चन्द्रयान - यशोगाथा (पूर्वार्ध)
चंद्रयानाच्या उड्डाणाच्या अनुषंगाने गुरुत्वाकर्षण , अग्निबाण , अंतरिक्षात भ्रमण , उपग्रह आणि अग्निबाणांची निर्मिती या पहिल्या पांच भागात त्याच्या उड्डाणासाठी कराव्या लागलेल्या प्रयत्नांची थोडक्यात ओळख करून दिल्यानंतर या भागात मुख्य मुद्यावर येऊन चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणाची माहिती दोन भागात देत आहे.चंद्रयान प्रकल्पाची जाहीर घोषणा झाल्यानंतर लगेच त्यावर जे प्रतिसाद आले त्यात "आता हे कसले नवे खूळ काढले आहे?", "या लोकांना हे झेपणार आहे काय ?", "याची कोणाला गरज पडली आहे ?", "याचा काय उपयोग होणार आहे?", "आता याचा खर्च पुन्हा आमच्याच बोडक्यावर पडणार आहे ना?" अशासारखे प्रश्न अनेक लोकांनी विचारले होते. चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणानंतर त्याबद्दल वाटणारा अविश्वास आणि शंका दूर झाल्या आहेत. कालांतराने त्याचे महत्व पटल्यानंतर विरोधाची धारही बोथट होईल. यापूर्वी रोहिणी आणि आर्यभट यांच्या उड्डाणाच्या वेळीसुध्दा अशा शंका व्यक्त केल्या गेल्या होत्या. समर्पक उत्तरे मिळाल्याने त्यांचे निरसन आतापर्यंत झाले आहे.
चंद्रयान प्रकल्पाची रूपरेखा आंखतांनाच त्यामागची उद्दिष्टे निश्चित केली होती. यापूर्वी भारताने उडवलेल्या प्रत्येक उपग्रहाचा उपयोग वातावरणाचे तसेच भूगर्भाचे निरीक्षण, विविध स्वरूपाचे संदेशवहन इत्यादी पृथ्वीवरील जीवनाशी संबंधित होता. अंतराळातील ग्रहगोलांचे वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करून त्यांचा बारकाईने अभ्यास करण्याची ही पहिलीच भारतीय मोहिम आहे. त्यानुसार त्यावर बसवलेल्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे चंद्राविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती ते यान गोळा करणार आहे. चंद्राची पृथ्वीवरून दिसणारी (सशाचे चित्र असलेली) बाजू तसेच पलीकडली आपल्याला कधीच न दिसणारी त्याची बाजू या दोन्हींच्या पृष्ठभागांचा सविस्तर त्रिमित नकाशा काढणे, चंद्राच्या पृष्ठभागावरील तसेच त्याच्या गर्भातील विविध खनिजांचा शोध घेणे वगैरे उद्देशाने ही निरीक्षणे करण्यात येणार आहेत. मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह, टायटेनियम आदि पृथ्वीवर बर्याच प्रमाणात सापडणारी मूलद्रव्ये तसेच रेडॉन, युरेनियम व थोरियम यासारखी इथे दुर्मिळ असलेली मूलद्रव्ये यांची चंद्रावर किती उपलब्धता आहे याचा अंदाज यावरून येऊ शकेल. अखेर चंद्राचा जन्म नेमका कशामुळे आणि कसा झाला असावा हे समजण्याच्या दृष्टीनेही या निरीक्षणांचा उपयोग होऊ शकेल.
चांद्रयानाच्या मोहिमेचे खालील प्रमुख टप्पे सांगता येईल.
१. पृथ्वीवरून उड्डाण
२. अंतराळातून पृथ्वीचे अवलोकन करीत चंद्राकडे गमन
३. चंद्राच्या कक्षेत प्रवेश
४. चंद्राच्या कक्षेत त्याच्यापासून १०० कि.मी. अंतरावर राहून सुमारे २ वर्षे त्याचेभोवती नियमितपणे घिरट्या घालणे. हे चांद्रयानाचे मुख्य काम आहे. हे काम करतांना त्याने खालील गोष्टी करायचे योजिले आहे.
अ. चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्व बाजूंनी निरीक्षण करून त्याचे नकाशे तयार करणे.
आ. चंद्रावरील धातू, अधातू वगैरेंच्या साठ्यांचा अंदाज घेणे
इ. चंद्रावर उतरणारे (धडकणारे) छोटे यान पाठवून त्याच्या मार्गाचा अभ्यास करणे, तसेच आपल्या आगमनाची खूण चंद्राच्या पृष्ठभागावर ठेवणे.
