अग्निबाण
भारताने अवकाशात पाठवलेल्या चन्द्रयानासंबंधीच्या बातम्या वाचून सर्व सामान्य वाचकांना त्या प्रयोगाचे जेवढे आकलन झाले त्यापेक्षा जास्त कुतूहल अनेकांच्या मनात कदाचित निर्माण झाले असेल. त्या संबंधात गुरुत्वाकर्षण या अवकाशाच्या संशोधनाशी निगडित असलेल्या विज्ञानविषयाच्या ज्ञानाची थोडी उजळणी करण्याचा प्रयत्न मी एका लेखात केला होता. गुरुत्वाकर्षणावर मात करून अवकाशात झेपावणार्या अग्निबाणाची फक्त तोंडओळख या लेखात दिली आहे. वाचकांच्या पसंतीला ती उतरल्यास चन्द्रयानाबद्दल अधिक माहिती क्रमाने पुढे देण्याचा विचार आहे.
पक्षी आणि फुलपाखरे यांना उडतांना पाहून आकाशात विहार करण्याची ऊर्मी माणसाच्या मनात खूप पूर्वीपासून उठत आली आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले होते. त्यात यश येऊन अनेक प्रकारची विमाने आणि अग्निबाण यांच्या सहाय्याने तो आकाशातच नव्हे तर अंतराळात देखील भ्रमण करू लागला आहे. विमाने आणि अग्निबाण ही दोन्ही साधने जमीनीवरून आकाशात झेप घेतांना दिसतात, पण विमानातून चंद्रावर जाता येईल कां? किंवा अग्निबाणाच्या सहाय्याने मुंबईहून दिल्लीला जाता येईल कां? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येतील. त्याची कारणे मात्र निरनिराळी आहेत. विमाने वातावरणाच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत त्यामुळे ती चंद्राची यात्रा कधीच करू शकणार नाहीत. एकदा उडवलेला अग्निबाण लगेच नष्ट होऊन जातो त्यामुळे तो परत फिरून जमीनीवर उतरण्याचा प्रश्नच नसतो. तरीही त्याबरोबर अवकाशात पाठवलेले यान मात्र सुरक्षितपणे परत आणून पृथ्वीतलावर उतरवण्याचे तंत्र विकसित झालेले आहे. हे खरे असले तरी आकाशात उडणारे विमान जसे बरोबर विमानतळावरच्या धांवपट्टीवर खाली उतरवतां येते तसे अंतराळातून परतणारे यान नेमक्या जागेवर उतरवण्याची तयारी अद्याप झालेली नाही. त्यामुळे गांवोगांवी जसे विमानतळ बांधले गेले आहेत त्यासारखे अग्निबाणतळ झालेले नाहीत. अग्निबाणासोबत उडवलेले क्षेपणास्त्र नेमके शत्रूपक्षाच्या गोटावर टाकून त्याचा विध्वंस करण्यापर्यंत यात प्रगती झाली आहे, पण मुंबईहून दिल्लीला जाऊन तिथे सुरक्षितपणे उतरण्याइतका त्याचा विकास अजून व्हायचा आहे.
विमान आणि अग्निबाण यातला मुख्य फरक आता थोडक्यात पाहू. पक्षी ज्याप्रमाणे आपल्या पंखांची फडफड करून हवेला खाली आणि मागे लोटतात आणि स्वतः वरती आणि पुढे जातात, तसेच समोरच्या हवेला मागे ढकलून विमान पुढे जाते. सुरुवातीच्या काळात हे काम त्याला जोडलेल्या प्रोपेलर नावाच्या अजस्त्र पंख्यांद्वारे होत असे, आजकाल बहुतेक मोठी विमाने जेट इंजिनावर चालतात (उडतात). हॅलिकॉप्टर मात्र अजूनही पंख्यांच्याच तत्वावर उडतात. कागदी बाण किंवा फ्रिसबीची डिस्क यासारखी एकादी गोष्ट हवेतून वेगाने भिरकावली की हवाच तिला उचलून धरते हे आपण पाहतोच. अशाच प्रकारे अतिशय वेगाने पुढे जाणार्या विमानाचे हवेद्वारा उध्दरण होते. आतापर्यंत मुख्यतः तीन प्रकारच्या इंजिनांचा उपयोग विमान उडवण्यासाठी केला गेला आहे.
