चन्द्रयान - यशोगाथा (उत्तरार्ध)
चंद्रयानाच्या उड्डाणाच्या अनुषंगाने गुरुत्वाकर्षण , अग्निबाण , अंतरिक्षात भ्रमण , उपग्रह , अग्निबाणांची निर्मिती आणि चंद्रयान - यशोगाथा (पूर्वार्ध) या पहिल्या सहा भागात त्याच्या उड्डाणाशी संबंधित असलेली माहिती थोडक्यात करून दिल्यानंतर या भागात या मालिकेची सांगता करीत आहे.
मुंबई ते दिल्लीचा प्रवास असो किंवा सातारा ते फलटणपर्यंतचा असो, त्यात निर्गमन, मार्गक्रमण आणि आगमन असे त्या प्रवासाचे तीन टप्पे असतात. पहिल्या आणि अखेरच्या टप्प्यांवर त्या त्या ठिकाणी असलेल्या तत्कालिन स्थानिक परिस्थितीचा प्रभाव असतो, पण तो अल्पकाळासाठी असतो. उदाहरणार्थ मुंबईहून उत्तरेला अहमदाबाद, दक्षिणेला गोवा आणि पूर्वेला नागपूरकडे जाणारी विमाने सांताक्रूझ विमानतळावरून आधी पश्चिमेकडे उड्डाण करतात. दोन गांवातले अंतर कापण्यामधले मार्गक्रमणच महत्वाचे असते आणि तेच आपल्या लक्षात राहते. पृथ्वीपासून चंद्रापर्यंत मार्गक्रमणाची गोष्ट मात्र यापेक्षा वेगळी आहे.
पृथ्वीवरून आभाळातला चंद्र डोळ्यांना दिसतो. त्यामुळे नेम धरून सोडलेल्या बाणाप्रमाणे रॉकेटसुध्दा चंद्राला बरोबर नाकासमोर ठेवून सरळ रेषेत त्याच्याकडे झेपावत असेल आणि त्याच्यापर्यंत जाऊन पोचत असेल असे कोणालाही वाटणे शक्य आहे. पण प्रत्यक्षात ते तसे नसते एवढे मला माहीत होते. पृथ्वीवरून उड्डाण केल्यानंतर ते यान आधी पृथ्वीच्या सभोवती प्रदक्षिणा घालीत राहते आणि त्यात स्थिरावल्यानंतर चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करते एवढे मला ऐकून ठाऊक होते. ज्या वेगाने ते आकाशात झेप घेते तो पाहता ते कांही मिनिटातच पृथ्वीभोवती फिरू लागेल, त्यानंतर कांही तासात ते पुढील प्रवासाला निघू शकेल आणि एक दोन दिवसात चंद्रापर्यंत जाऊन पोहोचेल अशी माझी अपेक्षा होती. पण चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणाची जी बातमी आली तिच्यातच त्या यानाला चंद्राजवळ जायला कमीत कमी पांच दिवस लागतील हे वाचून थोडे आश्चर्य वाटले होते. प्रत्यक्षात तर २५ ऑक्टोबरला इकडून निघालेले हे यान दोन आठवडे उलटून गेले तरी अजून आपल्या मुक्कामाला जाऊन पोचल्याची बातमी आली नाही. साध्या प्रवासी विमानाच्या गतीने सुध्दा एवढ्या काळात ते चंद्रापर्यंत जाऊन पोचू शकले असते. त्यामुळे ते नेमके कुठे गेले आहे आणि इतके दिवस तिथे काय करते आहे हे कांही समजत नव्हते. अखेरीस १२ नोव्हेंबरला चंद्रयान आपल्या ठरलेल्या कक्षेत स्थिरावल्याचे समजले आणि १४ नोव्हेंबरला त्याने भारताचा झेंडा चंद्रावर पाठवला.
![]() |
Chandrayan path |
चंद्रयानाच्या प्रत्यक्ष प्रवासाचा मार्ग साधारणपणे वर दिलेल्या चित्रात दाखवल्यासारखा होता. सर्कसमधील ट्रॅपीझ या प्रकारातला क्रीडापटू एका उंच झोपाळ्यावर चढतो, त्याला झोका देत देत तो उंच उंच जातो, एक खूप मोठा झोका दिल्यानंतर पटकन आपला झोपाळा सोडून दुसरा झोपाळा पकडतो आणि नंतर त्या झोपाळ्यावर झुलू लागतो, तशा प्रकारे पृथ्वीभोवती फिरता फिरताच तिच्यापासून दूर दूर जात चंद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि चंद्राभोवती फिरता फिरता त्याच्या जवळ जवळ जात त्याने चंद्राच्या कक्षेतले आपले नियोजित स्थान ग्रहण केले. त्याची तारीखवार प्रगती खाली दिल्याप्रमाणे झाली.
