरेतर या दोन्ही कल्पना मराठी साहित्यात मूळच्या दिसत नाहीत असे मला वाटले. त्या भारतीय जडण घडणीमध्ये घडतील असेही वाटत नाही. भारतीय मनाला कुणी शूर शिलेदार संकटमोचन करणारा आहे असे वाटण्यापेक्षा देवाने प्रत्यक्ष अवतार घेऊन काम करुन देणे अधिक प्रशस्त वाटते. त्यानंत आरत्यांमध्ये कडवी वाढवण्याची सुद्धा सोय होते ;).
अनुवादित पुस्तके आणि परभाषेतल्या साहित्यातून घेतलेल्या प्रेरणेवर आधारित लेखनातून त्या डोकावल्या असाव्यात असा अंदाज. मराठी बालसाहित्यात गोट्या, फाफे, बिरबल, तेनाली राम, रामायण-महाभारत-भक्त प्रल्हादादी पौराणिक कथाच जास्त प्रमाणात असाव्यात. मागच्या पिढीतले लोक याबद्दल जास्त बोलू शकतील.
शूर शिलेदारासारखी पात्रे आपल्या मनात रुंजी घालत नसावित. उंच मनोर्यात कैद झालेल्या त्रस्त तरुणीला सोडवणार्या शिलेदारापेक्षा उड्डाण करुन द्रोणागिरी उपटून आणणारा हिरो आपण पसंत करतो. राजकिय स्थिती आणि धार्मिकवातावरण यांमुळे हा फरक पडत असावा.
माझे लेखन विषयांतर करणारे ठरत आहे असे वाटते. क्षमस्व !
--लिखाळ.
प्रेम-रोमांच-कथेचा एतद्देशीय स्रोत
पाश्चिमात्त्यांच्या सारखाच लोककथांमध्ये आढळेल. तिथे अशा साहसकथा भटके कथागायक (त्रुबादूर) सांगत.
लावण्यांचे म. वा. धोंडांचे पुस्तक मी आजकाल जमेल तसे वाचत आहे. त्यातील पुरुष देशोधडी फिरणारा शूर सैनिक असतो. पण इश्कही करतो. बहुधा लावण्यांपेक्षा पोवाड्यांमध्ये अशा एखाद्या वीरपुरुषाची प्रेम-साहस-रंजित कहाणी ऐकायला मिळू शकेल.
पौराणिक दैवतांच्या कथेचे निमित्त करून मनुष्यांच्या सुरस कथा सांगायची पद्धत जुनी आहे. शाकुंतलात शकुंतला ही त्रस्तकन्यकाच आहे. दुष्यंतही वीर-प्रेमवीर म्हणूनच जास्त लक्षात राहातो. उर्वशी, देवलोक वगैरे पौराणिक तपशील रंजक चौकटच आहेत. (शाकुंतल हे संस्कृत-प्राकृत मिश्र भाषेतले नाटक आहे. म्हणजे प्राकृत बोलणार्या प्रेक्षकांची आवड दाखवते.)
मराठीत नळ-दमयंती आख्यान हे त्याच प्रेम-रोमांच कथाप्रकारातले असावे.
अर्थातच युरोपातील कथासंकेत थोडे वेगळे (उदा. भटका शिलेदार सम्राटाचा विश्वासू दास असतो). भारतीय कथासंकेत थोडे वेगळे (वीर खुद्द राजा किंवा राजपुत्र असतो). असे असू शकेल.
पण फारसीतील रुस्तम-सोहराब, अरबीतील हजार-अन्-एक रात्री, रामायण महाभारतातील माणसांबद्दल उप-कथा (उलूपी-विजय वगैरे), आदिवासी वीरांच्या कथा... साहस-प्रेमकथा ऐकायची आवड सर्वत्रच असावी, असे वाटते.
पाश्चिमात्य संकरानंतर काही संकेत बदलले असू शकतील, या बाबत सहमत.