१. प्रोपेलर - यात इंधनतेलाच्या ज्वलनावर चालणार्या इंजिनाला जोडलेली मोठमोठी पाती पंख्याप्रमाणे वेगाने फिरत हवेला मागे ढकलून विमानाला पुढे जाण्यासाठी गती देतात. इंजिनामध्ये इंधनाचे ज्वलन होण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणातून प्राणवायू घेतला जातो.
२. जेट - यातसुध्दा इंजिनात होण्यार्या इंधनाच्या ज्वलनासाठी आजूबाजूच्या हवेतून प्राणवायू घेतला जातो. इंजिनाला जोडलेल्या कॉम्प्रेसरने हवेचा दाब आधीच वाढवला जातो. इंजिनाच्या ज्वलनातून निर्माण झालेल्या ऊष्णतेमुळे तो दाब आणखी वाढतो. या तप्त व प्रचंड दाब असलेल्या हवेला अरुंद वाटेने (नॉझल्समधून) मागच्या दिशेने बाहेर सोडले जाते. त्यातून अतीशय वेगवान असा झोत (जेट) निर्माण होतो. त्याच्या प्रतिक्रियेने विमान वेगाने पुढे जाते.
३. रॉकेट इंजिन - यातसुध्दा ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोतानेच विमान पुढे जाते. मात्र यात खास प्रकारचे इंधन वापरतात. त्याच्या ज्वलनासाठी लागणारा प्राणवायू किंवा तो पुरवणारी रासायनिक द्रव्ये यांचा साठा विमानाबरोबर नेला जातो. त्यासाठी आजूबाजूच्या हवेतून प्राणवायू घेण्यात येत नाही. वजनाच्या तुलनेत या प्रकारची इंजिने सर्वाधिक शक्तीमान असतात. अतीवेगवान अशा लढाऊ विमानांत अशा प्रकारच्या इंजिनांचा उपयोग करतात.
वरील तीन्ही प्रकारात विमानांच्या उध्दरणासाठी वातावरणाची आवश्यकता असतेच असते. त्यामुळे ती अवकाशातल्या निर्वात पोकळीत उडू शकत नाहीत. विमानाला उचलून धरण्यासाठी पुरेसा इतका हवेचा दाट थर पृथ्वीसभोवती फारसा दूरवर नाही. त्यामुळे विमान जेवढे उंच जाऊन उडू शकते तेवढ्या अंतरामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात विशेष फरक पडत नाही.
रॉकेट म्हणजेच अग्निबाण यांचा इतिहास विमानांपेक्षा खूपच जुना आहे. कित्येक शतकांपासून ती बनवली जात आहेत. चिनी लोकांनी सर्वात आधी स्फोटकांचा शोध लावला आणि त्यांचा उपयोग रॉकेट्स मध्ये केला असे मानले जाते. अलीकडच्या इतिहासात अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुध्दात त्यांचा वापर केला गेला आणि आपल्या भारतात टिपू सुलतानाने त्याचे तंत्र विकलित केले असल्याची नोंद आहे. दिवाळीतल्या फटाक्यातले बाण हे रॉकेटचेच छोटे रूप असते. त्यात भरलेल्या दारूमध्ये ज्वलनशील पदार्थ आणि प्राणवायूचा पुरवठा करणारी रसायने यांचे मिश्रण असते. बाणाची वात पेटवल्या नंतर वातीमधून ती आग या मिश्रणापर्यंत जाते आणि त्याचे क्षणार्धात ज्वलन होऊन त्यातून खूप मोठे आकारमान असलेले वायुरूप पदार्थ तयार होतात. बाणाच्या छोट्याशा पण भक्कम नळकांडीमध्ये ते कोंडले गेल्यामुळे त्यांचा दाब वाढत जातो. जळलेल्या वातीतून निर्माण झालेल्या छिद्राच्या वाटेने या वायूंचा झोत वेगाने बाहेर पडतो आणि त्याची प्रतिक्रिया त्या बाणाला विरुध्द दिशेने म्हणजेच वर फेकण्यात होते. बाणाला जोडलेल्या लांब काडीमुळे त्याच्या प्रवासाला एक दिशा मिळते आणि त्या दिशेने तो वर उडतो आणि हवेत झेपावतो. साध्या फटाक्यामध्ये या वायूला बाहेर पडायला विशिष्ट वाट न मिळाल्यामुळे त्याचा दाब वाढत जातो आणि कवचाच्या चिंध्या उडवून तो मिळेल तिकडून बाहेर पडतो. त्या क्रियेत त्याचा मोठा धमाका होतो. आजकाल बाजारात मिळणार्या बाणांची रचना विशिष्ट प्रकाराने केलेली असते. त्यात अनेक कप्पे असतात. सर्वात खाली ठेवलेला बाण हवेत उंच उडतो. आकाशात गेल्यानंतर इतर कप्प्यातील स्फोटकांचा स्फोट होतो आणि त्यात ठेवलेली रंगीत भुकटी पेट घेऊन सगळ्या बाजूंना पसरते. यामुळे आकाशातून रंगीत ठिणग्यांची फुले पडत असल्याचे मनोहर दृष्य आपल्याला दिसते.