२२ ऑक्टोबर २००८ : पृथ्वीवरून उड्डाण करून २२९००/२५५ कि.मी. च्या लंबवर्तुळाकार कक्षेत तिच्याभोवती भ्रमण सुरू
२३ ऑक्टोबर : कक्षा ३७९००/३०५ कि.मी. वर नेली
२५ ऑक्टोबर : कक्षा ७४७१५/३३६ कि.मी. वर नेली
२६ ऑक्टोबर : कक्षा १६४६००/३४८ कि.मी. वर नेली
२९ ऑक्टोबर : कक्षा २६७०००/४६५ कि.मी. वर नेली
०४ नोव्हेंबर : पृथ्वीपासून ३८०००० कि.मी. वर चंद्राच्या जवळ पोचले
०८ नोव्हेंबर : ७५०२/५०४ कि.मी. या कक्षेत चंद्राभोवती भ्रमण सुरू
०९ नोव्हेंबर : चंद्राभोवतीची कक्षा ७५०२/२०० कि.मी. वर नेली
१२ नोव्हेंबर : १०० कि.मी. अंतरावरून चंद्राभोवती वर्तुळाकार कक्षेत भ्रमण सुरू
१४ नोव्हेंबर : एम.आय.पी.च्या सहाय्याने चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा राष्ट्रध्वज उतरवला.
२२ ऑक्टोबर रोजी पृथ्वीभोवती फिरतांना चंद्रयानाला एका परिभ्रमणासाठी फक्त साडेसहा तास इतका वेळ लागत होता. तिच्यापासून दूर दूर जातांना तो कालावधी वाढत वाढत गेला आणि २९ ऑक्टोबरला ज्या कक्षेत चंद्रयान पोचले तिच्यात तो सहा दिवसांइतका झाला होता. त्यानंतर बहुधा शेवटचे भ्रमण पूर्ण होण्याच्या आधीच ते चंद्राभोवती प्रदक्षिणा घालू लागले. आता ते चंद्रापासून १०० कि.मी. अंतरावर राहून वर्तुळाकार ध्रुवीय कक्षेत फिरत आहे. चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवरून जात आपले एक आवर्तन ते सुमारे दोन तासात पूर्ण करते. तोपर्यंत चंद्र थोडासा स्वतःभोवती फिरलेला असतो. अशा प्रकारे चंद्राचा संपूर्ण पृष्ठभाग ते पाहून घेईल आणि त्याची छायाचित्रे पाठवत राहील. चंद्रयान जरी (पृथ्वीवरच्या) एका दिवसात चंद्राभोवती बारा वेळा फिरत असले तरी ते कांही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून पूर्णपणे मुक्त झालेले नाही. चंद्राबरोबरच ते सुध्दा सत्तावीस दिवसात एक पृथ्वीप्रदक्षिणा घालत राहीलच आणि पृथ्वी व चंद्र या दोघांच्याही सोबत सूर्यालासुध्दा एका वर्षात एक प्रदक्षिणा घालेल.
चंद्रयानाच्या कक्षांमध्ये बदल करण्यासाठी त्याच्यासोबत जोडलेल्या रॉकेट इंजिनांचा उपयोग केला गेला. त्यांच्या जोरावर यानाच्या भ्रमणाची गती बदलली की त्याची कक्षा बदलते आणि त्यानंतर ते यान नव्या कक्षेत आपोआप फिरत राहते. त्यावरील विविध उपकरणांना विद्युत पुरवठा करण्यासाठी लागणारी वीज पुरवण्यासाठी यानावर सोलर सेल्सचे पॅनेल बसवले आहे. यानावरील सर्व साधनांना पुरेल इतकी वीज त्या सोलर सेल्सपासून निर्माण होते. या सर्व उपकरणांचे कसून परीक्षण केलेले असल्यामुळे निदान दोन वर्षे तरी ती अव्याहत चालत राहतील अशी अपेक्षा आहे. चंद्रयानाकडून कुठकुठली शास्त्रीय माहिती मिळते ते पाहणे, ती जमा करून तिचे विश्लेषण करणे वगैरे कामं आता पुढील दोन वर्षे चालत राहतील. चंद्रावरील सुप्रसिध्द विवरांची (क्रेटर्सची) विविध छायाचित्रे तसेच चंद्रावरील विकिरणासंबंधी माहिती, त्यांचे आलेख वगैरे चंद्रयानाकडून प्राप्त झाले आहेत.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) च्या संकेतस्थळावर चंद्रयानाबद्दलची जी माहिती प्रसिध्द झाली आहे तिचा उपयोग या लेखासाठी केला आहे. या संकेतस्थळाचा दुवा खाली दिला आहे.