ई. या छोट्या यानाने चंद्रावर धडकण्यापूर्वी त्याच्या जवळून घेतलेली माहिती जमा करणे.
या संपूर्ण कालावधीत चांद्रयानाकडून शक्य तेवढी माहिती पृथ्वीवरील केंद्राकडे पाठवत राहिली जाईल. येथील प्रयोगशाळांमध्ये त्याचे विश्लेषण होत राहील. यांतून नवनव्या शास्त्रीय गोष्टी समजत जातील व त्यांचा भविष्यकाळातल्या प्रयोगात उपयोग होईल. चंद्रावर उतरण्यासाठी योग्य जागा शोधायला त्यातून मदत मिळेल. अंतरिक्ष संशोधनासाठी आतापर्यंत नासाने केलेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या कित्येक नव्या गोष्टी आज सामान्य माणसाच्या वापरात आल्या आहेत. त्याप्रमाणे कदाचित पृथ्वीवरील जीवनात उपयोगी पडणारे शोधसुध्दा चंद्रयानाच्या मोहिमेतून लागू शकतात. या मोहिमेतले पहिले तीन टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. सध्या चौथा व्यवस्थितपणे चालला आहे.
२२ ऑक्टोबर २००८ रोजी सकाळच्या नियोजित वेळी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून चांद्रयानाने यशस्वीरीत्या उड्डाण केले. सुमारे चार दशकांपूर्वी अमेरिका व रशिया यांनी चंद्रावर स्वारी केली होती. त्यानंतर नील आर्मस्ट्राँग याने चंद्रावर उतरून मानवाचे पहिले पाऊल (की बुटाचा तळवा) त्याच्या पृष्ठभागावर उमटवला होता. अपोलो प्रोग्रॅममधून दहा बारा अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले. युरोपातील देशांनी संयुक्तपणे आपले यान चंद्राकडे पाठवले होते. वर्षभरापूर्वीच जपान आणि चीन या आशियाई देशांनी या क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर आता भारताचा क्रम लागतो. पृथ्वीवरून निघून चंद्रापर्यंत पोचण्याचे जे तंत्र चाळीस वर्षांपूर्वी विकसित झाले होते त्यात मूलभूत असा फरक दरम्यानच्या काळात पडलेला नाही. मात्र अत्यंत प्रभावशाली कॅमेरे, संदेशवहनाची साधने आणि संगणक आता उपलब्ध असल्यामुळे चांद्रयानाकडून पूर्वीच्या मोहिमांपेक्षा अधिक तपशीलवार, अचूक आणि अद्ययावत माहिती मिळणार आहे. या बाबतीतचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांच्या सहयोगाने करण्यात येणार आहे.
सुरुवातीच्या काळात भारताचे उपग्रह विकसित देशांच्या रॉकेट्सबरोबर अवकाशात पाठवले जात. त्याच्या जोडीने असे अग्निबाण भारतात तयार करण्याचे प्रयत्न चाललेले होते. पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल्स (पीएसएलव्ही) चे तंत्रज्ञान विकसित केल्यानंतर भारताने आपले उपग्रह त्यांच्या सहाय्याने अंतराळात पाठवणे सुरू केले. त्यात इतके यश मिळाले की भारताने आपले अनेक उपग्रह अवकाशात पाठवलेच, शिवाय परदेशांचे अनेक उपग्रहसुध्दा आतापर्यंत पृथ्वीवरून आभाळात उडवले गेले आहेत. याच मालिकेतल्या पीएसएलव्ही-एक्सएल जातीच्या अद्ययावत अग्निबाणाच्या सहाय्याने चांद्रयानाने उड्डाण केले. सुमारे पंधरा मजली गगनचुंबी इमारतीइतके उंच असलेले हे रॉकेट चार टप्प्यांचे आहे. यात घनरूप तसेच द्रवरूप अशा दोन्ही प्रकारच्या इंधनांचा उपयोग केला जातो.
त्यांच्या जोरावर उड्डाण केल्यानंतर चंद्रयानाचे वाहन पृथ्वीच्या सभोवती अतीलंबगोलाकार अशा कक्षेत फिरू लागले. साडेसहा तासात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतांना प्रत्येक आवर्तनात ते तिच्या पासून २५५ किलोमीटर इतके जवळ यायचे तर २२८६० कि.मी. इतके तिच्यापसून दूर जायचे. क्रमाक्रमाने हे अंतर वाढवीत त्याने ८ नोव्हेंबर रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर आपली कक्षा हळूहळू बदलून चंद्रयान त्याच्या ठरलेल्या कक्षेमध्ये फिरू लागले आहे. पृथ्वीवरून निघतांना हा उपग्रह १३८० किलोग्रॅम वजनाचा होता. चंद्राच्या मार्गावर जातांना सोडलेल्या रॉकेटमुळे त्याचे वजन कमी होत गेले. चंद्राजवळ पोचेपर्यंत आता ते ६७५ किलोग्रॅम झाले आहे आणि यापुढे तेवढेच राहील.