याच तत्वावर तयार करण्यात आलेल्या प्रचंड शक्तीशाली अग्निबाणांचा उपयोग क्षेपणास्त्रांच्या रूपाने युध्दात करण्यात येतो. तोफेच्या पल्ल्याच्या पलीकडे असलेल्या शत्रूच्या लक्ष्यावर तोफेपेक्षा जास्त अचूक आणि तोफेच्या गोळ्याच्या अनेकपट विध्वंसक असा मारा या अस्त्राद्वारे करता येत असल्यामुळे त्यांचा कल्पनातीत इतका विकास गेल्या शतकात झाला आहे. पण हा एक स्वतंत्र विषय आहे.
बिनतारी संदेशवहनावर प्रभुत्व मिळवल्यानंतर वातावरणाच्या अभ्यासासाठी त्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग व्हायला सुरुवात झाली. विमानांच्या उड्डाणाचा वातावरणाबरोबर प्रत्यक्ष संबंध येत असल्यामुळे त्याच्या अभ्यासाची अद्ययावत उपकरणे विमानात ठेवली जातच, त्याशिवाय हलक्या वायूने भरलेल्या फुग्यांच्या सहाय्याने कांही उपकरणे विरळ होत जाणार्या वातावरणाच्या वरच्या भागात पाठवली जाऊ लागली. अग्निबाणांचा उपयोग करून त्याहून अधिक उंची गाठता येते हे पाहून त्या दिशेने प्रयोग सुरू झाले. त्यातून अधिकाधिक उंची गाठण्याचीच स्पर्धा सुरू झाली. सर्वसामान्य प्रकारच्या रॉकेट्सचे अवशेष खाली येऊन पृथ्वीवर पडतात किंवा वाटेत जळून भस्म होतात, पण एस्केप व्हेलॉसिटी इतक्या वेगाने त्याचे प्रक्षेपण होऊ शकल्यानंतर जो अग्निबाण उडाला तो पृथ्वीवर परत आलाच नाही. त्यानंतर अवकाशात जाणारे अग्निबाण विकसित करण्याचे विज्ञान व तंत्रज्ञानाचे एक नवे दालन उघडले गेले.
Comments
उत्तम
लेख आवडला.
>>इंजिनामध्ये इंधनाचे ज्वलन होण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणातून प्राणवायू घेतला जातो.
मात्र उपग्रहांसाठी वापरण्यात येणार्या बाणांमध्ये प्राणवायू साठवून ठेवतात का?
अनेक हॉलीवूड चित्रपटांमध्ये लक्ष्याचा शब्दशः पाठलाग करणारे आडवेतिडवे पळणारे बाण दिसतात. या बाणांचे कार्य कसे चालते? (म्हणजे हे बाण केवळ फ्यांटसी आहेत की खरे अस्तित्त्वात आहेत)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
चित्रपटातले आणि प्रत्यक्षातले
असे अग्निबाण अस्तित्वात आहेत. वेगवेगळ्या तंत्राचा उपयोग करून आपला मार्ग बदलू शकणारे आणि त्यामुळे लक्ष्यावर आदळण्याची शक्यता वाढवणारे अग्निबाण/क्षेपणास्त्रे आहेत असे वाटते. अश्या अग्निबाणांना/क्षेपणास्त्रांना फायर अँड फर्गेट प्रकारची मिसायले म्हणतात. हल्लीच्या काही युद्धांमध्ये प्रेसिजन गाइडेड शस्त्रास्त्रांचा बराच बोलबाला झाला होता.