चांगला विषय
लेखमालेचा 'विषय' छान आहे! :)
आठवुन पाहिले तर मराठी साहित्यातील लैंगिकतेची ओळख बहुदा वपु काळ्यांच्या पुस्तकांमधुन झाली. चाळीत राहणारे जोडपे लैंगिक सुखासाठी होणारी तगमग वगैरे गोष्टी वाचुन. साधारण त्याच सुमारास (मी शाळेत असताना) आचार्य अत्रेंचे 'अश्या गोष्टी अश्या गमती' हे पुस्तक हातात पडले. त्यातली काही प्रकरणे वाचून अक्षरश: नखशिखांत हादरलो होतो. 'घटकंचुकी' वगैरे संदर्भतर अशक्यच. मित्रपरिवारात ह्या गोष्टी रंगवुन सांगायला तेव्हा जाम मजा यायची. :)
याखेरीज खरे शास्त्रशुद्ध लैंगिक शिक्षण मिळाले (कितीतरी गैरसमज दूर झाले :) ) ते 'निरामय कामजीवन' हे पुस्तक वाचल्यावर. मराठीमध्ये अतिशय सोप्या शब्दात समजावुन सांगीतले आहे, माझ्या मते पौगंडावस्थेतील सर्वांना वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक.
उत्तम
सुरूवात उत्तम झाली आहे. प्रतिसादांतूनही बरीच माहिती समजली. पुढील भागांची वाट पाहतो. मर्ढेकर/विंदांच्या काही कविता, नवीन काळात झालेले लेखन याबद्दल या संदर्भात वाचायला आवडेल.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वेगळा पण महत्वाचा विषय
एक अगदी वेगळा पण तितकाच महत्वाचा विषय. लेखमालेतील पहिलाच लेख जोरदार, पुढच्या लेखांबद्दलच्या अपेक्षा खूपच उंचावल्या आहेत. अर्थात या विषयावर संतुलित लिखाण करणे ही तारेवरची कसरत आहेच, पण तुमच्याकडून ते होईल ही खात्री आहे.
माझेही लहानपणचे पुस्तकविश्व जवळजवळ लेखात वर्णन केल्याप्रमाणेच होते. पुराणकथा, अरबीकथा, राजपुत्र-राजकन्या कथा वगैरे... बावळटपणामुळे असेल कदाचित, पण पुराणातल्या त्या कथांचं हे 'अंग' एवढं जाणवलं नव्हतं तेव्हा. उदाहरणार्थ, हनुमानाच्या घामामुळे कोण्या एका समुद्रातल्या राक्षसीला गर्भ राहिला वगैरे कथा चमत्कारीक नक्कीच वाटल्या पण सुरस मात्र नाही वाटल्या तेव्हा. त्या मागचे खरे संकेत वगैरे नंतर लक्षात आले.
पण नंतर मात्र साधारण १२-१३ वर्षांनंतर काही गोष्टी 'जाणवायला' लागल्या. त्याच सुमारास 'आवाज' मधली खिडकीचित्रं वगैरे दिसायला लागली. 'ज्ञानेश सोनार' (बहुतेक) यांनी काढलेल्या व्यंगचित्रांतल्या 'सुबक' ठेंगण्या लक्षात यायला लागल्या. गो. नी. दांडेकरांच्या (बहुतेक) आत्मवृत्तात त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल थोडक्यात पण कोणताही आडपडदा न ठेवता लिहिल्याचे वाचले आहे असे आठवते. चंद्रकांत काकोडकर माहित होते, पण नेमके तेव्हाच सिडनी शेल्डन, जेफ्री आर्चर वगैरे सापडले. (ती फ्लिकरची युक्ति पण लक्षात आली होती, पण जरा वेगळी पध्दत होती माझी.) पण जसजसा काळ गेला तसतसे नाविन्य संपले.