चंद्राच्या कक्षेतले आपले निश्चित स्थान ग्रहण केल्यानंतर १४ नोव्हेंबरच्या रात्री (भारतीय वेळेप्रमाणे) त्याने मून इंपॅक्ट प्रोब (एमआयपी) नांवाचा आपला एक दूत चंद्रावर पाठवून दिला. त्याच्या अंगावरच तिरंगा झेंडा रंगवलेला होता. सुमारे तीस किलोग्रॅम वजनाचा हा प्रोब स्वतःभोवती फिरत फिरत २५ मिनिटांनंतर चंद्रावर जाऊन नियोजित जागेवर उतरला आणि त्याने चंद्रावर भारताचा राष्ट्रध्वज नेऊन ठेवला आहे. उद्या चंद्राच्या पृष्ठभागाच्या मालकीवरून पृथ्वीवरल्या देशांदेशांध्ये वाद झाला तर त्यावर आता भारताला आपला हक्कसुध्दा सांगता येईल. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरता उतरता त्याने स्वतःभोवती फिरत चंद्राच्या विस्तृत भागाचे जवळून अवलोकन करून अनेक प्रकारची माहिती पाठवली आहे. भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज यापूर्वी पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर फडकला होताच, आता तो चंद्रावर जाऊन पोचला आहे.
. . . . . . . .. . . . . . . . . (क्रमशः)
Comments
मस्त
छान माहिती आहे. या मोहिमांबद्दल मला नेहमी एक प्रश्न पडतो. अवकाशात या यानांचे भाग सुटे होत जातात. मग या सुट्या झालेल्या भागांचे काय होते? अथवा जेंव्हा या यानांचे आयुष्य संपते तेंव्हा काय होते?
अवकाशातील कचरा
अग्निबाणामधील इंधन जळून जाते आणि त्यातून निर्माण झालेल्या वायुरूप पदार्थांचे (कर्बद्विप्राणील वायू, पाण्याची वाफ इ.) अणू अवकाशात इतस्ततः विखरून जातात. त्यांचे अस्तित्व जवळजवळ नाहीसे होते. पण अग्निबाणाचे कवच प्रत्येक स्टेजनंतर सुटून वेगळे होते ते एकाद्या उपग्रहाप्रमाणे पृथ्वीभोवती फिरत राहते. उड्डाणाच्या सुरुवातीला प्राणवायू किंवा हैड्रोजन वगैरेने भरलेले सिलिंडर रिकामे झाल्यानंतर असेच मागे सोडले जातात आणि फिरत राहतात. अग्निबाणाच्या वेगवेगळ्या स्टेजेसना जोडण्यासाठी वापरले गेलेले नट, बोल्ट, रिवेट, त्यातले गास्केट्स, नॉझल्स वगैरे असंख्य वस्तू सुट्या होऊन अवकाशात भरकटत असतात. अशा प्रकारचे लक्षावधी तुकडे आता पृथ्वीभोवती फिरत आहेत. मी लेखात उल्लेख केलेल्या कांही कारणांमुळे त्यांचा वेग कमी झाला तर ते आपली कक्षा सोडून पृथ्वीकडे येऊ लागतात आणि तो वेग प्रचंड वाढला तर हवेबरोबर होणार्या घर्षणामुळे तापून जळून जातात. अवकाश इतके विशाल आहे आणि यातले बहुतांश अवशेष एकाच दिशेने फिरत असतात यामुळे आतापर्यंत ते एकमेकांवर आपटण्याच्या घटना घडल्या नव्हत्या, पण एक निकामी झालेला रशियन उपग्रह आणि एक काम करत असलेला अमेरिकन उपग्रह यांची टक्कर होऊन त्यात तो निकामी झाल्याची घटना नुकतीच घडल्याचे आपण वर्तमानपत्रात वाचले असेल. अवकाशातील या कचर्यावर लक्ष ठेवण्याचेच काम कांही उपग्रहांना दिले आहे. अग्निबाणाच्य़ा सहाय्याने त्यांचा वेध घेण्यावरही संशोधन चालले आहे. हे काम यशस्वी होऊन हा कचरा साफ करण्याची यंत्रणा तयार होईपर्यंत तो असाच फिरत राहणार आणि त्यापासून मानवी यानांना असणारा धोका कदाचित थोडा वाढतच जाणार आहे.