अर्थात प्रत्यक्षातले हे अग्निबाण चित्रपटात दाखवल्याइतके प्रभावी असतात की नाही हे माहीत नाही :)
पाठलाग
असा पाठलाग उष्णता मापून केलेला असल्याने तो चुकवण्यासाठी एअर फोर्स वन मध्ये खास आतिषबाजीची सोय आहे असे ऐकून आहे.
ढाल आणि तलवार
युद्धकौशल्यामध्ये आक्रमण आणि त्यापासून बचाव याची नवनवी तंत्रे विकसित होतच राहतात. मुख्यत: यातूनच मानवाच्या तांत्रिक क्षमतेचा विकास झालेला आहे असे कित्येक विचारवंतांचे सांगणे आहे. पहिल्या महायुद्धात विमानांचा वेगाने विकास झाला तर दुसर्या महायुद्धाने अण्वस्त्रांना जन्म दिला. पुढे त्यांचे शांतताकाळातले उपयोग विकसित झाले.
रॉकेट आणि रॉकेट इंजिन
इंजिनामध्ये इंधनाचे ज्वलन होण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणातून प्राणवायू घेतला जातो.
हे वर्णन साध्या विमानांच्या प्रोपेलर व जेट इंजिनचे आहे. रॉकेट आणि रॉकेट इंजिन या दोन्हीमध्ये प्राणवायू किंवा तो निर्माण करणारी रासायनिक द्रव्ये बरोबर घेतली जातात.रॉकेट आणि रॉकेट इंजिन या दोन भिन्न गोष्टीआहेत. रॉकेट स्वतः उडते , त्यातील इंधन भुर्रकन क्षणर्धात जळून जाते. रॉकेट इंजिन वायुसेनेच्या लढाऊ विमानात बसवतात. त्याचे इंधन इतर इंजिनाप्रमाणे नियंत्रित दराने बराच वेळ जाळता येते.
मात्र उपग्रहांसाठी वापरण्यात येणार्या बाणांमध्ये प्राणवायू साठवून ठेवतात का?
होय
अनेक हॉलीवूड चित्रपटांमध्ये लक्ष्याचा शब्दशः पाठलाग करणारे आडवेतिडवे पळणारे बाण दिसतात. या बाणांचे कार्य कसे चालते? (म्हणजे हे बाण केवळ फ्यांटसी आहेत की खरे अस्तित्त्वात आहेत)
सिनेमातील बाण ट्रिक फोटोग्राफीने पळवत असतीलही. पेट्रियटसारखे लक्ष्यवेधी अग्निबाणसुद्धा अस्तित्वात आलेले आहेत. स्कडसारख्या मिसाइलचा वेध घेतांना आपण त्यांना अलीकडील युद्धांच्या बातम्यांमध्ये पाहिले असेल. लढाऊ अग्निबाण हा माझ्या लेखाचा विषय नाही हे मी स्पष्ट केलेले आहे.
धन्यवाद
धन्यवाद सर.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सुटसुटीत आणि माहितीपूर्ण लेख
उडणार्या विविध जड वस्तू वेगवेगळ्या भौतिक तत्त्वांचा उपयोग करतात, ही माहिती छान समजावून सांगितली आहे.
"धाडड्धुम्" नंतर हा लेखही वाचनीय झालेला आहे. धन्यवाद.
सहमत +इंधने
हेच!
अजून असे लेख यावेत.
अग्निबाणाची विवीध इंधने त्यांचे रासायनिक गुणधर्म, त्यानुसार केलेला वापर
यावर काही प्रकाश पाडू शकाल का?
-निनाद
+१
लेख आवडला. माझ्या लहानपणी "कुतूहल" नावाचे ३ खंड वाचले त्याची आठवण झाली. त्यातही विषय अगदी सहज समजेल , जराही क्लिष्टता येणार नाही अशा प्रकारे विज्ञानातल्या गोष्टींची उत्तरे दिली होती. उत्तम लेख.