http://www.isro.org/chandrayaan/htmls/home.htm
गुरुत्वाकर्षण, अग्निबाण, उपग्रह वगैरेबद्दलच्या शास्त्रीय माहितीचे संकलन नासाच्या आणि इतर अनेक संकेतस्थळांवरून मिळालेल्या माहितीवरून केले आहे. त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे.
Comments
मस्तच
हा भाग सुद्धा मस्तच झाला आहे. खास करुन संकल्पना समण्यासाठी दिलेल्या उदाहरणांमुळे समजायला सोपा आहे.
धन्यवाद!
मागच्या भागात विचारलेल्या प्रश्नाचे इतके सविस्तर उत्तर दिल्या बद्द्ल धन्यवाद!
तरिही एक प्रश्न राहतोच की मग ३८-४० वर्षा पुर्वी अपोलो यानां ना ५ ते ६ दिवस कसे लागले ? त्यानाही हाच मार्ग अवलंबा लागला असेल
ह्या अश्या कक्षा बदलाव्या लगल्या असतील की त्यानी कोणता दुसरा मार्ग अवलंबला होता.त्यात तर जास्ती धोके असु शकत होते का?
माणसाना घेवुन जाणे व ह्या मार्गाने १६ - १८ दिवस जाणे यात वजन वाढले असते म्हणुन त्यानी काही जवळचा मार्ग काढला होता का?
या विषयी तुम्ही काही माहीती देवु शकाल का?
कारण
आपणच दिलेल्या दुव्यावरून पाहता अपोलोने वेगळा मर्ग अवलंबला होता हे स्पष्ट होते.
कारण
आपणच दिलेल्या दुव्यावरून पाहता अपोलोने वेगळा मार्ग अवलंबला होता हे स्पष्ट होते. एकादे विमान जमीनीवरून आकाशात उडवतांना खूप शक्ती लागते, पण ते आभाळात थोडे इकडे तिकडे गेले तरी चालते. त्याला आकाशातून जमीनीवर उतरवतांना मात्र अचूकपणे धावपट्टीवरच आणावे लागते. त्याचप्रमाणे यानाला चन्द्राच्या किंवा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतांना अतीशय काळजी घ्यावी लागते. त्यात किंचित चूक झाली तरी ते यान एक तर अथांग अवकाशात भरकटत कायमचे दूर चालले जाईल किंवा पृष्ठभागाकडे वेगाने खेचले जाऊन त्यावर जोराने आपटेल किंवा अती ऊष्णतेमुळे जळून खाक होईल अशा तीन्ही शक्यता असतात. यांचा विचार करता चंद्रयानासाठी अधिक सुरक्षित किंवा कमी धोका असलेला मार्ग स्वीकारला असावा. त्याच्या उड्डाणापूर्वीच वर्तवलेल्या अंदाजानुसार त्याला ५ ते २० दिवस लागतील असे सांगितले गेले होते. त्या बाबतीत अनिश्चितता होतीच.
चित्र
चित्रामुळे माहिती अगदी एका झटक्यात समजली.
नासा-इस्रो व इतर देशांच्या स्वतःच्या संस्था यामध्ये को-ऑर्डिनेशन कसे चालते? एखाद्या संस्थेने स्वतःचे यान पाठवण्याचे ठरवल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणाची परवानगी घेणे अपेक्षित असते का? हे पूर्णपणे अवांतर प्रश्न मनात आले.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
गुगलुन
गुगलुन माहीती मिळवताना खालिल दुव्या वर बरिच माहिती मिळाली .
http://www.christa.org/lunar.htm
गुगलुन माहीती मिळवताना खालिल दुव्या वर बरिच माहिती मिळाली .