धन्यवाद
शंका निरसन केल्या बद्दल धन्यवाद. या कचर्यामुळे नव्याने जाणार्या यानांना धोका होऊ नये असे संशोधन होणे गरजेचे आहे असे वाटते.
आढावा
चंद्रयान-प्रकल्पाची उद्दिष्ट्ये आणि टप्प्यांचे कालक्रम समजले.
उद्दिष्ट्यांविषयी सुरुवातीला नोंदवलेले लोकांचे प्रश्न
पैकी केवळ दुसर्या "झेपणार आहे का?" प्रश्नाचे उत्तर
बाकी "काय नवे खूळ" आणि "काय उपयोग होणार" प्रश्न येथे उत्तर मिळवतात.
"कोणाला गरज पडली आहे?" आणि "खर्च आमच्याच बोडक्यावर" या प्रश्नांची प्रभावी उत्तरे या लेखात नाहीत, आणि या लेखाचे ते उद्दिष्ट्यही नाही - जी माहिती दिली ती उत्कृष्ट आहे, आणि हे प्रश्न लेखाची दिशा विस्कळित करणारे आहेत.
जमल्यास वेगळ्या लेखात या प्रश्नांचाही विचार व्हावा.
(या प्रश्नांसाठी नव्हे तरी) पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत...
विस्कळितपणा
आपला मुद्दा माझ्या लक्षात आला आहे. एकादा शोधलेख लिहितांना मी कधीच अवांतर गोष्टी त्यात घुसडल्या नसत्या. पण जनसामान्यांना माझे लिखाण वाचावे असे वाटण्यासाठी त्यांना अपील होतील अशी वाक्ये टाकण्याचा मोह होतो. त्यामुळे थोडा विस्कळितपणा येतो खरा. तो कांही लोकांना चालतो अशी माझी समजूत आहे.
संवादी
हा विस्कळीत पणा 'संवादी' व 'प्रवाही' अर्थाने घेतला तर
हा खर्च भारतासारख्या विकसनशील देशाला अत्यावश्यक होता का? या प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेने चर्चा व्हावी. प्रकल्पाचा एकुण खर्च किती? किती टक्के विकासनिधी यावर खर्च केला?
प्रकाश घाटपांडे
आवश्यकता
माणसाच्या जीवनात असो किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेत असो, त्यातील प्रत्येक गोष्ट आवश्यकता या एकाच निकषावर ठरवता येत नाही. शिवाय कोणतीही गोष्ट आवश्यक आहे किंवा नाही हे ठरवण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे नियम असतात. अत्यावश्यकता ठरवणे ही तर फारच कठीण गोष्ट असते. या गोष्टी सापेक्ष असतात. तरीही देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार ज्या लोकांना दिले असतात त्यांच्यासमोर याबद्दल कांही मार्गदर्शक तत्वे असतात. त्यानुसार ते आपला निर्णय घेतात. त्यांनी घेतलेले निर्णय तपासून पाहण्यासाठी एक यंत्रणा असते. तिच्यावर निरीक्षण करणारे हिशेबतपासनीस असतात. माझ्या लेखाचा विषय फक्त तांत्रिक माहितीसंबंधित आहे.
या प्रयोगातून ताबडतोब मिळण्यासारखा दृष्य स्वरूपाचा लाभ नाही हे मी या लेखमालेत नमूद केलेले आहे. आज आंब्याचे झाड लावणारा त्याची फळे लगेच चाखू शकत नाही, त्याने झाडे लावणे ही गोष्ट त्याच्या दृष्टीने अत्यावश्यक नसते, पण भविष्यकाळात त्याचे वंशज ती चाखतील या अपेक्षेने तो झाडे लावत असतो.
चांगला लेख
लेख सुटसुटीत वाटला. याच लांबीचे लेख ठेवावेत असे वाटते. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
सुंदर
लेख आवडला. अशा स्वरुपाचे आणखी लेखही वाचायला आवडतील.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
चांगला लेख
२२ ऑक्टोबर २००८ रोजी उड्डाण केल्यावर चन्द्रयानाने८ नोव्हेंबर रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला म्हणजे जवळ जवलळ १६ दिवस घेतले पण पुर्वी गेलेल्या अमेरिकेच्या अपोलो यानांना चंद्रा वरती उतरण्या साठी ५ते ६ दिवस लागत.आपल्या यानाने जाणिव पुर्वक जास्ती वेळ घेतला असावा का? किंवा काय कारण असावे?
या प्रश्नाचे सविस्तर उत्तर
पुढील भागात (उत्तरार्धात) मिळेल. कृपया थोडी वाट पहा.