विनंती
मी आपल्याला मागेही विनंती केली होती,
हा लेख आपण विकिवर द्याल काय?
आपले लेखन विकिसाठी फार उपयोगी आहे.
आपली परवानगी असल्यास माझी हा लेख (काही बदल करून)
विकिवर अग्निबाण या पानावर चढवण्याची तयारी आहे.
अथवा आपणच या पानावर चिकटवल्यास मी विकिला योग्य असे बदल करेन.
या शिवाय इंग्रजी विकिवर या विषयी भरपूर माहिती आहेच.
पण मराठीतून ती सहजतेने यावी असे वाटते.
ती सहजता तुमच्या लेखांमध्ये आहे, म्हणून विनंती करतो आहे.
-निनाद
आवडले
सुटसुटीत सोप्या शब्दातली अग्निबाणाविषयी माहिती आवडली.
लेख आवडला/चंद्रयान
लेख आवडला.
नक्कीच उतरली आहे. चंद्रयानाबद्दलची माहिती वाचायला आवडेल.
अवांतर १ - चंद्रयानच्या इंग्रजी स्पेलिंगमुळे 'चंद्रयान', 'चांद्रयान', 'चांद्रायन', 'चंद्रायन' असे वेगवेगळे उच्चार प्रचलित आहेत. खरा उच्चार कसा आहे कुणास ठाऊक?
अवांतर २ -
हे तंत्र वापरात आहे ना? म्हणजे आंतराष्ट्रीय अंतराळ तळावरून परतणारे अंतराळवीर तर त्यांचे यान नेमक्या धावपट्टीवर विमानासारखे उतरवतात ना?
सहमत आहे
हा लेख वाचायला मजा आली. चांद्रयानावरही लिहा.
लेख/उद्धरण
सोप्या पद्धतीने अग्निबाणाची आणि त्यातील भौतिक तत्त्वांची माहिती देणारा लेख आवडला. चंद्र/चांद्रयानाबद्दल वाचण्यास उत्सुक आहे.
हवेने उचलून/तोलून धरणे (बॉयन्सी) साठी उद्धरण हा शब्द पटला नाही. उद्धरणे म्हणजे विकास करणे, नाव काढणे/गाजवणे वगैरे अर्थाने वापरतात. आता विकास करण्याला uplifting म्हणता येते, पण तरी उद्धरण म्हटल्यावर बॉयन्सी असा अर्थ पटकन सुचत नाही. उद्वहन हा शब्द योग्य ठरावा काय? उचल शब्दही मनांत आला, मात्र तो पैशाची उचल वगैरे अर्थाने वापरात आहे तेव्हा कदाचित बॉयन्सीसाठी योग्य ठरणार नाही. लिफ्ट वा एलेवेटरसाठी उद्वाहक हा शब्द वापरल्याची उदाहरणे पाहिली आहेत, मात्र तिथे बॉयन्सीचा काही संबंध नसतो. उद्धरण आणि उद्वहन ह्या शब्दांचा हिंदीत इरिगेशन संबंधात अर्थ आहे असे ऑनलाईन शोधात कळले, मात्र मला नेमका संबंध समजला नाही. लोकसत्तातल्या ह्या लेखामध्येही उद्धरण चा सिंचनाशी संबंध सापडला (तो कदाचित हिंदीचा प्रभाव असू शकतो). माझ्याकडील प्रगती सायन्स डिक्शनरीमध्ये बॉयन्सीसाठी मराठी प्रतिशब्द सापडला नाही. येथील मराठी व संस्कृत तज्ज्ञांनी योग्य शब्द सुचवावा.
योग्य प्रतिशब्द
मराठी आणि इंग्रजी या भाषांमध्ये सर्वार्थाने प्रतिशब्द सापडणे कठीण आहे . उदाहरणार्थ 'डावा' व 'उजवा' या शब्दांमध्ये 'लेफ्ट' व 'राइट' या शब्दांचे सर्व अर्थ येत नाहीत. 'सोडून गेला', 'निघून गेला', 'उरलेसुरले ' वगैरे 'लेफ्ट'चे अर्थ 'डावा' या शब्दात येत नाहीत आणि 'बरोबर', 'हक्क' हे 'राइट' चे अर्थ 'उजवा' या शब्दात अंतर्भूत नाहीत. 'डावा' व 'उजवा' या शब्दात जसा कमी अधिक असा दर्जा ध्वनित होतो तसा 'लेफ्ट' व 'राइट' या शब्दांत होत नाही.