गुगलुन माहीती मिळवताना खालिल दुव्या वर बरिच माहिती मिळाली .
गुगलुन माहीती मिळवताना खालिल दुव्या वर बरिच माहिती मिळाली .
गुगलुन माहीती मिळवताना खालिल दुव्या वर बरिच माहिती मिळाली .
गुगलुन माहीती मिळवताना खालिल दुव्या वर बरिच माहिती मिळाली .
गुगलुन माहीती मिळवताना खालिल दुव्या वर बरिच माहिती मिळाली .
गुगलुन माहीती मिळवताना खालिल दुव्या वर बरिच माहिती मिळाली .
उत्तम यश
चंद्रयानाचे यश वाखाणण्यासारखे आहे.
सर्कसमध्ये झोक्यावरच्या उड्या घेणार्यांचे उदाहरण छान आहे. ती केवळ उपमा नसून त्याच भौतिक तत्त्वाचे पृथ्वीतलावर दिसणारे उदाहरण आहे.
चित्र दिल्यामुळे टप्पे समजणे सोपे झाले.
मस्त!
मागे एका मित्राने माहिती दिली होती की सर्कसच्या झुल्याप्रमाणे टप्प्या-टप्प्याने जायची कल्पना कोणालातरी (नाव विसरलो) कॅरमवरून सुचली होती..
तो शात्रज्ञ कॅरम खेळत असताना एका सोंगटीने दुसरीला, दुसरीने तिसरीला व तीसरीने क्वीनला लक्ष्यापर्यंत पोहोचवले होते.. त्याप्रमाणे कमीतकमी शक्तीने जास्तीत जास्त अचुकता साधली गेली.
(अर्थात माहिती ऐकीव आहे.. पुरावा नाहि.)
बाकी तुमचे सगळे लेख वाचले आहेत.. सगळेच आवडले.. प्रत्येक वेळी प्रतिसाद दिला जातोच असे नाहि.. लिहित रहा..
ह लेख विषेश आवडला तो दिलेल्या आकृती मुळे.. आकृतीसाठी घेतलेली मेहनत जाणवली .. अभिनंदन.. लेख सुंदर उतरला आहे.
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
चित्रांमुळे..
सर्व माहिती विनाविलंब कळाली. यापुढे अशाच इतर विषयावर तुमची मालिका सुरु होईल अशी आशा करतो.
लेख वाचून मनात आलेले प्रश्न दिले आहेत.
१)गुरु आदी दूरच्या ग्रहांकडेही याने पाठवताना याच तंत्राचा वापर करतात, अशावेळेस तर यान मागे म्हणजे बुध ग्रहाकडेही पाठवले जाते वगैरे माहिती टीव्हीवर वाचल्याचे आठवते. याबद्दल तुम्हाला काही माहिती देता येईल का?
२)तुम्ही सर्कसमधल्या कसरतींचे उदाहरण दिले आहेच. गोफणीतून दगड भिरकावण्यासाठी ती आधी फिरवणे किंवा गोळाफेकीच्या स्पर्धांमध्येही गोळा फेकण्याआधी स्पर्धक स्वत:भोवती गिरक्या घेतात ही उदाहरणे याच प्रकारची आहेत का?
-सौरभ
==================
खुलासा
१. मंगळ, गुरू, शनी वगैरे ग्रहांच्या सफरीला निघालेले यान सूर्याच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून जात आहे. मला त्याबद्दल सविस्तर माहिती नाही. नासाच्या स्थळावर बहुधा ती मिळेल.
२. गोफण व गोळाफेक यात त्यांचा दगड किंवा गोळा यांचा वेग आणि त्यांच्यात सामावलेली ऊर्जा वाढवत नेण्यासाठी ते फेकण्याआधी फिरवले जातात आणि फिरवण्याचा वेग जवळ जवळ फेकणार्याच्या क्षमतेपर्यंत वाढवून तो जास्तीत जास्त दूर फेकण्याचा प्रयत्न असतो. चंद्रयानच्या उड्डाणात 'जास्तीत जास्त'चा भाग नसतो, तर त्याला चंद्राच्या कक्षेत नेमकेपणाने नेऊन पोचवणे (क्रिकेटच्या बॉलप्रमाणे) महत्वाचे असते.