बिपिन कार्यकर्ते
सुरस
गावातील मारुतीच्या देवळात हरिविजय रामविजय यांची पोथी चालायची .त्यावेळी तपस्वी गुरुजी पोथी वाचताना वर्णन करीत. जेव्हा हनुमान समुद्रावरुन लंकेला जाताना मारुतीला आलेला घाम समुद्रात पडला त्यावेळी तो एका मगरीने गिळला व तिला गर्भ उत्पन्न होउन एक पुत्र झाला. हनुमान ब्रह्मचारी असला तरी त्याला पुत्र कसा? याचे ते उत्तर देत.
प्रकाश घाटपांडे
पौराणिक वा आधूनिक सर्वच असले लेखन स्वाभाविक
मराठी असो की जगातल्या कोणत्याही वाङ्मयातले साहित्य असो ते त्या त्या स्थलकालपरत्वे अस्तित्वात असलेल्या जनमानसांचे प्रतिबिंब बहूतेकवेळा असते. माणूस हा वेगळेपणाच्या कितीही बढाया मारत असला तरी तो अंतिमतः एक प्राणीच असतो. आणि प्राण्यांच्या स्वाभाविक खोडी त्याच्या अंतरंगात कायम दडून बसलेल्या असतात. वर सांस्कृतिकतेची, माणूसपणाची जाड गोधडी त्यानं पांघरलेली असते. पण मूळ पातळीवर आल्यावर त्यांचे हे पाशवीपण उचल खातेच. विरूद्धलिंगी व्यक्तीबदद्ल असलेले लैंगिक आकर्षण हे वंशवृद्धीच्या आदीम प्रेरणेचे द्योतक मानले गेले आहे. पूराण काळात (आणि आताही) सामान्य माणसाने लैंगिकतेबद्दल बोलणे हे निषिद्ध मानल्या गेल्याने देवदेवतांच्या तसेच पूराणातील इतर नायक नायिकांच्या प्रणयकथा (खरेतर भोगकथा) सविस्तर वर्णन करून सांगितल्या गेल्या. सामान्यांना संस्कृतचे गम्य नसल्यामुळे (आजही ) अक्षरशः दैवी फळांच्या प्राप्तीसाठी आजही या किळस आणणा-या कथांची पारायणे सुरू आहेत. (एक चपखल उदाहरण- गुरूचरित्र पारायण) संस्कृत जर सर्वश्रुत असती तर लोकांनी या पारायणकारांना पिटाळून लावले असते. सारांशाने या पूराणकारांनी किंवा गौरी देशपांडे, मेघना पेठे, विभावरी आदींनी असे कसे काय बुआ लिहीले या वर चर्चा करण्यापेक्षा आपले लक्ष वेधून घेणारे असे त्यात काय आणि का आहे हे निरलसपणे समजून घेतले तर आश्चर्य वाटण्याचे कारणच उरणार नाही. लैंगिकतेवर मुक्त लिहीले जाते म्हणून ना पूराणे वाईट ना आधूनिक मराठी साहित्य वाईट. पूराणे अन्वयार्थाने व आरोपणाच्या माध्यमातून (ब-याचशा छुप्या सामाजिक उद्देशांनी ) मानवाच्या मूलभूत प्रवृत्तींशी भिडली तर आजच्या साहित्याने कुठलीही भीड न बाळगता जे असते ते साहित्यात उतरवले इतकेच.
छान लेख
छान लेख प्रतिसादातली चर्चाही उत्तम.
मुक्तराव, एका चांगल्या विषयाला हात घातलात!
मराठी वाचनातून लैंगिकतेची ओळख नेमकी कधी झाली हे आता आठवत नाही पण त्यात चित्रांचा सहभाग मोठा असतो हे नक्की! १३-१४ ह्या वयात चांदोबासारख्या मासिकातली 'उठावदार' चित्रे एका वेगळ्या कुतुहलाने पहाणे सुरु झालेले आठवते. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या आजूबाजूला दिसणारे लोक हे तसे धष्टपुष्ट का नसतात? हा प्रश्नही पडला. पुढे कधीमधी मेनका सारखे मासिक हाती पडल्यावर त्यातली शृंगारिक वर्णने वाचताना भान हरपलेले आणि आवंढे गिळलेले आठवते आणि त्या कथा वाचून झाल्यावर आपण काही गैर तर केले नाही ना? कोणाला समजले तर नसेल ना? अशी एक भीतीही थोडाकाळ वाटलेली. एस्.टी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर पिवळ्या कव्हरातली पुस्तके लोक जरा आडोशाला उभे राहून चोरट्यासारखी का वाचतात ह्याचेही कुतुहल वाटे. एकदोनदा ती पुस्तके हळूच वाचून बघावीत अशी इच्छाही झाली पण धीर झाला नाही!