'उद्धरण' हा शब्द 'बॉयन्सी ' या अर्थाने आर्किमिडीजच्या सिद्धांताच्या संदर्भात मी वाचला होता, त्यामुळे त्याचा हा अर्थ मला बरोबर वाटतो. आजकालच्या शाळेतील पुस्तकांत 'बॉयन्सी ' ला काय म्हणतात?
'उद्वहन' हा शब्द प्रचलित नाही . मी भाषातज्ज्ञ नाही पण 'एकादी वस्तू आपल्याबरोबर वरच्या दिशेने नेणे' असा त्याचा अर्थ मला जाणवतो. तो लिफ्टच्या बाबतीत योग्य असेल, पण हवा किंवा पाणी (फ्लुइडला मराठीत काय म्हणतात?) तसे करीत नाहीत. ते आधार देतात.
प्लावक बल
सत्त्वशीला सामंतांच्या शब्दानंदमध्ये बॉयन्सीसाठी 'प्लावक बल' असा प्रतिशब्द असल्याचे समजले. आर्किमिडिजच्या तत्वालाही तिथे प्लावक बल तत्व असे म्हटलेले आहे. (माझ्याकडे शब्दानंद नाही, मात्र माझ्या मैत्रिणीकडे आहे, तिला विचारले.) शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये हाच शब्द वापरतात वा नाही ह्याबद्दल पुरेशी माहिती नाही. मोल्सवर्थ मराठी - इंग्रजी शब्दकोशामध्ये 'प्लवन' चा अर्थ पोहणे व प्लव चा अर्थ छोटी नाव असा सापडला.
फायर अँड फरगेट...
जागा बदलणार्या लक्ष्यांचा वेध घेणारी क्षेपणास्त्रे अमेरिकेने विकसित केली आहेत. डिस्कव्हरीवर यासंदर्भातले कार्यक्रम बर्याचदा चालू असतात. एकदा क्षेपणास्त्र डागल्यानंतरही उपग्रहामार्फत त्यावर नियंत्रण ठेऊन त्याचा मार्ग हवा तसा बदलता येतो असे पाहिल्याचे आठवते.
भारतातही नौदलासाठी फायर अँड फरगेट यासारखी क्षेपणास्त्रे विकसित होत आहेत असे वृत्तपत्रात वाचले होते.
-सौरभ.
==================
लक्ष्यवेधी क्षेपणास्त्रे
लक्ष्य वेधण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते.
१. लक्ष्य नेमके कुठे आहे ते पाहून त्याचा अंदाज घेणे
२. त्याला गाठेपर्यंत मार्गक्रमण करणे.
पळत जाणार्या चोराचा पाठलाग पोलिस कसा करतो? जसजसा चोर वळून त्याचा मार्ग बदलेल त्याप्रमाणे तोसुध्दा आपला मार्ग बदलतो. त्यासाठी रॉकेटमध्ये उपयुक्त अशी साधने बसवावी लागतात आणि बसवली जात आहेत. उदाहरणार्थ लक्ष्यावर नजर ठेवणारा दिव्यदृष्टी असलेला डोळा, लक्ष्यापासून आपले अंतर दुरूनच मापणारी अद्भुत फूटपट्टी, हवी तशी दिशा बदलण्यासाठी सुकाणू, वेग वाढवण्यासाठी दुय्यम अग्निबाण वगैरे.
चंद्रयानातसुध्दा अशी साधने लागतात, पण चंद्र ठराविक कक्षेमध्ये ठराविक वेगाने फिरत असल्यामुळे त्यातील बरेचसे काम आधी करून ठेवता येते आणि आयत्या वेळी कराव्या लागणार्या सुधारणा कमीत कमी करता येतात.
मस्त प्रतिसाद
प्रतिसाद आणि त्यातही हे वाक्य आवडले.
साध्या सोप्या शब्दांतील
अग्निबाणांविषयी माहिती आवडली. अवकाशातून परत येण्याच्या तंत्रावरही थोडेफार लिहावे.
विकीवरील साहित्य
This comment has been moved here.