कस्सीनि यान
कस्सीनि हे यान सूर्याच्या दिशेने आधी गेले आणि सूर्याला जवळून वळसा घातल्यावर (धूमकेतूसारखे) सूर्यमालेच्या बाहेरच्या दिशेला फेकले गेले.
चंद्रयानासारख्या अनेक घिरट्या घालता आल्या तर दोन फायदे असतात (असे मला वाटते - श्री घारे यांनी चूक असल्यास सुधारावी.) १) दर घिरटीत महापिंड-निकट-बिंदूपाशी (पृथ्वीनिकट किंवा चंद्रनिकट - पेरिजी किंवा पेरिलूनर पॉइंट पाशी) अगदी थोडी उर्जा वापरून यानाचा मार्ग बदलता येतो. एकाच वेळी यानाचा मार्ग बदलायचा असेल तर एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात त्वरण देऊ शकणारे अवजड रॉकेट लागेल. (२) मार्ग सुधारण्यासाठी, नेमके लक्ष्य साधण्यासाठी अनेक संधी मिळतात.
कस्सीनिला शनीभोवती फिरायचे होते. (चूक सुधारली)
कस्सीनीला सूर्याजवळून जाताना भरपूर त्वरण देणारी यंत्रणा हवी (कस्सीनि मध्ये एक छोटी आण्विक भट्टी होती), आणि मग आदमासे एकरेषीय मार्गाची दिशा थोडी बदलण्यासाठी थोड्याच ऊर्जेची यंत्रणा हवी.
शनीभोवती लंबगोल-लांबी कमी-कमी करणारे धक्के देत याचा शनिभोवतीचा मार्ग स्थिर झाला. (चंद्रयानाप्रमाणेच.) म्हणजे सूर्याभोवती मोठा धक्का, शनीभोवती छोटे (अनेक) धक्के. चंद्रयानाला मात्र पृथ्वीभोवती अनेक छोटे धक्के, चंद्राभोवतीही अनेक छोटे धक्के.
कस्सीनि बद्दल अधिक माहिती येथे (दुवा१ [नासा - अधिकृत] दुवा२ [विकी - प्लुटोनियम भट्टी]) बघावी.
धन्यवाद...
आनंद घारे, धनंजय माहितीबद्दल धन्यवाद!
==================
चंद्रयान आणि अपोलो याने यांच्या मार्गातिल फरका
चंद्रयान आणि अपोलो याने यांच्या मार्गातिल फरका मुळे काही गोष्टी लक्षात आल्या.
त्या म्हणजे भारतिय शास्त्रज्ञापुढे किती अवघड आव्हान होते व त्यांनी ते यशस्वी रित्या पेलले या बद्द्ल त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे.
१.कुठलाही नविन् प्रयोग म्हटले की अपयश येवु शकते. ते गुहीत धरावे लागतेच.
पण भारतिय शास्त्रज्ञा अपयश येणे परवडणारे नव्ह्ते, ही पहिली आणि कदाचित् शेवटची संधी होती , काहीही गड्बड झाली असती तर
घारेजी नी म्हटल्या प्रमाणे "या लोकांना हे झेपणार आहे काय ?", "याची कोणाला गरज पडली आहे ?", "याचा काय उपयोग होणार आहे?", हे प्रश्न परत आले असते. थोडक्यात म्हणजे पहिलाच प्रयोग असुन अपयशाला अजिबात जागा नव्हती.
२. वरती धनंजय म्हणतात त्या प्रमाणे अपोलो यानांचा मार्ग अवलंबणे म्हणजे जास्त शक्तीशाली अग्नीबाण लागले असते म्हणजे खर्च जास्त, चंद्रयानाचा मार्ग म्हणजे वेळ जास्ती तरी स्वतातला.
३. नासाला बर्याच गोष्टींचा विचार ही करावा लागत नसेल् त्या सगळ्या गोष्टींचा विचार इसरोला करावा लागत असेल.
४ एखादे नविन मशिन तयार करताना पहिल्यांदाच चालु करताना जसे आपण मशिनचा एक एक भाग चालु करत मग पुर्ण मशिन चालु करतो कारण त्यात काही गडबड झालीच तर ती नियत्रीत करता येते व पुर्ण मशिनचे नुकसान् टाळता येते,
त्याच नितीचा अवलंब करत इसरोने हळहळू पण ठाम पावले टाकत मोहीम यशस्वी केली.