आनंद साधले सारख्या लेखकांच्या काही कथा, आवाज मासिकातली उत्तेजक खिडकीचित्रे, एखाद्या रहस्यकथेत अचानक आलेले वर्णन अशा क्रमाने हा प्रवास चालू राहिला. पुढे चांगल्या कळत्या वयात ह्यातला चटोरपणा मागे पडून शास्त्रीय माहिती समजल्यावर त्यातले गांभीर्य समजले. डॉ. लीना मोहाडीकर ह्यांच्यासारख्या मार्गदर्शकांचे काही उत्तम लेख वाचनात आल्यावर चूक काय बरोबर काय ह्यातले तारतम्य आले. ब्रम्हचर्याबद्दल आणि विद्यार्थीदशेतल्या अतिरेकी आत्मसंयमावर भर देणारे, वीर्यनाश हा जवळपास मृत्यूच वाटावा अशी भीती घालणारे लेखन वाचल्यानंतर त्यालिखाणाबद्दल तिडीक आली.
पुढे रीचर्ड बर्टन ह्या महाभागाने जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी केलेल्या प्रवासात जागोजागच्या स्त्रियांचा उपभोग घेऊन त्या अनुभवांवर लिहिणे हे त्याचे एक ध्येय होते असे वाचनात आले आणि मला त्याच्या 'अनैतिकते'बद्दल जाम धक्का बसला होता!
नंतरच्या काळात लैंगिकता ही एक सर्वसामान्य प्रेरणा असून विषयाच्या अनुरोधाने त्यावर लिखाण झालेले असले तर स्वाभाविक असते हे कळण्याइतपत प्रगल्भता आली.
(आता मुलगा मोठा होऊ लागल्यावर पुन्हा एकदा त्याच्या हाती काय साहित्य पडेल/पडावे ह्याबद्दल मनात हळूहळू विचार येणं, सध्याच्या वेगवान् आयुष्यात मुलांना बर्याच गोष्टी नको त्या वयातच कळतात ह्या भीतीने काळजी वाटायला सुरुवात झाली आहे!)
चतुरंग
कधी कधी
ही लैंगिकता टंकनदोषाने पण घडू शकते. उदा. दुसर्या एका मराठी संस्थळावरील लेखाचे शीर्षक आहे, "आमच्याकडे स्वतात नळ मिळतील". पण त्या संस्थळाचा इतिहास बघता अपघाताने हा विनोद घडला असल्याची शक्यता कमीच दिसते.
चु.भू. द्या आणि ह.ह. घ्या,
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
लैंगिकता आणि अश्लीलता
अश्लिलतेच्या संकल्पना या चर्चेची आठवण आली. या चर्चेच्या प्रस्तावात दिलेला निरंजन घाट्यांच्या अनुभव मासिकातल्या लेखाचा दुवा हा आता दिसत नाही. अनुभवच्या दुव्यावरील पाने बदलत असतात.
लिखाणात समाजात वापरल्या जाणार्या शिव्यांचे प्रतिबिंब दिसले तर ते लिखाण वास्तववादी असले तरी पांढरपेशा मनाला रुचत नाही. शिव्यांची माहिती हवी म्हणुन माहिती अधिकारात हा प्रश्न माहिती आयुक्तांना विचारला तर काय उत्तर येईल?
प्रकाश घाटपांडे
आयुक्त
आम्ही 'शिव्या' खात नाही.
'महसुला/खर्चाबद्दल' महिती हवी असेल तर बोला.
चांगला लेख
लेख आणि प्रतिसाद रोचक आहेत. पुढील भागांची प्रतीक्षा आहे.
काही आठवणी
This comment has been moved here.
लिंगसापेक्षता
चर्चाविषय व आत्तापर्यंतची चर्चा आवडली. एकाही स्त्रीने यावर काही स्वतःचे अनुभव / मते मांडलेली दिसली नाहीत हाही लिंगसापेक्षतेचा परिणाम म्हणायचा का?
बालपणी मला अश्या त्रस्त राजकन्या 'फुसक्या' वाटत असत. सगळी मजा (मारामारी वगैरे) राजपुत्र लोकांना करायला मिळते ही पार्श्यलिटी आवडत नसे. आपण आपल्या कथा लिहाव्या असे वाटू लागे.
कहाण्या, पुराणकथा या एकंदरित भाकडकथा आहेत असा दृढ विश्वास असल्याने कोणाकोणाचे जन्म कसे झाले त्यामागे काही रूपक असावे असे काही डोक्यात आले नाही. 'काय वाट्टेल ते लिहतात' (उदा चिलयाबाळ) या मताशी ठाम राहिल्याने पुढच्या शंका आल्या नाहीत.
पुढे समागमाची, प्रणयाची वर्णने वाचण्याआधीच, ११-१२ च्या वयात शास्त्रीयदृष्ट्या भरपूर माहिती मिळाली. तेव्हा काही धक्का बसला नाही. (काही मैत्रिणीना मात्र जोरदार बसला होता.) अनेकानेक गोष्टींबद्दल भरपूर माहिती मी गोळा करत असे त्यातलीच ही एक असे वाटले होते. शिवाय असे काहीतरी असणार असे आधीच वाटत असल्यानेही धक्का बसला नसावा.
अभियांत्रिकीत शिकताना 'अंधारात मठ्ठ काळा बैल' नावाचे एक पुस्तक वाचले होते. त्यात अनेक चमत्कारिक गोष्टिंसोबत प्रणयाचे उघडेवाघडे वर्णन होते. ते वाचून लेखकाचा थोडा राग आला होता, की आता प्रणयातली अद्भुतता गेली. त्यामानाने गौरी, सानिया, मेघना आदी लेखिकांचे वर्णन बरेच संयत वाटले. (माझे मर्यादित वाचन लक्षात घेता मी न-संयत पुस्तके न वाचली असण्याची भरपूर शक्यता.)
जेंडर ऍंड् सेक्शुआलिटी
मृदुलाताईंनी एकूण स्त्रियांच्या लिखाणाली लैंगिकता ही "संयत"वाटण्याच्या संदर्भात रोचक मुद्दा मांडला आहे . मला वाटते इथे प्रश्न एकंदरीत "जेंडर ऍंड् सेक्शुआलिटी"चा आहे. मराठीत या दोन्ही संज्ञांना "लैंगिकता" असाच शब्द आहे. मात्र या दोन गोष्टी अर्थातच वेगवेगळ्या होत.
स्त्रियांच्या लिखाणात - विशेषतः लैंगिकतेच्या संदर्भात - व्यक्तींचे objectification (म्हणजे त्यांच्याकडे व्यक्ती म्हणून न पहाता एक उपभोग्य वस्तू म्हणून पहाणे) हे क्वचित् पहायला मिळते. वर उल्लेखिलेल्या काकोडकरादि प्रभृतींच्या लेखनातल्या सुमारपणाबरोबरच , स्त्रीदेहाची आंबटशौकी वर्णने हा ठळक घटक आहे.
आमचे गैरसमज
आमचे लैंगिक गैरसमज दूर आपोआप झाले. काहीपन वाचावे लागले नाही. पान्यात पडल्यावर पोहायला शिकतो तसे.
- हमाल
सारी दुनिया का बोझ हम उठते है